खेळगीत

"औडक चौडक दामाडू... दामाडूचे पंचाडू..." असे गाणे असलेला एक जुना खेळ आहे. तो कसा खेळतात, हे कुणाला माहीत आहे का? मला काही कामासाठी तो संदर्भ तातडीने हवा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मूळ कानडी?

मूळ कानडी व्यक्तींना विचारल्यास जास्त सोपे पडेल असे वाटते.(दामाडु वरून हे गाणे कदाचित तेलुगूही असेल असे वाटते.)
संदर्भः साने गुरुजी.http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=422&Itemid=612&limitstart=119 येथून साभार---

“विश्वास, अरे खरोखरच तो कानडी शब्द आहे. तुमच्या मराठींत किती तरी भाज्यांचीं नांवं कानडी आहेत. आम्हीं कानडी लोकांनीं तुम्हांला खाण्याची संस्कृति दिली. आम्हीं भाज्यापाले दिले. तुमची भाषा समृध्द केली.”

“आणखी काय दिलंत ?”

“आम्हीं तुम्हांला खेळ दिले. लहान मुलांचीं गाणीं दिलीं. एडिक बेडिक दामाडू व आटक माटक चन्ने चाटक हीं गाणीं व हे खेळ आमचेच. दिवा लावून मुलाला तीट लावतांना अडगुळं मडगुळं गाणं महाराष्ट्रीय माता म्हणतात तें कानडीच.”

***

अडगुलं मडगुलं

अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट लावू कपाळा ||

हे गाणे कानडी नसून याचे मूळ तामीळ आहे असे विश्वनाथ खैरे म्हणतात.
त्यांच्या मते, अटकु म्हणजे गहाण ठेवायची वस्तू. मट्कुलम् म्हणजे मातीचे(मण) भांडे(कलम्), मडक्कु म्ह्॰ मातीची मोठी थाळी. सोन्याचे(तामीळमध्ये सोन्नम्), कडगुलं(तामीळमध्ये कडगम्=कडे) . रुपे(तामीळमध्ये इरुप्पु=शिल्लक रोकड, त्यावरून किंवा संस्कृत रूप्य वरून मराठी रुपे झाला), वाळा(तामीळमध्ये वाळम्=गोल किंवा वर्तुळ, संस्कृत वलय), तीट(तामीळ ती म्हणजे आग, तीत्तल् म्ह्॰ करपवणे, तीट्टुतल् म्ह॰ अंगाला लावणे, तीतु म्ह॰ दुष्टावा) वगैरे. त्यावरून मराठीत तीट हा शब्द आला.
गाण्याचा अर्थ असा: लोककथेतला पाजवा उंदीर फडके देऊन मडके घेतो त्या धर्तीवर, मातीचे मडके गहाण ठेवून सोन्याचे कडे आणि रुप्याचा वाळा घेतला. आता हे दागिने घातलेल्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून कपाळाला तीट लावू या.---वाचक्नवी

आड गोल माड गोल

हे गीत मराठीच आहे असे सरोजिनी बाबर म्हणतात. (संदर्भ हाताशी नाही). त्यांच्या मते हे 'आड गोल माड गोल सोन्याचं कडं गोल...' असं आहे.

पारधी

"औडक चौडक दामाडू"

असा उल्लेख असलेले एक लोकगीत सदृश्य गाणे पारधी जमातीतील आजोबा आपल्या नातवाला खेळवताना/झोपवताना मी ऐकल्याचे स्मरते. कोल्हापूरनजीकच्या कदमवाडी माळावर दिवाळीच्या आगेमागे त्यांच्या वार्षिक वस्ती पडते. तिथे एका मित्राबरोबर [जो स्क्रॅप ट्रेडिंगमध्ये आहे] त्या वस्तीप्रमुखाकडे माल खरेदीच्या निमित्ताने गेलो होतो (पारध्यांच्या बायका असा माल जमवितात). त्यांचे व्यवहाराचे बोलणे चालू असताना मी इकडेतिकडे तिथे फिरताना वरील शब्द असलेले ते गोंजारणे कानी पडले. तरीही 'औडक' असेच असेल की "औडकं" याबद्दल [आत्ता] संभ्रमात आहे. मात्र 'दामाडूचे पंचाडू' ऐकल्याचे स्मरत नाही.

आता तुमच्या येथील विचारणीवरून समजते की ते अंगाई गीत नसून एक छोट्यांच्या खेळाचा प्रकार असू शकेल.

अशोक पाटील

हा खेळ नसावा.

एका वर्तुळात मुले उभी राहून कुणावर राज्य आणायचे हे ठरविण्यासाठी जे विविध अर्थहीन शब्द बोलतात, त्यांतला हा एक असावा, असे वाटते. एकेका मुलाकडे बोट दाखवतदाखवत, औडक चौडक दामाडू म्हणत पुढच्या पुढच्या मुलाकडे बोट दाखवत रहाणे, आणि त्या तथाकथित गाण्याची ओळ ज्या मुलापाशी संपेल त्याच्यावर राज्य आले असे समजले जाणे, असा हा प्रकार असावा. अशीच इतर गाणी...
अक्कड बक्कड बंबे बो
अस्सी नब्बे पुरे सौ
सौ से निकला धागा
चोर निकलके भागा
राजा की बेटी ऐसी थी
रोज मार खाती थी
इस के लिये आलू बटाटा
धूssम....,

अडम तडम तड्तड बाजा,
हुक्का तिक्का लेस मास
करवम् डाळिम् अळ्ळम् फुल् वगैरे.... वाचक्नवी

आणखी एक

अक्कड बक्कड बंबे बो

आणखी एक

आदापादा
किसने पादा
दामाजी के
घोडेने पादा
ठामठूस
ठैंय्य़ाठूस
कारे बामना
पादला तूच

बामनाला टार्गेट केले आहे हे जरा उशिराच कळाले.;)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एक पाठभेद

माझे सवंगडी व मी "आदा पादा \ कौन पादा \ दामाजीका \ घोडा पादा" म्हणत असू. हा पाठभेद लयीत म्हणायला अधिक सोपा जातो. (शिवाय "कारे ब्राम्ह्णा")

(जुनी आठवण : आमच्या कुटुंबातील काही वृद्ध स्त्रिया मुलग्यांची कानउघडणी करताना "अरे ब्राम्हणा! ..." अशी सुरुवात करीत असत. त्या काळातल्या माझ्या कुटुंबातील सर्वच मुलगे वंशपरंपरागत-जातीने ब्राम्हण होते, असे आठवते. कदाचित पूर्वीच्या काळी आपापसात बोलतानाही जातीचा उल्लेख करणे सामान्य असावे.)

नक्कीच

कदाचित पूर्वीच्या काळी आपापसात बोलतानाही जातीचा उल्लेख करणे सामान्य असावे
नक्कीच. माझे सगळेच सवंगडी ब्राह्मण नव्हते. 'अरे ब्राह्मणा' असा उच्चार कुणी फारसा करत नसे.

आणखी एक निरर्थक खेळ(?)गीत आठवले.

आंड्या पांड्या
दुकानमांड्या
दुकानाची किल्ली हारपली
पांड्याच्या बायकोनं झोडपली
पांड्याच्या बायकोनं केला भात
पांड्या म्हणाला मी नाही खात
पांड्याच्या बायकोनं मारली लाथ
पांड्या गेला संडासात

हारपली आणि झोडपली वरून काही गोष्टी लक्षात याव्यात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अपडी-तुपडी

मराठीतल्या अपडी-तुपडी-गुळाची-पापडी (धम्मकलाडूंचा लेख/प्रतिसाद पाहिला की नेहमी डोक्यात येऊन बसते!) सारखंच लहान मुलांच्या पायांवर हात उलटा-सरळ टाकता टाकता म्हणताना हे कानडी खेळगीत म्हणतात. औडक-दामाडू सारखंच वाटतं:

अप्पड तुप्पड तंबे लाडू
भीमाराया भेट्टीग होगी / भीमरावाला भेटू जाऊन
हिट्टु तंदु कडुबू माडी / कणीक आणून, कडबू करून
ना तिंदे, नी तिंदे / मी खाल्ले, तू खाल्ले
सीता रामा कई तगी काल तगी! (३) / सीता राम हात काढ, पाय काढ!
(काल तगी म्हटले की मूल पाय मागे घेतं)

*********
धागे दोरे
*********

औडक चौडक

औडक चौडक दामाडू हे गाणे मी माझ्या आजी आणि आईकडून लहानपणी ऐकले होते. माझ्या आईच्या आठवणीनुसार हे गाणे असे आहे -

औडक चौडक दामाडू
दामाडूचा पंचाडू
पंचाड खोड खाशी
हिरवा दाणा कुडकुडीत
सोनपाणी प्यायली
अन्न्या मन्न्या शेजीबाईचा डावा उजवा हातच कन्न्या

तिच्या आठवणीनुसार पालथ्या हातांवर बोटाने अटक-मटक खेळतो त्याप्रमाणे हा खेळतात. कन्या शब्द ज्या हातावर येईल तो हात खेळातून बाद. मग उरलेल्या हातांवर पुन्हा हा खेळ खेळायचा.

____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

संदर्भ मिळाला...

अरुंधती जोशी या मैत्रिणीने कळवले आहे : मी आईला विचारलं. तिने सांगितलं ते असं
गोल करून बसायचं.. एकाने गाणे सुरु करायचं... त्याच्या दोन्ही बाजुच्यानी पालथे हात करायचे आणि हे गाणे म्हणणार्याने त्यांच्या हातावर चिमटी घेतल्यासारखे करून ठेवायचे एकेका हाताने आणि हे गाणे म्हणायचे. ते संपले कि उजवीकडच्या मुलाने उठून जायचे . मग पुन्हा तसेच करायचे म्हणजे उठून गेलेल्याच्या उजवीकडच्या मुलाच्या पालथ्या हातावर चिमटी घेऊन गाणे म्हणायचे . असे करत करत सगळे उठले कि खेळ झाला. हा खेळ अगदी लहान मुलांसाठी इतर खेळ खेळण्याचं आधी "वार्म अप ". मग नन्तर या शिल्लक ( म्हणजे खेळ सुरु करणाऱ्या) मुलाने राज्य घेऊन इतर रुमाल टाकी सारखे खेळ खेळायचे.....
ते गाणं असं आहे...
औन्डक चौंडक दामाडू, दामादूचा पंजाडू
पंजाद खाट खोटला
हिरवा दाणा कुडकुडीत
राजस घोडी व्यायली
सोंड पाणी प्यायली
करवंद जाळी हलली फुलली
हुक्का टिक्का रेस मास..... जा...

:)

हा खेळ अटम मटकसारखा आहे की!
अटम मटक चवळी चटक
चवळी झाली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
जिभेचा फोड फुटेना
घरचा पाव्हणा उठेना
जिभेचा फोड फुटला
घरचा पाव्हणा उ-ठ-ला

:)
मजा आली धागा वाचुन

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

 
^ वर