तर्कक्रीडा:२२: गंधर्व आणि यक्ष

.....हिंदी महासागरातील निसर्गरमणीय अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष अशा दोनच प्रकारचे लोक राहातात. सर्व गंधर्व नेहमी सत्यच बोलतात, तर सर्व यक्ष नेहमी असत्यच बोलतात .
..... अमरद्वीपावरील हे रहिवासी विवाहाच्या संदर्भात पुरोगामी विचारसरणीचे आहेत. वधूवरांची परस्पर संमती असली तर कोणतीही बंधने आड न येता गंधर्व-यक्ष विवाह इथे समारंभपूर्वक पार पडतात.
.......या द्वीपावरील एका गंधर्वकन्येला धनिक यक्षाशीच लग्न करावयाचे आहे. एकदा उपवनात सायंविहार करत असताना एक सुस्वरूप तरुण तिला दिसला. त्या युवकाला केवळ एकच प्रश्न विचारून त्याच्या 'हो' किंवा 'नाही' या एकशब्दी उत्तरावरून त्या चतुर कन्येने तो धनिक यक्ष आहे की नाही हे निश्चित केले. ............................. तर त्या बुद्धिमान युवतीने त्या तरुणाला कोणता प्रश्न विचारला असेल?
गंधर्व सत्य बोलतात तर यक्ष असत्य हे तिला ज्ञात आहेच.(तो तरुण धनिक गंधर्व, निर्धन गंधर्व,धनिक यक्ष अथवा निर्धन यक्ष असू शकेल.ज्याच्या घरी अश्वरथ असतो तो धनिक, तर अश्वरथ नसतो तो निर्धन असे अमरद्वीपावर मानतात.)
*********************
(प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित)

उत्तर कृपया व्यनि. द्वारे
..............यनावाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

तर्क.२२:गंधर्व-यक्ष

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गंधर्वकन्येने विचारलेला प्रश्न तो, एकलव्य,आणि प्रियाली यांनी अचूक शोधला. तो यांनी प्रश्न छान मांडला आहे.
विसुनानांनी उत्तर काढले आहे पण जरा आड वळणाचे आहे.
...........यनावाला.

तो कोणता प्रश्न ?

यनावाला साहेब,
गंधर्व कन्येने कोणता प्रश्न विचारला ? 'तो'चा प्रश्न सन्माननीय सदस्यांपेक्षा वेगळा कसा आहे.तो सांगावा ही नम्र विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योग्य प्रश्न कळावा...

यनासाहेब, योग्य प्रश्न कोणता ते उत्त्तर मिळाले नाही. दिलेत तर बरे!

तर्क.२२: गंधर्व-यक्ष उत्तर्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गंधर्व कन्येने प्रश्न विचारला, " तू निर्धन यक्ष आहेस काय?"
*** तो तरुण गंधर्व असेल (सधन वा निर्धन) तर 'नाही' असे उत्तर देईल.
***तो निर्धन यक्ष असेल तरी 'नाही' उत्तर देईल कारण तो खोटे बोलणार.
***केवळ धनिक यक्षच या प्रश्नाला "हो' उत्तरेल.
म्हणून वरील प्रश्नाचे 'हो' उत्तर आले तरच तो धनिक यक्ष. यावरून या प्रश्नाच्या 'हो' किंवा 'नाही' या उत्तरा वरून तो धनिक यक्ष आहे की नाही हे निश्चित होते.
............................
काहीनी विचारणा केली,"अश्वरथाचा उल्लेख कशासाठी?"
'धनिक' निर्धन' ही सापेक्ष विशेषणे आहेत.कोणतीही संदिग्धता राहू नये म्हणून या विशेषणांसाठी मानदंड देणे आवश्यक ठरते.

 
^ वर