"मुंबईचे वर्णन " लेखक- गोविंद नारायण माडगावकर

"मुंबईचे वर्णन " लेखक- गोविंद नारायण माडगावकर, साकेत प्रकाशन, पृ. ३२८, किं. रु.२५०/-. सदर पुस्तकाचे पहिले प्रकाशन इ.स.१८६३ साली झाले होते. त्यामुळे पुस्तकातील भाषा तत्कालीन मराठी आहे. आमच्या मुंबई बाबत वेगळीच माहिती वाचताना फार गम्मत वाटते. दुखाची बाब म्हणजे हे पुस्तक १८६३ नंतर प्रथमच प्रसिद्ध झाले आहे. या मधल्या काळात कोणाही मराठी माणसाला या पुस्तकाचे पुनः प्रकाशन करावेसे वाटले नाही. असो. पुस्तकातील प्रस्तावना तर फारच सुंदर आणि महत्वाची आहे. सदर पुस्तक प्रकाशित करण्याबाबत माडगावकर म्हणतात, " हे आमचे यत्किंचित प्रयत्न पाहून ह्या शहरातील कित्येक विद्वज्जनसमूहास इर्षा येऊन त्याणी याहून सहस्त्रपट उत्तम असा मुंबईचा किंबहुना हिंदुस्थानचा इतिहास अनेक देश पाहून स्वश्रमाने तयार करावा अशी उमेद आहे. या कृत्यास आरोग्य व द्रव्याची विपुलता पाहिजे.लक्ष्मीची कृपा पावलेले गृहस्थ आम्हांमध्ये बरेच आहेत.इतिहास म्हटला म्हणजे ज्याच्या देशाचा त्याणेच लिहावा. जर कोणास मराठीसारिख्या प्राकृत भाषेत इतिहास लिहावयास मन होत नसले, तर इंग्रजीत लिहिला असता तो इंग्रज आणि एतद्देशीय लोकांसही सारखाच मान्य होईल. परंतु मराठी भाषा म्हणजे केवळ क्षुद्र आहे असे कोणी माणू नये. मराठी भाषा संस्कृत भाषेच्या योग्यतेस देखील येईल.ती विद्वान लोकांनी वहिवाटीत आणिली पाहिजे. या भाषेत अनेक शास्त्रीय विषयावर ग्रंथ रचून तीत अनेक शब्दांची योजना केली पाहिजे. संस्कृत, युनानी, हिब्रू, लातीन, अरबी, फारशी,इत्यादी भाषा विद्वज्जनांनी सुधारल्या,म्हणूनच एवढ्या योग्यतेस चढल्या. आमच्या कल्पना उष्ट्या,आमचे विचार परतंत्र, आमची बुद्धी जड,आमची ग्रंथरचना पोरकट, आम्ही दुसऱ्याने संपादन केलेल्या विद्याधनावर फिशारी भोगणारे, किंवा उच्छिष्ट्भोजी , असे जे आम्हास युरोपियन लोक दोष देतात, त्यापासून आम्हास व आमच्या पुढील संततीस तरी आमचे अर्वाचीन ज्ञाते मुक्त करतील, अशी खातरी बाळगून हा ग्रंथ रचिला आहे.एक विद्वान असे म्हणतो.अनेक भाषा शिकाव्या, आणि मनुष्याने विद्वान व्हावे ते कशासाठी ? स्वभाषेत अनेक भाषातील शब्द व कल्पना मिसळून तीस उत्तम प्रतीच्या भाषेची योग्यता आणावी, नाहीतर अनेक भाषा व विद्वान होऊन लोकांस तादृश लाभ होत नाही, एखाद्या मुलाचे आई बाप मुळचे दरिद्री असतात, व पुढे मुलगा कर्तुत्वी निघून व मोठी संपत्ती मिळवून जसा आपले कूळ उदयास आणितो ;त्याच प्रमाणे विद्वान लोकांचे कूळ हि त्यांची स्वभाषा, ही त्याणी उदयास आणिली नाही ,तर मुलास संपत्ती प्राप्त झाली असता त्याणे आपल्या आई बापास घरातून हाकून देऊन परक्यास आपल्या वैभवाचे सुख दिले असता त्याजवर कृतघ्नपणाचा जो दोष येतो, तोच त्यांसही लागू होतो,त्यास,वाल्मिक,पाणिनी,इत्यादी अमर झाले,ते एक स्वभाषा सुधारल्यावरूनच.
दुसरे, ज्ञानेश्वर,वामन,मुक्तेश्वर, तुकाराम,मोरोपंत,रामदास,मुकुंदराज,श्रीधर,सोपानदेव,एकनाथ,इत्यादी प्राकृत कवींनी मनावर घेऊन पद्यरचनेत हजारो ग्रंथ रचले,तेव्हापासून मराठी भाषा थोडीसी उदयास आली, आणि ती भाषा काही उपयोगी आहे असे लोक मानू लागले. व आर्या, श्लोक,अभंग,दिंड्या ,ओव्या इत्यादी वाचण्याची लोकांस गोडी लागली.हे त्याणी श्रम केले नसते, तर मराठी भाषा केव्हास विलयास गेली असती.गद्यरचनेत शास्त्रीय विषयांवर ग्रंथ झाले नाहीत, यामुळे ती शास्त्री व पंडित जनास मान्य झाली नाही.परंतु हे लक्षात धरावे की, जी भाषा काव्यरचनेस योग्य झाली, ती हलकट असे कोण म्हणेल.
तीनशे वर्षांमागे इंग्रजी भाषा म्हटली म्हणजे मुळची अगदी पोरकट होती, आणि विद्वान, इंग्रजी लोकांस काही लिहिणे किंवा भाषण करणे पडे, तेव्हा जसे आम्ही हल्ली गणपतीच्या कथेच्या चिट्या, धर्मसंबंधी सभांचे कागद, भाजीची याद, व लग्नपत्रे देखील इंग्रजीत पाठवतो, त्याचप्रमाणे ते सर्व अगत्याचा कागदपत्राचा व्यवहार लातीन किंवा फ्रेंच भाषेत करीत.स्वभाषेची त्याला इतकी लाज वाटे की, तीमध्ये ते चौघात एकमेकांसी भाषण करायला देखील लाजत, आणि हल्ली आम्ही जसे अर्धे मराठी आणि अर्धी इंग्रजी बोलतो, तसे ते अर्धी इंग्रजी व अर्धी लातीन बोलत.परंतु पुढे जेव्हा बेकन,न्यूटन, मिल्टन, पोप,शेक्सपियर, बैरन ( लॉर्ड बायरन असावा बहुतेक), स्काट, अडीसन, इत्यादी त्यांध्ये धुरंधर विद्वान झाले,तेव्हा त्याणी ती भाषा श्रमेंकरून उदयास आणली.आणि आता ती सर्वमान्य झाली इतकेच नाही,परंतु संस्कृत, लातीन, अरबी, हिब्रू इत्यादी विद्वज्जन भाषांच्या पंक्तीस जाऊन बसली. अहो ? ही आम्हास किती लांच्छन आणण्याजोगी गोष्ट आहे. इंग्लंड देशातील इंग्रज आचार्यांनी आमच्या देशात येऊन संस्कृत व प्राकृत भाषांचे कोश तयार करून आम्हास द्यावे,आम्ही मराठीत लिहिलेले ग्रंथ त्याणी शोधावे; आमच्या वेदांचा अर्थ जर्मनी देशांतील भट्ट मोक्षमुलर ( maxmuller ) यांनी लावून व त्याजवर टीका करून छापून आम्हांसाठी पाठवून द्यावा; आमच्या मराठी, संस्कृत, आणि गुजराथी विद्यार्थ्यांची परीक्षा डाक्तर विलसन, डाक्तर मिचल, मेजर क्यांडी इत्यादी इंग्रज पंडितांनी घ्यावी; आणि मुंबईतील कॉलेजात विध्यार्थ्यांस संस्कृत शिकवायास जर्मनी देशातून गुरु यावा. अर्थात ही सर्व देशाभिमानाची व अप्रतिम उद्योगाची फळे आहेत,दुसरे काही नाही.
जर कोणी म्हणेल की,आमच्या लोकांस एवढे दोष कां देता. भारत,भागवत,रामायण, ज्योती:शास्त्र, न्यायशास्त्र, मानसशास्त्र,व्याकरण,वैद्य शास्त्र , अशा गहन विषयांवर मोठमोठे राजमान्य ग्रंथ आमच्या पूर्वजांनी रचिले आहेत, तर आम्हांमध्ये काय सामर्थ्य नाही?आम्हास ही गोष्ट कबूल करणे भाग आहे की व्यास, वाल्मिक, गौतम , कालिदास, पाणिनी,यांसारीखे आम्हांमध्ये महान विद्वान होऊन गेले खरे, परंतु ते ज्ञान त्यांजकडेसच राहिले, ते आम्हास उपयोगी पडत नाही.ज्याची विद्या,ज्याचे शौर्य ,ज्याचे सत्कर्म, ज्याचे ऐश्वर्य ,ज्याची शरीरसंपत्ती,ज्याचे सुख, त्यासच भूषण देते. ज्ञान म्हटले म्हणजे ज्याचे त्यालाच.दूर कशास जावे ? बापाचा लौकिक मुलास उपयोगी पडत नाही. मग शेकडो वर्षांमागील आमच्या पूर्वजांचे ज्ञान आम्हास कोठून भूषण दायक होईल ?ही सर्व श्रमेंकरून ज्याची त्याणेच साध्य केली पाहिजेत., किंवा पूर्वजांनी सध्या करून ठेविली असता रक्षण तरी केली पाहिजेत, तेव्हाच ट्या पुरुषास भूषण येईल, द्रव्य देखील स्वकष्टाने कमाविले असता जेवढे भूषण देते, तेवढे वडिलांनी ठेविलेल्या द्रव्यापासून भूषण येत नाही.
यावरून अशी कल्पना निघत्ये की, आम्हामध्ये पूर्वी मोठे विद्वान होऊन गेले, त्यामुळेच आम्हाला हल्ली अभिमान उत्पन्न होऊन आम्ही आळशी होत चाललो, जर आम्हामध्ये मुळीच कोणी विद्वान झालेले नसते, तर कदाचित आम्ही विद्येकडे झटून ती संपादन करायचे उद्योग केले असते.इंग्रज लोकांमध्ये पूर्वी विद्वान नव्हते व विद्या कलाही त्यांस नव्हत्या, म्हणूनच त्याणी देशोदेशी जाऊन अनेक शोध केले व लोकांची शास्त्रे तपासून त्यामध्ये जे जे उपयोगी होते , ते साध्य करून घेतले, आणि त्याची वृद्धी केली, व त्याच उद्योगात ते सुख मानितात."
( मराठीत ग्रंथ प्रकाशनाची नुकतीच सुरुवात झाली, अशा काळात १८६३ साली गोविंद नारायण माद्गाव्कारांनी "मुंबईचे वर्णन" सारखा अद्भुत ग्रंथ लिहिणे ही महत्वाची घटना आहे. एखाद्या शहराच्या इतिहासावर ग्रंथ लिहिण्याची परंपरा युरोपातही प्रचलित नव्हती. अशा काळात मुंबई शहराचा इतिहास जमवून लिहिणे ही त्या काळातील अपूर्व घटना होती. मुंबईचे हे एकशे चाळीस वर्षांपूर्वीचे तत्कालिक सामाजिक वर्णन आहे.१८६३ सालची मुंबई, तिचा पूर्वेतिहास, शहराची होत गेलेली वाढ,त्या काळातही होणारे ध्वनीप्रदूषण, मुंबादेवीचे महात्म्य, मुंबईत नुकतीच चालू झालेली रेल्वे, वाढता व्यापार, कर आकारणी आणि मुंबईतील उद्यमशील पारशी समाजाचे चित्रण या पुस्तकात आले आहे. या काळात शिक्षणाची नुकतीच सुरुवात झाली असली तरी रूढी अन परंपरांचा पगडा सर्व सामन्यांच्या मनावर होता तरीही उद्योग-धंद्यातील मुंबईची प्रगती बघून लेखक हरखून गेले. कोणत्याही देशाचे, शहराचे चित्रण त्या त्या काळातल्या वांग्मायात उमटत असते. त्यातील काही अक्षरवांग्मय बनते. " मुंबईचे वर्णन" हे गोविंद नारायण माद्गाव्कारांचे मराठी अक्षर वांग्मय त्यामुळेच अभ्यासकांसाठी आणि वाचकांसाठी आजही महत्वाचे ठरत आहे. एकशे चाळीस वर्षांपूर्वीच्या समृद्ध मराठी भाषेच्या विविध छटा या ग्रंथात बघायला मिळतात. आवर्जून वाचावे आणि संग्रही असावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

पुस्तक नि:संशय महत्त्वाचा संदर्भग्रंथ....

हे पुस्तक खरोखर रंजक आणि महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.

परंतु आपल्या या वाक्यात थोडा तपशील पुरवतो.
<<मराठीत ग्रंथ प्रकाशनाची नुकतीच सुरुवात झाली, अशा काळात १८६३ साली गोविंद नारायण माद्गाव्कारांनी "मुंबईचे वर्णन" सारखा अद्भुत ग्रंथ लिहिणे ही महत्वाची घटना आहे. >>

मराठीत ग्रंथ प्रकाशनाची सुरवात १८०५ साली झाली. बंगालमध्ये श्रीरामपूर येथे मिशनरी डॉ. विल्यम केरी यांनी 'मराठी भाषेचे व्याकरण' व 'सेंट मॅथ्यू' ही पहिली २ पुस्तके छापून प्रसिद्ध केली. १८१८ पर्यंत त्यांनी १२ पुस्तके प्रकाशित केली. मराठीतील स्वदेशी पुस्तक प्रकाशक म्हणजे गणपत कृष्णाजी. यांनी १९३१ पासून मराठीत पंचांग, धार्मिक ग्रंथ, व्याकरणाची पुस्तके छापण्यास सुरवात केली. या दशकात पुणे, मुंबई, अहमदनगर येथे सरकारी व खासगी छापखाने सुरु झाले व पुस्तकाबरोबरच नियतकालिकांचीही छपाई (दिग्दर्शन, दर्पण, प्रभाकर) सुरु झाली होती. त्यामुळे असे म्हणता येईल, की मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवसाय स्थिरावण्याच्या काळात माडगावकरांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. १८६३ साल म्हणजे मराठी प्रकाशन व्यवसायाने पन्नाशी ओलांडण्याचे होते.

माहिती दुरुस्तीहेतू

योगप्रभूंकडून देण्यात आलेली माहिती तोकडी व चूकीची आहे.

पुस्तक व ग्रंथ यांमध्ये फरक असतो.

माझ्याकडे असलेल्या 'मराठीचे व्याकरण' ह्या डॉ. लीला गोविलकर यांनी लिहीलेल्या पुस्तकातील काहि उतारे येथे देत आहे.

इ.स्. १८०५ मध्ये कॅरी या इंग्रजाने वैद्यनाथ शर्मांच्या साहाय्याने 'ए ग्रामर ऑफ महरट्टा लॅन्गवेज' हे (इंग्रजी भाशेतले) व्याकरण रचले. मराठीचे हे इंग्रजी राजवटीतील पहिले व्याकरण एका इंग्रजाने रचले. आणि तेही महाराश्ट्रात प्रकाशित न होता कलकत्याजवळच्या श्रीरामपूर येथे तयार झालेले आहे. यावरून मराठी व्याकरणाची आवश्यकता, त्या काळात मराठी माणसाला मुळीच वाटली नव्हती, हे स्पश्ट होते. अत्यंत जुजबी नियम असलेले हे पुस्तक मराठी-भाशक प्रदेशात नेमावयाच्या अधिकार्‍यांनी मराठी समजावे, वाचता यावे, बोलता यावे, या राजकीय हेतूने रचले होते. 'कॅरीचे व्याकरण ('शर्माने' सांगितलेले असल्यामुळे)अत्यंत अपुरे व चुकांनी भरलेले आहे.' असे मत नोंदवून, महंमद इब्राहिम मखबांनी इंग्रजी व्याकरणाचाच आदर्श नजरेसमोर ठेवून 'अ ग्रामर ऑफ महरट्टा लॅंग्वेज' (१८२६) रचले. ही दोनही व्याकरणे इंग्रजीत आहेत.

१८३३ मध्ये फादर स्टीफन्सनने 'परकियांना मराठीचे द्न्यान करून देणे' या हेतूने मराठीचे व्याकरण लिहिले. चार ब्राह्मणांकडून मराठीतील वेगवेगळे शब्द कसे चालतात, ते समजून घेऊन त्याने, त्याच्या आधारे मराठीच्या व्याकरणाचे नियम सांगितले. हे करताना त्याने मोलस्वर्थ आणी नेस्बिट यांच्याशी चर्चाही केली होती.

बॅलेन्टाईनचे 'दी ग्रामर ऑफ महराठी लॅन्ग्वेज' (१८३९),
बर्जेसचे 'अ ग्रामर ऑफ दी मराठी लॅन्ग्वेज (१८५४) ही देखिल इंग्रजांनी इंग्रजांसाठी इंग्रजीमधून लिहीलेली मराठीची व्याकरणे होत.

बेल्लर्स व आस्खेडकर यांचे मराठीचे व्याकरण (१८६८),
नवलकरांचे 'द स्टुडंटस् मराठी ग्रामर' (१८८०),
खेरांचे 'द हायर मराठी ग्रामर' (१८९९, द्वितीय आवृत्ती) हि मराठी व्याकरणकारांनी लिहिलेली व्याकरणे देखील इंग्रजांसाठी इंग्रजीमध्ये आहेत. पण ह्यावर प्रा. प्रियोळकरांनी वेगळे मत नोंदवले आहे.

गंमत म्हणजे इंग्रजीचे लिखित व्याकरण मराठी लिखित व्याकरणापेक्शा केवळ २५० वर्शेच वरीश्ट आहे, वयाने मोठे आहे.

१५८६ ला विल्यम बुल्लोकर ह्याने लॅटीन भाशेवर आधारलेले इंग्रजी भाशेचे पहिले व्याकरण लिहीले होते. लिहीले ते देखील लॅटीन भाशेत.
परंतु इंग्रजांच्या व आपल्या विद्वज्जनांच्या आभ्यासामध्ये खूप तफावत राहून गेली. इंग्रजी विद्वानांनी जरी लॅटीनवर आधारलेले इंग्रजीचे व्याकरण रचले तरी त्यात रॅशनल, तर्कसुसंगत विचाराने पूर्वसूरींचे व्याकरण सुधारत नेले गेले. आपल्याकडे मात्र अगदी उलट होत गेले. पूर्वसूरींच्या मताला तर्कसुसंगतपणा आणण्याहेतू खोडून काढण्याची हिंम्मत कोणात ही झाली नाही. उलट मराठीचे व्याकरण हे छोट्या खोपटेवजाघराच्या कधी घराभोवतीच तर कधी घरातच बांधकाम करून सोयी-सुविधांचा अभाव असलेले, गैरसोयींनी भरलेले एक घर बनवून ठेवले आहे.

अज्ञान दुरुस्ती हेतू..

१) मी कोणती तोकडी आणि चुकीची माहिती दिली हे कळू शकेल का? रावलेसाहेब!
२) पुस्तक व ग्रंथ यात नेमका कोणता फरक असतो?

नवीन माहिती मिळाली

श्री. योगप्रभू आपण आपल्या पहिल्या प्रतिसादात म्हटले आहे...

मराठीत ग्रंथ प्रकाशनाची सुरवात १८०५ साली झाली. बंगालमध्ये श्रीरामपूर येथे मिशनरी डॉ. विल्यम केरी यांनी 'मराठी भाषेचे व्याकरण' व 'सेंट मॅथ्यू' ही पहिली २ पुस्तके छापून प्रसिद्ध केली.

'विल्यम केरीने मराठीतून 'मराठी भाशेचे व्याकरण' छापले होते.', ही माहिती तुम्हांस कोठुन मिळाली, ते कृपया सांगाल कां?
त्याने १८०७ साली बायबल मराठीतून छापले ही माहिती मला येथून मिळाली. परंतु हिंदी त्याकाळात अस्तित्वात नसताना देखील हिंदीचा तेथे उल्लेख आहे. ते चूकीचे वाटले.

त्यामुळे असे म्हणता येईल, की मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवसाय स्थिरावण्याच्या काळात माडगावकरांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. १८६३ साल म्हणजे मराठी प्रकाशन व्यवसायाने पन्नाशी ओलांडण्याचे होते.

आपले हे विधान मला चूकीचे वाटते. विल्यम केरीने बायबल पुस्तकरुपात छापले होते. ग्रंथ हा शब्द मोठ्या स्वरूपातील लिखीत वा छापील कागद बांधणीलाच वापरला जातो वा तसा अर्थ घेतला जातो. मोजकीच पानं असलेल्या कागद बांधणीला पुस्तक असे म्हटले जाते हे माहित असल्यामुळे आपले विधान चूकीचे वाटते. तुमच्या जवळ वेगळी माहिती असेल तर मला जाणून घ्यायला आवडेल.

माडगावकरांच्या प्रस्तावनेतून त्यांच्या आभ्यासाचा व चिंतनाचा अनुक्रमे आवाका व स्तर दिसून येतो. असा विद्वान माणूस जेंव्हा म्हणतो. - 'आमचे यत्किंचित प्रयत्न पाहून ह्या शहरातील कित्येक विद्वज्जनसमूहास इर्षा येऊन त्याणी याहून सहस्त्रपट उत्तम असा मुंबईचा किंबहुना हिंदुस्थानचा इतिहास अनेक देश पाहून स्वश्रमाने तयार करावा अशी उमेद आहे.'
तेंव्हा त्याचा अर्थ त्यांच्या आधी अशा वैचारीक प्रकारची छापील सामग्री अस्तित्वात नव्हती. मराठीतील शैक्शणीक पुस्तके ह्यात गृहित धरलेली नसावित. त्यांच्या ह्या विधानावरच श्री. पवारांनी - 'मराठीत ग्रंथ प्रकाशनाची नुकतीच सुरुवात झाली, अशा काळात १८६३ साली गोविंद नारायण माडगावकरांनी "मुंबईचे वर्णन" सारखा अद्भुत ग्रंथ लिहिणे ही महत्वाची घटना आहे.' असे म्हटले असावे. त्यात प्रतिवाद करण्यासारखे काहिही नव्हते.

विल्यम केरी पाद्री होता, ही माहिती माझ्याकडे नव्हती. आपल्या दुसर्‍या प्रतिसादानंतर मी विकीपिडियावर केरीवरील लेख वाचला त्यानंतर मला ती माहिती मला मिळाली. त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
त्यात अजून ही काही माहिती दिलेली आहे, त्यावरून मी खालील निश्कर्श काढीत आहे. -

रिचर्ड वेलेस्ली हा एक कुशाग्र बुद्धी असलेला, राजकारणात धुर्त असलेला, मह्त्त्वाकांक्शी आयरीश व्यक्तीला विल्यम केरीचे धर्मांतराचे काम आवडले असावे व त्यास वेगवेगळ्या भाशा शिकून आत्मसात करण्याचे कसब भावले असावे.

वेलेस्ली हा त्या काळात गर्व्हनर जनरल ऑफ इंडिया ह्या मोठ्या पदावर होता. ह्याच्या विनंतीनंतरच विल्यम केरीने 'मराठी व्याकरणाचे पुस्तक' रचले असावे. वेलेस्लीला त्या पुस्तकाचा नंतर उपयोग करायचा असावा. कारण मराठ्यांशी युद्ध करायचे तर आधी त्यांची भाशा यायला हवी असा त्याचा अंतस्थ हेतू असावा.

केरीच्य आयुश्याचे ध्येय 'जगातील मागासलेल्या लोकांना ख्रिस्ती धर्मात आणणे.' हा होता. व्याकरणाची पुस्तके लिहीणं, छापणं हे त्याच्या ध्यानात हि नसावे, जरी त्याला भाशा शिकण्याचा छंद होता तरीही. लहानपणापासूनच त्याने लॅटीन, हिब्रू, इटाली, डच, फ्रेंच अशा अनेक भाशा स्वतःहून शिकून घेतल्या होत्या. भारतात आल्यावर त्याने बंगाली शिकून घेतली.

मी जे लिहिले ते बरोबर आहे...

मी जी माहिती दिली ती माझ्या समजुतीनुसार बरोबर आहे. तिचा स्रोत
१) मराठी ग्रंथप्रकाशनाची २०० वर्षे, लेखक - शरद गोगटे, प्रकाशक -राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठ क्र. ११ व १२
२) महाराष्ट्र परिचय, संपादक : कर्वे, जोगळेकर, जोशी, प्रकरण - मराठी वाड्.मयाचा इतिहास, पृष्ठ ३८७

कॅरी यांनी देवनागरी मुद्राक्षरांचा वापर केलेला असल्याने त्यांच्या पुस्तकाला 'मराठीतील पहिले ग्रंथप्रकाशन' म्हटले जाते, असेही पुस्तकात नोंदवले आहे.

पूर्वीच्या भाषेत ग्रंथ असे भारदस्त नाव असे पण सध्याच्या काळात सर्रास पुस्तक म्हटले जाते. (ग्रंथप्रकाशनच्या जागी पुस्तकप्रकाशन म्हटले तरी फारसे बिघडत नाही.) तुम्हाला आवडेल तो शब्द वापरा. याखेरीज ग्रंथ व पुस्तक यातील भेद मी तरी करत नाही.

......

माफी असावी.

श्री. योगप्रभू तुम्ही सुरवातीला दिलेल्या माहितीशी मिळतीजुळती माहितीच गुगलवर शोधल्यावर मिळाली. मी आपण दिलेल्या माहितीला चूकीचं म्हटले त्याबद्दल मी आपली क्शमा मागतो. तसेच डॉ. लीला गोविलकर यांनी 'मराठीचे व्याकरण' ह्या पुस्तकात दिलेल्या माहितीला खोटं समजू शकत नव्हतो. कारण त्यांनी इतरही बाबतीत सखोल व दाखल्यांसह माहिती दिलेली आहे.

गुगलवर शोधल्यावर मला खालील दुव्यांवर एकसारखीच माहिती मिळाली.
-http://marathikavita.co.in/index.php?topic=2434.0
-http://www.orkut.com/Main#CommMsgs?tid=5542331918843535207&cmm=1049771&hl=en
-http://www.myvishwa.com/public/PublicBlog/readblog/5161269036080795818
-http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=468

हि माहिती इथून तिथून कॉपी-पेस्ट केलेली असावी. मुळ लेखक वा स्त्रोत कोण ते कळले नाही.

परंतु बांग्लादेशच्या संकेतस्थळावर बरीच माहिती कोणताही बायस न ठेवता दिलेली आहे. विल्यम केरीला त्याच्या सेकंडहँड छपाई यंत्रावर देवनागरी मुद्रणासाठी, कार्ल विल्किन्सनच्या सहाय्याने लाकडी टंकमुद्रा घडवण्याचे काम जी 'पंचानन कर्माकर' नावाची व्यक्ती शिकली होती त्याचे सहाय्य झाले होते. शिवाजी महाराजांनी जानेवारी, १६६४ मध्ये जेंव्हा सुरत लुटली होती तेंव्हा त्यांना इंग्रजांचे छपाई यंत्र त्या लूटीत मिळाले होते. ते कसे हाताळायचे? मुद्रण कसे करायचे? ह्याबाबतची कामगीरी त्यांनी भिमजी पारेख ह्या जातीने कपोल बनिया असलेल्या गुजुभायवर सोपवली होती. हे आत्ता अगदी साधंसोपं वाटणारं तंत्र त्यावेळी त्याला कळलं नव्हतं व त्याने इंग्रजाकडे बरीच मिन्नतवारीकरूनही त्याला इंग्रजांनी मिळू दिलं नव्हतं. मनुची नावाच्या एका इटालीच्या व्यक्तीकडून महाराजांना छपाईतंत्राबाबत माहिती मिळाली होती. महाराजांची इच्छा होती की हिंदुंचे धार्मिक ग्रंथ छपाईतंत्राने छापवावेत. पण.... छपाईतंत्र असो टंकणयंत्र असो कि डाटाएनकोडींग तंत्र असो ते नियतीला गोर्‍या लोकांकडेच ठेवायचे होते.

परंतु माझ्या मनात अजूनही खालील मुद्द्यांबाबत संदेह उरले आहेत त्याचा पाठपुरावा करीत आहे.
छपाईच्या हेतूबाबत - "अत्यंत जुजबी नियम असलेले हे पुस्तक मराठी-भाशक प्रदेशात नेमावयाच्या अधिकार्‍यांनी मराठी समजावे, वाचता यावे, बोलता यावे, या राजकीय हेतूने रचले होते."

केरीने मराठीत 'मराठीचे व्याकरण' छापले असते तर...
'कॅरीचे व्याकरण अत्यंत अपुरे व चुकांनी भरलेले आहे.' असे मत नोंदवून, महंमद इब्राहिम मखबांनी इंग्रजी व्याकरणाचाच आदर्श नजरेसमोर ठेवून 'अ ग्रामर ऑफ महरट्टा लॅंग्वेज' (१८२६) रचले. ही दोनही व्याकरणे इंग्रजीत आहेत.

हि माहिती चूकीची कशी समजायची? हा प्रतिसाद तुमची माफी मागण्याहेतूच आहे, माहिती मागण्याहेतू नाही.

शंकानिरसन...

रावलेजी,
आपले काही संदर्भ अधिक अचूक करतो.
<<विल्यम केरीला त्याच्या सेकंडहँड छपाई यंत्रावर देवनागरी मुद्रणासाठी, कार्ल विल्किन्सनच्या सहाय्याने लाकडी टंकमुद्रा घडवण्याचे काम जी 'पंचानन कर्माकर' नावाची व्यक्ती शिकली होती त्याचे सहाय्य झाले होते. >>

विल्यम कॅरेने कोलकत्यावरुन चार्ल्स विल्किन्सनच्या (कार्ल नव्हे) हाताखाली तयार झालेला कुशल मुद्रिकाकार (पंच मार्कर) पंचानन कर्माकर व त्याचा भाचा व जावई असलेला मनोहर कर्माकर या दोघांनाही श्रीरामपूर येथे आणून त्याच्याकडून मराठी वळणाचे टंक पाडून घेतले.

मराठी व संस्कृत या भाषांचे टंक एकाच म्हणजे देवनागरी लिपीतील आहेत. शिवाजी महाराजांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर पुढचा प्रयत्न नाना फडणिसाने केला. त्याने इंग्रजांचा पुण्यातील वकील चार्ल्स मॅलटच्या मदतीने चित्र-शिल्पशाळा सुरु करुन तेथे तांबटांकरवी गीतेच्या श्लोकाचे तांब्याचे ठसे तयार केले. पुढे नानाला कैद झाली व त्यातच सन १८०० मध्ये त्यांचे निधन झाले. नानांच्या तांबट कलाकारांना मिरजेचे सरदार गोपाळराव पटवर्धन बरोबर घेऊन गेले. या ठशांवरुन लाकडी मुद्रणयंत्र व लाखी शाई वापरुन गीतेच्या २०० प्रती छापण्यात आल्या व त्या विद्वान ब्राह्मण व पाठशाळांना दान करण्यात आल्या. त्याचवेळी तंजावरलाही मुद्रणाचे प्रयोग सुरु होते.

विल्यम कॅरेचे पहिले मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक संपूर्ण मराठीत नसून इंग्रजीत असले व त्याचा हेतू फोर्ट विल्यम कॉलेजमधून तयार केल्या जाणार्‍या इंग्रज अधिकार्‍यांना स्थानिक भाषेशी परिचित करण्याचे असला तरी या पुस्तकात प्रथमच मराठी वळणाचे टंक वापरण्यात आले आणि दैनंदिन व्यवहारात उपयुक्त असे काही मराठी संवादही छापण्यात आले. अशा रीतीने छापील मराठी भाषा प्रथमच अवतीर्ण झाली. म्हणून हा ग्रंथ संमिश्र असला तरी ते मराठीतील पहिले ग्रंथप्रकाशनही ठरले. १८१० मध्ये कॅरेने मराठी भाषेचा शब्दकोश छापला. त्यात मोडी लिपीतील मराठी अक्षरे आहेत.

माहितीत थोडा भेद - थोडी भर

माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार -
1796 साली दुसरा बाजीराव गादीवर बसल्यानंतर फडणीसांना आपले मंत्रीपद सोडावे लागले होते. मुद्रणविद्या शिकलेले कारागिर मिरजेला स्थलांतरीत झाले. तिथं तिथल्या सरदार श्रीमंत गंगाधरराव (गोपाळराव नव्हे) पटवर्धन त्यांचे आश्रयदाते होवून मुद्रणाबाबतचे उरलेले काम पूर्ण करून घेतले. लाकडी छपाईयंत्रावर पूर्ण भगवदगीता छापण्यात आली परंतु त्यांच्या प्रतीवर नाना फडवणीसांचे कोठेही नामोल्लेख केला गेला नाही. त्या गीतेच्या पुस्तकाअखेरील पानावर खालील ओळी होत्या.

मार्कंडेय मुनिक्षेत्रे पटवर्धन संज्ञिक: ॥
निगमागम धर्मज्ञ: श्रीगोविंद तनूद्भव: ॥
विदुषामंतरायासं दिव्यां कृती गंगाधरो मुदा ॥
तज्जन्यं पुस्तकं यत्तत् द्विजेभ्यो दत्तवानसौ ॥
गोपाल कृष्ण चरण प्रसाद ज्ञान लब्धये ॥
॥श्रीरस्तु॥

तसेच ही माहिती देखील मिळाली. -
पंडित वैद्यनाथ हे नागपूरचे मराठी गृहस्थ होते जे कलकत्याला जावून स्थायिक झाले होते. ते 'फोर्ट विल्यियम कॉलेज'मध्ये तेथील इंग्रजी विद्यार्थ्यांना मराठी शिकवित असत. श्रीरामपूर मिशनरीच्या छापखान्यामध्ये पंडित वैद्यनाथांच्या मदतीने मोडी लिपीतील
- मराठीचा शब्दकोश
- सिंहासन बत्तीशी
- लाईफ ऑफ प्रतापादित्य
- राघोजी भोसले यांची वंशावळ
इत्यादी पुस्तके 1814 पर्यंत छापण्यात आलेली होती.

ओळख आवडली.

आम्हास ही गोष्ट कबूल करणे भाग आहे की व्यास, वाल्मिक, गौतम , कालिदास, पाणिनी,यांसारीखे आम्हांमध्ये महान विद्वान होऊन गेले खरे, परंतु ते ज्ञान त्यांजकडेसच राहिले, ते आम्हास उपयोगी पडत नाही.ज्याची विद्या,ज्याचे शौर्य ,ज्याचे सत्कर्म, ज्याचे ऐश्वर्य ,ज्याची शरीरसंपत्ती,ज्याचे सुख, त्यासच भूषण देते. ज्ञान म्हटले म्हणजे ज्याचे त्यालाच.दूर कशास जावे ? बापाचा लौकिक मुलास उपयोगी पडत नाही. मग शेकडो वर्षांमागील आमच्या पूर्वजांचे ज्ञान आम्हास कोठून भूषण दायक होईल ?ही सर्व श्रमेंकरून ज्याची त्याणेच साध्य केली पाहिजेत.,

हम्म! रोचक विचार. पुस्तकाची ओळख आवडली परंतु शीर्षकात म्हटल्याप्रमाणे तत्कालीन मुंबईचे फारसे वर्णन या लेखात वाचण्यास मिळाले नाही. तेही सोबत आले असते तर अधिकच आवडले असते.

मुंबईचा इतिहास

जुन्या मुंबईच्या इतिहासाबाबत कुतूहल असणार्‍या वाचकांसाठी तीन पुस्तके सुचवितो. तिन्ही इंग्रजी भाषेत आहेत आणि archive.org येथे विनामूल्य उपलब्ध. जेम्स डग्लस-लिखित A Book of Bombay, गर्सन दा कुन्हा-लिखित The Origin of Bombay आणि एस.एम.एडवर्ड्स-लिखित Byways of Bombay ही ती तीन पुस्तके. Gazetteers of the Bombay Presidency मालिकेतील मुंबई शहराचे पुस्तकहि वाचनीय आहे आणि तेथेच उपलब्ध आहे.

गर्सन दा कुन्हा, १८४४-१९०० हे व्यवसायाने डॉक्टर होते आणि एशिऍटिक सोसायटीशी त्यांचा संबंध होता. एस.एम एडवर्ड्स, १८७३-१९२७ हे आयसीएस अधिकारी १९१० साली मुंबईचे पोलिस कमिशनर होते.

मुंबईच्या मध्ययुगीन इतिहासासाठी 'महिकावतीची बखर' आणि तिला विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचावी.

< दुखाची बाब म्हणजे हे पुस्तक १८६३ नंतर प्रथमच प्रसिद्ध झाले आहे. या मधल्या काळात कोणाही मराठी माणसाला या पुस्तकाचे पुनः प्रकाशन करावेसे वाटले नाही.> मूळ लेखातील हे विधान बरोबर वाटत नाही. माझ्या समजुतीप्रमाणे ह.अ.भावे ह्यांच्या वरदा प्रकाशनाने हे पुस्तक छापलेले होते.

आभार!

तीनही पुस्तके चाळली. खजिनाच आहे!
आभार!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

वरदा प्रकाशन

खरे आहे. ह.अ.भाव्यांनी त्यांच्या वरदा प्रकाशनतर्फे गो.ना.माडगांवकरांचे 'मुंबईचे वर्णन' प्रसिद्ध केले होते. सूचीमध्ये प्रकाशनवर्ष दिलेले नाही, पण किंमत ३०० रुपये सांगितली आहे. नंतरच्या काळात मुंबईचे वर्णन करणारी अनेक पुस्तके बाजारात आली होती. त्यांतली उल्लेखनीय म्हणजे. मुंबई नगरी, लेखक न.र.फाटक - मार्च १९८१(मुंबई महापालिका शताब्दी वर्ष), मौज प्रकाशन-पृष्ठसंख्या २४७, किंमत २०रुपये.), माझी मुंबई, लेखक वा.वा.गोखले (राजहंस प्रकाशन, ११सप्टेंबर(गणेश चतुर्थी) - वर्ष दिलेले नाही, पृष्ठे २६९, किंमत १०० रुपये, एक्सप्रेस टॉवरवरून (आप्पा पेंडसे).

मुंबईच्या इतिहासावरचे अत्यंत वाचनीय उत्कृष्ट इंग्रजी पुस्तक म्हणजे ..History of Bombay (1661-1708), लेखक : एम.डी. डेव्हिड. मुंबई विद्यापीठ प्रकाशन -१९७३; पृष्ठे ४८८, किंमत ८ डॉलर्स.---वाचक्नवी

आभारी

श्री. पवार आणि श्री. कोल्हटकर ह्यांचा आभारी आहे. मुंबईचा इतिहास चित्रातून उलगडणारे एक जुने कॉफी टेबल बुक माझ्याकडे होते. अजूनही असेल. ते शोधायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर