सत्यमेव जयते

आमीरखानचा परिपूर्ण कार्यक्रम पाहिला. मनाच्या तळाशी दडपून ठेवलेले स्वतःचे आणि इतरांचेही अनेक अनुभव तडफडत घुसमटत पृष्ठभागावर आले. पाणी लाल झालं तरंगातरंगात. जखमी वाटत राहिलं.
पण श्वास तर घेता येतोय...
की बोलतंय कुणी ना कुणी योग्य व योग्य तर्‍हेने बाकीच्या त्या आचरट खोट्या ड्रामेबाज कार्यक्रमांना टाचेखाली दाबून.
आणि नुसती वस्तुस्थिती दाखवणं नाहीये, तर उत्तराची दिशाही दर्शवली जातेय, हे फार महत्त्वाचं.
धन्यवाद आमीरखान, सत्यजित भटकळ आणि बाकी सगळीच टीम...........

Comments

अनुमोदन

पहिला भाग सुरेख झाला. कसलाही दिखाऊपणा नाही, बॅकग्राऊंड म्युजिक नाही, इमोशनल प्रसंग उगीच स्लो मोशनमधे दाखवणे नाही की काही नाही. जे आहे, ते जसेच्या तसे समोर ठेऊन विचार करायला भाग पाडणारा हा कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. आमिर खानकडून ज्या दर्जाची अपेक्षा होती, त्याला न्याय दिला गेला आहे, याचा आनंद वाटतो. प्रक्षेपणासाठी रविवार सकाळची वेळ निवडणेही कल्पक !

सध्याच्या टीव्ही कार्यक्रम आणि रिएलिटी शोजच्या भाऊगर्दीत अजिबात चुकवू नये असा कार्यक्रम सादर केल्याबद्दल आमिरच्या टीमचे कौतुक, आणि स्टार वाहिनीचे आभार.

सहमत

बॅकग्राउंड म्युझिक नाही, इमोशनल प्रसंग उगीच स्लो मोशनमध्ये दाखवणे नाही असे पहिल्यांदाच अनुभवले. पडद्यावर दाखवलेले प्रसंग इमोशनल नव्हते, पण् पडद्यावरचे आणि टीव्हीसमोरचे प्रेक्षक प्रसंगांचे वर्णन ऐकताना इमोशनल झाले होते....वाचक्नवी

कार्यक्रम पाहिला

कार्यक्रम पाहिला. सुसूत्रता, संचलन, संगीत आणि एक्झेक्युशनच्या बाबतीत कार्यक्रम निश्चितच उजवा वाटला. आमीर खानने हाती घेतलेली भूमिका सक्षमतेने पार पाडली. टिव्ही चॅनेल्सच्या इतर "रिऍलिटी शोज"मध्ये जो बटबटीतपणा असतो तो टाळल्याबद्दल आमीर आणि चमूचे नक्कीच कौतुक वाटले. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही नवीन गोष्टीही कळल्या - त्यापैकी एक म्हणजे स्त्रियांच्या व्यापाराबद्दल. ऐकून खेद वाटला.

या कार्यक्रमाची तुलना "बिग बॉस"वगैरे रिऍलिटी शोजशी करायची गरज वाटत नाही. मात्र अशाप्रकारचे टॉक शोज हा काही नवा प्रकार नाही. अगदी दूरदर्शनच्या काळात प्रिया तेंडूलकर वगैरेही असे टॉक शोज सादर करत आणि त्यांना चांगला प्रतिसाद लाभत होता. नंतरच्या काळात न्यूज चॅनेल्सवर असे कार्यक्रम सादर होतात परंतु त्यातील अनेक कार्यक्रम बटबटीत वाटतात. बटबटीतपणा सोडल्यास त्या कार्यक्रमांत आणि आमीरच्या कार्यक्रमात नेमका कोणता फरक होता हे पाहायला गेल्यास दोन गोष्टी आढळल्या. आमीरच्या नावामागचे वलय आणि वस्तुस्थितीसोबत या प्रश्नांबाबत काय करता येईल याचा केलेला उहापोह आणि दाखवलेली दिशा.

आमीरच्या नावामागचे वलय बाजूला ठेवले आणि प्रश्नांबाबत दाखवलेली दिशा लक्षात घेतली तर मात्र चित्र इतकं रेखीवआखीव दिसत नाही. विशेषतः आजच्या एपिसोडमध्ये म्हटल्याप्रमाणे स्टींग ऑपरेशन टिव्हीवर दाखवूनही सदर डॉक्टरांचे प्रमाणपत्र काढून घेण्यात आले नाही, त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही. ज्या बायकांनी आपल्या मुली जन्माला घालण्याचा निर्णय घेतला, प्रसंगी नवरा आणि सासरच्यांची साथ सोडली त्यांच्या मुलींना बापाकडून 'चाइल्ड सपोर्ट' मिळतो का हे कळले नाही परंतु बहुधा हे असे काही होत नसावे असे दिसते. ही आपली वस्तुस्थिती आहे आणि सामान्य माणूस (यांत अन्यायपिडीतही आला) या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करू बघतो कारण त्याविरुद्ध आवाज उठवणे हे त्याला परवडणारे नाही. टिव्हीसमोर बसून डोळे टिपण्यापुढे सामान्य माणसाची मजल असे कार्यक्रम बघून जाईल का असा प्रश्न पडतो.पण निदान काहीजणांचे मन-परिवर्तन होऊ शकते काय याचे आशावादी उत्तर होकारात्मक देता येईल परंतु कायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत बळकट होत नाही, लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि ती भीती वाटण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ओवरऑल वस्तुस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही.

अर्थातच, पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा!

काही गोष्टी खटकल्या. त्यातील पहिली म्हणजे, हा कार्यक्रम ज्या वेळेत दाखवला जातो ती वेळ रविवार सकाळ असल्याने संपूर्णतः कौटुंबिक वेळ आहे. यांतील काही कार्यक्रम लहानमुलांसाठी योग्य असतीलच असे नाही. तसेच काही दृश्ये अस्वस्थ करणारी होती. त्या दृश्यांबाबत पूर्वसूचना देण्याचे कसे काय सुचले नाही याचे आश्चर्य वाटले. ही दृश्ये कार्यक्रमाच्या टीआरपीला मारक ठरू नयेत अशी अपेक्षा. पुढील कार्यक्रमात या त्रुटी टाळल्यास बरे होईल.

अगदी हेच

अगदी हेच इथे म्हटले आहे. प्रिया तेंडूलकरांच्या शो बद्दल सुद्धा. यावरून् त्या शो चे महत्व कळाले.

यक!

आमीर 'राखी/ बेदी' खान.

प्रतिक्रियेचा विस्तार करावा.

मुलाखतकाराचे गरजेपुरते बोलणे, फाफटपसारा न करणे, संयत शब्दांत बोलणे, योग्य प्रश्न विचारणे, संयत पार्श्वसंगीत, मुलाखतींसाठी योग्य व्यक्तींची निवड यांतून आमीर राखी/बेदी खान कसा दिसतो हे जाणून घेण्यास आवडेल.

कृपया विस्तार करावा.

कार्यक्रमाबद्दल माझे मत स्वतंत्र प्रतिसादात देईन.

अश्लील

मला हा कार्यक्रम बटबटीत वाटला. स्वागतालाच लोकांना हाताने बसाबसा अशी खूण करून, पायर्‍यांवर बसून, मी कित्ती साधा आहे, तुमच्यातलाच आहे, असे सांगण्याचा प्रयत्न होता. आसवे टिपणारे किंवा विस्मयचकित प्रेक्षक वेळोवेळी दाखविण्यात आले. इनोदी कार्यक्रमांत हशा घुसविलेला असतो तसेच हेही. स्वतःला शाणे समजणारे लोक जसे आविर्भाव करतात तसेच आविर्भाव आमीर खानही करीत होता. उदा., गर्भारपण पाच महिने लपविण्याच्या निर्णयाचे त्याने "अरे व्वा, शाब्बास!" अशा पेट्रनायजिंग प्रकारे समर्थन केले.
--
स्त्रीभ्रूणपाताविरोध हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

अरेच्चा!

मला हा कार्यक्रम बटबटीत वाटला. स्वागतालाच लोकांना हाताने बसाबसा अशी खूण करून, पायर्‍यांवर बसून, मी कित्ती साधा आहे, तुमच्यातलाच आहे, असे सांगण्याचा प्रयत्न होता. आसवे टिपणारे किंवा विस्मयचकित प्रेक्षक वेळोवेळी दाखविण्यात आले.

मध्यमवर्गाच्या भावनांना हात घालणे हाच कार्यक्रमाचा उद्देश वाटतो. बाकी, मी तुमच्यातलाच आहे असे मुद्दाम सांगणारे आणि आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत किंवा इतरांना जे दिसतं आवडतं त्यापेक्षा आमची आवड उच्च आहे, वेगळी आहे असे सांगणारे सर्वच मला वेळप्रसंगी बटबटीत वाटतात/ वाटू शकतात पण मग अशा चाळणीने चाळल्यास उरलेच कोण?

स्वतःला शाणे समजणारे लोक जसे आविर्भाव करतात तसेच आविर्भाव आमीर खानही करीत होता.

स्वतःला शाणा न समजणारा कोणीही आजपर्यंत मला भेटलेला नाही आणि स्वतःला शाणे समजणारे सर्वच राखी/बेदी असतील तर प्रत्येक उपक्रमीने ते उपनाम आपल्या आयडीत जोडायला हरकत नाही. कसें? ;-)

कार्यक्रमाला शुभेच्छा!

कार्यक्रमाचे पॅकेजिंग, फॉर्म्याट छान आहे. आणि आमीरचे ते मंदमंद प्लॅस्टिकी स्मितहास्य, तो हुशारपणे गंभीर चेहरा, ते मधूनच अर्थपूर्ण उसासे टाकणे आणि त्याच्या उभ्या राहण्याच्या स्टायली वगैरे वगैरे.... असो. आमीरची ऍक्टिंगही छान आहे. असो. कार्यक्रमाचा हेतू उदात्त आहे. 'सूरत बदलनी चाहिये' म्हणून कार्यक्रमाला शुभेच्छा!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बघितला नाही

बघितला नाही, पण ओप्रहःशी तुलना केल्याचे दिसते.

अवांतर - एका एपिसोडच्या ३ करोड दमड्या घेतल्या असल्यास त्याला शाणपणा करायला लावणारच न?

कार्यक्रम

शो बघितला नाही. पुढील रविवारी सहज टिव्ही लावलाच तर नक्की बघेन

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

प्रतिक्रिया

मला शो आवडला. इथल्या प्रतिक्रिया वाचून कशावर प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ते कळले नाही?
अमिर खानच्या सादरी करणावर?
कार्यक्रमाच्या फॉरमॅटवर?
कार्यक्रमाच्या विषयावर?

मला हा कार्यक्रम तद्दन बंद घरातल्या अश्लील चाळ्यांपेक्षा खुपच चांगला वाटला.

स्त्रीभ्रुण हत्येला सरकारी यंत्रणांनी सुरवात केली हे मला पहिल्यांदाच कळले आणि धक्कादायक वाटले. बाकि माहिती नवीन नव्हती. पण माहिती सुसुत्रपणे मांडली असे वाटले.

तसे तर अनुवादीत लेख-पुस्तके कशाला वाचायची? असे अनेकांना योग्य वाटू शकते. तसे अनुवाद करणे हा फालतु वेळ असलेल्या लोकांचा उद्दोग सुद्धा मानत येईल. प्रत्येकाला आपापला चश्मा आहे आणि त्याप्रमाणेच त्यांना दिसते. त्यात काही गैर नाही.

बाकी मी आज इतर प्रकारच्या प्रतिक्रिया अनुभवल्या. उदाहरणा दाखल येथे देत आहे.

मी अविवाहित आहे. स्त्रीभ्रुण हत्येचा आणि माझा काय संबंध. माझं डोकं जड झाला पाहून.

असे डोकं जड करणारे कार्यक्रम रविवारचा दिड तास घालवून मी कशाला पाहू?


पाहू पुढे

पहिल्या कार्यक्रमात दोष ठेवण्यासाठी ठोस/निश्चित टार्गेट्स होती (सासरची मंडळी + डॉक्टर मंडळी)

बालकामगारांवर कार्यक्रम होणार आहे असे ऐकले. तो पहायला, विशेषत: ते थांबवण्यासाठी प्रॅक्टिकल उपाय सुचवले जातात का हे पहायला आवडेल.

झोपडपट्टी याविषयावर कार्यक्रम होणार आहे का हे कळलेले नाही. तोही पहायला आवडेल.

[दोन्ही प्रश्नांत कायद्याची अंमलबजावणी हा एकच पैलू नाही].

नितिन थत्ते

सत्यमेव जयते

आमीर खानचा कार्यक्रम पाहिला. अतिरंजितपणा, टी. आर. पी. साठी केलेली रडारड-बोंबाबोंब दिसली नाही बरे वाटले.

पण.....

हे सोडता कार्यक्रमाचे नाविन्य काय होते? स्त्रीभ्रूणहत्या खरच गंभीर प्रश्न आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या कार्यक्रमाचा निमित्ताने नवीन काय झाले किंवा आमिरने नवीन काय सांगितले, आधी न सांगितलेले किंवा माहित असलेले काय प्रभावी उपाय सांगितले हे काही कळले नाही (कदाचित प्रश्नावर उपाय हा कार्यक्रमाचा हेतू नसावा). फक्त आमीरने हा प्रश्न परत मांडला म्हणजे नेमके काय झाले, भयानक लोक जागृती वगैरे झाली/सुरु झाली आहे/ होणार आहे? की काही असे ठाम उपाय सुचवले की ज्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या समस्या कमी होण्याची आशा आहे, मला तर तसे काही दिसले नाही.

एका शॉटला आमीरने फिल्मी स्टाईलने कॅमेऱ्याकडे बघितले आणि सांगितले की मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असते..... ७-८ वर्षापूर्वी किंवा त्याही आधी दूरदर्शनवर एक विस्तृत लोकजागृती करणारी जाहिरात दाखवली जायची ज्यात क्ष क्रोमोझोन य क्रोमोझोन याविषयीची (मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णत: पुरुषावर अवलंबून असते हे दाखवणारी) सोप्या शब्दात माहिती होती. या जाहिरातीचा माराही पुष्कळ होता त्यामुळे इतकी वर्ष होऊन ही लक्षात आहे.

इतर काही मराठी संकेतस्थळावर या कार्यक्रमाचा उदो-उदो सुरु आहे, एखादा कार्यक्रम फक्त आमीर खान करतो आहे म्हणून ह्या कार्यक्रमात नाविन्य किंवा कौतुकास्पद एवढे काय होते ते काही कळले नाही.

बाकी

निदान काहीजणांचे मन-परिवर्तन होऊ शकते काय याचे आशावादी उत्तर होकारात्मक देता येईल परंतु कायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत बळकट होत नाही, लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि ती भीती वाटण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ओवरऑल वस्तुस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही.

ह्या प्रियालीताईच्या प्रतिक्रियेशी १००% सहमत.

पुढील भागांसाठी शुभेच्छा.

एसएमएस, पत्रे, इमेल्स वगैरे

या कार्यक्रमातून एक प्रश्न पडला. राजस्थान सरकारवर दोषी डॉक्टरांवर त्वरित कार्यवाही व्हावी या हेतूने दबाव आणण्यासाठी एसएमएस पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारच्या आवाहनांनी नेमके काय साध्य होते? "गेम शो"मधून एसएमएसचा जोगवा/ मत मागणे वेगळे आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी एसएमएस मागणे वेगळे वाटते. यातून खरेच काही साध्य होईल की राजस्थानसरकारला लोकांच्या तोंडाला पाने पुसणे फारसे कठीण नसेल? जनलोकपालसाठी आंदोलने करून, गर्दी जमवून पुढे काय झाले याचे उदाहरण ताजे आहेच.

मिडीयाने आज आमीरच्या कार्यक्रमाला उचलून धरले आहे. हाच मिडीया काही दिवसांनी या कार्यक्रमाची आतडी पोतडी बाहेर काढायला निघेल. "मिडियाची नवी सर्कस" यापुढे जाऊन हा कार्यक्रम कसा तरणार?

आमीर खान सोडल्यास

आम्ही तद्दन अश्लील चाळ्यांचे कार्यक्रम, मालिका वगैरे वगैरे किंवा सध्याचे तत्सम रिअॅलिटी शो वगैरे वगैरे बघत नाही. पण असले कार्यक्रम कानावर पडत असतात. असो. हे शो, कार्यक्रम घाणेरडे, बीभत्स वगैरे वगैरे आहेत म्हणून ज्यांना आमीर खान अतिशहाणा, आगाऊ, पेट्रनायझिंग वाटतो त्यांनी हात आखडता घ्यावा काय? असो. आमीर खान सोडल्यास तसा कार्यक्रम वाईट नाही. किंबहुना कार्यक्रमामुळे थोडेफार भले होण्याची दाट शक्यताही आहे. पण कार्यक्रमावर टीका केल्यामुळे अनेकांच्या हळुवार, नाजुक, जंतरमंतर मध्यमवर्गीय भावना किंवा संवेदना दुखापतग्रस्त होत आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सोडायचा कशाला?

आमीरखानला सोडायचा कशाला म्हणे? आपल्याकडे दुसरी कोणी व्यक्ती आहे का जी अतिशहाणी नाही, उगा बकबक करत नाही, आगाऊ नाही, पेट्रनाइज करणारी नाही. अशी व्यक्ती आधी शोधू मग आमीरला सोडू. ;-)

कार्यक्रमावर टीका केल्यामुळे अनेकांच्या हळुवार, नाजुक, जंतरमंतर मध्यमवर्गीय भावना किंवा संवेदना दुखापतग्रस्त होत आहेत.

आण्णा गेले, आमीर आले अशी स्थिती आहे सध्या. त्यामुळे ज्यांच्या संवेदना दुखापतग्रस्त आहेत त्यांना बरे व्हायला थोडा वेळ द्या.

दुखापतग्रस्त आणि मुर्दाड !

दुखावलेल्या संवेदना कालांतराने ठीक होतीलही, पण ज्यांच्या संवेदना ठार मरूनच गेल्यात त्यांचे काय करायचे?

जगात चाललेले यच्चयावत सगळे काही कसे अपूर्ण किंवा अनावश्यक आहे हे दाखवण्यात आपला शाणपणा खर्ची घालणारे आणि फेसबुकावर 'लाईकक्रांती' घडवणारे- या दोन्ही प्रकारच्या कीबोर्डवीरांत वस्तुतः काडीचाही फरक नाही. इतरांनी केलेल्या बर्‍यावाईट कामांकडे 'बीन देअर-डन दॅट्' अवसान आणून, सर्वज्ञ असल्याच्या थाटात विश्लेषणे करणार्‍या आणि आपली बौद्धिक खाज भागवणार्‍या दहा शाण्यांपेक्षा जमिनीवर उतरून एक स्टारफिश वाचवणारा कितीतरी श्रेष्ठ आहे, असे मी मानतो.

'सत्यमेव जयते' हेच खरे !

सर्वज्ञपणा कशाला हवा?

सर्वज्ञ असल्याच्या थाटात विश्लेषणे करणार्‍या आणि आपली बौद्धिक खाज भागवणार्‍या दहा शाण्यांपेक्षा जमिनीवर उतरून एक स्टारफिश वाचवणारा कितीतरी श्रेष्ठ आहे, असे मी मानतो.
खिल्ली उडवायला सर्वज्ञपणा कशाला हवा? दांभिकपणा, व्यंग दिसले की झाले. बाकी लहान मुलांना स्टारफिशाच्या स्टोऱ्या फार आवडतात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुर्दाड की उदासीन?

दुखावलेल्या संवेदना कालांतराने ठीक होतीलही, पण ज्यांच्या संवेदना ठार मरूनच गेल्यात त्यांचे काय करायचे?

संवेदना मरून गेलेल्या नसाव्या पण भयंकर औदासीन्य भारतीय मध्यम वर्गात आहे आणि कमालीचा स्वार्थ. या दोहोंतूनच जगात चाललेले यच्चयावत सगळे काही कसे अपूर्ण किंवा अनावश्यक आहे हे दाखवण्यात आपला शाणपणा खर्ची घातला जातो कारण तो तसा घातला की स्वतः काही करण्याची जबाबदारी नष्ट होते.

या पुढली पायरी म्हणजे आम्हाला "मसीहा" हवा आहे पण अर्थातच तो आमच्या घरातून आलेला नसावा ही किमान अपेक्षा आहे.

त्रागा

संवेदना मरून गेलेल्या नसाव्या पण भयंकर औदासीन्य भारतीय मध्यम वर्गात आहे आणि कमालीचा स्वार्थ. या दोहोंतूनच जगात चाललेले यच्चयावत सगळे काही कसे अपूर्ण किंवा अनावश्यक आहे हे दाखवण्यात आपला शाणपणा खर्ची घातला जातो कारण तो तसा घातला की स्वतः काही करण्याची जबाबदारी नष्ट होते.

सगळेच घडणारे नजरेला पडते असे नाही, काम करणारे बोलतीलच असेही नाही, आमीर दिसतो अनेक आमीर दिसत नाहीत, 'सत्यमेव जयते' कार्यक्रमाला मिळणारा नकारात्मक प्रतिसाद अनुभवातून आला असावा, बरखा दत्तनेपण अनेक अशा गोष्टींवर उहापोह केला आहे, पण तिच्या काही नकारात्मक बाजू समोर आल्यावर 'प्रथम तुज पाहता' विश्वास ठेवणे अवघड वाटते, तसेच आमीरने घेतलेल्या ३ करोडमूळे आयोजकांचे प्राथमिक ध्येय पैसे मिळवणे असेल असे वाटते, ह्या सगळ्यांना नावे ठेवणारा मध्यमवर्ग बर्‍याच सामाजिक उपक्रमांमधे कुवतीप्रमाणे सहभागी होताना दिसतो(निदान मला), "राष्ट्रगीती" भावनिक मने असे काही वेगळे बघितले की तात्पुरते भारावून जातात असेही दिसते, अर्थात गोष्टींना 'य' बाजू असतात त्यामुळे चटकन निष्कर्षाप्रत येणे 'कसेही' गैरच.

परिस्थिती त्याच्याही पुढे

पण कार्यक्रमावर टीका केल्यामुळे अनेकांच्या हळुवार, नाजुक, जंतरमंतर मध्यमवर्गीय भावना किंवा संवेदना दुखापतग्रस्त होत आहेत

परिस्थिती त्याच्याही पुढे गेलेली दिसत्येय. आमच्या हाफिसातला एका सहचार्‍याने मला म्हटले "काय?? तु सत्यमेव नाही बघितलास? अरे काही सोशल अवेअरनेस आहे की नाही?" =))

फेसबुक वर 'कॉज'ला लाईक करणे, 'मी अण्णा' टोपी घालणे, ऑनलाईन काहिसाश्या 'चळवळींवर' आय सपोर्ट सह्या (क्लिक)करण्याबरोबरच "सत्यमेव जयते" हे सोशल अवेअरनेस असण्याचे नवे परिमाण झालेले दिसते.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

भारतात स्वार्थी कोण नाही?

भारतात स्वार्थी कोण नाही? नेते आणि सरकारी बाबू स्वार्थी आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेला वश करणारा श्रीमंत वर्ग स्वार्थी आहे. आत्मकेंद्रित आणि उदासीन झालेला मध्यमवर्ग स्वार्थी आहे आणि गरीब वर्ग तरी निष्पाप राहिलाय का? झोपडीत टीव्ही असला तरी रेशनकार्ड केशरी आणि गरीबी रेषेखालील स्टेटस असलेले लाखो लोक सापडतील. सगळे लाच देऊन कामे करुन घेतात. अर्थात परदेशातील शुद्ध हवेमुळे खूपशा स्थलांतरित भारतीयांची मने अद्याप निर्मळ आणि नि:स्वार्थी राहिली आहेत. काही आशा असेल तर फक्त त्यांच्याकडूनच.

बाष्कळ विधान

हं! या कार्यक्रमाचे टार्गेट ऑडियन्स मध्यमवर्ग आहे. त्यामुळे चर्चेत मध्यमवर्गाबद्दलच टिप्पणी आहे. सत्यमेव जयते हा भारतीयांनी भारतीयांसाठी सुरू केलेला कार्यक्रम दिसतो तेथे -

"परदेशातील शुद्ध हवेमुळे खूपशा स्थलांतरित भारतीयांची मने अद्याप निर्मळ आणि नि:स्वार्थी राहिली आहेत. काही आशा असेल तर फक्त त्यांच्याकडूनच." हे बाष्कळ वाक्य लिहून किंवा अनिवासी भारतीयांना वेगळे पाडून, नक्की काय दाखवायचे आहे?

योगप्रभू यांनी खुलासा करावा. अन्यथा, हा शाब्दिक दहशतवाद आहे असे मानण्यास जागा वाटते.

निखळ प्रशंसेचा अपमान कशाला?

कृपया मी लिहिलेले वाक्य पहा. त्याची फोड केली तर आपल्याला निखळ प्रशंसाच आढळेल. चांगल्याला चांगले म्हणायचे नाही का?

"परदेशातील शुद्ध हवेमुळे खूपशा स्थलांतरित भारतीयांची मने अद्याप निर्मळ आणि नि:स्वार्थी राहिली आहेत. काही आशा असेल तर फक्त त्यांच्याकडूनच."

भारतापेक्षा परदेशातील हवा शुद्ध आहे, हे मी विश्वासाने सांगू शकतो. मी स्वतः वाहनांच्या धुराने सर्वाधिक हवाप्रदूषण होत असलेल्या एका भारतीय शहरात राहातो. जल, वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आमच्याकडे ठोस पावले उचलली जात नाहीत. डॉल्बी सिस्टिम लाऊन रस्ते अडवून वराती निघतात. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आम्ही टाळू शकत नाही. वाहतूक कोंडीत किंवा एरवी कारण नसतानाही चालक कर्कश्श हॉर्न वाजवतात. या पार्श्वभूमीवर मागे वाचलेले एक उदाहरण मला कौतुकाचे वाटले. परदेशात एका भारतीय मंदिरात तुपाचा दिवा किंवा समई पेटवण्यास तेथील नियमानुसार बंदी होती, तर भारतीयांनी इलेक्ट्रिक नंदादीप लावला. गणेश विसर्जन वाटेल तिथे करता येणार नाही म्हणून सर्व काळज्या घेऊन प्रशासनाच्या देखरेखीखाली समुद्रकिनार्‍यावर ते छोट्या प्रमाणात पार पडले. स्थलांतरित भारतीय परदेशांमध्ये तेथील कायद्यांचे काटेकोर पालन करतात, तेथील स्थानिकांशी मिळून मिसळून राहतात, तेथील प्रशासनाला वेठीस धरत नाहीत अथवा लाच देऊन कामे करुन घेत नाहीत. असे चित्र इकडे भारतात दिसत नाही. इथे भारतात राहणारे दिवसेंदिवस कायदा, नियम, नैतिकता याबाबत बेफिकीर होत असल्याचे दिसते आहे. पूर्वीचा धार्मिक तणाव आता जातीय पातळीवर आला आहे. रोजची वर्तमानपत्रे वाचताना ते जाणवते.

या पार्श्वभूमीवर मी जर माझ्या स्थलांतरित बांधवांची प्रशंसा केली तर त्यात कुणाला काय खटकण्याजोगे आहे? पुन्हा कोणतेही विधान ऍबसोल्यूट करता येत नाही, हे मला ठाऊक आहे. कोणताही समाज सर्वच्या सर्व गुणवान किंवा दुर्गुणी, नि:स्वार्थी किंवा स्वार्थी असा असत नाही. त्यात अपवाद असतातच. म्हणून मी 'खूपशा' असा शब्द वापरला. याचाच अर्थ संख्येने 'निर्मळपणा व निस्वार्थीपणा' या गुणांत अल्प असे काही भारतीयही अपवाद ठरु शकतात, हे गृहित धरले आहे. मी ज्यांची प्रशंसा केली त्यांच्याकडून आशा बाळगली तर काय चुकले? भारतात संवेदना मेलेलेच जास्त आहेत, हे मला कधीच पटले आहे. भारतीय मध्यमवर्ग हा उदासीन आणि कमालीचा स्वार्थी आहे, हे सत्य आम्हाला पूर्वीच आमच्यायेथील एका अभ्यासू संपादकांनी जाहीर सांगितल्यानंतर उमगले होते.

माझ्या विधानात 'शाब्दिक दहशतवाद' अजिबातच नाही किंवा मी भेदभाव केलेला नाही. आमच्या स्थलांतरित बांधवांच्या चांगल्या गुणांचा उच्चरवाने आणि अभिमानाने पुरस्कार करण्यात मी कोणती वाईट गोष्ट केलीय, की ज्याबद्दल मला कॉम्प्लिमेंट्सच्या जागी टीका सहन करावी लागतीय? आता इतका स्पष्ट खुलासा आणि उद्देश स्पष्ट केल्यावर माझ्या हेतूबद्दल शंका घेतली जाऊ नये. संवेदना मेलेल्या शब्दांना दहशतवादाचे लेबल लागू नये, ही विनंती..

भेदभाव

शब्दांचे पूल बांधले म्हणून जो बाष्कळपणा झाला तो कमी होत नाही.

ही चर्चा परदेशात काय चालते त्या विषयी नसताना उगीच टिप्पणी करण्यात आली. वरील प्रतिसादातून ती वाढवण्यात आली आहे. भारतातील मुख्य शहरात नसली तरी अनेक गावांत, हिलस्टेशन्सवर वगैरे शुद्ध हवा असते. किंबहुना, तेथील लोकसंख्या परदेशातील ठिकाणांहून अधिकच असेल. तेथे लोकांची मने नि:स्वार्थी आणि निर्मळ असतील ना. त्यांचे संदर्भ का नाही दिले गेले?

माझ्या विधानात 'शाब्दिक दहशतवाद' अजिबातच नाही किंवा मी भेदभाव केलेला नाही. आमच्या स्थलांतरित बांधवांच्या चांगल्या गुणांचा उच्चरवाने आणि अभिमानाने पुरस्कार करण्यात मी कोणती वाईट गोष्ट केलीय, की ज्याबद्दल मला कॉम्प्लिमेंट्सच्या जागी टीका सहन करावी लागतीय?

कशासाठी? सदर चर्चा परदेशस्थांवर आहे का? संदर्भ सोडून पायरी घसरण्याची गरज का पडली आपल्याला?

परदेशातील शुद्ध हवेमुळे खूपशा स्थलांतरित भारतीयांची मने अद्याप निर्मळ आणि नि:स्वार्थी राहिली आहेत. काही आशा असेल तर फक्त त्यांच्याकडूनच."

कृपया, परदेशातील शुद्ध हवेमुळे मने निर्मळ आणि नि:स्वार्थी राहतात याला वैज्ञानिक पुरावा देणारे संदर्भ सादर करावे. अन्यथा, उपक्रमावर असला शाब्दिक दहशतवाद बंद करावा ही विनंती.

खुलासा पुरेसा स्पष्ट आहे..

एका गोष्टीचे नवल वाटले, की मी व्यक्तीगत टीका केली नसताना (उलट प्रशंसाच केलेली असताना) कुणाला काही का खटकावे?
असो. माझा खुलासा पुरेसा स्पष्ट आहे. त्याउप्पर अधिक विषय वाढवण्याची आणि वाद घालण्याची माझी इच्छा नाही. अन्य कुणाची असल्यास माझा नाईलाज आहे. 'बाष्कळ', 'पायरी घसरणे' व 'शाब्दिक दहशतवाद' हे शब्दप्रयोग स्वीकारण्याचे बंधन माझ्यावर नाही, पण विनंती मान्य करुन ही चर्चा थांबवतो आणि समज-गैरसमजापोटी कुणाला त्रास झाला असल्यास विनम्र भावाने दिलगिरी व्यक्त करतो.

(अवांतर - प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पुराव्यांच्या प्रकाशात तपासण्याची प्रथा अद्याप भारतात पूर्णांशाने नाही. काही गोष्टी वाडवडिलांच्या पारंपरिक उपदेशांवरही मानल्या जातात. हवा-पाणी शुद्ध असेल, आहार चौरस आणि सत्त्वयुक्त असेल तर आरोग्य उत्तम व मनोवृत्तीही निकोप-निर्मळ -नि:स्वार्थी असते, असे दीर्घायुषी असलेले लोक सांगतात. 'शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी' असे आमचे संत सांगतात आणि 'जसा आहार तशी मनोवृत्ती' असे पूर्वज सांगतात. म्हणून शुद्धतेला महत्त्व देण्याची भारतीयांची प्राचीन परंपरा होती. याच पार्श्वभूमीवर माझे विधान होते. याखेरीज 'जंगली', 'गीत' 'जब जब फूल खिले', 'राम तेरी गंगा मैली' अशा आमच्या चित्रपटांतून आम्ही पाहिले आहे, की शुद्ध हवा असलेल्या हिमालय व डोंगरी प्रदेशातील रहिवासी भोळेभाबडे, निष्कपट, निर्मळ, नि:स्वार्थी असतात आणि शहरी हवेतले लोक कमालीचे स्वार्थी असून त्यांचा गैरफायदा घेतात. अर्थात मला भेदभाव करायचा नाही त्यामुळे निर्मळ व नि:स्वार्थी देशस्थ भारतीयांबद्दलही प्रचंड प्रशंसादर व्यक्त करु इच्छितो.)

दिलगिरीबद्द्ल धन्यवाद

एका गोष्टीचे नवल वाटले, की मी व्यक्तीगत टीका केली नसताना (उलट प्रशंसाच केलेली असताना) कुणाला काही का खटकावे?

आपण काय केलेत हे वरील प्रतिसादांतून अनेकांना कळले असावे.

समज-गैरसमजापोटी कुणाला त्रास झाला असल्यास विनम्र भावाने दिलगिरी व्यक्त करतो.

दिलगिरीबद्दल धन्यवाद.

अनेक उपक्रमी सुजाण आहेतच...

<<आपण काय केलेत हे वरील प्रतिसादांतून अनेकांना कळले असावे. >>
त्याबद्दल खात्री आहे. अनेक उपक्रमी सुजाण आणि उत्तम तुलनाशक्ती असलेले आहेत, याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. 'शाब्दिक दहशतवाद' ही संकल्पना मला उपक्रमावरच समजली आणि आता तिचा अर्थही लक्षात आला आहे.

दिलगिरी स्वीकारल्याबद्दल मीही धन्यवाद देऊ इच्छितो.

धट्टीकट्टी गरिबी

गरीब लोकांच्या मुलाखती घेऊन आमीर खानने पहिल्या भागात सांगितले होते की उच्चशिक्षित लोकच मुलगी टाळतात, गरिबांना चालते.
मात्र, परळी येथील डॉ. मुंडे यांच्या हातून गर्भपात करताना मरण पावलेली महिला ऊसतोडणी मजूर (म्हणजे केवळ हंगामी काम!) होती - संदर्भ. (डॉ. मुंडे यांचे पॅकेज रु ३०००० चे होते - संदर्भ.)
या विषयावरील गरिबांचा दृष्टिकोनसुद्धा पुरुषप्रधान असल्याचेच (दुसर्‍या एका निखिल जोशी यांनी लिहिलेल्या) या ब्लॉगवरही दिसते.

मुलीचे नाव होते 'निराशा मोहुर्ले.' अम्मांनी तिला केबिनमध्ये बोलवले, तपासले, औषधे लिहून दिली. नंतर तिच्या आईला आत बोलावले. थोडी खोलात चौकशी केली असता कळले की खूप इच्छा असूनही मुलगा झाला नाही म्हणून वैतागून बाळाचे नाव निराशा ठेवले होते.

असाच आणखी एक संदर्भ:

मध्यमवगीर्य, उच्चमध्यमवगीर्य आणि श्रीमंत कुटुंबामध्ये केल्या जाणाऱ्या या गर्भहत्येची फळे आता मुलगे आणि मुली यांच्या लोकसंख्येतील व्यस्त प्रमाणात दिसू लागली आहेत. जे शहरांतून घडते, ते लहान गावांतून होत नाही; कारण तशा सुविधा आणि आथिर्क बळ तिथल्या कष्टकऱ्यांत नसते. परंतु मुलगी नको हा शहरी विचार तिथे मुलींचे नावच 'नकोशी' असे ठेवण्यात प्रगट होतो.

 
^ वर