तर्कक्रीडा १९:चोरांचे संमेलन

विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा "चोरांचे संमेलन " हा लेख अनेकांनी वाचला असेल.असेच एक चोरांचे संमेलन भरले होते. (म्हणजे वस्तू चोरणार्‍या चोरांचे.वाङमय चौर्य करणार्‍यांचे नव्हे. त्या संमेलनाला 'साहित्यसंमेलन म्हणतात!) संमेलन सभासदांसाठीच मर्यादित होते.
...."चोरी या व्यवसाया संबंधी लिखित स्वरूपात आचारसंहिता असावी."असा एक ठराव या संमेलनात मांडला गेला. चर्चा झाली. अध्यक्षांनी ठराव मतदानास टाकला . ते म्हणाले,"ज्यांचे मत ठरावाच्या बाजूने आहे ,त्यांनीच उभे रहावे.ज्यांचे मत विरुद्ध आहे त्यांनी खुर्चीवरच बसावे."
थोड्याच वेळात अध्यक्षांनी मोजणी केली.
..."हा ठराव संमत झाला आहे. कारण जितके सभासद बसले आहेत ;त्याच्या सवापट सभासद उभे आहेत." अध्यक्षांनी निर्णय दिला. तेव्हा उभे असलेले काही जण म्हणाले;
"अध्यक्ष महाराज ,आमचे एक गार्‍हाणे आहे. आम्ही उभे आहोत. पण ठरावाच्या विरुद्ध आहोत."
"अरे,मग बसा की"
"आम्हाला बसायला खुर्च्याच नाहीत."
"खुर्च्या नाहीत? काल तर पुरेशा खुर्च्या होत्या."
"रात्री काही खुर्च्या चोरीला गेल्या."
ही अडचण ध्यानात आल्यावर अध्यक्ष म्हणाले:"जे बसलेले आहेत ते ठरावाच्या विरुद्ध आहेतच.पण उभे असून जे ठरावाविरुद्ध आहेत त्यांनी उजवा हात वर करावा."
यावर बारा उभ्या सदस्यांनी हात वर केले. गणना झाल्यावर अध्यक्ष म्हणाले" हा ठराव केवळ एकाच मताने फेटाळला गेला आहे."
तर संमेलनाला किती चोर उपस्थित होते? (अध्यक्ष धरून)
(दोन्ही मतदानात अध्यक्ष तटस्थ राहिले.)
......यनावाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

औपरोधिक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"उपरोधाने लिहिले असावे. उपरोधाने लिहिलेल्या वाक्यापुढे ;-) असे द्यावे ही प्रथा संकेतस्थळांवर रूढ आहे."
क्षमा करा. मला ही प्रथा विदित नव्ह्ती. इतःपर असे चिह्न दर्शवीन.
.......... यनावाला.

सही प्रतिसादाच्या सुरवातीलाच येते आहे! ;)

यनवाला काका,

आपली सही चुकून आपल्या प्रतिसादाच्या सुरवातीलाच येते आहे.

की हेही एक नवे कोडेच आहे? ;)

आपला,
(मजेशीर!) तात्या.

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

तर्क.१९: पुरवणी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इदं न मम|(डिस्क्लेमर) : कधीतरी कुठल्याशा इंग्रजी पुस्तकात (कदाचित नियतकालिकात असेल) एक कोडे वाचले होते. त्यावर हे कोडे(चो.सं) आधारित आहे.
.........यनावाला.

निषेध.

वाङमय चौर्य करणार्‍यांचे नव्हे. त्या संमेलनाला 'साहित्यसंमेलन म्हणतात

तसे पाहिले तर वाङमय चौर्य हा न संपणारा विषय आहे,त्यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत.पण त्यासाठी साहित्य संमेलन असते हे म्हणने संपूर्णपणे चूकीचे आहे. त्यासाठी साहित्यिक,वाचक येतात असे म्हणने म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे.
आम्ही आपली कोडी वाचून जातो.त्याचा आम्ही घेतलाय का कधी शोध ! आम्ही तूमचीच आहेत म्हणतो ना ती कोडी.आम्ही आपला निषेध करतो.निषेध म्हणून आम्ही आठ दिवस तुमची कोडी वाचायला येणार नाही.

प्रत माहितीस्तव.
१)अध्यक्ष ,अ.भा.म.सा.सं.
२)उपसंपादक,उपक्रम.
३)मराठी समूदाय.
४)मराठी साहित्यिक,रसिक

मूक्त कवी संमेलनातील एक कवी ;) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहानुभूती..! ;)

निषेध म्हणून आम्ही आठ दिवस तुमची कोडी वाचायला येणार नाही.

बिरुटेसाहेब, आपल्याला सहानुभूती म्हणून पुढचे तीन दिवस आम्हीही वालावलकरशेठची कोडी वाचणार नाही! ;)

तात्या.

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

निषेध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांस,
........बिरुटे सर, आपल्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर मागाहून देतो. कृपया आपण कोड्यांवर बहिष्कार टाकू नये. तुम्ही कोडी वाचावी अशी माझी मनापासून इच्छा आहे .मी तुम्हाला तसे कळकळीचे आवाहन करतो.
कळावे.राग सोडावा हे विनंती.
आपला......यनावाला.

निषेध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांस ,सप्रेम नमस्कार.
गणित, तर्कशास्त्र, हे विषय नीरस,कंटाळवाणे आहेत. अशा विषयांवर कोडी लिहिताना ते लेखन वाचनीय व्हावे,त्यात रंजकता यावी असा माझा प्रयत्न असतो.म्हणून विषय, नावे,वर्णन यांत वैचित्र्य, वैविध्य आणण्याची खटपट करतो.बरेचदा हे प्रयत्न अयशस्वी ठरतात. आणि लेखन केविलवाणे होते. "चोरांचे संमेलन "च्या लेखनात रंजकता आणण्यासाठी काही चटपटीत वाक्य लिहावयाच्या नादात असे घडले. तुम्ही निदर्शनाला आणून दिल्यावर चूक ध्यानी आली. मी आपला आभारी आहे. झाल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून आता आठ दिवस कोडी लिहिणार नाही. आपण सुविद्य आहात. तरी राग नसावा.
......यनावाला.
( तात्यांच्या रागाचे मला भय नाही. त्यांचा राग क्षणिक असतो.शिवाय ते आमचे गाववाले आहेत. ते मला 'भ' च्या बाराखडीतील अक्षराने चालू होणार्‍या दोन शिव्या देतील आणि त्यांच्या रागाचे शमन होईल.)...यनावाला.

पुरेसे आहे.

यनासाहेब, तुम्ही इतक्या उदार मनाने चूक मान्य केली त्याने बिरुटेसाहेबही शांतवले असतील. इतके पुरेसे आहे.
त्यासाठी कोड्यांवर गदा कशाला?

कोण ?

बिरुटेसाहेबही शांतवले असतील.
काय विसूनाना कसे आहात ?तब्येत वगैरे काय म्हणते ?

व्यक्तिगत स्वरुपाचे लेखन असल्यामूळे खरडवहीचा वापर करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यनावालाजी कोडी येऊ द्या.

नमस्कार,यनावाला साहेब,
अहो,आम्हाला काही राग नाही.आपली कोडी वाचनीय असतात.म्हणून तर आम्ही न चूकता कोडी वाचून जातो.(सोडवून नव्हे).आपल्या तर्केक्रीडेतील संवाद ही एक नाट्यछटा असते. लेखन वाचनीय व्हावे,त्यात रंजकता यावी असा आपला प्रयत्न असतो.नव्हे ते आपले वैशीष्टे असते. विषय, नावे,वर्णन यांत वैचित्र्य, वैविध्य,हे आपल्या यशाचे गमक आहे.आणि कसले प्रायश्चित्त हो,येऊ द्या कोडी.
का सध्या काही दूस-या कामात व्यस्त आहात ;) आमची निषेधाची गोष्ट मनावर घेऊ नये ही कळकळीची नम्र विनंती.

निषेध करून,पश्चातापाने फनफनलेला,प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

वालावलकरशेठ,

बिरुटेसाहेबांनी उत्तर दिलंच आहे, आता मीही देतो आहे.

झाल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून आता आठ दिवस कोडी लिहिणार नाही.

अहो असा जिवाला हात घालू नका. अहो आपण कोकणी माणसं, बाहेरून फणसासारखी पण आतून खूप गोड असतो हो! आमचे बिरुटेसाहेब कोकणातले नाहीत, पण खूप हळवे आहेत. त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. प्लीज प्लीज कोडी लिहीत रहा. अहो माझ्या मिसळपाव डॉट कॉमवर देखील कोडी लिहायला या. शिवाय मिसळपाव डॉट कॉमच्या संस्कृत विभागाचा आणि शुद्धलेखन विभागाचा तुम्हाला उपसंपादकही करतो! ;)

पण असं जिवाला लावून घेऊ नका...

मिसळपाव डॉटकॉमवरील शिव्यांचा विभाग अर्थातच मी आणि युयुत्सू सांभाळू! ;)

अशा विषयांवर कोडी लिहिताना ते लेखन वाचनीय व्हावे,त्यात रंजकता यावी असा माझा प्रयत्न असतो.म्हणून विषय, नावे,वर्णन यांत वैचित्र्य, वैविध्य आणण्याची खटपट करतो.

कबूल! एकदम कबूल...आपण जरूर कोडी लिहीत राहावे एवढीच नम्र विनंती.

हो, काढली! 'च्यामारी कोण कुठला हा यनावाला!' असे म्हणून सुरवातीला मीदेखील आपली खोडी काढली. प्रांजळपणे कबूल करतो. पण एक डाव माफी करा साहेब!

( तात्यांच्या रागाचे मला भय नाही. त्यांचा राग क्षणिक असतो.शिवाय ते आमचे गाववाले आहेत. ते मला 'भ' च्या बाराखडीतील अक्षराने चालू होणार्‍या दोन शिव्या देतील आणि त्यांच्या रागाचे शमन होईल.)...

हे वाचून डोळे पाणवले, एवढंच सध्या लिहितो...!

आपलाच,
तात्या.

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

तर्क.१९: संमेलन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विसूनाना, अमित, वरदा आणि मृदुला यांनी या कोड्याचे अचूक उत्तर शोधले. इथे बैजिक समीकरण लिहिणे क्रमप्राप्त आहे. परीवश आणि प्रियाली यांची काहीतरी लहानशी चूक झाली असावी.पुनर्विचार केल्यास त्यांना सहज उत्तर येईल.सर्वांचे अभिनंदन! मनिमाऊ यांचे उत्तर आताच मिळाले.(अध्यक्ष धरून २२६ चोर). एवढे चोर असते तर ठराव पारित(पास ) झाला असता. मनिमाऊ यांनी छोटीशीच चूक केली.' तो' यांचे उत्तर आताच मिळाले. ते बरोबर आहे. अभिनंदन!
............यनावाला.

तर्क.१९: संमेलन

श्री.अत्त्यानंद यांनीही उत्तर पाठविले आहे. परंतु ते ठराव पारित व्हावा या मताचे आहेत असे दिसते. कारण मनीमाऊ प्रमाणेच लहानशी चूक करून त्यानी २२६ उत्तर काढले आहे.
..........यनावाला.

उत्तर

विसूनाना,अमीत,वरदा आणि मृदुला यांची उत्तरे कुठे आहेत ?
माझे उत्तर : २०८ चोर [अध्यक्षांसह]

२०८चोर

२०८चोर

 
^ वर