प्रतारणा की स्वातंत्र्य?

नुकताच "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू" पाहिला. मूळ कादंबरीही या पूर्वी वाचली होती. चित्रपटाच्याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट बनला आहे याबाबत कोणालाही शंका नाही पण चित्रपटाचा शेवट हा कादंबरीच्या शेवटापेक्षा वेगळा आहे. चित्रपट नवीन असल्याने मी खोलात जात नाही. ४-५०० पानांच्या कादंबरीवरून दोन-अडिच तासांचा चित्रपट बनवायचा झाल्यास काही काटछाट, काही पात्रांना वगळणे, प्रसंगांना वगळणे हे व्ह्यायचेच परंतु मुख्य कथानकाला धक्का देणे का होते? असे झाल्यास कादंबरीवरून तयार केलेला चित्रपट असे का म्हणता येईल? असे करणे मूळ कथानकाशी प्रतारणा मानावे की निर्माता-दिग्दर्शक-पटकथा लेखकाचे स्वातंत्र्य? चित्रपटात बदल करताना मूळ लेखकाची परवानगी इ. घ्यावी लागते का? असे सरळ सरळ कादंबरीवरून बनलेल्या चित्रपटांना ऍडपश्नचे लेबल लावले की काम भागते का? असे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले.

या पूर्वी पाहिलेल्या एंजल्स अँड डिमन्स या कादंबरीवरून बनवलेल्या याच नावाच्या चित्रपटातही मूळ गाभ्यालाच वगळले होते. सहारा या चित्रपटाच्या लेखकाने चित्रपट पाहिल्यावर हे मी लिहिलेले कथानक नाहीच अशी मुलाखत दिली होती.

कादंबरी/ कथेवरून निर्माण केलेल्या चित्रपटांत बदल करण्यासाठी मूळ लेखकाची परवानगी घेणे, त्याला कल्पना देणे आणि यासह प्रेक्षकांनाही कल्पना देणे महत्त्वाचे नसते का? कादंबरी वाचून प्रेक्षक अपेक्षेने चित्रपट पाहण्यास जातो त्याचा अशा बदलांनी विरस होऊ शकतो असे तुम्हाला वाटते का?

मला हिंदी/ मराठी चित्रपटांची उदाहरणे आठवली नाहीत. कोणाला आठवली तर ती इथे द्यावीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

विरस

मूळ पुस्तकातल्या कथानकात महत्वाचे फेरफार विरस करणारेच वाटतात. अलिकडचे मराठीतले उदाहरण म्हणजे जी.ए. कुलकर्णींच्या कैरी ह्या कथेवरचा अमोल पालेकरांचा कैरी हा चित्रपट. मूळ कथानकात किती बदल केला आहे माहित नाही पण ही कथा ज्या मुलाच्या नजरेतुन लिहिली आहे त्याऐवजी पालेकरांनी मुलगी घेतली आहे. (ते वर्ष भारत सरकारने महिला वर्ष की काय घोषित केल्याने पुरस्कार मिळण्यास सोपे जावे म्हणून तसे केल्याचे ऐकले होते) मला वैयक्तिकरीत्या हे न रुचल्याने अजूनही हा सिनेमा पाहिलेला नाही. पाहण्याची इच्छा नाही.
हा चित्रपटा जीएंच्या पश्चात बनवला असल्याने लेखकची परवानगी वगैरे मुद्दे गैरलागू होते.

कैरी

"जीएंच्या पश्चात बनवला असल्याने लेखकची परवानगी वगैरे मुद्दे गैरलागू होते."

~ फक्त या मुद्द्यापुरते लिहितो.
'कैरी" बद्दल जीए आणि पालेकर यांच्यात बरीच चर्चा झाली होती. पालेकरांनी 'चित्रपट माध्यमा' बद्दल त्याना जे काही सांगितले होते त्याला जीएंनी कोणताही विरोध केला नव्हता. इतकेच काय शेवटी त्यानी एका पत्रात अमोल पालेकरना स्पष्टच परवानगी दिली आहे : "मला वाटते, या विषयात माझ्या बाजूने, या काठावर जे सांगायचे आहे त्याची बरीच चर्चा झाली. यापुढचे सारे निर्णय तुम्ही तुमच्याच बाजूने घ्यायचे आहेत. कथा डिस्टॉर्ट होणार नाही, एवढ्यापुरताच खरे म्हणजे माझा संबंध असायचा. त्याबाबत मला आता कसलीसुद्धा भीती नाही. उलट, तुम्ही इतर काही बाबतीतही मला विचारलेत, हे खरोखरच तुमचे सौजन्य आहे."

~ हे पत्र स्पष्ट कबुली देतेच की, अमोल पालेकरांनी "कैरी" निर्मितीबाबत जे स्वातंत्र्य घ्यायचे त्याला जीएंची मान्यता होती.

दोघांतील 'कैरी' संबंधीचा पत्रव्यवहार आहे १९८२ मधील आणि चित्रपट निर्माण झाला २००१ मध्ये. म्हणजे पालेकर भारत सरकारचा महिला वर्षानिमित्तचा पुरस्कार "कैरी" ला मिळावा म्हणून २० वर्षे थांबले असा ज्यानी तर्क काढला असेल तो हास्यास्पद आहे.

अशोक पाटील

एंजल्स अँड डिमन्स

असे बदल करण्यासाठी लेखकाची पूर्व परवानगी घ्यायला लागते किंवा कसे ते माहित नाही परंतु जेव्हा असे कादंबरीवरून डिट्टो चित्रपट बनतात तेव्हा त्यातील क्लायमॅक्स बदलण्यात अधिक धंदा करणे या व्यतिरिक्त दुसरा हेतू कळत नाही.

अनेकदा चित्रपट बनताना अल्टरनेट क्लायमॅक्स वगैरे तयार केले जातात. त्यातील एक क्लायमॅक्स निश्चित केला जातो असे वाटते परंतु मूळ कादंबरीशी फारकत घेणारा शेवट प्रेक्षकांचा विरस करणारा वाटतो.

एंजल्स अँड डिमन्समध्ये हे संपूर्ण कथानक ज्या गैरसमजामुळे घडते तो गैरसमजच चित्रपटातून वगळलेला आहे. असे करण्याचे कारण मलाही समजले नव्हते पण त्या काळात मी आयएमडीबीवरील काही प्रतिसाद वाचले होते त्यावरून अनेक प्रेक्षकांना हे रुचले नव्हते असे वाटते.

बाकी, लेखकाला असे महत्त्वाचे बदल का चालत असावे किंवा त्यांची परवानगी लागते किंवा या प्रवृत्तीमुळे झालेले वाद वगैरे विषयी माहिती पुरवल्यास वाचण्यास आवडेल.

रिबेका

रिबेका या कादंबरीवरून हिंदीत अनेक वर्षांपूर्वी कोहरा (वहिदा रहमान, विश्वजीत आणि ललिता पवार) हा चित्रपट आणि दोन वर्षांपूर्वी अनामिका (दिनो मारिओ, मिनिषा लांबा व कोएना मित्रा) हा चित्रपट बनला.

दोन्ही चित्रपटात कथानकातील महत्वाच्या बाबी बदलण्यात आल्या. मूळ कादंबरीच्या कथानकात रिबेका ही मृत स्त्री ही व्यभिचारी आहे. किंबहूना व्यभिचारातूनच ती गर्भवती आहे असे नायकास सांगते व त्यास स्वत:वर गोळी झाडण्यास उद्युक्त करते.

कोहरा मध्ये या गोष्टीला फाटा देण्यात आला त्याचे कारण कोहरा ज्या काळात बनला त्यावेळी भारतीय समाजमन तितकेसे परिपक्व नव्हते. अर्थात तरी देखील असे दाखवायला अडचण नव्हती कारण ही नायकाची पूर्वपत्नी असली तरी नायिका नसून खलनायिकाच होती. असो.

अनामिकाने दुसर्‍या व तिसर्‍या फळीचे कलाकार घेतल्याने आणि तोपर्यंत भारतीय समाजमन बरेच प्रौढ झाले असल्याने त्यांना मूळ कादंबरीत बदल करण्याची गरज पडायला नको होती. परंतू त्यांनी तर कहरच केला. मूळ कादंबरीत रिबेकाची खास मदतनीस असलेल्या (जी पुढे कथेची मुख्य नायिका असणार्‍या नायकाच्या द्वितीय पत्नीस त्रास देते) पात्रास वृद्धेच्या ऐवजी तरूण दाखविले असून तिलाच मूळ खलनायिका तसेच रिबेकाची खरी खुनी दाखविले आहे तर रिबेकाला सज्जन दाखविले आहे.

मूळ कादंबरी बरीच जुनी आहे. त्यात रिबेका व्यभिचारी असून नायक तिचा खून करतो असे दाखविले आहे. असे असले तरी ही कादंबरी मनाला अतिशय भावते. अतिशय उत्कंठावर्धक अशा ह्या कादंबरीत रहस्याचे तीन स्फोट होतात.
१. रिबेका अपघातात मेली नसून तिचा खून झाला असल्याचे समजणे.
२. नायकच रिबेकाचा खुनी असल्याचे नायिकेला समजणे.
३. प्रत्यक्षात रिबेका मृत्युपूर्वी गर्भवती नसून तिने तसे नायकाला खोटेच सांगितले असल्याचे सर्वांना समजणे.
या तीन रहस्यस्फोटांमुळे कादंबरी जितका आनंद देते. त्याच्या एक टक्काही आनंद हे दोन्ही हिंदी चित्रपट देऊ शकत नाहीत.

इंग्लिश 'रिबेका'

श्री.चेतन सुभाष गुगळे यानी "रिबेका" च्या दोन्ही हिंदी चित्रपट आवृत्यांबद्दल लिहिले आणि त्यात मूळ कादंबरीच्या कथानकात काही बदल केल्याचे म्हटले आहे. पण आल्फ्रेड हिचकॉकच्या १९४० च्या 'रिबेका' मध्येही गरजेनुसार बदल करण्यात आलेच होते. त्यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मूळ कादंबरीत रिबेकाने तिच्या चारित्र्याविषयी (विशेषतः जॅकपासून गर्भवती राहिल्याचे कबूल करणे) नायक मॅक्झिम विंटरला खिजविल्यावर तो तिच्यावर गोळी झाडून तिला ठार करतो व नंतर त्या छोट्या होडीला छिद्रे पाडून ती बुडवितो, त्यामुळे रिबेकाने आत्महत्या केली असा देखावा निर्माण करण्यात यशस्वी होतो, असा उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष पडद्यावर असे दाखविणे योग्य नव्हते कारण "हॉलिवूड प्रॉडक्शन कोड" अंतर्गत सरकार मान्य करीत असलेल्या कायद्यात पतीने पत्नीचा खून केला असल्यास त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तसेच चित्रण केले जावे अशी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे असल्याने निर्माते सेल्झनिक आणि दिग्दर्शक हिचकॉक यानी 'रिबेका'चा मृत्यू दोघांच्या वादात ती वाड्यातच मागे घसरून पडते व डोके भिंतीवर आपटून मरते असे दाखविण्यात आले. याचाच अर्थ रिबेकाचा मृत्यू हा अपघाती असून मॅक्झिम घाबरून जाऊन तिचे प्रेत त्या होडीत ठेवतो असा बदल झाला. जो अर्थातच प्रचलित कायद्याचे पालन करणाराही ठरला.

अशोक पाटील

हॉलिवूड प्रॉडक्शन कोड

प्रतिसाद चर्चेशी अवांतर असला तरी "हॉलिवूड प्रॉडक्शन कोड"मुळे देत आहे. हा कायदा/ नियम १९६८ ला संपुष्टात आला आणि आता बहुधा रेटिंगचीच पद्धत आहे. तरीही, नैतिक मूल्ये हा निकष असावा की नसावा असा प्रश्न काही चित्रपट पाहिल्यावर पडला होता.

त्यापैकी एक, द नेक्स्ट थ्री डेज - यात नायिकेला खुनाच्या आरोपाखाली अटक आणि शिक्षा होते. सर्व पुरावे आणि साक्षिदार तिच्या विरुद्ध आहेत. गुन्हा तिने केला नाही असे कोणीही म्हणू शकत नाही इतके सज्जड पुरावे आहेत. परंतु तिचा नवरा हे मानत नाही आणि तिला तुरुंग फोडून त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग शोधतो. त्यासाठी जे पैसे लागतील त्याकरता काहीजणांची हत्या करतो, इतर गुन्हे करतो आणि नायिकेला तुरुंगातून पळवून नेण्यात यशस्वी ठरतो. पुढे, नायिकेने खून कसा केला नसावा त्याची थिअरी एक डिटेक्टिव सांगतो परंतु संपूर्ण चित्रपटात तो भाग अनावश्यक वाटतो. मी संपूर्ण चित्रपट अविश्वासाने पाहिला आणि बहुधा हेच या चित्रपटाचे यश असावे.

दुसरा चित्रपट, लिमिटलेस - आपल्या मेंदूचा आपण २०% भागच उपयोगात आणतो पण जर १००% मेंदूचा वापर करण्याचा ड्रग उपलब्ध असेल तर काय होईल यावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटाचा नायक एक अयशस्वी लेखक आहे. त्याला योगायोगाने एका नवीन ड्रगचा पत्ता लागतो. एक गोळी घेतल्यावर तो झटाझट लेखन करून प्रकाशकांकडे सुपूर्त करतो. इतर क्षेत्रात (स्टॉक्स, ट्रेडिंग) तो आपली बुद्धी लावून यश संपादन करतो आणि मग माफिया आणि या ड्रगला चटावलेल्या इतरांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अधिक गुन्हे करतो. या ड्रगचे साइड इफेक्ट लक्षात आल्यावर, त्यावर उपाय शोधून प्रमाणात ड्रग घेऊन यशस्वी राहतो.

एकंदरीत, दोन्ही चित्रपट मला अनैतिक वाटले. बर्‍याचदा पाहिलेल्या चित्रपटांची शिफारस मी मित्रमंडळात करते. द नेक्स्ट थ्री डेजची केली पण लिमिटलेसची बहुधा करणार नाही. :-)

दोन्ही चित्रपटांनी चांगला गल्ला जमवला आहे.

रसेल् क्रोवे

"हा कायदा/ नियम १९६८ ला संपुष्टात आला"

~ हो. पण 'रिबेका' ज्या काळात [१९४०-४१] निर्माण झाला त्यावेळी तो अस्तित्वात असल्याने त्या अनुषंगाने पटकथेत बदल करणे सेल्झनिकना भाग पडले. त्यात काही वावगेही नसावे कारण शेवटी कायद्याला मान देणे हा प्रघात सर्वच थरावरील समाजात असणे गरजेचे आहे.

"द नेक्स्ट् थ्री डेज" मी पाहिला आहे आणि ज्या फ्रेन्च चित्रपटाच्या यशामुळे हा निर्माण झाला तो 'एनिथिंग् फॉर हर' हा देखील पाहिला आहे, जो मला 'नेक्स्ट्..' पेक्षा खूपच वेगवान आणि सरस वाटला. अर्थात रसेल क्रोवेचा [कोणत्याही भूमिकेतील] अभिनय पाहणे हा एक निखळ आनंदाचा अनुभव असतो, जो नेक्स्टमध्येही प्रत्ययास येतोच. कथानकातील पत्नीला तुरुंगातून सोडविण्याचे त्याचे 'धाडस' पटत नाही, कारण मुळात नायक हा एक उच्चशिक्षित आणि प्राध्यापकाची नोकरी करणारा गृहस्थ दाखविला आहे. असे सरळमार्गी आयुष्य असलेली व्यक्ती अन्यायाविरूद्ध चिडूनचिडून कोणती पातळी गाठेल यालाही काही मर्यादा आहेत, त्यामध्ये 'अपीलावर अपील' ही एक सर्वमान्य. पण एका मुरलेल्या गुन्हेगाराकडून तुरुंग कसा फोडायचा, परदेशी पळून जाण्यासाठी आवश्यक तो पैसा कसा उभा करायचा, पत्नीचे मेडिकल रेकॉर्ड बदलून सरकारी बंदिस्त इस्पितळात प्रवेश करून त्याची अदलाबदल करायची...इ.इ. अतर्क्य घटना एक 'प्राध्यापक' करू शकेल का ? यावर विश्वास ठेवणे खरेच जड जाते. पण होते असे की, अशा धर्तीच्या चित्रपटाला जी एक विलक्षण गती देण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो, तेच या चित्रपटाचे यश आणि पाहताना कथानकाची अतर्क्यता प्रेक्षकाच्या ध्यानीही येत नाही.

अशोक पाटील

अगदी! अगदी!!

'रिबेका' ज्या काळात [१९४०-४१] निर्माण झाला त्यावेळी तो अस्तित्वात असल्याने त्या अनुषंगाने पटकथेत बदल करणे सेल्झनिकना भाग पडले. त्यात काही वावगेही नसावे कारण शेवटी कायद्याला मान देणे हा प्रघात सर्वच थरावरील समाजात असणे गरजेचे आहे.

हो म्हणूनच मी कायदा कधी संपला ते पाहिले. कारण मी दिलेले दोन्ही चित्रपट बघताना मला थोडेसे सखेद आश्चर्य वाटले आणि यावर काही सेन्सर नाही का असा प्रश्न पडला असे नमूद करते.

अर्थात रसेल क्रोवेचा [कोणत्याही भूमिकेतील] अभिनय पाहणे हा एक निखळ आनंदाचा अनुभव असतो, जो नेक्स्टमध्येही प्रत्ययास येतोच.

अगदी! अगदी! चित्रपटाचा वेग आणि रसेल क्रो हेच प्रेक्षकांना बांधून ठेवतात. मी अतिशय अविश्वासाने हा चित्रपट पाहिला. कहानीमें ट्विस्ट असेल किंवा जे घडते आहे ते भ्रम असेल असे वाटून पुढे काय होते हा अविश्वास देखील मला चित्रपटाशी बांधून ठेवणारा वाटला पण तसे काही घडले नाही तेव्हा कालांतराने 'असे चित्रपट प्रदर्शित करावे का?' असा प्रश्न मनाला चाटून गेला. (अर्थातच, सज्ञान लोकांना चांगल्यावाईटाची जाणीव असते हे लक्षात घेता या प्रश्नाला फारसे महत्त्व नाही. :-))

माध्यम आणि आस्वाद

दोन भिन्न माध्यमांतल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्याची रसिकांची पद्धत वेगवेगळी असते, शिवाय अनेकदा तर रसिकही वेगळाच असतो. त्यामुळे असे बदल होणे अपरिहार्य आहे असे वाटते. ज्यांनी मूळ कादंबरी वाचलेली नाही, त्यांना असे सिनेमे आवडू शकतात. मी फाईव्ह पॉईन्ट समवन आधी वाचले होते, नंतर थ्री इडियट्स पाहिला. त्यात केलेली कथानकाची मोडतोड मला आवडली नाही. माझ्या ज्या मित्रांनी सिनेमा आधी पाहिला, त्यांना तो प्रचंड आवडला. त्यातल्या काहींनी नंतर पुस्तक वाचले, तरीही त्यांना सिनेमाच जास्त उजवा वाटला. बहुधा कलाकृतीचे 'फर्स्ट इम्प्रेशन' महत्त्वाचे ठरत असावे.
पुस्तक काय किंवा सिनेमा काय, आपापल्या जागी चांगले अथवा वाईट असतातच. फक्त पुस्तकाबरहुकूम सिनेमा नाही आणि त्यामुळे माझा रसभंग झाला म्हणून सिनेमा वाईट असे म्हणता येते का? माझ्या मते, नाही. कलाकृतीचा आस्वाद स्वतंत्र घेतला जावा असे वाटते.

हुबेहुब नक्कल

कधीतरी कथानक वाचण्याआधी चित्रपट पाहिले तर कथानकापेक्षा चित्रपट आवडतो हे मान्य आहे. फर्स्ट इम्प्रेशन मान्य आहे.

>>फक्त पुस्तकाबरहुकूम सिनेमा नाही आणि त्यामुळे माझा रसभंग झाला म्हणून सिनेमा वाईट असे म्हणता येते का? माझ्या मते, नाही. कलाकृतीचा आस्वाद स्वतंत्र घेतला जावा असे वाटते. <<

येथे उपस्थित केलेले प्रश्न फक्त रसभंगावर नाहीत. जेव्हा एखाद्या कादंबरीवरून चित्रपट बनवला आहे [कादंबरीवर आधारित नाही. कादंबरीबरहुकूम हा शब्द आवडला.] अशी जाहीरात केली जाते, शीर्षकही तेच ठेवले जाते तेव्हा लेखकाच्या परवानगीने कथानक घेतलेले असते. पुस्तकाबरहुकूम चित्रपट बनतो आहे असेच दर्शवले जातात. चित्रपट माध्यमात बसवण्यासाठी थोडेफार फेरफार आकलनिय आहेत पण महत्त्वाचा भाग गाळणे किंवा बदलणे हे समजत नाही. जर तसे करायचे असेल तर प्रोमोमध्ये "बदललेल्या शेवटासह" अशी जाहीरात का करू नये? पुस्तकाबरहुकूम चित्रपट बनवला आहे असे सांगितल्यावर मुख्य भाग बदलून चित्रपट दाखवणे प्रेक्षकांशी प्रतारणा आहे.

पैसे,वेळ, मानसिक शांती

>>कादंबरी वाचून प्रेक्षक अपेक्षेने चित्रपट पाहण्यास जातो त्याचा अशा बदलांनी विरस होऊ शकतो असे तुम्हाला वाटते का?
नक्कीच, परिक्षण वाचल्याशिवाय चित्रपट पाहू नये असे सुचवतो. पैसे,वेळ, मानसिक शांती असे बरेच काही वाचते.

मी कादंबरी वाचली नसल्याने मला "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू" चित्रपट आवडला.

सिंहासन

मराठीतील असे एक उदाहरण आठवते. "मुंबई दिनांक" आणि "सिंहासन" अरुण साधू यांच्या या दोन कादंबर्‍यातील कथानक एकत्रित करून जब्बार पटेल यानी तयार केलेला "सिंहासन" हा चित्रपट. दोन्ही कादंबर्‍या त्या त्या काळी जशा गाजल्या तसेच हा चित्रपटही. "मुंबई दिनांक" मधील अनेक पात्रांपैकी एक महत्वाचे पात्र म्हणजे पत्रकार अय्यर. याला चित्रपटात स्थान नाही, तर ते दिले गेले 'सिंहासन' मधील 'दिगू टिपणीस' या पत्रकाराला. सिंहासन कादंबरीमध्ये दिगू या राजकारण्यांचे काहीही वाकडे होऊ शकत नाही, इथपर्यंतच्या निर्णयास येतो; पण जब्बार पटेल यानी चित्रपटात मात्र त्याला अखेरीस नैराश्येने वेडाचे झटके येतात आणि मुंबईच्या फूटपाथवरून तशा पद्धतीचे हातवारे करीत घुमताना दाखविले जाते आणि चित्रपट संपतो.

अर्थात असा बदल म्हणजे कादंबरीतील कथानकाशी दिग्दर्शकाने 'प्रतारणा' केली असे म्हणता येणार नाही, कारण पटकथेच्यावेळी मूळ लेखक अरुण साधूही त्यांच्यासोबत होतेच. चर्चा झाली असणारच. त्यामुळे 'सिंहासन' च्या बाबतीत सर्वानीच पडद्यावरील सादरीकरणासाठी तसेच प्रेक्षकांवर योग्य ती परिणामकारकता बिंबविण्यासाठी आवश्यक ते "स्वातंत्र्य" घेतले असे म्हटले जाईल.

"बनगरवाडी" हादेखील एक चांगला प्रयोग झाला होता. कादंबरी आणि चित्रपट दोन्हीही एकमेकाला पूरक बनले होते.

अशोक पाटील

हौ ग्रीन वॉज माय वॅली

"हौ ग्रीन वॉज माय वॅली" ही कादंबरी वाचली तेव्हा "बदलत्या काळाबरोबर येणारे अपरिहार्य बदल" ह्या संदेशाबरोबरच वेल्श अस्मितादेखिल पानांपानांतून डोकावताना दिसली होती.

त्यानंतर काही वर्षांनी चित्रपट पाहिला त्यात मात्र ही वेल्श अस्मिता कुठेही पकटपणे दिसली नाही.

बाकी ही दोन स्वतंत्र माध्यमे असल्यामुळे आणि चित्रपटाला वेळेचे बंधन असल्यामुळे काही बदल अपरिहार्य आहेतच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गाइड

आर के नारायण यांची "गाइड" कादंबरी मी देव आनंद चा प्रसिद्ध चित्रपट पाहिल्यावर वाचली होती. आधी वाचली असती तर कदाचित चित्रपट आवडला नसता. कथा एकच असले तरी दोन्ही माध्यमांतल्या कथानकात खूप फरक आहे.

नारायण यांना स्वतः चित्रपट अत्यंत भडक आणि विकृत वाटला होता. त्यांचे सेटवरचे कटु अनुभव, आणि एकूण चित्रपटाबद्दलचे विचार त्यांच्या "मिसगाइडेड गाइड" निबंधात नोंदविले होते. त्याबद्दल थोडेसे येथे वाचता येईल.

जेन ऑस्टन यांच्या कादंबर्‍यांना पडद्यावर आणणे आता लोकांना छान जमले आहे. सेन्स अँड सेन्सिबिलिटी चे एम्मा टाँप्सन ने केलेले रूपांतर, महत्त्वाचे फेरबदल केले असूनही मला फार आवडले. पण अलिकडे आलेला प्राइड अँड प्रेजुडिस अगदी बाद होता - त्यापेक्षा बी-बी-सी चे मिनि-सीरीज् मस्त होते (कॉलिन फर्थ....!!) एकूणच १९व्या शतकाच्या इंग्रजी कादंबर्‍यांचे - डिकन्स, जॉर्ज एलियट, गास्कल - रूपांतर बीबीसी ला छान जमलेय.

आधी ऍगथा ख्रिस्टी च्या जेन मार्पल गोष्टी जोन हिक्सन च्या अभिनयात खूप आवडायच्या, पण आता नवीन मालिकेत मार्पलही बदलल्या आहेत, (जास्त ग्लॅमरस झाल्या आहेत) आणि गोष्टीही! काही गोष्टीत खूनी ही वेगळा केला आहे. सस्पेन्सचे संगीत, भडक सेट्स, सगळ्यानेच रसभंग होतो.

हिंदी साहित्यातून सिनेमे झालेली दोन उदाहरणे म्हणजे फणीक्ष्वरनाथ रेणूंचे "तीसरी कसम" (ही त्यांनीच पडद्यावर आणली) आणि नदिया के पार (आत्ता लेखक आठवत नाही, पण कादंबरीचे बर्‍यापैकी रूपांतर झाल्याचे वाटल्याचे स्मरते).
*********
धागे दोरे
*********

तीसरी कसम

"फणीक्ष्वरनाथ रेणूंचे "तीसरी कसम" (ही त्यांनीच पडद्यावर आणली)"

~ पडद्यावर आणली गीतकार शैलेन्द्र यानी १९६६ मध्ये. "रेणू" यानीच या चित्रपटाचे संवाद लिहिले होते. मूळ कथाही "मारे गये गुलफाम" त्यांचीच. फणिश्वरनाथांची 'मैला आंचल' ही हिंदीतील अत्यंत गाजलेली कादंबरी, पण यावर चित्रपट निघाला नाही.

"गाईड" बद्दल ~ ज्या दुव्याचा तुम्ही उल्लेख केला आहे ते पुस्तक "द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ्" आहे माझ्याकडे. नक्की वाचतो नारायणन् प्रकरण. फक्त "जयपूर" लोकेशन निवडल्याबद्दल त्यांनी स्पष्ट् नाराजी व्यक्त केल्याचे राजू भारतन यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते. त्यापुढेही वाद होते असे दिसते एकूण.

अशोक पाटील

द गाइड

आर के नारायण यांनी द गाइड लिहिली तेव्हा त्यांच्या मनात लोकेशन, व्यक्तिमत्व या विषयी काही खास जागा आणि व्यक्ती होत्या. लोकेशनसाठी द. भारतातील जागा, रोझीचे शास्त्रिय नृत्य, राजूचे व्यक्तिमत्व यामध्ये बदल करण्यात आले. नारायण यांना ती प्रतारणा वाटली असावी. यावरून माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळते. पुढे जाऊन ही वाचकांशीही प्रतारणा आहे असे मला म्हणायचे आहे.

चर्चेत भाग घेणार्‍यांचे आभार आणि नववर्षाच्या शुभेच्छा.

 
^ वर