रोगापेक्षा इलाज भयंकर
आजच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये आमिर खानने विकलांगांचा प्रश्न हाताळला होता.
विकलांग व्यक्ती सामान्यांसारखीच कर्तबगारी दाखवू शकतात. विकलांगांना सामान्य जीवन जगू द्यावे. त्यांच्यासाठी खास शाळा वगैरे न काढता सामान्य शाळेत सामान्य मुलांबरोबर त्यांना शिक्षण द्यावे असा विचार या कार्यक्रमातून मांडला गेला.
या एकूण मांडणीशी सहमत असलो तरी विकलांगांना सामान्य शाळेत सामान्य मुलांच्या वर्गात शिक्षण (विशेषतः अंध आणि कर्णबधीर) कसे देता येईल या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. सामान्य शाळेत त्यांच्यासाठी वेगळे वर्ग ठेवावे म्हटले तर त्या वर्गांचे अर्थकारण कसे जुळवावे हे कळत नाही.
वरील प्रश्नांपेक्षा अधिक डिस्टर्बिंग विचार त्या कार्यक्रमात मांडला गेला. अशा प्रकारे सामान्य वर्गांत विकलांगांना सामावण्याची कृती जी शाळा-कॉलेजे ५ वर्षांत करणार नाहीत त्यांची मान्यता रद्द करावी का असा प्रश्न प्रेक्षकांसाठी ठेवला गेला. त्यावर येस / नो अशी मते एसएमएस द्वारा मागितली आहेत.
मला या मान्यता रद्द करण्याच्या धोरणात मोठाच धोका दिसतो.
सामान्यांबरोबर विकलांगांना शिक्षण द्यायचे म्हणजे त्याच शाळेत वेगळा वर्ग हाच एक उपाय मला दिसतो. त्याचे अर्थकारण जुळवता न आल्याने पाच वर्षांत बहुतेक शाळा कॉलेजे* आपली मान्यता गमावून बसतील. म्हणजे शाळा कॉलेजांची संख्या एकदम कमी होईल. मुलांनी शिक्षण कुठे घ्यावे असा प्रश्न निर्माण होईल.
मला हा रोगापेक्षा भयंकर इलाज वाटतो. उपक्रमींना काय वाटते?
*बड्या धनिकांच्या इलिटिस्ट शाळा या धोरणाला बगल देतील आणि मान्यता रद्द होण्याच्या भीतीला मुळीच भीक घालणार नाहीत. "हवी आहे कुणाला तुमची मान्यता?" असा प्रतिप्रश्न करून कुठल्या तरी फॉरेनच्या विद्यापीठाची मान्यता मिळवून चालूच राहतील.
Comments
सहमत,असहमतही.
आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे याची तीव्र जाणीव होऊन विकलांगांमधे न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी त्यांना इतरांप्रमाणेच वागणूक मिळावी हा हेतू असेल तर तो स्तुत्य आहे आणि तत्त्वतः व काही अंशी बरोबर आहे. पण ह्या विषयीचे सूत्र तयार करताना तारतम्य बाळगणे अत्यंत आवश्यक मानावे. विकलांगांमध्ये काही शारीरिक(वा मानसिक) क्षमता सर्वसाधारणांपेक्षा कमी असतात. तश्या त्या नाहीतच अशी समजूत करून घेऊन तशा प्रकारे त्यांच्याशी वागण्यापेक्षा तश्याच त्या आहेत आणि राहाणार आहेत हे पटवून घेऊन वागणे हे केव्हाही शहाणपणाचे .अर्थात् असे वागताना आश्रयदातेपणाची(पेट्रनाय्झिंग्) भावना टाळली पाहिजे. या अर्थाने बरोबरीने वागावे हे बरोबर. पण तीव्र कोटीच्या विकलांगांसाठी विशेष शाळा/महाविद्यालयांची नक्कीच आवश्यकता आहे.
त्यातही गंमत अशी आहे की या स्पेशल् किंवा विशेष विद्यालयांपर्यंत पोचताना/पोचण्यासाठी (जाणे-येणे या अर्थी) या मुलांना सर्वसाधारण मुलांप्रमाणेच सर्व धकाधकीला तोंड द्यावे लागते, कारण ह्या शाळा/महाविद्यालये बहुधा निवासी नसतात. पण पुन्हा, जर त्या निवासी केल्या तर ही मुले कोंडवाड्यात पडल्यागत होतील आणि बाहेरच्या स्पर्धात्मक वातावरणाला मुकतील. स्पर्धात्मक खुले निकोप वातावरण आणि सुरक्षितता ह्या दोन्ही गोष्टी एकाच चौकटीत मिळणे कठिण दिसते.
ऑन-ऑफ कंट्रोल!
एकुणच भारतातली सामाजिक परिस्थिती पाहता ह्या प्रकारचे आत्यंतिक उपाय सुचवले जाणं स्वाभाविक आहे.
एखाद्या संस्थेत (शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं) प्रवेश मिळण्यासाठी काय निकष असतील ते असतील त्याबाबतीत तडजोड करायची गरज नाहिये. पण संस्थेत अपंगांसाठीची स्वच्छतागृह नाहियेत, सगळीकडे जिनेच आहेत किंवा इतर पालक विरोध करतात म्हणून प्रवेश नाकारू नये असं वाटतं.
गडबड आहे खरी
सत्यमेव जयतेचा आजचा एपिसोड पाहणे जमले नाही पण या विषयावर बोलायचे झाल्यास, अमेरिकेतील बर्याचशा पब्लिक स्कूल्समध्ये अपंग आणि विकलांग मुलांना इतर मुलांच्या सोबत शिक्षण मिळते. हे होताना त्या शाळांकडे अशा मुलांना शिक्षण देण्यासाठी उपाय योजना असते. काही वर्गात या मुलांना इतर मुलांसोबत बसवले जाते तर काही वर्गांसाठी त्यांना स्पेशल शिकवणी दिली जाते. अशा मुलांच्या पालकांवर आधीच खूप ताण असतो. त्यात शाळांची सोय जवळ नसल्यास आणि मुलांना कुठेतरी दूरवर नेणे आणणे भाग पडते. सर्वसाधारण मुलांप्रमाणेच शाळेत स्वतःहून ये-जा करणे या मुलांना कधीकधी शक्य नसल्यास तो बोजा पालकांवर पडतो. हे जितक्या विकलांग मुलांच्याबाबत टाळता येण्याजोगे असेल तितक्यांना तरी इतर मुलांबरोबर शिकण्याची संधी मिळायला हवी.
अंध मुलांना मी इतर मुलांच्या सोबत शिकताना पाहिले आहे. त्यांना थोडेसे हँड होल्डींग लागते इतकेच. काही ऑटिस्टीक मुलांनाही सर्वसाधारण मुलांच्या शाळेत शिकताना पाहिले आहे. या पेक्षा अधिक काळजीची गरज असणार्यांसाठी वेगळ्या शाळा असतात.
दादा कोंडके म्हणतात त्या मुद्द्यात थोडी भर घालून म्हणेन की आजही भारतातील किती शाळांत अपंगांसाठी सोय केलेली असते? यांत स्वच्छतागृह, एलिवेटर्स इ. अनेक गोष्टी आहेत. ते जर नसेल तर शाळांवरही अचानक सक्ती होणे कोणाच्याच फायद्याचे नाही.
:-) करमणूकप्रधान कार्यक्रम आहे ना! पूर्वीच्या कार्यक्रमांचे रिझल्ट अद्याप दिसले नाहीत. काळजीचे कारण नसावे.
आततायी वाटला नाही
कार्यक्रम बघितला नाही . मात्र प्रश्न अगदीच आततायी वाटला नाही.
सामान्य शाळेत विकलांग मुलांना शिकताना पाहिले आहे. आमच्याच वर्गात एक कर्णबधीर मुलगा २ वर्षे होता. पहिल्या बाकावर बसायचा आणि ओठांच्या हालचालीवरून बरेचसे समजून घ्यायचा. (त्याला बोलता येत होते - मुकबधीर नव्हता). शिवाय स्वतःचे वाचन त्या वयातही खूप असल्याने त्याला सामान्य शाळेत शिकणे अजिबातच कठीण जात नसे. त्याला उत्तम मार्क मिळाल्याचेही आठवते आहे. (शाळेने सोडायला सांगितले नव्हते. वडिलांची बदली झाल्याने परगावी गेला होता)
अन्य प्रकारच्या अपंगांसाठीही शाळेत योग्य इन्फ्रास्ट्रक्चर असले तर 'विषेश वर्गांची' गरज पडू नये असे वाटते.
ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>
आर्थिक बाजू
कार्यक्रम मलाही आततायी वाटला नाही. परंतु विचारला गेलेला प्रश्न "भ्रष्टाचार्यांना फाशी द्यावी का?" असा र्हेटरिकल* + अपेक्षित उत्तराकडे निर्देश करणारा वाटला. हे खरेच धोरण म्हणून स्वीकारले तर जे परिणाम होतील त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.
विकलांगांना सामान्यांच्या शाळेत प्रवेश द्यावा याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांना नेहमीच्या वर्गात बसवून शिकवले जाणे कितपत शक्य आहे. अंध विद्यार्थ्याला फळ्यावर शिक्षकांनी लिहिलेले दिसणार नाही. म्हणजे शिक्षक फळ्यावर काय लिहिणार याची आगाऊ प्रत ब्रेल लिपीत तयार करून त्याला द्यायला हवी. हे प्रत्येक विषयासाठी प्रत्येक शिक्षकाला करणे शक्य होईल असे वाटत नाही. पुन्हा अशी कॉपी देणे म्हणजे शिक्षकाचे उत्स्फूर्तपणे शिकवणे लिमिट होईल. एखाद्या विद्यार्थ्याने शंका विचारली तर त्याचे निरसन आकृती काढून केले तर ती आकृती अंध विद्यार्थ्याला कशी दिसणार ? (शंका आयत्यावेळी विचारल्यामुळे आगाऊ प्रत दिलेली नसणार). त्यामुळे अंध व कर्णबधीर विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिकवणे फारच इम्प्रॅक्टिकल वाटते.
प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे काही विषय नेहमीच्या वर्गात आणि काही विषय वेगळ्या वर्गात शिकवायचे झाले तर ते (निदान अनुदानित आणि सामान्य विनाअनुदानित) शाळांना आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही.
याचा अपरिहार्य परिणाम शाळांची मान्यता रद्द करण्यात होणार असेल तर ते भयंकर आहे.
[नाहीतरी शाळांमध्ये शिकवणे होतेच कुठे? तेव्हा सामान्य आणि अपंग मुले एकत्र असण्याने असा काय फरक पडणार? असा विचार असेल तर ठाऊक नाही] ;-)
*येथे मला आमच्या गृहनिर्माणसंस्थेच्या सर्वसाधारण सभेची आठवण होत आहे. सभेत वॉचमनचे पगार वाढवावे या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा मिळाला. पुढचा ठराव वॉचमनचे पगार वाढवण्यासाठी वर्गणीत वाढ करावी असा ठराव येताच त्याला एकमुखी नाही तरी बराच विरोध झाला. म्हणजे "आम्हाला तोशिस न लागता चांगले होत असेल तर चालेल" अशी समाजाची धारणा असते. हीच धारणा आपल्याला इतर वेळी दिसते. समाजातल्या कमजोरांसाठी "सरकारने काहीतरी करावे" पण त्यासाठी आमच्याकडे कर मात्र मागू नये. अशा परिस्थितीत या एकत्र शाळांच्या प्रस्तावाचे आर्थिक गणित कसे बसणार याची काळजी आहे.
नितिन थत्ते
सहमत्
>>अंध व कर्णबधीर विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिकवणे फारच इम्प्रॅक्टिकल वाटते.<<
सहमत, बाकी, पंचेद्रिय व्यवस्थित असणार्या आणि मंद नसणार्या भिन्न-क्षमता व्यक्तिंना समान शिक्षण हवे हे पटते.
तसेही, धडधाकट लोकांना अपेक्षीत समानतेपेक्षा भिन्न-क्षमता व्यक्तीच्या दृष्टीकोनातून उचित विकास हे उद्दीष्ट जास्त योग्य वाटते.
सहमत मात्र..
प्रत्येक प्रकारच्या अपंगाला शिक्षण देणे व्यवहार्य नसावे याच्याशी सहमत. असे सरसकटीकरण कार्यक्रमाचे स्वरूप बघता करावे लागले असावे. प्रत्यक्ष नियम बनताना इतरही गोष्टींचा विचार सरकारला करावा लागेलच. तेव्हा मागणी करतानाच जर समंजस मागणी केली तर हाती अधिक 'निगोशियेटेड' प्रोडक्ट पडण्याची शक्यता वाढते असे काहिसे सुत्र असावे. :-)
माझ्यामते अश्या अपंगांसाठी वेगळ्या शाळा असाव्यात. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांना सामान्य शाळेत शिकायचे असेल तर केवळ तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून शिकता येणार नाही अशी वेळ येऊ नये. तेव्हा काहि बेसिक सुविधा (जसे शाळेत लिफ्ट असणे किंवा व्हीलचेअर नेता येईल असा रँप असणे, दृष्टीहिनांसाठी ठिकठिकाणी ब्रेलकोड असणे (जसे लिफ्टची बटणे, पंक्झ्यआंची-लाईटची बटणे इत्यादी)असे बरेच सुचवता येईल. मात्र असा 'सेट ऑफ बेसिक नेसिसिटीज' करून किमान त्या तरी असल्याच पाहिजे अन्यथा परवाना रद्द होईल असा नियम व्यवहार्य + गरजेचा वाटतो
ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>
ऋषिकेशजी,
इतके गंभीर विषय जर मांडत असाल तर असले उथळ 'करावे लागले असावे' अशी माफी देता येत नाही. सरसकटीकरण करून सवंग प्रसिद्धी लाटणे अन् सॉफ्ट टार्गेट्सवर हल्ला करणे 'तिथे' प्रच्छन्नपणे सुरू आहे.
हे दोन डगरींवर् हात ठेवणे नव्हे काय?
भारतात कोणत्याही शहरात, समजा मी एक लिफ्ट 'गिफ्ट' दिली,(म्हणजे लिफ्टची भांडवली किंमत सोडा, रोजचा खर्च बोलू यात.) तर ती १ वेळा वर खाली करताना किती रुपये खर्च येतो, व तो त्या शाळेने कोणत्या प्रकारे उभारावा, हे जरा सांगाल काय? अन् हा भांडवली खर्च, केवळ काही मुलांसाठी प्रत्येक शाळेने करणे 'सेन्सिबल', की त्या सुविधेची गरज असणार्या मुलांसाठी वेगळी शाळा करून त्या खर्चाचे योग्य उपयोजन (proper utilization) हे भारतासारख्या 'रिसोर्स् पूअर्' देशात जास्त योग्य ठरेल?
परवाना म्हणताच एकतर शेरोशायरीतली शम्मा आठवते, किंवा तुपकट तोंडाने 'चहापाणी' मागणारा सरकारी अंमलबजावणीदार...
अव्यवहार्य अन अनावश्यक या दोनच शब्दांत असल्या 'परवान्यां'चे वर्णन करता येईल.
***
वेगळ्या पट्टीवरः
केवळ अंधशाळा/मूकबधिर शाळा असते, व ती माझ्या मुलासारख्या 'लीगली' वा 'इकॉनॉमिकली' ब्लाईंड / डेफ-म्यूट मुलांना स्वतःच्या पायावर उभे करू शकते हेच माहित नसल्याने 'मेनस्ट्रीम' शाळेत शिकणारी हजारो मुले या देशात आहेत, व ती मुले कशीबशी, व कधी कधी नेत्रदीपक कामेही करीत आहेत, हे वास्तव आहे. अशा मुलांना शोधून काढून कमीतकमी आहे त्या सुविधांपर्यंत पोहचविता आले तरी भरपूर होईल..
सहमत.
थत्तेजी,
तुमच्या निरिक्षण व विष्लेशणाशी सहमत आहे.
शोमनशिपची, व त्यात स्वतःच तयार केलेल्या स्वत:च्याच समाजसेवक या प्रतिमेची झिंग चढली की असे विचार न करता सादरिकरण होते. असो.
प्रियालीतै वर म्हटल्याच आहेत-
:-) करमणूकप्रधान कार्यक्रम आहे ना!
सत्यमेव जयते आणि चर्चा
सत्यमेव जयतेचा एपिसोड झाला की चर्चांना उत येतो. लोकं चर्चा करतात हेच यश म्हणावे लागेल. चर्चांचा एकुणच सुर नेहमी अमिर खानला शहाणपणा शिकवण्याच असतो. जसा अण्णा हजारेंना शिकवण्यात. :) अर्थात त्यात काही चुक आहे मी मुळीच म्हणणार नाही. प्रत्येकाला आपले मत आहे आणि ते व्यक्त करण्याचे हे व्यासपीठ आहे. प्रतिसाद देण्याची झिंग चढली की आपलेच मत खरे वाटते. मला सुद्धा...
बाकी अनेक चर्चांमध्ये भारतासारख्या देशात अमुक अमुक उपाय योजणे कठीण आहे वगैरे सुर दिसुन येतो. पण भारतात कमीत कमी काय करणे गरजेचे आहे? काय शक्य आहे या बद्दल बोलताना कोणीच दिसत नाही. किंबहुना महाजालावर चर्चा करुन त्यांना प्रसिद्धी मिळत असताना लोकं फक्त दुसर्याला शहाणपणा शिकवण्यात धन्य मानताना दिसतात. आपण स्वतःसुद्धा एखाद्या समस्येचा भाग आहोत हेच मुळी कोणाला मान्य नसते. मग असे प्रतिसाद देऊन स्वतःला खोटे खोटे खरे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
आता हा जो शाळांचा विषय आहे, दिल्ली मधली ती शाळा दाखवलीच ना? ज्यांना समस्या सोडवायची आहे त्यांनी सोडवलीच ना? आज भारतभर नाहीत होणार अशा शाळा पण भविष्यात? किती खर्च येईल काही कोटी ना? जिथे लाखो कोटींचे घोटाले बाहेत येतात तिथे कोणत्याही राजकारण्याला काही कोटी उभे करणे किती अवघड आहे. यासाठी आपण आंदोलन करु का? पण टोलचे आंदोलन असेल तर गाव गोळा होईल. आठ दिवस पाणी नाही आले तर मोर्चे निघतील आणि कोणी बंद पुकारलाच तर याने काय होणार आमचेच हाल करुन अप्रत्यक्षपणे सरकारच्या अत्याचाराचे समर्थनच करणार. एकुण काय मी समाजावा एक भाग आहे आणि एखादी समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी सुद्धा आहे हा विचार फार कमी प्रमाणात दिसतो. त्यापेक्षा माझ्यासाठी त्यात काही आहे का? माझ्यावर परिणाम होणार आहे का? कि या समस्येचा मी भागच नाही असा सुर सर्वत्र दिसतो. असो, चालायचेच. कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व...
झिंग.
मला वाटते, की आपलेच मत खरे आहे अशी खात्री पटल्याशिवाय कुणी प्रतिसाद टंकीत नसावेत. मग यात प्रतिसाद देण्याची झिंग आली कुठून? की बहुतेक लोक आधीच झिंगून मग प्रतिसाद टंकायला बसतात असे काहीसे आहे? (हलके घ्या!)
नुसतेच काय करणे गरजेचे आहे अशी दिवास्वप्ने पहाण्यापेक्षा ग्राऊंड रिऍलिटीज् पाहिल्यात व त्या नुसार वागले तर बरे, असे म्हटले तर काय चुकीचे आहे? भारताची कॉण्टेक्स्ट नसेल तर घेतलेले निर्णय शेखचिल्ली प्रकारचेच होऊ शकतात व होतातही. आपण भारतात आहोत, हे सत्य आहे, हे आपण ऍक्सेप्ट करावयाचे नाही तर कुणी करायचे?
बाकी वायफळ चर्चांऐवजी अमुक प्रॉब्लेम आहे (उदा. आपण भारतीय शाळांबद्दल बोलत आहोत, जिथे एक् मोठा टक्का शाळेत येतच नाही, अन् आला तर प्रायमरि लेवलनंतर गळतो,इ.), हे मान्य करून त्यावर इलाज शोधण्याचा प्रयत्न कमी वेळा दिसतो या बाबीशी सहमत. याचसाठी, लिफ्ट इ. सारख्या सुविधांवर खर्च न करता तो कुठे व कसा केलेला योग्य राहील याचे माझे निरिक्षण वर ऋषिकेश यांना लिहिलेल्या प्रतिसादात आहे. माझ्या परिने यात करण्यासारखे आहे ते करतोच आहे, तुम्हीही योग्य त्या जागी सामाजिक भान पाळून कार्य करीतच असाल, त्याला शुभेच्छा!
झिंग
मी माझ्या संगणका समोर बसुन प्रतिसाद टंकतो. कदाचित तुम्ही म्हणता तसा माझ्या विचारांनी झिंगून बसत असेन सुद्धा. म्हणूनच म्हटले ना की जालावर प्रतिसाद देताना आपलेच मत खरे वाटते. उपक्रमावर अनेकजण माहितीआधारे लिहितात त्यामुळे मी माझी मते बदलली सुद्धा आहेत.
तेच तर म्हणतो आहे. समस्येवर उपाय शोधणे म्हणजे दिवास्वप्न आणि आपण भारतात काही एक करु शकत नाही या निराशेने पहाणे म्हणजे ग्राऊंड रिऍलिटीज् हा विचार मला पटत नाही. समस्या काही फक्त भारतात नाहीत. पण समस्येची सामाजिक जाणीव एखाद्याने करुन दिली तर त्याला शहाणपण शिकवणारा माणूस म्हणून मुर्खात काढणे हा सुद्धा शहाणपणा नाहीच ना?
आता, तुमच्याच विचारांनी जायचे म्हटल्यास शुन्यातुने एक शाळा उभी करणे व्यावहारीक की असलेल्या शाळेत एखादी लिफ्ट उभी करुन सध्याची सोडवण्यासारखी समस्या सोडवणे व्यावहारीक? एखादी सध्याची छोटी समस्या पहिला सोडवणे जास्त व्यावहारीक नाही का? निदान ज्यांना शक्य आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांना तरी जाता येईल? कि काही जणांना जाताच येत नाही आणि ते सोडवणे गरजेचे आहे म्हणून ज्यांना जायचे आहे त्यांची सोयच करायची नाही?
नव्याने सुरु होणार्या शाळांना असे नियम घालणे आणि त्याचे पालन होते आहे की नाही हे पाहणे हा सुवर्णमध्य होऊ शकतो ना? कार्यक्रमामध्ये एका अंधाने सांगितलेला किस्सा फारच बोलका होता. अंधाला दिसत नाही हे मान्य पण त्या सोबत सर्वसामान्य त्यांना बहिरे समजतात हे जास्त भयानक वाटते.
तुमचे बरोबर आहे,
परंतू अशा स्पेशल हँडिकॅप्ड लोकांसाठी शाळा आधीच अस्तित्वात आहेत, (लिंकवर् अलि यावर जंग इन्स्टिट्यूटची लिस्ट फक्त कर्णबधिरांसाठीच्या शाळांची दिलेली आहे, जरा डोळ्याखालून घालाच. ही इन्स्टिट्यूट् या विषयावर काम करणारी अशियातील सर्वोत्तम संस्था आहे. सरकारी आहे. मुंबईत आहे.) त्या शाळांची संख्या ठिकठिकाणच्या सरकारी रुग्णालयांनी 'इश्यू' केलेल्या 'अपंगाच्या दाखल्यांच्या' प्रमाणात पुरेशी आहे, व त्या शाळांना मदतीची, आधुनिकीकरणाची गरज आहे हे मी सांगतो आहे. त्या शाळा अस्तित्वात आहेत, तसेच, त्यासाठीच्या सरकारी ग्रँट्स कागदी शाळाही काढून काही 'हुशार' लोक मधेच लाटताहेत, हेच बहुतांश लोकांना ठाऊक नाही असे दिसते.
या अस्तित्वात असलेल्या स्पेशलाईज्ड शाळांना सक्षम व विकसित करणे अधिक निकडिचे, की आहेत त्या इतर मेनस्ट्रीम शाळांना अनावश्यक नियम लादून अधिक अडचणीत आणायचे? हा प्रश्न मी विचारत होतो.
दुसरे, आजकाल मेट्रोज् मधे शाळा म्हटले की के.जी. पासून लाखात फी उकळणारी संस्था असा ट्रेण्ड् आहे, तो संपूर्ण देशाला लागू नाही, असेही निदर्शनास आणून द्यावेसे वाटते. पण एकदा अशा प्रकारचा नियम केला, तर तो सगळ्यांनाच लागू होईल, अगदी आदिवासी पाड्यावरील शाळेसही. मग कसे करावे? याला मी ग्राऊंड रिऍलिटी म्हटलो.
या बाबी, केवळ तुमच्या निदर्शनास आणून देणे हा हेतू. अपंगांसाठी काही केले पाहिजे या बद्दल दुमत अजिबातच नाही. त्या कार्यक्रमात मांडले ते विचार 'अल्टिमेट आयडियल' आहेत, कधीकाळी भारताने तिथे पोहोचावेच. पण सुरुवात कुठून अन कशी केलेली जास्त योग्य राहील, हे या विषयात थोडे काम करून मग अनुभवातून इथे मांडावे या हेतूने लिहीले आहे.
टीव्हीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून कुणी सामाजिक समस्या मांडत असेल तर मला आनंदच आहे. पण त्या समस्या मांडताना रिसर्च पुरेसा होत नाहिये, सर्व अंगे तपासली जात नाहियेत, व मांडणी ही वास्तववादी होण्या ऐवजी पॉप्युलरिस्टिक प्रकाराने होते आहे, असे मला ज्या विषयांतले समजते, तितक्या विषयांवरील हे कार्यक्रम पाहून वाटले, तेच इथे मांडले आहे. (रिहॅबिलिटेशन : अपंगाचे पुनर्वसन हे ही डॉक्टरचे महत्वाचे काम असते, व ते करू शकणार्या संस्थांची त्याला माहीती असणे गरजेचे असते.)
माझे विचार वाचून त्यातील कच्चे दुवे पुनः तपासून पहाण्याची आपण मला संधी दिलीत, धन्यवाद.
कायदा
कोणताही सरकारी कायदा टिव्हीवरचा एक कार्यक्रम पाहुन होत असेल वाटत नाही. त्यावर सारासार विचार व्हायलाच हवा. समस्येचे अनेक कंगोरे असतात. त्यांचा विचार होत असेलच. याच बरोबर सध्या कायदा बनवणारे काय करतात आणि चांगले कायदे होण्यापासून कसे पळ काढतात ते आपण पहातो आहोतच.
हा मुद्दा बरोबर आहेच. पण याची दुसरी बाजू बघायचा प्रयत्न केल्यास जाणवेल कि या समस्यांना जास्तित जास्त लोकांना समजावणे त्यासाठी समस्या दाखवणे, विदा दाखवणे, त्यावर चालु असलेल्या चांगल्या कामाची माहिती दाखवणे या सर्वांसाठी जाहिराती पकडून दिड तास हा वेळ कमी नाही का?
असे काही करणे हेच बर्या पैकी स्तुत्य वाटते. असो, तुमचा प्रतिसाद सुद्धा बरोबर आहेच.
हा हा...
प्रतिसाद आवडला! :)
सध्याची खरी परिस्थिती काय आहे हे जास्तितजास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचं पोटेंशिअल या कार्यक्रमात आहे. आपण एक समाज म्हणून काय करू शकतो, सरकारनी काय करायला हवं याचा उहापोह होतो. या निमित्तानं क्रिकेट आणि डेलीसोपमध्ये अडकून बसलेल्यांत काहितरी हलचाल् तर आहे! आणि विषय तर उत्तम निवडलेत. नाहितर "चाइल्ड सेक्ष्युअल अब्युज" सारख्या विषयाचं गांभिर्य घराघरात कळणं अवघड होतं. माझ्या परिचितांपैकी 'या विषयावर मुलांशी कसं बोलावं?' असं विचार करणार्यांनी आपल्या मुलांना अमिरखानचा तो वर्कशॉप दाखवला.
प्रत्येक भाग बघितल्यावर या टीमचं कौतुकच वाटतं मला.
बाकी प.पु. राजूमहाराज स्रिवास्तवजी यांच्या शब्दात सांगायचं तर "थोडा कुछ अच्छा होरेला है तो क्या बीच मे उंगली करना जरूरी है क्या?" :)
कार्यक्रम योग्यच आहे पण....
कार्यक्रमाविषयी काही ऑब्जेक्शन नाही. पण कार्यक्रमातून निर्माण होणारे सोशिओ पॉलिटिकल प्रेशर बरेच आहे असे दिसते. पहिला भ्रूणहत्त्यांचा कार्यक्रम होताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून काही कृती होणे वगैरे.
त्या दृष्टीने असे एसएमएसद्वारा मते मागवून त्याचे जे निष्कर्ष येतील त्यावरून असले कायदे करण्याचे प्रेशर येऊ शकेल. [फेसबुकी गदारोळाने जसे लोकपाल कायदा करण्याचे प्रेशर आले]. एसएमएसचा निष्कर्ष मान्यता रद्द व्हावी या बाजूने ९९% वि १ % येईल याची पूर्ण खात्री आहे.
नितिन थत्ते
प्रतिखाप
तसा दबाव नकोच.
नागपूरला एका बलात्कार्याला महिलांनी कोर्टात ठेचून मारले (संदर्भ).
राजस्थानमध्ये नेमकी काय कृती झालेली आहे? प्रसिद्धी मिळालेल्या प्रकरणांमध्ये राजकारण्यांनी हालचाल करणे हे तर खड्ड्यात पडलेल्या प्रिन्ससाठीही घडले. ते कौतुकास्पद का?
राजस्थानला नुकसानभरपाई म्हणूनच की काय, जनरिक औषधांचे उदाहरण राजस्थानचे दाखविण्यात आले. अन्यथा, कोथरूड येथे सृष्टी या इमारतीतही जनरिक औषधांचे दुकान आहे आणि (उपक्रमचे माजी पाहुणे) डॉ. अनंत फडके यांनीही जनरिक औषधांच्या प्रचार/प्रसारासाठी काम केले आहे (संदर्भ). समित शर्मा रोज एक कोटी रुपयांच्या औषधांचे १४९६४ दुकानांमध्ये वाटप करतात. सरासरी प्रत्येक दुकानात ६५० रुपयांच्या औषधांचे वाटप म्हणजे फारच कमी खप वाटतो, त्या दुकानांसाठी २८००० बीफार्म कंपाउंडर नेमण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. (संदर्भ). व्यवहार खूपच खर्चिक वाटतो. थोरवीची तुलना करण्यासाठी लोकॉस्ट या कंपनीचा खप जालावर सापडला नाही.