महाकाव्याचा विषय

आपल्याकडे देव-देवतांची नित्य तशीच नैमित्तिक पूजा-अर्चा होते.स्तोत्रे म्हणतात,आरत्या गातात.रामजन्म,कृष्णजन्म साजरे होतात.गणेश चतुर्थी,नवरात्री,शिवरात्री असे अनेक वार्षिक उत्सव असतात.साधुसंत,अवतारी मानलेले पुरुष,बुवा,बाबा यांचेही प्रकटदिन,पालख्या मिरवणुका असतात.
मानवाच्या प्रगतीत या सर्व उत्सवांचे काही योगदान आहे असे वाटत नाही.हे सर्व करमणुकीचे,मनोरंजनाचे,सामूहिक आनंदाचे प्रकार आहेत असे म्हणता येईल.
तसेच ऐतिहासिक राजे, योद्धे, शूरवीर यांचेही वार्षिक स्मरण होते. स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर, लोकनेते, पुढारी यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम असतात.पूर्वी होऊन गेलेले नामवंत लेखक,कवी,विविध क्षेत्रातील कलावंत यांचीही आठवण आपण काढतो.त्यांना आदरांजली वाहतो.
पण ज्यांच्यामुळे मानवाची एवढी आश्चर्यकारक प्रगती झाली, माणसाचे जीवन सुखकर आणि सुविधापूर्ण झाले,ज्यांच्यामुळे कोट्यवधी लोकांचे दु:ख कमी झाले, लक्षावधी लोकांचे प्राण वाचले, ज्यांच्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य या प्राथमिक गरजा बर्‍याच प्रमाणात पुर्‍या होऊ शकल्या, ज्यांच्यामुळे मनोरंजनाची नवनवीन दालने घराघरांत पोहोचली,ज्यांच्यामुळे माणसाचे खर्‍या अर्थाने कोटकल्याण झाले, त्या वैज्ञानिकांचे,संशोधकांचे, स्मरण किती जणांना कधी असते? अखिल मानवजातीवर ज्यांचे अनंत उपकार आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणारे अत्यल्पच दिसतात.
विचार करा:-
*वाफेच्या इंजीनाचा शोध लागला: बोटी चालू लागल्या, आगगाड्या धाऊ लागल्या.
*इंटर्नल कंबश्यन इंजिन शोधले: दुचाकी, चारचाकी वाहने पळू लागली. वाहतुक कितीतरी वेगवान, कितीतरी सुलभ झाली.
* विजेचा शोध लागला: यामुळे निर्माण झालेल्या सुविधांची यादी न संपणारी आहे. विजेचा उपयोग सर्वव्यापी आहे. रात्रीचा अंधार दूर झाला.
*पदार्थाचे गुणधर्म शोधले:अणूचे अंतरंग उलगडले. कितीतरी नवनवीन वस्तू ,नवनवीन साधने निर्माण झाली.
*सूक्ष्मदर्शक यंत्रातून जंतू पाहिले: अनेक रोगांवर प्रतिबंधक लसी, औषधे मिळू लागली. आजवर झालेल्या युद्धांमुळे जेवढी माणसे मृत्यू पावली असतील त्याच्या कितीतरी पट अधिक माणसे, शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या औषधांमुळे वाचली.त्यांचे अकाली मृत्यू टळले.
अखिल मानवजातीसाठी वैज्ञानिकांचे कार्य महान आहे.त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ असले पाहिजे.विज्ञानाला व्यक्तिपूजा मान्य नाही, हे खरे.पण वैज्ञानिकांच्या कार्याची जाणीव तरी आपण ठेवायला हवी.
वैज्ञानिकांविषयी आईनस्टाईन यांनी म्हटले आहे, "शुद्ध तात्त्विक पातळीवरचे वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी प्रचंड प्रयत्‍न, अविरत श्रम आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण समर्पणाची भावना भावना लागते.
अनेक संशोधकांनी निसर्गनियम जाणून घेण्याच्या आंतरिक ओढीने प्रचंड कष्ट उपसले. तहान भूक विसरून संशोधनात गढून राहिले. अशावेळी जीवनातील उपभोग, आर्थिकलाभ, प्रसिद्धी असल्या गोष्टींकडे लक्षच नसते. त्यांची अपेक्षा नसते.तीव्र आच असते ती सत्यशोधनाची. ही खरी तपस्या. ही खरी साधना."
अशा उच्चतम ध्येयांच्या साधनेसाठी वैज्ञानिकांजवळ असामान्य अंत:स्फूर्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असला पाहिजे. प्रयोग करताना वारंवार अपयश येतच असणार.पण निराश न होता,खचून न जाता त्यांनी पुन:पुन्हा अथक प्रयत्‍न कसे केले असतील त्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. " विजेचा बल्ब शोधताना एडिसनचे प्रयत्‍न हजार वेळा विफल ठरले. तो म्हणतो,"मी कांटाळलो नाही.प्रत्येक वेळी नवीन काही शिकलो."
हे सर्व समजू शकणार्‍या सुशिक्षित लोकांतील बहुतेकांना वैज्ञानिकांविषयी काहीच कृतज्ञता वाटू नये हे कसे? मानवतेचे खरे उपकारकर्ते वैज्ञानिकच आहेत,याची जाणीव का नसावी?
काल्पनिक देव-देवतांवर स्तुतिस्तवने आहेत,शूर पुरुषांवर पोवाडे आहेत.गौरवगीते आहेत.थोर लोकांवर काव्ये,कथा,कादंबर्‍या, नाटके आहेत.पण वैज्ञानिकांचा,मानवतेच्या खर्‍या उपकारकर्त्यांचा गुणगौरव होत नाही.त्यांच्यावर ललित लेखकांनी फार काही लिहिले आणि ते सर्वसामान्य लोकांत प्रचलित झाले, प्रसृत झाले असे दिसत नाही.
विज्ञानाची महती आणि वैज्ञानिकांचे अखिल मानवतेच्या कल्याणाचे कार्य हा खरे तर महाकाव्याचा विषय आहे. पण यावर कोणी समर्थ प्रतिभावंताने सर्वसामान्य लोकांना समजेल, आवडेल अशा भाषेत कांही लिहिल्याचे वाचनात नाही. ते सर्वतोमुखी झाल्याचे ऐकिवात नाही. मला वाटते "विज्ञानाची/वैज्ञानिकांची महती" हा महाकाव्याचा विषय आहे.
******************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

महाकाव्याचा विषय

महाकाव्याचा विषय असूही शकेल.
जनसामान्यांना त्यात "सत्याचा जय" झालाय असे सांगनार्‍या कथानकात गुंफले तर किंवा दुर्बळांवर अन्याय होणार नाही अशी मांडणी करत घटना सांगितल्या तर किंवा लोकांना त्यात आपल्याच राग-लोभ्-हेवा-समर्पण-परमानंद् ह्यांचे प्रतिबिंब पहायला मिळाले तर नक्कीच ह्या विषयावरही महाकाव्य बनेल.

--मनोबा

अंतःस्फूर्ती

मी स्वतः एक तंत्रज्ञ आहे आणि वैज्ञानिकसुध्दा समजतो. या क्षेत्रामधील महान लोकांचे कार्य अर्थातच मला अत्यंत मोलाचे वाटते आणि जमेल तेंव्हा जमेल तेवढे मी त्याबद्दल लिहीत असतो. पण ते लिखाण लोकांना आवडावे आणि त्यांनी ते वाचावे यासाठी त्यात साहित्यिक गुण असावे लागतात आणि त्यासाठी अंगात प्रतिभेचे लेणे असावे लागते.

माझी अशी धारणा आहे की महान साहित्यिक कृती कृतज्ञतेच्या भावनेतून किंवा ठरवून लिहिल्या जात नाहीत, त्या प्रतिभावान साहित्यिकांच्या अंतःस्फूर्तीमधून निर्माण होतात. रोजचे जीवन सुसह्य किंवा आरामशीर करणे या गोष्टीला त्यांच्या लेखी फार महत्व असत नाही. समाजाचे नेतृत्व करणारे किंवा प्रबोधन करणारे लोकच त्यांना स्फूर्ती देऊ शकतात. त्यामुळे तेच महाकाव्यांचे महानायक बनतात.

दोन स्वतंत्र विषय(?)

येथे (१) वैज्ञानिक महाकाव्याचा विषय का होऊ शकत नाहीत आणि (२) समाजाला शास्त्रज्ञांप्रती कृतज्ञता वाटत नाही असे दोन स्वतंत्र परंतु लेखनात एकमेकांशी जोडले गेलेले दोन मुद्दे असावे असे वाटते.

आता पर्यंत जी महाकाव्ये झाली किंवा जे लोकनायक झाले त्यांच्याबाबत एक पॅटर्न अवश्य दिसतो. अनैसर्गिक जन्म, जन्मतःच येणारे संकट (किंवा आई-वडिल, कुटुंबावर येणारे संकट), आश्रयदाते (किंवा शिक्षक, गुरु), आत्मिक उन्नती, इतरांपेक्षा वेगळे उठून दिसणे, संकटाशी सामना/ प्रबोधन/ नेतृत्व, अनैसर्गिक मृत्यू आणि त्या मृत्यूतूनही पुन्हा परतायची आशा. थोड्याफार फरकाने, एखाददुसरा मुद्दा कमी जास्त करून हर्क्युलिस, कृष्ण, राम, बुद्ध, जीजस, मोझेस, शिवाजी असा कोणताही "हिरो" येथे बसवता येईल. सत्याची बाजू, धैर्य, साहस, नेतृत्व आणि समाजमान्यता हे "हिरो"चे विशेष गुण असतात.

पोवाडे, काव्य, कथा वगैरेंतून चमत्कार, योगायोग आणि अर्तक्य घटनांची फोडणी देऊन कल्पनाजाल विणले जाते. जेव्हा संघर्षाचे प्रसंग कमी पडतात तेव्हा त्याला नाटकी स्वरूप देऊन भरीची प्रकरणे त्यात घातली जातात. या कल्पनाजालात वाचकाने फसावे, त्याच्या रटाळ नित्यक्रमात दिलासा देणारे क्षण निर्माण व्हावेत हाच उद्देश असतो.

विज्ञान आणि वैज्ञानिकांना यांत बसवता येणे शक्य आहे पण त्यासाठी चमत्कार, योगायोग, नायकाला लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्व बहाल करणे पटत असेल तर नक्की करावे. मीठ मसाला भरलेले पोवाडे, किर्तने, काव्ये रचल्याने आणि त्यांच्या श्रवण पठणाने मोठ्या जनसमुदायापर्यंत वैज्ञानिकांची करणी पोहोचू शकेल परंतु असे करणे ही विज्ञानाशी घेतलेली फारकत नव्हे काय?

दुसरा मुद्दा सुशिक्षित समाजाला शास्त्रज्ञांप्रती कृतज्ञता वाटत नाही. हे खरे नसावे.कृतज्ञता वाटणे आणि कृतज्ञतेचे अवडंबर माजवणे या वेगळ्या गोष्टी आहेत. मनुष्य खरेच सुशिक्षित असेल तर तो हे अवडंबर माजवेल असे वाटत नाही. विमानप्रवास करताना ज्याप्रमाणे एखाद्याला हमखास देवाची आठवण येत नाही त्याचप्रमाणे हमखास राइटबंधूंचीही आठवण येत नसावी आणि ज्यांना देवाची आठवण येते ती केवळ त्याचे "लार्जर दॅन लाइफ" व्यक्तिमत्वामुळे किंवा त्याच्याविषयी पसरवलेल्या भाकड कथांमुळे.

व्यक्तिशः बोलायचे झाले तर रोज संध्याकाळी दिवा लावताना मला शुभम् करोती म्हणून देवाची आठवण काढण्यापेक्षा एडिसन आणि निकोला टेस्लाची आठवण काढायला आवडेल पण प्रत्यक्षात मी ते दोन्ही करत नाही आणि करणे शक्य आहे असे मला वाटत नाही. अंधार पडला, दिवा लावला ही कृती अगदी यांत्रिकपणे होते, त्यात कोणताही आणि कोणाही प्रती कृतघ्नतेचा अंश नाही.

बाकी, वैज्ञानिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाकाव्ये, पोवाडे (किंवा समाजावर होणारा दृकश्राव्य मारा) हा एकमेव उपाय असावा काय?

+१

प्रतिसाद पटला, आवडला.

+१

महाकाव्य तर श्रध्दाळू होण्यासाठिची पहिली पायरी...हरकत नाही.

कृतज्ञतेची जाणीव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली म्हणतात,
"(१) वैज्ञानिक महाकाव्याचा विषय का होऊ शकत नाहीत आणि (२) समाजाला शास्त्रज्ञांप्रती कृतज्ञता वाटत नाही असे दोन स्वतंत्र परंतु लेखनात एकमेकांशी जोडले गेलेले दोन मुद्दे असावे असे वाटते."

त्यांचे हे निरीक्षण अगदी अचूक आहे.पण वैज्ञानिकांप्रति कृतज्ञतेची भावना असली तर ती अभिव्यक्त करण्यासाठी काही लेखन होते. अंततः एखाद्या प्रतिभावंताला विज्ञान/वैज्ञानिक या विषयावर खंडकाव्य स्फुरूं शकते.पण वैज्ञानिकांनी मानवसमाजावर केलेल्या उपकारांची जाणीवच समाजात(केवळ आपल्या देशातील नव्हे तर जगभरातील) निर्माण झालेली नाही. कोणी तशी निर्माण केलेली दिसत नाही.माणसाला अजूनही वास्तवापेक्षा काल्पनिक अद्भुत,अजब-गजब अधिक आवडते असे दिसते.

हे खरेच आहे

माणसाला अजूनही वास्तवापेक्षा काल्पनिक अद्भुत,अजब-गजब अधिक आवडते असे दिसते.

हे तर सत्य आहे म्हणूनच आजही हॅरी पॉटर लहान थोर सर्वांमध्ये प्रसिद्ध होतो. आजच्या वाचकांचा "हिरो" बनतो.

अनैसर्गिक जन्म, जन्मतःच येणारे संकट (किंवा आई-वडिल, कुटुंबावर येणारे संकट), आश्रयदाते (किंवा शिक्षक, गुरु), आत्मिक उन्नती, इतरांपेक्षा वेगळे उठून दिसणे, संकटाशी सामना/ प्रबोधन/ नेतृत्व, अनैसर्गिक मृत्यू आणि त्या मृत्यूतूनही पुन्हा परतायची आशा या "हिरोच्या" सर्व अवस्थांना हॅरी स्पर्श करतो.

?

काल्पनिक देव-देवतांवर स्तुतिस्तवने आहेत,शूर पुरुषांवर पोवाडे आहेत.गौरवगीते आहेत.थोर लोकांवर काव्ये,कथा,कादंबर्‍या, नाटके आहेत.पण वैज्ञानिकांचा,मानवतेच्या खर्‍या उपकारकर्त्यांचा गुणगौरव होत नाही.

वैज्ञानिकांबाबत कथा-कादंबर्‍या वाचल्यासारख्या वाटतात. (मेंडेल, मारी क्यूरी, जॉन नॅश वगैरेंबाबत...) अधूनमधून जन्मशताब्दी वगैरे सुद्धा साजर्‍या होतात. विसाव्या शतकातला आइनस्टाईन हा जगभर प्रेमादरास पात्र आहे, तितका कुठल्याही देशाचा पुढारी जगद्वंद्य नाही.

बाकी युद्धकथा थरारक असते. धोकादायक तंत्रज्ञानाबाबत थरार-कथासुद्धा वाचलेल्या आहेत.

एडिसनबाबत दंतकथा आहेत, न्यूटनबाबत सफरचंदाची दंतकथा तर सर्वांना लहानपणापासून ठाऊक आहे...

महाकाव्ये

मी लहानपणीच मारी क्यूरीबद्दल ऐकलेले आहे, वाचलेही होते. तिच्यावरील एक पुस्तक आमच्या बहिणीस अगदी प्रचंड प्रियही होते - इतके की ती कॉलेजात असताना ट्रंकेचे टेबल करून वापरी म्हटल्यावर आमच्या शा़ळकरी ताईंनी घरातली जुनी ट्रंक काढून त्याचे टेबल बनवले! (ते टेबल फार सोयीचे होते, जमिनीवर छान मांडी घालून अभ्यास करायला बसता येई) असो.

एखादी व्यक्ती हीरो वाटणे हे कुठल्याही काळात, कोणाही आदर असलेल्या व्यक्तीसोबत होऊ शकते.

फक्त महाकाव्य होण्यासाठी मादाम क्यूरीचे काम लोकांना थोडेतरी जास्त माहिती असणे गरजेचे आहे असे वाटते. महाकाव्याच्या नायकांनी/नायिकांनी बर्‍याच लोकांना आकर्षित करून घेतले असण्याची शक्यता खूपच जास्त आहे. हे सामाजिक किंवा राजकीय पातळीवरील व्यक्तींबद्दल सर्वात जास्त शक्य आहे असे वाटते. राम आधी राजकुमार होता, मग देव झाला. कृष्णाचेही साधारण असेच. एवढेच काय पण बुद्धाचेही तेच.

आजच क्यूबावर आधारित एका भाषणास जाण्याचा योग आला. फिडेल कॅस्ट्रो, चेन ग्विवेरा (उच्चार नक्की माहिती नाही) असे "हीरो" समजले जातात. तेच होजे मार्टीचे. उद्या फिडेल कॅस्ट्रोवर महाकाव्य लिहीले गेले तर आश्चर्य वाटायला नको.

अजून एक

क्यूबामध्ये होजे मार्टी आणि चेन वग्विवेरा यांचे पुतळे, चित्रे सगळीकडे दिसत राहतात असे ऐकले होते. या पुतळ्यांवरून आठवण झाली, सहज पाहिले तर मारी क्यूरीचाही पुतळा वॉर्सा येथे आहेच.
दुसरा.

वैज्ञानिकांचा गुणगौरव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय तसेच चित्रा निदर्शनाला आणून देतात की वैज्ञानिकांवर कथा,कादंबर्‍या लिहिल्या आहेत, त्यांचे पुतळे उभारले आहेत.
..
असा गुणगौरव झाला आहे यांत शंका नाही.अनेक वैज्ञानिकांची चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्याविषयी कथा,कादंबर्‍या,नाटके आहेत.काही चित्रपटही निर्माण झाले असतील.पण प्रमाण अगदीच नगण्य आहे.सर्वसमान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्याविषयी फारसे काही माहितच नाही . प्राथमिक स्वरूपाच्या सोप्या वैज्ञानिक कल्पनांविषयी अनेक लोक अनभिज्ञ दिसतात.परवा खग्रास चंद्रग्रहण झाले म्हणजे नेमके काय झाले ते लोकांना सांगता येत नाही. त्यावेळी चंद्रावर खग्रास सूर्यग्रहण होते हे समजणे तर दूरच. मात्र अध्यात्माविषयींच्या ब्रह्म,माया,आत्मा,पुनर्जन्म, मोक्ष असल्या कल्पना अगदी अशिक्षिताना सुद्धा पिढ्यान् पिढ्या ठाऊक असतात.लोकांना अजूनही सत्याच्या आकर्षणापेक्षा कल्पिताचे आकर्षण अधिक आहे.

शास्त्रज्ञ आणि संशोधक हे काव्याचे विषय का होत नाहीत?

शास्त्रज्ञ आणि संशोधक हे काव्याचे विषय का होत नाहीत ह्याची माझ्या मते दोन कारणे असावीत.

शास्त्रीय सिद्धान्त आणि त्यांच्यावर आधारित तन्त्रज्ञान ह्यामुळे मनुष्याचे आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो आणि मानवी जीवन अधिक सुखकारक/सोपे होते हे निर्विवाद पण त्यांची निर्मितिप्रक्रिया ही बहुतांशी low-key आणि भावनारम्यतेऐवजी बुद्धिगम्यतेकडे झुकणारी असते. असे विषय काव्यविषय होऊ शकत नाहीत. तसेच ज्या क्षणाला एखादे शास्त्रीय सत्य सापडते किंवा त्याच्यावर आधारित तन्त्रज्ञान जन्मते - उदा. पहिला बल्ब आणि पहिला फोन - त्या क्षणाला त्याच्या निर्मात्याशिवाय कोणालाच त्याचे महत्त्व जाणवत नसते. अनेक वेळा तर निर्मात्यालादेखील त्याच्या कामाचा किती दूरगामी परिणाम होणार आहे ह्याची जाणीव नसते. त्या क्षणानंतर अनेक वर्षे, दशके आणि कधीकधी शतके लोटल्यानंतरच त्या संशोधनाचे वा तन्त्रज्ञानाचे महत्त्व सर्वसामान्य पातळीवर ओळखले जाऊ लागते.

दुसरे कारण म्हणजे ही निर्मितिप्रक्रिया incremental असते. प्रत्येक शास्त्रज्ञाचे कार्य त्याच्या पूर्वीच्या शास्त्रज्ञांच्या कार्याच्या खांद्यावर उभे असते. आइन्स्टाईन थोर खराच पण रिमानियन भूमितीशिवाय त्याचे कार्य सिद्धीस गेले नसते. काव्याचा विषय होण्यासाठी एखाद्या गोष्टीत जी चमक वा romance -आणि तोहि सर्वसामान्यांना जाणवणारा, अभिजनांना नव्हे - लागतो तो संशोधनात वा नव्या तन्त्रज्ञाननिर्मितीमध्ये अभावानेच असतो.

शास्त्रनिर्मिति उपकारक असली तरी ती बहुतेकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही हे स्वभावसिद्ध आहे.

+१

प्रतिसाद् आवडला. पटला.
त्यातही पहिले कारण व त्याचे स्पष्टीकरण अधिकच भावले.

--मनोबा

महाकाव्य

लेखकाचे लेखन कितीही त्याच्या अंतःप्रेरणेला साद घातलेले, स्वान्तसुखाय वगैरे असले तरी त्यात कळत नकळत कुठेतरी वाचकाचा अनुनय केलेला / झालेला असतो असे मला वाटते. 'कलेसाठी कला' या विशुद्ध भावनेतून केवळ नवनिर्मितीचा आनंद मिळवायचा म्हणून लिहिणारे लेखक/ कवी किती असतील? आंतरजालावर फुटकळ लेखन करणार्‍या लेखकांना/ कवींनाही आपल्या लिखणाला प्रतिसाद किती येतात याची उत्सुकता असतेच की. त्यामुळे 'मागणी तसा पुरवठा' या न्यायाने जगात ज्याची चलती आहे त्यावरच लोक लिहिणार. समाजात शंभरातल्या नव्व्याण्णवांना नसले तरी शंभरातल्या नव्वदांना विज्ञानाशी काही देणे-घेणे नसते. (आंतरजालावर वावरणार्‍यांची आकडेवारी यात घेऊ नये. आंतरजालावर वावरणारे लोक म्हणजे समाजाचे प्रतिबिंब नव्हे.) त्यामुळे अवतारी पुरुष, बाबा, माई, देवदेवता, इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ती यांच्यावरच महाकाव्ये, पोवाडे , नाटके लिहिली जाणार, आणि लोक तीच वाचणार. 'रायगडाला जेंव्हा जाग येते', 'इथे ओशाळला मृत्यू', 'हिमालयाची सावली' वगैरे उदाहरणे आहेतच. पण याला अपवाद म्हणून 'सूर्य पाहिलेला माणूस' सारखे सॉक्रेटिसच्या जीवनावर आधारलेले नाटकही आहे. पण अशा अपवादांनी नियमच सिद्ध होतो. शेवटी सामान्य लेखक, कवी तरी काय, समाजासमोर एक आरसाच धरत असतो. जसा समाज, तसेच त्या समाजात साहित्य तयार होणार. याच्या उलटे आजच्या घडीला घडत असेल असे मला तरी वाटत नाही. जन्मभर रसिक प्रेमकविता, निसर्गकविता लिहिणार्‍या बोरकरांना आयुष्याच्या शेवटच्या काळात गांधींवर लिहावेसे वाटले, न्यूटनवर नाही. आणि हे तर बोरकरांसारख्या 'मुक्ती नको' अशी भावना बाळगलेल्या कवीबाबत झाले. इतर बरेच लेखक - कवी तर वानप्रस्थाश्रम, संन्याशाश्रमासारखे आयुष्याच्या उरतणीला चक्क टाळमृदुंगी लेखन करु लागतात. मला वाटते, समाज एक अदृष्य चौकट ठरवून देतो आणि त्या चौकटीच्या बाहेर जाणे सामान्य लेखकाला, कवीला जमत नाही. फक्त ती चौकट अदृष्य असल्याने त्यातल्या त्यात तिच्या कडेकडेने लेखन करणारे लेखक, कवी समाजाला वेगळे वाटतात इतकेच.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

ऐसीअक्षरे: नमामि चार्ल्सं डार्विनम्

यनावाला जे म्हणताहेत ते अगदी योग्य आहे. आमच्यात इतकी प्रतिभा नाहि नाहितर महाकाव्य नक्कीच लिहिता यावे.
सुरवात म्हणून ऐसी अक्षरेवर आम्ही काहि स्तोत्रे लिहायला घेतली होती. त्यात इच्छुकांनी भर घालावी.
वैज्ञानिकांची स्तोत्रे इथे वाचता येतील: नमामि चार्ल्सं डार्विनम् ;)

ऋषिकेश
------------------
एक प्रसिद्ध हायकू:
कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

महाकाव्य होऊ शकत नाही

लेखातील विचार आणि "वैज्ञानिकां" विषयी प्रकट झालेली कृतज्ञतेची भावना योग्य वाटते. पण असे असले तरी तो घटक महाकाव्याचा विषय होऊ शकेल असे वाटत नाही (झाला तर आनंदच होईल यात शंका नाही, पण ती शक्यता धुसर आहे).

उपक्रमवरील एका ताज्या चर्चा-प्रस्तावात पृथ्वीच्या जन्मास २७ महायुगे झाली असून प्रत्येक महायुग साधारणपणे ३० कोटी वर्षांचे आहे असे गृहितक मांडले गेले आहे. त्या विषयाच्या खोलात न जाता फक्त ते विधान उदाहरणादाखल घेतल्यास "वैज्ञानिक" या संज्ञेस पात्र असलेल्या जमातीचे वय साधारणतः आपण एक-दोन हजार वर्षाचे धरल्यास त्या वर्षापासून श्री.यनावाला म्हणतात त्याप्रमाणे बोटी चालू लागल्या, आगगाड्या धावू लागल्या, अन्य वाहने आली, विजेचे शोध लागले, अणुचे अंतरंग उलगडले, अनेक रोगांवर प्रतिबंधक लसी औषधे मिळू लागली...इत्यादींची उपलब्धता वैज्ञानिकांमुळे झाली आणि तीमुळे मानवी जीवन सुखी, सुसह्य, आरामदायी बनले. असे जर मानले, तर मग त्या एकदोन हजार वर्षापूर्वी 'माणूस' सुखी नव्हता का ? बोट आगगाडी नव्हती म्हणून त्याचा प्रवास थांबला होता ? अत्याधुनिक औषधे नव्हती म्हणून तो आजारी पडल्यास त्याच्यावर उपचार होत नव्हते ? विजेचे बल्ब नव्हते म्हणून त्याची ज्ञानलालसा थंडावली होती ? विविध भाषांतील अजरामर ग्रंथ तर मेणबत्ती आणि कंदिलाच्या उजेडातच निर्माण झाले तर थक्क करून टाकणार्‍या भव्यदिव्य शिल्पकलाही कोणत्याही "इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेन्ट्" च्या मदतीशिवायच आकाराला आल्या हा तर स्वच्छ इतिहास आहे. त्या अज्ञात कलाकारांच्यावर जर कुणी महाकाव्ये लिहिली नसतील तर मग तशी वैज्ञानिंकाच्यावर लिहिली गेली नसल्यास त्यात नवल वाटायचे कारण नाही. "शोध" वृत्ती ही मानवी जीवनाच्या घडामोडीशी निगडित असलेली एक बाब आहे. त्यापोटी निर्माण झालेल्या या सुविधा असल्याने त्या त्या पिढीने त्याचा लाभ घेतला असे फारतर म्हणता येईल. वर लिहिलेले शोध जर आईन्स्टाईन, एडिसन, राईट् बंधूनी लावलेच नसते तर या पृथ्वीवरील माणसाचे जगणे 'बिकट वाट वहिवाट" असे झाले असते याची शक्यता नाही. मानव अश्मयुगाच्याही अगोदर जगत होता, विचार करीत होता त्याच तालेवर विज्ञानयुगात जगतो आहे, आणि त्याशिवायही जगलाच असता.

त्यामुळे वैज्ञानिकांचे कार्य हे जसे साहित्यिकांचे, शिल्पकारांचे, चित्रकारांचे, संगीतकारांचे कार्य असते/होते/आहे, त्याच पठडीतील असल्याने जर शेक्सपिअर, मायकेलअँजेलो, पिकासो, मोझार्ट यांच्यावर महाकाव्य होऊ शकत नसेल तर आईन्स्टाईनवर होत नाही यात आश्चर्य मानण्यासारखे काही नाही.

अशोक पाटील

सहमत आहे

विविध भाषांतील अजरामर ग्रंथ तर मेणबत्ती आणि कंदिलाच्या उजेडातच निर्माण झाले

भव्यदिव्य शिल्पकलाही कोणत्याही "इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेन्ट्" च्या मदतीशिवायच आकाराला आल्या

त्यामुळे वैज्ञानिकांचे कार्य हे जसे साहित्यिकांचे, शिल्पकारांचे, चित्रकारांचे, संगीतकारांचे कार्य असते/होते/आहे

सहमत आहे. वैज्ञानिकांच्या कार्याप्रमाणे साहित्यिकांचे, शिल्पकारांचे, चित्रकारांचे, संगीतकारांचे वगैरेंचे कार्य देखील कमी महत्त्वाचे नाही.
तेव्हा यापैकी (किंवा खरेतर इतर) कोणतेही कार्य न करणार्‍या तद्दन काल्पनिक देवादिकांवरील महाकाव्यांपेक्षा या अनाम माणसांवरही महाकाव्य लिहिली गेली पाहिजेत या मताशी सहमत आहे

ऋषिकेश
------------------
एक प्रसिद्ध हायकू:
कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

हम्म

कोणतेही कार्य न करणार्‍या तद्दन काल्पनिक देवादिकांवरील ....

ईश्वराचे अवतार असोत की सच्चे सत्पुरूष, ते ही 'धर्मसन्स्थापनार्थाय' यथायोग्य कार्य करतच होते, आहेत आणि राहतील. तेही 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' अशीच शिकवण देत आलेले आहेत. गीतेत नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेल्यालाही लोकसन्ग्रहासाठी कर्म करत राहणे आणि कर्तव्यदक्ष राहणे टाळता येणार नाही, तो अधर्म ठरेल असाच उपदेश आहे एवढेच विनम्रपणे सुचवतो.

(वैज्ञानिकांच्या सत्कार्याबद्दल समाजात आदरभाव वाढावा याबद्दल सहमत. 'दिव्यत्वाची ये जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असाच समाजाचा निसर्गतः सर्वसाधारणपणे व्यवहार होतो. एकेकाचे टोकाचे पूर्वग्रह असतात ते त्याचे त्याला लखलाभ होतात. सगळा समाज मिळून एकन्दर अमुक इतकाच आदरभाव दाखवू शकेल, त्याउपर नाही अशी कुठली मर्यादा अस्तित्वात नाही. त्यामुळे अमुक एकाविषयी अनादर दाखवला तरच तमुक एकाविषयी आदर व्यक्त करता येईल अशा पद्धतीचे विचार सयुक्तिक वाटत नाहीत. असो. )

कष्टमय जीवन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अशोक पाटील यांनी प्रश्न केले आहेत,
..".... एकदोन हजार वर्षापूर्वी 'माणूस' सुखी नव्हता का ? बोट आगगाडी नव्हती म्हणून त्याचा प्रवास थांबला होता ? अत्याधुनिक औषधे नव्हती म्हणून तो आजारी पडल्यास त्याच्यावर उपचार होत नव्हते?"

.
*दोनशे वर्षांपूर्वीच्या सैपाक घराची कल्पना करा.किचन ओटा, गॅस,सिंक,नळ,मिक्सर काहीं नाही.चुलीत लाकडे जाळून सैपाक.धूर.विहिरीचे पाणी.पहाटे जात्यावर दळण.स्त्रियांचे जीवन किती कष्टमय!

*प्रसूती म्हणजे जीवावरचा प्रसंग.पेशव्यांच्या अनेक स्त्रिया बाळंतपणीं गेल्या. नाना फडणिसांच्या आठ बायकांचे नवजात अर्भकांसह निधन झाले.प्लेग,पटकी अशा साथीत हजारो माणसे पटापट मरायची.इ.स.१९२० मध्ये माणसाचे सरासरी आयुर्मान ४० वर्षे होते.आता ते ७० वर्षे आहे.त्याकाळी माणूस सुखी होता असे म्हणायचे का?
*वीस हजार वर्षांपूर्वी माणसे टोळी करून राहात.दिवसा अन्नासाठी धडपड.हींस्र श्वापदे,साप,विंचू पदोपदी नित्य भीती.वादळे,वणवे,अतिवृष्टी,महापूर यांची नैमित्तिक भीती.रात्री गडद काळोख,निबिड अरण्य,गुहा.माणूस सुखी होता का? त्याने प्रजोत्पती केली. म्हणून आज आपण इथे आहोत हे मात्र खरे.
असो.लिखाण भरकटले.क्षमस्व.

कैच्याकै

विविध भाषांतील अजरामर ग्रंथ तर मेणबत्ती आणि कंदिलाच्या उजेडातच निर्माण झाले

एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावायच्या आधी रात्री मेणबत्ती आणि कंदिलाच्या उजेडात काम चालत असणार हे उघड आहे. पण अजरामर ग्रंथ काय फक्त रात्रीच लिहिले गेले? दिवसा नाही? की त्या काळात सूर्याचा शोध लागलेला नसल्याने दिवस नावाची कल्पनाच नव्हती, सर्वत्र सर्वकाळ रात्रच होती असे काही आहे? उगीच काहीतरी लिहायचे झाले!

प्रतिसादातील भाषा

विनायकराव

~ हाती आहे टंकलेखनाची सोय आणि 'उपक्रम' देत आहे प्रतिक्रियेसाठी आवश्यक ते स्वातंत्र्य म्हणून एखाद्या सदस्याच्या मतावर "उगाच काहीतरी" अशा स्वरूपाचे बालिश शेरे मारण्याची तुम्हाला मोकळीक आहे हे मान्य आहे म्हणून वाचणार्‍याने ते जसेच्या तसे स्वीकारावे अशी उपक्रमने मला सक्ती केलेली नाही म्हणून हा माझ्या प्रतिसादाबाबतच खुलासा :

बल्ब शोधाच्या अगोदर झालेले लिखाण दिवसा उजेडीही होत असणार हे तुम्हाला जसे समजते तसे इथल्या सर्वानाच असणार हे गृहित धरावे. मग मी प्रवासाविषयीही लिहिले होते, त्यावेळीदेखील लोक दिवसा उजेडी आणि रात्रीबेरात्रीही पलित्यांच्या उजेडात प्रवास करीत असणारच ना ? वैज्ञानिक युगाच्या अगोदरच्या परिस्थितीचे वर्णन करताना एखादे दुसरे उदाहरण द्यावे म्हणून तो ग्रंथ लिखाणाचा उल्लेख, इतकेच त्याचे महत्व, त्याला 'काहीतरी लिहायचे' असा टॅग देण्याची गरज नाही. ताजमहाल, खजुराहो, मीनाक्षी मंदिर, अजंठा अशी थक्क करणारी बांधकामे करणारे कलाकार आणि त्यांच्या हाताखालील मजूर तुमच्या म्हणण्याप्रमाणे फक्त दिवसाउजेडीच काम करीत होते असे मानावे काय ?

"गॅलिलिओ एका छोट्याशा दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा. ग्रॅहम बेल मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचा. शेक्सपिअर तर चक्क पदपथावरील दिव्यांच्या खाली बसून अभ्यास करायचा. आगरकरांनी मुन्शिपाल्टीच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास केला" असे काहीसे वर्णन आपण वेळोवेळी ठिकठिकाणी वाचत आलो आहोत. मग "या दिग्गजांना दिवसा अभ्यास करता आला नसता काय? दिवसभर ही मंडळी काय माळावर उनाडक्या करीत फिरत होती की काय ?" असले बालिश प्रश्न उभा करता येतीलच. अशी उदाहरणे फक्त मुद्द्यासाठी आणि नवीन पिढीला अभ्यासाचे, चिकाटीचे महत्व पटवून देणारी असतात; इतपतच त्यांचे महत्व.

अशोक पाटील

कृतज्ञता

एकंदर समाज शास्त्रज्ञ अथवा वैज्ञानिकांबद्दल कृतज्ञ नसतो, असे वाटत नाही. वेळोवेळी त्यांचे स्मरण केले जाते. अनेक वास्तूंना, वस्तूंना, वैज्ञानिक परिभाषांना, नव्या संकल्पनांना शास्त्रज्ञांची नावे दिली जातात.
नुकतेच घडलेले एक उदाहरण म्हणजे स्टीव्ह जॉब्सचे निधन झाल्यानंतर जगभर- अगदी भारतासारख्या तिसर्‍या जगातल्या देशांतूनही पसरलेली शोकाची उत्स्फूर्त लाट. स्टीव्हचे कार्य (कदाचित) एडिसन, जेम्स वॅट, ग्राहम बेल किंवा आईन्स्टाईनइतके मानवी प्रजातीस उपकारक नसावे, तरीही हे घडले. ही त्याच्या बुद्धीमत्तेला वा कल्पकतेला समाजाने दिलेली दाद होती असे मला वाटते.

(त्यांच्यावर महाकाव्ये लिहिली जावीत अथवा नाही, याबद्दल काही निश्चित मत नाही. असलीत तरी चालेल, नसली तरी फरक पडत नाही, असे वाटते. असो.)

पुरावा द्या

इ.स.१९२० मध्ये माणसाचे सरासरी आयुर्मान ४० वर्षे होते

पुरावा द्या

१९२० मध्ये सरासरी आयुर्मान

इ.स.१९२० मध्ये माणसाचे सरासरी आयुर्मान ४० वर्षे होते हे विधान कोठल्या देशाला उद्देशून आहे का सर्व जगासाठी आहे हे कळत नाही.ईईईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईई
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईई

पण मला येथे दिसल्याप्रमाणे "According to the Centers of Disease Control and Prevention, life expectancy at birth has risen to a new high of nearly 78 years. Two thousand years ago the average Roman could expect to live 22 years. Those born in 1900 could only expect to live 47.3 years."ईईईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईई ईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईई
पुन: हे विधान सर्व जगाच्या संदर्भात आहे की केवळ अमेरिकेच्या हे कळत नाही. अर्थात् ते अमेरिकेच्या संदर्भात असले तर हिन्दुस्थानात ते ४७.३ पेक्षा बरेच खाली असणार.इइइइ
ईईईईईईईईईईईईईईईईईईई ईईईईईईई ईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईईईई ईईई ईईई ईईई ईईईईईईईईईईईई ईईईईईईईईईईईईईई इइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइ

विज्ञान आणि भारतीय समाज

भारतीय समाज हा पहिल्यापासूनच विज्ञानाच्या बाबतीत उदासीन आहे. इथे संत, साहित्य, कला, देव, कुटुंब, प्रेम, माणुसकी, त्याग या सगळ्याला भौतिक सुखापेक्षा आणि गणिती आकडेमोडीपेक्षा जास्त महत्व आहे. कारण माणूस संस्कारांमुळॅ घडतो, विज्ञानामुळे नाही. त्यामुळे एखादा साधा माणूस सुध्दा महाकाव्याचा विषय होऊ शकतो, शास्त्रज्ञ सुध्दा होऊ शकतो पण त्याच्यातल्या माणूसपणावरच महाकाव्य लिहिले जाईल, त्याच्या शोधांवर नव्हे.

सगळ बरोबर् आहे पण्..

मुळात भौतिक विज्ञानात कोणतीच डेव्हलपमेंट होत नसल्याने, होय् विज्ञानात् प्रगती न्हवे तर फक्त क्रिएटीव्हीटी साधता येते संपुर्ण विज्ञान हि फक्त् आधीच उपलब्ध असलेल्या घटकांची केवळ कल्पक योजना होय. म्हणुनच हि प्रगती ही केवळ् जे आधिच अस्तित्वात आहे त्याची कल्पक मांडणी यापलिकडे आणखि काहीच न्हवे. त्यांमुळे मुळातच ति मानवाला प्रगत/प्रगल्भ होण्यासाठी न्हवे तर केवळ मनोरंजनासाठीच वापरता येते ज्याचा सातत्याने कंटाळा येतच् असतो..... म्हणुनच् मानसाची प्रगती ही केवळं आंतरीक् घड्ली तरच ति घडली म्हणाय्ची.. बाकि मनोरंजन काय दारु पिल्यावरही होतेच्...... मनोरंजनाची सोय म्हणजे प्रगती हाच् मुळात् चुकिचा सिध्दांत् असल्याने शास्त्रद्न्यां विषयि भलेहि कृतद्न्य भाव् असेल.. पण महाकाव्य् ...? कैच्याकै...

पहिल्या तासात सराईत प्रतिसाद

उपक्रमावर स्वागत आहे.
स्वगतः सभासदत्त्व घेतल्याच्या पहिल्या तासात असा सराईत प्रतिसाद! कमाल आहे.

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

स्वागत| असहमती नोंदवते

नवीन अनबोर्न थायसेल्फ (मजेशीर टोपणनाव आहे) यांचे स्वागत आहे. उपक्रमावर अकारान्त शब्दात अ मिसळावा लागतो या कडे कृपया लक्ष पुरवावे.


स्वगतः सभासदत्त्व घेतल्याच्या पहिल्या तासात असा सराईत प्रतिसाद! कमाल आहे.

सभासदत्त्व घेतल्यावर पहिल्या तासात असा सराईत प्रतिसाद देणारे आतापर्यंत उपक्रमावर अनेकजण आहेत. अगदी सभासदत्व घेऊन ताबडतोब लेख टाकणारे ही अनेक आहेत आणि पहिल्या तासात दिले नसतील पण सदस्यत्व घेतल्यावर लवकरच अतिशय सराईत प्रतिसाद देणारेही अनेक आहेत. काही नावे घ्यायची झाली तर (आताचे निखिल जोशी, नीलपक्षी, आडकित्ता, मायनॅक, आजूनकोणमी वगैरे) तेव्हा स्वागताची ही पद्धत कोणती? ऋषिकेश यांच्या स्वगतावर असहमती नोंदवते.

अशाप्रकारच्या प्रतिसादांनी खरेच नवीन आलेले सदस्य नाराज होण्याची शक्य आहे. यावर पूर्वी या विषयावर आपली चर्चा झालेली होती असे आठवते. निदान "बेनेफिट ऑफ डाऊट" म्हणून तरी आल्या आल्या असे प्रतिसाद नको असे सुचवते.

बेनिफिट

बेनिफिट देऊन अन्बोर्न थायसेल्फ यांची माफी मागत आहे

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

अवांतर..ट्रोल वगैरे

स्वगतः सभासदत्त्व घेतल्याच्या पहिल्या तासात असा सराईत प्रतिसाद! कमाल आहे.

बालवयातील* सदस्य "थोर" पाहुणे नसतील कशावरुन?

*सदस्यत्वाच्या आधारे, वेगळा अर्थ काढू नये.

 
^ वर