पुण्यातील वॉकिंगप्लाझाचे कौतुक
पुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.हा प्रयोग यशस्वी होणार नाही किंवा होऊ शकणार नाही असे वाटायचे खरे तर काहीच कारण नाही आणि नव्हते.कारण पोलिसी खाते आणि अतिक्रमण खाते ह्यांनी जर ह्या पूर्वी सुद्धा,हा सध्याचा समन्वय दाखविला असता तर, खरे तर हे असले प्रयोग करण्याची वेळ सुद्धा त्यांचे वर आली नसती.वास्तविक पाहता ह्या दोन्ही खात्यांच्या प्रचंड निष्क्रियतेतूनच सध्याची परिस्थिती उद्भवली होती आणि आहे.लक्ष्मी रोडवरील आणि तेथील फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण खात्याला न दिसणे आणि तेथे खरेदीला आलेल्या लोकांनी त्यांच्या गाड्यां मध्ये ड्रायव्हर बसवून ठेवून,ती वाहतुकीला अडथळा उत्पन्न होईल अशी उभी करून ठेवेणे आणि ते हि अगदी एका मागोमाग एक, अशा पद्धतीने, हे सर्व सगळ्यांना दिसत असून हि पोलिसांना ते न दिसणे हे, ह्या पूर्वीही शक्य नव्हते आणि ह्या पुढे हि नसेल.
मुळात गाडीत जर ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला असेल,त्याच्या समोर तेथून पुढे गाडी नेण्यासाठी काहीहि अडथळा अथवा तांबडा सिग्नल नसेल,आणि जर त्याच्या तेथे तसे जागेवरच उभे राहण्याने त्याच्या मागून येणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर खरे तर पोलिसांनीच त्याला तेथून रट्टे मारून हाकलले पाहिजे,पण ड्रायव्हर कडून त्याच्या मालकाने "पोलिसांना देण्यासाठी दिलेली चिरीमिरी" गुपचूप नि बिनबोभाट पदरात पडून घेण्या कडेच त्यांचा फक्त कल असेल, तर त्याला नियम,तरी काय करणार ? आणि मुळात ड्रायव्हर सीटवर जर कुणी बसले असेल तर त्याला ती गाडी रस्त्यात वाहतुकीला अडथळा उत्पन्न करून,त्याला हवी तितका वेळ, तेथे एकाच जागेवर उभी करून ठेवण्याचा हा अधिकार कोणत्या कायद्याने मिळतो ? आणि मिळाला ? हे सर्वसामान्यांना आजतागायत न उलगडलेले कोडे आहे.
कधी काळी मारलेल्या आणि आता अतिशय अंधुक झालेल्या अशा पांढऱ्या पट्ट्याच्या अगदी थोडीफार बाहेर लागलेली दुचाकी अतिशय वेगाने आणि कार्य तत्परतेने उचलणाऱ्या पुणे वाहतूक पोलिसांना लक्ष्मीरोड वरील "वामा" दुकानाच्या बाहेर,हातगाडीवर एकूण मालाची किंमत जेमेतेक पाचएकशे रुपये असलेल्या फेरीवाल्याची वर्षानुवर्षे उसाच्या कांड्या विक्रीची हातगाडी,चणे-फुटणे विक्रेत्याची हातगाडी दिसत नाही हे सुद्धा एक मोठे आश्चर्य आहे.
थोडक्यात काय तर जनमताच्या थोड्याफार रेट्या मुळे म्हणा किंवा आता पोलिसांना हि परिस्थिती त्यांच्या पूर्ण हाताबाहेर गेल्याची थोडाफार जाणीव झाल्याने म्हणा किंवा केवळ त्या मुळेच त्यांच्यावर पडलेल्या ताणा मुळे म्हणा ..निदान आत्ता तरी जाग आली हे हि नसे थोडके.....हनुमानाला जशी त्याच्या शक्तीची वेळोवेळी आठवण करून देणे भाग पडायचे तद्वत पोलिसी आणि अतिक्रमण खात्याला सुद्धा त्यांच्या अधिकाराची जनतेने वेळोवेळी , योग्यवेळी आठवण करून देणे क्रमप्राप्त झाल्याचे सध्याचे चित्र दिसते.....त्या मुळे संबंधित विभागातील स्थानिक लोकांना ह्या "यशस्वी प्रयोगाचे" तितकेसे कौतुक आणि अप्रूप नसल्यास त्यात आश्चर्य ते कोणते?
Comments
हातगाड्या नसल्या तर मजा काय
विशेषतः शगुन चौकापासून कुंटे चौकापर्यंतचा रस्ता हातगाड्यांनी गजबजलेला असतो. पण ह्या हातगाड्यांवर फणसाचे गरे, चनाजोर, मक्याची चाट, उसाचे कांडे, शहाळ्याचे आणि चणे फुटाणे विकत घेणारे ग्राहकही थोडेबहुत दोषी नाहीत काय? आणि दुसरी बाजू अशी की अशा खाण्यापिण्याच्या ठेल्यांमुळे बाजारला जाण्याची मजा आहे. असो. पण माजोरड्या चारचाकीवाल्यांना मात्र फटके द्यायला हवेत.
तुमचे उपक्रमावर स्वागत आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.
+१
...पण माजोरड्या चारचाकीवाल्यांना मात्र फटके द्यायला हवेत.
ह्याच्याशी बरेच चारचाकी वाले सहमत् होतील.
पण् आपण "माजोरडे" चारचाकी वाले नसून् चारचाकीची "गरज" असणारे आहोत किंवा गाडी "नाइलाजाने घेतलेलयंपैकी" आहोत असे सर्वच् म्हणतील.
अजून् एक् प्रश्न, माजोरडय दुचाकीवाल्यांना का बरे फटके देउ नयेत?
विशेषतः शगुन चौकापासून कुंटे चौकापर्यंतचा रस्ता हातगाड्यांनी गजबजलेला असतो. पण ह्या हातगाड्यांवर फणसाचे गरे, चनाजोर, मक्याची चाट, उसाचे कांडे, शहाळ्याचे आणि चणे फुटाणे विकत घेणारे ग्राहकही थोडेबहुत दोषी नाहीत काय? आणि दुसरी बाजू अशी की अशा खाण्यापिण्याच्या ठेल्यांमुळे बाजारला जाण्याची मजा आहे.
कित्येक गाडीवाले माजोरडे चारचाकीवालेही आहेत्. त्यांच्याचमुळे मजा आहे असे म्हणायचे आणि पुन्हा त्यांनाच फटके द्यायचे. :)
-- माजोरडा पादचारी
मनोबा
कसल प्रयोग ?
पुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.
हा कसला प्रयोग् आहे ?
खामोश
वॉकिंग प्लाझा - रस्त्यावर(पदपथ अपुरा पडत आहे) चालता यावे(!!!!) ह्यासाठी पोलिसांनी/पालिकेनी बॅरीकेड्स उभी केलीयेत.
काही बोळ-संप्रदायी सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार-
काही माजोरड्या चारचाकीवाल्यांच्या गाडीला पडलेल्या(कसा ते देव जाणे) स्क्रॅचची किमंत ही जवळपास ६ महिन्याच्या पार्किंग तिकिटाएवढी आहे किंवा सहज १०/१२ महिने रिक्शाने लक्ष्मी रस्ता दिवसातुन १० वेळा फिरण्याइतपत आहे.
माहिती - लक्ष्मी रस्त्याच्या जवळ असलेली जवळपास सर्व सार्वजनिक पार्किंग्स् स्थानिक लोकांनी त्यांच्या चारचाक्या लावण्यासाठी महिन्याच्या पासवर घेतल्या आहेत, त्यामुळे हि पार्किंग्स् जवळपास कायम भरलेली असतात, काहिंच्या गाड्या तर धूळ खात महिनो-महिने उभ्या असतात, महिना-पास हा कायम-पार्किंग विकत घेण्यापेक्षा खुपच स्वस्त पर्याय आहे.
रिक्षावाले आणि त्यानां थांबविणारे पादचारी ती रिक्षा कुठे थांबते आहे ह्याचा अजिबात विचार करत नाहित, चालताना गप्पकन थांबून बाजुच्या दुकानात जायचे कि नाही ह्यावर मध्य पदपथावर कधी कधी रस्त्यात थांबुन पादचार्यांच्या चर्चा घडतात, (खरेतर.. ह्या चर्चांसाठी पुण्यात तुळशीबाग नावाचा खास डेव्हलप्ड एरिआ आहे)
दुचाकी वाले तर पेशवाईची वस्त्रे परिधान केल्यासारखी वावरत असतात (मी स्वतः कधी माधवराव, कधी बाजिराव, कधी रघुनाथराव असतो)
पालिका, हा तर ह्या शब्दाचाच अपमान आहे.
राजकारणी -ते-पालिका प्रशासन-ते पब्लिक ह्यानां देहांत प्रायश्चित्ताशिवाय एकच प्रायश्चित्त आहे ते म्हणजे ह्या लक्ष्मी रोड वर एकमेकांचा माज सहन करणे.
इन्फ्रास्ट्रक्चर
गाड्या उदंड झाल्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरची बोंब असली की दुसरे काय होणार म्हणा.
आजूनकोणमी यांचा प्रतिसाद आवडला. ;-)
अवांतरः खामोश म्हणजे "गप्प राहायचं ठरवलं आहे" टैप की शत्रुघ्न सिन्हा टैप?
अतीअवांतर
सगळ्यांना गप्प रहा असे सांगुन माज (पुणेरी टैप) करत आहे. ;)
वृतपत्रीय शीतयुद्धाचा बळी: पुण्याचा लक्ष्मी रस्ता
स्थळ : पुणे
नोव्हेंबर २०११ ची सुरुवात.
-पुण्यातील वृत्तपत्रीय क्षेत्रातील 'दादा' असलेलेल्या एका वृत्तपत्रात लक्ष्मी रस्त्यावर 'वॉकिंगप्लाझा' राबवण्याची कल्पना येते.
-सदर वृत्तपत्राचे संपादक मंडळ ही कल्पना उचलून धरतेच शिवाय अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्त, पोलीस यांना साकडे घालून मान्यताही मिळवते.
-या नुसार लक्ष्मी रस्ता शनिवार व रविवार फक्त पादचार्यांसाठी खुला ठेवून वाहतूक बाकीच्या रस्त्यावरून वळविण्याची योजना असते.
-या मध्ये स्थानिक लोकांना अजिबात विचारात घेतले जात नाही, तसेच बाकीच्या रस्त्यावर किती ताण पडू शकतो याचा कोणताही विचार नाही.
-स्थानिक लोक, रस्त्यावरचे विक्रेते व त्यांचे 'मेहेरबान' लगेचच प्रशासनाकडे याची दाद मागतात परंतु त्यांचे आक्षेप विचारात घेतले जात नाहीत.
-सदर वृत्तपत्राचे मुख्य स्पर्धक वृत्तपत्र याची दखल घेवून या योजनेच्या विरोधात जोरदार बातमीबाजी करण्यास सुरुवात करते.
-परिणामी स्थानिक लोकांत प्रचंड असंतोष निर्माण होवून प्रशासनावर दबाव वाढतो व योजनेचा पुनर्विचार होतो.
-दुसर्या दिवशी 'दादा' वृत्तपत्रातील बातमी अशी:
" काही समस्यांमुळे योजना काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे"
स्पर्धक वृत्तपत्रातील बातमी:
"जनतेचा विजय : योजना गुंडाळण्यात आली"
-आता 'दादा' वृत्तपत्र व त्यांचे संपादक मंडळ यांचा इगो दुखावला जातो व ते आपल्या राजकीय संबधांचा वापर करून योजनेत थोडे फेरफार करून परत 'वॉकिंगमध्य' नावाने एक योजना पुढे रेटतात आणि अल्पावधीत (विरोध होण्या आधीच) ती राबवली देखील जाते.
-यामध्ये ज्या रस्त्यावर मुळातच दोन्ही बाजूना फुटपाथ आहेत तिथे अजून ४-५ फूट जागा पादचारी लोकांसाठी राखीव ठेवण्यात येते व त्यासाठी रस्त्याच्या एका बाजूचे पार्किंग रद्द करून तो भाग अडथळे लावून व दोर्या लावून आरक्षित करण्यात येतो.
याचा परिणाम :
-आता उरलेल्या रस्त्यावर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडालेले असतो, रद्द केलेल्या पार्किंगचा ताण आजूबाजूच्या गल्ल्यांवर पडलेला असतो.
-'पुणेरी' दुचाकीस्वार ह्या खास आरक्षित केलेल्या जागेतूनही गाड्या घुसवतात (अगदी बी आर टी प्रमाणेच), बहुतांश वेळा यशस्वी होतात तर थोड्या वेळा पोलिसांचे बकरे बनतात.
-दुपारच्या भर उनाच्या वेळेस आरक्षित जागेत कुत्रेही फिरकत नाही, व त्याचवेळेस बाजूच्या उरलेल्या रस्त्यावर वाहतुकीची बोंब उडालेली असते, वाहनचालक पालिका, पोलीस यांच्या नावाने खडे फोडत उन्हात एका जागी अर्धा अर्धा तास उभे असतात.
-आरक्षित जागेत हळू हळू फेरीवाले आपले बस्तान बसवायला सुरुवात करत आहेतच.
तात्पर्य:
कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे !
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम असून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.
अरेरे !
असा प्रकार आहे तर.
फुटपाथ असतांनाही असे विचित्र पर्याय सुचणे (आणि हेकेखोरपणे त्यांची अंमलबजावणी करणे) दुर्दैवीच म्हटले पाहिजे.
उदय सुमारपत्राचा?
"उदय भविष्यपत्राचा" असे बिरुद धारण करून वर्तमानपत्राच्या नियत कामाशिवाय सर्व काही*करणार्या वृत्तपत्राबाबत तुम्ही बोलत आहात का? असले प्रकार पाहून हे 'भविष्यपत्र' आहे की 'सुमारपत्र' असा प्रश्न पडतो. यानिमित्ताने वृत्तपत्रांचा राजकीय अजेंडा^ यावर चर्चा होणे आवश्यक आहे.
*घरे, फर्निचर प्रदर्शने, दिवाळी नंतरचा स्वस्त 'सेल', बुवा-बाबांचे आयुर्वेदापासून आध्यात्मापर्यंतचे लेख/कार्यक्रम (व्हिडियोकॉन्फरन्सिंग वापरून!!), नाचगाण्याचे कार्यक्रम इ. इ.
^
१. टगेगिरी करणार्या ज्युनियर साहेबांचे छुपे कौतुक करायला सुमारपत्रवाले बिलकुल मागे पडत नाहीत बरे.
२. नुकतेच साहेबांच्या कानाखाली वाजवण्याचे प्रकरण आणि त्यावर अण्णांची (प्रातिनिधिक?) प्रतिक्रिया झाल्यापासून सुमारपत्राने अण्णांविरुद्ध मोहिमच उघडली आहे जणू.
आहेत ते फुटपाथ
अतिक्रमणात नष्ट झालेले पदपथ मोकळे करायची हिंमत नाही प्रशासनात. म्हणून आता अतिरिक्त पदपथ निर्माण केले जात आहेत. जे लवकरच अतिक्रमित होतील. आणि पुणे मनपातील सत्ताधारी पक्षाद्वारे चालवले जाणारे वृत्तपत्र फुल्ल वॉकिंग प्लाझा ची मागणी करेल.
||वाछितो विजयी होईबा||