शनि मंगळ युती चे बळी?

आजच्या दै. सकाळ च्या या बातमी कडे लक्ष गेले. बातमीत असे लिहिले की - ज्योतिषशास्त्राच्या आहारी गेलेल्या कुटुंबप्रमुखाने प्रापंचिक नैराश्यायतून आपल्या पत्नीसह दोन मुलांना झोपेच्या गोळ्या देऊन जीवे मारून आणि स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनी-मंगळ युतीचे "भय'
ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वाशस ठेवणाऱ्या अरुण पालकर यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये बायको व मुलांना जीवे मारण्यामागचे कारण स्पष्ट दिले आहे. या चिठ्ठीमध्ये पालकर लिहितात "माझा भविष्यावर विश्वास आहे, मला गोष्टी आधीच कळतात; पण मला कोणी गांभीर्याने घेत नाही. माझे लक्ष संसारात नव्हते. तेरा वर्षांच्या संसारात पैसा, घर, गाडी घेणे मला सोपे होते; पण शनी-मंगळाची युती झाली असल्यामुळे माझी अडचणीकडे वाटचाल सुरू झाली. माझे व पत्नीचे कधीच पटले नाही. माझी मुलं हुशार आहेत; पण त्यांचे हाल नको म्हणून हा मार्ग मी निवडला. पत्नीशी संगनमताने हे पाऊल उचलले आहे.'
याच बातमीला पूरक बातमी म्हणून अरुण पालकरांच्या भावाचे म्हणजे श्री उमेश पालकर यांचे म्हणणे स्वतंत्र दिले आहे ते म्हणतात - "लहानपणापासूनच त्यांना ज्योतिष शास्त्राविषयी आवड होती. ते नववीत शिकत असल्यापासून याविषयातली सर्व पुस्तके वाचत. एखादा माणूस ठराविक कालावधीत कसा वागेल याचे ज्ञान त्यांना होतं. मात्र, ते सगळ्यांनाच याबाबत सांगत नव्हते. मी न सांगता कधी बाहेरगावी गेलो तर त्यांना आपोआप समजायचे आणि ते मला फोन करून विचारायचे."
ज्योतिष समर्थक म्हणतात कि ज्योतिष हे मानवजातीला कल्याणकारक असे शास्त्र आहे.मानवी मनाला दिलासा देणारे शास्त्र आहे. भविष्यात येणार्‍या अडचणींची कल्पना अगोदर आल्यामुळे माणुस संकटाचा सामना करण्यास सिद्ध होतो. वरील बातमीत जातक व ज्योतिषी एकच आहेत. ज्योतिषावर कट्टर श्रद्धा असणारा माणुस देखील असे म्हणेल कि ज्योतिषशास्त्राच्या एवढे आहारी जावयास नको होते. सदर संकट हे ज्योतिष शास्त्रामुळे ओढवलेले नसून अरुण पालकरांच्या नैराश्यामुळे उदभवले आहे.
संकट आले म्हणजे तोडगे परिहार आलेच. तो करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याची बातमी झाली नसती. अगोदरच कर्ज बाजारी त्यातून या तोडग्याचा खर्च. स्वतःसकट कुटुंब संपवण्याचा विचार काही एका रात्रीतुन आला नाही. हे विचार त्यांच्या मनात बराच काळ रेंगाळत असणार. ज्योतिषाच्या आहारी जाण्या ऐवजी त्यांनी जर मानसशास्त्र व समुपदेशन याचा आधार घेतला असता तर चित्र वेगळे दिसले असते. आपल्याला काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

मानसशास्त्र व समुपदेशन

मानसशास्त्राच्या शैलीनेच बहुतांश ज्योतिषी समुपदेशन करतात असे इथले एक ज्योतिषसमर्थक दिवंगत आयडी सांगत; त्याची आठवण झाली.

--मनोबा

हॅ हॅ

या ठिकाणी जातक व ज्योतिषी ही एकच व्यक्ती आहे. त्यामुळे मानसशास्त्राच्या शैलीने समुपदेशन करायचे झाल्यास ते स्वतःच स्वतःला करायचे आहे.
प्रकाश घाटपांडे

रसेल्स पॅराडॉक्स

रसेल्स पॅराडॉक्स ऐकला असेलच. नसल्यास हा घ्या:-

एका गावात एकच न्हावीच आहे. त्याने प्रतिज्ञा केलेली आहे ती अशी :- "मी गावातील् अशाच पुरुषांची दाढी करेन जे स्वतःची दाढी स्वतः करत नाहित" . आता त्याला पडलेला एक साधासा प्रश्न :- "त्यानं स्वतःची दाढी करावी का?"

समुपदेशन ,हजामत व अंत्यसंस्कार हे कुणीतरी दुसर्‍यानेच करावेत हेच इष्ट. स्वतःचे स्वतःअ करता कामा नये.

--मनोबा

अरेच्चा!

माझे व पत्नीचे कधीच पटले नाही. माझी मुलं हुशार आहेत; पण त्यांचे हाल नको म्हणून हा मार्ग मी निवडला. पत्नीशी संगनमताने हे पाऊल उचलले आहे.'

काहीतरी घोळ दिसतो. ज्योतिषाला बदनाम करण्याचा कट दिसतो. ;-)

बायदवे, शनी मंगळ युती हा काय प्रकार असतो? तो तेरा वर्षे वगैरे टिकतो का? तो वारंवार येत राहतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे माहित नसल्याने अधिक टिप्पणी करता येत नाही. ;-)

ज्योतिष

ज्योतिष हे शास्त्र आहे का, त्याने मानसिक बळ मिळते का, त्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये या न संपणार्‍या चर्चा आहेत. पण एखादी गोष्ट एखाद्याला इतके टोकाचे पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर ती माणसासाठी कल्याणकारी नक्कीच नाही इतकेच म्हणता येईल.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

अरेरे

लिहिलेले पत्र प्रचंड मानसिक तणाव वा बिघडलेली मानसिक परिस्थिती दर्शविते, ह्या मानसिक आजारावर वेळीच औषध मिळाले असते तर निदान मुलांचा आणि पत्नीचा जीव वाचला असता.

दुर्दैव

प्रचंड मानसिक तणाव आणि बिघडलेली परिस्थिती असावीच परंतु आणखी एक वाईट गोष्ट नजरेस पडली ती म्हणजे त्यांच्या भावाने केलेली टिप्पणी. या अशा टिप्पणीतून नको त्या गोष्टींचे महत्त्व वाढवण्यास लोक मदत करतात.

"क्ष" चे भविष्य कध्धी खोटे ठरलेले नाही त्यामुळे त्याने सांगितलेल्या दिवशी मरण ओढवणार/ संकट येणार अशी नकळत जाहीरातबाजी करणारे लोक ज्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे त्यांना अधिकच खट्टू करत असतात असे वाटते.

खरय

खरयं, त्याचाच भाऊ तो, वृत्तपत्राने अशा बातम्या छापताना निदान त्यातून अशा प्रकारच्या ज्योतिष वैचारिकतेला प्रोत्साहन देणे गैर वाटते.

वाचाळ ज्योतिषी

ज्याने हे भविष्य वर्तवले त्याला मनुष्यवध - मृत्यु होणार माहित असुनही पोलिसांना कळवले का नाही? - ज्यामुळे हे वढ टाळता आले असते; या मुद्याखाली पोलिस अटक करू शकतात का? त्यामुळे अश्या वाचाळ ज्योतिषांना तरी जरब बसावी

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

फलज्योतिष

ज्याने हे भविष्य वर्तवले त्याला मनुष्यवध - मृत्यु होणार माहित असुनही पोलिसांना कळवले का नाही?

बातमीत' ज्योतिषशास्त्राच्या' याचा अर्थ 'फलज्योतिष या विषयाच्या' आहारी गेल्याने असा अर्थ आहे. कोणा एका ज्योतिषाच्या आहारी गेल्यामुळे नाही.
माझ्या मते तो फलज्योतिषा पेक्षा मनोविकाराचा बळी आहे. मानसोपचार तज्ञांच्या सल्ला / उपचारामुळे हा प्रसंग टळला असता का? हा खरा महत्वाचा मुद्दा आहे.
प्रकाश घाटपांडे

ह्म्म्म्

पटले. सहमत आहे.

अवांतरः फलज्योतिषावरून आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घ्यायला उद्युक्त होणे हा मानसिक आजार घोषित करावा काय?

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

शनि-मंगळ युती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
खगोलशास्त्रातील आपली ग्रहमाला सर्वांना ठाऊक आहे.त्यात पृथी आणि सूर्य यांची अदलाबदल करा.सूर्याला पृथीच्या कक्षेत ठेवायचे. भ्रमणकाल १ वर्ष. पृथीला केंद्रस्थानी आणायचे.ही झाली ज्योतिषांची ग्रहमाला.चं.,बु.शु.र.(सूर्य),मं.गु. श. इत्यादि सर्व ग्रह पृथी भोवती फिरतात.
समजा ज्योतिषांच्या ग्रहमालेतील अ आणि ब हे कोणतेही दोन ग्रह. प ही पृथ्वी. आता अ आणि ब फिरता फिरता अ,ब,प हे एका सरळ रेषेत येतील (अ आणि ब हे प च्या एकाच बाजूस) तेव्हा अ आणि ब ग्रहांची युती झाली म्हणायचे. कोन अपब=० अ आणि ब जर प च्या विरुद्ध बाजूंस असतील तर ती प्रतियुती.(कोन अपब=१८० अंश) .कोन अबब=६० असेल तर लाभयोग,तो ९०अंशाचा असेल तर केंद्रयोग,१२० अंश असेल तर त्रिकोण योग असे म्हणतात.
..
शनीचा भ्र.का.३० वर्षांचा आहे. मंगळाचा १.८९ वर्षे.त्यामुळे दर दोन वर्षांनी युती होत असावी. तसेच एका राशीत शनी अडीज वर्षे असतो तर मंगळ जेमतेम दोन महिने. म्हणून युती अधिकतम दोन महिने असते.म्हणजे शनि-मंगळ युती दर दोन वर्षांनी दोन महिने असते.
..
अरुण पालकरांनी ज्या युतीचा धसका घेतला ती बहुधा त्यांच्या जन्मपत्रिकेतील असावी.(म्हणजे त्यांचा जन्म झाला त्या दिवशी ही युती होती. (श.,मं.) असे दोन ग्रह कुठल्यातरी एका राशीत असणार.गोचरीत आज हे दोन ग्रह कुठे आहेत ते पंचांगात पाहता येईल.

बरोबर

शनि मंगळ युति ही पालकरांच्या पत्रिकेत होती त्याचाच धसका त्यांनी घेतला असावा. सध्या गोचरीत शनि तुळ राशीत व मंगळ सिंह राशीत आहे. शनि मंगळ युति काही दुर्मिळ ग्रहयोग नाही. दर दोन वर्षांतून अशी शनी मंगळ युती होतच असते.
पालकरांनी स्वतःचीच पत्रिका ज्योतिषाच्या भुमिकेतून पाहून स्वतःपुरते काही निष्कर्ष काढले असावेत. बातमीच्या तपशीला वरुन त्यांनी नियोजन बद्ध रीतीने हे प्रकरण केले आहे.
आजच्या सकाळ मधे अजुन एक हत्या करुन आत्महत्या ची बातमी आहे. येथे ज्योतिषाचा काही संबंध दिसत नाही. आजचे सकाळचे संपादकीय देखील याच विषयावर आहे. त्यात " सामान्य माणसांना अनेक चिंतानी घेरलेले आहे आणि अनेक प्रकारची दुःखे त्यांना सतावत आहेत, हे वास्तव समजावून घेतलेच पाहिजे. अशा परिस्थितीत सर्वार्थाने कोलमडून पडण्याची वेळही अनेकांवर येते, हेही नाकारता येणार नाही. बरेच लोक या मनःस्थितीत ज्योतिष्याकडे धाव घेतात. पण त्यांना खरी गरज असते ती समुपदेशनाची. ती कशी भागविता येईल, याचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा." असे म्हटले आहे
प्रकाश घाटपांडे

अत्यंत घिसा पिटा शे'र आठवला.

खुदी को कर बुलन्द इतना
कि हर तकदीर से पहले
खुदा बंदे से खुद पूछे
बता तेरी रजा क्या है?

हे आजकालच्या पब्लिकला समजत नाही का?

आत्महत्या 'पूर्ण' झाल्या, (म्हणजे ते लोक मेले.) म्हणून पेपरात बातमी आली. पण, क्षुल्लक भांडणांत नवरा/बायकोने जीव द्यायला निघणे. रॉकेल ओतून घेणे, किंवा ब्लेडने मनगटे कापणे. (नशीबाने रेडियल आर्टरी खूप खोल असते) किंवा तत्सम अतिरेक करणे, हे इतके कॉमन आहे की कल्पनाही करता येत नाही. या 'स्पेसिफिक' घटनेत ज्योतिषही 'इन्व्हॉल्व्हड्' आहे, तो एक वेगळा विषय आहे. सकाळचाच नाही तर आजचा लोकमतचाही अग्रलेख याच घटनेबद्दल आहे.

खूप खळबळ मनात आहे या विषयाबद्दल. अन खूप लिहायचे मनात आहे. थोड्या वेळाने लिहीन म्हणतो. (brb)

स्वतंत्र लेख लिहा

खूप खळबळ मनात आहे या विषयाबद्दल. अन खूप लिहायचे मनात आहे. थोड्या वेळाने लिहीन म्हणतो. (brb)

स्वतंत्र लेख लिहा किंवा चर्चा सुरू करा.

अवांतर

शनिमंगळाची युती झाली असावी कुठेतरी जवळपास. 'खूप लिहायचे मनात' असण्याचा बळी गेला बहुतेक (हलके घ्या...)

अंधश्रद्धाळू

भलतेच अंधश्रद्धाळू आहात. युती संपली की तुमच्या सवडीने लिहा.

अघोरी प्रकार

हा तर अघोरी प्रकार आहे. ज्योतिष हे समुपदेशनाचे एक साधन आहे असे मृदू किंवा सूक्ष्म समर्थन करणेही कितपत योग्य आहे ह्यावर विचार करायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

ज्योतिष हे समुपदेशनाचे एक साधन आहे असे मृदू किंवा सूक्ष्म समर्थन करणेही कितपत योग्य आहे काय ह्यावर विचार करायला हवा.

+१

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

सहमत/असहमत

हा तर अघोरी प्रकार आहे.

सहमत

ज्योतिष हे समुपदेशनाचे एक साधन आहे असे मृदू किंवा सूक्ष्म समर्थन करणेही कितपत योग्य आहे काय ह्यावर विचार करायला हवा.

ही विचार प्रकिया तर चालूच असते. सर्वसामान्य लोकांना वै़ज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद वगैरे च्या आधारे अनिश्चितता पचवायला शक्य होत नाही. असे लोक फारच थोडे. त्यांच्यासाठी ज्योतिष हे थोतांड आहे हे एका वाक्यात पुरेसे असते.
मला यानिमित्ताने माझ्या मनोगताची आठवण येते

"आपल्याला जे पटत नाही ते सर्व त्याज्य अशी भूमिका न घेता बहुविध दृष्टिकोणातून या विषयाकडे बघण्याची दृष्टि ही मला माझया ज्योतिष प्रवासातूनच मिळाली. अनेक बुद्धिप्रमाण्यवादी फलज्योतिष विरोधक आपल्या मताशी जो पूर्णत: सहमत नाही तो फलज्योतिष समर्थकच आहे असे मानणारे आहेत. तसेच अनेक फलज्योतिष समर्थक हे आपल्याशी सहमत नसणारा तो विरोधक असे मानणारे आहेत. हे पुस्तक फलज्योतिषाचे समर्थन करते की विरोध असाही प्रश्न काही लोकांना पडला. एखाद्या गोष्टीला समर्थन वा विरोध यो दोनच बाजू नसून चिकित्सा नावाची वेगळी बाजू पण आहे. चिकित्सा ही दोन्ही पातळयांची करावी लागते. फलज्योतिष समर्थक वा विरोधक हे आपापल्या व्यासपीठावरुन एकमेकाविरुद्ध आग्रही मतं मांडत असतात. या दोन्ही भूमिका लोकांना एकाच वेळी ऐकायला मिळाव्यात या हेतूने पहिल्या आवृत्तीचे समारंभपूर्वक प्रकाशन केले. त्यात डॉ.नरेन्द्र दाभोलकर यांनी आपला फलज्योतिष विरोधी आणि ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी आपली समर्थक भूमिका मांडली. तसेच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दोघांनीही उत्तरे दिली. उत्तरे पटणे वा न पटणे हा भाग निराळा. पण या निमित्ताने एक विचार प्रक्रिया तर चालू झाली. आतापर्यंत फलज्योतिष हा विषय वा ज्योतिषी ही व्यक्ती केन्द्रबिंदू धरुन विरोध वा समर्थन झाले आहे. हा विषय मुख्यत: ज्योतिषाकडे जाणारी व्यक्ती म्हणजेच जातक यांच्या करता आहे. परंतु यांना केन्द्र बिंदू मानून चिकित्सा केली जात नाही. जातक हा चिकित्सकही बनू शकतो अशी भूमिका मांडताना त्याची मानसिक जडणघडण विचारात घेतली आहे. फलज्योतिष हा श्रद्धेचा विषय झाला की चिकित्सेच्या वाटाच बंद होतात. चिकित्सेला प्रवृत्त करण्यासाठी काही तडजोड करणे ही आवश्यक असते. ती तडजोड म्हणजे जातकाला वेळोवेळी समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
फलज्योतिषातील समर्थक वा विरोधी मते यातील विविध अंतर्प्रवाह मला जवळून पहायला मिळाले. अत्यंत तटस्थ राहून मी फलज्योतिष चिकित्सा केली आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. टीकाकार या नात्याने अंतर्विसंगती मांडायच्या झाल्या तर त्या फलज्योतिषीय परिभाषेत मांडाव्या लागतील. त्या फक्त अभ्यासकांनाच समजतील सर्वसामान्य माणूस चिकित्सेपासून पुन्हा वंचितच राहिल म्हणून तो विषय फलज्योतिषीय पातळीवर फारसा मांडला नाही. चिकित्सा करताना दोन्ही बाजू अभ्यासक या नात्याने समजावून घेताना कधी सुसंगतीतही विसंगती आढळली तर कधी विसंगतीतही सुसंगती आढळली. हेच तर मानवी स्वभावाचे वैशिष्टय आहे. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत हे भान ठेवून चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने वाचकांना काही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. "

उधृत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...

प्रकाश घाटपांडे

उपरोध

ही विचार प्रकिया तर चालूच असते.

'मृदू किंवा सूक्ष्म समर्थन करणेही कितपत योग्य आहे काय ह्यावर विचार करायला हवा." या विधानाचा अर्थ असतो की "ते मुळीच योग्य नाही असे तुम्हाला पटेपर्यंत पुन्हापुन्हा विचार करीत रहा.".

समुपदेशनाचे साधन

ज्योतिष हे समुपदेशनाचे एक साधन आहे असे मृदू किंवा सूक्ष्म समर्थन करणेही कितपत योग्य आहे काय ह्यावर विचार करायला हवा.

वैयक्तिक दृष्ट्या माझी याला हरकत नाही कारण समुपदेशन करणारे सर्वच १००% यशस्वी होतात किंवा दिलेल्या गाइडलाइन्स पाळतात असे दिसत नाही. समुपदेशकांतही काही अतिरेकी, चिडखोर, कडक शिस्तीचे वगैरे समुपदेशक असल्याने समुपदेशनाचा उद्देश हेलपाटल्याची उदाहरणे मिळतात. समुपदेशकांकडे जाऊनही आत्महत्या वगैरे करणारे लोक आढळतात आणि रिहॅबमध्ये दाखल होऊनही पुन्हा व्यसनांच्या मागे जाणारे लोक आढळतात. त्याचप्रमाणे एखादा ज्योतिषी नकारात्मक सल्ले देणारा मिळतो.

एक उदाहरण द्यायचे झाले तर, आमच्या नातेवाईकांत एका स्त्रीला एका विक्षिप्त ज्योतिषाने सांगितले होते की तुमच्या मुलाचे लग्न झाल्यावर नातू व्हायच्या आत त्याची बायको तुम्हाला सोडून जाईल. सोबत धनसंपत्ती वगैरे घेऊन जाईल तेव्हा या मुलाचे लग्न करू नका. सुदैवाने असला अघोरी सल्ला घरच्यांनी मानला नाही. आज या मुलाचे लग्न होऊन, त्याला मुलेबाळे होऊन १० वर्षांवर काळ उलटला आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे. तर इतरत्र असेही ज्योतिषी माहित आहेत जे ज्योतिष्याच्या मागे लागलेल्या लोकांना सांगतात की "अहो वारंवार येत जाऊ नका. तुम्हाला आधी सांगितलं होतं ना की सर्व व्यवस्थित होईल, धीर धरा. तुम्ही वारंवार आल्याने जे व्हायचे आहे ते बदलणार आहे का? उगीच माझी फी देऊन स्वतःचं नुकसान का करून घेता?"

हॅ हॅ हॅ

हॅ हॅ हॅ.. म्हंजे "चांगला ज्योतिषि मिळण्याचा योग मात्र तुमच्या पत्रिकेत असायला हवा" (इति पु.ल. - काही नवे ग्रहयोग)

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

हेहेहे!

हॅ हॅ हॅ.. म्हंजे "चांगला ज्योतिषि मिळण्याचा योग मात्र तुमच्या पत्रिकेत असायला हवा" (इति पु.ल. - काही नवे ग्रहयोग)

हो हो! आधी चांगला ज्योतिषी मिळणार का हे पत्रिकेत शोधावे आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा योग असेल तरच त्याकडे जावे. ;-)

 
^ वर