म्यूब्रिजच्या 'चलनचित्रा'चे प्रयोग

काही दिवसापूर्वी, गूगलच्या पानावर क्लिक् केल्यानंतर पळणाऱ्या घोड्याचे ऍनिमेशन फिल्म स्ट्रिप्स पाहिल्याचे आपल्याला कदाचित आठवत असेल. हे स्ट्रिप्स म्यूब्रिजच्या 182व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दाखवल्या जात होत्या. गूगलवरच्या असल्या प्रकारात काय विशेष म्हणून आपण दुर्लक्षही केले असेल. परंतु फोटोग्राफी व चित्रपट व्यवसायाची नांदी ठरलेल्या चलनचित्र तंत्रज्ञानाचा जनक म्हणून ईडीवियर्ड म्यूब्रिज याला आपण विसरू शकत नाही.

ईडीवियर्ड म्यूब्रिजचे खरे नाव एडवर्ड म्युगरिड्ज होते. तो लंडन येथील केन्सिंग्टन येथे 9 एप्रिल 1830 रोजी जन्मला. तरुणपणी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे स्थलांतरित झाल्यानंतर काही गूढ कारणामुळे स्वत:चे मूळ नाव बदलून ईडीवियर्ड म्यूब्रिज असे केले. सुरुवातीला तो पुस्तकं विकण्याचा धंदा करत होता. न्यूयॉर्कपेक्षा सॅनफ्रान्सिस्को या धंद्यासाठी योग्य शहर म्हणून तो सॅनफ्रान्सिस्कोला गेला. तो काळ म्हणजे कॅलिफोर्निया येथील गोल्ड रशचा काळ. काही अघटित न घडल्यास पुस्तकाच्या खरेदी -विक्रीच्या धंद्यातच त्याचे आयुष्य गेले असते. परंतु टेक्सास येथे तो बसलेल्या घोडागाडीला अपघात झाल्यामुळे त्याच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. या अपघाताने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. टेक्सास येथील सुप्रसिद्ध डॉक्टर विलियम गिल (याच डॉक्टरवर एकामागून एक अशाप्रकारे साखळी खून करणारा जॅक दि रिप्पर म्हणून आरोप करण्यात आले होते.) यानी या दुखण्यावर उपाय म्हणून परदेशात हिंडून फिरून येण्याचा सल्ला दिला.

डॉक्टराच्या सल्ल्यानुसार म्युब्रिज अमेरिका, इंग्लंड व युरोपच्या दौऱ्यावर गेला. याच प्रवासाच्या वेळी इंग्लंडमध्ये त्याची आर्थर ब्राउनशी भेट झाली. ही भेटच त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. म्युब्रिज अमेरिकेत असताना फोटोग्राफीची प्रक्रिया हाताळणाऱ्या सिलास सेलेक या डगेरियोटायपिस्टशी मैत्री जमली होती. फोटो काढण्याची ही पद्धत अत्यंत प्राथमिक स्वरूपातली होती. यात प्लेट एक्स्पोज केल्यानंतर प्रत्यक्ष फोटो निघत होते. परंतु निगेटिव्ह नसल्यामुळे फोटोच्या प्रती काढता येत नव्हत्या. आर्थर ब्राउन यानी म्युब्रिजला wet plate collodion चे तंत्र शिकविल्यामुळे फोटोची निगेटिव्ह प्रत काढून नंतर हव्या तेवढ्या प्रती काढणे शक्य होणार होते.

म्युब्रिज 1866 साली अमेरिकेला परतला. सॅनफ्रान्सिस्को येथे सेलेकच्या मदतीने अमेरिकेतील निसर्गस्थळांचे, शहरांचे, नदी - नाल्यांचे, डोंगर - पठारांचे अप्रतिम फोटो काढून त्यांच्या प्रती तयार करून प्रदर्शित करू लागला. जनतेला आपल्या देशाच्या निसर्ग संपत्तीचे हे अभूतपूर्व दर्शन थक्क करणारे होते. काही दिवसातच म्युब्रिजला प्रसिद्धी मिळाली व त्याबरोबर पैसाही. एकदा त्याची भेट कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर, लेलँड स्टॅनफोर्ड याच्याशी झाली. त्याच्याशी गप्पा मारत असताना स्टॅनफोर्ड यानी त्याला अजूनपर्यंत न सुटलेल्या एका कूटप्रश्नाला उत्तर शोधण्याचे आव्हान दिले.

या आव्हानामागे अनेक दंतकथा आहेत. अल्टा कॅलिफोर्निया या वृत्तपत्राचा मालक फ्रेड मॅकुलिश या लेलँड स्टॅनफोर्डच्या मित्राने कोड्याचे उत्तर शोधणाऱ्याला 25000 डॉलर्सचे बक्षीस देणार होता. रेसमध्ये अती वेगाने पळणाऱ्या घोड्याच्या चारी पायाच्या खुरा घोडा पळत असताना कधी तरी हवेत तरंगत असतील का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना हवे होते. बक्षीस मिळो वा न मिळो या प्रश्नाचे उत्तर शोधणे म्युब्रिजला नक्कीच आव्हानात्मक वाटले.

या कूटप्रश्नाचे उत्तर शोधण्य़ासाठी म्युब्रिजला दोन गोष्टी कराव्या लागणार होत्या. पहिल्यात पळण्याच्या पावित्र्यात असलेल्या घोड्याचे एक स्थिर चित्र काढावयाचे होते. यात घोडा पळत असतानाच्या क्षणी फ्रीज झाला आहे असा भास निर्माण करावयाचे होते. दुसऱ्यात कॅमेरा चालू करून घोड्याची प्रत्येक हालचाल टिपावयाचे होते. चालणाऱ्या घोड्याच्या मागे एक पांढरा पडदा ठेऊन कॅमेराने फक्त घोड्याचे तिमिरचित्र (silhouette) काढल्याने अर्धे काम होणार होते. जोराने पळणाऱ्या घोड्याची हालचाल टिपण्यासाठी रेल्वेत वापरात असलेल्या विद्युत चापाचा (electrical trigger)वापर करण्याचे त्यानी ठरविले. 1872 साली रेसमध्ये पळणाऱ्या स्टॅनफोर्डच्या घोड्याचे अशा प्रकारे संपूर्ण चित्रण करून कोड्याचे उत्तर शोधून काढले. त्यानी काढलेल्या छायाचित्रावरून एका विशिष्ट क्षणी घोड्याच्या चारी खुरा हवेत तरंगतात याचा पुरावा सापडला.

खरे पाहता तंत्रज्ञानाच्या दृष्टीने म्यूब्रिजची कथा येथेच संपायला हवी होती. तंत्रज्ञानात भर घालण्यासारखे काही राहिले नव्हते. परंतु त्याच्या आयुष्यातील एका दुर्घटनेमुळे म्युब्रिज पुन्हा एकदा प्रकाशात आला. 1874मध्ये त्याला मुलगा झाला. परंतु या मुलाचा बाप दुसराच कुणी तरी असून त्याच्या बायकोची मेजर लार्किन्सबरोबर प्रेमप्रकरण आहे असा त्याला संशय आला. एके दिवशी मेजर लार्किन्सला अज्ञात ठिकाणी बोलवून त्याच्यावर गोळी झाडून त्यानी खून केला. या खून खटल्यात म्यूब्रिज यानी आपली मानसिक स्थिती बिघडल्यामुळे व ही स्थिती बिघडण्यास टेक्सास येथील अपघात कारणीभूत आहे म्हणून आपली निर्दोष सुटका करावी अशी विनंती कोर्टाला केली. ज्यूरींना त्याचा युक्तीवाद पटला नसला तरी मेजर लार्किन्सच्या भानगडीला म्यूब्रिजने दिलेली शिक्षा योग्य होती व हा खून न्यायकारक (justified homicide) आहे म्हणून म्यूब्रिजची तुरुंगातून सुटका झाली. त्याकाळच्या प्रसिद्धी माध्यमाच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी म्यूब्रिज मध्य अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेला. त्याच्या 7 महिन्याच्या दुर्दैवी मुलाची रवानगी अनाथालयात करण्यात आली.

1876मध्ये कॅलिफोर्नियाला परतल्यानंतर म्यूब्रिज पुन्हा एकदा फोटोग्राफीविषयीच्या प्रयोगात स्वत:ला गुंतवून घेतला. यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी स्टॅनफोर्डने घेतली. एका 15 मीटर लांबीच्या शेडमध्ये त्यानी 12 कॅमेरे, त्याच्या चलनासाठी रेल्वेप्रमाणे रुळाची व्यवस्था, कॅमेराची नेमकी स्थिती कळण्यासाठी रेषा, एक हजारांश सेकंद शटर स्पीडसाठी tripwire पासून तयार केलेले विद्युत चाप इत्यादींचा वापर करत जिवंत प्राण्यांचे चलनवलन कसे होते याचे हजारोंनी फोटो त्यानी काढले. त्यानी काढलेल्या फोटोवरून माणसं जिना चढताना, तरुणी नृत्य करताना, जंगलातील प्राणी शिकार करताना त्यांची नेमकी हालचाल कशी असते हे प्रथमच अभ्यासकांना कळू लागले. त्यानी यानंतर 12 ऐवजी 24 कॅमेरे वापरून चलनचित्रांच्या गुणवत्तेत सुधारणा केली. 1878मध्ये The Horse in Motion या पुस्तकात ही छायाचित्रे प्रसिद्ध झाले. सायंटिफिक अमेरिकन या विज्ञानविषयक मासिकाने या पुस्तकातील चित्राविषयी टिप्पणी करताना लहान मुलांच्या खेळण्यातील झूट्रोपमधून ही चित्रं दाखविल्यास चलनाचा आभास होऊन आणखी मजा येईल असे लिहिले. हाच धागा पकडून म्यूब्रिज यानी झूप्रॅक्सिस्कोप नावाचे यंत्र तयार करून युरोपच्या दौऱ्यात सशुल्क भाषणामधून माहिती देऊ लागला. पॅरिस, लंडन या शहरात त्याच्या भाषणाला भरपूर गर्दी व प्रसिद्धी मिळाली. अनेक संघ-संस्थानी त्याचा सत्कार केला. त्याचे यंत्र म्हणजे वेड लागलेले जादुई चिराग असे वर्णन वृत्तपत्रांनी केले.

याचवेळी म्यूब्रिजचा मित्र, स्टॅनफोर्ड यानी The Horse in Motion हेच नाव देऊन आणखी एक पुस्तक प्रकाशित केले. परंतु पुस्तकाचा लेखक म्हणून डॉ. जे बी स्टिलमन हे नाव होते. त्या पुस्तकात म्यूब्रिजचेच छायाचित्रं वापरल्या होत्या. परंतु पुस्तकात म्यूब्रिजच्या नावाचा साधा उल्लेखही नव्हता. स्टॅनफोर्डने असे का केले हे कळण्याला काही मार्ग नव्हता. परंतु म्यूब्रिजवर वाङ्मयचौर्याचा शिक्का बसला. त्यामुळे युरोपचा दौरा अर्धवट सोडून तो अमेरिकेला परतला.

अमेरिकेत परतल्यानंतर पेनिसिल्वानिया विद्यापीठाच्या आर्थिक सहाय्यातून 11 खंड असलेल्या Photographic Investigation of Consecutive Phases of Animal movement, 1872-1885 या लांबलचक शीर्षक असलेल्या कोषाची निर्मिती त्यानी केली. त्यात 20000 पेक्षा जास्त फोटोग्राफ्स होत्या. जेथे मानवी डोळेसुद्धा चलनाचे विश्लेषण करू शकत नाहीत अशा चलनांचे कॅमेऱ्याच्या सहाय्याने प्राणी,पक्षी, झाडं माणसं इत्यादींच्या चलनवलनाचे विश्लेषण करणारा कोष लिहून त्यानी जगाला आश्चर्यचकित केले. कोषाचा खप जास्त झाला नसला तरी म्यूब्रिजला अमाप प्रसिद्धी मिळाली. 1893 साली झूप्रॅक्सिस्कोपचा वापर करून त्यानी आपल्या फोटोग्राफ्सचे जागोजागी प्रदर्शन भरविले. त्यासाठी चिकॅगो येथे झूप्रॅक्सोग्राफिकल हॉल बांधण्यात आले. कदाचित येथेच प्राथमिक अवस्थेतील चित्रपटाचे पहिल्यांदाच प्रदर्शन करण्यात आले असे म्हणता येईल.

1894 साली म्यूब्रिज इंग्लंडमधील आपल्या जन्मस्थळी परतला. तेथेही तो मिनिएचर फोटोग्राफीचे प्रयोग करू लागला. इंग्लंडमधील मोठमोठी तळं व बागा यांचे चित्रण त्याला करायचे होते. परंतु वयाच्या 74व्या वर्षी हृदयाघाताने त्याचा मृत्यु झाला व त्याचे हे स्वप्न अर्धवट राहिले.

संदर्भ

Comments

स्थिरचित्रांपासून चित्रपट

नवीनच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

त्यावरून आठवले की काही महिन्यांपूर्वी एका पुस्तकाच्या दुकानाच्या हजारो स्थिरचित्रांपासून निर्माण केलेल्या हलत्या विडिओची बातमी दूरदर्शनवर पाहिली होती. आत्तच गूगलच्या साहाय्याने त्याचा शोध घेतला आणि तो यूट्यूबवर
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=SKVcQnyEIT8#! येथे सापडला. अवश्य पहावा.

+१

धन्यवाद!
थोडक्यात परंतु सुंदर चित्रफीत!

माहितीपूर्ण लेख आवडला

माहितीपूर्ण लेख आवडला

माहितीपूर्ण

अत्यंत माहितीपूर्ण लेख.. आवडला

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

उत्तम लेख

उत्तम, वाचनीय लेख खूप आवडला.

 
^ वर