माझ्या संग्रहातील पुस्तके-१५ 'गुलाबी सिर- द् पिंक हेडेड डक'

'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या संतोष शिंत्रेच्या पहिल्या कथासंग्रहाच्या 'ब्लर्ब' मध्ये म्हटलेलं आहे, 'नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा. माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक आयुष्य कधी उजळून, कधी झाकोळून तर कधी भोवंडून, चक्रावून टाकणारी ही वर्षं. माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, मूल्यं, माणुसकी, परस्परसंबंध, शोषण, सामाजिक वास्तव... सगळंच ढवळून काढणारी वर्षं. सोबतीला निसर्गाच्या सतत होणार्‍या र्‍हासाची गिरमिटयुक्त जाणीव. पण कुठेतरी, आशेची एक न संपणारी लकेरही. 'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' मधील कथा म्हणजे 'अपेक्षाभंग' आणि 'भ्रमनिरास' या जुन्या दोस्तांच्या सोबतीनंच पण आशेच्या त्या लकेरीसह त्या सगळ्या जाणिवांना, बदलांना एका ताज्या, लिहित्या मनानं दिलेला सकारात्मक प्रतिसाद.' हा कथासंग्रह वाचताना हे वर्णन किती समर्पक आहे हे जाणवत जाते
संतोषच्या या कथासंग्रहातील नऊ कथांपैकी बर्‍याचशा कथांचा मी पहिला वाचक, उदंड प्रशंसक आणि प्रसंगी कठोर टीकाकार झालेलो आहे. या कथांपैकी काही कथांचा कच्चा खर्डा वाचताना कधी मी त्यातल्या विषयांच्या, मांडणीच्या नाविन्यानं थरारुन गेलेलो आहे. तर कधी त्याच्या कथांमधील काही घटना, काही रचना न पटल्याने मी त्याच्याशी तुटेस्तोवर वादही घातलेला आहे. यातल्या नवापैकी आठ कथा 'साप्ताहिक सकाळ' मध्ये प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांनी कथास्पर्धेमधली बक्षीसं पटकावली आहेत. 'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या 'दीपावली' च्या २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या ताज्या कथेला नुकतंच महाराष्ट्र साहित्य परिषदेचं दि. अ. सोनटक्के पारितोषिक मिळालं आहे. या कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या 'इन्सिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या कथेचं नाट्यरुपांतर अनेक प्रेक्षकांपर्यंत पोचलेलं आहे. या न्यायाने या कथा लोकप्रिय झालेल्या आहेत. पण तरीही संतोषच्या या कथा जनसामान्यांसाठी नाहीत असंच मला वाटत आलेलं आहे. निव्वळ मनोरंजन, चार घटका करमणूक, वामकुक्षीच्या आधी डोळ्यासमोर धरायची चार अक्षरं असं या कथांचं स्वरुप नाही. खरं तर कुठल्याच लिखाणाचं केवळ असं स्वरुप असू नये, पण तो वेगळा मुद्दा झाला.
या कथा म्हणजे आज मध्यमवयाकडे वाटचाल करणार्‍या पिढीला हादरवून टाकणार्‍या विविध गोष्टींची एका संवेदनशील मनात उठलेली वलये आहेत. जुन्याचे आकर्षण सुटत नाही, नव्याचा मोहही टाळता येत नाही अशा चमत्कारिक परिस्थितीत सापडलेली ही पिढी. बर्मन-गुरुदत्त, तलत-मुकेश, कुलकर्णी-माडगूळकर, हृषीदा-गुलजार, होम्स-वुडहाऊस यांमधला जुनाट गोडवा सोडवत नाही आणि संगणक-इंटरनेट-मोबाईल फोन, ट्रॅफिक यांशिवाय जगताही येत नाही अशा परिस्थितीत काहीशी कुतरओढ होत असलेली ही पिढी. समाजाचे वेगाने होणारे बकालीकरण, सपाटीकरण आणि उथळपणाचा समाजाच्या सर्वच थरांनी बाहू पसरुन केलेला स्वीकार यामुळे पुरती भंजाळलेली ही पिढी. एकीकडे विज्ञानाचा जगभर गाजावाजा होत असताना दुसरीकडे समाजात बुवा, दादा, बापू, मां यांचे चे भीती वाटावी असे वाढत चाललेले प्रस्थ, भ्रष्टाचाराचा समाजातल्या सगळ्याच स्तरांनी सहजपणाने केलेला स्वीकार, निसर्ग, पर्यावरण याबाबतची शासनापासून, सामान्यांपर्यंत सगळीकडे दिसणारी उदासीनता आणि यापलीकडे कशाचेच कशाशी 'देणे-घेणे नसलेला' पाट्या टाकून वैध- अवैध मार्गाने पैसे कमावणारा, विकणारा आणि विकत घेणारा, पैठण्या, गजरे, झब्बे, बटर चिकन, टू बीएचके, मल्टीप्लेक्स, आयटेन, गुगल,फेसबुक, सिंगापूर-मलेशिया (आणि अर्थातच अमेरिका!) हा आणि एवढाच विचार करणारा सुस्त मद्दड समाज याने कमालीची अस्वस्थ झालेली ही पिढी. संतोषच्या या कथांमध्ये या पिढीच्या मनातील खळबळच दिसून येते. 'एम्पथी' या कथेतला मार्केटिंगमधल्या माणसाला उपयोगी पडणारा समोरच्या क्लायंटचा मूड ओळखून त्याला किती 'कमीशन' -लाच द्यायची आहे एवढंच कॅलक्युलेट करणारा- एवढीच फंक्शन्स असणारा कॅलक्युलेटर, 'मारिच' कथेतला बापूंच्या आश्रमातील सत्संगात डोळ्यांत पाणी आणून साधना करणारा धूर्त साधक, आपल्याल शैक्षणिक संकुलातलं 'फिलॉसॉफी' चं डिपार्टमेंट बंद करुन त्या इमारतीत 'पावटॉलॉजी' चा कोर्स सुरु करणारे शिक्षणचूडामणी बाळासाहेब कलंत्रे ही या खळबळींचीच प्रतिकं आहेत. आजूबाजूच्या जगात होत असणार्‍या या विसंगत गोष्टी बारीक नजरेनं टिपताना संतोषने भाषेचा (मराठी आणि काही काही वेळा इंग्रजी आणि हिंदीही) एक कुसरीचे -'क्राफ्ट' चे साधन म्हणून सुरेख वापर केला आहे. शासकीय कर्मचार्‍यांची भाषा, शास्त्रज्ञ-अभ्यासकांची भाषा, अध्यात्म-गुरुंची भाषा ( 'हरी की क्रिपा..), इतिहासतज्ञांची भाषा ('आमचे अगत्य असो द्यावे...') आणि अर्थातच समाजात सगळीकडे झुरळांसारखे पसरलेल्या 'पंक्स' - पावट्यांची भाषा ( 'कम्प्लेट गावात आपला टेरर है बंधो!') या सगळ्या भाषांचे नमुने बघताना लेखकाचे डोळस निरीक्षण तर दिसतेच, पण मुळात त्याचे भाषेवरचे प्रेमही दिसते. 'आख्खे कंट्री की भाषा की तो वाट लगेली है' म्हणणारा 'मुन्नाभाई' आणि हा विनोद म्हणून घेणारे त्याचे प्रेक्षक आठवतात आणि मग भाषाशुचिता हे एक मूल्य मानणार्‍या पिढीचे आणखी एक शल्य ध्यानात येते.
संतोषच्या या कथांपैकी काही कथांना विज्ञानाची, काही ठिकाणी रहस्याचीही जोड आहे. पण तरीही रुढ अर्थाने या कथा रहस्यकथा किंवा गूढकथा नाहीत.काही वेळा त्याची कथा फॅन्टसीचा अंगानेही जाते. त्यामुळे या कथांच्या विषयांसारखे या कथांचे 'फॉर्मस्' ही अगदी वेगवेगळे आहेत. हे लेखकाने मुद्दाम जाणीवपूर्वक केलेले आहे असे वाटत नाही. मनात घाटणारी कथा त्या त्या अंगाने फुलू द्यायची आणि मग त्यावर मेहनत घ्यायची ती फक्त तपशीलाच्या स्वरुपात- अशी काहीशी या कथांची निर्मितीप्रक्रिया दिसते. म्हणून या कथा साच्यांतून काढल्यासारख्या, बेतलेल्या वाटत नाहीत. एक वाचक म्हणून मला संतोषच्या कथांचे हे वैशिष्ट्य वाटते.
लेखन - मग अगदी ते कथालेखन का असेना - संपूर्णपणे काल्पनिक कधीच असत नाही. त्यात समाजातील घटनांबरोबरच लेखकाच्या स्वतःच्या विचारांची-मतांची प्रतिबिंबं उमटत असतातच. कथांमधली पात्रं बोलतात ती वाक्यं, ते विचार कधी कधी - कधी कधी काय, बर्‍याचदा- लेखाकाची स्वतःची वाक्यं, त्याचे स्वतःचे विचार असतात. संतोषच्या कथांमध्येही त्याच्या पात्रांच्या विचारांत त्याच्या स्वतःच्या विचारांचे प्रतिसाद दिसतात. केवळ ज्ञान, निखळ, बावनकशी सोन्यासारखं झळझळीत ज्ञान - या ज्ञानाचा ध्यास घेतलेले काही वेडे लोक आणि त्यांना द्रव्यपूजक समाजाकडून मिळणारी दारुण उपेक्षा, एकूणच संगणक सोडून इतर ज्ञानशाखांबाबत समाजात असलेली कमालीची उदासीनता, दिवसभर आकड्यांवर डोळे लावून डे-ट्रेडिंग, फॉरवर्ड ट्रेडिंगवर पैसा मिळवून माज करणारे पॅरासाईट सटोडिये, पैसा सोडून इतर कोणत्याही गोष्टीबाबत संवेदनशील नसणारे अमेरिकन प्रोफेशनॅलिझम असणारे व्यापारी, कोणत्याही प्रकारची शरम न बाळगता एक शर्ट काढावा आणि दुसरा घालावा इतक्या सहजतेनं आपल्या भूमिका बदलणारे भ्रष्ट शासकीय अधिकारी... आणि अगदी अपवाद म्हणून का असेना, या सगळ्या किडक्या यंत्रणेविरुद्ध एकटे उभे राहाणारे काही ताठ कण्याचे, तेजस्वी डोळ्यांचे बाणेदार लोक. लोभाला लाथाडून श्रेयस आणि प्रेयस, यिन आणि यँग, सत्प्रवृत्ती आणि दुष्टप्रवृत्ती यातली आपल्या विवेकाला पटेल तीच निवड करणारे लोक... संतोषच्या कथांमधले हे सगळे 'बाहेरचे' -काल्पनिक असे वाटत नाही.
संतोषच्या या कथांच्या विषयवैविध्यांबरोबरच त्याने त्या त्या विषयांचा खोलवर जाऊन केलेला अभ्यास हे मला या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य वाटते. 'गुलाबी सिर' आणि 'उद्यापासून सुरवात' या कथांसाठी साठी पक्षी, प्राणी, पर्यावरण हे (लेखकाच्या आवडीचे)विषय, 'एम्पथी ' साठी मार्केटिंग आणि त्यातल्या खाचाखोचा हा विषय, 'यिन, यँग आणि साताळकर' साठी ऐतिहासिक कागदपत्रे, त्यांचा खराखोटेपणा आणि त्यांची किंमत आणि माणसाच्या मनात मोह आणि विवेक यांची चालणारी आंदोलने हे विषय, 'हस्तरेखांच्या ललाटरेषा' साठी हाताच्या बोटांचे ठसे हा अगदी वेगळाच विषय... संतोषच्या कथा वाचताना त्याने त्या त्या विषयावर घेतलेली मेहनत जाणवते. अस्सल लिखाणात अशी 'मेहनत' जाणवू नये असे म्हणतात. म्हणून हा त्या कथांचा गुण म्हणायचा की कथालेखनाची मर्यादा हे ज्याने त्याने ठरवावे.
अर्थात हा कथासंग्रह सर्वार्थाने उत्कृष्ट आहे किंवा यातल्या सगळ्याच कथा उत्तम अहेत असे मीही म्हणणार नाही. 'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या कथेचा पहिला मसुदा वाचूनच मी या कथेचा शेवट मला पटत नसल्याचे म्हणालो होतो. माझे आजही मत तेच आहे. तो शेवट मला आजही पटत नाही. 'एम्पथी' या कथेचा पायाच मला इतर कथांच्या तुलनेत थोडा दुबळा वाटतो. 'हस्तरेखांच्या ललाटरेषा' आणि 'डॉट कॉम... डॉट ऑर्ग' या कथा थोड्याशा सोप्या करता आल्या असत्या की काय असे वाटून जाते. वर्णने आणि संभाषणे वास्तववादी करण्यासाठी संतोष आपल्या कथांमध्ये बरेच इंग्रजी शब्द, वाक्ये वापरतो. त्यांचाही कधीकधी अतिरेक होतो, असे मला वाटते.
पण एकंदरीत माझ्या मित्राचा 'मॅजेस्टिक' ने काढलेला हा कथासंग्रह बघून मला फार बरे वाटले. 'There is no greater agony than having an untold story inside you' हा या पुस्तकासाठी वापरलेआ 'मोटो' मला फार समर्पक वाटला आणि 'माझ्या जगण्याची व्याप्ती, उंची आणि खोलीही विस्तारणार्‍या मित्रमैत्रिणींसाठी' या त्याच्या अर्पणपत्रिकेत कुठेतरी माझाही एक लहानसा सहभाग आहे, या जाणिवेने तर फारच बरे वाटले.
गुलाबी सिर- द पिंक हेडेड डक
संतोष शिंत्रे
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
मार्च २०१२, १४२ पाने, किंमत रु.१७०

Comments

धन्यवाद

उत्तम पुस्तक परिचय. यातली 'पावटॉलॉजी' ही कथा वाचल्याचे आठवते.
पुस्तक नक्कीच वाचणार.

खळबळोत्तर

उत्तम परीक्षण. पहिलाच कथासंग्रह असल्याने श्री. संतोष शिंत्रेंच्या या कथासंग्रहात कलेबरोबरच कुसरही जाणवत असावी. पण लेखक जसजसा सरावेल तसतशी ही कसर भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

हे खरे की आम्हीही याच पिढीतले-

...समाजाचे वेगाने होणारे बकालीकरण, सपाटीकरण आणि उथळपणाचा समाजाच्या सर्वच थरांनी बाहू पसरुन केलेला स्वीकार यामुळे पुरती भंजाळलेली ही पिढी. एकीकडे विज्ञानाचा जगभर गाजावाजा होत असताना दुसरीकडे समाजात बुवा, दादा, बापू, मां यांचे चे भीती वाटावी असे वाढत चाललेले प्रस्थ, भ्रष्टाचाराचा समाजातल्या सगळ्याच स्तरांनी सहजपणाने केलेला स्वीकार, निसर्ग, पर्यावरण याबाबतची शासनापासून, सामान्यांपर्यंत सगळीकडे दिसणारी उदासीनता आणि यापलीकडे कशाचेच कशाशी 'देणे-घेणे नसलेला' पाट्या टाकून वैध- अवैध मार्गाने पैसे कमावणारा, विकणारा आणि विकत घेणारा, पैठण्या, गजरे, झब्बे, बटर चिकन, टू बीएचके, मल्टीप्लेक्स, आयटेन, गुगल,फेसबुक, सिंगापूर-मलेशिया (आणि अर्थातच अमेरिका!) हा आणि एवढाच विचार करणारा सुस्त मद्दड समाज याने कमालीची अस्वस्थ झालेली ही पिढी. संतोषच्या या कथांमध्ये या पिढीच्या मनातील खळबळच दिसून येते...

त्यामुळे कथा वाचायलाच हव्यात. पण या सार्‍याला आता आम्ही चांगलेच 'सरावलो' असल्याने या पिढीतून आम्ही निसटून चाललो आहोत. आता या 'खळबळोत्तर' कथा शित्र्यांनी (किंवा कदाचित स्वतः सन्जोप रावांनीच) लिहाव्यात असे वाटते. हे 'सकारात्मक', 'आशेची लकेर' वगैरे अगदीच घिसेपिटे जहाले नाही का? 'अपेक्षाभंग' आणि 'भ्रमनिरास' असे जुने दोस्त आता नव्याने (फेसबुकावर) 'सुवर्णसंधी' आणि ' नव्या वाटा' म्हणून सापडत आहेत. त्यांना आम्हीही नव्याच रंगवलेल्या चेहर्‍याने सामोरे जायला नको का?

वाचायला पाहिजे

ओळखीमुळे या विविध पैलू असलेल्या कथा वाचायची इच्छा होते आहे.

 
^ वर