आंदोलन आणि फलित

काल काही वैयक्तिक कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली.

आज अण्णा हजारे उपोषणस्थळी उपस्थित नव्हते. तुरळक गर्दी होती सुमारे दोन हजार लोकांची. मंचावरून बहुधा मनिष सिसोदिया यांचे भाषण चालू होते. नंतर एका केरळी हेल असलेल्या व्यक्तीचे छोटेसे हिंदी भाषण झाले.

भाषण संपल्यावर मैदानातील मोठ्या प्लाझ्मा स्क्रीनवर राज्यसभेतील कामकाज दाखवण्यास सुरुवात केली.

इतक्यात अण्णांना तपासणार्‍या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीचे बुलेटिन जाहीर केले.

-----------------------------

आंदोलनाचा फियास्को झालेला पाहून काहीसे वाईट वाटले. ज्यांच्यामुळे लोकपाल विधेयक कसे का होईना एकदाचे पास झाले त्यांच्याकडे लोकांनी पूर्णतः पाठ फिरवावी हे काही योग्य नाही. लोक का आले नाहीत याची अनेक कारणे असू शकतील. यात महाराष्ट्रात हजारे यांच्या उपोषणाचे नाविन्य नसण्यापासून, मुंबईतील बलवान पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध असणे, अण्णांच्या आंदोलनातील राजकीय रंग उघड होत जाणे इत्यादि सर्व कारणांचा थोडा थोडा सहभाग असावा. एप्रिल आणि ऑगस्टमधल्या गर्दीचं जेवढ्या जोरकसपणे मीडियाने प्रक्षेपण केलं तितक्याच जोरात मिडिया या फियास्कोचेही करणार.

यात अण्णा टीमच्या जजमेंटची चूक म्हणता येईल. उद्यापर्यंत थांबून लोकपाल बिल पास झाल्यावर आपला पार्शल विजय झाला असे सांगितले असते आणि तो साजरा केला असता तर अधिक चांगले झाले असते. आणि आपण या लोकपालाची शक्ती वाढवण्यासाठी आणखी आंदोलन करू असे ठरवता आले असते. अण्णांना ज्याचे क्रेडिट दिले जाते तो माहिती अधिकाराचा कायदाही एका फटक्यात झालेला नव्हता. (हे मी अण्णा हजारे यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने म्हणत नाही. तर ज्यांना खरोखर सशक्त लोकपाल हवा आहे त्यांच्या मनात निराशा दाटून येण्याची शक्यता आहे. कारण जर सरकारने जंतरमंतर पूर्वी आणलेला तथाकथित जोकपाल आणि काल पारित झालेला कायदा यात -अण्णांच्याच मते- फारसा गुणात्मक फरक नसेल तर वर्षभराच्या आंदोलनाचे फलित काय असा प्रश्न निर्माण होतो).

असो. आंदोलन करणार्‍यांसाठी हा एक धडा म्हणता येईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

कं टा ळ लो

कं टा ळ लो
हा दुवा
--मनोबा

कारण्..

एकतर् सध्या लोक् सुट्टीच्या मूडमध्ये आहेत, शिवाय काल् असे ऐकले, की वांद्र्याहून् आणि कुर्ल्याहून् रिक्शावाल्यांवर् पोलिसांनीच् बंधने घातली होती. शिवाय् 'काही लोक' आधीच् लोकांना सांगत् होते की तिथे आता काही नाहीये. घरी जा.
कविता

मिडियाचे काम

"तितक्याच जोरात मिडिया या फियास्कोचेही करणार."

~ त्याला कारणही (दुर्दैवाने) अण्णाच आहेत.
वाईट एकच, दिग्विजय सिंगसारख्या वाचाळवीरांचे यामुळे चांगलेच फावेल. शिवाय पाच राज्यातील निवडणुकांदरम्यानच्या प्रचारावर "अण्णा मॅजिक" काही परिणाम करू शकेल याची जी शक्यता होती तीही आता धूसर बनली आहे.

असो.

अशोक पाटील

राहिलेले डावपेच आणि कंटाळलेले लोक

वृत्तपत्रातुन पध्दतशिरपणे टीम-अण्णांविरुध्द केलेले मत-परिवर्तन प्रयत्न (ब्रेनवाशिंग), टीम अण्णांची आंदोलन घाई आणि अडमुठेपणा, पहिल्या आंदोलनानंतर राहून गेलेले लोकांच्या मतपरिवर्तनाचे डावपेच,कंटाळलेले लोक ही आणि अशी अनेक कारणे आंदोलन फसण्यासाठी जबाबदार आहेत.

ऑक्युपाय वॉलस्ट्रीट आणि लोकपाल आंदोलन हे तसे फारसे यशस्वी झालेच नाहीत.

पण वाईट वाटले

मुळातच हे आंदोलन बऱ्यापैकी मीडियाने फुगवलेले होते. शेवटी सूज उतरणारच होती. असो. पण ह्या आंदोलनामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे नाकारता येणार नाही. नंतर सरळसरळ राजकीय/काँग्रेसविरोधी झालेले हे आंदोलन कुठल्याही पक्षाचा बॅनरखाली झालेले नव्हते हेही मान्य करायला हवे. असो. अण्णांच्या ह्या आडमुठ्या 'आम्ही म्हणू तो कायदा' आंदोलनाला पाठिंबा नसला तरी शेवटी हा 'डॅम्प स्क्विब' (बोऱ्या वाजलेला) झालेला पाहून वाईट वाटले.

सरकारी कटकारस्थानांमुळे फक्त पाच हजार लोक त्या मैदानात जमू शकले असा स्पिन देण्यात सध्या अनेक अण्णासमर्थक/भाजपासमर्थक/काँग्रेसविरोधक गुंतलेले आहेत. त्या चर्चा अतिशय मनोरंजक.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अति तेथे माती

अण्णांचा आडमुठेपणा, मिडियाने चढवून वाढवून दिलेला भाव, राजकीय पार्टींची सर्कस या सर्वांतून कधीतरी सामान्य जनता वैतागून बाहेर पडणारच होती. एखादे आंदोलन सुरू करायचे आणि ते पूर्णत्वाला न्यायचे यासाठी जी योजनाबद्धता लागते ती टीम अण्णा प्रत्यक्षात आणण्याच्या भानगडीतच पडत नव्हती. "चलो, हमारा साथ दो" असे म्हटले की सामान्य माणूस एकदा आपले कामकाज सोडून साथ देईल. दर महिन्या दोन महिन्यांनी कसा देईल बरे.

अभ्यास कमी पडला

अण्णाची तुलना गांधीजींशी व्हायला लागली होती.आता दोन्ही नेतॄत्वातील फरक लोकांच्या लक्षात आला. अण्णांनी थोडे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.तसे न केल्यास त्यांचा वैचारिक अंत निश्चीत आहे.

तात्पुरता विराम

अण्णा आंदोलनाचा असा शेवट व्हावा हे बघुन वाईट वाटले. मात्र हा तात्पुरता विराम दिसतोय.
कालचा राज्यसभेतील दिग्दर्शित फियास्को मिडीयाने आधीच उघड केल्याने आता काँग्रेसला पुन्हा ब्याकफुट वर जावे लागते आहे असे दिसते.

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

बॅकफूट

सरकार बॅकफूटवर का जात आहे हे कळत नाही. राज्यसभेत सरकारचे बहुमत नाही हे आधीपासून माहिती होते. त्यात ज्या दुरुस्त्या विविध पक्षांकडून मागितल्या जात होत्या त्या अण्णांच्या मागण्यांच्या विरोधात होत्या.

सरकारने खरेतर आक्रमकपणे याचा प्रचार करायला हवा. (परंतु ५ राच्यांच्या निवडणुकींचा संदर्भ असावा).

नितिन थत्ते

पळाले

सरकार का 'पळाले' हेच कळले नाही. हे बॅकफुटचे मोठे कारण. जर फ्लो'र मॅनेजमेंटची खात्री नसेल तर बिल मांडायलाच नको होतं. तृणमुलने आपल्या अमेंडमेंट्स बुधवारीच दिल्या होत्या व भाजप त्यांना सपोर्ट करणार आहे हेही बुधवार संध्याकाळपर्यंत स्पष्ट झालं होतं.

शिवाय त्यांचा मोठा प्रॉब्लेम असा झाला की राजनीती सिंह दंगा करणार आहे हे सीएनेन् आयबीएन् ने आधीच घोषित केले :)

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

लोकपालचा फायदा

अण्णांचे हसे होणार होते हे उघडच होते. जे सर्व काही झाले त्याला राजकारण म्हणावे इतके चांगले उदाहरण आहे. यामध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या. वर अनेकांनी योग्य मुद्दे लिहिले आहेतच. मिडियाचा अतिरेक, लोकपाल म्हणजे दुसरी लढाई इत्यादी जरा अतिरेक होत होता. सर्व राजकिय पक्ष आणि आंदोलक सर्वच गोष्टींचा फायदा घेत होते. सरकारला किंबहुना काँग्रेसला कायदा केल्याचे फक्त क्रेडिट हवे होते हे स्पष्टच दिसत होते. तसेच त्यांना हवे तसे बिल करुन स्वतःला सुरक्षित ठेवायचे होते.

या लोकपालचा आम्हा भारतीयांना एकच फायदा झाला की असे कायदे संसद करते, त्यासाठी आंदोलन केल्यास जनतेचा फायदा होण्याची शक्यता असते आणि उगाचाच अतिरेक केल्यास राजकारणी नेहमी प्रमाणे स्वतःचा फायदा करुन घेतात हे मोठ्या प्रमाणावर कळले.


जनाधार व आंदोलने.

जे झाले ते चांगले की वाईट याचा निर्णय शेवटी काळच देणार आहे.

प्रत्येक माणूस भ्रष्टाचाराविरोधी बोलतो, अन् भ्रष्टाचार करतो. हेही या देशी सत्यच आहे. फक्त प्रत्येकवेळी 'त्यांनी' केला तो भ्रष्टाचार अन् माझा तो नाईलाज हे म्हणून स्वतःची समजूत करून घेण्यात आपण बहुधा सफल होतो. व्यक्तिगत नैतिकता उंचावत नाही तोवर या भ्रष्टाचारापासून मुक्ती नाही हे सत्य आहे.

परंतु आजकाल इन्स्टंट फूड् अन् स्पूनफेड अभ्यास करणार्‍या पिढीस एकंदरीतच कुणीतरी आयते 'सोल्युशन' देणारा मसिहा हवा आहे. या लोकपाल बिलाच्या सुरुवातीच्या काळात तेच झाले. मसिहा आला आहे असे वाटले. (असे मसिहे/अवतार शोधणे, किंवा त्यांची अपेक्षा करणे हा या देशाला मिळालेला शाप आहे असे वाटते. सगळेच या विचारात असतात की कुणी अवतार घेईल अन माझी पीडा हरण करील.)

आंदोलन खरे यशस्वी करायचे असेल, तर चांगला 'कार्यक्रम' सोबत घेऊन 'ग्रासरूट लेव्हल' ला काम करणे गरजेचे आहे. हे संघटना बांधणे, व ती वाढवत नेऊन मग काही करणे हे आजकाल कुणी करताना दिसत नाही अन् म्हणून अशी आंदोलने फसताना दिसत आहेत.

'टीम'च्या वागणूकीबद्दल, त्यातील व्यक्तिंच्या चारित्र्य/निस्पृहतेबद्दल कितीही मतभेद असले तरी शेवटी त्यांचेही विचार व्यक्तींचे प्रबोधन गरजेचे इथेच येऊन थांबले आहेत हे लक्षात घेण्याजोगे आहे.

 
^ वर