दिवाळी अंक २०११: "कर्नल मॅकेंझीचा ऐतिहासिक खजिना"

धनंजय यांच्या विनंतीनुसार, कर्नल मॅकेंझीचा ऐतिहासिक खजिना या रोचना यांनी दिवाळी अंकात प्रकाशित केलेल्या लेखावरील चर्चा आणि प्रतिसाद यांच्यासाठी हा धागा वेगळा काढला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

काही प्रतिसाद खाली हलवले आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

लेख फार आवडला

'कर्नल मकेंझीचा ऐतिहासिक खजिना: एका दक्षिणी दस्तऐवजातले बहुभाषिक स्वर' हा दिवाळी अंकातला लेख वाचला. कावली बंधूंवरील रमा सुंदरी मंतना ह्यांचा निंबंधही वाचला. एका अनोख्या विश्वाशी, ऐतिहासिक दस्तावेजांच्या शोधात केलेल्या मुशाफिरीशी परिचय झाला.

मॅकंझीच्या काळात फोर्ट ओफ सेंट जोर्जच्या कॉलेजात दक्षिण भारताच्या इतिहासाचे जाणकार किंवा अभ्यासक असताना त्याने हा स्वतंत्र 'उपक्रम' सुरू करण्यामागचे कारण काय ह्याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळत नाही. किंवा वाचताना हुकले असावे.

मॅकंझी आणि राजवाडे ह्यांची तुलना रोचक आहे. मॅकंझीच्या उपक्रमाला सरकारी मदत मिळाली असली तरी. मात्र नंतरच्या काळात मॅकंझीलाही ह्या कामात स्वतःचा पैसा टाकावा लागला होता असे दिसते. मात्र राजवाड्यांना त्यांच्या कामात जेवढे आणि ज्याप्रकारचे त्रास सोसावे लागले तेवढी तोशीस मॅकंझीला नक्कीच पडली नसावी.

असो. एकंदर लेख फार आवडला. ह्या लेखावर आणखी चर्चा व्हायला हवी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

मकेंझी ने संग्रहण सर्वे खात्याच्या कामांतर्गत सुरू केले, आणि त्याचा फोर्ट सेंट जॉर्ज च्या प्राच्यविद्या वर्तुळाशी तेवढा संबंध आला नाही. चार्ल्स ब्राउन किंवा फ्रांसिस एलिस सारखे प्राच्यपंडित यांचा प्राथमिक अभ्यास भाषाशास्त्रीय होता; तमिळ, आणि अन्य दाक्षिणात्य भाषा संस्कृतोत्पन्न नसून स्वतंत्र वंशवृक्षातले आहेत, या सिद्धांतावर चर्चासंशोधन केंद्रित होते. यात सैद्धान्तिक भाग तर होताच, पण कलकत्तेकर संस्कृत प्राच्यपंडित व एशियाटिक सोसायटीच्या छायेच्या बाहेर पडून वेगळे भाषाशास्त्रीय संशोधन करण्याचा व्यावहारिक भागही होता. या दोन्ही गटांना मकेंझी ज्या प्रकारचे कथानक व सामग्री गोळा करत होता यात अजिबात रस नव्हता - भाषांचा वांशिक इतिहास ते सांगू शकत नव्हतेच, पण वापरता यावा असा शास्त्रशुद्ध इतिहासही त्यांत त्यांना दिसला नाही. फारतर साहित्यिक महत्त्वाचे म्हणून काव्ये, आणि काव्यात्मक सामग्री थोडीफार चर्चेत आली. नंतर कावली बंधूनी ही हाच धागा उचलला - रामस्वामी दख्खनच्या कवींचे चरित्र लिहून लिटररी सोसायटीच्या वर्तुळात सामिल झाला. त्यामुळे अभ्यासक होते, पण इतिहास आणि साधनसामग्री बद्दल निराळे विचार बाळगणारे. टॉम ट्रॉटमन यांनी संपादन केलेले "मद्रास स्कूल ऑफ ओरिएंटलिझम्" (ज्यात मंतनांचा लेख आहे) हे पुस्तक या सर्व संदर्भाचा मस्त आढावा घेते.

मकेंझीची काहीशी सीमीय परिस्थिती होती असे म्हणता येईल - एकीकडे तो हा उपक्रम चालवू शकलाच ही वस्तुस्थिती त्याला वसाहती शासकीय चौकटीतच बसवते. त्याने स्वतंत्रपणे तो चालवला, स्वतःचे पैसे लावले असले तरी पदोपदी त्याला कलेक्टर कचेरी, आणि युद्धात नुकतेच यशस्वी झालेल्या साम्राज्यवादी सैन्याचा हातभार लागला. तो उच्च पदावर होता, आणि नंतर त्याच्या इस्टेटीला या उपक्रमाचा फायदाच झाला. हे विसरता येत नाही, आणि हाच त्याच्या आणि राजवाड्यांमधला मोठा फरक. शेवटी त्याचे आर्काइव दाक्षिणात्य संस्कृतीच्या इतिहासजाणीवेच्या समृद्धीपेक्षा अभाव नोंदविण्यास वापरले गेले, आणि त्याचे सहाय्यकही नवीन संस्थात्मक वारे ओळखून "साहित्य" या नवीन ऐतिहासिक चौकटीत त्यांच्या विचारांना बसवू लागले. पण त्याचे इतिहास, नेटिव्ह ज्ञान आणि समाज, आणि सहाय्यकांबरोबर संबंध मात्र तत्कालीन विचारप्रवाहा पासून वेगळे होते, आणि इतिहासाबद्दल कळकळ ही वैयक्तिक, प्रामाणिक होती. साधन संग्रहाचे त्याला ही वेडच लागले, म्हणूनही राजवाड्यांची आठवण होतेच.

कर्नल मकेंझीचा ऐतिहासिक खजिना

आज वाचून पूर्ण केला. :-) अतिशय अभ्यासपूर्ण आणि मेहनतीने तयार केलेला लेख वाचताना मनापासून बरे वाटले. मॅकेंझीबद्दल वर वर माहिती होती पण एका ध्यासापायी या मनुष्याने केलेली धडपड विस्तृतपणे समोर आली. रोचना यांनी या धडपडीचे केलेले चित्रण रोचक आहे.

आभार

धन्यवाद, प्रियाली! दिवाळी अंकाचा मूळ धागा दुसर्‍या पानावर घसरला होता - हा वेगळा धागा काढल्यावर तुमचा प्रतिसाद पाहिला.

*********
धागे दोरे
*********

अतिशय आवडला

लेख दिवाळीतच वाचला होता. अतिशय आवडला आहे. पण काही अर्थपूर्ण प्रतिसाद नोंदवायला गेलो तर काही सुचेचना. याचे कारण असे की या विषयात मला काहीच गती नाही. (ग्रांट डफ आणि राजवाडे यांच्या कार्याची सुद्धा अंधुक माहिती आहे, इतकेच.) अज्ञानाचे खास नाही. पण अज्ञान जाणवले म्हणून टंकते हात थिजावेत, हा अनुभव माझ्यासाठी नवा आहे.

या खजिन्याची माहिती, ती जमवण्याचे आणि जमवणार्‍यांचे आख्यान हे सर्व मला नवीनच होते. शेवटच्या विभागात ग्रँट डफ आणि राजवाड्यांच्या साहित्य गोळा करण्याशी तुलना केलेली आहे, ते विश्लेषणही अभ्यास करण्याजोगे आहे. या लेखात रोचना यांनी आपले स्वतःचे संशोधनसुद्धा उपक्रम दिवाळी अंकाच्या वाचकांना पुरवले आहे. हे फार चांगले.

लेखाखालची तळटीप उत्सुकता वाढवणारी आहे :

हा फेरविचार इंग्रजांनी गोळा केलेल्या माहितीला खरी-खोटी ठरविण्याचा प्रयत्न नाही. तर विज्ञाननिष्ठ, निष्पक्ष, व आधुनिक म्हणवून घेणार्‍या, व पौर्वात्य, पराजित देशांचे एकमेव विश्वासू निरूपण करू पाहणार्‍या या ज्ञानविश्वाच्या मुळाशी असलेल्या सत्ता संबंधांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ब्रिटिश काळात उगम पावलेल्या अनेक आधुनिक ज्ञानक्षेत्रांचा या व्यापक अभिलेखीय इतिहासात समावेश करता येतो

संदर्भांत दिलेला देशपांडे (२०१०) हा निबंध वाचण्याची इच्छा होत आहे. जमल्यास याबाबतीत थोडी ओळख रोचना यांनी उपक्रमावर द्यावी, अशी विनंती.

+१

लेख दिवाळीतच वाचला होता. अतिशय आवडला आहे. पण काही अर्थपूर्ण प्रतिसाद नोंदवायला गेलो तर काही सुचेचना.

+१ माझेही असेच झाले होते. फक्त 'छान छान' इतकाच प्रतिसाद देण्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण - रोचक माहिती लेख देतो.. पण या विषयीचं अज्ञान प्रतिक्रीया लिहायला थांबवते.

अर्थात मला मात्र "अज्ञान जाणवले म्हणून टंकते हात थिजावेत", हा अनुभव माझ्यासाठी अजिबात नवीन नाही ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मूळ लेख

धनंजय, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! दोन-तीन दिवस जरा गडबडीत आहे; वेळ मिळाला की २०१० च्या लेखाची ओळख करून देईन. लेख तसा लांबलचकच आहे, पण तूर्तास एक प्रत मी येथे टाकली आहे.
*********
धागे दोरे
*********

प्रतिसाद

कागदपत्रे जमवणार्‍या कर्नल मॅकेंझीची ओळख आवडली. प्रतिसाद द्यायला उशीरच झाला. (अवांतर या दिवाळी अंकातील कित्येक उत्तम लेखावंर प्रतिक्रिया दिली नाही याची खंत वाटते.)
ग्रँट डफ आणि राजवाड्यांबरोबर अल बिरुनीचेही नाव आठवले.

प्रमोद

 
^ वर