माझा ईश्वर स्त्री आहे - नूर जहीर

वेगळ्या उंचीची तर्कनिष्ठ लेखिका

ईश्वर आहे की नाही? प्रत्येक धर्मातील लोकांनी हा प्रश्न कधी ना कधी विचारलेला आहे. प्रत्येक काळात ईश्वर आहे असं मानणारे अस्तिक व ईश्वराचं अस्तित्व नाकारणारे नास्तिक अशी विभागणीही प्रत्येक समाजात पूर्वापार चालत आलेली आहे. जे ईश्वराचं असितत्व मानतात ते एकतर त्याला सगुण साकार रूप देतात किंवा सर्वव्यापी निराकार मानतात. रूप देणारे कधी केवळ प्रतिकांचा वापर करतात; तर कधी माणसासारखे, पण माणसाहून अधिक गुणवत्ता असलेले अतिमानवी दैवी रूप देतात. अनेक जे की, अनेक हात किंवा माणूस व प्राणी यांचा संयोग अशा कल्पना केल्या जातात. यातील बहुतांश दैवते 'तो' असतात, 'ती' नव्हे. मातृसत्ताक पद्धती लोप पावत जगभर पितृसत्ताक पद्धती रुजत गेल्या. क्वचित काही जागी मातृसत्तेचे अवशेष उरले, तिथे स्त्री-देवता तगून राहिल्या. बाकी बहुतेक जागी त्या नष्ट झाल्या आणि पुरुष दैवतांनाच महत्त्व आलं. तो ईश्वर, तो देवदूत, तो अल्ला, तो प्रेषित, तो पुजारी, तो भगत, तो मुल्ला, तो मौलवी... अशा सर्व जागी, पायरीपासून ते कळसापर्यंत, गाभार्‍यात व दिक्कालात सर्वत्र 'तो' च व्यापून राहिला. आणि 'ती' उरली ते केवळ आज्ञापालन करण्यासाठी आणि त्याच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी.

जिथं स्त्री-दैवतं शिल्लक होती, तिथंही ती केवळ प्रतीक म्हणून उरली. तिला अतिमानवी स्वरूप दिलं गेलं आणि प्रत्येक स्त्रीनं भौतिक आशा आकांक्षा, षडरीपु बाजूला सारून त्या दैवी पातळीवर पोचण्याची, आदर्श बनण्याची धडपड करावी, असं मानलं गेलं. ते ज्यांना जमणार नाही, त्या देवी म्हणून पूजल्या न जाता दासी म्हणून पायाशी ठेवण्यात आल्या. या दोन्हीही श्रेणींमध्ये स्त्रीला आपल्यातल्या माणसाकडे बघणं अशक्य होऊन बसलं. ती कायम अर्ध नारी व तो कायम ईश्वर अशी विभागणी झाली आणि पुरुषाशिवायची स्त्री अपूर्ण असते असं ठरवलं गेलं. पती नसलेली स्त्री व पुत्र देऊ न शकणारी स्त्री यांना समाजात हीन दर्जा प्राप्त झाला.

ज्या धर्मात ईश्वर निराकार मानला गेला, मूर्तिपूजा वर्ज्य समजली गेली, त्या धर्मातही ईश्वराला 'तो' च समजले गेले, 'ती' नव्हे. या पार्श्वभूमीवर जेव्हा नूर जहीर ही लेखिका 'माझा ईश्वर स्त्री आहे' असं लिहिण्याचं धाडस करते, तेव्हा त्या शीर्षकालाच पहिला सलाम केला जातो.

१९१७ साली रशियात झालेली कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाल्यानंतर जगभरच्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन करण्यासाठी कम्युनिस्ट इंटरनॅशनल ही संस्था स्थापन करण्यात आली. त्या काळात ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढणार्‍या कम्युनिस्ट चळवळीत अनेक मुसलमान होते. सुभासचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक व आझाद हिंद सेनेतही मुसिलमांची संख्या मोठी होती. हे संदर्भ सर्वसामान्य वाचकांपर्यंत अनेकदा पोहोचतच नाहीत. मुस्लीम आणि मागास हे शब्द बहुतेकवेळा जोडीने उच्चारले जातात. शिक्षित, उच्चशिक्षित मुस्लिमांनी स्वत:चा व्यक्तिगत विकास साधला, तरी सामाजिक व राजकीय क्षेत्रांमधलं त्यांचं योगदान दिसेनासं व्हावं इतकं अत्यल्प होत गेलं. बाकी समाजांशी संपर्क तुटल्यानं गैरसमजांची दरी वाढत गेली. नूर जहीर यांच्या कादंबरीतून हा सारा प्रवास आपल्याला दिसतो. कादंबरीची नायिका साफिया ही राजकीय-शैक्षणिक कार्यापासून तुटत एक सरकारी अधिकारी बनून सारा इतिहास विसरून कोषातलं व्यक्तिकेंद्रित आयुष्य जगू लागते आणि वृद्धपणी शहाबानोच्या खटल्याच्या निमित्तानं कृतीची, कृती शक्य नाही हे जाणवल्यावर लेखनाची, क्षीण धडपड करते. हे उदाहरण समग्रतेनं पाहिलं की वरील मुद्यांचा उलगडा सहजपणे होऊ शकतो. मात्र हे भान नसेल तर त्यामुळे कादंबरी सलग वाचताना एकदम तुकडा पडल्यासारखे विषयांतर झालं आहे की काय असंही वाटतं. पण माणसाचं आयुष्य आमुलाग्र बदलून टाकणारी अनपेक्षित वळणं आली की व्यकितगत मतं, सामूहिक जीवन, सांस्कृतिक संदर्भ आदी गोष्टीमध्ये इतकी टोकाची स्थित्यंतर होतात, हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागतं.


या कादंबरीचं अजून एक निराळं वैशिष्ट्य आहे, ज्याचा अदमास मला मराठीतील स्त्री-लेखनाशी या कादंबरीची तुलना करताना लागला. कथा, कादंबरी, आत्मचरित्रं यांतून पुरुषांचे, कुटुंबव्यवस्थेचे आणि समूहजीवनाचे नकारात्मक अनुभव आम्ही ठळकपणे मांडले आहेत आणि ते मांडण्यासाठी नकारात्मक वळणाच्या पात्रांची योजनाही केलेली आहे. पण योग्य, आदर्श, चांगलं काय आहे वा असेल वा असावं, याचा विचार मात्र आम्ही अजून पुरेशा प्रमाणात मांडलेला नाही. पुरुष कसे नसावेत, कुटुंब कसं नसावं, समाज कसा नसावा, नाती कशी नसावीत, इत्यादी स्पष्टपणे मांडताना हे सारं 'कसं असावं' याचा मोकळा विचार आम्ही केलेला आढळत नाही. नूर जहीर यांची कादंबरीत अब्बासच्या निमित्ताने आधुनिक, प्रागतिक विचारांचा आणि त्या विचारांना कृतीत आणण्याचा प्रयत्न करणारा नायक रंगवला आहे. कात्यायनजींसारख्या पात्राची त्याला जबरदस्त जोड आहे.

लग्न, मेहेर, बहुपत्नीत्व, तलाक, मशिदीत महिलांनी जावं की नाही याबाबतचा धार्मिक हक्काचा वाद अशा प्रश्नांवर झगडणार्‍या मुस्लिम विमेन्स जमात सारख्या संस्था या दशकात भारतात स्थापन झाल्या आहेत. दहा हजारांहून अधिक मुस्लिम महिला तिच्या सभासद आहेत. व्यकितगत पातळीवर लहान मोठे लढे मुस्लिम स्त्रिया लढत असल्याच्या बातम्या अधूनमधून कानी येतात. खोटा एकतर्फी तलाकनामा बनवून देणार्‍या जुन्या लखनौमधील सुल्तानुल मदारीसच्या तीन मौलवींना निशात फातिमा या महिलेने आपल्या दोन मैत्रिणींसह यथेच्छ चोप दिल्याची बातमी कादंबरीतील अशाच घटनांची आठवण करून देते आणि स्त्री-प्रश्नांवर काळ किती ठप्प झालेला आहे, याची जळजळीत जाणीव होते. पुरुषसत्ताक समाजाचा विरोध, कट्टर धार्मिक लोकांचा विरोध आणि अस्पष्ट विचार व गोंधळलेल्या मतांमुळे नेमकी भूमिका घेऊ न शकणारे कुंपणावरचे लोक, तसेच मुसिलम स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर धर्माच्या, विशेषत: हिंदू स्त्रियांनी का बोलावं असा विचार करून दुफळी मानणार्‍या स्त्रिया यांना सामोरं जात मुस्लिम स्त्रियांच्या संघर्षाची वाटचाल मंद गतीने सुरू आहे. कट्टरपंथी लोकांची शक्ती जगभर वाढत चालली आहे आणि देशानुसार प्रांतानुसार ओळख मिटत केवळ धर्मानुसार ओळख मानली जात आहे. त्याचा अजून एक मोठा तोटा म्हणजे "सगळे मुस्लिम सारखेच," असं म्हणत काही विशेषणं सरसकट सगळ्यांना लावली जात आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते शहाबानो खटल्यापर्यंचा (१९८५) काळाचा मोठा पट नूर जहीर यांनी ज्या ताकदीने रंगवला आहे, त्यातून त्यांची संवेदनशील व विचारी लेखक म्हणून दिसणारी ताकद विस्मयचकित करणारी आहे. भाव व्याकुळतेला कणभरही थारा न देता, विद्रोह असला तरी लेखन किंचितही आवाजी होऊ न देता, तर्कबुद्धीचा चकित वापर करत विविध घटनांच्या साखळीतून येणार्‍या ठाम विधानांनी ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते. पत्रकाराची लेखणी जेव्हा ललित लेखनाकडे वळते, तेव्हा पत्रकारितेतील लेखन वैशिष्ट्येही तिच्यात उतरतात. प्रतिमा-प्रतीकांचं जंजाळ बाजूला सारत ती निखळ तथ्यं सामान्यांच्या भाषेत मांडू लागते.

बालविवाहापासून ते पोटगीपर्यंत अनेक मुद्यांवर चर्चा करताना शरीयत अपरिवर्तनीय आहे म्हणत मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा विचारात घेऊन भारतीय संविधान व शासन हस्तक्षेप करू शकत नाही, असं ठणकावून सांगितलं जातं, पण पंथीय भेद पाहिले तर शरीयत अपरिवर्तनीय असल्याचा बुरखा आपोआप टरकावला जातो. शिया पंथात सर्वोच्च धर्मगुरू व त्यांनी नेमलेले इमान यांनाच शरीयतचा अन्वयार्थ लावण्याचा व अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. तर सुनी पंथियांत उलेमा आणि त्यांनी निर्माण केलेल्या विविध धर्मपीठांकडे हा अधिकार जातो. त्यांच्यात आपसातही अनेक मतं-मतांतरं आढळतात. प्रथम कुराण, कुराणातील न्यूनता भरून काढण्यास हदीस, हदीसही कमी पडेल तिथं इज्मा (विद्वान व धर्मशास्त्रज्ञांचं एकत्र मत) आणि कयास म्हणजे विवेकबुद्धी ही दोन साधनं आली. त्यात पुन्हा शरियतचे चार संप्रदाय आहेत. धर्मसंस्थांनी सामाजिक न्याय ताब्यात घेतल्यानंतर विकास प्रक्रिया कुंठीत झाली. ती बदलण्याचे प्रयत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि डा. महंमद इकबाल यांनी केलं. मात्र पारंपरिक उलेमांनी त्यांचे विचार दुर्लक्षित तर केलेच, पण दाबूनही ठेवले. ब्रिटिशांनी मात्र इंडियन पिनल कोड लागू करून शरीयतमधले जवळपास ८० टक्के कायदे रद्द केले आणि मुस्लिम पर्सनल लॉ हा विवाह, घटस्फोट, पोटगी आणि वारसाहक्क या चार मुद्यांपुरता शिल्लक राहिला. या चारही मुद्यांच्या बळी ठरल्या त्या स्त्रियाच! कादंबरीत हे तांत्रिक तपशील वा माहिती सविस्तर येत नसली, तरी काही मुद्दे तुकड्या-तुकड्यांनी येतात. त्यांचं आकलन वाचकांना व्हावं, म्हणून हा तपशील मी इथं थोडक्यात नोंदवला आहे.

इस्मत चुगताई नंतरचं मुस्लिम महिलांचं लेखन मराठीत अनुवादित होऊन आलंच नाही. इस्मत चुगताईंच्याही कथा सुट्या स्वरूपात वा प्रातिनिधिक संकलनात आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या सोळा कथांचा संग्रह अनुवादित केला. हे दुर्लक्ष एक मोठी दरी निर्माण करणारं आहे, हे जाणवत असतानाच नूर जहीरची आणि माझी भेट-ओळख झाली. उर्दूत प्रकाशित होऊ न शकल्यानं तिनं ही कादंबरी पुन्हा इंग्रजीत लिहिली. त्याखेरीजच्या भारतीय भाषांपैकी प्रथम मराठीत ती प्रकाशित होते आहे, हे मराठीच्या व महाराष्ट्राच्या पुरोगामी दृष्टिकोनाला साजेसं आहे. आपलं लेखन प्रकाशित करण्यास आपल्या भाषेत एकही प्रकाशक तयार नसणं आणि स्वत: प्रकाशित करायची ठरवल्यास मुद्रणालयांनी छापून देण्यास नकार देणं, हा संघर्ष दुर्दैवानं आजही भारतातील काही मोजक्या विद्रोही व आधुनिक विचारांच्या लेखिकांना करावा लागतो आहे. नूर जहीर त्यांपैकीच एक आहे.

अपघातानंतर परपुरुषाचं रक्त घेतलं म्हणून एका स्त्रीला व्यभिचारी ठरवण्याचं थोर काम दिल्लीतील एका पोलीस अधिकार्‍यानं केलं. अशा अनेक घटनांना पत्रकार म्हणून, लेखन म्हणून व कार्यकर्ता म्हणून समाजासमोर आणण्याचं कार्य ती ज्या चिकाटीने व सातत्याने करते आहे, त्याला तोड नाही. प्रागतिक लेखक संघ स्थापन करणार्‍या सज्जाद जहीर यांची ती कन्या. वडिलांचा वारसा तिनं आज एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. 'भारतीय लेखिका' या पुस्तकमालिकेतून अशा अनन्यसाधारण लेखिका मराठी वाचकांना परिचित करून देता येताहेत, ही गोष्ट मला फार आनंदाची वाटते आहे.

( या पुस्तकाला नुकताच या वर्षीचा सार्क पुरस्कार प्राप्त झाला आहे. :-)... )

लेखातील चित्र www.vitastapublishing.com येथून घेतले आहे. - संपादन मंडळ.

Comments

धन्यवाद

नूर ज़हीर ह्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीला साजेसेच त्यांचे कार्यकर्तृत्व दिसते आहे.
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर:
प्रगतिशील लेखक संघाशिवाय सज्जाद ज़हीर भारताच्या कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. नंतर 1948 साली भारत सोडून पाकिस्तानात गेले आणि फ़ैज़ अहमद फैज़सोबत पाकिस्तानाच्या कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली. त्यानंतर रावळपिंडी कटाच्या खटल्यात सज्जाद ज़हीर ह्यांना एक मोठा काळ (1948-54) पाकिस्तानी कैदखान्यांत काढावा लागला होता. त्यावेळी जेलमध्ये त्यांचे मित्र फैज़ सोबत होतेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगली ओळख

नूर झहिर यांच्या पुस्तकाची ओळख आवडली. लेख तूर्तास घाईत वाचला. नंतर सावकाश वाचून अधिक प्रतिक्रिया देता येईल.

छान

पुस्तकाचा परिचय अतिशय आवडला. मिळवून वाचायच्या यादीत या पुस्तकाची भर घातली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आभार आणि शुभेच्छा!

उत्तम परिचय. पुस्तक वाचावेच लागेल!
भारतीय लेखिका या प्रकल्पाद्वारे अनेक भारतीय भाषांतील लेखिकांच्या लेखनाचा, अनवट विषयांचा, काही दबलेल्या घटकांचा आवाज मराठी सारस्वतात दाखल करण्याचे उत्तम कार्य होत आहे.
या कार्याला शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

पुस्तक परिचय आवडला.

कादंबरीचा परिचय आवडला. या कादंबरीचे मराठी भाषांतर जरूर वाचेन.

काही प्रश्नही पडले.
या कादंबरीच्या नावाचा आणि तीतल्या कथानकाचा काही संबंध आहे काय?
ही कादंबरी मूळ उर्दूत लेखिकेने कधी लिहिली? तिचे उर्दुतील मूळ नाव काय होते?
शहाबानो खटल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
त्यामुळे पुरोगामी मुस्लिम पुरुषांच्या आणि पुरोगामी मुस्लिम स्त्रियांच्या मानसिकतेवर काही परिणाम झाला आहे का?
या कादंबरीचा दुसरा भाग लेखिका लिहिणार आहे का?

पुस्तक परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला. मिळाल्यास जरूर वाचेन.

 
^ वर