तर्कक्रीडा २०:पुन्हा शब्दिक

मागे एकदा शब्दिक प्रश्न दिले होते. (तर्क.१२) .त्यात शोधसूत्रे गद्य होती. इथे पद्य सूत्रे देण्याचा प्रयत्न केला आहे.कंसातील संख्या शब्दात अक्षरे किती ते दर्शविते.(कृपया उत्तर व्यनि. ने)
...(१) हर हर शंकर वंदन करिता |मिळते फळ ते सांगा आता......(४)
...(२) मना का धरावी अशी ही मनीषा?|......(३)
...(३) मज काका देईल कार्य काय?.............(४)
...(४)मामास ते न गमते जणू आई ठायीं.|......(५)
...(५) सुमन हार हा बदल जरा ग |..............(३)
...(६)नामास धरा|व्रतनेम पुरा| सोहळा करा|.......(५)
...(७)असुरगुरुची आत्मजा या वनी दे.|.........(४)
...(८) जगी तुला कवितेत तुला.|................(४)
...(९) या विना ससा हा सहज कसा?|..........(५)
...(१०)धूर्त होई विपरीत की क्षणाचा.|............(३)
...(११)शत्रू असे मनी ग विपरीत कोण सांग.|....(३)
...........यनावाला

लेखनविषय: दुवे:

Comments

६ व्या प्रश्नाचे

उत्तर गोंधळात टाकते आहे. बघू जमते का...बाकीची आली.

तर्क.२०:शाब्दिक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्यात अकरा शब्द शोधायचे होते. आता पर्यंत पाच उत्तरे आली. त्यानी शोधलेल्या अचूक शब्दांचे प्रमाण पुढील प्रमाणे:

विसूनाना:--११/११
मृदुला:--११/११
प्रियाली:--१०
अमित:--९
ओंकारः:--६
क्र. ६ या सूत्राचे उत्तर'समाराधना' असे आहे. ['नामास धरा' चा समाक्षरी शब्द--अनॅग्रॅम--]काहीनी 'समाराधन' असे लिहिले आहे.वस्तुतः हे दोन शब्द भिन्न आहेत.
...समाराधन (नपु.) :---आनंद देण्याचे साधन.(नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधा एकं समाराधनम्|)
...समाराधना (स्त्री.):--धार्मिक व्रताच्या समाप्तीनंतर करावयाचा सोहळा, त्याप्रीत्यर्थ ब्राह्मणभोजन.(समाराधनेस जाऊ नये|...असे दासबोधात आहे).
....या कोड्याविषयी विसूनाना लिहितात"मजा आली", मृदुला म्हणतात" मला असली शाब्दिक कोडी खूप आवडतात'
सर्वांना धन्यवाद!

तर्क.२०:शाब्दिक

या कोड्याला अपेक्षे पेक्षा कमी प्रतिसाद लाभला. म्हणून कोड्या विषयी आणखी थोडे लिहितो.म्हणजे कदाचित अजून उत्तरे येतील.
***जो शब्द शोधायचा आहे त्यातील सर्व अक्षरे सूत्रात असून ती एकत्र आहेत. कुठेतरी विखुरलेली नाहीत. केवळ त्यांचा क्रम बदलून ती दडवली आहेत.
***प्रत्येक सूत्राचे दोन अर्थ आहेत.एक म्हणजे त्याचा वाच्यार्थ. दुसरा म्हणजे कोणत्या अक्षरांपासून कोणता शब्द शोधायचा तो गूढार्थ.
उदाहरणार्थः मामास ते न गमते जणू आई ठायी याचा वाच्यार्थ " (जे) मामास न गमते .ते जणू
आई ठायी (असते)"
गूढार्थः.."मामास ते न" (हे) "जणू आई ठाई" (या अर्थाचे कसे) गमते?..."मामास ते न " या अक्षरांपासून "मातेसमान" हा "जणू आई ठाई" या अर्थाचा शब्द मिळतो.
......यनावाला.

तर्क.२०: शाब्दिक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शाब्दिक कोड्याची आणखी उत्तरे आली आहेत. ती पुढील प्रमाणे:
मनीमाऊ ......७/११
अभिजित.......७/११
ओंकार .....(अगोदरचे ६+ नवीन ३)= ९/११
राधिका :...........................९/११
अभिनंदन!

तर्कक्रीडा २०:शाब्दिक :उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

**प्रत्येक सूत्रातून एक शब्द शोधावयाचा आहे.
** शब्दात अक्ष्ररे किती ते दिले आहे.
**ती सर्व अक्षरेही तिथे एकत्रित पणे आहेत. केवळ त्यांचा क्रम बदलला आहे.
**शब्दाचा अर्थ सुद्धा तिथे आहेच.
**असे असूनही शब्द सापडत नाही.कारण त्या सूत्राला असलेला स्वतःचा वाच्यार्थ.त्यामुळे दिशाभूल होते.
**उदा..."शत्रू असे मनी ग |विपरीत कोण सांग|" हे वाचल्यावर मनात असलेला विपरीत(वाईट) शत्रू कोण बरे? याचा विचार सुरू होतो.मग षड्रिपू आठवतात. काम,क्रोध,....अशी दिशाभूल झाली म्हणजे तिथे लिहिलेले " मनी ग विपरीत (उलटे) म्ह.'गनीम' हाच शत्रू हे डोळ्यांपुढे असून दिसतच नाही.....सर्व शब्द पुढील प्रमाणे:
१.करवंद
२.कामना
३.कामकाज..(मज काका)
४.मातेसमान..(मामास ते न)
५. गजरा
६. समाराधना..(नामास धरा)
७. देवयानी
८. तुजलागी...(जगी तुला)
९. विना सायास...(या विना ससा)
१०. चाणाक्ष
११. गनीम
........यनावाला.

 
^ वर