नायजेरियामधे जावे का?

माझ्या एका सहकारी स्त्री इंजिनिअरला नायजेरियाच्या एका सरकारी कंपनीकडून व्य. नि.च्या माध्यमातून तिथल्या एका मध्यस्थामार्फत नोकरी मिळाली आहे. तिच्या नवर्‍यासाठीही (तो वाणिज्य पदवीधर आहे) तिथल्या सिटीकॉर्पमधे नोकरी मिळते आहे. त्यांचा मुलगा सध्या दहावीच्या परीक्षेला बसला आहे.
पत्रावरून पगार चांगला आहे असं वाटतंय.
१) नायजेरियात राहणं किती सुरक्षित आहे, इ. माहिती कुणाला माहिती असल्यास इथे कृपया द्यावी.
२) नायजेरियात राहणार्‍यांबद्दल काही माहिती / संपर्क क्र. मिळू शकेल का? असल्यास कृपया मला निरोपातून कळवावी.
- कुमार

लेखनविषय: दुवे:

Comments

थोडी माहिती

नायजेरियातील कोणत्या शहरात राहायचे आहे त्यावर अवलंबून आहे, असे माझी तिथे राहून आलेली एक मैत्रिण म्हणाली. एकंदरित तिच्या गोष्टीवरून एकूणच प्रदेश धोकादायक वाटला खरा. पण सद्यपरिस्थिती माहिती नाही. (वीसेक वर्षांपूर्वी) तिचे कुटुंबीय वांशिक हल्ल्यातून बालंबाल वाचले, असे तिने सांगितले.

काही माहिती

माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ नायजेरियात राहतो असे माहित होते. (आता ती मैत्रिण शहरात राहत नसल्याने चटकन अधिक माहिती गोळा करणे शक्य नाही.) नायजेरियात कायदा आणि सुव्यवस्था शून्य आहे. इतर काहीजणांकडून दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घरे फोडल्याची आणि पळवण्याची उदाहरणे ऐकली आहेत. तरी, मैत्रिणीचा भाऊ जेथे राहतो त्या टाऊनशीपला संपूर्ण संरक्षण आहे. कोणत्याही कारणासाठी (मोठे प्रवास इ. सोडून) त्यांना टाऊनशीप बाहेर जावे लागत नाही. बर्‍याच सुविधा घरबसल्या मिळतात म्हणून तो तरी तेथे राहण्यास आनंदी आहे असे कळले होते.

तरी, संपूर्ण चौकशी केल्याशिवाय नायजेरियाला जाऊ नये असे मला वाटते.

माझ्या ओळखीचा

माझ्या ओळखीचा एक मनुष्य ४-५ वर्षापूर्वी नायजेरीयातल्या नोकरीत होता.लूटमारीपासून थोडे संभाळून रहावे लागत होते कारण ते भारतीयांनाही युरो/डॉलरधारींप्रमाणे श्रीमंत समजत असत. आणीबाणी सुरु झाली आणि तो भारतात सुट्टीवर आला होता तो परत गेलाच नाही. कागदोपत्री पूर्ण करायलाही नाही. अर्थात आता परीस्थिती नक्कीच बदलली असणार. तरीही हे मनात ठेवून चालावे की युरोप आणि अमेरीका वास्तव्यासारखा तो प्रकार नसेल.

धन्यवाद!

मृदुला/युयुत्सु/प्रियाली/अनु,

आपल्या उत्तरांबद्दल् धन्यवाद! माझ्या सहकारी मैत्रिणीपर्यंत ही माहिती मी नक्कीच पोचवेन.

युयुत्सु, तुम्ही दिलेला दुवा भयंकर आहे.... (दुसर्‍या एका सहकार्‍याच्या निरोपावरून मला नायजेरिया आणि इतर देशांतल्या गुंडगिरीतल्या फरकाबद्दल पुढील माहिती वाचनात आली...

  • इतर देशांमधे आधी लुटतात आणि तुम्ही प्रतिकार केलात तर इजा करतात.
  • या देशात आधी मारतात आणि मग लुटतात!

... खरं-खोटं माहिती नाही; पण ते माहिती करण्यासाठी जाण्याची इच्छा अजिबात नाही!)

धन्यवाद पुन: एकदा!
- कुमार

हे वाचा

आजच्या सकाळमधील ही बातमी आहे. घाबरविण्याचा हेतू नाही. नायजेरिआमध्ये कोठे नोकरीसाठी जायचे ठरते आहे यावर बरेचसे अवलंबून आहे. आसाममध्ये काही झाले म्हणून मुंबईत उद्योगासाठी कोणी विचार बाजूला ठेवावा असे होत नाही.

नायजेरियातील दोन भारतीयांचे अतिरेक्‍यांकडून अपहरण

वारी (नायजेरिया), ता. १५ - दोन विविध घटनांमध्ये बंदूकधाऱ्यांनी दोन भारतीयांसह पाच परदेशी नागरिकांचे अपहरण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज येथे दिली. ....
देशातील तेलाचा सर्वांत मोठा साठा असलेल्या हिंसाचारग्रस्त पश्‍चिम निगार डेल्टा भागातून अपहरणाची ही घटना घडली. अपहरण झालेल्यांमध्ये दोन चीनी व एका पोलंडच्या नागरिकाचाही समावेश आहे.

याआधी अतिरेक्‍यांनी दोन भारतीय अभियंत्यांचे अपहरण करून, त्यांना २५ दिवसांनी ११ जून रोजी मुक्त केले होते. अतिरेक्‍यांनी "इलेमी पेट्रोलियम कंपनी'चे व्यवस्थापकीय संचालक अरुण तनेजा यांच्यासह दहा भारतीयांचे एक जून रोजी अपहरण केले होते. हे सर्व जण अद्याप ओलिस आहेत.

दरम्यान, देशातील तेलाच्या साठ्यांवर हल्ले केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या मुजाहिद डोकुबो असारी या अतिरेक्‍याला न्यायालयाने कालच मुक्त केले होते. मुक्त झाल्यानंतर त्याने अधिक स्वायत्तता व गरिबी निर्मूलनासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. असारीच्या संघटनेने या भागात सुरू केलेल्या परदेशी तेल साठ्यांवरील हल्ले व नागरिकांच्या अपहरणांमुळे तेलाचे उत्पादन कमी झाले असून, किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष उमारू यारअदुआ यांनी अपहरणाच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून, ही समस्या सोडविण्याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे.

आणि हे ही वाचा...

सकाळमधील बातमी -

सहावीतील चिमुरडा आहे "आयटी प्रोफेशनल'...

मुंबई, ता. १५ - नाव - शंतनू गावडे, राहणार - नायजेरिया, वय - ११ वर्षे, शिक्षण - सध्या सहावीत, व्यवसाय - नायजेरियातील "इंटिग्रल टेक्‍नॉलॉजी'स कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर. ११ वर्षांचा मुलगा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय, खरे वाटत नाही ना? .......
शिकण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयात शंतनू नोकरी करीत आहे आणि तेही एका वेगळ्या, अवघड क्षेत्रात! वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कॉम्प्युटरवर गेम खेळता खेळता कार्ड बनविणे, काही प्रेझेंटेशन तयार करणे अशा गोष्टी तो सहज करू लागला. त्याची कॉम्प्युटरमधील गती एवढी अफाट होती, की त्याने वयाच्या चौथ्याच वर्षी त्याने "एम. एस.ऑफिस' हा कोर्स पूर्ण केला. पुढे त्याने "एनआयआयटी'मध्ये प्रवेश घेत जावा प्रोग्रामिंग, मायक्रोसॉफ्ट एसक्‍यूएल सर्व्हर २०००, एमसीएसई २००३, मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल बेसिक-एनईटी, ओसीए, ओसीपी, एससीजीपी, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ऍप्लिकेशन डेव्हलपर, एमसीपी असे २० कोर्सेस वयाच्या दहाव्या वर्षी पूर्ण केले.

चार वर्षांपूर्वी शंतनू नायजेरियात स्थायिक झाला. सध्या तो सहाव्या इयत्तेत शिकतो आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत तो शाळेत जातो आणि त्यानंतर ३ ते ६ या वेळात एका कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो. आजकालच्या तरुण मंडळींना नोकरी सांभाळून इतर गोष्टी करणे जेथे अवघड असते, तेथे हा चिमुरडा आयटी क्षेत्रात नोकरी करीत शाळा आणि अभ्यासाबरोबरच आपले इतर छंदही जोपासतो. गेली चार वर्षे शंतनू सुट्यांमध्ये दोन महिन्यांकरिता मुंबईत आजी-आजोबांकडे येतो, तसा तो यंदाही आला आहे; पण त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो येथे आल्यानंतरही नोकरी करतो आहे.

लहान वयातच एवढी मोठी झेप घेणाऱ्या शंतनूच्या या कर्तृत्वाबद्दल जेव्हा राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना कळले, तेव्हा त्यांनी नुकतेच त्याला दिल्लीला बोलावून त्याचे कौतुक केले. याविषयी सांगताना शंतनू म्हणतो, ""तुझ्यासारख्या अनेक मुलांची भारताला गरज आहे. २०२० मध्ये महासत्ता म्हणून भारताची ओळख तयार करण्यात तुझ्यासारख्या मुलांचेच योगदान मोठे राहणार आहे, हे राष्ट्रपतींचे उद्‌गार ऐकून मला खूप आनंद झाला. यातूनच ठरविले, की मी लवकरच भारतात परतणार आणि माझ्या बुद्धिमत्तेचा वापर भारतासाठी करणार.''

शंतनूला आता स्वतःची शंतनू इन्फोटेक कंपनी सुरू करायची आहे. त्या दृष्टीनेही सध्या तो प्रयत्नशील आहे.

 
^ वर