सत्यमेव जयते आणि प्रश्न डॉक्टरांचे

सत्यमेव जयतेचा भाग प्रदर्शित झाल्यावर फेसबुकवर एक लांबलचक पत्र नजरेस पडले.

प्रिय आमीर खान,

"सर्वच डॉक्टर हावरट नसतात"
"कोणताही व्यवसाय संपूर्णतः स्वच्छ नसतो."
"डॉक्टरी पेशा (निवडणे) ही पसंती आहे, सक्ती नव्हे"

माननीय महोदय,

मी तुमच्या अभिनयाचा चाहता आहे. मी सत्यमेव जयतेचाही चाहता आहे परंतु २७ मे, २०१२ चा भाग पाहून मला धक्का बसला. हा भाग टाकण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार आणि गृहपाठ करणे आवश्यक होते. तुमच्या चित्रपट उद्योगात तुम्ही आणि अमिताभ बच्चन या दोनच व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सुसंस्कृत समाज गांभीर्याने पाहतो. त्यामुळे तुम्ही असे एकांगी आणि दूषित कथानक पुढे करता तेव्हा दु:खाने असे म्हणावेसे वाटाते की व्यावसायिक चॅनेलवर अशा प्रकारचे कार्यक्रम करणे अयोग्य आहे. (मला वाटते तुम्ही या कार्यक्रमासाठी मोठी रक्कम घेतली असावी, दानधर्म आणि परोपकार फक्त डॉक्टरांनी करायचे असतात, ऍक्टरांनी नाहीत!!! बरोबर!)

या पुढे मांडलेले मुद्दे थोडक्यात आणि माझ्या शब्दांत देत आहे. - धूमकेतू.

१. खाजगी कॉलेजात मेडिकलची कॅपिटेशन फी ४०-५० लाख असते असे तुम्ही कार्यक्रमात सांगितले. अशीच कथा तुम्ही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, एमबीए कॉलेजबद्दल का सांगितली नाही? फक्त डॉक्टर्सना लक्ष्य का केले?

2. कार्यक्रमात सांगितले गेले २००१ नंतर ३१ सरकारी मेडिकल कॉलेजे आणि १०६ खाजगी कॉलेजे उघडण्यात आली. आज भारताट १८१ खाजगी आणि १५२ सरकारी कॉलेजे आहेत. आकडा तुम्ही सांगितला तेवढा वाईट नाही. तेव्हा तुमच्या कार्यक्रमाला पोषक असे मुद्दे मांडू नका.

खाजगी कॉलेजांपैकी ९५% कॉलेजे राजकारण्यांची आहेत आणि एमसीआयशी त्यांची हातमिळवणी आहे. भ्रष्टाचारासाठी राजकारण्यांन दोषी धरा, डॉक्टरांना नाही.

3. कार्यक्रमातील एक पाहुणे (डॉ. गुल्हाटी) म्हणाले की औषधे लिहून देण्यासठी फार्मा कंपन्या ३०% कमिशन डॉक्टरांना देतात. या विधानाला काहीही अर्थ नसून त्या संबंधी कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत.

4. कार्यक्रमादरम्यान तुम्ही इंग्लंड आणि भारतातील डॉक्टरी परवाने रद्द झाल्या विषयी आकडे सांगितले पण भारतात किती डॉक्टरांना गुंडांकडून मार खावा लागतो, स्टायपेन्डच्या नावाखाली त्यांना किती क्षुल्लक पगार मिळतो, राहण्या-खाण्याच्या गैरसोयी वगैरेंविषयी काहीच बोलणे नव्हते.

5. कार्यक्रमादरम्यान तुम्ही म्हणालात की हा व्यवसाय फक्त परोपकारासाठी निवडावा, पैसे कमावण्यासाठी नाही. असे का? डॉक्टरांना चांगले सुखासीन आयुष्य कंठित करण्याची परवानगी नाही? इथे साम्राज्यवाद दिसतो. आधी डॉक्टर होण्यासाठी काय काय करावे लागते ते जाणून घ्या आणि मग हे गीता-ज्ञान इतरांना द्या.

साडेपाच वर्ष एम.बी.बी.एस. आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी १५ ते २० हजार रु. प्रति महिना मिळतात. (इतर क्षेत्रातील मुले याच्या दुप्पट पगार आधीच मिळवतात) पुढे शिकले नाही तर २०-२२००० पगार मिळतो.

पोस्ट ग्रॅज्युएशननंतर सक्तीने खेडेगावात १ वर्ष नोकरी करावी लागते किंवा २५ लाख रुपयांचा बाँड द्यावा लागतो.

6. फक्त डॉक्टरांना खेडेगावात आणि सरकारी हॉस्पिटलांत नोकरी करण्याची सक्ती का? फक्त डॉक्टरांना सरकारला पैसे का द्यावे लागतात? इंजिनिअर्स, वकील, सीए, एमबीए यांना अशी सक्ती का नाही?

आता सरकार डॉक्टरांना परदेशी स्थायिक होण्यास प्रतिबंध करण्याविषयी विचाराधीन आहे. का? असाच प्रतिबंध आयआयटी/ आयआयएम विद्यार्थ्यांना का नाही? समाज आणि सरकारने डॉक्टरांसाठी काय केले आहे की डॉक्टरांनी फक्त परोपकार करत राहावे?

7. तुम्ही कार्यक्रमादरम्यान सांगितले की डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात. औषधांच्या किंमतींवर नियंत्रण आणणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी डॉक्टरांना दोषी धरू नये.

महोदय, दुसर्‍यांकडे बोटे दाखवणे सोपे असते. सर्व काही आलबेल आहे असे सांगण्याचा आमचा प्रयत्न नाही पण सर्व काही कोठेच आलबेल नाही. भ्रूणहत्या आणि हुंड्यावर कार्यक्रम करणे वेगळे आणि अशा गुंतागुंतीच्या विषयावर फारसे संशोधन न करता कार्यक्रम करणे वेगळे.

या कार्यक्रमातून तुम्ही डॉक्टरांची प्रतिमा डागाळली आहे. १० वाईट डॉक्टरांमागे १००० चांगले डॉक्टरही असतात. तुम्ही याबाबत माफी मागणे गरजेचे आहे.

आम्ही असे ऐकतो की आमीर खान एका भागासाठी ३ करोड रुपये घेतात. आम्ही डॉक्टर समाजसेवा कमी करत असू पण जी समाजसेवा करतो त्याचा मोबदला मागत नाही.

---

हे पत्र एका मेडिकल विद्यार्थ्याचे आहे आणि फेसबुकवर सर्वत्र झळकत आहे. सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाशी तुम्ही सहमत आहात की वरील पत्राशी? देशातील आरोग्यसेवा चिंताजनक आहे असे तुम्हाला वाटते का?

Comments

हम्म...

साईट आधिच पाहिली होती आणि तलवारांना खरमरीत पत्रदेखील पाठवलं होतं. आणि आणि तुमच्या सल्ल्यानुसार कायमस्वरूपी बंदी आणलेल्या डॉक्टरांच्या नाव-पत्ते असलेली यादी शोधायचा प्रयत्न केला. पण असं एकही नाव सापडलं नाही. असो.

कायमची बंदी

श्रीराम लागू यांची नोंदणी कायमची काढण्यात आलेली आहे.
संदर्भ १
संदर्भ २

उत्तम

निखिल जोशींचा प्रतिसाद आवडला, पटला.

स.ज.च्या शीर्षकगीतात 'तू', 'तूने', इ. शब्द वारंवार आहेत, ते नेमके कोणाला उद्देशून आहेत?

माझ्या माहितीनुसार ते देशाला उद्देशून आहेत. पण त्यातून नक्की काय सिद्ध होते?
हा काही आक्षेप घ्यावा असा मुद्दा नाही.

 
^ वर