फेसबुक गुगल आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य

कपिल सिब्बल ह्यांनी फेसबुक, गुगल वगैरे कंपन्यांना सेन्सॉरची कात्री लावण्यासाठी सरकार योजना बनवत असल्याची घोषणा केली, जी सध्या बरीच चर्चेत आहे. सिब्बल ह्यांच्या मते फेसबुक आणि गुगलवर असणारी काही घृणास्पद पाने भारताच्या शांतता आणि सुरक्षेला धोका पोहचवणारी आहेत, ज्यावर ह्या कंपन्यांनी वारंवार सूचना देऊनही काहीही कारवाई केलेली नाही. ह्या कंपन्यांनी असेच धोरण ठेवल्यास सरकारला पावले उचलणे भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे.

ह्यावर इंटरनेट कंपन्यांनी बेकायदेशीर मजकूर काढून टाकू पण कायद्याच्या चौकटीत बसणारा कोणताही मजकूर काढणार नाही अशी भूमिका घेतली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अमेरिकेत असलेले धोरण आम्ही सगळीकडे वापरणार, अशी त्यांची भूमिका आहे. फेसबुक, गूगलचे आंतरराष्ट्रीय वजन पाहता हा सामना चांगलाच रंगणार असे दिसत आहे.

सिब्बल ह्यांनी उदाहरणा दाखल काही मजकूर दिला आहे.
१. 'आय हेट सोनिया गांधी' आशयाची पाने
२. 'मनमोहन इज सोनियाज् पपेट' / पंतप्रधान आणि सोनिया गांधी ह्यांची अश्लील व्यंगचित्रे
३. इस्लामच्या पवित्र मक्का इथे डुकरांचा संचार दाखवणारे चित्र

माझ्या मते वरील तिनही उदाहरणे 'बॅड टेस्ट' दाखवणारी असली तरी कायद्याचा भंग करणारी नाहीत. गर्दीच्या ठिकाणी 'आग आग' असे ओरडणे*, ह्या प्रकारात येत नाहीत असे मला तरी वाटते.

एकूणच 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' 'संपादकांची कात्'री वगैरे विषय अगदी टीचभर मराठी संकेतस्थळांवरही खूप चर्चिले जातात. त्यानिमित्ताने उपक्रमींच्या ह्या विषयीच्या मतांचे स्वागत आहे.
---
* ह्या उदाहरणामधे पाश्चात्य देशांमधेही अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मर्यादा घातली आहे

Comments

गुंतागुंतीचा समाज

विषय गुंतागुंतीचा आहे. अमेरिका किंवा पश्चिमी जग आणि मध्यपूर्वेतले देश, भारत ह्यांच्या संस्कृतीत फार फरक आहे. त्यामुळे अमेरिकत राष्ट्रध्वजाची चड्डी घालून फिरले तरी कुणी काही म्हणत नाही. आणि सिब्बल ह्यांच्या एका बैठकीत एखाद्या श्रेणी कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे राष्ट्रध्वज उलटा लागला तर अल्ट्रा राष्ट्रवादी बोंबाबोंब करायला सुरवात करतात.

सोशल मीडियामुळे अल्ट्रा राष्ट्रवाद्यांना, जातीयवादी संघटनांना अफवा पसरवणे, खोटेनाटे बोलून किंवा कसेही स्वस्त प्रसिद्धी मिळवणे सोपे झाले आहे.

पण असे असले तरी गुंतागुंतीच्या समाजासाठी बहुधा वेगळी धोरणे ठेवायला हवीत असे वाटत नाही. सिब्बल ह्यांच्याशी अर्थातच असहमत. सध्या कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी संकेतस्थळाकडे दाद मागण्याची सोय/पायरी आहे. त्याचा वापर करायला हवा. संकेतस्थळांना वाटल्यास ते मजकूर काढतील.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मान्य

वरील तीन्ही उदाहरणे कात्री लावण्यासारखी नाहीत.

(सिब्बल यांच्या पूर्ण वक्तव्याचा दुवा देता येईल का? कदाचित त्यांनी अन्य खरोखरे धोकादायक उदाहरणेसुद्धा दिली असतील.)

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

आय हेट सोनीया किंवा मनमोहन इज सोनियाज् पपेट हे ठीक पण

मक्क्यात डुक्कर आणि एखाद्याची अश्लील (व्यंग)चित्रे हे दुसर्‍याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसे होऊ शकते? लक्षात आले नाही.

याचबरोबर आणखी एक प्रश्न पडला. एखाद्या व्यक्तीच्या श्रीमुखात भडकवणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याचा उदो उदो करणारे किंवा त्याला सहमती देणारे अनेक संदेश फेसबुकावर दिसत होते. त्याबद्दल कायदा काय म्हणतो?

अभिव्यक्ति स्वातंत्र्य ही मुळात भारतीय संकल्पनाच नाही.

आपण भारतीय (यात सगळ्या धर्माचे, जातीचे, भाषा बोलणारे लोक आले) प्रचंड प्रमाणात व्यक्तीपूजक आणि भावूक आहोत.
आपल्याला कुणाला तरी सतत follow करणेच खूप आवडते, मग ते राजकारणी असोत, सिने अभिनेते असोत, खेळाडू असोत वा आपापल्या जातीचे, धर्माचे तथाकथित नेते.
मग कालांतराने असे लोक म्हणजे आपल्यासाठी ईश्वरासामान होतात आणि त्यांच्याविरुद्ध आपण एक शब्द ऐकून घेवू शकत नाही.

आपल्या आणि इतर पाश्चात्य देशातल्या या मुलभूत सामाजिक फरकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पना जशीच्या तशी इथे उचलून धरणे चुकीचे आहे. आपल्या समाजाच्या जडणघडणीनुसार ही व्याख्या "जोपर्यंत तुम्ही दुसर्याला दुखावत नाही तोपर्यंत तुमच्या भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य" अशी परावर्तीत होते.

बाकी वरील तीनही उदाहरणे प्रातिनिधिक वाटतात, कोणाही राजकीय नेत्याबाबत किंवा धार्मिक प्रतीकांबाबत असे होवू शकते (किंबहुना होतेच).

येथे प्रश्न असा उद्भवतो की एखाद्या सोम्याने अमुक एक चित्र फेसबुकवर टाकले म्हणून दहा शहरात दंगली होणार असतील, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असेल तर याला जाबाबदार कोण ?

जर चित्र अजाणतेपणाने किंवा परिणाम न लक्ष्यात आल्यामुळे टाकले गेले असेल तर ते निव्वळ अनैतिक वर्तन ठरते व सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणण्याची जबाबदारी पूर्णपणे दंगलखोर गटांकडे जाते, परंतु हीच गोष्ट जर मुद्दामून भावना भडकवण्यासाठी केली गेली असेल तर मात्र दोघेही सारख्याच प्रमाणात जबाबदार ठरतात.

कायद्याच्या( किंवा सध्याच्या व्यवस्थेच्या) व्याख्येत मात्र हा फरक मंजूर नसून सदरचे चित्र टाकणारा हाच सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी कारणीभूत मानला जातो. आणि अशा घटकांना रोखणे हे कायद्याचे आणि पर्यायाने सरकारचे कामच आहे, किंबहुना या भावनेतूनच सरकार हे पाउल उचलत आहे असे वरकरणी तरी चित्र वाटते.

बाकी यामध्ये इतर अनेक घटक समाविष्ट असू शकतात जसे :
-कपिल सिब्बल यांना आपल्याला गांधी घराण्याच्या बदनामीची अधिक काळजी आहे असे दाखवण्याची गरज असणे.
-अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी या माध्यमांचा झालेला प्रचंड वापर.
-या माध्यमांचा सामान्य माणसाकडून सतत सरकारविरोधी रोष व्यक्त करण्यासाठी होणारा वापर इत्यादी .

परंतु या घटकांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी वेगळे वेगळे चर्चा प्रस्ताव करावे लागतील, इथेच सगळ्यांची चर्चा होऊ शकत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम असून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.

नक्की काय झाले आहे?

कपिल सिब्बल ह्यांनी फेसबुक, गुगल वगैरे कंपन्यांना सेन्सॉरची कात्री लावण्यासाठी सरकार योजना बनवत असल्याची घोषणा केली, जी सध्या बरीच चर्चेत आहे.

मला वाटते ह्या सर्वामागे काय कारण आहे आणि सिबल ह्यांनी कंपन्यांकडून काय मागण्या केल्या आहेत ते अजून पुरेसे स्पष्ट झालेले दिसत नाही. सेन्सॉरची कात्री लावण्याची सरकारची काही इच्छा असल्याचे आत्तातरी दिसत नाही. तूर्तास कंपन्यांनीच monitoring करावे अशी नेमस्त मागणीच त्यांनी केल्याचे दिसते पण तसे monitoring हे ex post facto का pre-auditing अशा प्रकारचे हे स्पष्ट नाही. काही मजकूर ex post facto आक्षेपार्ह आढळल्यास कंपन्या तो काढून टाकतातच.

ह्या चर्चेच्या मुळाशी हा रॉयटर्सचा रिपोर्ट आहे असे दिसते आणि जगभरच्या अनेक वृत्तपत्रांनी तो उचलला आहे असे वाटते. उदाहरणार्थ माँट्रियाल गझेटचा हा आणि हिंदुस्तान टाइम्सचा हा रिपोर्ट पहा.

ह्यावरून असे वाटते की चित्र अजून पुरेसे स्पष्ट नाही.

नो कमेंट्स

नो कमेंट्स (नाहितर कपिलराव उद्या उपक्रमावर बंदी घालायचे :प्)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

झरदारी जोक्स्....

इथे सौदीत माझ्या बरोबर काम करणार्‍या पाकीस्तानी लोकांकडून पाकचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्याबद्दल अनेक विनोद ऐकले होते. त्यातलाच एक फेसबुक वरही वाचायला मिळाला होता या लेखाशी संबध आहे से वाटतय म्हणूनतो इथे देतो. कारण लोकांची कल्पनाशक्ती व विनोद बुद्धी अशा बंधनांना जुमानत नाही. आणीबाणीच्या काळाबद्दल मला फार थोडे माहित आहे पण दादा कोंडकेनी " विच्छा..." मधे व पु ल आदी प्रभृतींनी विनोदाचे हत्यार अतिशय परिणामकारक रितीने वापरले होते असे वाचून माहित आहे.

झरदारींबद्दलचा विनोद असा...

काही महिने आधी पाक चे राष्ट्राध्यक्ष झरदारी च्या बद्दल इतके जोक्स एस एम एस व नेट वर फिरत होते की पाक सरकार ने शेवटी एक अध्यादेश काढला ज्या नुसार जो कोणी असे जोक एस एम एस व नेट वर पाठवेल त्याला अटक केली जाईल. या अध्यादेशा नंतर एक नवा जोक एस एम एस व नेट वर फिरु लागला.....

जनाब झरदारी जितना महान आदमी पाकिस्तान मे आज तक पैदा नही हुआ, न आगे होगा....

उनके जितना इमानदार आदमी पूरी दुनीया मे नही है.........

पुढे असे भरपूर गुणवर्णन आहे....

पाकिस्तान मे झरदारी को पैदा करके अल्लाह ने पाक के लोगो पर बडा ही एहसान किया है...
.
.
.

आपको समज मे तो आ रहा है ना? मै क्या बता रहा हू .......?

स्वातंत्राच्या अधिकारासोबत जबाबदारीची जाणीव करून दिली जायला हवी.

कुणाला जर 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हवे असेल, तर मग ते ओळख लपवून ठेवील असे असता कामा नये. आंतरजालावर बरीच मंडळी आपली ओळख लपवून काहिही लिहीत असतात, घाण पसरवत असतात. अशा मंडळींना चाप बसायलाच हवा. आधारकार्डचा क्रमांकच प्रोफाईलला जोडला जायला हवा.

पण असे चाप बसवणे केवळ 'जबाबदारीने वागा, बोला, लिहा त्यासोबत जे लिहाल, बोलाल, वागाल त्याची त्यानंतर जबाबदारी घ्या!' अशाप्रकारचा द्र्श्टीकोन ठेवून केलेले असेल तरच योग्य. अन्यथा ती मुस्कटदाबी होवू शकेल.

सहमत आहे

(चक्क) या(ही) प्रतिसादाशी सहमत आहे!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असहमत.

इंटरनेटवर ओळख सांगणे कोणाला बंधनकारक नाही आणि नसावे. नेटवर ओळख लपवणे हासुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे असे मी मानतो.
सरकार करू पाहत असलेल्या प्रयत्नांचा निषेध. डाऊन विथ द सेन्सॉरशिप !!
(रिटे यांची उणीव जाणवते आहे.))

स्वातंत्र्य अपेक्षित आहे

नेटवर ओळख लपवणे हासुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे असे मी मानतो.

इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अपेक्षित आहे.. अभिव्यक्ती स्वैराचार नव्हे!
ओळख लपवायला ना नाही! ओळख लपवून बदनामी कारक, प्रक्षोभक मजकूर टाकण्यावर आक्षेप आहे.
हे म्हणजे लपून दगड मारणे झाले. जर एखाद्यावर टिका टिपण्णी करायची आहे तर ती कायद्याच्या चौकटीत करावी आणि तसे नसल्यास कारवाई कोणावर करावी इतकेच म्हणणे आहे

अर्थात सरकारची भुमिका (एखाद्याची टिव्हीसमोरची बडबड आणि प्रत्यक्षातील भुमिका-कायद्याचा प्रस्ताव यात बर्‍याचदा तफावत असतेच) अजुन स्पष्ट नाही तेव्हा त्यावर मी टिपणी करत नाही!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ओळख पटवून बदनामी चालेल का?

ओळख लपवून ओळख लपवून बदनामीकारक, प्रक्षोभक मजकूर टाकण्यावर आक्षेप आहे.

ओळख पटवून बदनामीकारक, प्रक्षोभक मजकूर टाकण्यावर आक्षेप नाही का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असा आक्षेप का असावा?

ओळख पटवून बदनामीकारक, प्रक्षोभक मजकूर टाकण्यावर आक्षेप नाही का?

नाहि असा आक्षेप का असावा? जर ओळख पटवली आहे आणि जर ते लेखन करून इतरांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जात असेल किंवा इतर कारणाने काहि गुन्हा घडत असेल तर तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई शक्य आहे.

ओळख लपवून उगाच एखाद्याने उद्या एखाद्या नग्न व्यक्तीचा किंवा असभ्य स्थितीतील फोटो टाकून खाली धम्मकलाडू लिहिले तर तुम्ही काय करू शकणार? फार तर तो आयडी ब्यान करायची तुम्ही विनंती करू शकाल. त्या 'आयडी' वर कारवाई होऊ शकेल. त्या व्यक्तीवर कारवाई कशी होईल?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

फंडे

माझ्यामते तुमचे फंडे प्रचंड चुकलेले आहेत. ओळख लपविणे हा मुद्दाच असू शकत नाही. एखादी आंतरजालीय कृती बेकायदेशीर आहे किंवा नाही एवढाच मुद्दा असू शकतो.

एकीकडे तुम्हाला सेन्सॉरशिपही नको, दुसरीकडे ओळख लपवून लिहिणारेही. कायद्याच्या चौकटीत राहून कुणी दगड मारत असल्यास 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अपेक्षित आहे.. अभिव्यक्ती स्वैराचार नव्हे!' सारखे क्लीशे हाणण्यापेक्षा दगड खाण्याइतके निगरगट्ट व्हायला हवे.

तुमच्या परवानगीशिवाय, अर्थातच कायद्याची चौकट सोडून, कुणी तुमचा नग्न किंवा असभ्य स्थितीतला फोटो एखाद्या संकेतस्थळावर, जसे फेसबुकवर, टाकला तर गुन्हेगार व्यक्तींवर तुम्ही कारवाई करू शकता आणि अशा कारवाया झाल्या आहेत हे तुम्हाला माहीत नाही काय? पोलिसांनी माग काढून अशा अनेक गुन्हेगारांना जेरबंद केलेले आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कै च्या कै!!!!

ओळख लपविणे हा मुद्दाच असू शकत नाही.

का असु शकत नाही?

तर गुन्हेगार व्यक्तींवर तुम्ही कारवाई करू शकता आणि अशा कारवाया झाल्या आहेत हे तुम्हाला माहीत नाही काय

तक्रार करण्यासठी गुन्हेगार 'व्यक्ती' शोधायची कशी सांगाल का? तेवढीच आमच्या ज्ञानात भर
धम्मकलाडू म्हणजे नक्की कोणती 'व्यक्ती' हे मी कसे ओळखावे? कोणाला शिक्षा करावी?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

फंडे गोल!

ओळख लपविणे हा मुद्दाच असू शकत नाही.

का असु शकत नाही?

फंडे गोल! कारण ओळख लपविणे, इनकॉग्निटो वावरणे हा काही कायद्यानुसार गुन्हा नाही. आधी गृहपाठ म्हणून काही चांगल्या कंपन्यांच्या प्रायवसी पॉलिस्या वाचा बरे.

तक्रार करण्यासठी गुन्हेगार 'व्यक्ती' शोधायची कशी सांगाल का? तेवढीच आमच्या ज्ञानात भर

तुमची नंगीपुंगी प्रकाशचित्रे आंतरजालावर टाकल्याबद्दल तक्रार करा. पोलिस गुन्हेगार शोधतील. आणि असे आंतरजालीय गुन्हेगार कसे शोधून काढतात हे तुम्हाला गूगलबाबा सांगतील. गुगला.

धम्मकलाडू म्हणजे नक्की कोणती 'व्यक्ती' हे मी कसे ओळखावे? कोणाला शिक्षा करावी?

धम्मकलाडू ह्यांनी तुमची असभ्य स्थितीतली किंवा नंगीपुंगी चित्रे टाकली किंवा कुठलेही बेकायदेशीर काम केले नसल्यास, थोडक्यात धम्मकलाडू ह्यांनी तुमचे कुठलेही घोडे मारले नसल्यास, तुमचे प्रश्न निरर्थक आहेत. असल्यास आधी सांगितल्याप्रमाणे पोलिसांकडे तक्रार करा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत आहे.

@ऋषिकेश-

'दगड मारणे' हा गुन्हा आहे. मग तो लपून मारलेला असो किंवा प्रकट. स्वत:च्या जबाबदारीवर किंवा खरी ओळख देऊन दगड मारला तरी तो गुन्हाच आहे. अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठीच पोलिसांचा 'सायबर क्राईम' विभाग आहे. दोनेक वर्षापुर्वी ऑर्कुटवर 'किल बाळासाहेब ठाकरे' अशी कम्युनिटी उघडणार्‍या एका मुंबईकर तरूणाला सायबर पोलिसांनी गजाआड केले होते, असे आठवते. अर्थात त्यासाठी आधी तक्रार करावी लागते. अन्यथा असे अनेक गृप्स आजही नेटवर आहेतच.
(त्या तरूणाचा कैवार घेण्यासाठी कुणीही 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हा मुद्दा घेऊन पुढे आलेले नव्हते.)
सेन्सॉरशिपला विरोध करणे म्हणजे स्वैराचाराला किंवा गुन्हेगारीला उत्तेजन देणे नाही, यात तुम्हाला काही शंका नसावी अशी आशा आहे.

शंका नाही

सेन्सॉरशिपला विरोध करणे म्हणजे स्वैराचाराला किंवा गुन्हेगारीला उत्तेजन देणे नाही, यात तुम्हाला काही शंका नसावी अशी आशा आहे

अर्थातच शंका नाही. मात्र सेन्सॉरशिप नको म्हणताना आंतरजालावर काहितरी बंधन हवे व सध्याची बंधने पुरेशी नाहित हेही मान्य व्हावे!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अगदीच बाळबोध अन् पुस्तकी

पोलिसांकडे तक्रार करा.

पोलिस स्टेशनमधे तुम्ही यासांबंधी कधीही एकही तक्रार नोंदवलेली दिसत नाहिये इतका कैच्याकै, बाळबोध अन् पुस्तकी प्रतिसाद आहे. यासाठी कंपन्या पॉलिस्या वाचुन उपयोगाच्या नाहित स्वतः अनुभव घ्या!

मी स्वतः स्थानिक पोलिस स्टेशनात मागे एकदा गेलो होतो. (त्यावेळी सोशल नेटवर्किंग नवे असावे) त्यांनी तक्रार कोणाविरुद्ध करायची आहे हे विचारल्यावर 'धम्मकलाडू' सारखा एक आयडी दिला (बिनचेहर्‍याच्या आयडीचे केवळ एक उदा. देतोय, वैयक्तीक टिपण्णी नव्हे). ते म्हणाले एका आयडी विरुद्ध आम्ही तक्रार घेणार नाही. हवं तर संस्थळाविरुद्ध करा, संस्थळ मालकांकडे तक्रार करा किंवा तुम्ही संस्थळाचे मालक असला पाहिजेत. शिवाय त्यात संस्थळाची मालकी परदेशी असल्याने इथे तक्रार नोंदवून उपयोग नाहि. आता त्या 'व्यक्ती'ला मी कसे शोधायचे?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असे निराश होऊ नका

कैच्याकै, बाळबोध अन् पुस्तकी प्रतिसाद

माझेच चुकेल. तुम्हाला समजेल अशा भाषेत प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न मी केला. क्षमस्व.

कंपन्या पॉलिस्या वाचुन उपयोगाच्या नाहित

तुम्हाला वाचायला ह्यासाठीच सांगितल्या कारण त्यात सबळ कारणाशिवाय सदस्यांची ओळख उघड न करण्याची एक हमी सहसा असते. ही ज्यांना खरी ओळख लपवावी वाटते त्यांच्यासाठी. अर्थात ही गोष्टही बाळबोधच आहे. त्यामुळे तुम्हालाही ठाऊक असावीच.

मी स्वतः स्थानिक पोलिस स्टेशनात मागे एकदा गेलो होतो. (त्यावेळी सोशल नेटवर्किंग नवे असावे) त्यांनी तक्रार कोणाविरुद्ध करायची आहे हे विचारल्यावर 'धम्मकलाडू' सारखा एक आयडी दिला ते म्हणाले एका आयडी विरुद्ध आम्ही तक्रार घेणार नाही. हवं तर संस्थळाविरुद्ध करा, संस्थळ मालकांकडे तक्रार करा किंवा तुम्ही संस्थळाचे मालक असला पाहिजेत. शिवाय त्यात संस्थळाची मालकी परदेशी असल्याने इथे तक्रार नोंदवून उपयोग नाहि. आता त्या 'व्यक्ती'ला मी कसे शोधायचे?

तुमची पूर्ण केस काय होती ते कळल्याशिवाय टिप्पणी करता येणार नाही. तिथे गुन्हा घडला होता का, गुन्हा घडला असल्यास तो दखलपात्र होता का वगैरे गोष्टी बघाव्या लागतील. जेव्हा तुम्ही ही तक्रार करायला गेला होता तेव्हाचे माहीत नाही पण सायबर कायद्यांबाबत अद्याप पोलिसांचेही ज्ञान कमीच आहे. असो. ह्या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ञ वकिलाची मदत घ्यायला हवी होती.

अनावश्यक मजकूर संपादित.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नस्ते सल्ले

ह्या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ञ वकिलाची मदत घ्यायला हवी होती

आधी पोलिसांकडे जा नंतर वकिलांकडे! छ्या! आधी एक काय ते ठरवा

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अनावश्यक मजकूर संपादित.

बरोबर

आधी पोलिसांकडे जा नंतर वकिलांकडे!

बरोबर. माझा आधीचा प्रतिसाद पुरेसा बाळबोध नव्हता असे दिसते. तर आधी पोलिसांकडेच जायचे. त्यांनी दाद न दिल्यास वकिलांची मदत घ्यायची आणि कोर्टात जायचे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रतिसाद संपादित

व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांसाठी खरडवही किंवा व्यनिसुविधेचा वापर करावा.

सहमत

नेटवर ओळख लपवणे हासुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे असे मी मानतो.

सहमत. सायबरस्पेस आणि मीटस्पेस ह्यात गल्लत करता कामा नये. आणि तसेही ज्ञानेश आणि ऋषिकेश ह्या नावाने कोण वावरतोय ह्याची काळजी किंवा चांभारचौकशा करण्याएवढा वेळ बहुधा जिथे फार उलाढाल नसते अशा संस्थळांवरच्या सदस्यांना असतो. उदा. शे-दोनशे पर्यंत सक्रिय सदस्यांची संख्या असणारी स्थळे किंवा टीचभर मराठी संकेतस्थळे. असो. मराठी संकेतस्थळांनी मोठे व्हायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

टीचभर मराठी संकेतस्थळे

एक अवांतर पण महत्त्वाचा प्रश्न पडला.

टीचभर मराठी संकेतस्थळे म्हणजे टीचभर (आकाराची) मराठी संकेतस्थळे की टीचभर मराठी (बोलणारी) संकेतस्थळे?

काहीकाही संकेतस्थळांवर अशुद्धलेखन, मिंग्लिश, धन्यु, विकांत यासारखे शब्द इतके फोफावले आहेत की त्यांना मराठी संकेतस्थळे म्हणताना मनाला यातना होतात.

स्ट्राइसँड परिणामाचाच आसरा

स्ट्राइसँड परिणामाच्या धर्तीवर सिब्बल, ममो आणि सोनिया यांच्याविषयीची एखादी छोटीशी बॅड टेस्ट काल्पनिका कोणी (मला वेळ नाही) लिहू शकेल काय? त्यांच्याविरुद्ध चिथावणी किंवा त्यांच्याविषयीच्या सत्य माहितीचा दावा करणारा काहीही मजकूर नसावा परंतु "मला स्वप्न पडले की ..." किंवा "मला विनाकारण संशय वाटतो की ..." अशा विधानाने सुरू होणार्‍या काल्पनिकेला मी माझा फेसबुक पानावर टाकेन आणि सर्व मित्रांना ते लेखन प्रसृत करण्याची विनंती करेन. कायदा येण्यापूर्वीच असे काही पसरवून ठेवले की त्यांचा हेतू फोल करता येईल अशी मला आशा आहे. माझ्या मित्रांनी कोलावेरी गाणे पसरविलेले नव्हते त्यामुळे पसरवावीशी वाटेल अशी चांगली काल्पनिका अपेक्षित आहे.

समांतर

"धिस व्हिडिओ इज बॅन्ड् इन इंडिया" असे शीर्षक लिहून हीन कंटेण्ट असलेल्या अनेक व्हिडिओ फेसबुकवर आलेल्या पाहिल्या आहेत. असे शीर्षक असले की प्रत्यक्षात असा बॅन आहे का हे कोणी तपासायला जात नाही आणि बॅन आहे त्याअर्थी ती माहिती खरीच असणार असे समजले जाण्याची शक्यता असते.

नितिन थत्ते

स्ट्राइसँड परिणाम

हाहाहा. आयडीया चांगली आहे. असे काहीही बरळणारा व्हिडियो बनवायला हवा.

सिब्बल पुराण

आउटलुकवरचा हा लेख सिब्बल यांच्या उद्गारांची, व फेसबुक-गूगल प्रतिसादांचा रोचक घटनाक्रम देतो.

*********
धागे दोरे
*********

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच

इथे व्यंगचित्रे काही आज काढली जात नाहीयेत. फरक एवढाच की तो विचार व्यक्त करणारे माध्यम कुणाच्या मालकीचे आहे.
फेसबुक वर जे काही लिहिले जाते ते त्यांच्या मालकीचे नाही त्यामुळे त्यांनी का नियंत्रण ठेवावे?

वरील उदाहरणांपुरते तरी, नियंत्रण असावे असे वाटत नाही.

 
^ वर