गणतंत्र दिवस आणि आपण

गणतंत्र दिवस आणि आपण

जानेवारी २६ म्हणजे प्रजासत्ताक दिन. गणतंत्र दिवस म्हणताच देशाचा विचार मनात येताच मनात शरीराचा विचार आला. कुठे एक छान वाक्य वाचले ‘स्वातंत्र्य दिन म्हणजे ‘day of the past, of celebrating what we have inherited from our previous generations’. या उलट ‘गणतंत्र दिवस’ ‘is about the present and the future’ — about pledging and working towards making the Indian Republic stronger*.

आपल्या शरीराची सुद्धा एकाद्या राष्ट्रासारखीच व्यवस्था आहे. ‘राज्यकर्ता मेंदू’ व ‘सतत दक्ष राहून अहोरात्र काम करणाऱ्या हृदय आणि श्वसन संस्था’ यांचे कार्य वाखाणण्याजोगे. पण मग आपली पांच ज्ञानेन्द्रीये? त्यांचे कार्य काम कमी मोलाचे आहे? आवाज, वास, दृष्टी, जिव्हा आणि त्वचा यांचे आपले रस ग्रहण करणे आणि रक्षण करण्याचे कार्य फारच मोठे आहे. अंतर्गत अवयवांचे काम तर आपल्याला न समजताच नीटस पणे चालू असते. यांत कुठेही बिघाड झाला कि प्रकृती बिघडलीच.

आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल सुद्धा आपले शरीर चोखंदळ असते. साधे प्रथिनांचेच बघा ना. आपल्या शरीरात प्रत्येक भागात प्रथिने लागतात. आपल्या आहारात प्रथिने असतातच. ती खातो तशीच वापरली तर किती सोप्पे. पण त्यांचे विघटन करून आपल्याला हवी तशीच परत शरीरात बनविली जाणार. त्यासाठी सुमारे २० अमिनो एसिड लागतात. त्यातली जशीच्या तशी वापरते तर काही खाण्यातून आलेल्यांवर प्रक्रिया करून आपणास हवी त्या प्रकारात बदलते (inter conversion). अंतीम उपयोग महत्वाचा.

बाहेरून खाद्यपदार्थांतूनच जी अमिनो एसिड घ्यावी लागतात त्यांना आपण एसेन्शिअल म्हणतो. जी आपण शरीरात बनवू शकतो वा बनवितो त्यांना आपण नॉन-एसेन्शिअल म्हणतो. म्हणजे तीही आपणाला हवीच असतातत्यांना एकमेकात बदलण्याचे तंत्रही आपण आत्मसात केले आहे.त्या सर्वाना एकत्र व विशिष्ट पद्धतीने गुंफण्याचे काम सुद्धा आपलेच.

जी एसेन्शिअल अमिनो एसिड आपण म्हणतो ती शरीरात बनविण्यासाठी प्रयत्न केल्यास ज्यास्त उर्जा व्यय होईल व बाहेरून घेणे सोपे म्हणून बाहेरून घेतली जातात, असे जीव रसायन शास्त्रज्ञ म्हणतात. जी अंतर्गत स्वत: बदलणे/बनवणे स्वस्त व सोपे आहे (नॉन-एसेन्शिअल) ती स्वत: बनविणे हे तत्व पाळले जाते. म्हणजे शरीरास ही सर्वच अमिनो एसिड (एसेन्शिअल व नॉन-एसेन्शिअल) हवी असतात. बाहेरून शक्यतो कच्चा मालच घेणे, सोप्या गोष्टीच्या प्रक्रिया स्वत: करणे / बनविणे हा मूळ मंत्र असतो.

म्हणजे कच्चा माल बाहेरून घ्यायचा, प्रक्रिया स्वत: करावयाची व कठीण असेल, ज्यास्त शक्तीचा व्यय असेल त्याच गोष्टी बाहेरून घ्यायच्या हे सूत्र होते.

सध्या देशात काय चालू आहे ते पाहून मन उद्विग्न होते. विजेचे दिवे, रोषणाईसाठी लागणाऱ्या त्यांच्या माळा, देवांच्या मूर्ती, मोबाईल फोन, संगणक, मुलांसाठीची खेळणी, काय काय चायनीज वस्तू आपण घेत असतो? या वस्तू काय भारतात बनत नाहीत? फरक थोडा ‘किमतीचा’ असेल वा आहे. पण त्यामागची कारणे अनेक आहेत. उद्योगाला चालना देण्यासाठी सूट घेउन परदेशी चलन मिळविणे हा त्यांच्या सरकारचा प्रथम उद्देश होता. यातून परदेशी कंपन्या बाद झाल्यावर त्यांच्या किमती वाढविण्यास ते मोकळे होतात ही फार्मासुटीकल्सनी अनुभवलेली गोष्ट. नंतर ही स्वस्ताई रहात नाही व नंतर कळून उपयोग पण कमी. व्यापारी वस्तू भले आणतील, विकल्या नाही गेल्या तर पुढे वस्तू विक्रीस आणणे आपोआपच कमी होत जाईल. यां गोष्टी आपल्या हातात आहेत. उशीरा जाग येणे घातक ठरेल.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्त परदेशी वस्तूंची होळी करीत त्याचे कारण आपल्या बांधवांचा उपजीविकेचा आधार जाऊ नये हा असे. अर्थकारण होतेच. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे वेळची ‘बोस्टन टी पार्टी’ सर्वांना द्न्यात आहेच. जागतिकीकरणात आता पदार्थांची होळी करणे वर्ज्य असावे. आपणही आपल्या देशात बनवलेले पदार्थ परदेशी विकातोच. परंतू माझ्या रोजच्या वापराच्या वस्तू मी मायदेशीच बनलेल्या वापरीन हे आम्ही का म्हणू नये? शेजारील राष्ट्राशी मैत्रीचेच संबंध असावेत पण सावधपणा मात्र असावाच.

जे आपल्या शरीरास कळते ते न कळण्यास मन एव्हढे का अनभिज्ञ आहे? नक्कीच नाही. पण मन जेव्हा व्यावहारिक फायदा बघते तेव्हा असे घडते. मनाला ताळ्यावर आणण्याचे काम अवघड आहे पण अशक्य मात्र नाही.

माझा एक मित्र ठरवून चीन मध्ये बनलेल्या वस्तू खरेदी करीत नाही. एकट्याने असे करून काय फरक पडणार असे विचारल्यावर तो म्हणाला, माझा निर्णय मी घेतला आहे. अश्या अनेक 'मी' मधूनच देश तयार झाला होता व परतही वैभवास नक्कीच येईल ही माझी खात्री आहे.

• (http://www.knowledgehub.co.in/2011/01/independence-day-and-republic-day....)

लेखनविषय: दुवे:

Comments

देश-हा-शरीरच रूपक

देश-हा-शरीरच हे पारंपरिक रूपक चांगल्या प्रकारे विशद केले आहे.
- - -

(रूपक ताणून : फक्त इसेन्शियल अमिनो ऍसिडेच तोंडावाटे घ्यावी, बाकी सर्व अमिनो ऍसिडे शरिरात निर्माण करावी, अशा प्रकारचा आहार अव्यवहार्य - कदाचित अशक्य - आहे. रोजच्या वरण-भात-पोळी-भाजी-कोशिंबिर-ताकात इसेन्शियल अमिनो ऍसिडांबरोबर मोठ्या प्रमाणात नॉन-इसेन्शियल अमिनो ऍसिडे खाल्ली जातात. प्रमाण पाहिजे तर इसेन्शियलांची टक्केवारी ५०% पेक्षा खूपच कमी असावी. बहुधा <१०%. नॉन-इसेन्शियल अमिनो ऍसिडे वगळून फक्त इसेन्शियल अमिनो ऍसिडांचे जेवण करणे ठरवले, तर रोजचे कुठलेच पदार्थ खाता येणार नाहीत : कारण फक्त इसेन्शियल अमिनो ऍसिडे असलेली धान्ये/दुधे देणार्‍या वनस्पती आणि गुरे सापडत नाहीत. त्याच प्रमाणे देशाला सोयीसाठी पुरेशा प्रमाणात इसेन्शियल आयात करता यावी म्हणून त्याच्यासह मोठ्या प्रमाणात नॉन-इसेन्शियल आयात करावी लागते. कारण फक्त इसेन्शियल तितक्याच वस्तू निर्यात करू इच्छिणारे परदेश जगात सापडणार नाहीत.)

परदेशातून येथे बनणार्या सोप्या गोष्टी आणू नयेत ही कल्पना

@नॉन-इसेन्शियल अमिनो ऍसिडे वगळून फक्त इसेन्शियल अमिनो ऍसिडांचे जेवण करणे ठरवले, तर रोजचे कुठलेच पदार्थ खाता येणार नाहीत :

आपले म्हणणे बरोबरच आहे. येथे मुद्दा वेगळाच आहे. दोन्ही रॉ मटेरीअल आहेत. दोन्ही बाहेरूनच घ्यायला लागणारच. शरीर तेच करते. आपण् खातो ते बरोबरच् आहे. सगळेच जेवण बाहेरचे प्रक्रिया आपल्या. आपण खातो म्हणजे सर्वच कच्चा माल बाहेरून घेतो. Inter-conversion साठी जास्त पायऱ्या म्हणजे उर्जा जास्त व्यस्त होणार, व ते टाळणे म्हणूनच शरीर हा फरक करते. पण अती महत्वाच्या गोष्टी – उदा. एन्झाइम्स स्वत:च बनवते. मधुमेहात इन्शुलिन बाहेरून घ्यावे लागते नाईलाज म्हणून पण तो पर्याय महाग पडतो.

शरीर हुशारच आहे. आपण त्यापासून बोध घ्यावा व राष्ट्र संपन्न करावे, शत्रू राष्ट्रावर साध्या गोष्टींसाठी अवलंबून राहू नये ही कल्पना व इच्छा. परदेशातून येथे बनणार्या सोप्या गोष्टी आणू नयेत ही कल्पना. गणतंत्रदिनी हा भेद देशकारणासाठी महत्वाचा वाटला.

दुरुस्ती...

"गणतंत्र"ला मराठीत "प्रजासत्ताक" म्हणतात म्हणे.
"प्रधानमंत्री ,रक्षामंत्री,श्रेयस तलपडे" ह्यांना जसे अनुक्रमे मरठित "पंतप्रधान,संरक्षणमंत्री व श्रेयस तळपदे" म्हणतात तसेच.
हिंदी शब्दांचा वापर वाढण्याचे कारण म्हणजे बॉलीवूडही असू शकेल.

मराठित "झेंडा" "रोवतात". हिंदीत "झंडा गाडा" जाता है.
"चला झेंडा गाडू या" ह्याचा भलताच अर्थ होतो.

--मनोबा

यूज इट वन्स अँड थ्रो इट अवे

हम्म!

भारतीय मानसिकता ही परदेशी मानसिकतेपेक्षा पूर्वी थोडी वेगळी होती. "साधी राहणी, उच्च विचारसरणी", जे विकत घेतले ते पुरवून पुरवून वापरावे, विकत घेतलेली वस्तू काळजीपूर्वक वापरली तर ती अनेक वर्षे वापरता येते वगैरे. या मानसिकतेतून नवी भारतीय पिढी बाहेर येत आहे. वैविध्य या पिढीला आवडते. (मग तो माल असो किंवा नवनवे गर्ल/बॉयफ्रेंड)

चिनी माल हा तकलादू आणि कामचलाऊ असतो. त्याप्रमाणेच त्याच्या किंमतीही मालाला अनुसरून असतात. त्याप्रकारचा माल भारतात बनू लागला तर मात्र भारतीय मन त्याला कितपत स्वीकारेल माहित नाही. इतरांनी यंव त्यंव केले तर चालेल पण आपल्यांनी तसे करू नये असे म्हणण्याचीही भारतीय मानसिकता आहे.

असो.

अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे वेळची ‘बोस्टन टी पार्टी’ सर्वांना द्न्यात आहेच.

अशी पार्टी आता अमेरिकेत आयोजित केली तर शिल्लक काय राहिल हा मोठा प्रश्न आहे. ;-)

यूज इट वन्स अँड थ्रो इट अवे

@ अशी पार्टी आता अमेरिकेत आयोजित केली तर शिल्लक काय राहिल हा मोठा प्रश्न आहे.

आपण अगदी वर्मावरच बोट ठेवलेत. तशी वेळ आपणावर येऊ शकते व तशी ती येऊ नये असे वाटते म्हणूनच हा प्रश्न उपस्थित करावा असे वाटले.

चुक वा बरोबर असा प्रश्न नसून समाजाचे मत जाणावे व जनमानसाची या विषयावरील मते आजमावी असे वाटले.

'टिश्यु पेपर संस्कृती'

अमेरिकेच्या "यूज इट वन्स अँड थ्रो इट अवे" ला उत्तम नाव आहे 'टिश्यु पेपर संस्कृती' :)

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

 
^ वर