चीन आणि वॉलमार्ट

अलीकडेच भारतात वॉलमार्टच्या प्रवेशाला उद्देशून एक धाग्यावर बरीच चर्चा झाली. चीनमध्ये वॉलमार्टची उपस्थिति १९९५ पासून असून आज घटकेला वॉलमार्टची सुमारे ३५० स्टोअर्स चालू असून एक लाखभर चिनी व्यवसाय मुख्यत्वेकरून पुरवठादार म्हणून वा अन्य प्रकारे वॉलमार्टशी संबंध साधून आहेत. चीनमध्ये वॉलमार्ट ह्या विषयावर चालू डिसेंबर महिन्याच्या 'अटलांटिक मंथली' ह्या प्रतिष्ठित मासिकामध्ये ऑरविल शेललिखित एक लेख वाचावयास मिळाला. वॉलमार्टला भारतात प्रवेश द्यावा की नाही ह्या सध्याच्या मुद्द्याशी तो समांतर आहे असे वाटल्याने सारांशरूपाने त्यातील विचार येथे देत आहे.

लेखात सर्वप्रथम वॉलमार्ट ही कंपनी आणि चीन देश ह्यांच्यामध्ये बरेच काही समान आहे ते कसे हे दाखविले आहे. चीनचे नेतृत्व कसे काळाला अनुसरून बदलत आहे. वॉलमार्टनेहि आपले पूर्वीचे रूप टाकून अधिक eco-friendly रूप निर्माण केले आहे. ह्या नव्या वॉलमार्टकडून आपल्या उद्योजकांना आणि सर्वसामान्य जनतेला बरेच काही शिकता येईल अशा कल्पनेने चिनी नेतृत्वाने वॉलमार्टचा प्रवेश चीनमध्ये घडवून आणला आणि हे धोरण कितपत यशस्वी झाले हे तदनंतर दाखविले आहे.

वॉलमार्ट आणि चीन देश ह्या दोघांनाहि एक मूळचा जन्मदाता ’पितामह’ आहे. चीनच्या बाबतीत पितामह म्हणजे माओ, ज्याचे चित्र चीनमध्ये जागोजागी दिसत असते. वॉलमार्टच्या बाबतीत ’पितामह’ म्हणजे संस्थापक सॅम वॉल्टन (१९१८-९२). रॉजर्स ह्या अर्केन्सॉ राज्याच्या ग्रामीण भागातील छोटया गावातील एका स्टोअरपासून सुरुवात झालेले वॉलमार्ट आज ४५० अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेले आणि जगभर अनेक देशात हातपाय पसरलेले एक व्यापारी साम्राज्य बनले आहे. (देशोदेशींच्या GDP शी तुलना केली तर वॉलमार्ट २३ वा २४ व्या क्रमांकावर सौदी अरेबिया, स्वीडन, पोलंड ह्यांच्या रांगेत आणि एकशेसाठ-पासष्ट देशांच्या वर असेल.) वॉलमार्टच्या प्रत्येक स्टोअरमध्ये सॅमचे चित्र लावलेले दिसते. चीनमध्येहि जेथे तेथे माओ चित्ररूपाने समोर असतोच. माओ आणि सॅम आज जगात नाहीत पण त्यांच्या स्थानी असलेले त्यांचे आजचे चेले - चीनमध्ये पार्टीचा जनरल सेक्रेटरी आणि वॉलमार्टचा आजचा सीईओ - हे तेव्हढयाच अधिकाराने आणि स्वयंसिद्ध दैवी शक्तीने प्रेरित असल्यासारखे आपापली साम्राज्ये चालवीत आहेत. प्रेषिताची आपल्या धर्मावर असावी तशी त्यांची त्यांच्या तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आपली साम्राज्ये चालवण्यासाठी दोघांनाहि शिस्तबद्ध आणि व्यावसायिक अशा मोठया संघटनांचा पाठिंबा आहे. ह्या संघटनांना शिस्तीत ठेवण्यासाठी दोघेहि कधी प्रचारसाधने, कधी धाकदपटशा आणि मोठया प्रमाणात electronic monitoring ह्यांचा वापर करीत असतात. लोकांना आवडेल अशा शब्दात आपले तत्त्वज्ञान गुंडाळून पुढे करण्याचे तंत्र दोघांच्याहि चांगले अंगवळणी पडलेले आहे. भांडवलदारी संस्था असूनदेखील वॉलमार्ट ’ग्राहकाची सेवा’ हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत असते आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष ’जनतेची सेवा’ करण्याचा दावा करतो. कम्युनिस्ट विचारासारखेच वॉलमार्टचे स्वत:चे ’वॉलमार्ट कल्चर’ आहे.

पण हे साम्य येथेच संपत नाही. दोघांच्याहि इतिहासाकडे आणि वर्तमानाकडे नजर टाकली की अजून एक महत्त्वाचे साम्य समोर येते. हे कसे ते पाहण्यासाठी वॉलमार्टचा प्रारंभ आणि नंतरचा वॉलमार्टमधील बदल ह्याकडे दृष्टि देऊ.

वॉलमार्टची प्राथमिक अवस्थेतील मूल्ये अमेरिकेच्या दक्षिण राज्यांची, छोटया गावांची, ख्रिश्चन तत्त्वांवर श्रद्धा असलेली, कामगारचळवळविरोधी, मध्यमवर्गी अमेरिकेची आहेत. 'Always low prices, Always' ह्या तिच्या घोषणेमुळे आणि ’मोठी उलाढाल, कमी मार्क-अप’ ह्या धोरणामुळे आणि ग्राहकांशी खेळीमेळीचे संबंध राखण्याच्या धोरणामुळे वॉलमार्ट लवकरच मध्यमवर्गी अमेरिकेची आवडती कंपनी झाली आणि १९८५ मध्ये सॅम वॉल्टन अमेरिकेतला सर्वात श्रीमंत माणूस बनला. त्याचबरोबर वॉलमार्टच्या वाढत्या आकारामुळे आणि कामगारचळवळविरोधी धोरणामुळे, तसेच गावांच्या सीमांवर मोठीमोठी box stores उघडून गावांच्या परिसरात अनिष्ट बदल घडवून आणण्यामुळे आणि लहान व्यवसायांचे ग्राहक खेचून घेऊन अशा लहान व्यवसायांना उपासमारीने मारण्यामुळे वॉलमार्टविरोधी वातावरणहि तापू लागले होते. २००१ मध्ये १० लाख स्त्रीकर्मचार्‍यांनी स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याच्या वॉलमार्टच्या धोरणाविरुद्ध अमेरिकेतील सर्वात मोठा class-action दावा कंपनीविरुद्ध लढवला. चोरून अमेरिकेत प्रवेश केलेल्या लोकांना कमी पगारावर नेमून त्यांचे शॊषण करणे आणि immigrationविषयक कायद्याचा भंग करणे ह्याबद्दल वॉलमार्टला कोर्टापुढे हजर व्हावे लागले आणि पर्यावरणविषयीच्या कायद्यांचा भंग केल्याबद्दल २००४ मध्ये वॉलमार्टला दंड भरावा लागला. ह्या सर्व अप्रिय प्रसिद्धीमुळे वॉलमार्टच्या ग्राहकसंख्येत घट दिसू लागली आणि तेव्हढया प्रमाणात शेअरची किंमतहि घसरली.

२००० सालात नेमलेल्या वॉलमार्टच्या सीईओची - ली स्कॉटची - स्वत:ची पार्श्वभूमीहि कंपनीसारखीच ’छोटे गाव - कनिष्ठ मध्यमवर्ग अशीच होती. वॉलमार्टमध्ये अगदी तळापासून सुरुवात करून २००० पर्यंत सीईओच्या स्थानापर्यंत त्याचा प्रवास झाला होता. त्या स्थानावर तो बसतो न बसतो तोच कंपनीभोवती ही नवीन वादळे घोंघावू लागली होती. ह्यामधून बाहेर पडण्य़ासाठी त्याने ऑक्टोबर २००५मध्ये नवीन धोरण आखले ते म्हणजे वॉलमार्टला green बनवून २१व्या शतकातील पहिल्या स्थानासाठी सुयोग्य बनवणे. हा नवा 'born again' अवतार धारण करण्यासाठी तीन प्रमुख मार्गदर्शक तात्वे ठरविण्यात आली: १) १०० टक्के renewable energy चा वापर करणे, २) ’शून्य कचरा’ निर्माण करणे आणि ३) पर्यावरणाची हानि न करणारी उत्पादने विक्रीस ठेवणे.

एव्हांना वॉलमार्ट आणि चीन एकमेकांशी अनेक कारणांनी घट्ट बांधले गेले होते. चीनमधे वॉलमार्टची अनेक स्टोअर्स गावोगावी चालू होतीच आणि वॉलमार्ट जगभर विकत असलेली हजारो उत्पादने चीनमध्ये तयार केली जात होती. चिनी उत्पादकांना वर उल्लेखिलेल्या ’हिरव्या’ दोर्‍याने बांधल्याशिवाय वॉलमार्टचा नव्या शतकात नव्या अवतारात प्रवेश होऊ शकणार नाही हे स्पष्ट होते. वॉलमार्टच्या चिनी उत्पादकांना बोलावून हा संदेश त्यांच्या गळी उतरवण्याचे कार्य ली स्कॉट आणि त्याच्या संघटनेने सुरू केले. जे उत्पादक ह्या मार्गाने स्वत:मध्ये बदल घडवून आणणार नाहीत त्यांचा माल वॉलमार्ट घेणार नाही हा चाबूकहि मागे होताच.

वॉलमार्टचे हे नवे तत्त्व चिनी उत्पादकांच्या गळी उतरविण्यामध्ये चिनी नेतृत्त्वाचहि भाग होता. २००५ सालापूर्वीचा ’उत्पादनात वाढ - कोणत्याही किमतीला’ हा जुना विचार कालबाह्य होऊ लागल्याचे चिनी नेत्यांच्या लक्षात येऊ लागले होते. हे नेतृत्व माओनंतरच्या चौथ्या वा पाचव्या पिढीतले होते. चिनी जनतेमध्ये दूषित पर्यावरण, अन्नात भेसळ, सार्वत्रिक लाचखोरपणा अशा गोष्टींबद्दलचा राग वाढतांना दिसू लागला होता आणि रस्त्यांवरचे उत्स्फूर्त विरोध, अशासकीय संस्थांना - NGOs - अशा विरोधी हालचालींचा भाग बनविणे ह्या प्रवृत्ति वाढू लागल्या होत्या आणि त्यांची दखल घेणे आवश्यक आहे असे नेतृत्त्वाला जाणवू लागले होते. २००६ मध्ये सुरू झालेली नवी पंचवार्षिक योजना अशा कारणांनी 'kexue fazhan - scientific development' ह्यावर आधारित होती.

चिनी ग्राहकांमध्ये - विशेषत: मध्यम आणि उच्च उत्पन्नाच्या वर्गामध्ये - अन्नातील भेसळीला कंटाळून 'brand name' रेस्टॉरंट (McDonald, KFC) आणि 'brand name' स्टोअर्स (वॉलमार्ट) कडे वळण्याची प्रवृत्ति वाढीला लागली होती. (ही अमेरिका-युरोपमध्ये दिसते त्याच्या अगदी विरुद्ध वर्तणूक आहे. अमेरिका-युरोपमध्ये ह्याच कारणासाठी ग्राहकांचा कल 'brand name' पासून दूर अशा स्थानिक, छोटया 'organic' उत्पादकांकडे आहे.)

अशा रीतीने चीन आणि वॉलमार्ट ह्यांच्या धोरणांमधील बदल एकमेकास पूरक ठरले. चिनी सरकारने नव्या सहकारी संस्थांना उत्तेजन दिले आणि वॉलमार्टने आपला स्वत:चा Direct Farm Program २००७ साली सुरू केला. ह्या दोन गोष्टींमुळे वॉलमार्ट आणि वॉलमार्टचे ’हिरवे’ उत्पादक ह्यांच्यामध्ये दुसर्‍या मध्यस्थांशिवाय संबंध प्रस्थापित झाले. मालाचा दर्जा राखणे, त्याला योग्य मूल्य मिळविणे आणि विक्रीप्रक्रियेचे व्यवस्थापन करणे ह्या नव्या गोष्टी उत्पादक वॉलमार्टमुळे आणि वॉलमार्टच्या मार्गदर्शनामुळे शिकले. आधुनिक तंत्र वापरणारे नवे उत्पादक निर्माण झाले. (अशा प्रकारच्या ४-५ success stories मूल लेखात दिल्या आहेत.)

अशा पद्धतीने नव्या चीनच्या वाढीमध्ये वॉलमार्ट एक प्रकारे catalyst भूमिका पार पाडत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

लेख आवडला

ही अमेरिका-युरोपमध्ये दिसते त्याच्या अगदी विरुद्ध वर्तणूक आहे. अमेरिका-युरोपमध्ये ह्याच कारणासाठी ग्राहकांचा कल 'brand name' पासून दूर अशा स्थानिक, छोटया 'organic' उत्पादकांकडे आहे.

अगदी अचूक निरिक्षण! पुण्यात पहिले मॅकडॉनल्ड्स उघडले तेव्हा उच्चभ्रुंच्या रांगा लागल्या होत्या.

वॉलमार्टला नावे ठेवणारे अनेक असले तरी मला वॉलमार्ट तितके वाईट वाटत नाही. लोकांना स्वस्तात वस्तू हव्या असतात त्या ते पुरवतात. कुठलीही वस्तू पसंत न पडल्यास कसलीही खळखळ न करता परत घेतात आणि पूर्ण पैसे परत देतात. अमेरिकेत तरी कष्टकरी लोकांसाठी वॉलमार्टला पर्याय नाही. तसेच बहुतेक मध्यम/मोठ्या शहरांमधे वॉलमार्ट सोबत अनेक लोकल दुकानेही चालतातच ज्यांना स्वत:चे असे ग्राहक असतात. त्यामुळे वॉलमार्टमुळे सरसकट सगळे स्थानिक व्यवसाय बंद पडतात हे काही तितके खरे नाही. उलट वॉलमार्टच्या स्पर्धेमुळे स्थानिक उद्योगधंदेही गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करतात ज्याचा सामान्य ग्राहकाला फायदाच होतो.

अवांतरः अनेकदा वॉलमार्टला जाऊनही सॅम वॉल्टनचे चित्र बघीतल्याचे आठवत नाही, याउलट चीनमधले माओचे चित्र मात्र चांगलेच आठवते आहे.

लेख आवडला

लेख आवडला. तरीही, वॉलमार्ट बिचारं कानफाटं तर नाही ना अशी शंका येते. वॉलमार्ट खेरीज इतर चेन्सही (उदा. टारगेट, बेस्ट बाय, क्रोगर) भरपूर धंदा करतात.

वर वैद्यांनी सांगितलेल्या कारणांसाठी मलाही वॉलमार्ट आवडते. अतिशय योजनापूर्वक लावून ठेवलेल्या गोष्टी, योग्य दर* वर वैद्यांनी म्हटले तसे एखादी गोष्ट परत करायची झाल्यास खळखळ नाही.

चिनी ग्राहकांमध्ये - विशेषत: मध्यम आणि उच्च उत्पन्नाच्या वर्गामध्ये - अन्नातील भेसळीला कंटाळून 'brand name' रेस्टॉरंट (McDonald, KFC) आणि 'brand name' स्टोअर्स (वॉलमार्ट) कडे वळण्याची प्रवृत्ति वाढीला लागली होती. (ही अमेरिका-युरोपमध्ये दिसते त्याच्या अगदी विरुद्ध वर्तणूक आहे. अमेरिका-युरोपमध्ये ह्याच कारणासाठी ग्राहकांचा कल 'brand name' पासून दूर अशा स्थानिक, छोटया 'organic' उत्पादकांकडे आहे.)

अगदी! अगदी! वॉलमार्टपेक्षा ट्रेडर जो'ज् मध्ये जाऊ असे आम्ही म्हणतो आणि जातोही पण वॉलमार्ट हुशार आहे. ते ही बरेचसे ऑर्गॅनिक ब्रँड विकतात.

* दरांचा विचार करायचा झाल्यास वॉलमार्टमध्ये सर्वच गोष्टी इतरांपेक्षा कमी दरांत मिळतात हे खरे नाही. चलाख खरेदीदार दोन चार ठिकाणी तपास करून खरेदी करतो.

अवांतरः

मीही कधीही वॉलमार्टला सॅम मामांचे फोटो पाहिलेले नाहीत. (सॅम काका म्हणत नाही.) काल हा लेख वाचल्यावर आणि मला वाटेत वॉलमार्टला भरपूर खरेदी करायची असल्याने जाणे झाले होते. मुद्दाम सर्व भिंती शोधल्या. सॅम वॉल्टनचा फोटो कुठेही नव्हता आणि इतक्या वर्षांत इतर वॉलमार्टांतही पाहिल्याचे आठवत नाही. त्यांच्या ऑफिसच्या जागेत असेल तर माहित नाही.

असो. माझी तथाकथित भरपूर खरेदी $५० पर्यंत झाली. इतर ठिकाणचे भाव माहित असल्याने क्रोगर किंवा इतरत्र (टारगेट त्यामानाने स्वस्त आहे) हीच खरेदी सुमारे $६० पर्यंत झाली असती यात शंका नाही.

सॅम वॉल्टनचे चित्र

तसे मीहि कधी सॅम वॉल्टनचे चित्र स्टोअरमध्ये पाहिलेले नाही पण मूळ लेखात तसा स्पष्ट उल्लेख आहे.ईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईई
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईईईई

सॅम आणि कंपनीची टोपी
सॅम आणि कंपनीची टोपी

"Sam Walton's smiling visage (beneath a shovel-billed company cap) today hangs prominently in Walmart stores, much as Mao zedong's iconic image...."
इइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइ
स्टोअरच्या आत मॅनेजरच्या ऑफिसात कदाचित असू शकेल.
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइ
चित्र http://www.businesspundit.com/ येथून साभार.

अमेरिकेतील वॉलमार्ट

माझा लहानसा अनुभव फक्त अमेरिकेतल्या अल्फारेटा या एका लहानशा गावाच्या आसपास असलेल्या दोन तीन वॉलमार्ट बद्दल आहे, मला खालील गोष्टी त्यात जाणवल्या.
१. अवाढव्य विस्तार, तरीही सुरेख मार्गदर्शनामुळे हवा तो माल शोधणे सोपे.
२. खेळणी आणि सजावट यासारख्या नयनाकर्षक विभागात प्रामुख्याने चिनी वस्तू, अत्यंत स्वस्त किंमतीत.
३. नको असलेला माल परत करायचा असल्यास त्यासाठी कारण द्यावे लागत नाही. माल परत घेण्यासाठी एक वेगळे काउंटर
४. प्रचंड पार्किंग लॉट्समुळे ग्राहकांना गाड्या उभ्या करण्याची चांगली सोय, पण यामुळे आजूबाजूच्या वस्तीमधील ग्राहक तिथे येतात आणि त्यामुळे रस्त्यात वाहतुकीची कोंडी होते अशी स्थानिक लोकांची तक्रार.

इंग्लंडमध्ये लीड्स या गावी मला दाट लोकवस्तीच्या भागात अनेक लहान लहान कॉर्नर शॉप्स दिसली. ब्रेड, बिस्किटे यासारखी एकाददुसरी वस्तू घेण्यासाठी (आपल्याकडील दुकानांसारखीच) घराचाच एक भाग असलेली ती दुकाने अत्यंत सोयीस्कर असतात. तसली दुकाने मला अल्फारेटाला कमी दिसली . वॉलमार्ट खेरीज तशाच प्रकारच्या इतर मोठ्या स्टोअर्समध्ये जाऊन एकदम सगळी खरेदी करण्याकडे कल दिसला. पण त्यात बराच वेळ जातो.

 
^ वर