गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स

गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते. ज्या गोष्टी भयोत्पादक आहेत, मग त्या पारलौकिक, अतींद्रिय, परग्रहसंबंधित असोत की मानवी, त्यांना भयकथेमध्ये स्थान दिले जाते. कथेची मांडणीही अशी असते, की त्यातून भयाचीच निर्मिती व्हावी. जगभरच्या वाङमयात अशा उत्तम भयकथा पुष्कळ आहेत, त्यांच्यावर अनेक ग्राफिक नॉव्हेल्स, चित्रपट वगैरेही आलेले आहेत. आपल्याकडे नारायण धारपांनी 'चंद्राची सावली' सारख्या अनेक उत्कृष्ट दीर्घ भयकथा लिहिल्या आहेत.

गूढकथेमध्ये, कधीतरी, अनपेक्षित म्हणून गूढ असलेल्या भीतीचा वापर अवश्य केला जातो; पण तिच्यात अशा इतर अनेक तत्त्वांचा समावेश होतो, जी अनोळखी, नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळी असल्यामुळे अर्तक्य आणि गूढ असतात. उदाहरणार्त्य, मंत्रचळेपणा. कुलूप पक्के लावलेले आहे, हे माहित असताही परत परत ओढून पाहणे, एक जिना उरतल्यावरही परत वर जाऊन पाहण्याचे कष्ट घेणे, हे नेहमीच्या सवयींपैकी दिसणारे आहे. माणूस असे का वागतो? - उत्तर नाही. ते गूढ आहे; पण ते भयप्रद नाही. जे समजण्याच्या पलीकडे आहे, अर्तक्य आहे, ते सार गूढ आहे. नेहमीच्या पाहण्यातले नाही, त्याची कदाचित भीती वाटू शकेलः पण ते मूलतः भीतिदायक नाही, ते गूढ आहे. ते वास्तव असू शकते. तरीही नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ते वेगळे वाटते, अनाकलनीय वाटते, गूढ वाटते.

- रत्नाकर मतकरी.
प्रस्तावना - अंतर्बाह्य.

रत्नाकर मतकरींनी मांडलेले मत; गूढकथा आणि भयकथेतील फरक वाचकांना सहज कळून येत नाही याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. बर्‍याच वेळा वाचकांना "ही भयकथा नाही, ही गूढकथा आहे." असे स्पष्टपणे सांगावे लागते. त्यानंतरच वाचक त्याकडे गूढकथा म्हणून पाहतात.परंतु तरीही, गूढकथेचा बाज त्यांना कळतो का याविषयी शंका वाटते. वरील परिच्छेदावरून गूढकथा आणि भयकथेतील फरक समजण्यास वाचकांना मदत होईल अशी अपेक्षा करते आणि गूढकथेच्या आणखी एका उदाहरणासाठी माझ्या एका आवडत्या चित्रपटाची ओळख येथे करून देते.

काळ आहे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळचा. युद्ध जवळ जवळ संपल्यात जमा आहे. ग्रेस स्टेवर्ट या स्त्रीचा नवरा फ्रान्समध्ये लढाईवर होता पण तो अद्याप परतलेला नाही. ग्रेस आणि तिची दोन लहान मुले, ऍनी आणि निकोलस हे एका मोठ्या इस्टेटीवर बांधलेल्या प्रचंड हवेलीत राहतात. ग्रेस अतिशय पापभिरू बाई आहे आणि मुलांनीही तसेच असावे यावर तिचा भर आहे. ऍनी हट्टी आहे. तिचं आणि ग्रेसचं पटत नाही. ग्रेस तिच्यावर कडक बंधने घालून शिस्त लावायचा प्रयत्न करते. निकोलस त्या मानाने खूपच बुजरा आहे. आठवड्याभरापूर्वी मायलेकीत काहीतरी झालं आहे आणि त्यावरून ऍनी ग्रेसवर नाराज आहे. ग्रेसच्या दोन्ही मुलांची कातडी प्रकाश संवेदनशील आहे त्यामुळे सूर्यप्रकाशापासून त्यांना दूर ठेवण्याची धडपड ग्रेस करते. घरातील पडदे सतत ओढलेले असतात आणि मंद दिवे किंवा मेणबत्तीच्या प्रकाशातच घरातले व्यवहार चालतात. ग्रेसला नवीन नोकर हवे आहेत कारण तिचे जुने नोकर नुकतेच काही कारणास्तव नोकरी सोडून गेलेले आहेत.

तिने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीवरून एके दिवशी तीन नोकर तिच्या दाराशी येतात. त्यांत मि.टटल हा म्हातारा माळी, मिसेस मिल्स ही मध्यमवयीन स्त्री, आणि एक मुकी तरुण मुलगी; लिडिया आहे. ग्रेस त्यांना आपल्या मुलांच्या परिस्थितीची ओळख करून देते आणि मुलांना प्रकाशापासून दूर राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्याची कल्पना देते. ग्रेसला नोकर आणि नोकरांना नोकरी पसंत असते.

चित्र विकिपीडियावरून साभार.

परंतु एके दिवशी ग्रेसच्या लक्षात येते की तिने वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात छापून आलेलीच नाही. ती मिसेस मिल्सकडे विचारणा करते. त्यावर मिसेस मिल्स सांगतात की ग्रेस या घरात राहायला येण्यापूर्वी जुन्या मालकांकडे ते तिघे नोकर कामाला होते पण नंतर नोकरी गेली. तरीही या घरात आणि इस्टेटीवर काम करणे त्यांना आवडत असे. एके दिवशी सहज नोकरी शोधायला म्हणून स्वतःहून त्यांनी येथे येऊन पाहिलं तर नोकरी मिळून गेली. जाहीरातीबद्दल फार उहापोह न झाल्याने त्यांनीही फार भर दिला नाही.

हळूहळू ग्रेसला घरात काहीतरी विचित्र अनुभव येऊ लागतात. ऍनी येऊन तक्रार करते की तिच्या खोलीत तिला व्हिक्टर नावाचा एक मुलगा दिसतो. तिला घरात इतर माणसेही कधीतरी दिसतात पण व्हिक्टर अधिक वेळा दिसतो. घरात कोणीतरी बोलते आहे, कुजबुजते आहे असे भास होतात. कधीतरी काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज येतो. ग्रेसला वाटते की ऍनी तिच्यावर रागावलेली असल्याने खोटे बोलते आहे आणि ऍनीला आणखी कडक शिक्षा होते. परंतु, मिसेस मिल्स ऍनीवर विश्वास ठेवतात आणि एक दिवस तुझ्या आईलाही या प्रकारांची प्रचिती येईल असे सांगून ऍनीची समजूत काढतात. हवेलीच्या आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स आहेत. मि. टटल त्यावर वाळकी पाने टाकून त्यांना लपवायचा प्रयत्न करतात.

एके दिवशी ग्रेसला खरेच घरात काहीतरी वावगे दिसते. त्या प्रकाराने त्रस्त होऊन ग्रेस घराला ब्लेस करून घ्यायचे ठरवते आणि प्रीस्टच्या शोधासाठी घराबाहेर पडते. मिसेस मिल्स ग्रेसला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती जुमानत नाही. वाटेत धुकं पडलं आहे. ग्रेसला त्यातून वाट काढताना नाकी नऊ येतात पण त्याच धुक्यातून तिच्यासमोर अचानक तिचा नवरा, चार्ल्स, उभा ठाकतो. ग्रेस आनंदाने नवर्‍याला घरी घेऊन येते पण तिच्या लक्षात येते की तिचा नवरा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो अबोल झाला आहे ,अतिशय थकलेलाही आहे. त्याचा भ्रमनिरास झाला असावा. "बहुधा तो कोठे आहे हे देखील त्याला माहित नसावे"असे त्याच्याकडे पाहून मिसेस मिल्स म्हणतात.

घरातील विचित्र घटना सुरूच राहतात. ऍनी ग्रेसला व्हिक्टर आणि त्याच्या आईवडिलांचे चित्र काढून दाखवते. चित्रात त्यांच्यासोबत एक आंधळी म्हातारीही दिसते. ते चित्र पाहून ग्रेस चकित होते आणि घरात काही सापडते का हे पाहण्यासाठी घराची तपासणी सुरू करते. तशात तिला मृत्यूसमयी काढलेल्या फोटोंचा एक अल्बम दिसतो. त्यातले काही फोटो गहाळ आहेत.

एके दिवशी ग्रेस आणि ऍनी, ऍनीचा एक ड्रेस शिवत बसलेल्या असतात. काही कारणास्तव ग्रेसला खोलीबाहेर जावे लागते. ती परतते तेव्हा ऍनी तो जवळपास पूर्ण झालेला ड्रेस घालून जमिनीवर बसलेली असते पण ती ऍनी नसते. त्या ड्रेसमध्ये ती आंधळी म्हातारी असते. ग्रेसचा थरकाप उडतो आणि संतापही अनावर होतो. ती त्या मुलीला पकडून बदडून काढते. या झटापटीत ड्रेस फाटतो आणि ग्रेसच्या लक्षात येतो की तिला झाला तो भास होता. प्रत्यक्षात ती ऍनीलाच मारते आहे.

ग्रेस नवर्‍याच्या खोलीत जाते. तो शांतपणे तिला सांगतो की आठवड्याभरापूर्वी तू काय केलेस हे ऍनीने मला सांगितले आहे. हे ऐकल्यावर ग्रेस ढेपाळते आणि आपली चूक नव्हती, भावनेच्या भरात कृत्य झाले असे सांगण्याचा प्रयत्न करते. लवकरच ग्रेसचा नवरा घरातून निघून जातो. ग्रेस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो बधत नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी घरातले सर्व पडदे गायब होतात आणि घर प्रकाशाने भरून जाते. ग्रेसची मुलं घाबरून आरडाओरडा करतात. ग्रेस संतापाने वेडीपिशी होते. तिला हे नोकरांचे कारस्थान वाटते. ती त्यांच्यावर बंदूक रोखते. ग्रेसचा हा अवतार पाहून मुले भेदरतात. त्या रात्री ती घरातून पळून जाऊन वडलांचा शोध घेण्याचा बेत आखतात आणि खिडकीतून खाली उरतरात. रागाने वेडीपिशी झालेली ग्रेस घरभर पडदे शोधते आहे. ती पडदे शोधायला नोकरांच्या खोलीत जाते आणि तेथे तिला एक पाकिट सापडते. त्या पाकिटात मृत्यूसमयी मृत शरीरांचे काढलेले तीन फोटो मिळतात. १८९१ साली वारलेल्या माळी, मिसेस मिल्स आणि लिडियाचे.

एव्हाना घराबाहेर पडलेल्या ऍनीला आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स दिसतात. घरातल्या तीनही नोकरांचे. ऍनीला रहस्याचा उलगडा होतो आणि तेव्हाच मि.टटल, मिसेस मिल्स आणि लिडिया मुलांच्या दिशेने येताना दिसतात. ऍनी आणि निकोलस जीव घेऊन घराच्या दिशेने धावत सुटतात आणि....

त्या हवेलीत नेमकं रहस्य काय असतं? ते तिघे मृत नोकर ग्रेस आणि मुलांपर्यंत पोहोचतात का? व्हिक्टर त्याचे आईवडिल आणि त्या आंधळ्या म्हातारीचं काय रहस्य असतं? ग्रेसचा नवरा कुठे नाहीसा झालेला असतो या अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट वाचकांनी अवश्य पाहावा.

२००१ साली प्रदर्शित झालेल्या "द अदर्स" चित्रपटात निकोल किडमनची प्रमुख भूमिका आहे आणि तिने ती अतिशय ताकदीने पेलली आहे. राग, भीती, कुतूहल या सर्व भावना निकोल आपल्या डोळ्यांतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त करते. चित्रपट पाहताना कोठेही किळस, ओंगळवाणे काहीतरी पाहिल्याचा प्रत्यय येत नाही. फारशी भीतीही वाटत नाही. किंबहुना, दचकवणारा एकमात्र प्रसंग ड्रेसमध्ये ग्रेसला ऍनीऐवजी म्हातारी दिसते तो असावा. तरीही, समोर जे सुरु आहे ते कुतूहल जागवते. प्रेक्षकांना बांधून ठेवते.

वातावरण निर्मिती, सशक्त रहस्य आणि कलाटणी हे गूढकथेचे मुख्य भाग असायला हवेत. या तीनही विभागांत हा चित्रपट सरस वाटतो. प्रचंड मोठी धुक्यात वेढलेली इस्टेट, प्रकाशाची ऍलर्जी असणारी मुले आणि त्यांची विशेष काळजी घेणारी ग्रेस, अचानक उपटलेले तीन नोकर, घरात वेळी अवेळी दिसणार्‍या व्यक्ती, ग्रेसच्या नवर्‍याचे येणे आणि जाणे आणि अर्थातच कथेला मिळणारी शेवटची कलाटणी.

हा चित्रपट सुमारे १० वर्षांपूर्वीचा असल्याने अनेकांनी पाहिला असावा. चित्रपटाविषयी त्यांचे विचार ऐकायला आवडतील. भय हा मुद्दा गूढकथेमध्ये मुख्य नसतो पण तो हळूच शिरकाव करतो. या चित्रपटातही रहस्याचा पत्ता शेवटपर्यंत प्रेक्षकांना न लागू देण्यात पटकथा यशस्वी ठरते. द अदर्स या चित्रपटावर काही तद्दन टुकार हिंदी चित्रपटही आले आहेत. तरीही, गूढकथेचा अस्सल आणि परिपूर्ण नमुना म्हणून "द अदर्स"चे नाव घेता यावे. या चित्रपटाची शिफारस मी आतापर्यंत अनेकांना केली आहे आणि त्या सर्वांना हा चित्रपट आवडला आहे हे विशेष.

Comments

गुढ!

कथा चांगलीच गुढ दिसतेय. प्रसंगी भयप्रदही
भयकथा हा गुढकथांचा सबसेट समजावा का त्याचं असं खास वेगळं अस्तित्त्व आहे?

बाकी प्रस्तुत लेखिकेने गुढ/भय कथांवर लिहावं हे त्यांच्या आंतरजालीय प्रतिमेला साजेसं आहे आणि लेखन शोभेसंही! :)

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

सबसेट

भयकथा हा गुढकथांचा सबसेट समजावा का त्याचं असं खास वेगळं अस्तित्त्व आहे?

सबसेट समजायलाच हवे असे नाही; पण काढायचाच झाला तर भयकथेचा गूढकथा हा सबसेट किंवा गूढकथेचा भयकथा हा सबसेट काढणं शक्य आहे. तेवढी सरमिसळ दोन्ही कथाप्रकारांत होऊ शकते. भयकथेसाठी गूढाची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी एक सिरिअल किलर काही लोकांना ओलिस ठेवतो आणि मग त्यांना एकेक करून त्यांचे हाल करून मारतो. हे केवळ भय झालं त्यात कोणतंही गूढ असण्याची आवश्यकता नाही. तेथे सशक्त कथानक असणंही आवश्यक नाही. माणूस काय कशालाही घाबरतो. परंतु, रोजच्या आयुष्यातील काही घटना आपल्याला दचकवून जातात. उदा. डरना मना है या चित्रपटात सफरचंदांवर एक उत्तम गूढकथा होती. तसेच, द साइन्स या शामलनच्या चित्रपटाचे कथानक सशक्त नाही पण गूढ आणि भयकथा सोबत घेऊन बनवलेला सिक्स्थ सेन्स प्रभावी वाटतो.

बघायला हवा...

चित्रपट पहायला हवा असे वाटते.
--मनोबा

मस्त

चित्रपट छान, निकोल अविस्मरणीय, तुमचे परिक्षण देखिल छान.

तेव्हाच मि.टटल, मिसेस मिल्स आणि लिडिया मुलांच्या दिशेने येताना दिसतात. ऍनी आणि निकोलस जीव घेऊन घराच्या दिशेने धावत सुटतात

हा प्रसंग पडद्यावर पहाताना लोक धक्क्याने घाबरल्याचे सांगतात, मला बहुदा रहस्य कळल्यामुळे तेवढा धक्का बसला नाही, विषयाची अशी हताळणी "सिक्स्थ सेन्स" किंवा "शटर-आयलंडमधे" बघावयास मिळाली.

घरात वेळी अवेळी दिसणार्‍या व्यक्ती आणि त्यांचे नंतर उलगडलेले गुढ विलक्षण वाटते.

तरीही, गूढकथेचा अस्सल आणि परिपूर्ण नमुना म्हणून "द अदर्स"चे नाव घेता यावे.

नक्किच.

अदर लोकांनीच असले सिनेमे काढावे असे वाटते.

शटर आयलंड

शटर आयलंड मी पाहिलेला नाही (मला डि'कॅप्रिओ फारसा आवडत नाही. ;-)) पण कथा माहित आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. ती गूढकथा आहे. त्यामानाने सिक्स्थ सेन्स भयप्रद आहे. तेथे वेळोवेळी प्रेक्षकांना भीती दाखवलेली आहे परंतु सशक्त कथा आणि कन्सेप्टच्या बाबतीत तीनही कथानके मिळतीजुळती आहेत.

घरात वेळी अवेळी दिसणार्‍या व्यक्ती आणि त्यांचे नंतर उलगडलेले गुढ विलक्षण वाटते.

मला शेवट पाहेपर्यंत चित्रपट अजिबात खास वाटला नव्हता. पठडीतली गोष्ट सुरू आहे असे वाटत होते पण उलगडा झाल्यावर चित्रपट अतिशय आवडला.

उगाचच टाळलं

बरेच दिवस हा चित्रपट पहाणं उगाचच टाळते आहे असं वाटलं. लवकरात लवकर हा ही चित्रपट पहाते.

छान

चित्रपटांमधे भयपट हा फारसा आवडता प्रकार नाही. तरीही हा चित्रपट बरा वाटला होता. चित्रपट पाहाताना अंगावर सरसरुन काटा आणण्यात दिग्दर्शकाने चांगलेच यश मिळवले आहे. मृत व्यक्तिंचे मृत्यूनंतर कपडे/दागिने वगैरे घालुन काढलेले फोटो वगैरे प्रसंग तर चांगलेच घाबरवणारे होते. चित्रपटाची चांगली माहिती करुन दिली आहे.

सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वैद्य यांच्या:

चित्रपटाची चांगली माहिती करुन दिली आहे.

»
या अभिप्रायाशी सहमत. माहिती करून दिली आहे पण गूढासंबंधीचे औत्सुक्य कायम राखले आहे.हा चित्रपट पाहाण्याची संधी मला मिळण्याची संभवनीयता कमी. पण बघितला तरी अंगावर सरसरून काटा येण्याचा संभव शून्य.दुर्भाग्य असे की अशा चित्रपटात समरस होता येत नाही.हे खोटे आहे असे सारखे वाटत राहाते.त्यामुळे आस्वाद घेताच येत नाही.असो

समरस होणे आणि आस्वाद घेणे

दुर्भाग्य असे की अशा चित्रपटात समरस होता येत नाही.हे खोटे आहे असे सारखे वाटत राहाते.त्यामुळे आस्वाद घेताच येत नाही.

यनावालांना समरस होता येत नाही आणि आस्वाद घेता येत नाही हे पटते. असे अनेकांचे होत असावे आणि ते फक्त गूढकथा वगैरेंसाठीच असेल असे नाही. वय वाढलेल्या लोकांना प्रेमकहाण्याही खोट्या वाटू लागतात. मला स्वतःला साय-फाय चित्रपटांशी समरस होता येत नाही. कै च्या कै असे वाटते. गूढ किंवा भयकथांबद्दलही असे होणे स्वाभाविक आहे.

वैद्य यांनी अंगावरून सरसरून काटा यावा असे कोणत्या प्रसंगाबद्दल म्हटले ते कळत नाही परंतु प्रतिक्रियेचे नवल वाटले नाही. चित्रपटाचा शेवट बघून मला तरी "अरेच्चा!" किंवा "अरे! व्वा!" असे म्हणावेसे वाटले. ही दाद त्या कलाटणीला होती परंतु चित्रपटात रमलेल्या व्यक्तीला रहस्याची जाणीव होणे, संकटाची चाहूल लागणे वगैरे गोष्टी अंगावर काटा आणण्यास पुरेशा आहेत. त्यासाठी त्या वास्तव किंवा अवास्तव असायला हव्यात असे नाही. किंबहुना, वैद्य म्हणतात

मृत व्यक्तिंचे मृत्यूनंतर कपडे/दागिने वगैरे घालुन काढलेले फोटो वगैरे प्रसंग तर चांगलेच घाबरवणारे होते.

हा प्रसंग मला घाबरवणारा वाटला नाही तरी खूप विचित्र वाटला कारण असे काही केले जाते हे त्यावेळी पहिल्यांदा कळले (नावीन्य होते) आणि अनैसर्गिक वाटले. किंबहुना, काहीच दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसमधील एका स्त्रीच्या नातीचा जन्मताच मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या स्टाफने तिच्या मृतदेहाला सजवून जिवंत व्यक्तीप्रमाणे तिचे फोटो काढले. या बाईंनी त्यातील एक फोटो घरात लावला आहे (अगदी दर्शनी लावलेला नाही असे म्हणाल्या) हे मला सांगितल्यावर मला आजही ते विचित्र वाटले.

बाकी राहिला प्रश्न खोटेपणाचा. चित्रपटात काय खोटे नसते? हिरो-हिरॉइन गाणी गातात, मागून ढोल-ताशे-पिपाण्या वाजतात, कोरस जमा होतो हे खोटे आहे, एक हिरो दहाजणांना मारतो हे खोटे आहे, दुष्ट व्यक्तीचे चटकन मतपरिवर्तन होणे खोटे आहे, सुपरमॅन, बॅटमॅन, स्टारट्रेक वगैरे खोटे आहे, लायन किंगमध्ये प्राणी बोलतात हे खोटे आहे, टॉम ऍण्ड जेरीची लुटुपुटुची मारामारी खोटी असते. दुष्ट शक्तींचा न चुकता होणारा नि:पात खोटा असतो. अगदीच वास्तवावर आधारित चित्रपट सोडला तर इतर अनेक जॉनरमधील चित्रपट खोटे वाटू शकतात. प्रेक्षक विरंगुळ्यासाठी त्याचा तात्पुरता उपयोग करतात इतकेच.

मुख्य मुद्दा माझ्यामते, आपण जे बघतो ते विरंगुळ्यासाठी आणि बघितले ते खोटे होते हे माहित असले की झाले. :-)

भीती वाटते म्हणून असे चित्रपट न पाहणार्‍या व्यक्तींपेक्षा खोटे वाटते म्हणून चित्रपट न पाहणार्‍या व्यक्ती मला अधिक पटतात.

परीचय

परीचय आवडला. चित्रपट पहावा असे वाटते आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

चित्रपट

चित्रपटातील गूढ आधीच माहीत असल्याने पाहताना एवढी मजा आली नाही. मात्र नकट्या नाकाची निकोल किडमन आवडते बॉ.

धन्यवाद!

सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.

@ अदिती, मनोबा आणि सन्जोप राव - शेवट माहित नसेल तर चित्रपट पाहायला नक्की आवडेल. मिळाल्यास बघाच.

@ सदस्य - नकटं नै कै, अपरं. मुमताझसारखं. ;-) कोणत्याही रहस्य/ गूढकथेचा शेवट माहित असेल तर ती वाचायला/ पाहायला मजा येत नाही हे खरंच.

आवडला

ह्या धाग्यामुळे काल चित्रपट पाहिला आणि आवडला. चित्रपट पाह्यचा असल्यामुळे धागा अर्धवट वाचला होता.
आज पुर्ण वाचला.

दचकवणारा एकमात्र प्रसंग ड्रेसमध्ये ग्रेसला ऍनीऐवजी म्हातारी दिसते तो असावा.

घाबरवणारा होता नक्कीच.

वातावरण निर्मिती, सशक्त रहस्य आणि कलाटणी हे गूढकथेचे मुख्य भाग असायला हवेत. या तीनही विभागांत हा चित्रपट सरस वाटतो

नक्कीच. एका चांगल्या चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)

आवडला

धागा वाचून चित्रपट मुद्दाम रेकॉर्ड करून पाहिला. थोडा कंटाळवाणा वाटला पण शेवट छान. उत्कंठावर्धक रीतीने चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
असाच गूढ पण भयकारी नसलेला एक उत्तम चित्रपट 'द शायनिंग' जरूर पहा!

द शायनिंग

उत्कंठावर्धक रीतीने चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

धन्यवाद.

भय/गूढ कथानकांची आवड असल्याने 'द शायनिंग' अर्थातच पाहिलेला आहे. :-) स्टिफन किंगची ही कादंबरी ऑडियो बुकवर ऐकायची आहे पण अद्याप योग आलेला नाही. मागे एकदा पेट सेमेटरी ऐकली होती. त्या कथेला बॅकग्राउंडला ट्रकचा हॉर्न* वाजतो. तो इतक्या शिताफीने आणि गूढरम्य वाजवला आहे की ऐकून शहारा येईल.

* ही कादंबरी वाचली असेल तर हॉर्नची भूमिका लक्षात येईल.

 
^ वर