शिक्षण संस्थांचे ध्रुवीकरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या एका सर्वसाधारण शाळेमधून झाले. आमच्या वर्गात सधन म्हणता येतील अशी मुले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असावीत. बहुतेक मुले कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब घरांमधली होती. माझ्यासारखी वरिष्ठ मध्यम वर्गातील मुलेही वर्गात थोडीच होती. बहुतेक मुले, पुणे शहरातील जुन्या वाड्यांमधील एक किंवा दोन खणांच्या बिर्‍हाडात भाड्याने रहात असलेल्या कुटुंबातील होती. काही जण तर अगदी ग़ोठ्यांलगत असलेल्या एखाद्याच खोलीत रहाणार्‍या गरीब घरांतील सुद्धा होती. माझ्या एका मित्राची आई उदबत्या वळून कुटुंबाला हातभार लावत असल्याचे मला चांगले स्मरते आहे. वर्गात असलेल्या चाळीस पन्नास मुलांच्या पालकांच्या आर्थिक स्थिती मधली ही तफावत मला आज जाणवते आहे. त्या वेळेस ती कधीच जाणवली नव्हती. जुन्या वाड्यातील एका खणाच्या खोलीत रहाणार्‍या वर्गमित्राच्या घरी जाताना कधी संकोच वाटल्याचे मला आठवत नाही. घरच्या आर्थिक परिस्थिती मधला फरक शाळेत गेल्यावर कधी जाणवलाच नाही याला बहुदा दोन तीन कारणे असावीत.

एकतर शाळेचा गणवेश म्हणजे पांढरा हाफ शर्ट व खाकी चड्डी हा असे. शाळा मुलांची असल्याने फॅशन हा शब्दही आमच्या ज्ञान कोषात नव्हता. बहुतेकांच्या डोक्यावरचे केस अलीकडे क्रू कट म्हणतात त्या धर्तीवर कापलेले असत. असे केस कापल्याने केश कर्तनावरचा खर्च शक्य तेवढ्या लांबणीवर टाकता येईल हा विचार या कट मागे असावा. पायात पादत्राण म्हणजे चप्पल किंवा जास्तीत जास्त सॅन्डल. बूटांची वगैरे फॅशन त्या वेळेस फारशा कोणाला परवडण्यासारखी नव्हतीच. या शिवाय शाळेत न्यायच्या डब्यात पोळी-भाजी हाच मेन्यू सर्वांचा असे. ग्राऊंडवर सगळे खेळ अनवाणीच खेळले जात. आता या अशा सगळ्या परिस्थितीत हा गरिबाघरचा किंवा हा सधन कुटुंबातील असा काही भेद दिसतच नसे. त्याच प्रमाणे तेंव्हा अगदी टोकाची परिस्थिती असल्याशिवाय पालकांना शाळेत बोलावत नसत. त्यामुळे याचे वडील सायकल वरून आले, त्याचे फटफटी वरून, हे समजण्यासही वाव नसे. तसेच बडी असल्यामुळे एकाची आई फॅशन करते तर दुसर्‍याची अगदी साधी सुधी राहते असाही काही भेद-भाव नसे. थोडक्यात म्हणजे वर्गात अनेक प्रकारच्या आर्थिक स्थितीतील मुले असल्याची जाणीव आम्हाला तरी कधी शाळेत असताना झाली नाही.
हे सगळे भारूड आज मनात येते आहे ते नवीनच मंजूर झालेला शिक्षण हक्क कायदा व त्या कायद्याची सुलभ अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने, सरकारी मदत घेणार्‍या किंवा न घेणार्‍या अशा सर्व शाळांमध्ये 25टक्के तरी मुले ही समाजाच्या दुर्बल घटकातील असलीच पाहिजेत, या स्वरूपाच्या काढलेल्या एका आदेशामुळे. मी शाळेत असताना समाजाच्या सर्व स्तरांमधील मुले एकाच शाळेत जात. त्यामुळे 25काय, 50टक्के मुले सुद्धा समाजाच्या दुर्बल घटकांतीलच बहुदा शाळेत असण्याची शक्यता मला वाटते आहे. मग आताच असे काय झाले आहे की ज्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हा आदेश काढण्याची जरूरी भासते आहे?
याचे एक प्रमुख कारण म्हणजे समाजातील स्तरांचे आर्थिक परिस्थितीनुसार होत चाललेले, अधिक अधिक धृवीकरण, हे आहे असे मला वाटते. हे धृवीकरण तीव्र होत असण्याची कारणे तर इतकी भिन्न आणि परस्पराविरोधी आहेत की या विरोधी कारणांनी धृवीकरणाची प्रक्रिया मात्र अधिक तीव्रच कशी होत चालली आहे हे अभ्यासणे मला मोठे रोचक वाटते आहे.

समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून भारतातील मध्यवर्ती व राज्य शासनांनी आरक्षणाचे अनेक कायदे केले आहेत. दुर्बल किंवा वंचित घटकांना याचा फायदा जरूर मिळाला आहे पण या आरक्षणामुळे समाजातील सबळ घटकांपुढे असणार्‍या संधींमध्ये एकदम घट झाली आहे. उदाहरणार्थ आपण अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागांची परिस्थिती पाहू. या जागांवर आरक्षण आल्यामुळे सबळ घटकाला उपलब्ध असलेल्या जागा कमी झाल्या. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाला प्रचंड मागणी व शिक्षण देणार्‍या संस्था कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा फायदा घेत काही नेते मंडळींनी खाजगी अभियांत्रिकी कॉलेजे काढण्यास सुरूवात केली. या कॉलेजात विद्यार्थ्यांस द्यावे लागणारे शुल्क एवढे अफाट ठेवण्यात आले की या संस्था समाजातील फक्त सबळ घटकांच्यासाठीच आहेत असे दिसू लागले आहे. म्हणजे सरकारी अभियांत्रिकी संस्था आरक्षित घटकांसाठी, तर खाजगी संस्था सबळ घटकांसाठी, असे एक नवीन वर्गीकरणच झाले आहे. अभियांत्रिकी संस्थांमध्ये जे घडले आहे ते शिशू शाळांपासून सर्व शिक्षण संस्थांमध्ये घडते आहे.
माझ्या पिढीमध्ये शिक्षणाचे सर्वसाधारण माध्यम मराठी हेच होते. समाजाचे दुर्बल घटक, सबळ घटक हे सर्व मराठी माध्यमातूनच शिक्षण घेत. मराठीतून शिकलेल्या माझ्या परिचितांनी सर्व क्षेत्रांतील मानाची स्थाने भूषविली आहेत. परंतु 1970च्या नंतर परिस्थिती बदलली. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, यासारख्या कारणांनी, समाजातील सबळ घटकांना असे वाटू लागले की आपल्याला उज्वल भविष्य प्राप्त करून घ्यायचे असले तर यापुढे मराठी शिक्षण फारसे उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे सबळ घटकांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेणे ही गोष्ट अनिवार्य होत गेली. परिणामी समाजातील दुर्बल घटक मराठी शाळेत व आपले अलग अस्तित्व ठेवण्यास उत्सुक असलेल्या सबळ घटकातील मुले, इंग्रजी शाळेत असे वर्गीकरण सुरू झाले.
गेल्या काही वर्षात सबळ घटकांच्या या इंग्रजीमधून शिक्षण देणार्‍या संस्थात, पालकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणखीनच उप-वर्गीकरण झाले आहे. अती श्रीमंत मुलांसाठी असलेल्या शाळांपासून ते मध्यमवर्गीय मुलांसाठीच्या शाळा, अशा निरनिराळ्या प्रकारच्या इंग्रजी शाळा निर्माण झाल्या आहेत. या संस्थांचे, मुलांच्या आर्थिक परिस्थितीनुसार वर्गीकरण झालेले असल्याने, शाळांच्या शुल्कात असलेला आश्चर्यकारी फरक, या प्रत्येक शाळेतील व्यवस्थापन पद्धती, शालान्त परिक्षा घेणारी संस्था, शाळेतील वातावरण, सहलीची ठिकाणे यातही प्रचंड भिन्नता आली आहे. उदाहरण द्यायचे असले तर दर सहामाहीला या शाळा 6लक्ष रुपयांपासून ते 25000 रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क आकारत आहेत. काही शाळा पंचतारांकित हॉटेलांसारख्या वातानुकुलित सुद्धा आहेत तर काहींमध्ये पंख्यांचाही अभाव आहे. काही शाळा परदेशात सुद्धा मुलांच्या सहली नेत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील या धृवीकरणाचा परिणाम म्हणजे श्रीमंतांसाठी असलेल्या इंग्रजी शाळा या अतिशय Elitist, अलग किंवा Exclusive होत चाललेल्या आहेत. त्या शाळेत शिकणार्‍या मुलांशी जर आर्थिक समता असली तरच या शाळेचा विचार करा असा स्पष्ट संदेश या शाळा इच्छुक पालकांना देत आहेत असे दिसते. मागच्या वर्षी आमच्या शाळेतील बॅचच्या मुलांचे एक माजी विद्यार्थी संमेलन आम्ही भरवले होते. त्या वेळेस शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापकांनी आता शाळेत असणारे विद्यार्थी फक्त समाजाच्या कनिष्ठ गटातूनच येत असल्याची खंत आम्हाला बोलून दाखवली होती. आमच्या शाळेने आता मराठी माध्यमाचीच पण सरकारी मदत न घेणारी अशी दुसरी समांतर शाळाच आता आर्थिक दृष्ट्या जास्त सबळ पण मराठीतून शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी काढली आहे. अर्थात असे विद्यार्थी फारच विरळा आहेत ही गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आर्थिक वर्गीकरण झालेल्या शिक्षण क्षेत्रातील या संस्थांची मोठीच पंचाईत होणार आहे याबाबत माझ्या मनात तरी काही शंका नाही. पुढे येणार्‍या अडचणींमध्ये, आर्थिक अडचण तर आहेच. प्रवेश दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे राज्य शासन या संस्थांना दहा ते पंधरा हजार एवढी रक्कम बहुदा देईल. परंतु या शाळा, विद्यार्थ्यांकडून घेत असलेले शुल्क व ही रक्कम यात असलेला फरक इतर विद्यार्थ्यांचे शुल्क वाढ्वून या संस्थांना बहुदा भरून काढावा लागेल.
आर्थिक अडचणीचे निराकरण जरी करता आले तरी या शाळांची सर्वात मोठी अडचण या दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिल्यावर या शाळांची अलगता ( Exclusivity or Elitist nature) कशी टिकवता येईल ही आहे. केवळ या अलगतेमुळे या शाळा एवढे भले थोरले शुल्क आज आकारू शकत आहेत. त्याच प्रमाणे या शाळेत शिकत असलेले इतर विद्यार्थी व दुर्बल घटकातील विद्यार्थी यात समता कशी राखली जाईल, वर्गात व शाळेत दोन गट पडणार नाहीत याची काळजी या शाळा कशा घेणार आहेत? हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे शाळांचे झालेले वर्गीकरण सौम्य होऊन त्यांच्यातील भिन्नता जर कमी होऊ शकली तर या क्षेत्रात अतिशय आवश्यक अशी एक सुधारणा होऊ शकेल असे मला वाटते.
19 मे 2012

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला लेख

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे शाळांचे झालेले वर्गीकरण सौम्य होऊन त्यांच्यातील भिन्नता जर कमी होऊ शकली तर या क्षेत्रात अतिशय आवश्यक अशी एक सुधारणा होऊ शकेल असे मला वाटते.

शाळा आणि कॉलेजांत असणारा थोडासा फरक येथे नमूद करावासा वाटतो. शाळांवर शिक्षक आणि कार्यकारी समिती यांचा अंकुश थोडा जास्त असतो. कसा त्याचे एक उदाहरण देते.

गेल्यावर्षी तात्पुरत्या काळासाठी परदेशात राहणार्‍या माझ्या भावाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मुलाला पहिलीत ऍडमिशन मिळण्यास बराच त्रास झाला. शेवटी सहामाही सुमारे ७५००० फी असलेल्या शाळेत दाखला मिळाला. अर्थातच, तेवढा खर्च करण्याची त्यांची तयारी होती ही गोष्ट वेगळी परंतु शक्य असते तर एवढा खर्च केला नसता हाही भाग आहेच.

बरं, शाळेत दाखला मिळाल्यावर शाळेने वेगवेगळी फर्माने सोडण्यास सुरुवात केली. युनिफॉर्म आम्ही सांगतो त्या दुकानातूनच घ्यायचे. यांत बुटांच्या सॉक्सचाही समावेश होता कारण त्या सॉक्सवर शाळेचे बोधचिन्ह होते. तो सर्व खर्च काही शाळेच्या फीमध्ये समाविष्ट नाही. त्यानंतर, स्कूल सप्लाइजची भली मोठी यादी देण्यात आली. पालकांना मूग गिळून गप्प बसण्यावाचून पर्यायच नव्हता. हल्ली शाळा बाहेर आमच्यावर टीका केल्यास तुमच्या पाल्याचा दाखला रद्द करू अशी धमकीही देतात. असो.

शाळा सुरु झाल्यावर पहिल्याच आठवड्यात टिचरने फर्मान सोडले की अमुक दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून यायचे आहे. वेशभूषा या समाजातील विविध कार्य करणार्‍या मंडळींच्या होत्या. जसे, डॉक्टर, नर्स, सैनिक, पोलिस इ. यासाठी योग्य ड्रेस आणायचा होता. आता असा ड्रेस घरी नव्हता. मग कोणातरी मुलाच्या आईने सांगितले की अंधेरीला "छोटू ड्रेसवाला"कडे असे ड्रेस भाड्याने मिळतात. मग माझ्या वहिनीची आणि माझी स्वारी अंधेरीला गेली. रिक्षाचा जाण्यायेण्याचा खर्च १६० आणि ड्रेसचा एक दिवसाचा खर्च १५० असे मिळून तो ड्रेस आणणे आणि पुन्हा पोचता करणे यासाठी सुमारे ६०० रु. खर्च झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यात टिचरचा बर्थडे होता. त्यासाठी गिफ्ट खरेदी करून पाठवावे लागले. त्याच्यापुढे मी अमेरिकेत परतल्याने केवळ हा प्रकार पाहून माझ्या डोक्याला झालेला ताप बंद झाला.

माझ्यामते कॉलेजांत असा अंकुश थोडा कमी असतो.

पण तिथे "पीअर प्रेशर" नावाचा भयंकर प्रकार असतो. बेताची परिस्थिती असणार्‍या माझ्या एका वर्गमैत्रिणीच्या डोक्यात काय शिरले म्हणून तिने १० वी नंतर के.सी. कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे ठरवले. तिचे टक्के उत्तम असल्याने तिला ऍडमिशन मिळणे सहजशक्य होतेच पण तिला अनेकांनी समजावले की के.सी., जयहिंद ही आपल्या आवाक्या बाहेरची कॉलेजे आहेत. असो. कॉलेजात गेल्यावर काही काळात या मुलीत आमूलाग्र बदल घडल्याचे दिसले. तिचे राहणे, कपडे, बोलणे यांत जमीनआस्मानाचा फरक पडला होता. तिने सर्व शाळामित्रांशी संबंधही तोडून टाकले. काही काळाने असे कळले की ही मुलगी डिप्रेशनमध्ये गेली असून तिने कॉलेज बदलून उपनगरातील साधेसे कॉलेज जॉइन केले आहे पण तिने तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींशी मैत्री तोडली ती मात्र कायमची. शाळेच्या रियुनियनसाठीही तिने येत नाही असे कळवले असे ऐकते.

सांगण्याचा उद्देश असा की सरकार ऍडमिशनसाठी मदत करेल परंतु पुढली पैशांची भुते उभी करणे अशक्य असते तेव्हा मैत्री असो की शिक्षण अंथरुण पाहून हातपाय पसरणे उत्तम.

बाकी, लेख आणि मांडणी फारच आवडली.

लेख आवडला.

एक बातमी व त्या बातमीमुळे ढवळून गेलेल्या आठवणी व भिन्न काळातील जनतेची शिक्शणाबाबतची मानसिकता ह्या सर्व बाबी सुंदर सादरीकरणातून लेखात मांडल्या आहेत.

चांगला विषय आणि लेख

चांगला विषय आणि लेख. जागा राखून ठेवतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बालपण आठवले...

धन्यवाद चंद्रशेखरजी...
हेच शाळेचे वातावरण आम्ही अनुभवले. गरीबी माणसाला खूप काही शिकवते. शाळा सुरु होण्यापूर्वी घरुन एक खाकी चड्डी-पांढरा शर्ट मिळे. आधीच्या वर्षीचा जुना गणवेश आणि हा नवा यावर वर्ष काढत असू. पावसाळ्यात कपडे वाळत नसत त्यामुळे रंगीत शर्ट घालून जात असू. गणवेश तपासणारे मास्तर दयाळू असले तर सोडून देत, पण खडूस असले तर हातावर पाच छड्या बसत. ते नेहमीचेच झाले होते.

पुस्तके नवीकोरी आणणे शक्य नसे. गल्लीतील वरच्या इयत्तेत गेलेल्याची पुस्तके निम्म्या किमतीत आणून वापरायचो. अनेक ज्ञातिसंस्था विद्यार्थ्यांना अल्पशी मदत पाठवत त्याच्या वर्तमानपत्रातजाहिराती बघून अर्ज करणे हा आमचा मे-जून मधील उद्योग. त्या पैशांमध्ये शैक्षणिक साहित्य विकत घेता येत असे.

इयत्ता सातवीपर्यंत भाकरी-भाजी किंवा भाकरी-तेलचटणी हाच डबा असे. नंतर इतरांचे बघून रोज पोळीचा हट्ट धरला. प्रेमस्वरुप आईने तो पुरवला. आजच्यासारखे पावभाजी, वडापाव, पिझ्झा हे त्याकाळात नव्हते. इडली आणि डोसा या पदार्थांचे अप्रूप असे. दारावर येणार्‍या घंटीवाल्या गाडीवरुन २५ पैशांची कुल्फी घेऊन खाणे किंवा ५० पैशांची भेळ खाणे ही चैन.

असो. किंचित अवांतर झाले. सध्याच्या परिस्थितीबाबत उत्तर नाही. समोर येईल ते आणि शक्य होईल तसे आनंदात जगायचे, एवढेच. इतरांचे विचार वाचण्यास इच्छुक.

आपण वर्णन केलेल्या गोष्टी अजून ही आहेत..

आपण वर्णन केलेल्या गोष्टी अजून ही आहेत..

चंद्रशेखरजी आणि योगप्रभूजी, आपले प्रतिसाद वाचून असं मत होईल की त्या गोष्टी आता नामशेष झाल्या असाव्यात परंतु मी असं म्हणेन की फक्त आता त्या आपल्या समोर तेवढ्या मोठ्या प्रमाणात उरल्या नाहीत बहुतेक.. किंवा आपल्या नजरेसमोरच्या परिघात नाही आहेत..
खेडेगावातल्या शाळांमध्ये अजून तेच चित्र आहे जे आपण वर्णन केलंय.. पांढरा शर्ट- खाकी चड्डी आणि चटणी- भाकरी किंवा पोळी-भाजी डब्याला... आणि हे आत्ता पण पाहू शकतो .. तसंच शहरातल्या बऱ्याच 'गरिबांच्या' समजल्या शाळात नक्कीच पिझ्झा, बर्गर अस्तित्वात नाही आहे असं वाटतं..

आता या लेखाबद्दल, आपण मांडलेला एक मुख्य मुद्दा अगदी पटला 'समाजातील स्तरांचे आर्थिक परिस्थितीनुसार होत चाललेले, अधिक अधिक धृवीकरण ' पण त्याची कारणे पण बऱ्यापैकी बरोबर.
आपण म्हणत आहात तसा वर्गात या असमानतेमुळे मुलांवर होणारा परिणाम पण मोठा असण्याची शक्यता आहे.. पण मुख्य प्रश्न असा की दुर्बल ची व्याख्या काय आहे इथे ? जातीवर की आर्थिक स्थितीवर ...? म्हणजे आमच्या वर्गात कलेक्टरचा मुलगा आरक्षणाद्वारे आला होता म्हणजे जातीच्या आधारावर असेल तरीही शाळेला जास्त त्रास नाही येणार.. आर्थिक स्थितीवर असेल तर जरा त्रास आहे शाळांना.. पण बरेच राजकीय व्यक्ती सध्या दारिद्र्य रेषेखालीच असतात.. काही व्यावसायिक देखील पाहिलेत मी EBC (economically backward class) म्हणून दाखवताना.. ;)

बाकी जर 'काही' कारणाने दुर्बल घटक मिळाले नाहीत तर काय करावे शाळेने ? याबद्दल सरकार काही बोलले आहे काय ?

उत्तम मांडणी

चांगला लेख आहे. समस्येची मांडणी नीट केली आहे.

सरकार नियम करून प्रवेश मिळवून देईल त्यात शिक्षण संस्थांचे ध्रुवीकरण टळले तरी त्या शाळांतर्गत विद्यार्थ्यांमधले ध्रुवीकरण होईल असे वाटते. आणि ते शाळांच्या ध्रुवीकरणापेक्षा वाईट असेल.

आर्थिक ध्रुवीकरणाखेरीज सामाजिक (जातीय) ध्रुवीकरण असते त्यावरही काहीतरी उपाय हवा.

माझ्या समाजातल्या मंडळींना सरकारी अनुदानित शाळेत काही टक्के मुले वेगळ्ञा समाजातली घ्यावी लागतात ही गोष्ट आवडत नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या शाळाप्रवेशाच्या वेळी तिला विशिष्ट शाळेत घालावे कारण त्या शाळेत बहुतांश "आपली" मुले येतात असा सल्ला मला त्यांनी दिला. त्या शाळेत सरकारी कोट्यातली मुले सोडली तर "आमच्याच" समाजातल्या मुलांना प्रवेश देतात. आणि अलिकडे त्या शाळेत जाणार्‍या उच्चजातीय मुलांचे पालक शाळा विना-अनिदानित करूया (म्हणजे त्या मुलांना प्रवेश द्यायला लागणार नाही+ त्या समाजातले शिक्षकही ठेवायला लागणार नाहीत) अशी सूचना शाळाचालकांकडे करत असतात. हे पालक पैशाने गडगंज वगैरे नसतात. तरी ही मंडळी विनाअनुदानित शाळेची स्वप्ने पाहतात. त्या अर्थी एक्स्क्लूझिविस्ट प्रवृत्ती आर्थिक धनाढ्यांमध्येच असते असे नाही. किंवा श्रीमंतीमुळे येते असे नाही.

नितिन थत्ते

उत्तम

चांगल्या विषयाचे सादरीकरण उत्तम व

पालकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे शाळांचे झालेले वर्गीकरण सौम्य होऊन त्यांच्यातील भिन्नता जर कमी होऊ शकली तर या क्षेत्रात अतिशय आवश्यक अशी एक सुधारणा होऊ शकेल असे मला वाटते.

या तात्पर्याशी सहमत आहेच त्यामुळे अधिकच आवडला

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

चांगला विषय - उत्तम लेख

हेच विषय कार्यालयातल्या रोजच्या चर्चेचे आहेत.

लेखाचा शेवटचा परिच्छेद सर्वात प्रभावी आहे. सध्या पुण्यात खास करुन हिंजेवाडीच्या जवळ सुरु झालेल्या शाळा हा एक उत्तम नमुना आहे. यातल्या एका शाळेचे शुल्क रु. ९६००० फक्त आहेत. हि शाळा सध्याच्या राष्ट्रपतींच्या नातेवाईकांची आहे असे समजते.

काळजीचा दुसरा मुद्दा हा आहे की अशा शाळांचे प्रवेश अर्ज मिळण्यासाठी प्रत्येक स्तरातले पालक दिवसरात्र रांगेत उभे राहून अर्ज मिळवतात आणि असेच ते अनेक शाळांकरिता करतात. काही शाळा नक्कीच चांगल्या आहेत. पण पाल्याला उच्चदर्जाचे सर्व काही द्यायचे या हट्टापायी पालक पण वाट्टेल ते करायला तयार असतात.


मांडणी आवडली, आशयामुळे वाईट वाटले.

मांडणी आवडली, आशयामुळे वाईट वाटले.

शेवटच्या परिच्छेदातील आशावादामुळे बरे वाटले.

लेख आवडला

>सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आर्थिक वर्गीकरण झालेल्या शिक्षण क्षेत्रातील या संस्थांची मोठीच पंचाईत होणार आहे याबाबत माझ्या >मनात तरी काही शंका नाही.

माझ्याही. नुसत्याच शिक्षणसंस्थांची नव्हे तर अनेक 'जागरूक' पालकांचीही.
शहरी भागात हे असे ध्रुवीकरण फारच होते आहे असे वाटते.
माझ्या लहानपणी मी आमच्या घराजवळच्या कामकरी वर्गातील मुलांबरोबर खेळत असे, म्हणून आमच्या बाजूच्या एका (अमराठी) मुलाने माझ्या मोठ्या बहिणीला विचारल्याचे आठवते की त्या मुलींमध्ये ती का खेळते?
असो. अशा आढ्यतेखोरांनी गरिबांच्या दप्तराशी दप्तर लावून बसणे म्हणजे फारच झाले.

 
^ वर