देवळांचा जीर्णोद्धार

उपक्रमावारती गेल्या काही दिवसात अध्यात्म, दैववाद, आस्तिक, नास्तिक, श्रद्धा इत्यादी विषयांवर बरीच चर्चा चालू आहे. ह्या लेखांना मिळणारा उत्तम प्रतिसाद वाचला आणि सहज मनात आले आपल्या महाराष्ट्रात विशेषकरून गांवागांवात अनेक देवी देवतांची उत्तम मंदिरे आहेत, काही तर फारच प्राचीन आहेत आणि अगदी जीर्ण अवस्थेत आहेत. देवतांवर असणाऱ्या ह्याच श्रद्धेपोटी केला जाणारा देवळांचा जीर्णोद्धार आणि त्यासाठी होणारा मोठ्या रकमांचा आर्थिक व्यवहार हा विषय मांडावासा वाटतो.

गांवात अगदी कोणत्याही गेल्यावर आपल्याला चौकात दिसतात ते मोठमोठाले फलक "...... देवाचे मंदिर जीर्णोद्धार सढळ हस्ताने मदत करा" इत्यादी इत्यादी.

काही प्रश्न उपस्थित राहतात ते असे -

१) गावात असणारे मंदिर, देउळ लहान आहे किंवा प्राचीन आहे म्हणून त्याला अवाढव्य करणे खरच जरुरी आहे का ह्या बांधकामाला आणि भव्यतेला काही मर्यादा असायला नको का?
मंदिरातील उत्सव आणि समारंभांना जागा कमी पडत असेल, जुन्या बांधकामामुळे मूर्तीला आणि त्यायोगे लोकांना काही त्रास असेल तर ठीक आहे पण ह्या भव्यतेमुळे अनेक वापरायोग्य जागा, मुलांचे खेळण्याचे मैदान, जुने वृक्ष नष्ट होतात हेदेखील नुकसान नाही का?

२? ह्या मंदिरांसाठी होणारा खर्चाला नियोजन म्हणावे कि पैशाचा दुरुपयोग - आमच्या गावात अशी ५ ते ६ मंदिरे आहेत आणि काही वर्षांपासून त्या मंदिरांचा एका मागोमाग जिर्णोधार व्हायला सुरुवात झाली आहे, अगदी भव्य मंदिरे आहेत.
आज ज्या गांवात लोकांना आपला महिन्याचा दैनंदिन खर्च भागविता येत नाही तिथे हा असा पैसा कसा उभा राहतो हाच मोठा प्रश्न आहे. देणगी किंवा पैशाची मदत न देण्याचा प्रश्नच नाही कारण नाहीतर देवाचा कोप होतो हि लोकांची समजूत नाहीतर गावकऱ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा उभा राहतो म्हटल्यावर त्या पैशातून अनेक उत्तम कामे करता येतील जसे रस्ते, विहिरी, गरीब मुलांना शिक्षण, किमान गावात एखादेतरी सामाजिक वाहन जसे टेम्पो किंवा रुग्णवाहिका इत्यादी.

३) ह्या मोठ्या व्यवहारांचे कोणतेही tracking किंवा audit होत नाही. त्यामुळे होणारे अनेक गैर व्यवहार झाकले जातात.

४) खरेच ह्या मंदिरांच्या जीर्णोद्धार कामाने खरेच गावकरी एकत्र येतात का - चाकरमानी गावात येतात आणि मोठमोठी वर्गणी देण्याची शर्यत लागते. तसेच मंदिर बांधल्यावर त्याला करायचा इतर खर्च, इतर साहित्य, विधी पुजारी, प्रसाद, आरती, मंदिराचे trustee यांसाठी होणारे छोटे मोठे वाद ह्यातून कोणती सामाजित बांधिलकी निर्माण होते?
मंदिर मोठे केल्यावर मी अजूनतरी कोणत्याहि गावच्या मंदिरातून हे पहिले नाही कि गावच्या मंदिराने जमा होणाऱ्या देणगीतून, निधीतून २ किंवा ३ मुलांचे संपूर्ण शिक्षण केले आहे, गावातील एका बेरोजगार कुटुंबाला रोजगार मिळवून दिला आहे, गावात असणाऱ्या गरीब शेतकऱ्याला खते किंवा बियाणे पुरवले आहे.
ही अशी कामे मंदिरांनी करूच नयेत असे काही आहे कि अशी कामे आपण निवडून दिलेल्या सरकारनेच करायची आणि आपण फक्त आपले तोंड वाजवायचे अशी आपली धारणा आहे.

चर्चेचा विषय कोणाच्याही श्रद्धेला हात घालण्याचा नाही. पण आज आपला ग्रामीण समाज आर्थिक विषमतेकडे जात असताना समाजाच्या असणाऱ्या खऱ्या गरजा आणि निकडी ह्याकडे डोळेझाक करून त्या सोडवून माणसाला, जनतेला आणि महाराष्ट्राला मोठे आणि सबळ करण्यापेक्षा आपण केवळ श्रद्धेला आणि कर्मकांडांना मोठे करतो आहोत आणि त्यातून आपणास काय मिळणार आहे.

विषय मांडताना काही त्रुटी राहिल्या असतील किंवा कोणास दुखावले असेल तर क्षमस्व.

लेखनविषय: दुवे:

Comments

देऊळें उदंड जाहली

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मला तर वाटते, "येत्या पंचवीस वर्षांत भारतात कोणीही, कोठेही,कोणत्याही धर्मस्थळाचा जीर्णोद्धार करू नये ,तसेच एकही नवीन धर्मस्थळ निर्माण करू नये" असा वटहुकूम तातडीने काढायला हवा.
* एका पाश्चात्य विचारवंताने म्हटले आहे,"ज्या दिवशी जगातील शेवटच्या चर्चच्या शेवटच्या भिंतीची शेवटची वीट डोक्यावर पडून जगातील अखेरच्या धर्मगुरूचा कपाळमोक्ष होईल त्या दिवसापासून जगातील माणसाच्या खर्‍या प्रगतीचा प्रारंभ होईल."
..या सुवचनात जे चर्चसाठी म्हटले आहे ते सर्वच धर्मस्थळांना लागू आहे.

फॅसिस्ट

मला तर वाटते, "येत्या पंचवीस वर्षांत भारतात कोणीही, कोठेही,कोणत्याही धर्मस्थळाचा जीर्णोद्धार करू नये ,तसेच एकही नवीन धर्मस्थळ निर्माण करू नये" असा वटहुकूम तातडीने काढायला हवा.

फॅसिस्ट नको असं फसिस्ट-स्टाइल मधे सांगणं रोचक वाटलं.

बाहेर नाही तर घरातच

बाहेर बांधू नाही दिली म्हणजे लोक घरातच देवळे बांधतील की. त्याचे काय कराल?

नवीन देवळे ही लोकांच्या वसाहतीप्रमाणे होत राहतात. उदा. आमच्या येथे वॉटरटाऊन नावाचे एक गाव आहे. तेथे एका मुख्य रस्त्यावर किमान दहा चर्च असतील.. इथली वस्ती एवढी कमी असतानाही यांना नवीन चर्चेस कशाला लागतात असा मला प्रश्न पडे. पण त्याचे कारण एवढेच की ती वेगवेगळ्या ख्रिश्चन पंथांची आहेत. तरी एका वेळी बिल्डिंग पूर्ण भरणे अशक्य आहे असे वाटते इतक्या या इमारती भव्य आहेत. तेव्हा हे सगळीकडे आहे. ही एक प्रकारची स्पर्धा आहे असे मला वाटते. या स्पर्धेत भाग घ्यायचा का नाही हे आपले आपण ठरवावे.

बाकी जुन्या देवळांचा जीर्णोद्धार करू नये असे म्हणताना एक गंमतीची गोष्ट सांगते. माझ्या गावी एक लहान म्हणजे अगदी चौथरा असलेले मारुतीचे देऊळ आहे. ते जमीन वहिवाटीने आमचे नाही, पण नंतर जमीन विकत घेतली त्यात देऊळही आले. घरच्यांनी तेथे इमारत बांधली, तेव्हा हे देऊळ त्या जमिनीवरून विधीपूर्वक हलवले गेले, मुख्य रस्त्याजवळ आणले गेले. आता जेथे ते आणले आहे ती नवीन जागाही आमचीच आहे. पण त्या जमिनीचा हक्क आमच्याकडे नसल्यागतच आहे. त्या देवळात दिवा लावण्याचे काम वर्षानुवर्षे सगळे आजूबाजूचे लोक करतात. नवीन लग्न झालेली जोडपीसुद्धा अगदी पहिल्याप्रथम ब्रह्मचारी असलेल्या या मारुतीच्या दर्शनाला येतात :) आता यासगळ्या लोकांच्या भावना गुंतलेल्या या लहानशा देवळाचा पुढेमागे वेळ आली तर जीर्णोद्धार करायचाच नाही, असे म्हटले तर ती जबरदस्ती होईल, नाही का? आम्ही जीर्णोद्धार केला नाही, तरी बाहेरचे लोक करतीलच, अगदी वर्गणी काढून करतील ही खात्री आहे. जेव्हा जीर्णोद्धार करूच नये, किंवा केलाच पाहिजे अशा प्रश्नांचा पाठपुरावा आपण करण्याचे काही कारण नाही, ते त्या स्थानिक जनतेवर सोडून द्यावे असे वाटते.

>"ज्या दिवशी जगातील शेवटच्या चर्चच्या शेवटच्या भिंतीची शेवटची वीट डोक्यावर पडून जगातील अखेरच्या धर्मगुरूचा कपाळमोक्ष होईल त्या >दिवसापासून जगातील माणसाच्या खर्‍या प्रगतीचा प्रारंभ होईल."

येथे कपाळमोक्ष होईल हे आपण बहुदा सांकेतिक अर्थाने घेत आहात असे मानून चालते.
माणसाच्या प्रगतीला सुरुवात ही शिक्षणाने, आणि तीही योग्य मार्गदर्शन करणार्‍या आणि समाजाभिमुख अशा शिक्षकांमुळे होईल असे वाटते. आपली शिक्षणव्यवस्था याबाबतीत फार मागे आहे असे वाटते.

देणगी.

जिर्णोद्धार किंवा सध्याच्या देवळाच्या बांधकामाचा विस्तार याला बहुतांशी मिळणारी देणगीस्वरूपातील मदत ही चाकरमान्यांकडून असते. प्रसंगी गावाचे विधानसभेत वा संसदेत प्रतिनिधित्व करणारी आमदार/खासदार मंडळीही अशा देणगीदारांच्या यादीत दिसून येतात. यामध्ये श्रद्धा/अंधश्रद्धा, देवळाची प्राचीनत्व टिकविणे, असला काही प्रकार नसतो. मी स्वतः एक चाकरमानी आहे, शहरात राहतो आणि ज्यावेळी वर्षातून दोनतीन दिवस गावाकडील म्हाईला (जत्रेला) जातो त्यावेळी तेथील घर, गोठे, शेत, विहीर, पिकपाणी पाहणे, जमीन कसणार्‍याच्या कुटुंबाची, त्यांच्या मुलाबाळांची जशी आपुलकीने चौकशी करतो (सारेच करीत असतात, जत्रेच्या निमित्ताने येणे झाले म्हणून) तद्वतच मग ग्रामदेवतेच्या मंदिराला जाऊन वाडवडिलांच्या नावे नारळ देणे, प्रसाद घेणे आदी कार्यक्रम होत असतातच. इथे 'मी देव मानतो वा मानत नाही' असा काही वादाचा प्रसंग खडा राहत नसतो, वर्षातून एकदा येणार तीही धावती भेट म्हणून. मग दुसर्‍या दिवशी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गप्पाटप्पा, एकमेकाला भेटणे, विचारपूस चालताना कुणीतरी 'मंदिराची पश्चिमेकडील भींत पडत चालली आहे, आवारातील नंदी फुटला आहे, दोन नव्या मोठ्या घंटा बसविल्या पाहिजेत...' अशी चर्चा चालवितो आणि मग गावकामगार पाटील, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित चाकरमान्यांना अगदी 'कॅज्युअली' मदतीचे (म्हणजेच देणगीचे) आवाहन करताना थेट नाव घेऊनच आपल्या बुकात नोंदवितात, "अशोकराव तुमच्या नावे हजार टाकतो बघा. का जास्त टाकू ?" आता अशा प्रेमळ धमकीला कुणी नकार देत नाहीच, शिवाय वर्षाला एक हजार मंदिरासाठी घेतले जाणार हे तिथे येणार्‍या प्रत्येकाला जवळपास ठावूक असतेच (हजार कुणी देत नसेल तरी शंभर तरी देतातच). त्यामुळे गाव सोडण्यापूर्वी पावती फाडली जातेच. [या देणगीचा हिशोब पुढच्या वर्षी न चुकता समोर ठेवला जातो, तुम्ही पाहा अगर न् पाहा. हे मी अनुभवले आहे.]

सांगायचा मुद्दा असा की, मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी असो वा विस्तारीकरणासाठी असतो काही प्रमाणात देणगी दिल्याचे मलातरी कधीही वैषम्य वाटणार नाही. या निमित्ताने गावातील चार कारागिरांना कामही मिळते.

"गणपतीपुळे" येथील विस्ताराच्या बांधकामामुळे त्या भागाला आज पर्यटनक्षेत्राचे स्वरूप आले आहे. एकेकाळी दोनचार भक्तगण आले तरी पुजार्‍याला पुरेसे वाटत असे आणि आज त्या दोनाचे शनिवार-रविवारी वीस हजार भक्त झालेले दिसतात. [अंगारकी संकष्टीला तर पन्नास हजाराच्या पुढे आकडा जातो]. या वीस हजारामुळे किमान शंभर हॉटेल्स, हजारांवर गाड्या, शेकडो स्टॉल्स, पान-सिग्रेटच्या टपर्‍या, शीतपेयगृहे आणि त्याचप्रमाणात स्थानिक लोकांची देवस्थान सुव्यवस्थित राखण्याची योग्य ती धडपड जाणवत आहे. अप्रोच रोडही सुंदर झाल्याने वाहनांचाही सुकाळ झाला आहे. बीचेस् सुधारले आहेत. तिथेही त्या अनुषंगाने आज जवळपास ४० कुटुंबे (मेरी-गो-राऊंडवाले, घोडेवाले, उंटवाले, फुगेवाले, काचसामान, रेवड्या,शेंगदाणे-फुटाणे विकणारी, छोट्याछोट्यी भेटवस्तू विकणारी मुलेमुली) जगत आहेत. हादेखील एक फायदाच मानावा लागेल.

म्हटले तर हे एक मान्यता मिळणारे अर्थकारणही आहे. त्यामुळे मिळत असलेल्या देणग्यांचा वरकरणी का होईना सदुपयोग झाल्याचे दिसते. दुरुपयोग होत नसेलच असे थेट म्हणता येत नसले तरी देणग्यावर शासनाच्या देवस्थान कमिटीची नजर असते. सर्व देणग्यांचे आणि खर्चाचे ऑडिट् होत असते हे सत्य आहे.

थोडक्यात, व्यक्तीशः देऊळ बांधकाम तसेच जिर्णोद्धारासाठी देणगी देण्यात मला काही वावगे वाटत नाही. ज्याला द्यायची नसेल त्याच्यावर कोणतेही देवस्थान सक्ती करत नाही. (आणि मी देतो म्हणजे तो आकडा काही भव्यदिव्य आहे असेही नाही.)

अशोक पाटील

'केवळ' अर्थकारण

म्हटले तर हे एक मान्यता मिळणारे अर्थकारणही आहे.

म्हटले तर नव्हे हे तर 'केवळ' अर्थकारण आहे!. असो जास्त लिहित नाही. याविषयीची माझी मते जगजाहिर आहेत. याच मंदीरांच्या विषयावर मिपावर हे थोडे सहजच लिहिले होते ते आठवले.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत

सांगायचा मुद्दा असा की, मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी असो वा विस्तारीकरणासाठी असतो काही प्रमाणात देणगी दिल्याचे मलातरी कधीही वैषम्य वाटणार नाही. या निमित्ताने गावातील चार कारागिरांना कामही मिळते.

"गणपतीपुळे" येथील विस्ताराच्या बांधकामामुळे त्या भागाला आज पर्यटनक्षेत्राचे स्वरूप आले आहे. एकेकाळी दोनचार भक्तगण आले तरी पुजार्‍याला पुरेसे वाटत असे आणि आज त्या दोनाचे शनिवार-रविवारी वीस हजार भक्त झालेले दिसतात. [अंगारकी संकष्टीला तर पन्नास हजाराच्या पुढे आकडा जातो]. या वीस हजारामुळे किमान शंभर हॉटेल्स, हजारांवर गाड्या, शेकडो स्टॉल्स, पान-सिग्रेटच्या टपर्‍या, शीतपेयगृहे आणि त्याचप्रमाणात स्थानिक लोकांची देवस्थान सुव्यवस्थित राखण्याची योग्य ती धडपड जाणवत आहे. अप्रोच रोडही सुंदर झाल्याने वाहनांचाही सुकाळ झाला आहे. बीचेस् सुधारले आहेत. तिथेही त्या अनुषंगाने आज जवळपास ४० कुटुंबे (मेरी-गो-राऊंडवाले, घोडेवाले, उंटवाले, फुगेवाले, काचसामान, रेवड्या,शेंगदाणे-फुटाणे विकणारी, छोट्याछोट्यी भेटवस्तू विकणारी मुलेमुली) जगत आहेत. हादेखील एक फायदाच मानावा लागेल.

गावातिल देवळाला धार्मिकतेशिवाय इतरही अनेक पैलू असतात, त्यात वर श्री. अशोक पाटील म्हणतात त्याप्रमाणे अर्थकारण असते, काहिंच्या श्रध्दा असतात, समाजकारण असते, चावडीप्रमाणेच बाया बापड्यानी एकत्र जमण्याचा अड्डा असतो, त्याच्या जिर्णोध्दाराच्या नावाखाली लुटालुट चालते हे काही केसेसमध्ये खरे असेलही पण ती लुटालुट हा मानवी-स्वभाव आहे, धर्म हे एक फक्त कारण आहे.

त्याकडे गावचे अर्थकारण म्हणून बघावे म्हणजे नास्तिकांना फार त्रास होणार नाही.

अवघड

देवळांचा जीर्णोद्धार यापूरता हा विषय मर्यादीत मानता येणार नाही. ऐतिहासिक वास्तुशिल्प म्हणून देवळांचा जिर्णोद्धार जेव्हा होत असतो तेव्हा त्या ऐतिहासिक कलाकृतीवर अतिशय निर्दयीपणे आधूनिक कला थापण्याचेच काम बहूतांश ठिकाणी झालेले दिसून येते. आणि अशावेळी इतिहासाऐवजी धर्माचा प्रश्न निर्माण झाल्याने कुणालाही त्यात दखल देणे दूरापास्त होऊन बसते.

जुन्या मोठ्या देवळांविषयीचा विचार बाजुला ठेवला तरीही अक्षरश: ज्याला देवळी सुद्धा म्हणता येईल अशा लहान मंदीरांचे भव्य सभामंडपासहीत विस्तारीकरण करण्याची अहम्अहिका सध्या ग्रामीण भागात लागलेली दिसते. यात मस्जिदीचे कामासाठी कशी देणगी ते लोक गोळा करतात मग आपणही का मागे राहतो अशीही स्पर्धा लावलेली दिसून येते.

या सगळ्या देणग्या गोळा करण्यासाठी आमदार, खासदार यांना गावकरी एकगठ्ठा मताचे बिनधास्त अमिष दाखवतात. नेतेही लाखभराचे विकासकाम करण्यापेक्षा पाच पन्नास हजार देणगी मंदीराला देऊन मोकळे होतात. गावातील सहज जाळय़ात सापडणारे कर्मचारी (मुख्यत्वेकरुन शिक्षक) यांना गावकीच्या बेंडकुळ्या दाखवून सक्तीने देणगी वसूल केली जाते.

ब-याच ठिकाणी उंबरठ्यानुसार किंवा दरमाणशी देणगीचा दर गावकरी ठरवतात. अशा प्रसंगी मोलमजुरी करणारे, असुधारीत दलित वर्गातले लोक यांची मोठी गोची होते.

असो. हा विषय इथे मोकळेपणाने भलेही मांडता आला पण मंदिराबाबतची गावक-यांची (एकूण जनतेचीच) मानसिकता पाहता खुलेपणाने बोलण्याची हिंमत करणे अवघड ठरेल असे वाटते.

शिक्षक आणि वर्गणी

श्री.जगताप ~~

"गावातील सहज जाळय़ात सापडणारे कर्मचारी (मुख्यत्वेकरुन शिक्षक) यांना गावकीच्या बेंडकुळ्या दाखवून सक्तीने देणगी वसूल केली जाते."

~ याला असहमती दर्शविणे मला क्रमप्राप्त आहे. बाबा आदमच्या जमान्यात शिकविणारे शिक्षक आता गावात चुकूनही आढळणार नाहीत तुम्हाआम्हाला. एकजात 'तयारी' चे आहेत; दोन घ्यायला दोन द्यायला. माझी नोकरीही अशी काही आहे की तीन जिल्ह्यातील शंभरएक छोट्यामोठ्या गावांना व्हिजिट असतेच. त्यामुळे गावातील नित्याचे राजकारण आणि तेथील शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, बीबियाणे केन्द्र कर्मचारी, दूधसंकलन केन्द्र आदी तत्सम ठिकाणी नोकरी करणारे निव्वळ 'नोकरदार' नसून गावातील अशा राजकारणातील प्रमुख सरदार कसे बनले जातात याचा प्रत्यक्षदर्शी विदा आहे माझ्याकडे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९ गावातील देऊळे, व्यायामशाळा आणि पंचायत समितीच्या दगडी बांधकामाच्या जागी आरसीसी इमारती उभी करण्यामागे दोन हेडमास्तर आणि ६ शिक्षक (त्यात दोन शिक्षिकाही) अग्रभागी होत्या. त्याचे फळ म्हणून एक हेडमास्तर आणि तीन शिक्षकांना त्या वर्षीचे 'आदर्श शिक्षकां'चे पुरस्कार मिळाले. (पुरस्कारापाठोपाठ चालून येणार्‍या सहाव्या वेतन आयोगातील दोन भरभक्कम पगारवाढीही. त्यासाठीही अशी कार्ये करण्यात याच शिक्षकांत चढाओढ दिसून येईल तुम्हाला). "पुरस्काराच्या अर्जा" सोबत जोडलेल्या अटॅचमेन्टमध्ये "माझे कार्य" अंतर्गत 'गावातील देवळाचा आणि तालमींचा जिर्णोद्धार करण्यात माझा पुढाकार" यावर एक पूर्ण पान.

तांबड्या-पिवळ्या एस.टी.साठी आता शिक्षक थांब्यावर दिसत नाहीत. त्यांच्या हाती आली आहे 'हीरो होंडा पॅशन'. [हे वाईट झाले असे मी बिलकुल म्हणत नाही, हेही इथे नमूद करणे गरजेचे आहे, कारण मीही सरकारी नोकर असून मलाही हे आर्थिक फायदे मिळत आहेतच.]

फार "आर्थिक" आणि सोयीचे राजकारण आहे या जिर्णोद्धार आणि विस्तारीकरण प्रकरणात. शिक्षकवर्ग मागे नाहीत पावत्या फाडण्यातही आणि पावत्या करण्यातही. त्यामुळे सद्यस्थितीत 'शिक्षकांकडून सक्तीने वर्गणी गोळा केली जाते' या विधानात सत्यता नाही असे मी {अनुभवाचे बोल} म्हणेन.

अशोक पाटील

इतिहासाचे जतन करण्यासाठी आवश्यक मात्र..

देवळांकडे एक वास्तु-स्थापत्य म्हणून बघता ते मोडकळीस आलेले पाहुन दु:ख होते. मात्र जिर्णोद्धाराच्या नावाखाली मुळच्या ढाच्याला जो बकालपणा आणला जातो त्यापेक्षा मुळचा तुटका ढाचा अधिक सुंदर वाटावा!

त्यामुळे इतिहासाचे जतन करण्यासाठी मुळ मंदीर 'जसेच्या तसे' जिर्णोद्धारीत केले जाणार असेल तर स्वागत केले पाहिजे. मात्र, अश्या पुरातन मंदिरांमधे कोणतीही धार्मिक कार्ये करण्यास बंदी घातली पाहिजे कारण त्यामुळे (त्यातील मुर्ख चालीरीती/कर्मकांडांमुळे) त्या स्थापत्याचे न भरून येणारे नुकसान होते.
(अन् ज्यांना देवाची पुजा करायची आहे त्यांच्यासाठी एक वेगळे दुकान उघडून द्यावे.)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

जीर्णोद्धार

देवळांचे जीर्णोद्धार अवश्य व्हावेत पण त्यासाठी ते देऊळ मोडकळीस आलेले असेल पक्षी जीर्ण झालेले असेल तर जीर्णोद्धार (जीर्णोधार नव्हे) हा शब्द योग्य वाटतो. विशेषतः ऐतिहासिक संपत्तीचा जीर्णोद्धार आवश्यक वाटतो फक्त तो भारतीय पुरातत्त्व खात्याला करायला लावू नये. ;-) - ह. घ्या.

याहून वेगळे, भक्तांच्या सुविधेसाठी किंवा इतर कारणांसाठी देवळाच्या आराखड्यांत बदल करणे किंवा अधिक बांधकाम करणे वगैरेंवर मतांतरे असू शकतात.

मोठा विषय.

हल्ली सर्वच विषयावर खूपशा चर्चा झाल्यासारख्या वाटता. तरीही, ऋषिकेश शी सहमत.

@ अशोक काका/सर/जी/रावः-
आपण म्हणता त्या गोष्टी ठिक वाटतात्. पण तो काही सर्वोत्तम् पर्याय नाही असेही वाटते.
रोजगार हा मंदिरनिर्माणातून् करण्यापेक्षा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत् उपलब्ध करून् दिल्यास जास्त् परिणामकारक्, विधायक्,दूरदर्शी ठरेल. समाजाचा शाश्वत् विकास्,सर्वांगीण् प्रगती त्याने साध्य होइल्, धार्मिक् स्थळाने नाही.
हल्ली नवीन् स्थळे उभारायला शासन् परवानगी देत् नाही, म्हणून् "जुना प्राचीन् मंदिराचाच जीर्णोद्धार करत आहोत" असे सांगत जागा हडपणारयंचीच संख्या शहरात अधिकतर् दिसते. अरविंद कोल्हटकर ह्यांनी एका ठिकाणी सांगितले आहे, तसाच माझाही अनुभव् आहे. त्याच्याशी ऐन मिसरूड फुटायच्या काळात अयशस्वी झुंजही माझी घेउन् झाली आहे. असो.
राळेगण सिद्धीने विकास् केला तो काही फार् मोठे धार्मिक् स्थळ् उभारत् नव्हे. एकेकाळी दुष्काली, ओसाड् ,माळरान् पसरलेले गाव म्हणून् नगर जिल्ह्यातले " हिवरा बाजार" ह्या गावाचे नाव् घेतले जाई. आज त्यांनी निव्वळ योग्य त्या गोष्टी योग्य त्या पद्धतीने करत गावाला सुजलाम् सुफलाम् केले आहे. भारतातच् नव्हे तर् आख्ख्या आशियात् त्याला "आदर्श् ग्रामपंचायत" म्हणून् ओळखतात. मध्द्यपूर्व्, कोरिया, जपान् इथले लोक् तिथे खास व्यवस्थापनाचा अभ्यास् करण्यासाठी येउन् गेलेत. युनो च्या विव्ध संस्था तिथे ह्या गोष्टी शिकण्याअसाठी येतात. हे सर्व त्यांनी आधुनिक् तंत्राचा योग्य तो वापर् करत्, पायाभूत् सुविधा उपलब्ध् करत्,समाजाला शहाणे करत् केले आहे. धर्मस्थळ् म्हणून् मिरवण्याची त्यांना गरज् पडली नाही.
अशी अनेक उदाहरणे आहेत. बोटे दुखून् थाम्बतो आहे.

--मनोबा

सुजलाम् सुफलाम् - अवान्तर

भाषेच्या योग्य वापराच्या आग्रहाची तंगडी सवयीने येथेहि घालून एक सुधारणा सुचवितो. ह्या सुधारणेची आवश्यकता आहे कारण 'सुजलाम् सुफलाम्' हा उपयोग सर्वसामान्य झालेला आहे.

'वन्दे मातरम्' ह्या गीतातील 'सुजलां सुफलां मातरं वन्दे' (सुजल आणि सुफल अशा मातेस मी वन्दन करतो) असे हे मूळचे वाक्य आहे आणि 'सुजलां सुफलां मातरं' ही ' वन्दे' ह्या क्रियापदासाठीची द्वितीया विभक्ति आहे. प्रथमा विभक्तीत हेच 'सुजला सुफला माता' असे होईल त्यामुळे (मराठीपुरते) 'गावाला सुजलाम् सुफलाम् केले आहे' ह्याऐवजी 'गावाला सुजल सुफल केले आहे' हेच योग्य आहे.

जीर्णोद्धार

श्री.मनोबा

(मी पन्नाशी पार केली असल्याने 'अशोककाका' ठीक आहे. पण 'सर' 'जी' अजिबात नको. एकतर 'जी' लावण्याइतपत माझा व्यासंग नाही, तसेच 'सर' म्हणण्याइतका मोठा विद्याभ्यासही नाही. काहीजण 'अशोकराव' म्हणत असतात, बट दॅट कॉल ईज चलता है, समवयस्क असल्याने. असो.)

प्रतिसादातील मुद्द्याकडे वळतो :

एकतर मी पर्यायाचा कुठेच उल्लेख केला नसल्याने माझ्या त्या संदर्भातील प्रतिसादातील विचार सर्वोत्तम पर्याय होऊ शकेल असा खुद्द माझाही दावा नाहीच.

प्लीज, धागाकर्त्याच्या मुख्य विषयाकडे जर आपण [तुम्ही आणि मी] लक्ष दिले तर लक्षात येईल की त्यांचा मुद्दा केवळ 'जीर्णोद्धार तसेच सध्या आहे त्या बांधकामाच्या विस्तारास देणगी दिली जाते वा मागितली जाते ते योग्य होईल काय ?". इतपतच, बाकी नंतर ते जरूर म्हणतात मोकळ्या जागेचा मुलांच्या खेळासाठी, पर्यावरण आदीचा विचार इत्यादी. पण याचा अन्वयार्थ असा चुकूनही होऊ देवू नये की "त्याऐवजी" पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक करून दिल्यास समाजाची सर्वांगीण प्रगती साध्य होईल. व्हॉट काईंड् ऑफ् 'पायाभूत सुविधा' यू आर एक्स्पेक्टिंग माय फ्रेन्ड ? मी बालाजी, शिर्डी, मीनाक्षी, आणि लेटेस्ट् इन् हॉट् लिस्ट लाईन 'लालबागच्या राजा' बद्दल अजिबात म्हणत नसून सह्याद्रीच्या कडेकपार्‍यात वसलेल्या छोट्या-छोट्या वाड्यातील, गावातील 'देऊळ' नावाच्या एका संस्थेविषयी लिहित होतो. 'संस्था' शब्दाचे प्रयोजन मुद्दाम केले आहे. वर एका प्रतिसादात एका सदस्याने म्हटल्याप्रमाणे गावातील देऊळ हे केवळ 'धार्मिक' ठिकाण असत नाही तर ते एक सांस्कृतिक केन्द्र बनलेले असते. त्या आवारात ज्या गप्पागजाली चाललेल्या असतात त्या अनेकविध स्वरूपाच्या असू शकतात. कापसाला, उसाला, कांद्याला भाव, होऊ घातलेल्या निवडणुका आणि त्यावरचे चर्चाचर्वितणही देवळाच्या आवारातच हमरीतुमरीवर येऊन केले जाते. कोणत्याही परच्युटन पुढार्‍याची सभा ग्रामपंचायतीच्या आवारात न होता ती देवळाच्या मंडपात का घेतली जाते, तर त्या निमित्ताने 'चला, आलोच आहे, तर घालू एक् दंडवत खंडोबाला !' असेही उद्गार काढलेले ऐकू येतात. त्यामुळे तिथे गोळा होणारी मंडळी एकजात त्या देवळाच्या जिर्णोद्धारासाठीच जमलेली असतात असा कधीही कुणीही समज करून घेऊ नये.

मग अशा 'ठिकाणा'च्या [मी मुद्दाम मंदिर असे नाम घेत नाही] डागडुजीसाठी, सुशोभीतासाठी, वाढीव बांधकामासाठी जर चार पैसे गोळा करायचे झाल्यास (अशी कामे खर्चिक असतातच हे तुम्हाला मान्य व्हावे) मग ती गोळा केली जातात 'देवा'च्या नावानेच. मागणार्‍याला तशी मागणी करणे जसे गैर वाटत नाही, तशी देणार्‍यालाही मनोमनी माहीतच असते की आपली (किरकोळ) देणगी देवाच्या नावाखाली अन्य कार्यासाठी जात आहे. आता हे 'अन्य' कार्य टाकावू असते का ? तर अजिबात नाही. असूच शकत नाही, त्याला कारण म्हणजे ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये माझ्याही परिचयाची दोनचार मंडळी असतातच आणि त्यानी मी कधीही देणगीच्या प्रगतीबाबत विचारणा करू शकतो (मोबाईलमुळे तर आता हे फार सोयीचे झाले आहे).

सांगायचा मुद्दा हा की, मला जर माझ्या देणगीचा वापर योग्य त्या कारणासाठी केला जातोय/वा गेला आहे, याची खात्री झाली असेल तर मग माझ्यादृष्टीने 'विधायक, दूरदर्शी, परिणामकारक' कामाची व्याख्या वेगळी होऊ शकत नाही. कदाचित ही माझ्या समजुतीची मर्यादाही असू शकेल.

"जुन्या प्राचीन मंदिराचाच जीर्णोद्धार करत आहोत" असे सांगत जागा हडपणार्‍यांचीच संख्या शहरात अधिकतर दिसते. असे तुम्ही म्हटले आहे. चला, मान्य करतो मी तुमचा हा मुद्दा, कारण तशा घटना आपण पाहिल्या आहेत. पण, त्यामुळे उद्वगाने माझ्या गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मी देणगी (जी तशी क्षुल्लकच असते) देणे बंद केले पाहिजे असा त्यातून अर्थ ध्वनीत होत असेल तर तो मी स्वीकारू शकत नाही. शेवटी, मी मुख्य प्रतिसादात म्हटले आहेच की, माझ्यासारख्यां शंभरएक लोकांनी दिलेल्या अल्पस्वल्प देणगीतून गावातील चार लोकांना रोजगार मिळत असेल तर ते मलाच काय अगदी शासनालासुद्धा हवेच असते.

'राळेगणसिद्धी' चा विषय वेगळा होऊ शकेल. त्यावरही मी लिहिन, पण इथे ते अवांतर होईल म्हणून थांबतो.

अशोक पाटील

जीर्णोद्धार मंदिरांचा कि गुन्हेगारांचा ?

येथे काही लोकांचा सूर "गावकरी त्यांच्या पैशाने करत आहेत ना, मग करू द्या की? आपल्याला काय त्रास?" असा वाटतो आहे .
व्यावहारिकदृष्ट्या हे बरोबरही आहे.
परंतु एका 'अ' नावाच्या माणसाने मंदिराचा जीर्णोद्धार केला व 'ब' आणि 'क' ने त्याला आर्थिक मदत केली एवढे हे सोपे नसते.

देवळाच्या जीर्णोद्धारात अनेक कुकर्मे, भ्रष्टाचार, भानगडी चतुराईने झाकली जात आहेत.
जीर्णोद्धार करणारे भक्त खरे किती आणि "च्यायला एवढा पैसा या ना त्या मार्गाने मिळवलाच आहे तर थोडा देवाला देऊ, तेवढेच पुण्यकर्म !" असे म्हणणारे किती याचा जिज्ञासूनी अभ्यास करावा. (हा अभ्यास करूनच मी आतापर्यंत तीन जीर्णोद्धार मंडळवाल्यांना घराबाहेर हाकलण्याची हिम्मत करू शकलो)

एक टिकोजीराव वाळूचे अनधिकृत ठेके घेतो, हातभट्टी चालवतो, बलात्कार करतो, सर्रास मुडदे पाडतो व "मंदिराचा जीर्णोद्धार केला आता पुण्य मिळवले" म्हणून हे सगळे करायला परत मोकळा होतो आणि लोकही त्याच्या दानशूरतेची तोंड फाटेपर्यंत चर्चा करतात. हे सगळे समाज आजारी असल्याचे, गुलामीच्या मानसिकतेत खोलवर रुतल्याचे लक्षण आहे.

खरोखरीच मोडकळीस आलेल्या देवळांची डागडुजी करायला कोणाचा अकारण विरोध असणार नाही, पण लोकांना एकत्र आणायला फक्त तोच एक मार्ग आहे ही जी समजूत आहे ती चुकीची आहे.

बाकी हा चर्चेचा विषय फक्त जीर्णोद्धारासम्बंधी असल्याने धार्मिक श्रद्धेच्या विषयावर काही बोलता येणार नाही. असो.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम असून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.

प्रबोधनकार म्हणतात त्याच्याशी सहमत

लोकांना एकत्र आणायला फक्त तोच एक मार्ग आहे ही जी समजूत आहे ती चुकीची आहे- प्रबोधनकार म्हणतात त्याच्याशी पूर्णपणे सहमत
मी देखील अश्रद्ध नाही पण देवाच्या नावाखाली जे प्रदर्शन चालविले जात आहे त्याला माझा विरोध आहे.

हा विषय मांडताना जे मुळ मुद्दे होते ते हेच कि गावचा विकास करताना केवळ मंदिरे मोठी करून अर्थकारण होईल गावचा विकास होईल हे धोरण चुकीचे आहे. आज अशी कित्येक गावे आहेत जिथे मोठी मोठी मंदिरे झाली आहेत, अगदी मुंबई, पुणे अश्या दूरच्या ठिकाणावरून वर्षातून एकदा माणसांचे लोंढे जत्रेला त्या गावी येतात आणि असे वाटते कि वाह काय गाव आहे. मंदिर मोठे झाले पण गाव सुधारले, पण त्याच गावात इतर दिवशी फिरलात तर कळेल कि त्या गावच्या शाळेची काय दशा आहे ते, गावातील रेशन दुकान किती मोठे आहे, गावातील पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे, गावात किती बेकार आहेत ते, निदान गावातील दवाखाना आणि त्यातील सोयी काय आहेत. आज गावकरी श्रद्धेच्या नावाखाली एवढी मोठी मंदिरे बांधण्यासाठी एकत्र येऊ शकतात पण गावातील या इतर समस्या दूर करण्यासाठी का एकत्र येत नाहीत.

तुलनात्मक दृष्ट्या किती गावांनी अशा एकत्रीकरणातून मंदिरान्शिवाय इतर कामे केली आहेत - एकत्र शेती करणे, एकत्र फळबागा करणे, एकत्र जलसिंचन करणे इत्यादी.

अगदी हजार नाही तर शंभर द्यायला कोणाचीच ना नाही असे म्हणणे योग्य वाटते पण तेच पैसे जर योग्य आणि जरुरी कामासाठी खर्च केले गेले तर आज आपल्या खेडेगावांची जी परिस्थिती आहे त्यात फरक तरी नक्कीच पडला असता.

सहमत

सुहासवदन यांच्या मताशी मी १०० टक्के सहमत आहे.

केशरी पैसा

मध्यंतरी मी एक लेख वाचला होता. त्यात असे लिहिले होते की भारताच्या अर्थकारणात तीन प्रकारचे पैसे आहेत. काळा, शुभ्र आणि केशरी. हा केशरी पैसा जमा करतांना त्याला कोणत्याही रंगाचा पैसा चालतो. त्याच्या जमाखर्चावर तितकेसे कडक नियंत्रण नसते. देवळांचे पुनरुत्थान बव्हंशी केशरी पैशानेच होत असल्याने त्यातून केशरी अर्थकारणाला चालना मिळते. त्यामुळे काळ्या पैशात निव्वळ घट होते की आणखी वाढ होते यावरून त्याचा परिणाम चांगला की वाईट हे कदाचित ठरेल.

काळा, शुभ्र आणि केशरी.

अशाच प्रकारे हिरवा, निळा असेही पैशे असु शकतात.....(बिच्चारे रंग.)

देवीचं देउळ...

चांगला धागा आणि प्रतिसाद.

लहानपणाची देवळासंबंधी एक आठवण आहे. अगदीच रहावलं नाही म्हणून लिहितो.

सोलापुरमध्ये घराशेजारीच एक चौकोनी मोकळी जागा होती. त्यावेळच्या कमिशनरने प्रत्येक वसाहतीत मुलांना खेळायला, मोकळी हवा वगैरेसाठी अशा जागा सोडल्या होत्या. काही वर्षानंतर आजुबाजुला राहणार्‍या लोकांनी अर्थातच् त्याचा उकिरडा केला. पण मधल्या मोकळ्या जागेत आम्ही मुलं खेळत असू.

मग अचानकच आसपास राहणारी काही लोकं आली आणि वर्गणी मागायलागली. कारण विचारलं तर म्हणाली इथं देवीचं मंदीर बांधायचय. वास्तविक आधिच अशाच मोकळ्याजागेवर बांधलेली असंख्य देवळं होती. त्यात मारूतीचं आणि स्वामी समर्थांचं देउळ (शेजारी-शेजारी) तर त्या देवळाच्या २०० मिटर अंतरावरच आहेत. आम्ही शक्य तितका विरोध केला. पण काही उपयोग झाला नाही. सगळ्यां कडून जवळ जवळ जबरदस्तीनंच २००० रुपये काढले. सगळ्यांना असं सांगण्यात आलं की तिथं आपण मंदीर बांधलं नाही तर मुसलमान लोकं मशीद बांधतील! नंतर व्हायचं तेच झालं. एका पुजार्‍याला काम मिळालं. देवळाचं अर्थंकारण बघणार्‍यांना बरकत आली. दोन-दोन खोल्यांच्या घरात दाटीवाटीने राहणार्‍या लोकांची रात्री झोपायची सोय झाली. भक्तांची गर्दी वाढली. त्यातच कुणीतरी नवसाची मोठ्ठी घंटा आणुन बांधली.

या सगळ्या गोष्टीचा आम्हाला प्रचंड मनस्ताप झाला. सकाळी साडेतीन-चारलाच झोपमोड होउ लागली. रात्र-रात्र किर्तनं चालायची. नंतरतर तिथं लग्नं व्हायला सुरवात झाली. नवरात्राचे १० दिवस तर अक्षरशः जगणं अवघड व्हायचं. घरात बोललेलं ऐकु यायचं नाही. त्या बालवयात काही कळायचं नाही, पण मी त्या देवळात एकदाही गेलो नाही. नंतर जिथं जिथं देवळं बघायचो तेंव्हा पहिला विचार यायचा की इथं आसपास राहणार्‍यांना याचा किती त्रास होत असेल. म्हणून घंटा सुद्धा वाजवायचो नाही! :)

ऑन न लायटर नोट, या अश्या देवळांमुळे लांब राहणार्‍या आस्तिकांची सोय होते, पण जवळ राहणारे नास्तीक होत असतील.

सहमत.

>>ऑन न लायटर नोट, या अश्या देवळांमुळे लांब राहणार्‍या आस्तिकांची सोय होते, पण जवळ राहणारे नास्तीक होत असतील.

१०००००००% सहमत!!!!!!

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर