हे फक्त आपल्या देशातच घडू शकते!

देऊळ या आजकाल गाजत असलेल्या मराठी चित्रपटातील कथेप्रमाणे दैवीशक्तीच्या व्यापारी संस्थापनांचे जाळे देशभर विखुरलेले आहे. ही देवळं, देव्हारे, दर्गा, भक्तीपीठं कशामुळे उदयास आल्या, त्यांची भरभराटी कशी झाली, त्यांचा फायदा कुणाला होतो, काळ्या पैशाप्रमाणे हा 'केसरी' पैसा (saffron money) समांतर अर्थ व्यवस्थेचा भाग आहे का, यात कोण नागविले जातात, कोण कुणाचा शोषण करतो (वा करतच नाही!) किंवा यात फक्त win, win ही स्थिती आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करता येतील व पुढे केव्हातरी यावर संशोधन होऊन वास्तव किती भयाण असू शकेल याची कल्पना देणारे नक्कीच भेटतील. तोपर्यंत अशाच एका बुलेट बाबाची ही कथा आपल्या देशातील भयाण वास्तवाबद्दल आपल्या मेंदूला थोडेसे खाद्य होईल म्हणून हा लेखन प्रपंच!

अंबाला - जोधपूर NH-65 या राष्ट्रीय महामार्गावरील जोधपूरपासून 50 किमी वर पाली या धार्मिक स्थळाच्या वाटेवर असलेल्या चोटिला या खेडेगावापाशी बुलेट बाबाचा हा देव्हारा असून देव्हाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या 10 किमी पर्यंतचा प्रदेश निर्जन आहे. रस्त्याच्या बाजूचा खड्डा बुजवून बुलेट बाबाचा हा देव्हारा उभा केला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे 20 वर्षापूर्वी येथे एक अपघात झाला होता. ओम बन्ना हा श्रीमंत घराण्यातील तरूण 350 सीसी रॉयल एनफील्ड बुलेट या मोटरबाइकवरून रात्रीच्या वेळी गावी येत असताना रस्त्याच्या जवळ असलेल्या झाडाला बाइकची टक्कर होऊन गाडी उलटी पलटी झाली व तो जवळच्या खड्डयात पडून मेला. पोलीस सोपस्कारानंतर या रॉयल एनफील्ड बाइकला पोलीस स्टेशनात उभी केली. परंतु सकाळी तेथे गाडी नव्हती. शोधाशोध केल्यानंतर गाडी अपघात झालेल्या झाडाजवळ सापडली. कुणीतरी चेष्टा केली असेल असे समजून गाडी परत पोलीस स्टेशनला आणून या वेळी सरपळीने बांधून ठेवली. तरीसुद्धा रात्री गाडी गायब झाली व त्याच झाडापाशी सापडली. गाडीच्या चमत्काराची बातमी गावभर पसरली. जमलेल्याना मोटरबाइकमधील दैवीशक्तीचा भास झाला. बुलेटचा 'बुलेटबाबा' झाला. बाइकच्या अंगावर पुष्पवृष्टी करण्यात आली. बघता बघता बुलेट बाबाचे प्राण प्रतिष्ठान झाले.

खड्डा बुजवला. त्यावर ती गाडी ठेवण्यात आली. शेजारी टपरीवजा मंदिर बांधण्यात आले. मंदिरात ओम बन्नाजी व बुलेट बाबांच्या तस्वीरी आल्या. फोटोंना हार, हळद - कुंकू इत्यादीतून यथासांग पूजा सुरु झाली. बुलेट बाबाच्या दंतकथा पसरू लागल्या. ओम बन्ना या गाडीवर बसून रात्रभर चक्कर मारतो व ड्रायव्हरमंडळींचे अपघातापासून रक्षण करतो यावर बहुतेकांचा विश्वास बसू लागला. एकदा एका मोटारसायकलस्वाराच्या गाडीला अपघात झाला व तो खड्ड्यात पडला. त्याचे विव्हळणे ऐकून ओम बन्ना यानी त्याला सुरक्षितपणे खड्ड्याबाहेर काढून जीव वाचविला म्हणे. पौर्णिमा - अमावास्येला रात्री केव्हा तरी गाडी आपोआप स्टार्ट होते व काही वेळाने बंद होते, असे शपथेपूर्वक सांगणारे अनेक जण येथे सापडतील. अशा मिथ्यकथामुळे बुलेटबाबाच्या देव्हाऱ्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे ड्रायव्हर्स काही क्षण थांबून बुलेटबाबाचे दर्शन घेऊ लागले. बाइकला गंध लावणे, फुलं वाहणे, लाल दोरा बांधणे नित्याचे झाले. या बुलेट बाबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाबांच्या दर्शनाला येणारे बहुतेक ड्रायव्हर्स दारूची बाटली (बुलेट बीअर!) घेवून येतात व प्रदक्षिणा घालताना थोडीथोडीशी दारू गाडीच्या चाकावर, गाडीवर ओततात. असे केल्यामुळे अपघात होत नाहीत यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे.

या वाटेवरील प्रवासी - विशेषकरून कार व बाइकचे ड्रायव्हर्स - येथे थांबून बुलेटबाबाची प्रार्थना करूनच पुढे जातात. गेल्या 5-7 वर्षात प्रवाश्याच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे स्थानिकांना उद्योग मिळाला. देव्हाऱ्याची आणि मंदिराची देखरेख पूनम गिरी हा पुजारी करत आहे. सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना होत आहे. भजन - कीर्तन होत आहेत. ओम बन्नाजी व बुलेट बाबांच्या महिमा गाणाऱ्या सीडी व व्हिसीडी हातोहात खपत आहेत. बुलेटबाबाचे चेन, ताईत, गंडे - दोरे, व ओम बन्नाच्या वेगवेगळ्या आकारातील फोटोंचा धंदा मोठ्या प्रमाणात होत आहे. पाच वर्षापूर्वी येऊन येथे दुकान थाटणाऱ्या कैलास राठोडच्या म्हणण्यानुसार धंदा तेजीत चालला आहे. त्याचे दुकान - इतर दुकानाप्रमाणे - 24 तास उघडे असते. "या आपल्या देशात अनेक प्रकारचे बाबा असतील; परंतु आमचा हा बुलेट बाबा एकमेवाद्वितिय असावा! " इती कैलास राठोड.

श्रद्धेचे हे बाजारी स्वरूप आपल्या समाजाला कुठे नेणार आहे, कितपत मानसिक समाधान देणार आहे, कुठल्या अगतिकतेपोटी हा बाजार मांडला जात आहे, या 'दैवी'शक्तीच्या प्रदर्शनाचा अंत कधी होणार आहे (किंवा कधीच होणार नाही) ... अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं या अत्याधुनिक म्हणवून घेणाऱ्या समाजाला शोधावे लागतील. जर या गोष्टी समाजाच्या अज्ञानात भर घालणाऱ्या आहेत व समाजाला अंधार युगात नेत आहेत असे वाटत असल्यास या गोष्टी थांबविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. किंवा कमीत कमी या प्रयत्नात असलेल्यांचे हात बळकट करून आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. फक्त वितंडवाद करत, शब्दांचा कीस काढत 'हे असेच चालायचं' या म्हणण्याला काही अर्थ नाही!

संदर्भ : इंडियन एक्सप्रेस

फोटो सौजन्य

लेखनविषय: दुवे:

Comments

'बुलेट' बाबाची चित्रफीत

हा हा हा !

हसावे की रडावे हे कळत नाही. तूर्त हसून घेतो. :)
एक किस्सा म्हणून कोणी सांगीतले असते तर विश्वास बसला नसता. थोडे गुगलले तर आणखी रंजक माहिती मिळते आहे.
"रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० सीसी" ला गॉड ऑफ इंडिअन बाईक्स असे बाईक कम्युनिटीजमधे संबोधले जाते. ते इतके शब्दशः खरे असेल असे वाटले नव्हते ! अन्य कुठल्या बाईकपेक्षा बुलेटला हा सन्मान मिळाला, याचे त्यातल्या त्यात समाधान वाटते.

बुलेट बाबा की जय हो !!

गंमत

हा हा! एकदा भेट दिलीपाहिजे या देवस्थानाला!
शेवटी निराकार इश्वरा इतकेच त्याचे सगुण साकार रूप कल्पणार्‍या भारतातच दगड, उखळ याप्रमाणे हे रूपही घडू शकेल यात आश्चर्य वाटले नाही गंमत मात्र जरूर वाटली ;)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

कहर

चालकाचा जीव घेणारी, त्यानंतर आपोआप सुरु होऊन अपघाताच्या ठिकाणी पोहोचणारी, पौर्णिमेला स्टार्ट होणारी आणि दारूचा नैवेद्य मागणारी ही "अघोरी" ;-) बाइक श्रद्धेचा विषय आहे हे वाचून करमणूक झाली. माणूस त्याला जे हवे ते त्या नजरेतून पाहतो हेच खरे.

श्रद्धेचे हे बाजारी स्वरूप आपल्या समाजाला कुठे नेणार आहे, कितपत मानसिक समाधान देणार आहे, कुठल्या अगतिकतेपोटी हा बाजार मांडला जात आहे, या 'दैवी'शक्तीच्या प्रदर्शनाचा अंत कधी होणार आहे (किंवा कधीच होणार नाही) ... अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं या अत्याधुनिक म्हणवून घेणाऱ्या समाजाला शोधावे लागतील.

खरे आहे. समुपदेशन, विज्ञान, मानसोपचार यांची गरज समाजाला पटत नाही तोवर श्रद्धेला शरण जाण्यासमोर पर्याय दिसत नाही.

दर्गा आणि केसरी' पैसा

१. लेखातील विचार खरंच चिंतनीय आहेत. लेखाचे शीर्षक वगळता लेखातील मतांशी मी पूर्णतः सहमत आहे.

...ही देवळं, देव्हारे,दर्गा,भक्तीपीठं कशामुळे उदयास आल्या, त्यांची भरभराटी कशी झाली, त्यांचा फायदा कुणाला होतो, काळ्या पैशाप्रमाणे हा 'केसरी' पैसा (saffron money) समांतर अर्थ व्यवस्थेचा भाग आहे का...

२. "दर्गा" आणि "केसरी" पैसा (saffron money) ही तुलना पटत नाही.
३. "भगवा दहशतवाद" (Saffron terrorism) सारखे "केसरी पैसा" (saffron money) चे सामान्यीकरण (generalization) होऊ नये असे वाटते.

वामन देशमुख

या इथे विशाल तरुतळी, सुरई एक सुरेची, खावया भाकरी अन् वही कवितेची!

केसरी पैसा

केसरी (वा भगवा!) पैसा हा शब्द प्रयोग श्रद्धेच्या पोटी अफाट प्रमाणात जमा होत असलेल्या संपत्तीच्या संदर्भात केला आहे. मग हा पैसा पद्मनाभ, सिद्धीविनायक, तुळजाभवानी, शिरडी साईबाबा, दगडू शेठ गणपती, अय्यप्पा इत्यादी हिंदू देवस्थानं वा अजमेरचा दर्गा वा जैन - बौद्ध मंदिर वा चर्च अशापैकी कुठून आला आहे याच्या फार खोलात न शिरता वापरला आहे. या संदर्भात साधना साप्ताहिकातील (24 डिसेंबर 2011) उदय निरगुडकर यांचा लेख (इंग्रजी भाषातर) (http://www.thoughtnaction.co.in/temples-a-gigantic-market/)व DNA तील ही बातमी (http://www.dnaindia.com/mumbai/report_temples-have-become-business-for-s...) लेखातील आशयाला पुष्टी देणाऱ्या आहेत.

पुण्याजवळच्या नारायणपूर येधील बालाजी मंदिर वा तळेगाव जवळील शिरगाव येथील प्रती साईबाबा मंदिर अशा प्रकारच्या बिझिनेस मॉडेलचे य़शस्वी उदाहरण ठरतील.

ज्या प्रकारे व ज्या वेगाने काळ्या पैशाचे केसरी पैशात रूपांतरित होत आहे त्यावरून केसरी पैशाचेही सामान्यीकरण होण्यास विलंब लागणार नाही.

अन्य देश

जगात अनेक देश आहेत. त्यात अप्रगत ही देश आहेत तिथे देखील हे अथवा अशा प्रकारचे घडू शकते. अंधश्रद्धेचा मक्ता फक्त आपणच घेतलेला नाही.
प्रकाश घाटपांडे

अन्य देशातील श्रद्धेचे विचित्र प्रकार

अन्य मागासलेल्या किंवा पुढारलेल्या देशातील श्रद्धेच्या विचित्र प्रकाराबद्दल वाचण्यास नक्कीच आवडेल.

माझ्या मते आपल्याइतकेच किंवा आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात शकुन - अपशकुन याबद्दलच्या भन्नाट कल्पना इतर देशात आहेत. परंतु श्रद्धेचे होत असलेले विकृत स्वरूपातील बाजारीकरण वा बाइक, दारूची बाटली, इत्यादींचे दैवतीकरण कदाचित इतर देशात इतक्या मोठ्या प्रमाणात होत नसावे. हा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे.

येशूमाता मेरी ही साक्षात्कारांकरिता लोकप्रिय

ख्रिस्ती समाज असलेल्या देशांत येशूची माता मेरी ही साक्षात्कारांकरिता लोकप्रिय आहे. (विकिपीडिया दुवा)

उदाहरणार्थ चॉकलेट वितळून पडलेल्या ढिगात मेरीचा साक्षात्कार झालेला आहे (बातमीचा दुवा).

मला नाही वाटत!

शिक्षणाचा गंधही नसलेल्या कुठल्यातरी आफ्रीकन देशात किंवा अगदी \\\'कुराण वाचता येइल इतपतच शिकावं\\\' असं ब्रम्हवाक्य असलेल्या मुस्लीम देशात कुठंतरी याच्याही पेक्षा खुळचट अंधश्रद्धा असतीलही पण अभियांत्रिकी सारखं उच्च शिक्षण घेतलेली लोकं फक्तं भारतातच विसा मंदीरात रांगा लावू शकतात!

बाकी, महत्वाकांक्षा म्हणून माणसानं वरती बघावं पण समाधानासाठी खाली बघावं असं कुठतरी वाचल्याचे स्मरते. :)

अपडेट

हे घ्या. कुणी सोम्या गोम्यानं नव्हे तर इस्रोच्या चेअरमन नं १००वी मोहिम यशस्वी व्हावी म्हणून बालाजीला त्याची प्रतिकृती करून वाहिली!

http://www.deccanherald.com/content/277108/isro-chief-offers-worship-shr...

अशा घटणांमुळे लोकांमधला अंधविश्वास वाढतो.

एक कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून: मोठमोठी तीर्थक्षेत्र आपल्या रिवेन्यु पैकी मार्केटींग/अ‍ॅडवर्टाइसिंग म्हणून मोठ्या लोकांना असलं काहितरी करण्याच्या बदल्यात कमिशन देउन तयारही करत असतील. :)

निषेध

कॉन्स्पिरसी थिअरी आवडली.

खालील पत्त्यांवर मी पुढील ईमेल पाठविली आहे.
chairman@isro.gov.in, scientificsecretary@isro.gov.in, director@vssc.gov.in, vijayanand@isro.gov.in

Sir,

I protest against ISRO Chairman K Radhakrishnan and Directer of Vikram Sarabhai Space Center, S Veeraraghavan for their actions against the constitutional duty of Art 51Ah according to which, every Indian citizen is expected to promote scientific temper.
It is a petty matter when an ailing patient or a failing student prays god. However, it is a grave national disgrace when persons of elite stature such as yours stoop to the level of commoners to pray at Saibaba temple or Lord Venkateswara temple for professional success. I wonder if you spent for the travel and worship expenses from your own pockets. I also wonder if your absence from duty for a purpose that is against your fundamental duty should be considered as 'a break in service' and those leaves of absence should be considered as 'un-paid leaves' and all consequent dues should be recovered from you. It is also disgrace to the global community of engineers and scientists on whose behalf you (S Veeraraghavan) have audaciously claimed that "We scientists and engineers do our best and leave rest to the God".
Scientific temper is a greater, more important and independent skill than tech savviness or science literacy. God has no place in science. It is part of your professional responsibility to guide India out of the superstitions, gullibility and faiths that have riddled our country, especially with greater penetration after 1990.
In these actions, you have caused more damage to India than the monetary benefits from the success of PSLV-C21, by setting a wrong example to follow for people, regarding desired attitude towards faith. I wish that you repent your actions and strive to undo the damage done by you to the public psyche.
By the way, as an aside, have you ever considered blaming your gods (and claiming damage recovery from the temple trust authorities) when some of the earlier Indian rockets failed?

श्रद्धेला पर्याय नाही, हेच खरे!

अशा प्रकारच्या ई - मेलसाठी या लोकांनी कचर्‍याच्या डब्याची व्यवस्था नक्कीच केली असेल. त्यामुळे आपले श्रम व वेळ व्यर्थ गेल्यातच जमा!

अवांतरः
काल वीर राघवन शिरडी साईबाबाच्या दर्शनाला गेले होते, अशी बातमी वाचली.
ड्रीम लायनर विमानाच्या चाकांची हळद - कुंकू -फुलं वाहून सवाष्णांनी यथासांग पूजा केल्याचे फोटोसुद्धा पेपरात झळकले.

श्रद्धेला पर्याय नाही, हेच खरे!

छान!

दखल घेतली जाओ न जावो पण आपणं शक्य त्या मार्गाने निषेध नोंदवला हे उत्तम.

आठवणः सुरवातीला (जेंव्हा खुपशा मोहिमा अयशस्वी व्हायच्या) इस्त्रोच्या कुठल्यातरी प्रकल्पात रॉकेटचं उड्डाण ऐन वेळी पुढं ढकलण्यात आलं. त्याच्या वर एक व्यंगचित्रं आलं होत. त्यात पत्रकार परिषदेत एकानी याचं कारण विचारल्यावर प्रमुख म्हणतो "आम्हाला उड्डाण पुढे ढकलावं लागलं कारण बटण दाबल्यावर रॉकेट उडालच नाही!" :)
(चूभुदेघे)

गमतीदार!

नुकताच मेक्सिको देशातल्या एका अगदी छोट्या खेड्यात कामानिमित्त गेलो होतो. दोन-पाचशे घरांचं गाव असेल्. गावातील् एकमेव देखणी इमारत म्हणजे एक जुनं चर्च. या वर्षीच त्या चर्चला ४०० वर्षं पूर्ण होताहेत. त्या चर्च मध्यला \\\"जीजस\\\" ची कथा आणि बुलेटबाबाची कथा यांमध्ये एक विलक्षण साम्य आहे, ते असं,

सुमारे शे-दिडशे वर्षांपूर्वी या जीजसची मूर्ती शेजारच्या गावातल्या चर्च मध्ये हलवण्याचा निर्णय या गावकर्‍यांनी घेतला. म्हणून मूर्तीला कसल्यातरी रथावर बसवून हे नेऊ लागले तर काही मैल अंतरावर गेल्यावर यांना लक्षात आले मूर्ती गायब झाली आहे. परत येऊन् पाहतात तर मूर्ती पुन्हा चर्चमध्ये. हाच प्रकार पुन्हा मूर्ती घेऊन् गेल्यावर घडला आणि मग मात्र गावकर्‍यांना विश्वास पटला की हा जीजस खरंच दैवी आहे. त्यानंतर आजूबाजूची पाच पन्नास गावं या गावात येऊन त्या ठराविक दिवशी मोठा उत्सव करतात.

तळटीप: दुहेरी अवतरण चिन्ह टाकले असता \\\\ चिन्ह आपोआप् निर्माण होत आहे.

-Nile

उपाय

गमभन मध्ये अडचण असावी, तात्पुरता उपाय म्हणून पुढील एचटीएमएल खुणा वापरता आल्या.
&quot; = "
&#39; = '

हास्यास्पद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
एका फटफटीला बुलेटबाबा मानून तिची पूजा-अर्चा करणे, आरत्या गाणे, दारूचा नैवेद्य देणे हे सगळे आपल्याला हास्यास्पद वाटते.कारण अशी पूजा आपल्याला अपरिचित आहे. पण शनिशिंगणापूरला जाऊन तिथे शनीचे प्रतीक म्हणून उभ्या केलेल्या दगडाला तेल माखून प्रदक्षिणा घालणे,नमस्कार करणे हे तितकेच हास्यास्पद आणि अडाणीपणाचे आहे.ते परिचयाचे झाल्याने तितकेसे हास्यास्पद वाटत नसावे इतकेच.इथून एकशे चाळीस कोटी किलोमिटर अंतरावर असलेल्या शनीग्रहाचा त्या उभ्या दगडाशी दूरान्वयाने तरी संबंध असू शकेल काय? तो दगड म्हणजे शनिशिंगणापुराला जाणार्‍या श्रद्धाळू शनिभक्तांचे प्रतीक आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल!

:)

You know, Scientologists [sound of audience laughing]. And right, you're like, "Oh, yeah, that's some crazy shit. Okay." Jesus with the virgin birth and the dove and the snake who talked in the garden, that's cool. But the Scientologists, they're the crazy ones.

[Santa is] one man flying around the world dropping presents down a chimney; that's ridiculous. But one man hearing everybody murmur to him at the same time, that I get.

- बिल माहर

आपला तो बाब्या

यालाच आपला तो बाब्या म्हणतात ना?

_देवा_ चे उपयोग

केशरी पैशाव्यतिरिक्त असे देव "तयार" करण्यात अनेक फायदे असतात.
१. जिन्याच्या कोपर्‍यात लोक हमखास गुटखे खाऊन थुंकतात. तिथे साईबाबा इ. चे फोटोवाली टाईल लावली तर हे होत नाही.
२. रस्त्यावर अतिक्रमणे करणे. यासाठी एकाद्या झाडावर कुण्या बाबाचा आधी छोटा फोटो, मग मोठा मग तिथे भंडारा असा तो क्रम वाढत असतो. त्याच्या आडोशाने अतिक्रमण सोयीचे होते.
३. वरील प्रमाणे "देऊळ" तयार करण्या आधी, किंवा दरम्यान या ठिकाणच्या कुण्या दुकानदाराला हप्ता बांधून मागितलेला असतो. तो दिला नाही तर व्यवस्थीत रित्या असे देऊळ उत्पन्न करून दुकानात गिर्‍हाईक येणारच नाही अशी व्यवस्था केली जाते.
४. घराच्या जवळपास लोकांनी कचरा फेकून उकिरडा तयार करणे सुरू केले असल्यास वरीलप्रमाणे छोटे देऊळ उत्पन्न करावे. प्रश्न मिटतो.
५. रस्त्यावरचे देव : हे जकात वसूली केल्यासारखे असतात. प्रत्येक घाटात तर हमखास दिसतात. पण मारूती/शनीचा दगड केला, तर भगवे ट्रकवाले, अन् पीर केला तर हिरवे असा बिझिनेस विभागला जातो. मग बुलेटबाबा सारखा "न्यूट्रल" देव केला, तर बिझिनेस जास्त होतो.

यादी बरीच मोठी आहे.
पण, "हे फक्त आपल्याच देशात होते" असे वाटत नाही.

(वरील उपाय क्र. १ व ४ मी स्वत: केलेले आहेत. दवाखान्याच्या आवाराजवळ क्र. ४ केल्याने आजकाल ऑपरेशन सुरू असलेल्या पेशंटचे नातेवाईक "त्या" झाडाखाली हात जोडून बसतात, अन अधून मधून तिथे नारळे फोडणेही सुरू आहे.)

चित्रपट अभिनेत्यांची देवळे

चित्रपट अभिनेत्यांची देवळे हा सुद्धा एक असाच हास्यास्पद आणि बिनडोक प्रकार आहे. भारतात प्रचंड संख्येने असलेल्या एवढ्या सगळ्या बुवा बाबांना भक्तांची कमतरता भासत नाही यात अजिबात नवल नाही.

अजून काही...

ही बातमी आजच पाहीली होती - 'थँक्यू , साईबाबा!' 'इस्रो'च्या यशाबद्दल :

भारतीय अवकाश संशोधन संघटना अर्थात ' इस्रो ' नं नऊ सप्टेंबरला श्रीहरिकोटा इथून ' पीएसएलव्ही - सी२१ ' या प्रक्षेपकाच्या साह्यानं फ्रान्स आणि जपान अशा दोन देशांचे उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते . ' इस्रो ' ची ही शंभरावी मोहीम होती . ती यथासांग पार पडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीहरिकोटा इथल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस . वीरराघवन यांनी साईबाबांच्या शिर्डीतील मंदिराला भेट दिली .

' आम्ही शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर आपलं सर्वस्व पणाला लावून काम करतो आणि उरलेलं सगळं देवाच्या हाती सोपवतो . इस्रोची शंभरावी मोहीम यशस्वी झाल्यावर मला इथं येऊन साईबाबांचे आशीर्वाद घ्यावे , असं वाटलं . खासकरून या विशेष मोहिमेच्या यशानंतर मला त्यांचे आभार मानायची इच्छा झाली !' अशा शब्दांत वीरराघवन यांनी आपलं मनोगत सांगितलं .

तरी या बातमीत काम करून नंतर जम्निनीवर पाय ठेवून रहाण्याच्या उद्देशाने श्रद्धा आहे असे म्हणता येईल.

मात्र कधीकाळी वाचल्याप्रमाणे: महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवार यांचे अधिकृत शासकीय निवासात निधन झाले. त्यानंतर अशी आवई उठली की कन्नमवारंचा आत्मा तिथे भटकात असतो... आणि मग मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान "वर्षा" झाले तर आधीचे (कन्नमवारांच्या वेळेपर्यंतचे) निवासस्थान, "सह्याद्री" हे अतिथी निवासस्थान केले गेले!

शनीवारवाड्यातून अमावास्येस रात्री "काका मला वाचवा" ऐकायला मिळते म्हणून लहानपणी (मोठ्यांकडून) कायम ऐकले होते. :-)

बाकी लेखातील बुलेट पोलीसस्टेशनवरून आपोआप हलण्याच्या चमत्कारावरून बॉस्टन/केंब्रिजच्या एम आय टी मधील विद्यार्थ्यांनी संपुर्ण पोलीस कारच बिल्डींगच्या टपावर ठेवल्याच्या तसेच तत्सम इतर मस्करीची आठवण झाली: (केवळ prank म्हणून खालील गोष्टी घडल्या होत्या)

घातक

वीरराघवन ह्यांची कृती वैज्ञानिक जगतात एक आदर्श म्हणून राबविण्यास घातक आहे ह्याबद्दल सहमत आहे.

 
^ वर