मत कधीच वाया जात नाही

सध्या निवडणूकीचे दिवस आहेत. मतदार आपल्या पसंतीचे उमेदवार निवडण्याचा विचार करत आहेत. यासंदर्भात आपण ज्या उमेदवाराला मत देतो तो उमेदवार निवडून यावा असे मतदारांना वाटणे सहाजिकच आहे, परंतु जर आपण मत दिलेला उमेदवार निवडून आला नाही, तर आपले मत 'वाया' गेले असा एक सार्वत्रिक समज आढळुन येतो. हे योग्य नाही असे मला वाटते. त्याची कारणे अशी:

  1. खरे तर पराभूत उमेदवाराला पडलेली मतेही तितकीच महत्वाची आहेत, कारण त्या उमेदवाराचे काम, चारित्र्य व कार्यक्रम कमी लोकांना का असेना, पण पटलेला आहे हा संदेश सर्वांपर्यंत जातो.
  2. पराभूत उमेदवाराला पडलेल्या मतांमुळे जो उमेदवार निवडून येतो, त्याची मतांची आघाडी कमी होत असल्याने त्याच्यावर काम केलेच पाहिजे असा मतदारांचा वचक राहतो.
  3. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या सर्वच पक्ष 'निवडून येण्याची शक्यता' या निकषाला नको तेवढे महत्व देत आहेत. त्यासाठी गुन्हेगारी पार्ष्वभूमी असलेल्यांनाही तिकिटे देत आहेत. अशा वेळी मतदारांनीही अशा उमेदवारांना केवळ आपले मत वाया जाऊ नये यासाठी मत देणे योग्य होणार नाही.

निवडणूक ही ना घोड्यांची रेस आहे, ना बरोबर अंदाज वर्तवण्याची स्पर्धा! त्यामुळे लोकशाहीच्या मूळ सिध्दांताला अनुसरुन मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारासच मत देणे हे योग्य ठरते, भले तो उमेदवार निवडून येवो अथवा न येवो.
उपक्रमावरील सदस्यांना काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.

-स्वधर्म

लेखनविषय: दुवे:

Comments

आपली कळकळ कळते आहे

या लेखामागील आपली कळकळ कळते आहे. आपली भावना पोचली. मुद्दे पटले.

अल्गोरिदम

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/नगरपालिका/महानगरपालका वगैरेंच्या निवडणूकीत (पक्षाकडे दुर्लक्ष करून) योग्य उमेदवाराला, राज्यस्तारावर स्थानिक पक्षाला आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय पक्षालाच मत द्यायचे असे माझे धोरण आहे. या क्रायटेरीयात न बसणारे ऑप्शन्स असतील तर मी मला योग्य वाटणार्‍या महिला (व महिलाही उभी नसल्यास अल्पसंख्यांक) उमेदवाराला मत देतो

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

समर्पक पण आदर्श स्थितीत

आपले धोरण समर्पक वाटते, पण आदर्श स्थितीत. थोडक्यात उमेदवार जिंकणार आहे की नाही, याला आपण महत्व देत नाही आहात, तर योग्य उमेदवार निवडणे आपण महत्वाचे मानता.
पक्षांच्या बाबतीत आपले म्हणणे, जर पक्षांमध्ये भेद करता येत असेल तरच ठीक वाटते. सध्या सर्व पक्ष तत्वे व कामाच्या बाबतीत सारखेच असल्यासारखी परिस्थिती आहे, तेंव्हा पक्षाकडे पाहून मत देणे कितपत शक्य आहे असे वाटते. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरही योग्य उमेदवार निवडणे आधिक महत्वाचे आहे असे मला वाटते. केवळ राष्ट्रीय पक्ष आहे, पण उमेदवार गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचारी पार्श्वभूमी असलेला असेल तर् मी अपक्षाला मत देणे पसंत करीन.
-स्वधर्म

धोरणे

>>पक्षांच्या बाबतीत आपले म्हणणे, जर पक्षांमध्ये भेद करता येत असेल तरच ठीक वाटते. सध्या सर्व पक्ष तत्वे व कामाच्या बाबतीत सारखेच असल्यासारखी परिस्थिती आहे, तेंव्हा पक्षाकडे पाहून मत देणे कितपत शक्य आहे असे वाटते.

सर्व पक्ष तत्त्वांच्या बाबतीत सारखे आहेत असे वाटत नाही. (कामाच्या बाबतीत सारखे असू शकतील).

शिवसेना व भाजप हे पक्ष हिंदूंच्या हितासाठी + हिंदू रूढींच्या रक्षणासाठी आणि हिंद्वेतर रूढींच्या विनाशासाठीसाठी काम करण्याचे आपले धोरण तत्त्व आहे असे सांगतात. त्या धोरणानुसार काम करीत असल्याचे अनेकदा प्रत्ययास येते. पैकी शिवसेना हा पक्ष पूर्वी केवळ मराठी माणसांच्या हितासाठी काम करतो असे आपले धोरण सांगत असे आणि त्यानुसार कृतीही करत असे. त्या धोरणात बदल झाल्यावर तश्या प्रकारची कृती त्या पक्षाने थांबवल्याचेही दिसते आणि अमराठी लोकांना उत्तेजन देण्याची कृतीही केल्याचे दिसते.

काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष सर्वसमावेशकता हे आपले धोरण असल्याचे सांगतात. त्यानुसार वर लिहिलेल्या कृतींना विरोध करण्याची कृती ते करताना दिसतात.

आणि आर्थिक तत्त्वे सर्वांची एकच असतील (तशी आहेत असे वाटत नाही) तर ही वर लिहिलेली धोरणे महत्त्वाची बनतात.

नितिन थत्ते

धोरणे व कृती

आपण उदाहरणादाखल उल्लेख केलेली त्या त्या पक्षांची धोरणे ही केवळ सांगायची म्हणून आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या धोरणात नक्की काय बरे फरक आहे? तसेच राष्ट्रवादीने मागच्या पुणे महापालिकेत भाजपाबरोबर युती करून काँग्रेसला सत्तेतला वाटा नाकारला होता. राष्ट्रवादीच्या धोरणानुसार भाजपा जातीयवादी व भाजपच्या धोरणानुसार राष्ट्रवादी हा हिंदूहितविरोधी. तरीही त्यांनी युती केली व ज्या मतदारांनी पक्षाच्या धोरणांकडे पाहून मत दिले, त्या मतदारांचा विश्वासघात केला. त्यामुळे सत्ता मिळणे हेच या सर्व पक्षांना महत्वाचे आहे असे वाटते.

-स्वधर्म

+१

हे समुपदेशन आवडले, पण एकूण कोणाला मत द्यावे ह्याबद्दल अनेक मत-प्रवाह अढळतात, काहींच्या मते पक्षाचा नेता खंबीर असल्यास तो नगरसेवकांकडून नगराची सेवा करुन घेउ शकतो, असे असल्यास नवख्या का होइना पण त्या पक्षाच्या उमेदवाराला मत द्यावे असे मत असते, तर पक्षाकडे न पहाता उमेदवाराला मत देण्याचा प्रघातही बरेच ठिकाणी आढळतो.

मत वाया गेले किंवा नाही ह्याचा फारसा विचार न करता मतदान करणे गरजेचे आहे.

निवडणूक आयोगाने मतदानासाठी सरसकट सुट्टी न देता २ तासाची सवलत दिली आहे हे फार उत्तम केले आहे.

 
^ वर