कौन बनेगा पंचमहामनी करोड़पती
कौन बनेगा करोडपतीची सांगता झाली आणि भारताच्या तरुणाईचे आशावादी चित्र भावले. उंची वस्त्र प्रावरणे आणि बटबटीत दागदागिन्यात मढवलेल्या व्यक्तिरेखांनी घडवलेल्या नीच, पाताळयंत्री कारवायांमुळे घरोघरी हेवेदावे करत सामान्य समाज जगत असतो असे आभासी चित्र एकीकडे बनत असताना कौन बनेगा करोडपतीने (कौ.ब.क.) सुखद धक्का दिला आहे.
कौबकच्या हॉटसीटमधे बसलेल्या व्यक्ती शहरी कमी, गावा-खेड्यातील अधिक होत्या. त्यांच्यावर तयार केलेल्या चित्रफितीतून ते प्रत्यक्षात कुठे, कसे राहातात-वागतात, याच दर्शन होत होते. उत्तरे देताना त्यांच्या शारीरिक हालचालीतून एक प्रकारचा ठामपणा जाणवत असे. एखादे उत्तर खात्रीने माहित नसेल तर त्यात दिलेल्या पर्यायातील कोणते पर्याय नक्की नसतील ते ठरवून चतुराईने ते मार्ग काढत. अनेकदा प्रेक्षककक्षातून दिल्या गेलेल्या योग्य उत्तरातून तेथे बसलेल्या आमंत्रिताना ती उत्तरे माहित असल्याचे चित्र दिसत होते. तज्ज्ञ व्यक्तींनी अचूक मार्गदर्शन करून अल्प काळात आपली छाप पाडली.
स्त्रियांच्या धीट सहभागातून त्यांनी संकोचीवृत्तीवर मात केली असल्याचे दिसत होते. मिळणाऱ्या पैशाचा विनियोग कसा करणार या हमखास प्रश्नाचे उत्तर देताना विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत मी इथवर आलोय आहे आता घरातील अन्य सदस्यांवर ती वेळ येऊ नये म्हणून त्यांच्यात आनंददायक प्रेरक परिवर्तन घडवण्यात मी हे धन वापरीन असे म्हणणारे अनेक जण होते. त्यातून त्यांनी अप्पलपोटेपणा न दर्शवता प्रगल्भ विचारीपणाचे दर्शन करवले. प्रथितयश कलाकारांनी मिळवलेले धन सामाजिक कार्याला देऊन आपली बांधिलकी प्रदर्शित केली.
या कार्यक्रमात उस्फूर्तपणा होता. संवाद पाठ करून म्हटलेले नव्हते. सभाधीटपणा, उत्तरातील चतुराई, हिन्दीत त्या त्या प्रदेशातील बोलीचा गोडवा प्रेक्षकांना बांधून ठेवायला कारणीभूत झाला होता.
या सर्वांला पार्श्वभूमी होती अमिताभ बच्चन यांची. त्यांच्या प्रत्येक कृती, वर्तन, संभाषणतून आदर्श व्यक्तिमत्व कसे असते - असावे, याचा वस्तुपाठ मिळत होता. त्यांच्या मुखातून हिंदीभाषा गौरवान्वित झाली.
कौबक शेवटी टीव्हीशो असल्याने उत्कंठा वर्धनासाठी प्रकाश-ध्वनी योजनांचे प्रयोजन उचित वाटले. आता या कार्यक्रमाचा पुढील भाग भारतीयांना असाच प्रेरणादायी होईल अशी आशा वाटते.
Comments
उलट मत
आपली मते कुठेच जुळत नाहितसे वाटते ;)
पाचव्या भागातील कौबक म्हणजे तद्दन बाजारूपणा वाटला.. पहिल्या भागाइतका रोचक आणि व्यवस्थित सादरीकरण बहुदा अमिताभलाही परत जमणार नाही
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
प्रतिसाद
केबीसीच्या पहिल्या पर्वाची सर परवाच्या पर्वाला नाही, हे खरे आहे. मात्र वासरू-लंगडी गाय न्यायाने इतर रिऍलिटी शोजपेक्षा केबीसी नक्कीच उजवा वाटतो.
यावेळच्या पर्वात अमिताभ-स्तुतीने आणि कवितांनी वैताग आणला.
ही कदाचित नाण्याची दुसरी बाजू
"कौबकच्या हॉटसीटमधे बसलेल्या व्यक्ती शहरी कमी, गावा-खेड्यातील अधिक होत्या. त्यांच्यावर तयार केलेल्या चित्रफितीतून ते प्रत्यक्षात कुठे, कसे राहातात-वागतात, याच दर्शन होत होते."
ह्याची दुसरी बाजू कदाचित खालील प्रमाणे असू शकते.
१) ह्या आणि अशा प्रकारच्या शोंना एस एम एस करून पदरचे पैसे घालविणे म्हणजे स्वतःच्या अकलेवर मूर्खपणाचा कळस चढविणे हे शहरी प्रेक्षकांना उमगून चुकल्याने तेथून त्या माध्यमातून येणारा महसूल मंदावलेला होता./आहे.
२) आधीच्या सर्व शों मध्ये सदैव गुळगुळीत शहरी चेहरे बघून बघून ...हे आपल्या साठी नाही हि शहरेतर प्रेक्षांची झालेली समजूत व त्याचे शोच्या प्रेक्षकांच्या टी आर पी मध्ये दिसलेले प्रतिबिंब.त्या मुळे त्यात या वेळी वरील पद्धतीचा प्रेक्षक वर्ग टार्गेट करून त्यांच्या खिशातून पैसे काढले गेले.
३) अशा स्पर्धकांचे राहणीमान दाखवून सर्वसामान्य माणसाला सुद्धा " मी हे करू शकतो किंवा करावे" ह्या साठी उद्युक्त करणारी प्रसिद्धी यंत्रणा सोयीस्कर पद्धतीने राबविण्यात आली.
थोड्याफार पद्धतीने ह्या प्रकारचीच यंत्रणा मराठी गाण्यांच्या रिअलिटी शो मध्ये वापरली जाते.नुसते शहरी म्हणण्या पेक्षा जरा जास्त स्पष्टच बोलायचे तर उच्चवर्णीय त्यात हि शक्यतो महिला स्पर्धक त्या हि गोऱ्या गोमट्या,शक्यतो देखण्या अशा, ज्या त्यांच्या खरोखरच्या मेरिटवर शेवटच्या २-३ भागापर्यंत स्पर्धेत आल्या असतात त्यांना फुटकळ कारणाधारे पद्धतशीरपणे स्पर्धेबाहेर काढून आम जनतेचा एस एम एस प्रतिनिधी म्हणून फायनल एपिसोड मध्ये अर्ध ग्रामीण/अर्ध शहरी पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकाला विजयी घोषित करायचे,कि जेणे करून "त्या "प्रेक्षकांचा एस एम एस पोल ,व त्या वर्गाची प्रेक्षक संख्या कमी होऊ नये.ह्यात निर्मात्यांची सुद्धा चूक नाहीये कारण मुठभर उच्चवर्णीयांच्या तुलनेत इतर प्रेक्षकवर्ग हा संखेने आता जास्त आहे,आणि धंदा चालवायचा तर गिऱ्हाईकाचा विचार हा स्वाभाविकपणे आधी होणे गरजेचे आहे/असते.