व्यास वगैरे

युयुत्सु यांनी सुरू केलेल्या चर्चेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्याला खूपच प्रतिसाद आले आहेत. एवढ्या सर्व प्रतिसादांमध्ये काही मुद्दे हरवून जातात म्हणून हा वेगळा केवळ व्यासांबद्दल मिळालेली माहिती वाचकांपर्यंत पोचवायला हा नवा चर्चा प्रस्ताव लिहीत आहे. येथे व्यासांबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास जरूर लिहावी.

आधीचे प्रश्न याप्रमाणे होते:
महाभारतात उल्लेख असलेले कृष्णद्वैपायन व्यास, (धृतराष्ट्र, पंडु आणि विदुराचे नियोगी पिता) हेच वेद व्यास का ?
गुरुपौर्णिमा ज्या व्यास ऋषींच्या आदराप्रित्यर्थ साजरी केली जाते, ते व्यास कोणते ? की "तेच ते"?

नुकतेच बॉस्टन येथे डॉ. रामचंद्र भट यांना (थोडाच वेळ) भेटण्याचा योग आला. श्री. भट हे कर्नाटकात वेद विज्ञान गुरुकुलम् येथील डीन आहेत. त्यांचे MIT ला योग आणि अध्यात्म (spirituality) वर भाषण झाले.

त्यांच्याशी बोलत असताना हा विषय ताजा असल्याने मी त्यांना व्यासांवरून विचारले. त्यावर ते म्हणाले ते असे की अनेक व्यास होऊन गेले, (प्रियाली यांनी म्हटल्याप्रमाणे) व्यास ही एक पदवी होती. वेदांना ज्यांनी संकलित केले आणि आपले योगदान दिले अश्या पातळीवर पोचलेल्या अधिकारी व्यक्तीला व्यास म्हणत. त्यांच्या मते महाभारतातले कृष्णद्वैपायन व्यास हे शेवटचे व्यास धरले जातात. (कश्यप हे पहिले असे ऐकल्यासारखे वाटते). गुरुपौर्णिमा या सर्व व्यासांच्या गुरु-शिष्य परंपरेचा आदर करण्यासाठी सुरु केली गेली.

श्री. भट यांच्याशी वेळेअभावी जास्त बोलता आले नाही, पण गेली अनेक वर्षे ते बंगलोरमध्ये कार्यरत असल्याचे कळले.

चित्रा

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत!

युयुत्सुंच्या वरिल विचारांशी सहमत आहे.
ही चर्चा समारोपाची आहे आणी चित्राताईंनी योग्य दिशा दिली आहे असे दिसते. त्याच वेळी नवीन येत जाणारी माहिती तितकीच उत्सुकताही वाढवते आहे.

आता नवीन माहिती साठी नवीन चर्चा...

म्हणजेच 'एक फुल, दोन हाप दोन नंबर टेबल वर दे रे'

असं होऊ नये येवढीच सदिच्छा ;)

आपला
(रसाच्या गुर्‍हाळात तोच तोच घुंगरांचा आवाज ऐकत बसलेला)
गुंडोपंत

पण विक्रमादित्य आपला हट्ट सोडत नाही!

"परंतु डॉ. भटांनी हे उत्तर कसे मिळवले, ह्याबद्दल उत्सुकता अद्याप कायम आहेच."

आधीच म्हटल्याप्रमाणे गर्दीमुळे आणि इतर प्रश्नांमुळे मला डॉ. भट यांच्याशी जास्त बोलायला वेळ झाला नाही. त्यामुळे ह्यापेक्षा जास्त माहिती मला मिळवता आली नाही. मिळाल्यास कळवेन. तरीपण पुराणातील ही
माहिती वरील वक्तव्याशी मिळती जुळती आहे.

चित्रा

नाही,

उत्सुकतेवर बंदी अजिबातच नाही हो. उलट या प्रश्नांमुळे बर्‍याच खाचाखोचा कळून येतात.

चित्रा

नमस्कार,

चित्राजी,

इथे 'व्यास' या प्रकाराबद्दल (काही लोक त्या प्रकाराला 'व्यासमुनी' वगैरे म्हणतात, असो!) वेगळा चर्चाविषय लिहिलात याबदल आपले आभार. आपण या चर्चाविषयाला 'व्यास स्पेशल एपिसोड' म्हणुयात! ;)

त्यांचे MIT ला योग आणि अध्यात्म (spirituality) वर भाषण झाले.

वा वा! मस्तच विषय आहे! ;)

आम्हाला त्या भाषणातील काही ठळक मुद्दे कळले तर आम्हालाही त्यावर काही भाष्य करता येईल!

लवकरच आम्ही कृष्णाच्या गीतेतील वक्तव्यांचे सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून काय महत्व आहे, किंवा नाही याबद्दल 'तात्याशिष्टाई' ही चर्चात्मक लेखमाला उपक्रमावर सुरू करणार आहोत!

त्यांच्या मते महाभारतातले कृष्णद्वैपायन व्यास हे शेवटचे व्यास धरले जातात. (कश्यप हे पहिले असे ऐकल्यासारखे वाटते).

I see. कश्यप आणि कृष्णद्वैपायन व्यास, या दोहोंमध्ये आणखी किती व्यास होऊन गेले?

नया दिन नयी रात मध्ये जसे ९ संजीवकुमार होऊन गेले तसे व्यासही ९ होऊन गेले किंवा कसे? ;)

गुरुपौर्णिमा या सर्व व्यासांच्या गुरु-शिष्य परंपरेचा आदर करण्यासाठी सुरु केली गेली.

कुणी सुरू केली? शेवटच्या धरल्या जाणार्‍या खुद्द व्यासांनीच तर नव्हे ना?? ;)

भट साहेबांचं याबद्दल काय म्हणणं आहे हे कळलं तर बरं होईल.

परंतु डॉ. भटांनी हे उत्तर कसे मिळवले, ह्याबद्दल उत्सुकता अद्याप कायम आहेच.

युयुत्सुशी सहमत. भट साहेबांचे उत्तर आम्ही ऑथेंटिक का मानावे हे कळले तर बरे होईल.

आपले,
(उपक्रमावर शेअरबाजारातील माहिती संकलित करून त्यात आपले योगदान देणारे!) तात्याव्यास! ;)

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

लईच की राव प्रश्न!

तात्याबा,
लईच की भारी प्रश्न लिहिले बुवा तुम्ही.
येकदम ऊस जास्त होवून
अचानक मशीन थांबल्यावर होते
तसं झाल्यासारखे वाटले बरं का!

(निवांतपणे रसाचे घोट घेत बसलेला)
गुंडोपंत

तात्या,

आम्हाला त्या भाषणातील काही ठळक मुद्दे कळले तर आम्हालाही त्यावर काही भाष्य करता येईल!

डॉ. भट यांच्या मी ऐकलेल्या बोलण्याचा विषय हा वेद आणि व्यास इत्यादी पेक्षा योग आणि आत्मिक ज्ञान यावर अधिक होता. मी spirituality आधी अध्यात्म हा शब्द वापरला आहे, त्यापेक्षा आत्मिक ज्ञान हा जास्त योग्य वाटला. ज्यांना अधिक योग्य शब्द सुचवता येईल त्यांनी जरूर तो सुचवावा. व्यासांबद्दल प्रश्न मी त्यांना ते नंतर भेटले तेव्हा विचारला (विषय ताजा होता म्हणून). तुम्हाला खरोखरच रस असल्यास :) नवी चर्चा सुरु करावी म्हणते.

नया दिन नयी रात मध्ये जसे ९ संजीवकुमार होऊन गेले तसे व्यासही ९ होऊन गेले किंवा कसे? ;)
याचे उत्तर प्रियाली यांनी दिले आहे.

कुणी सुरू केली? शेवटच्या धरल्या जाणार्‍या खुद्द व्यासांनीच तर नव्हे ना?? ;) भट साहेबांचं याबद्दल काय म्हणणं आहे हे कळलं तर बरं होईल.

डॉ. भट यांच्याशी माझे फार बोलणे होऊ शकले नाही, हे आधीच म्हटले आहे. आता त्यावर मी अजून काय बोलणार? सवाई गंधर्व महोत्सव का सुरु केला गेला? आणि तो कोणी केला? सवाई गंधर्वांनीच का? अर्वाचीन काळावरून तुम्हाला या प्राचीन काळातल्या प्रश्नाची उत्तरे देता येऊ शकतील असे वाटते. शिवाय, तुम्हाला नाही व्यासांच्या नावाने पूजा करायची, तर नका करू. आपल्याकडची गुरु- शिष्य परंपरा ही फार प्राचीन आहे. व्यास/गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या प्रथेला मान्यता दिली जात असेल तर ते चांगलेच आहे.

भट साहेबांचे उत्तर आम्ही ऑथेंटिक का मानावे हे कळले तर बरे होईल.

तुम्ही कोणाचेही म्हणणे खरे खोटे मानावे हा आग्रह मी धरला नाही. श्री. भट हे बोलताना (तरी) अतिशय सरळ व व्यासंगी वाटले. श्री. भट ह्यांची माहिती तुम्हाला गूगलवर मिळेलच. पण ते वेदाचार्य आहेत, ते त्यांच्या विषयातले तज्ञ आहेत. बरेच जण विकीपिडीयाचे संदर्भ देताना दिसतात, परंतु त्यापेक्षा भट यांच्याकडून मिळालेली माहिती नक्कीच मी तरी जास्त ऑथेंटिक मानते. तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा अन्यथा ठेऊ नका. फक्त जेव्हा कोणीही अधिकारी व्यक्ती काही बोलते तेव्हा निदान त्यात काही तथ्य आहे का ते तपासून बघावे म्हणजे झाले. म्हणजे हे असे आहे: आजार झाल्यावर डॉक्टरांकडे गेलो की ते एक निदान करतात, ते पटले तर औषध घ्यावे, निदान न पटल्यास दुसर्‍या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि मगच निष्कर्ष काढावा.

चित्रा

चित्राजी,

मी spirituality आधी अध्यात्म हा शब्द वापरला आहे, त्यापेक्षा आत्मिक ज्ञान हा जास्त योग्य वाटला.

आत्मिक ज्ञान? बरं बरं! ;)

ज्यांना अधिक योग्य शब्द सुचवता येईल त्यांनी जरूर तो सुचवावा. व्यासांबद्दल प्रश्न मी त्यांना ते नंतर भेटले तेव्हा विचारला (विषय ताजा होता म्हणून). तुम्हाला खरोखरच रस असल्यास :) नवी चर्चा सुरु करावी म्हणते.

हो, बिनधास्त करा! 'आत्मिक ज्ञाना'वर जमलं तर आम्हीही आमचं 'आत्मिक ज्ञान' पाजळू! ;)

भाईकाकांच्या बटाटाच्या चाळीतल्या, 'कोण आत्मू ना? तो एक नंबरचा हलकट माणूस आहे' याची या निमित्ताने आठवण झाली! ;))

सवाई गंधर्व महोत्सव का सुरु केला गेला? आणि तो कोणी केला? सवाई गंधर्वांनीच का? अर्वाचीन काळावरून तुम्हाला या प्राचीन काळातल्या प्रश्नाची उत्तरे देता येऊ शकतील असे वाटते.

माफ करा चित्राजी, पण आपला काहीतरी गैरसमज होतो आहे. सवाईगंधर्व महोत्सव हा सवाईगंधर्वांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९५२ साली आमच्या अण्णांनी पुण्यात सुरू केला. तेव्हा एखाद्याच्या स्मृतिप्रित्यर्थ केला गेलेला कार्यक्रम आणि एखाद्याची गुरुपौर्णिमा यात फरक आहे.

संगीतक्षेत्रात गुरुपौर्णिमा दोन प्रकारे केली जाते. १) शिष्यमंडळी स्वतःहून करतात, २) आणि विशारद/अलंकार हे सांगितिक कोर्सेस शिकवणारे काही गुरू (!) आपलीच गुरुपौर्णिमा आपल्या शिष्यांना करायला सांगतात! याला 'क्लासची गुरुपौर्णिमा!' असा घाऊक शब्द वापरला जातो! ;)

संगीतक्षेत्रात आम्ही असे काही महाभाग पाहिले आहेत की जे वरील (२) प्रमाणे स्वतःच्या शिष्यांकडून स्वतःची गुरुपौर्णिमा करून/करवून घेतात. व्यासांना गुरू मानून जी गुरुपौर्णिमा सुरू केली गेली, ती (१) प्रमाणे की (२) प्रमाणे? एवढंच फक्त आम्हाला भटसाहेबांना विचायारचे होते! ;)

आज जो आपण गुरुपौर्णिमा प्रकार नंबर २ पाहतो, तो व्यासांचाच आदर्श की काय अशीही एक कोकणी शंका सध्या आमच्या मनी घर करून आहे. आता भटसाहेब बोस्टनहून इथे भारतात परतले की त्यांना गाठलेच पाहिजेत! ;)

आपल्याकडची गुरु- शिष्य परंपरा ही फार प्राचीन आहे. व्यास/गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या प्रथेला मान्यता दिली जात असेल तर ते चांगलेच आहे

हे मात्र १०० टक्के पटले! शेवटी गुरुपौर्णिमा हा उत्सव महत्वाचा आणि त्याबद्दल आम्ही सगळ्या ९ च्या ९ व्यासमंडळींशी कृतज्ञच राहू! आम्ही आमच्या सांगितिक आयुष्यात काही चांगल्या गुरुपौर्णिमा पाहिल्या आहेत त्याबद्दल यथावकाश इथे लिहूच.

श्री. भट हे बोलताना (तरी) अतिशय सरळ व व्यासंगी वाटले.

अहो आत्मिक ज्ञानाचा अनुभव असलेली मंडळी, आणि त्यावर बोलणारी मंडळी (सहसा!) सरळच असतात. आम्ही भटसाहेबांच्या सरळतेविषयी व व्यासंगाविषयी कुठलिही भयंकर शंका घेतलेली नाही. फक्त 'आम्ही त्यांचे म्हणणे ऑथेंटिक का मानावे?' हे विचारण्यामागे त्यांनी ही विद्या कुठून संपादन केली, हेच आमचे गुरुबंधू श्री युयुत्सू यांच्याप्रमाणे आम्हालाही विचारावेसे वाटले इतकेच! ;)

कृपया राग नसावा!

श्री. भट ह्यांची माहिती तुम्हाला गूगलवर मिळेलच. पण ते वेदाचार्य आहेत, ते त्यांच्या विषयातले तज्ञ आहेत.

कबूऽऽऽल! एकदम कबूल!

बरेच जण विकीपिडीयाचे संदर्भ देताना दिसतात, परंतु त्यापेक्षा भट यांच्याकडून मिळालेली माहिती नक्कीच मी तरी जास्त ऑथेंटिक मानते.

हे मात्र खरं हो! अहो या विकिपिडियावाल्यांनी हैराण करून सोडले आहे! ;)

फक्त जेव्हा कोणीही अधिकारी व्यक्ती काही बोलते तेव्हा निदान त्यात काही तथ्य आहे का ते तपासून बघावे म्हणजे झाले.

अहो तेच तर तपासून बघत होतो.

आजार झाल्यावर डॉक्टरांकडे गेलो की ते एक निदान करतात, ते पटले तर औषध घ्यावे, निदान न पटल्यास दुसर्‍या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि मगच निष्कर्ष काढावा.

चला, म्हणजे भटसाहेबांनंतर पुन्हा दुसरे डॉक्टर शोधणं आलं! ;)

असो, विस्तृत उत्तराकरता धन्यवाद चित्राजी,

आपला,
तात्याद्वैपायन व्यास.

व्यास, गुरूपौर्णिमा वगैरे

आपल्याकडे गुरूपौर्णीमा साजरी करतात ती - व्यासांना आठवायला म्हणून नाही तर गुरूशिष्य परंपरेचा आदर राखायला आणि आठवण ठेवायला म्हणून. व्यास या व्यक्तीने आणि परंपरेने जेव्हढे साहीत्य लिहीले आणि वेद संकलीत केले त्या आदरामुळे त्याला व्यास पौर्णिमा असे म्हणतात.

आपल्या लिखाणातून आपण व्यासांचा जो सतत अनादर करत आहात तो शिष्ठाचाराला धरून नाही कारण तो का विरोध आहे ते सांगत नाही पण उगाच थट्टा करता. त्याने व्यासांचे काय किंवा त्यांच्या वाड्मयाची आवड असनार्‍यांचे काय काही बिघडत नाही .

विचार करा (मला दोघांबद्दल आदर आहे आणि आवडतात पण्..) उद्या पु.लं ना कोणी नावे ठवली - उ.दा. "हे काय लिखाण झाले, ज्यात सामान्य वागणूकीचे उदात्तीकरण आहे?" असे कोणी म्हणले किंवा "भिमसेन काय मधेच कुठे न सांगता पळून काय जातात आणि गंगूबाईंकडे काय मिळतात" वगैरे म्हणले तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा. वादासाठी वाद घालत "मला काही फरक पडत नाही" असे म्हणू नका..

आपल्याला मुद्दा कळेल अशी आशा करतो.

विकास
स्वतःशी चिमुटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला
आपुल्यावरून दुसर्‍यासी वोळखावे
- इति समर्थ रामदास

विकासराव,

आपल्या लिखाणातून आपण व्यासांचा जो सतत अनादर करत आहात तो शिष्ठाचाराला धरून नाही कारण तो का विरोध आहे ते सांगत नाही पण उगाच थट्टा करता.

छे हो विकासराव! आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे. मी पामर उगीच कशाला थट्टा करेन व्यास महाराजांची? अहो थट्टा करायला व्यास मंडळी नक्की किती आहेत हेदेखील मला माहेत नाही.

त्याने व्यासांचे काय किंवा त्यांच्या वाड्मयाची आवड असनार्‍यांचे काय काही बिघडत नाही .

मग झालं तर!

विचार करा (मला दोघांबद्दल आदर आहे आणि आवडतात पण्..) उद्या पु.लं ना कोणी नावे ठवली - उ.दा. "हे काय लिखाण झाले, ज्यात सामान्य वागणूकीचे उदात्तीकरण आहे?" असे कोणी म्हणले किंवा "भिमसेन काय मधेच कुठे न सांगता पळून काय जातात आणि गंगूबाईंकडे काय मिळतात" वगैरे म्हणले तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा.

क्षणभर वाईट वाटेल. पण पुलंबद्दल किंवा अण्णांबद्दल नव्हे, तर बोलणार्‍याबद्दल! ;)

आपल्याला मुद्दा कळेल अशी आशा करतो.

आपला मुद्दा कळला आहे. यापुढे 'व्यास' हा विषय माझ्याकडून संपला!

प्रॉ मि स..

अहो शेवटी सगळेच (!) व्यास आपलेच आहेत! ;)

आपला,
(चिमट्याने कासावीस झालेला!) तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

मणभर वाईट

क्षणभर वाईट वाटेल. पण पुलंबद्दल किंवा अण्णांबद्दल नव्हे, तर बोलणार्‍याबद्दल! ;)

--------- तुम्हाला त्या बोलणार्‍यासारखे वाटेल असेच वाईट आम्हाला तुमच्याबद्दल वाटले. क्षणभरच नाही तर मणभर वाईट वाटले.

थँकस्..

तुम्हाला त्या बोलणार्‍यासारखे वाटेल असेच वाईट आम्हाला तुमच्याबद्दल वाटले. क्षणभरच नाही तर मणभर वाईट वाटले.

थँकस् फॉर द सिंपथी! ;)

तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

अरे वा

आपल्याला अशा व्यक्तीशी भेटण्याचा बोलण्याचा योग आला! व्यासांबद्दलच्या या माहितीसाठी धन्यवाद.

राधिका

आभार

राधिका,

तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार.

चित्रा

कृष्णद्वैपायन व्यास

मराठी विकिवर मी एका विश्वासार्ह मानले जाणार्‍या विद्वानांना* हाच प्रश्न विचारला. त्यांचे उत्तर अशाप्रकारे -

विष्णुपुराणात(३.३.११-२०) अठ्ठावीस व्यासांची नावे दिली आहेत, त्यात कश्यप हे नाव नाही. व्यासांची नावे लिंगपुराण, स्कंदपुराण, देवी भागवत, शिवशतरुद्रसंहिता इत्यादी बर्‍याच ग्रंथात दिली आहे.

व्यास ही पदवी होती अशी थिअरी आहे. शक्य आहे, पण तसा निश्चित पुरावा नाही. व्यास हे अतिशय दीर्घायुषी होते त्यामुळे वेद व्यास आणि कृष्णद्वैपायन व्यास एकच समजले जातात. ते वेगळे असल्याचे अजून सिद्ध करता आलेले नाही अशी माझी माहिती आहे. अठ्ठावीस व्यासांच्या नावात शेवटचे नाव कृष्णद्वैपायन आहे. त्यांनी वेदविभाजन, पौराणिक साहित्य तसेच महाभारताच्या निर्मितीखेरीज व्यासस्मृती, गद्यव्यास, वृद्धव्यास, बृहद्‌व्यास, लघुव्यास, महाव्यास, दानव्यास इत्यादी स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. भविष्य पुराणाच्या पहिल्या(ब्राह्मपर्व) पर्वात पराशरपुत्र कृष्णद्वैपायन हे एकमेव व्यास असल्याचे सांगितले आहे.---

* हे कोणत्याही उपहासाने किंवा उपरोधाने लिहिलेले नाही तर आदराने लिहिले आहे. त्यांची या विषयातील जाण अप्रतिम आहे आणि ते सहसा संदर्भाच्या आधारेच बोलतात असा अनुभव आहे.

आभार

प्रियाली,

ही खूपच चांगली माहिती आहे. कश्यप हे व्यास होते किंवा नाही याविषयी मलाही खात्री नाही.

एकंदरीत व्यासांबद्दलची माहिती अनेक ठिकाणी विखुरलेली आहे. आणि त्यात काळानुरुप बदल घडले असण्याची आणि घडवले गेले असल्याची शक्यता देखील जास्त वाटते.

चित्रा

कर्ण???

उपरोक्त प्रतिसादातील माहिती/शंका लक्षात घेता आयत अगर चौरसाला दोन एकरूप भागांमध्ये विभागणार्‍या रेषाखंडास व्यास न म्हणता कर्ण का म्हणतात, असा प्रश्न मला पडला आहे.

कर्ण

आयत वा चौरसाच एकरूप भाग करणार्‍या सर्व रेषांना कर्ण म्हणत नाहीत. समोरासमोरील कोपरे जोडणारी रेषा वा तिरकी रेषा म्हणाजे कर्ण. अर्थात आयताच्या वा चौरसाच्या समोरासमोरील बाजूचे मध्यबिंदू जोडणारी रेषाही त्यांचे एकरूप भाग करते, पण तिला कर्णही म्हणत नाहीत वा व्यासही म्हणत नाहीत. कोन असणार्‍या बहुमिती रचनांसाठी व्यास हा शब्द प्रचलित नसावा एवढेच काय ते स्पष्टीकरण देता येऊ शकते असे वाटते.

(अवांतर - एखाद्याला त्रास द्यायचा असेल तर काय कराल? त्याला एखाद्या वर्तुळाकार भिंती असलेल्या खोलीमध्ये सोडा आणि सांगा की कोपर्‍यात जाऊन बस. हा शाळेत असताना आमच्यामधला लोकप्रिय पीजे होता, त्याची आठवण झाली.)

------------------------------------------
हे सहीच आहे, नाही? :)
------------------------------------------

शब्दार्थ

शब्दकोशाच्या दुव्याबद्दल आभारी आहे. व्यासांनी वेदाचे संकलन केले तेव्हा त्यांचे विभाजन देखील त्यांनीच केले असा एक संदर्भ वाचनात आला.

येथे पहा

म्हणून हे नाव पडले की काय?

 
^ वर