धर्मभाबड्या डोळ्यांत अंजन घालणारा 'देऊळ'

विवेकशून्य आंधळी धार्मिकता, राजकारण व राजकारणी आणि विकासाच्या नावावर झपाझप बदलणारी भारतातली खेडी या विषयांवर उमेश कुलकर्णीचा देऊळ हा नवा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटाची मणभर परीक्षणे, समीक्षा आता वेगवेगळ्या माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या आहेतच. त्यामुळे त्यावर नवीन काही लिहिण्यात काही हशील नाही. पण मराठी चित्रपटाच्या चुकूनही वाटेला जाऊ नये असे वाटण्याच्या या दिवसांत 'देऊळ' आपल्या मनातलेच काही पडद्यावर आणतो, समाजासमोर त्याचे अस्वस्थ करणारे प्रतिबिंब दाखवणारा आरसा धरतो असे वाटले,म्हणून हे चार शब्द.
चित्रपटाची कथा, त्यातील नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश आणि सोनाली कुलकर्णी (आणि नसिरुद्दीन शहादेखील!) या नावांमुळे या चित्रपटाला एक झगमगीत वलय लाभले आहे. अशा वलयामुळे मूळ कथेचा गर हरवण्याची भीती असते. या चित्रपटातही तसे झाले आहेच, नाही असे नाही. त्यातून हे असे मोठे कलाकार सारखे त्या व्यक्तिरेखांपेक्षा ते कलाकार म्हणूनच अधिक प्रकर्षाने जाणवत राहतात. 'देऊळ' मधला बेरकी राजकारणी भाऊ हा 'भाऊ नाना पाटेकर' असाच दिसत, वागत राहातो. ( 'काय तो तुमचा अभिनेता काशिनाथ घाणेकर! वा वा वा! 'रायगडाला जेंव्हा जाग येते' बघा, हुबेहूब संभाजी! 'अश्रूंची झाली फुले' बघा, हुबेहूब संभाजी!'मला काही सांगायचंय' बघा, हुबेहूब संभाजी!' हे आठवले.) प्रभावळकर हे कुलकर्णी अण्णांच्या ऐवजी 'प्रभावळकर अण्णा' वाटतात. असो.
गावातल्या केशाला झाडाखाली स्वप्नात दत्तमहाराज दिसतात आणि बघताबघता त्या गावाचे एक 'प्रोफेशनल' देवस्थान होते ही एका वाक्यात सांगायची तर 'देऊळ' ची कथा.कोणत्याही गोष्टीचे-विशेषतः श्रद्धेचे सस्ते आणि कुरुप बाजारीकरण कसे होते हे 'देऊळ' हा चित्रपट धाडशीपणे सांगतो.असेही श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशा विषयांना हात घालण्याचे धाडस मराठी पडद्यावर तसेही अभावानेच दिसते. देवस्थानाच्या ठिकाणी 'रिसायकल' होणारे हार किंवा नारळ असोत की देवस्थानाच्या वेबसाईटवरुन 'डाऊनलोड' करण्यासारखे देवार्त्यांचे रिंगटोन्स असोत - हे सगळे आसपास होताना आपण बघत असतोच. त्याकडे सोयिस्करपणाने दुर्लक्षही करत असतो.रोज सकाळच्या वर्तमानपत्रांत रात्रीबेरात्री देवदर्शन करुन परतणार्‍या वाहनांना झालेले अपघात आणि त्यात होणारे मृत्यू बघताना आताशा फारसे काही वाटतही नाही.देवस्थानांच्या ठिकाणी जागोजागी उगवलेले बार (आणि कुंटणखाने) हेही आपल्या सुस्त मनाला चटका लावत नाहीत. देवस्थानाच्या ठिकाणी प्रसाद, अभिषेक, आरत्यांची पुस्तके, कॅसेटस आणि सिड्या यांची दुकाने, प्रवाशी कंपन्यांच्या ट्रिपा, खानावळी, प्लॅस्टिकचे आणि कचर्‍याचे ढिगारे -आणि या सगळ्यात श्रद्धेने झिंगलेले भाविक - या सगळ्यांमधली विसंगती लक्षात येण्याच्या पलीकडे आपण गेलो आहोत. 'देऊळ' हे सगळे दाखवणारा आरसा आपल्या समोर धरतो हे मी जे म्हणालो ते त्यामुळेच.
कोणत्याही गोष्टीचा विचका कसा करावा हे अवघ्या जगाने भारताकडून शिकावे. डायरेक्ट टू होम टेलीव्हिजन, मोबाईल फोन, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतात उपलब्द्ध आणि लोकप्रिय झालेली उत्पादने व सेवा (म्हणजे काय तर बर्गर, फ्रेंच फ्राईज, शीतपेये आणि वेफर्स!)- जरा डोळे उघडे ठेवू इच्छिणार्‍या माणसाला शिसारी यावी असे या सगळ्यांबाबत आपण करुन टाकले आहे. काही दिवस कामानिमित्त परदेशात गेलेला माझा एक मित्र सांगत होता की तो तिकडून आपल्या घरी भारतीय वेळेनुसार रात्री आठ-साडेआठच्या सुमाराला फोन करायचा, तेंव्हा त्याचे आई-वडील फोनवर बोलताना अस्वस्थ, घाईगडबडीत असल्यासारखे वाटायचे. नंतर त्याच्या ध्यानात आले, की ती वेळ टीव्हीवरील मालिकांची असे आणि अगदी परदेशातील आपल्या मुलाचा फोन यापेक्षाही त्याच्या आईवडीलांना त्या मालिका अधिक महत्त्वाच्या वाटत असत! आज गावागावांतून जात असताना अगदी झोपडीसारख्या दिसणार्‍या घरांवरही जखमांसारख्या दिसणार्‍या रोगट डिश अँटेनाज आणि त्यांवरील एकताकपूरी इटीव्ह्याळ कार्यक्रमांना चिकटून बसलेले उद्याच्या आर्थिक महासत्तेचे अगणित वारसदार बघताना मळमळायला लागते.गुडमॉर्निंग, गुडनाईट, पप्पा मम्मी, हॅपी बर्थडे टू यू, करवाचौथ, मंगनी, सगाई, बारात, गोदभराई, दीदी-जीजू असल्या प्लॅस्टिकच्या घुशींनी सगळा समाजच पोखरुन टाकला आहे. खरुज, गजकर्णासारखे हे गाजरगवती आक्रमण वाढते आहे. यावर भाष्य करण्याचे धाडस 'देऊळ' मध्ये दाखवले आहे, म्हणून त्याचे विशेष कौतुक. गावागावांत तरुण-तरुणी, म्हातारे-म्हातार्‍या ज्या पिसाटलेपणाने टीव्हीवरील मालिका बघण्यासाठी लसलसत असतात त्याने तर ही भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक साथ आहे की काय असे वाटायला लागले आहे. भारतातील आदर्श खेडी, भाबडे, निष्पाप गावकरी, ताजी भाजी, स्वच्छ हवा अशा सानेगुरुजी कल्पना बाळगणार्‍यांनी तर 'देऊळ' जरुर बघावा आणि हा बदलता भारत बघून आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारायची की डोक्याला हात लावून बसायचे हे ठरवावे. 'देऊळ' मधले राजकारण व राजकारणी याचे चित्रण मात्र तितकेसे प्रभावी वाटत नाही. देऊळ हा 'वळू-भाग दोन' असे गृहीत धरले तर ('जाने तू या जाने ना' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे 'दिल चाहता है' अनुक्रमे भाग दोन व तीन असे गृहीत धरल्याप्रमाणे!) 'वळू' मध्ये हे गावठी राजकारण अधिक प्रभावीपणे दाखवले होते.
जाताजाता 'देऊळ' या समाजातल्या लैंगिक उपासमारीवर एक मिष्किल कटाक्ष टाकतो. पुरुषप्रधान समाजात 'मुलगाच पाहिजे' अशा स्त्रीच्या आणि विशेषतः स्त्रीच्या मानसिकतेचाही धांडोळा घेतो. (मुलगा पाहिजे म्हणून पुन्हापुन्हा नवर्‍याशी लगट करणारी बायको आणि शेवटी अगदी वैतागून 'आयला या पोराच्या' म्हणून अंगातला शर्ट खसकन ओढून फेकून देत त्या बायकोच्या अंगावर झेपावणारा नवरा ज्यांनी पाहिला आहे त्यांना हा प्रसंग चांगला समजतो!) असले सगळे करताना 'एक ना धड..' असे थोडेसे 'देऊळ' च्या दिग्दर्शकाचे झाले आहेच. विवेकवादी अण्णांचे पात्र अगदी उपरे, कृत्रीम झाले आहे. चित्रपट बराच रेंगाळल्यासारखाही झाला आहे. पण असले सगळे असले तरीही या कुलकर्णीद्वयांचे मला 'देऊळ' साठी कौतुक करावेसे वाटले.
पश्चिम महाराष्ट्रातील एका घाणेरड्या गावातील एका घाणेरड्या थेटरात मी 'देऊळ' पाहिला. उद्याच्या महासत्तेचे आधारस्तंभ संपूर्ण चित्रपटभर अचकटविचकट, अश्लील शेरेबाजी करत होते. सतत कुणाचे ना कुणाचे मोबाईल फोन वाजत होते. चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना रसिकांनी जागोजागी पानतंबाखू खाऊन थुंकलेल्या थारोळ्यांतून वाट काढत कसेबसे बाहेर पडावे लागले. तशातच 'लेज' वेफर्सच्या पाकिटांचे बोळेही पडलेले होते.

लेखनविषय: दुवे:

Comments

+१

शब्दन् शब्द पटला. सर्व विचार माझ्याही मनात जसेच्या तसे आले होते.
इथे अनुल्लेखित असणारी (कदाचित अनावधानाने) एक गोष्ट म्हणजे गाणी...देवा तुला शोधू कुठं आणि दत्त-दत्त ही दोन्ही गाणी अतिशय सुंदर आहेत. देवा तुला शोधू कुठं हे भजन तर एकदम नैसर्गिक वाटते. (म्हणजे कोणत्याही गावात विदाऊट प्रॅक्टिस भजन म्हणणारी माणसे जशी असतात, तसेच हे भजन आहे.)

||वाछितो विजयी होईबा||

दाहक वाक्य न वाक्य

"श्रद्धा" ही वैयक्तिक बाब च असली पाहीजे. तिचे कुरुप प्रदर्शन, उठवळ बाजार मांडायलाच नको खरं तर.

टीव्ही पहात नसल्याने नो कमेंट्स.

अंतर्मुख करणारे परीक्षण. शब्द न शब्द दाहक आहे.

'प्रोफेशनल' देवस्थान

गावातल्या केशाला झाडाखाली स्वप्नात दत्तमहाराज दिसतात आणि बघताबघता त्या गावाचे एक 'प्रोफेशनल' देवस्थान होते ही एका वाक्यात सांगायची तर 'देऊळ' ची कथा.

अशा 'प्रोफेशनल' देवस्थानाची आपल्या डोळ्यासमोर घडलेली तीन उदाहरणे.

मुंबईच्या शिवाजी पार्कमधील 'उद्यान गणेश' गेल्या ३०-३५ वर्षांतीलच आहे अशी माझी समज आहे. पार्कच्या कठडयाला टेकून एक दिवशी एक गणपतीची मूर्ति आली आणि तिचे मुंबईतील एका महत्त्वाच्या देवळात कधी परिवर्तन झाले ते कळलेच नाही.

वरळीचा सिद्धिविनायक ५० वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेच्या एका पडक्या देवळात होता. राजकारणी लोक, सिनेतारे आणि क्रिकेटवीरांनी त्याला डोक्यावर घेतल्यामुळे आज ते देऊळ एक महत्त्वाचे स्थान आणि पोलिसांची डोकेदुखी बनले आहे.

कोथरूडची तुळजाभवानी
कोथरूडची तुळजाभवानी

तिसरे उदाहरण कोथरूडची तुळजाभवानी माता. पौड फाटयाच्या रस्त्यावर नव्या सोसायटयांची गर्दी ८०च्या दशकानंतर सुरू झाली. माझ्या आठवणीनुसार तेथील 'सर्वत्र' ही सोसायटी त्या रस्त्यावरची पहिलीच सोसायटी असावी. तिचा उगम मूळच्या सदस्यांच्या १६ छोटया बंगल्यांपासून झाला, ज्यांमध्ये मीहि एक होतो. ही गोष्ट १९८०-८१ सालची आहे. (ते बंगले आता पुढच्या मोठया इमारतींमागे लपल्यामुळे मुख्य रस्त्यावरून दिसत नाहीत पण जेव्हा ह्या बंगल्यांची पायाभरणी झाली तेव्हा आसपास मोकळया माळाव्यतिरिक्त काहीहि नव्हते. असे फोटोहि माझ्यापाशी आहेत पण ते शोधायला लागतील.) मुख्य रस्त्यावरून आमच्या बंगल्यांकडे जायचा कच्चा रस्ता होता. त्याच्या कोपर्‍यावर जुन्या शेतातील एक शेंदूर लावलेला बांधावरचा दगड होता. वस्ती वाढू लागली आणि उघडयावरील त्या दगडाला एका कच्च्या बांधकामाचे टपरीवजा देऊळ मिळाले आणि दगडाचे 'भवानीमाता' असे नामकरणहि झाले. टपरीपुढे फुले-उदबत्त्या विकणारे स्टॉल्स आले. भक्तांची संख्या वाढू लागली आणि वाहतुकीला अडथळा होण्याइतपत हे प्रकरण मोठे झाले. मूळचा अरुंद असलेला पौड फाटयाचा रस्ता नव्या वाढत्या वस्तीस पुरेना म्हणुन रस्तारुंदीचा प्रस्ताव आला. त्यावेळी 'धार्मिक भावना दुखावता येणार नाही' ह्या कारणासाठी भवानीमातेला बदल्यात प्रशस्त जागा शेजारच्याच टेकडीवर मिळाली आणि तिचे 'तुळजाभवानी माता' (what else?) असे प्रमोशनहि झाले. भक्तांना आकर्षित करणारे असे ते एक पुण्याचे महत्त्वाचे स्थळ झाले आहे. नवरात्रात तेथे आता मोठी जत्रा भरते. शेंदूर थापलेल्या दगडापासून ३० वर्षात देवीची झालेली भरभराट शेजारील चित्रावरून कळतेच आहे. जय मातादी!

 

विधिनिशेध्शुन्यता

कुलकर्नि बन्धुनच्या देऊल् चे उदाहरन आज काल् गावोगावि पहायला मिलत् आहे. विकासाच्या नावे सर्व् जन् पऐस्याच्या मागे धावताना दिस्तात् कारन् सगल्या गोश्ती पऐश्यात् मोजल्या जाताहेत् म्हनुन् मग् तो मिलवताना कुथलाहि मार्ग् विधिनिशेध् श्युन्यपने वापरयचा. मानस् एकदा का पैश्याच्या मागे लागलि कि मग् त्यान्च्या व्रुत्तिहि बदल्तात्. मग् आपोआपच् त्यात् स्वार्थ्, राज्रकारन्, ईगो, (पर्यावर्नाविशयी वा तत्सम्) बेपर्वाई ई.ई. आल्याच्. त्यात् पुन्हा आपन् भारतिय, तन्त्रद्न्यानाचा गैर् वापर् कर्न्यात् वाकब्गार्, चागल्यातल् वाईत तेव्ह्ध आप्न पत्कन् निवद्तो. म्हन्जे, बुदत्याचा पाय् अधिक् खोलात्..........

चित्रपट परिक्षण आहे का ?

देऊळ चित्रपट अजून काही पाहिला नाही परंतु सदरील लेखन चित्रपटाचे परिक्षण् आहे की एका चित्रपट रसिकाच्या पूर्वग्रहित मताच्या पिंका आहेत, काही कळले नाही. असो, सदरील लेखनातून चित्रपटाची काहीच ओळख होत नाही, असे मला वाटले.

पश्चिम महाराष्ट्रातील एका घाणेरड्या गावातील एका घाणेरड्या थेटरात मी 'देऊळ' पाहिला. उद्याच्या महासत्तेचे आधारस्तंभ संपूर्ण चित्रपटभर अचकटविचकट, अश्लील शेरेबाजी करत होते. सतत कुणाचे ना कुणाचे मोबाईल फोन वाजत होते. चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना रसिकांनी जागोजागी पानतंबाखू खाऊन थुंकलेल्या थारोळ्यांतून वाट काढत कसेबसे बाहेर पडावे लागले. तशातच 'लेज' वेफर्सच्या पाकिटांचे बोळेही पडलेले होते.

चित्रपट परिक्षणात अशी माहिती द्यावी लागते, हे नवीनच कळले.

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

पिंका

परंतु सदरील लेखन चित्रपटाचे परिक्षण् आहे की एका चित्रपट रसिकाच्या पूर्वग्रहित मताच्या पिंका आहेत, काही कळले नाही. असो, सदरील लेखनातून चित्रपटाची काहीच ओळख होत नाही, असे मला वाटले.

सदरील म्हणजे काय हे माहिती नाही. पण हे परीक्षण न वाटता पिंका वाटण्यामागेही पूर्वग्रह हे कारण असू शकते. उदाहरणार्थ समजा मला 'कागज के फूल' आवडला नाही, तर याचे कारण मला 'प्यासा' आवडला नव्हता हे असू शकते. किंवा मला शिरीष कणेकरांचे परीक्षण आवडले नाही, तर याचे कारण मुळात मला शिरीष कणेकर आवडत नाहीत, हे असू शकते. यातून तुम्हाला चित्रपटाची ओळख होत नसेल तर जाऊ द्या हो. सगळ्याच गोष्टी काही सगळ्यांना जमतात असे नाही. शिवाय अशा ओळखीसाठी तुम्हाला होम पिच आहेच की!
चित्रपट परिक्षणात अशी माहिती द्यावी लागते, हे नवीनच कळले.
ही या परीक्षणावरची सर्वात आनंददायी प्रतिक्रिया. 'बक रहा हूं जुनूं में क्या क्या कुछ, कुछ न समझे खुदा करे कोई'
धन्यवाद.
कसचं कसचं, प्राडॉव. तुम्ही घरची माणसं. उद्या अजितदादा आराराबांना धन्यवाद वगैरे म्हणायला लागले तर ते बरे दिसेल का?

सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

गमतीदार लेख

लेख आणि शैली गमतीदार आणि यशस्वी आहे.

+१

लेख आणि शैली गमतीदार आणि यशस्वी आहे.

हेच म्हणतो.

-Nile

धर्मभाबडे आणि ज्ञानबेरकी

'धर्मभाबडे' या विषयावर बरीच चर्चा नेहेमी होतच असते. या सगळ्यातून् धर्मस्थानान्चे, तीर्थक्षेत्रान्चे पावित्र्य जपायला हवे. किमान तिथे तरी गल्लाभरूपणा असू नये असा सूर न लावता बुडवा एकदाची ती धर्मस्थळे असा धोशा ज्ञानबेरकी जेव्हा लावतात, तेव्हा तिकडे दुर्लक्ष करावे इतपत बुद्धी या तथाकथित भाबड्या लोकात सुदैवाने असते. असो. बाकी रावसाहेबान्चे शैलीदार लेखन नेहेमीप्रमाणेच आवडले.

:)

ज्ञानबेरकी !!!!
=))

आता बघावाच लागेल

देऊळची इतक्या विविध मतांची परिक्षण वाचली आहेत की आता बघावाच लागेल (आणि अजुन एक परिक्षण? ;० ;) ).
बाकी शैली खास राव-इष्टाईल

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

उलट सुलट मते अशा काही प्रकारची वाचली आहेत की बघायचे कुतूहल आहे.

--मनोबा

मस्त ...

एकदम मस्त परिक्षण.
चित्रपटाच्याच अनुषंगाने संबंधित गोष्टीवर केलेले भाष्यही आवडले.

गावागावांत तरुण-तरुणी, म्हातारे-म्हातार्‍या ज्या पिसाटलेपणाने टीव्हीवरील मालिका बघण्यासाठी लसलसत असतात त्याने तर ही भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक साथ आहे की काय असे वाटायला लागले आहे. भारतातील आदर्श खेडी, भाबडे, निष्पाप गावकरी, ताजी भाजी, स्वच्छ हवा अशा सानेगुरुजी कल्पना बाळगणार्‍यांनी तर 'देऊळ' जरुर बघावा आणि हा बदलता भारत बघून आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारायची की डोक्याला हात लावून बसायचे हे ठरवावे.

खरं आहे. :(

------
छोटा डॉन

मला 'देऊळ' खूप आवडला

परीक्षणात लिहिलेले दोष (उपरे प्रभावळकर अण्णा, काय (काय!) दाखवायचे आहे त्याची गल्लत, इत्यादी) मान्य करूनही मला 'देऊळ' खूप आवडला.

मराठी सिनेमा म्हणजे असे काहीतरी ज्याला पदरचे पैसे खर्च करून जाणे हे आपले कर्तव्य असते; मग प्रत्यक्षात सिनेमा रंजन करणारा, विचार करायला लावणारा, अस्वस्थ करणारा असो वा नसो... अशी काहीतरी समजूत मराठी सिनेमाबद्दल दिसते. मराठी सिनेमांचे निर्मातेही 'लोक थेटरात येऊन पाहात नाहीत... सरकारने मदत करावी, मल्टिप्लेक्सवाल्यांनी शो लावावेत...' असले काहीतरी दीनवाणे बडबडत असतात.

या पार्श्वभूमीवर 'देऊळ'च्या मागे मात्र 'आपण एक झकास सिनेमा बनवू या - आपल्याला म्हणायचे आहे ते ठामपणे म्हणू या - मग ते गंभीर असो वा विनोदी, कुठल्याच प्रकाराला अस्पृश्य समजायचे काम नाही, लोकांना आवडले तर लोक पाहतील' असा काहीसा पक्का विचार जाणवला. स्टार कलाकारांना घेऊन आशय झाकोळेल वगैरे कचखाऊपणा नाही, गोष्टीच्या अनुषंगाने येणारे लैंगिक विनोद दाखवताना भित्रेपणा नाही (सहकुटुंब बघता येईलसे स्वच्छ मनोरंजन वगैरे हवे, म्हणून सपक दांभिक कौटुंबिकपणा इत्यादी), दत्तमंदिरासारख्या तथाकथित 'भावनाभडकाऊ' ठरू शकेलश्या (जो तसा ठरवला गेलाच) विषयाला हात घालताना ('दत्त दत्त' (दोन्ही), 'वेलकम हो राया', 'देवा तुला शोधू कुठं' या तिन्ही गाण्यांचे शब्द मुद्दामहून ऐकावेत) काचकूच नाही.

सिनेमा विचार करायला लावण्यासोबत आपले मनोरंजनही करतो आणि त्याबद्दल त्याला कुठेही शरमिंदे वाटत नाही, हे मला अतिशय महत्त्वाचे वाटले.

खेरीज नाना पाटेकर मला तरी भाऊ नाना पाटेकर न वाटता भाऊच वाटला (पण हे सापेक्ष आहे हे मान्य आहे). सोनाली कुलकर्णीचे कामही निव्वळ खल्लास आहे. काहीशी सैल वागणारी, पुढारीपणात रस असलेली ती भोचक बाई सोनालीने कमालीची जिवंत केली आहे. तिची चाल, नेसणे - बोलणे सगळेच पाहण्यासारखे आहे. हेच सगळ्या लहान-सहान पात्रांचे. एकेका फटकार्यातून त्यांचे जिवंत चित्र समोर उभे राहते, त्यांच्यातली जुगलबंदी पाहताना बेहद्द मजा येते.

नसीरुद्दीन शाहचे उच्चार मात्र खटकले; ते सफाईदार मराठीत आणणे अशक्य तर नक्कीच नसणार. हा एक मोठाच दोष आहे.

गिरीश कुलकर्णीच्या बेअरिंगबद्दल तर बोलायलाच नको. त्याच्या गावठी बोलण्यातली सहजता, बेरकीपणा, भोळेपणा, देवाबद्दलचे प्रेम, मैत्रिणीशी, आईशी असलेले त्याचे नाते ... सगळे लाजवाब आहे. त्यानेच लिहिलेली ही कथा, संवाद आहेत हे कळल्यावर तर मला त्याच्याबद्दल निव्वळ आदर वाटला.

- मेघना भुस्कुटे

प्रतिसाद

प्रतिसाद आवडला. धन्यवाद.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

आपली धाव इथपर्यंतच.

गोष्टीच्या अनुषंगाने येणारे लैंगिक विनोद दाखवताना भित्रेपणा नाही

खरे आहे. आपली धाव इथपर्यंतच.

अवांतर: 'लैंगिकता आणि मी' ह्या विषयावरचे बरेचसे लेखन नुकतेच एका आंतरजालीय दिवाळी अंकात वरवर चाळले. आमच्या एका चांगल्या हलकट मित्राने "तो अंक म्हणजे 'लैंगिक' मेजवानी आहे, पंत. जाऊन वाचा!" असे सुचवले होते. अर्थात असे म्हणणे त्याच्या लौकिकाला अत्यंत साजेसेच होते. आम्ही त्याच्या हलकटपणाकडे हलकेच मंदमंद स्मितत दुर्लक्ष केले आणि अंकाकडे मोर्चा वळवला. लेखन चाळल्यावर एकंदर त्या अंकात 'लैंगिकता' ह्या विषयाला 'मी' ह्यांनी बऱ्यापैकी बाळबोधपणे हाताळले असल्याचे जाणवले. असो. पण प्रयत्न चांगला.

बाकी राव ह्यांचा लेख आणि तुमचा प्रतिसादही आवडला. तुमच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया टाकल्यावर असे लिहिणे आवश्यक आहे हे खरे. पण खरेच आवडला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खरेच आवडले.

किमान शब्दांत कमाल लाथा मारण्याचे तुमचे कसब खरेच शिकण्यासारखे आहे. खरेच आवडले.

जुनाट आपण-

'देऊळ' चित्रपटात नेमके कशावर भाष्य आहे ते समजले. (...असल्या प्लॅस्टिकच्या घुशींनी सगळा समाजच पोखरुन टाकला आहे.) आता ते नेमके कसे केले आहे? म्हणजे ते भाष्य बटबटीतपणे चव्हाट्यावर मांडले जाते की संयतपणे जाणवते ते पहायला हवे. नाहीतर कोण जाणे, 'प्लॅस्टिक वापरू नका' अशी जाहिरात करणारे होर्डिंगच फ्लेक्सच्या प्रचंड फलकावर छापलेले असायचे!

देऊळ चित्रपटाच्या परीक्षणाच्या निमित्ताने 'जरा डोळे उघडे ठेवू इच्छिणार्‍या माणसाला शिसारी यावी असे या सगळ्यांबाबत आपण करुन टाकले आहे.' ही लेखकाची मल्लीनाथी आमच्यासारख्यांना मनोमन पटते हे खरे, पण आम्ही मेणाचे जुनाट बाहुले आहोत आणि म्हणूनच हल्लीच्या चमकदार रंगांच्या, सुबक,चटपटीत बार्बी डॉल्स आपल्याला खुपतात असा एक आरोप होऊ शकतो.

टी व्ही

चित्रपट परीक्षणाबरोबर संबंधित विषयावरचे भाष्य आणि शैली जास्त आवडली.
चित्रपट मात्र जरा संदेशदेऊ वाटतो. न पटणारे संदेश देणारे चित्रपट तर बघवत नाहीच, पण पटणारे ही फार कंटाळवाणी वाटतात. एकेका मतानिमित्ताने तयार केलेली पात्रे आणि अगदी अपेक्षित वादविवाद. चमकवून टाकणारं असं खूप कमी.

ता.कः मेघना यांचा प्रतिसाद आत्ताच वाचला. आता सिनेमा बघावासा वाटतो!

गुडमॉर्निंग, गुडनाईट, पप्पा मम्मी, हॅपी बर्थडे टू यू, करवाचौथ, मंगनी, सगाई, बारात, गोदभराई, दीदी-जीजू असल्या प्लॅस्टिकच्या घुशींनी सगळा समाजच पोखरुन टाकला आहे. खरुज, गजकर्णासारखे हे गाजरगवती आक्रमण वाढते आहे. यावर भाष्य करण्याचे धाडस 'देऊळ' मध्ये दाखवले आहे, म्हणून त्याचे विशेष कौतुक. गावागावांत तरुण-तरुणी, म्हातारे-म्हातार्‍या ज्या पिसाटलेपणाने टीव्हीवरील मालिका बघण्यासाठी लसलसत असतात त्याने तर ही भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक साथ आहे की काय असे वाटायला लागले आहे.

अगदी बरोबर, १००% सहमत. कॅल्विन आणि हॉब्ब्स चित्रमालिकेची एक गोष्ट आठवली. दोघे एका पुस्तकात (कार्ल मार्क्स चे वाक्य) वाचतात - "धर्म हे समाजाचे अफिम आहे." म्हणजे नक्की काय, हा विचार करत बसतात. समोरा चा टीव्ही मनोमन म्हणतो - "याचा अर्थ मार्क्स ला अफिम म्हणजे काय असते याची कल्पनाच नव्हती..."

चित्रपट आवडला!

देऊळ चित्रपट पाहिला. 'विहिर' पाहिला होता म्हणूनच देऊळ पहायचाच हे आधीच ठरवले होते. दोघा कुलकर्ण्यांचा हा हि चित्रपट आवडला.

परीक्शण तितकेसे पटले नाही.
प्रत्येक राजकारणी कपटीच असायला हवा असे नाही. एखादा राजकारणी रोमँटीक देखील असू शकतो. उलटपक्शी मला तरी दिग्दर्शकाने व लेखकाने नानाचे पात्र उगीचच मोठे होवू दिले नाही, जे खूप चांगले केले. मुळात ते पात्र सगळ्यांना सोबत घेवून चालणारे, काळानुसार बदलणारे, वरीश्ठां समोर म्हणा की आपल्या फायद्यासाठी म्हणा पण वेळेप्रसंगी नमते घेणारे असेच होते.
या पात्राच्या अगदी उलट प्रभावळकर यांचे पात्र होते. ते पात्र सुशिक्शीत असून ही हे जग असंच चालायला हवं किंवा अमुक एका पद्धतीने जग कां चालत नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे न सापडलेलं होतं. मला स्वतःला प्रभावळकर यांचा अभिनय आवडत नाही. प्रभावळकर ह्यांच (कमकुवत) व्यक्तीमत्व गोंधळलेलं पात्र म्हणून छान शोभतं त्या उद्देशाने कदाचित त्यांना ह्या चित्रपटात ते पात्र देवू केले असावे असे मला वाटते.

(मुलगा पाहिजे म्हणून पुन्हापुन्हा नवर्‍याशी लगट करणारी बायको आणि शेवटी अगदी वैतागून 'आयला या पोराच्या' म्हणून अंगातला शर्ट खसकन ओढून फेकून देत त्या बायकोच्या अंगावर झेपावणारा नवरा ज्यांनी पाहिला आहे त्यांना हा प्रसंग चांगला समजतो!)


कमाल आहे?
मी हा चित्रपट मुंबईतील बोरीवली येथील जया (ह्या घाणेरड्या) थेटरमध्ये (मुंबईतहि एकापेक्शा एक घाणेरडी थेटरं आहेत.) तिथं वर उल्लेखलेल्या पात्राला बर्‍याच वर्शापासून मुलच नसते. त्याला जेंव्हा बर्‍याच वर्शाने मुल होते ते दत्ताच्या कृपेने होते अशी बातमी बातमीदारासोबतची टाळकी करायचे घाटतात, असे दाखवले होते.
कथा सुरु झाली एका स्वप्नामुळे.
त्या गावात इन्फ्रास्ट्रकचरल विकास न होण्याने अनेकांची स्वप्ने खुंटलेली असतात. गावातील शहाणा समजला जाणारा 'सुशिक्शीत अण्णा' अमुक एका पद्धतीने गावाचा विकास व्ह्यावा ह्या विचारांचा असतो. पण.....
मॅन प्रपोजेस...गॉड डिस्पोजेस्!
विकास कसा होतो? कुणामुळे होतो? कशामुळे होतो? काय केले कि होतो? ह्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नाही.

एका स्वप्नातून प्रेरणा उपजते, त्या प्रेरणेला 'महत्वाकांक्शेचे' बळ मिळून ती शक्ती कार्यरत होते. मग तीथून विकासाचे चक्र फिरू लागते. विकास झाल्यानंतर तीसरा टप्पा आधीच्या शक्तीचे विघटन! इथून कथानक आधी सुरू केलेली प्रेक्शकांची भावनिक इन्वॉल्वेमेंट कमी करीत तो चित्रपट त्यांना अलिप्त होवून पहायला लावते.
शेवटच्या भागात ज्या व्यक्तीला स्वप्न पडल्यामुळे गावातील इतर मंडळींमध्ये 'महत्वाकांक्शेची प्रेरणा' फुलते त्या फुलण्याला एकीतून साकारलेल्या 'मास्टर मांईड'च्या शक्तीमुळे चालना मिळते व तिथून विकास होतो हे सांगत असता असतानाच 'त्या भोळ्या भाबड्या पहिल्या व्यक्तीला मार देवून एक फेरा संपला' आता हा चित्रपट वरच्या स्तरावर नेला जाईल हे सांगतो. व होतं देखील तसेच.

विहीर हि तसाच होता. फक्त ह्या चित्रपटाचे कथानक लिहीता-लिहीता कुलकर्णी आता खूप प्रगल्भ झाले आहेत हे कळते.

-----------
वरील एका प्रतिसादात भुस्कुटे बाई म्हणतात.-
गिरीश कुलकर्णीच्या बेअरिंगबद्दल तर बोलायलाच नको. त्याच्या गावठी बोलण्यातली सहजता, बेरकीपणा, भोळेपणा, देवाबद्दलचे प्रेम, मैत्रिणीशी, आईशी असलेले त्याचे नाते...
मला तरी गिरीश कुलकर्ण्यांच्या पात्रात कोणत्याही प्रसंगात भेरकीपणा दिसला नाही. ते एक साधेभोळे पात्र होते.

सापेक्ष

'आपण तर फक्त ठिपकाय ठिपका' असे म्हणून अण्णांना निरुत्तर करणार्‍या केशामधे मला तरी बेरकीपणाची एक छटा जाणवते. त्याच्या बिनतोड युक्तिवादाचे हसूही येते. शेवटी हे सापेक्ष आहे, हे खरे आहे.

हजरजबाबीपणा व बेरकीपणा हे सापेक्श असू शकतात?

बेरकीपणा हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे लबाड माणसाला, मनात काहि उद्देश ठेवून बोलणार्‍याला म्हणतात. केशाने जे उत्तर दिले त्याला पद्धतीला माझ्या मते 'हजरजबाबीपणा' असे म्हणतात.

आपण घातलेला नवा शर्ट अण्णांना दाखवण्यासाठी आलेला होता. तेंव्हा गावातील विकास चूकिच्या पद्धतीने होत असल्यामुळे निराश झालेल्या अण्णांना तुम्ही ह्या दुनियेचे ओझे स्वतःच्या डोक्यावर कां घेता? असे सांगायचे असल्यामुळे त्यांनी एके काळी दिलेले उत्तर त्यांच्या निराशेच्या क्शणी भावनेचा आधार व्हावा म्हणून त्याने म्हटले कि बदलत्या काळाच्या पटावर आपण केवळ ठिपके असतो.

ते नवे शर्ट त्याला देऊळ बांधणार्‍या गटाने दिलेले असते, चढवलेले असते. ते शर्ट बदललेल्या काळानुसार स्विकारलेले नवी विचारचौकट असा काहिसा अर्थ दिग्दर्शक + लेखकाला असावा असे वाटते. त्यात केशा मनात काहि ठेवून ज्यांना तो मान देतो अशा अण्णांना बोलेल कां?

तुमचा प्रतिसाद वाचून अण्णांच्या भुमिकेत दिलीप प्रभावळकर यांनी त्या पात्राची वाट लावली असे आत्ता वाटू लागले आहे. कथानकाच्या सुरवातीला रात्रीच्या वेळी माळरानावर, मचाणावरती अण्णा केशाच्या समोर मांडी घालून डोळ्याला डोळा भिडवून संवाद बोलतात. ह्या ऐवजी अण्णांच्या पात्राने, पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास कशासाठी केला जातो? ह्या प्रश्नाने बुचकळ्यात पडलेल्या केशाला 'काळाच्या पटावर आपण सगळी माणसं केवळ ठिपका असतो, ठिपका.' हे वाक्य त्यांनी भव्य आकाशात चांदण्याकडे पहात, किंवा शून्यात नजर लावून म्हणायला हवे होते. तेवढे इंप्रोवायजेशन प्रभावळकरांना (नेहमीप्रमाणेच) जमले नाही. अण्णा काय बोलताहेत हे सामान्य बुद्धीच्या भोळ्या पण हजरजबाबी केशाला समजत नाही म्हणून तो म्हणतो, 'काय अण्णा? एवढा मोठा देह तुमच्या समोर बसलाय अन् तुम्ही मला म्हणताय 'ठिपका'? बरं चलतो! ह्या ठिपक्याची आता जायची वेळ झालीय.' (अशा प्रकारचे विधान)

अनाठाई

पश्चिम महाराष्ट्रातील एका घाणेरड्या गावातील एका घाणेरड्या थेटरात मी 'देऊळ' पाहिला

अत्यंत अपरिपक्व , अनावश्यक, टिपिकल शहरि प्रतिक्रिया.

(अवांतर: घाणिच्या बाबतित मुंबई चा प्रथम क्रमांक लागु शकतो)

का बरे? कसं काय?

अत्यंत अपरिपक्व , अनावश्यक, टिपिकल शहरि प्रतिक्रिया.

का बरे? कसं काय?.. एखाद्या घाणेरड्या गावाला व थेटरला घाणेरडे म्हणण्यात कसलं शहरीपण आलंय?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अपरिपक्व, अनावश्यक, टिपिकल शहरी

अपरिपक्व, अनावश्यक, टिपिकल शहरी ही विशेषणे वापरण्याचे आपले स्वातंत्र्य मान्य आहे. हे सगळे आपल्याला अनावश्यक वाटले याचा अर्थ हे मी का लिहिले आहे हे (माननीय प्रा. डॉ. बिरुटेसरांप्रमाणे) आपल्याला कळाले नाही असा होतो. मला जरा कमी क्रिप्टिक लिहायला हवे!
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

थोडा प्रकाश पाडा राव, मी देखील अंधारात आहे.

हे सगळे आपल्याला अनावश्यक वाटले याचा अर्थ हे मी का लिहिले आहे हे (माननीय प्रा. डॉ. बिरुटेसरांप्रमाणे) आपल्याला कळाले नाही असा होतो. मला जरा कमी क्रिप्टिक लिहायला हवे!

मला देखील कळले नाही. लेखाचा विशय 'एक चित्रपट' आहे? कि
'एखाद्या भूभागातील थेटरं किती घाणेरडी आहेत? नव्हे केवळ थेटरं नाही तर त्या भागातील लोकहि गावंढळ व गलिच्छपणा जोपासून तो भूभाग घाणेरडा ठेवतात' हे सांगणे आहे?

कृपया, उत्तराला वेगळे वळण न देता, मुख्य विशयाला जोडून ते कां लिहीले? ते सांगावे हि विनंती.

-------------------------------------------------
एक बार गलती करता है, वो है इंन्सान
बारबार गलती करता है, वो है शैतान
खुद गलती पे गलती करके, दुसरोंकी खामियां गिनता है, वो है.......?

जरा ताण द्या

मराठीतले एक लेखक म्हणतात, 'लेखकाने इतका प्रयत्न करुन लिखाण केलेले असते, ते समजून घेण्यासाठी वाचकांनीही थोडेसे प्रयत्न करावेत.' सगळे लिखाण सहज-सोपे- प्रीडायजेस्टेड सेरेलॅकसारखे हवे असेल तर इतर जागा आहेतच. त्यामुळे रावले साहेब, जरा मेंदूला ताण द्या. नाही समजले तर सोडून द्या. परत त्याच लेखकांचे वाक्य लिहितो, 'झेब्रा आवडला नाही तर तसे म्हणा, हा कसला पट्ट्यापट्ट्याचा उंट, असे म्हणू नका'.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

नै नै तुम्ही आपलं लिहित राहा.

मला जरा कमी क्रिप्टिक लिहायला हवे!

नै नै, तुम्ही आपलं जमेल तितकं उच्च आणि क्रिप्टिक लिहित जा. सर्वच लेखन अगदी मुद्देसूद, नादमय आणि एका लयीत असलं पाहिजे असं थोडं असतं. आणि सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत असंही काही नसतं. आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा निराशेनं मला घेरलेलं असेल, मी खूपच चिंताग्रस्त असेन, जगण्याची इच्छा जेव्हा मरुन जाईल तेव्हा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आठवून मन उत्साहित करण्यापेक्षा आपलं हे असलं क्रिप्टिक आणि संदर्भ तोडून केलेले लेखन मी वाचायला घेईन आणि मला नक्की खात्री आहे की, माझं मन अधिक उत्साही आणि प्रफुल्लीत होईल या बद्दल माझ्या मनात कोणताही किंतू नाही. (आचार्य अत्रे मला क्षमा करतील )

हम भी दरिया है हमे अपना हुनर मालूम है.
जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता हो जायेगा.

-दिलीप बिरुटे

पश्चिम महाराष्ट्रातील-गावातील काही घाणेरडी सिनेमागृहे !

पश्चिम महाराष्ट्रातील एका घाणेरड्या गावातील एका घाणेरड्या थेटरात मी 'देऊळ' पाहिला

काहीसा असाच अनुभव सातार्‍यात "दे धक्का" चित्रपट पाहताना समर्थथेटरात आला, त्यामुळे सहमत.

परिक्षण आवडले, त्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे,
पण,
"हिंदु जन जागृती समिती"ने या चित्रपटाच्या गाण्यावर आक्षेप घेतल्यामुळे (अजुन बॉम्बस्फोट झालेले नाहीत हे सुदैवच म्हणावे लागेल)
हा चित्रपट, चित्रपटगृहात जावून पाहण्याची हिम्मत होत नाहिए,
त्यामुळे बाजारात डिव्हिडि आली की पाहीन म्हणतो.

देऊळ

न्यू यॉर्क् मध्ये सुरू असलेल्या दक्षिण आशियायी चित्रपटमहोत्सवात नुकताच(आजच) हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटगृह पूर्ण भरले होते. लोकांना चित्रपट आवडला. प्रेक्षकांमध्ये अमेरिकन्स्ही होते.नंतरच्या चर्चेत काही प्रश्न विचारले गेले.त्यातला एक नसीरुद्दीन् शाहच्या व्यक्तिरेखेच्या प्रयोजनाविषयी होता. तिची आवश्यकताच नव्हती असे काहींचे म्हणणे. दिग्दर्शकाच्या मते ती संदिग्धता मुद्दामच ठेवली आहे. चित्रपटाची सुरुवात केश्याच्या स्वप्न/साक्षात्कारापासून होते. शेवटही साक्षात्कारानेच(विजन्) केल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले.गायीच्या पायाला जखम झालेली असते तशीच नसीरुद्दीनच्या पायालाही ती झालेली दाखवली आहे. यावरून काही सूचित अर्थ प्रेक्षक काढू शकतील.
मला देऊळ आवडला होता. मला तरी त्यामध्ये काही सणसणीत भाष्य किंवा झणझणीत अंजन वगैरे जाणवले नव्हते. भाष्य होते पण ते नर्म विनोदी शैलीने केलेले. संपूर्ण गावाचा पट मांडायचा तर पात्रांची भाऊगर्दी आलीच जी एकसंध परिणामाला मारक ठरलेली आहे. अर्थात् असा तुकड्यातुकड्यांचाच परिणाम अपेक्षित असावा.कारण इतकी सगळी पात्रे,त्यात प्रत्येकाच्या छुप्या आणि उघड अजेंड्याचे वेगवेगळे पदर आणि त्याला अनुसरून वेगवेगळी गोष्ट. तरी सलगता बर्‍यापैकी राखली आहे.
या चित्रपटातली सर्वात आवडलेली आणि पटलेली गोष्ट म्हणजे यात दाखवलेले बदलते, बदललेले खेडे. टी.व्ही चे घराघरात झिरपलेले व्यसन, कृतक् (पण तरीही खरीच की) माध्यमजागृती,इंग्रजी भाषेचा,हिंदी चित्रसृष्टीचा ग्रामीण संस्कृतीमध्ये झालेला सहज शिरकाव,लोकांची बदललेली बोली आणि देहबोली,(अमृता सुभाषचे केश्याच्या छातीवर मुठी आपटीत 'आ हेट् यू,आय् हेट् यू' असे बॉलिवुड् स्टाइल् किंचाळणे) अशा कितीतरी छोट्या छोट्या बारकाव्यांनी मजा आणली आहे. आणि ते नामधारी महिला सरपंचाचे पात्र तर बेफाट आहे. सरपंचाच्या नामधारीपणाची योग्य ती जाणीव ठेवून सतत भेदरलेपणा,सर्वांच्या धाकात वावरणं,त्यातच जमेल तितका सौम्यसा पुढारीपणा करणं हे सर्व खूप आवडून गेले.
छायाचित्रण ही सुरेख आहे.विशेषतःएकीकडे देऊळ आणि त्या भोवतीची जत्रा दाखवताना वापरलेले भडक रंग आणि झगझगीत प्रकाश तर दुसरीकडे देवाची मूर्ती लपवतानाची सौम्य रंगसंगती आणि मंद प्रकाश आशयाला बळकटी आणतो.
शेवटी,ऑल् सेड् अँड् डन्,चित्रपट एकदा(तरी) बघावा(च).

प्रतिसाद

कलाकृती एकदा पूर्ण झाली की मग रसिकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे त्याचे अर्थ काढावेत हा कलाक्षेत्रातला नियमच आहे. नसीरुद्दीन शाहचेच नव्हे, तर मला प्रभावळकरांचे पात्रही अनावश्यक वाटले. गाईच्या पायाची जखम आणि नसीरुद्दीनच्या पायाची जखम हे असले बाकी त्या दिग्दर्शकालाही अपेक्षित असेल असे वाटत नाही. अर्थात हे माझे मत झाले.
केशाच्या छातीवर मुठी आपटणारी नटी ही अमृता सुभाष नव्हे. हे बाकी माझे मत नसून ही वस्तुस्थिती आहे....
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

थिएटर

काही कारणास्तव गेली कित्येक वर्षे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट (कोणत्याही भाषेतील) पाहणे पूर्ण बंद झाले आहे. तिच गोष्ट टेलिव्हिजनची. जाहिरातींच्या संताप येणार्‍या अतिरेकामुळे तिथेही चित्रपट पाहत नाही - अपवाद अधेमधे टीसीएम चॅनेल्, कारण इथे एकतर मला आवडणारे जुन्या जमान्यातील ब्लॅक अँड व्हाईट इंग्रजी चित्रपट लागतात शिवाय एकही जाहिरात नसते, ब्रेकही नसतो. अगदी साडेतीन तासाचा 'गॉन् वुइथ् द् विंड्' एकाही ब्रेकशिवाय तिथे एंजॉय करता येतो.

~ पण 'देऊळ' बाबतचा लेख आणि त्यावरील जास्तीतजास्त अनुकूल प्रतिक्रिया वाचल्यावर हा चित्रपट अवश्य बघावा असे वाटू लागले आहे, पण पाहिला तर तो मात्र थिएटरमध्ये न जाता डीव्हीडी आणून घरीच.

तसे करीनही.

अशोक पाटील

इंटरनेटवरचे चित्रपट

भारतात यूटयूबवरचे चित्रपट दिसत नाहीत का? तेथे सर्व भाषांतील - इंग्रजी, मराठी, हिंदी - भाषांतील उत्तमोत्तम चित्रपट, कधीकधी सलग तर कधीकधी ८-१० भागांमध्ये, भरपूर उपलब्ध आहेत. ते का नाही पाहात? तसेच नाटकांचे. उदा. घाशीराम कोतवाल, नव्या संचातले, तेथे सलग उपलब्ध आहे

apalimarathi.com येथेहि भरपूर मराठी चित्रपट आणि नाटके आहेत. ती भारतात पाहाता येतात किंवा नाही ह्याची माहिती मिळेल काय?

भारतात

भारतात वा कोठेही यूट्यूबसारख्या ठिकाणी सलग, न अडखळता (without frequent buffering) चित्रपट पाहता येण्याकरिता इंटरनेटचा वेग किमान १ एम्बीपीएस असायला हवा. नाहीतर दर ५-१० मिनिटांनी बफरिंगचा व्यत्यय येतो. भासंनि १+ एम्बीपीएस् अमर्यादित जोडणी देत नाही. इतर सेवा पुरवठादारांचेही जवळ्पास तसेच आहे. २+ एम्बीपीएस चा वेग असणार्‍या जोडण्यांना डाऊनलोडिंगची मर्यादा असते. अशा कारणांसाठी ऑनलाईन सिनेमे पाहणे अवघड जाते.

||वाछितो विजयी होईबा||

यूट्युब् आणि आपली मराठी

धन्यवाद. ही माहिती (निदान माझ्यासाठी तरी) नवी आहे. यूट्यूबवर मी प्रासंगिक क्लिप्स अधूनमधून (अर्थातच ऑन रेकेमेन्डेशन) पाहात असतोच. पण पूर्ण चित्रपट ही सोयही तिथे मिळते हे वाचून समाधान वाटले. नक्की प्रयत्न करेन. वरील प्रतिसादात श्री.तुषार म्हणतात तसा नेट स्पीडचा अडथळा मलाही येईल असे वाटते कारण माझ्याकडे टाटा फोटॉन असूनही त्याची गती पाहून गोगलगायही 'चेतक' प्रमाणे जाते की काय असे वाटते.

apalimarathi.com देखील आपली करण्याचा प्रयत्न करून पाहतो.

अशोक पाटील

घाशीराम

आज योगायोगाने घाशीराम कोतवाल सापडलेच होते तर लिंक देतो.

घाशीराम कोतवाल - संपूर्ण नाटक

-Nile

घाशीराम कोतवाल

व्वॉव ~ धन्यवाद निलेश. मी मूळ [डॉ. मोहन आगाशे यांचा नाना फडणीस अजूनही स्मरतो] नाटक पाहिले आहे त्याला आता वर्षे लोटली. त्यानंतरही एकदोनदा हौशी संचाकडून सादर केले गेलेले (सरकारी नाट्यस्पर्धेतील) प्रयोग पाहण्यात आले होते, पण त्यातील काटछाट मला भावली नव्हती. पण तो दोष सादर करण्यार्‍यांचा नव्हता तर दंगलीच्या पार्श्वभूमीवर संहितेत झालेले फेरबदल त्या सादरीकरणाला मारक ठरले होते.

आता यूट्यबवरून डाऊनलोडवितो अन् त्याबद्दल तुमचे आणि श्री.कोल्हटकर यांचे आभार मानतो.

अशोक पाटील

चित्रपट पाहाणे - रिअल प्लेअर डाउनलोडर

मी ह्यातला तज्ञ वगैरे काही नाही, तरीपण मी अनुभवाने काय शिकलो ते सांगतो. कोणास उपयोग झाला तर उत्तम. थोडे अवांतर आहे पण उपयुक्त ठरावे...

बफरिंगवर इलाज म्हणजे रिअल प्लेअर डाउनलोडर वापरून संपूर्ण विडीओ आधी डाउनलोड करणे. त्यास कितीहि वेळ लागू दे कारण ते चालू असता तुम्ही अन्य कामे चालू ठेवू शकता. डाउनलोड सुरू झाल्यावर मूळ विडीओ सोडून दुसर्‍या विडीओकडे वळता येते कारण विडीओ पाहाणे आणि त्याचा डाउनलोड ह्या एकमेकांपासून स्वतन्त्र गोष्टी आहेत. सुरू झाल्यानंतर डाउनलोड पार्श्वभूमीवर चालूच राहतो. ह्या मार्गाने एखाद्या चित्रपटाचे सर्व भाग एकाच वेळी डाउनलोड करता येतात. गति चांगली असल्यास पूर्ण चित्रपट (सुमारे ५०० एम बी) १०-१२ मिनिटात डाउनलोड होतो. अर्थात इंटरनेटच्या मासिक वापरासारखे काही बंधन असेल तर त्या बंधनाच्या आतच राहून हे करता येईल.

सर्व भाग डाउनलोड झाल्यावर रिअल प्लेअरमध्ये त्यांची प्लेलिस्ट तयार करा. आता तुमच्या हार्ड ड्राईववरून चित्रपट तुम्ही सलग बघू शकाल.

छोटया स्क्रीनपेक्षा मोठयावर चित्रपट अधिक मनोरंजक वाटतो. शक्य असल्यास संगणक मोठया टीवीला जोडून थिएटरमध्ये बसल्यासारखा सहकुटुंब पहा.

अधिक तान्त्रिक मार्गदर्शनासाठी गूगल वा यूटयूबला विचारा.

(टॉरेंटस् वापरणे हाहि एक मार्ग आहे पण वायरसच्या भीतीने मी त्याच्या मागे जात नाही.)

देवळावरची पाटी

लेख आवडला.
देऊळ पसरट वाटला. तरी त्या मधली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे देवळावरची पाटी :
"तू झोपी जा. मी जागा आहे."
धमालच.

तू झोपी जा. मी जागा आहे.

ह्यावरून एक ऐकीव गोष्ट आठवली ती सांगतो.

जगन्नाथ पंडित आणि अप्पय्य दीक्षित हे समकालीन विद्वान वाराणसीत रहात असत आणि ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. आपल्या स्वैर वागणुकीमुळे जगन्नाथ कुप्रसिद्ध होता.

गंगेच्या घाटावर एका दुपारी जगन्नाथ वामकु़क्षी करत असतांना जवळून जाणार्‍या अप्पय्य दीक्षितानी त्याला पाहिले आणि त्यांनी पुढील श्लोक रचला:

किं नि:शङ्कं शेषे शेषे वयसि समागते मृत्यौ|
अथवा सुखं शयीथा: निकटे जागर्ति जाह्नवी जननी||

मृत्यु समीप आलेला असतांना उरलेल्या दिवसात असा निर्धास्त का झोपला आहेस? किंवा, आनंदाने निद्रा घे, गंगामैय्या जवळच जागृत आहे!

च्यायला माझ्या पाठीमागे लपून मलाच म्हणतोयस, तू भीऊ नकोस?

देऊळ पसरट वाटला.
अहो दादा, तो पीक्चर सिनेमास्कॉप होता, म्हणून तो पसरट वाटला असेल.

"तू झोपी जा. मी जागा आहे." हे वाक्य मला उगीचच
" भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ह्या वाक्याचे विडंबन वाटले.

आहेच्

आहेच की..

||वाछितो विजयी होईबा||

छान समीक्षा

सर्व गोष्टी एकवटून एकूणच वाचण्याजोगे काहीतरी खास वाचकांसमक्ष मांडण्याचा हा सन्जोप रावांचा प्रयत्न अभिजात वाटला, अगदी स्तुतीस पात्र! चित्रपट पहावा असे वाटायला लागले आहे आता. आभार.

पाहिला. आवडला

(एकदाचा) देऊळ पाहिला. आवडला. वर परिक्षणात म्हटल्याप्रमाणे "भारतातील आदर्श खेडी, भाबडे, निष्पाप गावकरी, ताजी भाजी, स्वच्छ हवा अशा सानेगुरुजी कल्पना बाळगणार्‍यांनी तर 'देऊळ' जरुर बघावा " असेच म्हटतो.

चित्रपटात भारतीय सवंग राजकारणावरही चांगला प्रकाश टाकला आहे. त्याही पेक्षा उत्तम टिपणी नाना करतो जेव्हा तो म्हणतो "शहरातल्या लोकांना गाव सतत छान, शांत हवं. ते मात्र तिथे बसून पैसा ओढणार!" हे या परिस्थितीचं मुळ नेमकं पकडलं आहे. अण्णांचं पात्र मात्र अगदी तकलादू वाटतं, त्याहुनही ते निराशावादी (आणि पुचाट) वाटतं. "हे चक्र आता इतकं गतिमान झालं आहे की आता ते थांबणं तुम्हालाच काय कोणालाही शक्य नाही" म्हणून लेखक या परिस्थितीवर उतारा नाही हेच सांगतो. हे आहे हे असं आहे आणि असंच चालु रहाणार हा वास्तववादी दृष्टिकोन आहे का? यावर मात्र नकारात्मक प्रतिक्रीया देताना जीभ चाचरते हेही तितकच खरं! :(

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आत्ताच पाहिला.

आवडला. काही गोष्टी खटकल्या. पण एकूणात गोळाबेरिज केली आवडलेल्या गोष्टी अधिक वाटल्या. चित्रपट बघावास वाटण्यात् ह्या लेखाचाही हातभार आहेच.

--मनोबा

 
^ वर