फ्लाइंग डचमॅन

धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग कथेतील गूढ वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो. रानात रस्ता चुकलेला वाटसरू आणि त्याच्या सभोवती त्याला आणि झाडा-झुडपांना वेढून टाकणारे धुकं, त्या धुक्यातून त्याचा होणारा पाठलाग वगैरे वगैरे. भयपटांतून दाखवलेली झपाटलेली हवेली नेहमीच धुक्याने वेढलेली असते. एखादा ड्रॅक्युलापट पाहिला असेल तर रात्रीच्या वेळी वेडीवाकडी वळणे घेत टेकडीच्या दिशेने जाणारी बग्गी आणि त्या टेकडीच्या माथ्यावर धुक्यात लपाछपी खेळणारा ड्रॅक्युलाचा वाडा नक्कीच आठवत असेल.

धुकं, डोंगरावर, जमिनीवर, पाण्यावर कोठेही अचानक जन्म घेतं. इतकंच नाही तर भर समुद्रातही धुकं निर्माण होतं. कल्पना करा की तुम्ही प्रवासाला निघाला आहात, चारीबाजूंना अथांग पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्याव्यतिरिक्त दिसणारं निळं आभाळ. अचानक प्रकाश मंदावतो, नजर अंधुक होते आणि समोर दृष्टी मर्यादित करणारं दाट धुकं निर्माण होतं आणि या धुक्यातून एखादं शेकडो वर्षे जुने भुताळी जहाज तुमच्यासमोर येऊन उभे ठाकतं. या केवळ भयपटातल्या कल्पना नाहीत. समुद्रावर प्रवास करणार्‍या खलाशांना कधीतरी अशी भरकटलेली जहाजे खरंच दृष्टीस पडतात.

स्वत: समुद्र ही काही कमी गूढ नाही. अद्यापही मानवाच्या संपूर्ण ताब्यात न आलेला भाग समुद्र, आजही अज्ञात, रहस्यमय आणि गूढ समजला जाणारा. कधी शांत, कधी खवळलेला, कधी वादळांत सापडलेला तर कधी भयंकर लाटा निर्माण करून बेटंच्या बेटं गिळून टाकणार्‍या समुद्राविषयी, त्यातील अगणित जीव आणि त्यावर स्वार झालेल्या जहाजांविषयी अनेक खऱ्याखोट्या अद्भुत कथा ऐकायला मिळतात. समुद्रावर खलाशांमध्ये अनेक आख्यायिका, अंधश्रद्धा असल्याचे सांगितले जाते.त्यातलीच एक सुप्रसिद्ध आख्यायिका आहे फ्लाइंग डचमॅनची.

फार लहानपणी ही गोष्ट कोणीतरी सांगितल्याचे आठवते. कालांतराने रिचर्ड वायनरच्या पुस्तकावर आधारित बाळ भागवतांचे पुस्तकही वाचले होते परंतु आता ही फ्लाइंग डचमॅनची आख्यायिका आठवण्याचे कारण म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन हा चित्रपट. डेव्ही जोन्स नावाचा कप्तान साक्षात सैतानाशी जुगार खेळतो आणि त्यात हरल्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याचे जहाज खलाशांसह जगाच्या अंतापर्यंत समुद्रात भरकटत राहते. एकाकी समुद्रात अचानक धुक्याच्या पडद्यामागून किंवा उंच उचंबळलेल्या लाटेतून प्रगट होणार्‍या या जहाजाच्या जवळपास जाणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देणे. फ्लाइंग डचमॅनची ही कथा या डिस्नीपटापुरती मर्यादित नाही. ती एक जगप्रसिद्ध आख्यायिका मानली जाते.

फ्लाइंग डचमॅनच्या आख्यायिकांच्या अनेक आवृत्त्या युरोपात प्रसिद्ध आहेत. या जहाजावर अनेक कथा, नाटकेही लिहीली गेली आहेत. त्यापैकी एखाद्या गोष्टीत फ्लाइंग डचमॅन हे जहाजाचे नाव आहे तर दुसर्‍या एखाद्या आख्यायिकेत ते जहाजाच्या कप्तानाचे नाव आहे. काही आख्यायिकांत हे जहाज जगातील सर्व समुद्रात कोठे ना कोठे दिसले असे सांगितले जाते तर बहुतांश आख्यायिका केप ऑफ गुड होपला फ्लाइंग डचमॅनचे प्रमुख स्थान मानतात. या सर्व आख्यायिकांपैकी खालील दोन आख्यायिका सर्वात प्रसिद्ध आहेत.

पहिल्या आख्यायिकेचे मूळ एका डच जहाजाशी संबंधित आहे असे म्हटले जाते. सतराव्या शतकात कॅ. बर्नार्ड फोक्के हा डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर कप्तान होता. त्याचे जहाज जावा ते हॉलंड असा प्रवास करत असे. या प्रवासासाठी इतर जहाजांना ८ महिने लागत परंतु फोक्के हा प्रवास केवळ ३ महिन्यांत आटोपत असे. यावरून लोकांत वावडी पसरली की बर्नार्ड फोक्केने साक्षात सैतानाशी करार केला आहे आणि त्यामुळेच तो हा प्रवास इतक्या जलद करायचा, असे म्हटले जाते. पुढे अर्थातच, फोक्के आपल्या जहाजासह समुद्रात गडप झाला आणि यावरून सैतानाशी केलेल्या मैत्रीचे प्रायश्चित्त म्हणून त्याला मृत्यूनंतरही जहाजासकट समुद्रात भरकटत राहावे लागले असे सांगितले जाते.

दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार या जहाजाचा कप्तान हेंड्रिक वॅन्डरडेकन होता. १६८० च्या सुमारास तो डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजाची ऍमस्टरडॅम ते जावा अशी वाहतूक करत असे. केप ऑफ गुड होप जवळ एकदा त्याच्या जहाजाला प्रचंड वादळाचा तडाखा बसला. यावर संतापून वॅन्डरडेकन जहाजाच्या डेकवर उभा राहिला आणि त्याने निसर्गाला यथेच्छ शिव्या घातल्या आणि इतरांनी दिलेले सल्ले धुडकावून त्या वादळात आपले जहाज घातले. परिणामी जहाज कलंडून सर्वांचा मृत्यू झाला. यामुळेच हे जहाज समुद्रात आजही भरकटत असते.

या दोन्ही आख्यायिकांत फ्लाइंग डचमॅन हे कप्तानाला उद्देशून म्हटले आहे. जहाजाला नाही. अशा अनेक आख्यायिकांचा शेवट मात्र सारखाच आहे की या जहाजाला आणि त्याच्या कर्मचारीवर्गाला अनंतापर्यंत समुद्रात भरकटत राहण्याचा शाप मिळाला आहे.

या जहाजाच्या केवळ दर्शनाने संकटे ओढवतात असे म्हटले जाते. १९व्या आणि विसाव्या शतकात अनेकांनी या जहाजाचे दर्शन झाले असल्याचे म्हटले आहे. यांतील सर्वात प्रमुख किस्सा इंग्लंडचा राजा पाचव्या जॉर्जचा येतो. पहाटे चारच्या सुमारास तांबड्या प्रकाशात न्हाऊन निघालेले हे जहाज त्यांना ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात दिसले असे सांगितले जाते. त्यानंतरही वारंवार अनेक जहाजांनी आणि खलाशांनी हे जहाज आपल्याला दिसल्याचे दावे केले आहेत. शेवटच्या अहवालानुसार १९४२ सालीही या जहाजाने दर्शन दिल्याचे किस्से ऐकवले जातात.*

फ्लाइंग डचमॅन ही आख्यायिका आहे की सत्यकथा कोणास ठाऊक? पायरेट्स ऑफ द कॅरेबियन -२ चित्रपटात डेव्ही जोन्स आणि त्याच्या खलाशांचे मानवी जीवन नाहीसे होऊन समुद्र जीवांचे गुणधर्म त्यांच्यात उतरलेले दाखवले आहेत. हे जहाज पाण्यातून उसळी मारून वर येतानाही दाखवले आहे. खरे खोटे कसेही असो. पायरेट्स ऑफ द कॅरेबियन -३ च्या भागात श्री संभाजी असे चक्क भारतीय सागरी चाच्याचे पात्र आहे. (इंग्रजी विकिपीडियावर तो कान्होजी आंग्र्यांचा वंशज असल्याचे लिहिले होते परंतु ते आता तसे तेथे दिसत नाही. ) पायरेट्सचा तिसरा भाग बघायची उत्सुकता फ्लाइंग डचमॅनमुळे जितकी आहे त्याच्या दसपट जॉनी डेपच्या नितांत सुंदर अभिनयात न्हालेल्या कॅप्टन जॅक स्पॅरोमुळे आहे.

---
* निळा अथांग पसरलेला समुद्र, एकाकीपणा आणि जीवनातील कमतरता तसेच जहाजांचे हेलकावे, वादळे, हवेतील बदल यासर्वांमुळे खलाशांना भास (hallucinations) होतात असे सांगितले जाते, तरी हे प्रसंग प्रत्यक्षात घडले किंवा नाही यावर विश्वास ठेवण्याची जबाबदारी वाचकांची राहिल.

लेखाचे संदर्भ आणि चित्र विकिपीडियावरून घेतले आहेत.

इंग्रजी विकिपीडियावर फ्लाइंग डचमॅन

Comments

छान

लेख आवडला. अजूनही पायरेट्स ऑफ कॅरेबिअन हा चित्रपट निवांतपणे पाहण्याचा योग आला नाही.
--लिखाळ.

पाळामुळांच्या लोणच्याचे चाहते आणि पुराणातल्या वांग्याच्या भाजीचे वाढपी.

खरच छान!

लेख खरच छान आहे. लेखातील चित्राने गुढपणा अजुनच वाढवला! अशा अद्भूत गोष्टींचं आकर्षण कायमच वाटत आलं आहे.
लहानपणी अद्भूत गोष्ट ऐकून अद्भूततेचा आनंद घेता येत असे. आता आम्हाला कोण गोष्टी सांगत नाही. म्हणून अशा चर्चांमधून् असा आनंद अनुभवयाचा.

आतापर्यंत समुद्राच्या गुढते विषयी फक्त बर्म्युडा ट्रँगल माहीत होता आज 'फ्लाइंग डचमॅन' हे काहीतरी नविन माहीती झालं.

(अद्भूत) रम्या

प्रियाली,.. जियो!

लेख मस्तच झाला आहे. वाचायला गंमत वाटली. औरभी जरूर लिखना.

रम्याच्या प्रतिसादाशी सहीसही सहमत! चित्र क्लासच आहे...

आपला,
(चाचा) तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

धन्यवाद

मी आजच हे 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' प्रकरण आहे तरी काय, कुणाला तरी विचारायला हवं, असा विचार करत होते. त्यातच तुमचा हा लेख आला. कल्पना वेगळी आहे. हे चित्रपट पहायला आवडतील. पण तिसरा चित्रपट एकदम पाहिला तर कळेल का, की आधीचे २ आधी पहायलाच हवेत? ते आता कुठे सापडतात का हे शोधावं लागेल, म्हणून विचारलं.
राधिका

छान

असा गूढ विषयाचा लेख आणि प्रियाली ताईची लेखनी, योग छान् जुळला आहे. समुद्रावर असे बेवारस फिरणारे, गूढ वलय असणारे अजून बरीच जहाजे आहेत. थोडे परग्रहीं वर पण लेखन होऊ दे.

छान

छान लेख आहे. चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता आहे, लेख वाचून ती अजून वाढली. चित्र मस्त आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आभार

लेख वाचणार्‍या सर्वांचे आणि प्रतिसाद लिहून लेख आवडला असे कळवणार्‍या सर्वांचे अनेक आभार.

रम्या आणि सुमीत,

भरकटलेली भुताळी जहाजे, प्रचंड आकारांचे भयानक जलचर, परग्रहावरील जीव, येती, सॅसक्वाच, लॉकनेस्ट मॉन्स्टर, एरिया ५१, चेटकिणी, झोंबी, झपाटलेल्या वास्तू अशा अनेक विषयांत आमची मास्टरी आहे. (आणि आमची इतरत्र कोठेही शाखा नाही.. ह. घ्या.)

अशा विषयांवर लिहायला मला आवडते, तुम्हाला वाचायला आवडते हे ऐकून बरे वाटले.

परग्रहावरील जीव, एरिया ५१

परग्रहावरील जीव, एरिया ५१ यवर आवडेल अजून काही...
आपला
गुंडोपंत

मास्टरी

भुताळी.. परग्रहवासी..येती.. झपाटल्या वास्तू.. एरिया ५१.. उडत्या 'त'बकड्या.. वगैरे 'विषयांत' त्याला ही रुची आहे. आपली 'इतरत्र शाखा' नसल्याने शिकवण्या इथेच व लवकरात लवकर सुरू कराव्यात ही विनंती.

(विद्यार्थी) तो

अवांतर - मनोगतावरील हवी आहेत भुते हा लेख आठवला :)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

छान्

'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' ३ रा भाग मी पाहिला तो काणीच बघू नका हि विनंती. मी दोन्ही भाग सिनेमा गृहात बघितले ते आवडले पण तिसरा भाग काहीच कळला नाही.पण तिन्ही भागात जॉनी डेपची भूमिका छान आहे फक्त ती बघण्यासाठी नक्की पाहा.

तिसऱ्या भागात फक्त गोंधळ आहे कोणाला कळल्यास जरुर कळवा. लेख छान आहे तिनंही भाग बघितल्यावर अधिक माहिती मिळाली.

डेव्ही जोन्स्, कॅलिप्सो आणि मावळता सूर्य

हा चित्रपट ज्यांना 'लॉर्ड ऑफ द रिंग' , 'हॅरी पॉटर' असले अदभुत आणि अंधारलेले चित्रपट पहायला आवडतात त्यांच्यासाठी बनवलेला आहे. पाऊस, काळेशार पाणी, हिरवट काळे वातावरण, चित्र-विचित्र चेहरे यांची रेलचेल आहे.
चित्रपट कळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून या चित्रपटाच्या संस्थळाला आणि विकिला भेट देणे अत्यावश्यक आहे. नाहीतर ज्यांना अर्थ लागावा असे वाटते त्यांचे पैसे फुकट जाण्याची शक्यता आहे.

भा. रा. भागवत

यांचे भुताळी जहाज हे पुस्तक वाचले आहे का? "उदे ग अंबे उदे" वगैरे? त्याची आठवण आली हा लेख वाचून. लहानपणी खूपच थरारक वाटले होते.

छान लेख.

चित्रा

भुताळी जहाज

हे वाचल्यासारखे वाटते. लेखकाचे नाव आठवत नाही. यात अशा अनेक भुताळी जहाजांच्या त्यांच्या दृष्य/अदृष्य होण्याच्या, वादळांची पूर्वसूचना देण्याच्या कथा/कहाण्या/किस्से होत्या/होते असे आठवते.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

भुताळी जहाज - लेखकाचे नाव

चित्रा म्हणतात ते पुस्तक भा. रा. भागवत यांचे. परंतु हे एक काल्पनिक पुस्तक होते असे वाटते.

तो म्हणतोय

अशा अनेक भुताळी जहाजांच्या त्यांच्या दृष्य/अदृष्य होण्याच्या, वादळांची पूर्वसूचना देण्याच्या कथा/कहाण्या/किस्से होत्या/होते असे आठवते.

हे वास्तवावर आधारित पुस्तक बाळ भागवतांचे 'ओशन ट्रँगल' तर नाही??? (भन्नाट पुस्तक आहे परंतु सत्यासत्याच्या कसोटीवर लावले तर बरेच निकष खोटे पाडता येतील असे.)

बरोबर

मी म्हणते ते पुस्तक ओशन ट्रँगल नाही. भा.रा. भागवतांच्या पुस्तकात मराठी सरदार जे समुद्रसफरीवर असताना मृत्युमुखी पडतात त्यांच्याबद्दल की कुमार गटातल्या मुलांसाठी गोष्ट होती.

चित्रा

असू शकेल

पण निव्वळ बर्म्यूडाबद्दलचे एक (की हेच?) पुस्तक १० एक वर्षापूर्वी वाचले असल्याने घोळ होत असावा. मुखपृष्ठावर निळसर विमानाचे की कायसे चित्र असावे. (आहाहा काय पण उपयुक्त माहिती, त्यातही असावे!)

हे काल्पनिक पुस्तक मात्र वाचले नाही हे नक्की.


(त्याची स्मरणशक्ती भारा/बाळ याच्या पलिकडची आहे. निव्वळ अद्याक्षरात गफलत नाही, तर काहीच आठवत नाही आहे. आपण बाळ फोंडके म्हटले असते तरी त्याची ना नव्हती :) )

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

बर्म्युडा

बर्म्युडावर एक भाषांतरित पुस्तक वाचले होते, लेखक बहुधा देवधर. आणि त्यावरही निळसर समुद्र आणि विमानाचे चित्र असल्याचे आठवते :)

(माझी स्मरणशक्ती त्याच्या तोडीची आहे असे जाणवले :) )

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बर्म्युडा ट्रँगल - विजय देवधर

बर्म्युडावर एक भाषांतरित पुस्तक वाचले होते, लेखक बहुधा देवधर. आणि त्यावरही निळसर समुद्र आणि विमानाचे चित्र असल्याचे आठवते

हे मात्र बरोबर. ओशन ट्रॅंगलवर समुद्रातील सूर्यास्ताचे काळपट सोनेरी चित्र आहे. (म्हनजे ते आता माझ्या समोर आहे. मेरी सेलेस्टीवर प्रतिसाद लिहिण्यासाठी.)

माझी स्मरणशक्ती त्याच्या तोडीची आहे असे जाणवले

स्मरणशक्तीच्या बाबतीत माझा नंबर याहूनही फार मागे असला तरी सच्चा भक्त बायबलाला कधीच विसरत नाही. ;-)

माया

हेच असावे. (शर्थ झाली!)

यात माया/अटलांटिस संस्कृती, त्यांचे आता पाण्याखाली गेलेले प्रचंड चुंबकीय क्षेत्र असणारे उर्जा केंद्र वगैरे गोष्टी वाचल्याचे आठवते का?
(यातल्या काही किस्से कंटाळवाणे ही वाटले होते. तीच ती २ किंवा ३ किंवा ५ जहाजे, तेच हेलकावे, तेच धुके... इत्यादी.)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

माया/ अटलांटिस

यात माया/अटलांटिस संस्कृती, त्यांचे आता पाण्याखाली गेलेले प्रचंड चुंबकीय क्षेत्र असणारे उर्जा केंद्र वगैरे गोष्टी वाचल्याचे आठवते का?

हो तेच ते पुस्तक. दुर्दैवाने त्याचे मूळ इंग्रजी पुस्तक मला आठवत नाही परंतु त्या पुस्तकाचा परामर्श घेणारा आणि त्यातील मुद्दे खोडून काढणारा एक कार्यक्रम बहुधा डिस्कवरी चॅनेलवर पाहिला होता. अटलांटिसमुळे समुद्रतळाशी गेलेले उर्जास्रोत हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा.

असंच काहीसं एडगर केसीचे म्हणणे होते की काय ते तपासायला हवे.

आठवले!!

एकदाचे आठवले :)
मूळ पुस्तक : द बर्म्युडा ट्राएंगल
लेखक : चार्ल्स बर्लिझ
याचा अनुवाद विजय देवधर यांनी केला होता. यातच माया/अटलांटिस संस्कृती, फिलाडेल्फिया प्रयोग वगैरे गोष्टींचा उल्लेख होता. याच देवधरांनी डॅनिकेनचे पुस्तक देव की परग्रहावरील अंतराळवीर या नावाने अनुवादित केले होते. त्या काळात उडत्या तबकड्या, बर्म्युडा या गोष्टींचे भयाण आकर्षण होते :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

जादू

चार्ल्स बर्लिझचे नाव आठवल्याबद्दल धन्यवाद.

देवधरांबद्दलची माहिती अगदी बरोबर. ते पुढे जॉन किल यांच्या जादू या पुस्तकाचे भाषांतर करणार होते असे वाचले होते. त्यात अरबस्तान आणि भारतातील प्राचीन जादूंचा उहापोह आहे असे वाचनात आले होते. ते पुस्तक प्रकाशित झाले का पाहण्यासाठी कित्येकदा बुक डेपोंच्या चकरा मारल्या होत्या परंतु ते प्रकाशित झाले नाहीच असे वाटते. त्याची इंग्रजी कॉपीही ग्रंथालयात नसल्याने मिळणे दुरापास्त आहे.

पृथ्वीवर माणूस उपराच

डॅनिकन यांचे भाषांतरीत 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे पुस्तक वाचल्याचे स्मरते. याच डॅनिकन वरचा एक कार्यक्रम डिस्कव्हरीवरही पाहण्यात आला. या कार्यक्रमात इजिप्शियन व मेक्सिकन पिरॅमिडस्, इस्टर बेटे, अन्ग्कोर वाट यातील परस्पर संबंध १०५०० या आकड्याचे महात्म्य वगैरे बद्दल माहिती होती.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

प्रकाटाआ

प्रकाटाआ.

माया

यात माया/अटलांटिस संस्कृती, त्यांचे आता पाण्याखाली गेलेले प्रचंड चुंबकीय क्षेत्र असणारे उर्जा केंद्र वगैरे गोष्टी वाचल्याचे आठवते का?

आता आठवायला लागले :)
यालाच फिलाडेल्फिया प्रयोग असे नाव दिले होते. पण मला हे कधीच कंटाळावाणे वाटले नव्हते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

नाही - फिलाडेल्फिया प्रयोग

फिलाडेल्फिया प्रयोग ही एक वेगळीच घटना (भानगड) आहे. मला आता विस्तृत आठवत नाही परंतु फिलाडेल्फियाला एका अमेरिकन नाविक दळाच्या मोठ्या जहाजावर काहीतरी प्रयोग घडवून आणले गेले. त्यात या जहाजा सभोवती हिरवा प्रकाश पसरून हे जहाज आणि त्यातील माणसे तात्पुरती अदृश्य झाली. पुढे ती प्रकट झाली तरी भविष्यात केव्हा केव्हा जहाज आणि माणसे कधीतरी अचानक अदृश्य होत अशी आख्यायिका आहे. (कृपया हसू नये!)

बर्लिझने त्यावरही लेखन केले होते असे वाटते.

बरोबर

यात चुंबकीय क्षेत्रही होते. आणि नंतर याचा संबंध माया वगैरेशी लावला होता असे वातते आहे..

(माझी अवस्था हिंदी चित्रपटातील स्मृती गमावलेल्या पात्रासारखी झाली आहे :) )

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

धन्यवाद

निनाद आणि चित्रा लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.

निनाद आणि विसुनाना,

तुमचे म्हणणे बरोबर आहे. तिसरा भाग गोंधळात टाकणारा आहे हे निश्चितच कारण चित्रपट पाहून आलेल्या प्रत्येकाचे मत तसे पडले तरी चित्रपट आवडल्याचे अनेकांनी सांगितले. याचे कारण जॉनी डेप असावे असे मला वाटते.

गुंडोपंत,
नक्की. पुढे कधीतरी परग्रहांच्या पाहुण्यांवर लिहिता येईल. सध्या कोडे सोडवून पाहता का? :))

चित्रा,
हे पुस्तक मी वाचले होते. अगदी लहानपणी "शाळेतली भुताटकी" हे पुस्तकही आवडायचे. जेथे "भूत"(भूतकाळ आणि भूतेखेते) हा शब्द दिसतो ते ते मी वाचते.

हो

हो हो!
परग्रहवासियांबरोबर चहा घेता घेता (शब्द)कोडीच सोडवत बसलोय बरं!
आपला
कोडोपंत

अजून एक

वॉटर वल्ड कोणी बघीतला आहे. तो चित्रपट् पण छान आहे त्यात त्याची बोट दाखवली आहे ती पण् छानच आहे.

मारी सेलेस्त्

प्रियालीताईंचा लेख आवडला हे आधीच लिहायला हवे होते.

एक मारी सेलेस्त् किंवा मेरी सेलेस्ट् नावाचे जहाज होते ते असेच सर्वतः निर्जन अवस्थेत (कारण अज्ञात) दिसले/दिसत असे. यावर मी हॅमंड इनिस् ची कादंबरी वाचलेली आहे. इतरांनीही लिहिले असेल .........
आठवल्याआठवल्या लिहितो आहे, गुगलून पाहिले नाही ..

- दिगम्भा

मेरी सेलेस्टी - भुताळी जहाज

धन्यवाद दिगम्भा

मेरी सेलेस्टी (सरळसोट अमेरेकी उच्चार) हे जहाज जिब्राल्टरजवळ समुद्रात भरकटताना आढळले होते. त्यावर अल्कोहोलच्या पिंपांची वाहतूक होत असे. या जहाजात पाणी भरले होते. जहाजाचा कर्मचारीवर्ग गायब होता. जहाजावरील कॅप्टनचे लॉगबुक सोडून सर्व कागदपत्रे सुखरुप होती. गायब झालेल्या कर्मचार्‍यांचे काय झाले याचा पत्ता कधीच लागला नाही. अशी काहीशी ही गोष्ट आहे.

अधिक माहिती येथे मिळेल.

संदर्भ: ओशन ट्रँगल - बाळ भागवत.

फ्ल्याइन्ग् डचमन

मला आधी वाटले की हा लेख Johan Cryuff (Cruijff) बद्दल आहे ज्याला फ्ल्याइन्ग् डचमन म्हणत असतं.

संभुजी

संभुजी हा आग्र्यांचा वशंज् आहे. पायरेटस् मधील् ते ९ सरदार् हे त्या काळातील् ब्रिटीश् जाहाजे लुटनारे लोक् होते. (जसे संभुजी हा मराठा सरदार्). मी पहील्या दिवशी हा चित्रपट् पाहीला. मला तिसरा भाग् जास्त् आवडला.

फ्लाइंग डचमन

लेख चांगला झाला आहे.अभिनंदन.

फ्लाइंग डचमॅन

लेख आवडला..!
मॅट्रिक्स वर लिहा कधीतरी..
-लंपूडिअर

सम्भजि अन्ग्रिया

..

 
^ वर