वार्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न
आंतरजालावरील फेसबूक, गुगल सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न भारत सरकारने परत एकदा चालू केल्याचे दिसते आहे. मात्र या वेळेस न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हे करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो आहे.
विनय राय या गृहस्थांनी काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मेट्रोपोलिटिअन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात या सोशल नेटवर्किंग साईट्स, राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सामंजस्य भंग पावेल असा मजकूर प्रसिद्ध करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा अर्ज केला होता. या अर्जाचा विचार करताना न्यायमूर्तींनी सरकारी मान्यता असेल तरच या अर्जाचा विचार करता येईल असा निकाल दिला होता. बहुदा भारत सरकार असा निर्णय घेण्याची वाटच पहात असावे कारण भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजीने त्वरेने आपला अहवाल कोर्टासमोर ठेवला आहे. या अहवालानुसार वर दिलेल्या आरोपांशिवाय, अश्लील मजकूर प्रसिद्ध करणे, लहान मुलांना अश्लील पुस्तके विकणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान या संबंधीचे आरोपही या सोशल नेटवर्किंग साईट्सवर ठेवता येतील असे मत व्यक्त केले आहे. या साठी त्यांनी आंतरजालावर प्रसिद्ध झालेला मजकूरही कोर्टाला सादर केला आहे.
कोर्टाने हा अहवाल दाखल करून घेतल्यावर भारत सरकारला परदेशात असलेल्या या कंपन्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले आहे.
या खटल्यावर स्टे आणावा अशी मागणी करणारा अर्ज फेसबूक इंडिया व गुगल इंडिया या कंपन्यांनी दिलीच्या उच्च न्यायालयात केला होता. हा अर्ज फेटाळून लावताना कोर्टाने अशा प्रकारचा मजकूर प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी या सोशल नेटवर्किंग साईट्सची असल्याचे सांगितले आहे. व त्यांनी हे न केल्यास या साईट्सवर चीन प्रमाणेच बंदी घालता येईल असेही सांगितले आहे.
गुगल इंडियाच्या वकीलांचे असे म्हणणे आहे की ही सोशल नेटवर्किंग साईट अमेरिकेतील मूळ कंपनी चालवत असल्याने त्यांची काहीच जबाबदारी या बाबतीत नाही. परंतु गुगलच्या नेटवर्क साईट्स पूर्णपणे स्वयंचलित असल्याने असा मजकूर काढून टाकणे कंपनीला केवळ अशक्य आहे. फेसबूक इंडियाच्या वकीलाच्या मताने फेसबूकवर असा मजकूर प्रसिद्ध झालेला नाही.
आंतरजालावर कोणत्याही कायद्याचा भंग होणारा मजकूर त्या देशात दिसणार नाही अशी थोडीफार तजवीज करणे शक्य होईल. परंतु अशा प्रकारचा सर्व मजकूर आधीच सेन्सॉर करून काढून टाकला गेला पाहिजे ही सरकारची मागणी वार्याला गवसणी घालण्यास निघण्यासारखे आहे. 1975 च्या आणीबाणीत सरकारने वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले होते. तरी सुद्धा त्यांना चुकवून अनेक बातम्या प्रसिद्ध होतच होत्या. आंतरजाल एवढे विशाल आहे की असा प्रयत्न करणे वेडेपणाचे ठरेल.
चीनने निर्बंध घातले आहेत म्हणजे त्यांनी या साईट्स बंदच करून टाकल्या आहेत. या प्रकारचे निर्बंध सरकारने आणले तर ते सर्वसामान्य आंतरजाल वापरणार्यांना रुचतील असे मला वाटत नाही.
मुक्त संभाषण हा लोकशाहीचा आत्मा असतो. त्यावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न मागच्या दाराने करणे हे कितपत योग्य आहे? याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. कोणताही भडकवणारा मजकूर प्रसिद्ध झाला तर तो मजकूर काढून टाकण्याची मागणी करू शकेल अशी लोकांची यंत्रणा उभारून त्यांच्या मार्फत असा मजकूर काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करणे हा एक मार्ग आहे. प्रत्येक शहरात विषयानुसार आंतरजाल वापरणार्यांचे असे गट स्थापन करून त्यांच्यामार्फत हे काम सहज करता येईल. कोणत्याही आंतरजाल वापरणार्याला असा मजकूर आढळला तर ती वेब साईट तो या अशा गटाकडे पाठवून देऊन त्यावरचा मजकूर आंतरजालावरून हटवला जाईल याची तजवीज करू शकेल.
सरकारचा उद्देश स्तुत्य आहे यात शंका नाही. पण हा मजकूर प्रसिद्ध न होऊ देण्याची जबाबदारी या सोशल नेटवर्किंग साईट्सची आहे हे म्हणणे तात्विक दृष्ट्या कितीही बरोबर असले तरी त्याची अंमलबजावणी अशक्यप्रायच आहे. भारतात फेसबूक व गुगल वापरणार्यांची संख्या लाखांनी आहे. त्यांना आपल्या या आवडत्या सेवांवर बंदी आणलेली रुचेल असे मला वाटत नाही.
Comments
योग्य मार्ग
हा योग्य मार्ग आहे. त्यावर कारवाई करायची की नाही हे वेब कंपन्यांना/संकेतस्थळांना ठरवू द्या. संकेतस्थळांवर बंदी आणण्याचा प्रकार जुलमी आहे. आणि व्यावहारिकही नाही. इराण,इजिप्त इ. देशांत झालेल्या चळवळींनी हेच सिद्ध केले.
फेसबुक आणि तत्सम संकेतस्थळांवर काही धर्माच्या श्रद्धास्थांनावर तथाकथित ब्लॅसफेमस हल्ले होत आहेत. त्यामुळे एक मोठा जनसमुदाय व्यथित होतो, संतापतो, आंदोलित होतो. अर्थात ह्या नव्या युगात रॅबल राउज़िंग करणेही सोपे झाले आहे म्हणा. पण तूर्तास तरी इंटरनेटवर एकदा आलेल्या आलेल्या माहितीला कुणी प्रसृत होण्यापासून रोखू शकत नाही. किंबहुना असा प्रयत्न केल्यास ती अधिक जोमाने पसरते ही गोष्ट लोकांना कशी समजावून सांगावी? आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी कायदेशीर चौकट (लीगल फ्रेमवर्क) झाल्यावर कदाचित अशा गोष्टींवर आळा घालता येण्याची शक्यता वाढावी. तूर्तास घाईत एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ही शक्यतेतील गोष्ट नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी कायदेशीर चौकट (लीगल फ्रेमवर्क) झाल्यावर कदाचित अशा गोष्टींवर आळा घालता येण्याची शक्यता वाढावी.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी काही चौकट निर्माण होणे - उदा. सहभागी होऊ इच्छिणार्या देशांचा परस्पर करार - सुतराम शक्य नाही कारण त्यासाठी एकमत कधीच गोळा होणार नाही.
राष्ट्रीय महत्त्वाच्या देवदेवतांचे, पौराणिक आणि आधुनिक व्यक्तींचे तथाकथित चारित्र्यहनन (आपला आवडता शब्द), आपल्या धर्मावरची टीका (प्रामाणिक वा विपर्यस्त) हे जे आपण आणि त्याचबरोबर पाकिस्तान, इराण सारखे अन्य देश ह्यांना red flag सारखे वाटतात त्या विषयांबाबत अन्य देश - विशेषत: पाश्चात्य देश - बहुतांशी उदास असतात. तेव्हा ही आवळ्याची मोट बांधणार कोण आणि कशी?
'वार्याला गवसणी घालणे' हे वर केलेले वर्णन चपखल आहे.
आवळ्याची मोट
आवळ्याची मोट हा वाक्प्रचार कोठे वापरतात ते वरील वाक्यावरून कळले पण तो कसा अस्तित्वात आला असावा? आवळा लहान असल्याने त्याची मोट तयार केल्यास कसे व्हावे या उपरोधातून तर नव्हे?
अगदी
अगदी. असे होण्याची शक्यता जवळपास नाहीच असेच मला आधीच्या प्रतिसादातून सुचवायचे होते. पाश्चात्य देश (म्हणजे त्या देशातले लोक) अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा संकोच करणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा, पावलांचा निकराने विरोध करतील.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सरकारची भूमिका योग्य पण अंमलबजावणी कठीण
कितीही माध्यम-स्वातंत्र्याचा उदो उदो केला तरी माध्यमांची काही जबाबदारी आहेच. उलट प्रिंट मिडिया पेक्षा इले. मिडिया ला ती जबाबदारी पाळणे सोपे आहे. ते त्यांनी पाळले नाही तर त्यावर कारवाई केली पाहिजे.
या सोशल साईट्स ने काही निकष पाळणे महत्वाचे आहे. त्यातही जर ती सोशल वेबसाईट वापरणार्या भारतीय लोकांची संख्या विशिष्ट संख्येपेक्षा जास्त असेल तर ते निकष पाळणे जास्त कठोर करावे.
१) ओळख प्रमाण- सध्यातरी कोणीही जालावर कुठेही खोटे सदस्यत्व मिळवू शकतो. त्यासाठी सदस्यत्व मिळवताना खरी ओळख पटल्याशिवाय सदस्यत्व देऊ नये.
२) काही लोकांना हे सोशल वेबसाईट (उदा. ट्विटर) वापरण्याची संपूर्ण बंदी असावी. उदाहरणार्थ सगळे सरकारी कर्मचारी, मंत्री, अधिकारी इत्यादी. त्यासाठी वेगळे संकेतस्थळ सरकारने उपलब्ध करून द्यावे.
३) अश्लिलतेसाठी ते संकेतस्थळ योग्य ती खबरदारी घेत नसेल तर ते सेन्सोर करण्यासाठी वेगळी यंत्रणा असावी. (याचा अर्थ ते संकेतस्थळ भारतात वापरताना ते पूर्ण तपासल्यानंतरच वापरले गेले पाहिजे)
४) सर्वच नेटवर्किंग वेबसाईटस ला वेळीच रोखले नाही तर त्याचा मोठा गैरवापर होऊ शकतो. त्यासाठी धार्मिक, प्रक्षोभक, अश्लिल लिखाण या वेबसाईट्सने काढून टाकावे. तसे न केल्यास त्यांना जोरदार दंड ठोठवावा. याद्वारे सरकारी तिजोरीत भर पडेल आणि त्यांच्यावर वचक बसेल. एका दगडात दोन पक्षी.
असहमत
१. इथे रेशनकार्ड पासून पासपोर्टपर्यंत सर्व ओळखीचे खोटे पुरावे आरामात मिळतात. मोबाईलचं सिमकार्ड अजूनही पूर्ण पडताळणीशिवाय मिळते. शिवाय अशा लाखो संकेतस्थळांनी करोडो सदस्यांच्या पॅनकार्ड आणि रेशन्कार्डाच्या फोटोकॉपीज् सांभाळत बासावे की आपापल्या साइट्स चालवाव्यात? (लोकांनी स्वतःच्या खर्या नावाने वावरण्याची अपेक्षा कमीत कमी तुम्ही करू नये.)
२. का?
३. अजून किती दिवस अश्लिलतेच्या खोट्या कल्पना कुरवाळत बसायच्या? अशा तथकथित अश्लिल गोष्टींवर बंधने आणायची आणि रस्त्यावर चालणार्या स्त्रियांचा नजरेने बलात्कार करत बसायचे, असा दुटप्पीपणा आम्ही बंद केलेला बरा.
४. ३ प्रमाणेच. अशा गोष्टींनी लोक प्रक्षुब्ध होतात, हा त्या समाज मनाचा कोतेपणा आहे.
||वाछितो विजयी होईबा||
उत्तर
१. इथे रेशनकार्ड पासून पासपोर्टपर्यंत सर्व ओळखीचे खोटे पुरावे आरामात मिळतात.
-> तसे करणे चुकीचे आहे. कायद्याने सिध्द झाल्यास गुन्हा ठरू शकतो. नैतिकतेचे नाही तरी कायद्याचे तरी बंधन पाळले जावे.
मोबाईलचं सिमकार्ड अजूनही पूर्ण पडताळणीशिवाय मिळते.
-> पडताळणी केल्यावर गुन्ह्यांचा तपास सोपा होईल. पडताळणी झालीच पाहिजे, भले सिमकार्डला वेळ लागला तरी चालेल.
अशा अनेक गोष्टी आहेत उदा. वाहन, जागा, बैंकेचे अकाउंट इत्यादी अनेक. त्यासर्व पडताळणी शिवाय उपलब्ध झाल्या पाहिजेत असे तुमचे म्हणणे आहे काय?
जर तुम्ही तुमच्या कुठल्याही भौतिक वस्तूबद्दल मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी व टिकवण्यासाठी पडताळणी आवश्यक आहे असे मानले तर तुम्ही समाजात जे विचार व्यक्त करता ते तुमच्या मालकीचे आहेत असे का मानू नये?
शिवाय अशा लाखो संकेतस्थळांनी करोडो सदस्यांच्या पॅनकार्ड आणि रेशन्कार्डाच्या फोटोकॉपीज् सांभाळत बासावे की आपापल्या साइट्स चालवाव्यात?
-> साइट्स वाले एवढ्या लाखो करोडो लोकांचे (निरूपयोगी) विचार सांभाळताय, कचर्यासारखी माहिती साठवताय, तर ही महत्वाची माहिती साठवणे फारसे काही कठीण नाही. परंतु मी तर म्हणतो, त्या परदेशातल्या प्रायव्हेट साईटसना प्रत्यक्ष ओळखीचे पुरावे आणि महत्वाची कागदपत्रे देण्यापेक्षा फक्त पडताळणी करून घेणे बंधनकारक करावे, पडताळणी इथल्या सरकारी यंत्रणेद्वारे किंवा तत्सम यंत्रणेद्वारे (उदा. आधार कार्ड, KYC इत्यादी) करावी. (आधार कार्ड हा एक चांगला पर्याय आहे, तो लवकरात लवकर वापरात येवो)
२. सरकारी कर्मचारर्यांना बंदी का?
कारण इंटरनेट हे अजुनही फसवे माध्यम आहे, त्यावरून व्यक्त झालेला विचार कुणाचा आहे याची खात्री नाही. मंत्री किंवा पुढार्यांना बरेच लोक मानतात. त्यावरून चुकीची माहिती पसरल्यास कारण नसताना कायदा आणि सुव्यवस्था ढासळू शकते. (आजच्या काळात फोन वरून, इमेल वरून बॉम्बच्या अफवा पसरवल्या जातात, त्याचा तपास करण्यात फुकट वेळ जातो, काँगेस अध्यक्षांना सुध्दा धमकीच्या इमेल्स पाठवल्या जातात यावरून कल्पना येऊ शकते, की एखादा चुकीचा विचार इंटरनेट द्वारे पसरल्यास भारतातील शांतता सुव्यवस्था क्षणार्धात कोलमडू शकते)
त्यामुळे अशी मानसिकता तयार झाली पाहिजे की जोपर्यंत सरकारी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा कॅमेरासमोर काही बोलत नाहीत तोपर्यंत कुणीही त्यावर विश्वास ठेवू नये. त्यांनी त्यांचे मत प्रत्यक्ष किंवा योग्य माध्यमातूनच व्यक्त केले पाहिजे.
३. अजून किती दिवस अश्लिलतेच्या खोट्या कल्पना कुरवाळत बसायच्या? अशा तथकथित अश्लिल गोष्टींवर बंधने आणायची आणि रस्त्यावर चालणार्या स्त्रियांचा नजरेने बलात्कार करत बसायचे, असा दुटप्पीपणा आम्ही बंद केलेला बरा.
हे खूपच उथळ विधान आहे. या इंटरनेटच्या जमान्यात आपली संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे एवढेच म्हणतो.
४. अशा गोष्टींनी लोक प्रक्षुब्ध होतात, हा त्या समाज मनाचा कोतेपणा आहे.
हो तसे म्हणा हवे तर. भारतीय समाज तेवढा प्रगल्भ नाहीयेच. त्यामुळेच तर शक्य तितकी खबरदारी घ्यायची. प्रक्षोभक विधान पसरू देऊ नये असे नव्हे, पण खरच ते विधान त्या व्यक्तीने केले आहे का ही तपासणी करणे महत्वाचे आहे, ती सध्या तरी इंटरनेटच्या माध्यमात होत नाहीये.
प्रति उत्तर
१. उलटपक्षी कायद्यापेक्षा नैतिकतेची बंधने पाळली तरी खूप होईल.(अर्थात हे होणे अशक्य आहे.)
उदा. लाल सिग्नल असतो. वाहतुक पोलीस सध्या तेथे नसतो. काही गाड्या थांबलेल्या असतात. गाड्या एका मागे एक अशा थांबलेल्या असतात. काही जण उजवीकडून, झाल्यास दुभाजकाच्याही पलिकडून पुढे येऊन थांबतात. आता येथे कायद्याचे बंधन आहेच, पण प्रत्येक वेळी त्याची अंमलबजावणी शक्य होईलच असे नाही. अशा वेळी लोकांनी स्वत्: संयम व नियम पाळणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी कोणीतरी काठी घेऊन थांबलेच पाहिजे असे नाही. कायद्याचा/काठीचा धाक हवाच. पण स्व-नियमन अधिक प्रभावी असते.
गुन्ह्यांचा तपास करणे आताही सोपे आहेच. अति-अति महत्वाच्य व्यक्तिंबाबत(विशेषतः काँग्रेस अध्यक्ष व त्यांचा परिवार)असे काही घडले तर तासाभरात गुन्हेगाराला पिनपॉईंट केले जाऊ शकते, करता येते, अगदी भारतातही.
२. चुकीची माहिती प्रसारित करण्याचे खूप मार्ग आहेत. १५ वर्षांपूर्वी इंटरनेट, २४*७ वृत्तवाहिन्या, मोबाईल नसतानाही गणपती दूध पिल्याची बातमी दुसरा दिवस उजाडायच्या आत देशभर पसरली होती. इंटरनेट मुळे ते थोडे आणखी वेगवान होईल, पन इंटरनेट नसले तरी ते थांबणार नाहीच. बा़की मंत्री/पुढारी/नेते यानी जबाबदारीने विधाने केलीच पाहिजेत. आणि ती ऑन कॅमेरा असतील तर नंतर नाकारणे त्यांना कठीण होईल, याच्याशी सहमत.(हे जरा मी अतिशोयक्तीपूर्ण बोलतोय. कॅमेर्यामोर 'एकही मारा?' असा प्रश्न करणारे आण्णा जेव्हा नंतर सारवा सारवा करतात, तेव्हा अंमळ हसू येते.)
३. संस्कृतीच्या व्याख्या व्यक्ति-कालसापेक्ष असतात. नऊवारी-सहावारी-सलवार कुर्ता-कुर्ता जीन्स-जीन्स टी शर्ट असा प्रवास होत असताना वेळोवेळी संस्कृती च्या नावाने ओरड होतच असते. पण नंतर समाजमानस ते स्वीकारतो. पण हे बदल घडूच दिले नाहित, तर समाजमानस बदलणार तरी कसे? आणि हे केवळ पेहरावाबद्दल नाही, तर आचार-विचारालाही लागू होते.
४. प्रगल्भ नाही म्हणून प्रक्षोभित करणार्या गोष्टी त्यापर्यंत पोहचू दिल्या नाहीत, तर तो त्या गोष्टी कधीच पचवू शकणार नाही. एकेकाळी घाशीराम कोतावाल आणि गिधाडे वर टीका करणारा अ-प्रगल्भ समाज आता त्या अभिजात कलाकृती म्हणून का स्वीकारतो आहे? पण असे विचार तेथपर्यंत पोहचू दिलेच नसते तर, या कलाकृती आजही बहिष्कृत ठरल्या असत्या. आणि एखादी गोष्ट न् स्वीकारता जाळपोळ करणारा खूप मोठा घटक आधीही होता, आजही आहे, आणि थोड्या फार प्रमाणात पुढेही राहिलच. म्हणुन काय केवळ त्यांना पटत नाही म्हणून नवीन गोष्टी आणूच नयेत का? समाज मन प्रगल्भ केले पाहिजे. लहान मुलांना इजा होऊ नये म्हणून काळजी घेणे वेगळे, आणि त्यांना इजा होऊ नये म्हणून त्यांना बाहेरची हवही लागू न देणे हे वेगळे.
||वाछितो विजयी होईबा||
जगाला कातडयाचे आच्छादन
शूरशिपाई ह्यांनी सुचविलेले व्यापक पण अव्यवहार्य (काही प्रमाणात विधिबाह्यहि - उदा. भारताचे नागरिक असलेल्या सरकारी कर्मचार्यांना अन्य नागरिकांप्रमाणेच समानतेचा आणि अन्य मूलभूत अधिकार घटनेने दिले आहे. त्यांचा संकोच करून त्यांच्या खाजगी वेळातहि त्यांनी social website वापरण्यावर बंदी कशी घालता येईल हे समजत नाही.) उपाय वाचून मला पुढील गोष्ट आठवली.
एका राजाला असे वाटले की चालतांना आपल्या पायांना धूळ लागत आहे आणि त्यावर काहीतरी इलाज केला पाहिजे. त्याने आपल्या प्रधानजीना हुकूम केला की सगळ्या देशातील रस्ते कातडयाने झाकून घ्या म्हणजे चालतांना माझ्या पायांना धूळ लागणार नाही. प्रधानजी हुकुमाचे बंदे. त्यांनी फतवा काढला की सर्व जनतेने आपली सर्व जनावरे मारून टाकून कातडी सरकारात जमा करावी म्हणजे ती वापरून सर्व रस्ते कातडयाने झाकून घेतले जातील.
जनता हवालदिल! पण राजापुढे बोलणार कोण? जनावरे मारून त्यांची कातडी काढण्यास प्रारंभ झाला.
एक लहान मुलगा होता. त्याला सुचले की राजाच्या प्रश्नावर एक साधा तोडगा आहे. धीर करून राजापुढे जाऊन त्याने सांगितले, "महाराज, तुमच्या प्रश्नाला माझ्यापाशी सोपे उत्तर आहे." राजाने विचारले, "काय?" "थोडया कातडयाचे बूट करून तुम्ही आपल्या पायात घाला." राजाला ते पटले आणि तेव्हापासून लोक बूटचपला वापरू लागले.
Moral of the story: जालावरील जो मजकूर आपणास अग्राह्य वाटतो तो वाचू नये! आपल्या 'नाजूक' मनाला जरा कठोर बनवावे आणि जालावर सावधगिरीने वागावे! हे उपाय प्रत्येकाचा कह्यात आहेत. तो मार्ग न चोखाळता आणखी कायदे कशाला?
सहमत
पहिल्या व अखेरच्या परिच्छेदात असल्याप्रमाणे माझेही विचार आहेत.
||वाछितो विजयी होईबा||
उपाय
जर संकेतस्थळांना कायद्याचा बडगा टाळायचा असेल तर आपल्या वापरकर्त्यांना त्यांची खरी ओळख घोषित करणे भाग करावे म्हणजे कायदेशीर कारवाई संस्थळावर न होता त्या व्यक्तीवर करता येईल.
हे करण्यासाठी व्यक्तीचे पॅनकार्ड / एस.एस.एन् नंबर अथवा त्या त्या देशातील युनिक आयडेन्टीटी नम्बर दिल्याशिवाय प्रवेश नाकारला जावा.
गुप्ततेच्या व सुरक्षिततेच्या कारणासाठी हा विदा सर्वाना दृश्य नको, मात्र तपासयंत्रणेने / पोलिसांनी मागितल्यास त्या वापरकर्त्याची मुळ माहिती त्वरीत उपलब्ध करून देणे गरजेचे वाटते.
आपली खरी ओळख ज्ञात आहे या भितीनेच बरेच सायबर-गुन्हे बंद होतील असे वाटते
ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?
+१
अगदी असाच उपाय शूरशिपाई यांनी सुचवला आहे (त्यांचा उपाय क्र. १).
आज ना उद्या सर्व सोशल साईट्सना हे करावेच लागेल.
भारतात सुरुवातीस मोबाईल फोन आले तेव्हा सिम कार्डे कोणत्याही ओळखपत्राविना मिळत. त्यातील गैरवापर लक्षात आल्यावर फोटो-ओळखपत्राविना सिम कार्डे मिळणे बंद झाले. जगभरातील बँका तसेच क्रेडिट कार्ड कंपन्यांना KYC करण्याची सक्ती आहे ती यामुळेच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बकवास
अरब जगतात, इजिप्त, सीरियामध्ये जे काही घडले, घडते आहे ते बघता असे करायलाच हवे. त्यामुळे सरकारविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांची ओळख पटेल आणि शांतता राखता येईल. बकवास.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भ्याड आंदोलने
सरकारविरुद्ध विधाने करण्यासाठि ओळख लपवायचि गरजच काय?
हिंमत असेल व हेतु शुद्ध असेल तर स्वतःची ओळख जनतेसमोर मांडूनही सरकारविरुद्ध बंड करता येतं - इतिहासात हे अनेकदा झालंही आहे.
असं भ्याडासारखं ओळख लपवून गोंधळ घालायचा नि त्याला 'आंदोलन' म्हणायचं यात कसला आलाय पुरुषार्थ? आयडी आड लपून लढतोय अश्या कवीकल्पनेत रमणारे भ्याडच ते!
सायबर गुन्हे रोखण्यासाठी ओळख दिलीच पाहिजे असे माझे मत आहे
ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?
किती बकवास!
किती बकवास! हिंमत आणि हेतू ठरवणारे कोण आपण? इतरांवर टीका करणे, खिल्ली उडवणे म्हणजे गुन्हा होत नाही. इंटरनेटवर मुक्तपणे लिहिता येते, वावरता येते हे सर्वात मोठे आकर्षण आहे. ओळख न दाखवता (ज्याला तुम्ही ओळख लपवून म्हणता) वावरणे हा त्याचाच एक भाग आहे. असो. यू हॅव जस्ट बिट्रेड योरसेल्फ़.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बकवास?
आंतरजालावर ओळख लपवता येते असे वाटणे हाच खरा तर मोठ्ठा बकवास आहे.
ओळख काढणे आजही शक्य आहेच. KYC मुळे ते अधिक सुकर (तपास यंत्रणेला) होईल इतकेच.
बाकी इथल्याच एका जुन्या सदस्यांच्या सहीची आठवण आली - यू हॅव नो प्रायवसी. जस्ट गेट ओवर इट!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मुद्दा तो नाहीच
मुद्दा ओळख लपवता (माझ्यामते ओळख न दाखवणे) येते की नाही हा नाही. किंबहुना लपवता येत नाहीच. आणि असे असल्यास मग KYC हवे वगैरे हवे कशाला? रेग्युलेशनचा विषयच संपला.
मुद्दा असा आहे की जालावर प्रत्येकाला मुक्तपणे वावरायचा हक्क असायला हवा. त्यात ओळख न दाखवता वावरणे हा एक भाग आहे. ज्यांना हे सहन होत नाही त्यांनी सौदी अरेबियात किंवा चीनमध्ये जावे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
डॉक्ट्रिन ऑफ प्रॉक्सिमिटी
कायद्याच्या क्षेत्रात डॉक्ट्रिन ऑफ प्रॉक्सिमिटीचे (की डेन्जरस प्रॉक्सिमिटी ? ) तत्त्व मानले जाते.
आपल्या कृतीने आसपासच्या लोकांना इजा होण्याची शक्यता असेल तर ती तशी कृती करणार्याची जवाबदारी असते.
रेलवेखाली सापडून किंवा रेलवेचा धक्का लागून माणसे मरण्याची शक्यता असते. रेलवेलाईनवर न येणे हा ऑप्शन इतर नागरिकांना उपलब्ध असला तरी नागरिकांना रेलवेलाईनवर येता येऊ नये असे शक्य ते सर्व उपाय करणे - फेन्सिंग घालणे वगैरे रेलवेला भाग असते.
असे उपाय करणे ही आमची जवाबदारी नाही आणि आम्ही त्याबाबत काही करणार नाही असे रेलवे म्हणू शकत नाही. असे म्हणाली तर बहुधा आपण "मग तुमची रेलवेसेवा बंद करा" असे बहुधा सांगू.
संस्थळावरील मजकूराने दोन प्रकारे हानी होते.
१. माझ्या भावना दुखावणे
२. माझ्याबद्दल/माझ्या समाजाबद्दल इतर समाजघटकांमध्ये द्वेष पसरणे
यापैकी पहिला प्रकार सोडून दिला तरी दुसर्या प्रकारात नुसते तुम्ही पाहू नका हे म्हणणे फारसे सयुक्तिक होत नाही. शिवाय जेव्हा त्याचा अधिकाधिक प्रसार करणे अतिशय सोपे असते (नुसते कुठेतरी एकदा क्लिक करणे) तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य एवढेच त्या प्रश्नाचे स्वरूप रहात नाही.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य संकोचले जाऊ नये अशी इच्छा असली तरी यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.
नितिन थत्ते
सत्यमेव
जोवर सत्य हा बचाव मान्य केला जात असेल तोवर कोणतेही निर्बंध चालतील. सत्य विधानाने भावना दुखावणे, द्वेष पसरणे, इ. घडले तरी घडू द्यावे, अन्यथा तो अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला आहे. असत्य लेखनाने काही नुकसान होवो न होवो, ते दंडार्हच ठेवावे, हानीच्या हेतूने प्रेरित असत्यकथनाला आणि हानीसाठी सूचक विध्यर्थी/आज्ञार्थी लेखनाला अधिक कठोर शिक्षा व्हावी. वर्क ऑफ फिक्शन डिस्क्लेमर लावून काहीही लेखनाची मोकळीक मिळावी.
विधान सत्य असल्याची पुरेशी काळजी घेऊनही गुड फेथमध्ये केलेले लेखन असत्य असल्याचे उघडकीस आल्यास शिक्षा होऊ नये.
अश्लीलता, बीभत्सपणा इत्यादी पासून लहान मुलांचे (आणि मृदू भावनावाल्या प्रौढांचे) संरक्षण करण्यासाठी, संस्थळाने संस्थळावर तसे लेखन असल्याचा इशारा संस्थळाच्या दर्शनी पानावर देणे पुरेसे मानावे. (दर्शनी पान टाळून थेट आतील पाने उघडण्यावर तांत्रिक बंदी शक्य आहे.)
+/-
>>अश्लीलता, बीभत्सपणा इत्यादी पासून लहान मुलांचे (आणि मृदू भावनावाल्या प्रौढांचे) संरक्षण करण्यासाठी, संस्थळाने संस्थळावर तसे लेखन असल्याचा इशारा संस्थळाच्या दर्शनी पानावर देणे पुरेसे मानावे. (दर्शनी पान टाळून थेट आतील पाने उघडण्यावर तांत्रिक बंदी शक्य आहे.)
हा उपाय चालण्यासारखा आहे. फेसबुक अश्या प्रकारचा डिसक्लेमर (या संस्थळावर द्वेषमूलक लिखाण सापडण्याची शक्यता आहे-असा) आपल्या मुख्यपृष्ठावर टाकेल काय?
तरीही यात द्वेष पसरवण्याच्या मुद्द्याचे निराकरण झाले नाही. उदा अमूक ठिकाणी तमूक समाजाच्या पाच जणांना जिवंत जाळले अशी (खरी अथवा खोटी) पोस्ट कोलावरी डी सारखी शेअरच्या बटणावर क्लिक करून पसरली तर काय होईल याचा विचार करायला नको का? तशी पोस्ट खरी असली तरी पसरू नये असे वाटत नाही का?
संरक्षण मृदू भावनावाल्या प्रौढांचे करायचे नाहीये ते मृदू भावनावाले नंतर काय करतील त्यापासून इतरांचे संरक्षण करायचे आहे.
[नुसते शेअरचे बटण काढून टाकून लोकांना निदान चोप्य् पस्ते करावे लागेल इतके केले तरी बराच प्रॉब्लेम कमी होईल].
नितिन थत्ते
बेहेत्तर
द्वेषमूलक विधानांवर तर बंदीच आवश्यक आहे. परंतु, सत्य/वर्क ऑफ फिक्शनने भावना दुखावण्याची शक्यता टाळण्याची दुनियादारी (जवाबदारी नव्हे) करण्यासाठीही "भावना दुखावण्याची संधी आहे, खासगी संस्थळ आहे, अन्यथा चपला घाला" असा डिस्क्लेमर पुरेसा ठरावा. हाच डिस्क्लेमर बालकांच्या संरक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, परंतु तीही दुनियादारी ठरावी, त्याचीही सक्ती नसावी. बालकांचे संरक्षण पालकांनी करावे.
मुळीच नाही. ती सत्य असेल (आणि सूडाची चिथावणी नसेल, अगदी सूचक विधानही नसेल) तर पसरू द्यावी. ती वाचून कोणी गुन्हा केल्यास त्या व्यक्तीला शिक्षा होईलच/व्हावीच.
असहमत पण टाळ्या....
संरक्षण मृदू भावनावाल्या प्रौढांचे करायचे नाहीये ते मृदू भावनावाले नंतर काय करतील त्यापासून इतरांचे संरक्षण करायचे आहे.
ह्या वाक्याला बसल्या जागेवरूनच जोरदार टाळ्या दिल्या.
बाकी कुणाशीच पूर्ण सहमत नाही, मोकळा होताच अधिक टंकेन
--मनोबा
सहमत आहे
याच्याशी आणि उर्वरित प्रतिसादाशी सहमत आहे.
---------
भावना दुखावण्याची मक्तेदारी विशिष्ट गटाची आहे याच्याशी असहमत आहे. (हे स्वतंत्र वाक्य आहे. निजोच्या प्रतिसादाशी संबंधित नाही.)
उद्देश
असहमत, मागे ह्यावर चर्चा झाली आहेच तरीही - स्वातंत्र्यासाठी गुलामाने केलेले कोणतेही वर्तन योग्यच ठरेल, असत्य लेखनाचा उद्देश तुम्हाला अपेक्षित सत्याच्या लेखनाएवढाच ग्रेट असल्यास ते योग्यच असेल.
बाकी बर्यापैकी सहमत.
अग्रलेख
सुदैवाने सारासार विचार करणारी भुमिका प्रिंट मिडीयाने तरी घेतलेली दिसते. बेछुट बेलगाम संकेतस्थळांवर व त्यांच्या अभिव्यक्ती स्वांतंत्र्याच्या आडून स्वैराचार करणार्या (मुर्खांवरही) कायद्याचा वचक हवाच अश्या अर्थाचा अग्रलेख म.टा. मधे वाचला
यासंबंधी एक चांगला अग्रलेख लोकसत्तमधेही आज आला आहे
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
पुन्हा एकदा बकवास
पुन्हा एकदा बकवास. अग्रलेख कशाला? मटा आणि लोकसत्ताने म्हटले म्हणून तुमचा सूर्य पश्चिमेला उगवणार आहे का उद्या? हॅव करेज ऑफ़ कनविक्शन्ज़. आणि हे वाक्य आणि सही आधी नव्हती. मधल्या काळात तोल गेलेला दिसतो. असो. मी तुमच्या मतांनाच बकवास म्हटले आहे. तुम्हाला नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
म टा
अश्लिल संकेतस्थळांवरील कारवाईबाबत मटाने विचार व्यक्त केलेले पाहून (व्यक्त केलेले विचार पाहून नव्हे) अंमळ हसू आले.
||वाछितो विजयी होईबा||
प्रतिसाद
लेख आवडला, पटला.
धम्मक, निखिल जोशी, तुषार यांच्या भूमिकेशी सहमत आहे.
सोशल नेटवर्किंग साईट्सचे सध्याचे स्वरूप आभासी (पण अजस्र) कट्ट्यासारखे/चावडीसारखे आहे. चावडीवर बसून कोण काय कुचाळक्या करतो, याची प्रत्यक्ष जबाबदारी कट्टा बनवणार्यावर टाकणे योग्य वाटत नाही. विशेषतः अशा वेळी, जेव्हा कट्टा-सेवा पुरवणार्याचे त्यावर काही नियंत्रण अथवा प्रोत्साहन नसल्याचे आपल्याला ठाऊक आहे.
(फेसबुकचा सध्या आपल्याकडे जोर असल्यामुळे बहुधा हे जास्त नजरेत येत असावे. एके काळी ऑर्कुट जोरात होते, तेव्हा त्यावर आक्षेप येत असत. आताही ऑर्कुटवर शेकड्याने 'हेट कम्युनिट्या' आहेत, ज्यावर बराच प्रक्षोभक मजकूरही सहज ऍक्सेसिबल असतो. पण त्यांची हल्ली कोणी फारशी दखल घेत नाही असे दिसते.)
सोपा आणि पिपाची चर्चा
सोपा आणि पिपाची चर्चा इथेच करायची का?
अरेरे! अजून तीन-चार तासांनी काय आणि कसं होणार आमचं? वार्याला गवसणी घालायची तर घाला बुवा पण आमच्या विकीला नक्को.
सोपा आणि पिपा
सोपा Stop Online Piracy Act, पिपा Protect IP Act.
अमेरिकेतहि अशा प्रकारच्या कायद्यांची काही जणांना आवश्यकता वाटत आहे. त्याचे motivation थोडे वेगळे, म्हणजे anti-piracy pro-copyright असे आहे. पण त्यालाहि भरपूर विरोध आहे आणि ती लढाई लढण्यात सरकारलाच फारसे स्वारस्य आहे असे जाणवत नाही. ह्याबाबत आजच्याच वृत्तपत्रातील हा लेख वाचा.