वैयक्तिक आयुष्याची प्रतिबिंबे
या किंवा इतर संकेतस्थळांवरील लेखन आणि प्रतिसाद बघताना लेखक-लेखिकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक अंदाज येत जातो. कुणाचे विचार कसे असतील, कुणाची कुठल्या विषयावर काय प्रतिक्रिया असेल याबाबत एक तर्क करता येतो. बहुतेक वेळा तो तर्क (तर्क करणार्या/रीचा पुरेसा 'अभ्यास' असेल तर) बरोबर निघतो. धार्मिकता, कर्मकांडे यांच्यावर वार करणारे कोण, त्याचा उदोउदो करणारे कोण, राजकारणातील एखाद्या पक्षाचे, त्या पक्षातल्या पुढार्यांचे समर्थन करणारे कोण, त्यांना विरोध करणारे कोण, आपल्या जातीबद्दल, धर्माबद्दल कडवा अभिमान बाळगणारे कोण, इतर जातींना, धर्मांना तुच्छ लेखणारे कोण - हे सगळे ध्यानात येते. तसेच कुणीकुणी घेतलेले बुरखे, मुखवटेही कळून येतात. यातला 'डुप्लिकेट आयडी' आणि मुद्दाम पाण्यात उडी मारुन खळबळ उठवणे हा खमंग, चुरचुरीत आणि बिनमहत्त्वाचा मुद्दा सोडून देऊ. प्रश्न असा आहे की संकेतस्थळावर लेखन करताना लेखक/ लेखिकांच्या मतांत, लेखनशैलीत, आक्रमकपणात, सहिष्णुतेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची प्रतिबिंबे उमटतात का? वैयक्तिक आयुष्यात एखादी व्यक्ती अधिकाधिक सुखी, समाधानी होत जात असेल तर तिचे संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिसाद अधिक तृप्त, संयत आणि आशावादी होत जातील का? याउलट एखादी व्यक्ती खाजगी आयुष्यात अधिकाधिक अयशस्वी, वैफल्यग्रस्त होत जात असेल तर त्या व्यक्तीचे लेखन, प्रतिसाद कडवट, भांडखोर आणि निराशावादाकडे झुकलेले असतील का?
आणि जर समजा तसे होत असेल तर जेथे विचार आणि माहितीची देवाणघेवाण होते अशा 'उपक्रम' सारख्या संकेतस्थळावर व्यक्त झालेल्या विचारांची वैधता - व्हॅलिडिटी- तरी काय? आज कुणीतरी सकाळी लवकर उठला, अर्धा कप चहा घेऊन, आन्हिके उरकून लांबवर फिरुन आला आणि आयुष्य सुंदर आहे या नव्या साक्षात्कारासह सकारात्मक लिहायला बसला. उद्या मरगळलेल्या मनाने त्यानेच काही निराशावादी खरडले.. अशी वैयक्तिक आयुष्यातील आंदोलने त्याच्या/ तिच्या लिखाणावर प्रभाव टाकत असतील, तर इथे किंवा इतर ठिकाणी होणार्या चर्चा आणि विशेषतः वादविवाद आणि त्यांमध्ये व्यक्त होणारी लेखक / लेखिकांची मते यांना तरी काय अर्थ आहे?
Comments
काही प्रमाणात होते
काही प्रमाणात अवश्य होते. पण आपले सगळे आयुष्य असेच आहे. त्यात उपक्रम काही वेगळा नाही. खरे सांगायचे तर वयाच्या २५ वर्षांपर्यन्त साधारण मते क्रिस्टलाईज होतात, नंतर फार बदलत नाहीत, पण वयोमानाने जरा मॉडरेशन येते इतकेच. आयुष्य ह्या सगळ्याचे अॅग्रिगेट आहे असे म्हणावे लागेल. आपल्या मनावर लहानपणी काय संस्कार झालेत, आपली विवेक बुद्धी, आपला पिंड काय आहे ह्यावर आपले विचार ब-यापैकी बांधलेले असतात. जेव्हा मुलभूत प्रश्नांवर प्रतिसाद देतात तेव्हा प्रासंगिक मुड कसा आहे त्यावर प्रतिसाद आधारीत नसतात असे माझे मत आहे. पण जर कोणी कोणत्या रिलिज होणा-या पिक्चर कसा आहे ह्यावर चर्चा आरंभली तर कदाचित प्रतिसाद देणा-याच्या मुड वर त्याला तो पिक्चर आवडला का नाही ह्या वर परिणाम होऊ शकतो. अजून बरेच लिहायचे होते पण वेळे आभावी एवढेच. बाकी लोक कीस पाडतीलच.
हेच म्हणतो.
शेवटची तीन वाक्ये सोडली तर श्री. चितळ्यांच्या मतांशी मी सहमत आहे.
आरशात आपलाच चेहरा पाहायचा असतो!
'जगी सर्वसुखी असा कोण आहे?' असे स्वामींनी म्हटलयं ते विचार करूनच म्हटलय. जर एखादी व्यक्ती आपण सुखी आहोत असं इतरांना दाखवू इछित असेल तर अशा व्यक्तींनी थेट चर्चेच्या रणधुमाळीत स्वतः सहभागी होवून आपल्या तृप्त, संयत व आशावादी विचारांशी इतरांना ओळख जरूर करून दाखवावी. शहाण्या मुलांनी कपडे खराब करीत माती-चिखलात खेळायचे नसते, केवळ बैठेखेळ कॅरम, सापशीडी इत्यादी खेळायचे असतात व इतरांना 'डर्टी बॉय/गर्ल' असं म्हणत नाक मुरडायचे असते.
नियती परीस्थितीरूपी हाताने प्रत्येकाचे आयुश्य लाडवासारखे वळत असते, मोदकासारखा आकार देत असते. मग आपण काही व्यक्तीनी अमुक असा प्रतिसाद द्यावा, असा लेख लिहावा अशी अपेक्शा का करावी बरे?
पुढच्या परीच्छेदानंतर रावांची गाडी रूळावरून घसरली आहे, हाताळता आलेली नाही. त्यामुळे तो भाग दुर्लक्शित करावा लागतोय.
होय
माझ्या मते ही प्रतिबिंबे उमटतात. कप्पेबंद अशी मनाची चौकट सर्वसाधारण माणसात नसते. छिन्न व्यक्तिमत्वांबाबत मात्र अशी विभागणी दिसून येते. ऑफिसमधील तणाव घरात येउ द्यायचा नाही वा उलट हे तितकस यशस्वी होत नाही. जालीय लेखनात सुद्धा स्कोअर सेटलमेंट हा तुमच्या भावभावनांचाच भाग आहे. ते लिखाणात प्रतिबिम्बित होतच असते. लिखाणात असलेला तुच्छतावाद हा आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा भाग असतो.
प्रकाश घाटपांडे
स्वाभाविक प्रतिबिंब
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सन्जोपराव यांनी प्रश्न उपस्थित केले आहेतः
..
उत्तरे:
१) हो. उमटायला हवीत. ते स्वाभाविक आहे.अन्यथा तसे लेखन दांभिकता ठरेल.
२) हो. निश्चितच.तसे होणे साहजिक आहे.
३)नाही मला तसे वाटत नाही.लेखक व्यक्तीचा मूळस्वभाव कसा आहे त्याचे प्रतिबिंब वैचारिक लेखनात उमटते.वैफल्य,नैराश्य यांतून येणार्या तात्कालिक मनोवृत्ती ललित लेखनातून प्रकट होतील. वैचारिक लेखनात नव्हे; असे माझे मत आहे.
असेच म्हणते
चर्चेचा नेमका उद्देश समजला नाही.
माणूस सर्वसुखी असेल तर तो संवादी संकेतस्थळांवर फिरकणार नाही असे माझे व्यक्तिगत मत आहे पण असा माणूस विरळा तेव्हा त्याला जो संवाद साधायचा आहे तो त्याच्या लेखनातून प्रकट होईलच. तसेच, दु:खी आणि निराश मनुष्य येथे येऊन अधिकच दु:खी होऊ शकेल अशा भीतीतून लांब राहणेही शक्य आहे.
यनांच्या सर्व उत्तरांशी सहमती आहे.
विस्तार बदलू शकतो
वेळ/संसाधने यांच्या उपलब्धतेनुसार माझे प्रतिसाद निश्चितच बदलतात, त्याचप्रमाणे भावनांतील बदलांमुळेही बदलतातच. म्हणजे, त्या घटकांवर अवलंबून मी प्रतिसाद त्रोटक देईन, भांडणे उकरून काढणार नाही, मुद्दे वाढू नयेत याची काळजी घेईन, इ. मात्र, जे काही लिहीन ते बहुतेकदा माझे सर्वकाळचे मत असेल, गाभा बदलणार नाही. पश्चात्ताप होईल असे क्वचितच घडेल. जेव्हा घडेल त्यास माझी मनोवृत्ती हे कारण क्वचितच असेल, बहुतेकदा माझी बौद्धिक कुवत मर्यादित असणे हे कारण असेल. उदा., काही कोड्यांचे पहिले उत्तर मी चुकवितो. अन्यथा, २+२ चे उत्तर मी ४ हेच देईन. उत्तर द्यावे की नाही, किती सविस्तर द्यावे, औपरोधिक सुचेल की नाही, ते मात्र बदलू शकेल.
भावनाच कशाला, कोणाला प्रतिसाद देतो त्यावरही माझे प्रतिसाद थोडे बदलतातच. उदा., येथील काही ज्येष्ठ लेखकांची मते, लेखनशैली पटत नाही तेव्हासुद्धा त्यांना मी छळत नाही. खरडवहीतील एक खरड उडण्याचा प्रकार इतर कोणत्या संस्थळावर घडला असता तर मी निषेध, तक्रार, इ. केले असते.
+१
>इ. मात्र, जे काही लिहीन ते बहुतेकदा माझे सर्वकाळचे मत असेल, गाभा बदलणार नाही. पश्चात्ताप होईल असे क्वचितच घडेल. जेव्हा घडेल त्यास माझी मनोवृत्ती हे कारण क्वचितच असेल, बहुतेकदा माझी बौद्धिक कुवत मर्यादित असणे हे कारण असेल
सहमत.
अय्यो रामं पाप्पं! तुम्ही हे काय बोलून सोडलं?
तुमचीही बौद्धेक कुवत मर्यादित???? वरील मताशी तुम्ही सहमत, एकमत आहात??? कां, कां, कां बरे?
तुम्ही स्वतःला इतकं कमी कां लेखता?
अवांतर
माजी बउद्धइक कुवत मरयादीतच आहे.
माझे मत
बरोबर. तसेच लेखन आणि प्रतिसाद बघताना लेखक-लेखिकांच्याच नव्हे तर संकेतस्थळाच्या व्यक्तिमत्वाबद्दलही अंदाज येत जातो. आपले व्यक्तिमत्व बघून लेखक-लेखिका संकेतस्थळही निवडत असावेत किंवा तिथे सक्रिय राहात असावेत.
माझ्यामते मूडवर बरेच अवलंबून असते. आणि मूड बरेचदा तेव्हाच्या आपल्या एकंदर परिस्थितीवरही अवलंबून असतो. पण कितीही सुखाचा आणि समाधानाचा वर्षाव झाला तरी काही मुद्द्यांबाबत एखाद्याची मते किंवा भूमिका कायम कडवी असू शकतात. कर्मकांडाचा आणि अंधश्रद्धेचा विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन्ही ह्या गटात मोडू शकतात. इथे नावे घ्यायची गरज नाही.
आणि जर समजा तसे होत असेल तर जेथे विचार आणि माहितीची देवाणघेवाण होते अशा 'उपक्रम' सारख्या संकेतस्थळावर व्यक्त झालेल्या विचारांची वैधता - व्हॅलिडिटी- तरी काय?
एखाद्याचे एकूण लेखन वाचून तो उजवा आहे की डावा आहे की मधला आहे हे कळते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आताचे जास्त छान
गणितामध्ये एक पद्धत अशी आहे की एखादे प्रमेय सिद्ध करायचे असेल तर ते चूकीचे आहे असे गृहीत धरले जाते आणि पुढे विस्तार केला जातो. एका बिंदूपाशी आपण काहीतरी विरोधाभासाशी येऊन अडखळतो आणि मग आपले गृहीतक चूकीचे सिद्ध होते, पक्षी प्रमेयाची व्हेलिडीटी सिद्ध होते.
तद्वत -
समजा असे धरुन चालू की मानसिक आंदोलने लेखनात, प्रतिसादात उमटली नसती, सारेजण स्थितप्रदन्य वृत्तीने लेखन करत राहीले असते, अगदी त्यांच्या मूळ स्वभावाला/ प्रकृतीला धरून तर मग काय झाले असते? उदाहरणार्थ एखादा मूळचा कडवट आय डी (असा मूळ स्वभाव असतो का हो?) त्याच्या आयुष्यात चांगले घडूनही कुचके शेरेच मारत राहीला असता. एखादा मूळचा आक्रमक आय डी कितीही संतुलित दिवस गेला तरी आपला आक्रमक आवेश न सोडता राहीला नसता. तर एखादा भीत्रा आय डी कधीच म्हणजे कधीच मनमोकळे लिहू शकला नसता.ही काही फार स्वागतार्ह बाब वाटत नाही. वैविध्यामध्ये जी मजा आहे ती या ठोकळेबाज व्यक्तीमत्वात नाही. अर्थात आपण मग प्रत्येक आय डी काय लिहू शकेल हे आधीच कल्पू शकलो असतो. सगळी चवच गेली असती नाही का? :)
याउलट जी मजा "अनप्रेडिक्टेबिलीटी" मधे आहे ती जास्त छान आहे.
मी सहमत् आहे.
मानसिक स्थैर्य् नसेल् तर् आपोआप् प्रत्येक् गोष्टीची नकारात्मक् बाजु दिसु लागते.
अभिजीत राजवाडे