ज्ञानेश्वरीतील अकरा ओव्या

आपण समाजात राहातो.कामे- कर्तव्ये,व्यवहार करतो. निर्णय घेतो.हें करताना अनेक परिचिताशीं, अपरिचितांशी संबंध येतो.सध्याची समाजव्यवस्था व्यामिश्र (कॉम्प्लेक्स) आहे.आपल्या व्यवहारांचे,निर्णयांचे परिणाम नेमके कोणते होतील याचे पूर्वानुमान करता येत नाही.जे काही बरे वाईट परिणाम होतील ते स्वीकारावे लागतात. त्यांतून कांही जण ताण-तणाव(टेंशन)ग्रस्त होतात.
त्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील पुढील ओव्या मननीय वाटतात.स्वामी स्वरूपानन्दांनी(पावस) नित्य पाठासाठी निवडक ११० ओव्या दिल्या आहेत. त्यांत या ११ आहेत. त्यांचा मथितार्थ असा की प्रत्येकाने आपली कर्तव्यकर्मे यथाशक्ती, यथामती पार पाडावी.परिणामांचा विचार करीत् बसू नये. यथामती म्हटले तरी सर्व सारासार विचारपूर्वक करावें.तसेच आपले व्यवहार नैतिक असावे.सत्कर्मेच करावी.अनैतिकतेची संगत धरू नये.अशा प्रकारे आचरण केल्यास मन सदैव प्रसन्न राहाते.त्यात संसारदु:खे शिरू शकत नाहीत.ताण-तणाव निर्माण होत नाहीत.
****
परिस पां सव्यसाची ...(परिस= परिश्रव,ऐक)
मूर्ती लाहोनि देहाची ....(लाहोनि=लाभोनि)
खंती करिती कर्माची
ते गांवढे गा॥..३/१४५ .....(गांवढे=अज्ञानी)
.
आम्ही समस्तही विचारिले.....(आम्ही या सगळ्यावर विचार केला)
तंव ऐसेंचि हे मना आले
जे न सांडिजे तुवां आपुले
विहित कर्म॥...२/२६५...(विहित कर्म = कर्तव्य,अवश्य करावे असे काम)
.
म्हणौनि जे जे उचित
आणि अवसरे करूनि प्राप्त..(अवसर=वेळ,प्रसंग)
ते कर्म हेतुरहित
आचरे तू॥...३/७८
.
आणि हे कर्म मी कर्ता
कां आचरेन या अर्था
ऐसा अभिमान झणे चित्ता
रिघों देसी॥...३/१८७
.
तया सर्वात्मका ईश्वरा
स्वकर्म कुसुमांची वीरा
पूजा केली होय अपारा
तोषालागी॥....१८/९१७
. [ अर्थ:वीरा अर्जुना,आपण केलेली कर्तव्यकर्मे हीच जणू फुलें.त्या फुलांनी
सर्वात्मक ईश्वराची पूजा केल्यास त्याला परमसंतोष होतो]

परी कर्मफलीं आस न करावी
आणि कुकर्मीं संगती न व्हावी
हे सत्क्रियाचि आचरावी
हेतुविणे॥...२/२६६
.
परी आदरिले कर्म दैवे....(आदरिले=आरंभिले,सुरू केले)
जरी समाप्तीते पावे
तरी विशेषें तेथ तोषावें
हे ही नको॥....२/२६८
.
का निमित्तें कोणे एके
ते सिद्धी न वचतां ठाके......(सिद्धी न वचतां ठाके=तडीस न जातां तसेच राहाते)
तरी तेथीचेनि अपरितोखें....(अपरितोख=असंतोष,दु:ख)
क्षोभावें ना॥.....२/२६९
.
तो कर्मे करी सकळें
परी कर्मबंधा नातळे......(नातळे=स्पर्श होत नाही)
जैसे न सिंपे जळीं जळे...(न सिंपे = भिजत नाही.)
पद्मपत्र॥...५/५०
.
देखे अखंडित प्रसन्नता
आथी जेथ चित्ता .............(आथी=आहे)
तेथ रिगणे नाही समस्तां
संसारदु:खां॥....२/२३८
.
जैसा अमृताचा निर्झरू
प्रसवे जायाचा जठरू
तया क्षुधे-तृषेचा अडदरू .....(अडदरू=भीती,धाक)
कहींचि नाही ॥...२/२३९
*********************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

एक सन्दर्भ

प्रा. वि. पु. आपटे लिखीत पूर्णवादावर आधारित भगवद्गीतेवरील भाष्य तीन खण्डात प्रकाशित झाले आहे - कृष्णायन, गीतोपनिषद आणि विश्वात्मक कर्मयोग. त्यापैकी "विश्वात्मक कर्मयोग' या भागात उपरोक्त विषयावर सविस्तर, आजच्या काळाशी सुसन्गत आणि मननीय विवेचन आहे.

(अवान्तराबद्दल क्षमस्व).

आभार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.मूकवाचक लिहितातः"(अवान्तराबद्दल क्षमस्व)."
..त्यांचा प्रतिसाद अवांतर कसा? तो प्रस्तावाशी संबंधितच आहे.
..त्यांनी प्रा.वि.पु.आपटे यांच्या त्रिखंडात्मक गीता भाष्याविषयी माहिती देऊन मला उपकृत केले आहे.त्यांतील "विश्वात्मक कर्मयोग" हा भाग वाचण्याची उत्सुकता आहे.कधीतरी वाचणार.धन्यवाद!

हे कशासाठी?

काही लिहावे की न लिहावे असा हॅम्लेटसारखा प्रश्न पडला होता कारण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मी खोल पाण्यात उतरायचे धाडस करीत नाही. 'विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनमपण्डितानाम्' हे मला चांगले ठाऊक आहे. तरीहि न राहवून लिहितोच.

प्रत्येकाने आपली कर्तव्यकर्मे यथाशक्ती, यथामती पार पाडावी.परिणामांचा विचार करीत् बसू नये. यथामती म्हटले तरी सर्व सारासार विचारपूर्वक करावें.तसेच आपले व्यवहार नैतिक असावे.सत्कर्मेच करावी.अनैतिकतेची संगत धरू नये.अशा प्रकारे आचरण केल्यास मन सदैव प्रसन्न राहाते.त्यात संसारदु:खे शिरू शकत नाहीत.ताण-तणाव निर्माण होत नाहीत.

ह्या उतार्‍यातले विचार तसे पाहिले तर सर्वांना पटण्याजोगेच आहेत. आपले काम निष्ठेने करावे, नैतिकतेला सोडू नये ह्यात चुकीचे काहीच नाही. तरीपण असा विचार मनात येतो की ह्या स्वतःसिद्ध विचारांना स्वामी स्वरूपानन्दांचा वा ज्ञानेश्वरीचा टेकू द्यायलाच पाहिजे का?
रात्रीच्यावेळी गाडी चालवतांना अन्य एकहि गाडी वा माणूसकाणूस नसलेल्या चौकात तांबडा सिग्नल पाहून तो सिग्नल हिरवा होण्याची वाट पहात नियमांचे सर्वदा प्रामाणिकपणे करणारा एखादा चालक शांतपणे उभा राहिलेला असतो तेव्हा त्याची प्रेरणा इतकीच असते की नियम पाळ्णे हे स्वतःला पटलेले बंधन तो मानत असतो, स्वामींनी सांगितले वा ज्ञानेश्वरीत आहे म्हणून नव्हे.

असा प्रश्न करण्यामागे स्वरूपानन्दांचा अथवा ज्ञानेश्वरीचा अधिक्षेप करण्याचा हेतु नाही पण ज्ञानेश्वरी सांगते म्हणून कर्म करणे ह्यामुळे त्या कर्माबरोबरच त्या शब्दामागचे सर्व baggageहि आपल्याकडून स्वीकारले जाण्याची शक्यता असते. किंबहुना हे baggage मान्य असणार्‍यांनाच उत्तरासाठी ज्ञानेश्वरी वा स्वामींचे मार्गदर्शन मिळवावेसे वाटते.

उद्धृत श्लोकांमध्ये निष्काम कर्म हा संसारदु:खावरील उतारा आहे असे प्रतिपादन केले आहे. संसार दु:खमय आहे हे मान्य करायलाच पाहिजे का? ज्यांना संसार दु:खमय वाटत नाही त्यांना त्यातून सुटण्याचीहि आस लागलेली नसते आणि मोक्षप्राप्ति मिळवून जन्ममरणाच्या फेर्‍यांतून सुटका करून घेणे हे त्यांचे ध्येयहि नसते. आयुष्यात प्रामाणिक कर्तव्य करणे स्वतःसिद्ध नैतिक आचरण पाळणे हे ज्यांना पुरेसे reward वाटते त्यांना स्वामी अथवा ज्ञानेश्वरीच्या मार्गदर्शनाची आणि संसारदु:खावर उतारा शोधण्याची काय आवश्यकता?

आता हे baggage मुळातच नाही असे म्हणता येईल काय? मला तसे वाटत नाही. गीतेतील 'कर्म' हे तुमच्यासाठी वरच्या शक्तीने आधीच ठरवून दिलेले असते. 'निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्' असा तिचा उपदेश आहे आणि 'भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया' असे त्या शक्तीचे वर्णन आहे. हे ज्यांना मान्य आहे त्यांना अर्थातच उद्धृत उतार्‍यात न पटण्याजोगे काहीच दिसणार नाही पण माझ्या अल्पमतीला हे baggage गळ्यात पडण्याचा धोका दिसतो.

स्वयंसिद्ध विचार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अरविन्द कोल्हटकर लिहितातः"तरीपण असा विचार मनात येतो की ह्या स्वतःसिद्ध विचारांना स्वामी स्वरूपानन्दांचा वा ज्ञानेश्वरीचा टेकू द्यायलाच पाहिजे का?"
..प्रत्येकाने आपली कर्तव्यकर्मे निष्ठेने पार पाडावी.सत्कर्मेच करावी.अनैतिकतेची कास धरू नये.या स्वयंसिद्ध तत्त्वांना कुठल्या शब्दप्रामाण्याचा टेकू हवा असे मुळीच नाही.पण आजच्या समाजव्यवस्थेत अनेकजण टेंशनग्रस्त होतात असे ऐकतो,वाचतो त्यात तथ्य असावे.अशावेळी ज्ञानेश्वरीतील या ओव्यांचे सार्थ मनन केल्यास उपयोग होऊ शकेल असे वाटते.या ओव्या पूर्णतः ऐहिक व्यवहारांशी संबंधित आहेत.त्यांत पारलौकिक असा कोणताही विचार नाही.वरची शक्ती,भ्रामयन् सर्व भूतानि,जन्ममरणाचे फेरे, अशा संकल्पनांचा प्रस्तुत चर्चाप्रस्तावाशी काही संबंध नाही.
श्री.कोल्हटकरांनी स्वतःला अपण्डित म्हटले आहे हा त्यांचा विनय होय.त्यांच्या बिंदुगामी(टु द पॉइंट) प्रतिसादावरून तसेच येथील इतर लेखनावरून त्यांची विद्वत्ता आणि बहुश्रुतता दिसून येतात. मात्र त्यांच्या लेखनात विद्वज्जडता नसते.

खंती करिती कर्माची ते गांवढे गा॥..३/१४५ .

अकरा ओव्या वाचल्या. काही शंका.

या सर्व ओव्या ज्ञानेश्वरीतल्या असल्या तरी त्या भगवद्गीतेचा भावार्थ सांगत आहेत हे अध्याय ओव्यांवरून चांगलेच स्पष्ट होते. गीतेतील संलग्न श्लोकांचा अर्थ यात सामावला आहे.

या ओव्या पूर्णतः ऐहिक व्यवहारांशी संबंधित आहेत.त्यांत पारलौकिक असा कोणताही विचार नाही.वरची शक्ती,भ्रामयन् सर्व भूतानि,जन्ममरणाचे फेरे, अशा संकल्पनांचा प्रस्तुत चर्चाप्रस्तावाशी काही संबंध नाही.

मात्र या ओव्यांशी संलग्न ओव्या आणि मूळ गीतेतील श्लोक मात्र बहुतांशाने पारलौकिक बाबींशी संबधित दिसतात.
उदा.

तो कर्मे करी सकळें
परी कर्मबंधा नातळे......(नातळे=स्पर्श होत नाही)
जैसे न सिंपे जळीं जळे...(न सिंपे = भिजत नाही.)
पद्मपत्र॥...५/५०

मूळ ज्ञानेश्वरीत हे ज्या श्लोकाचा भावार्थ सांगत आहे त्या श्लोकासंबंधी असे लिहिले आहे.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥१०॥
आतां अधिष्ठानसंगती। अशेषाही इंद्रियवृत्ती। आपुलालिया अर्थीं। वर्तत आहाती ॥४८॥
दीपाचेनि प्रकाशें। गृहींचे व्यापार जैसे। देहीं कर्मजात तैसे। योगयुक्ता ॥४९॥
तो कर्में करी सकळें। परी कर्मबंधा नाकळे। जैसें न सिंपे जळीं जळें। पद्मपत्र ॥५०॥

यातील ब्रह्मण्याधाय शब्दाचे भाषांतर देवासाठी अर्पण केले आहे असा अर्थ येथे आणि येथे दिला आहे. ज्ञानेश्वरीतील 'अधिष्ठानसंगती' हे देखिल तसेच असावे असे वाटते.

आता हा श्लोक बघु.

परिस पां सव्यसाची ...(परिस= परिश्रव,ऐक)
मूर्ती लाहोनि देहाची ....(लाहोनि=लाभोनि)
खंती करिती कर्माची
ते गांवढे गा॥..३/१४५ .....(गांवढे=अज्ञानी)

ज्ञानेश्वरीत मूळ श्लोकासह असे लिहिले आहे.


अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥१४॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥१५॥
अन्नास्तव भूतें। प्ररोहो पावती समस्तें। मग पर्जन्यु या अन्नातें। सर्वत्र प्रसवे ॥१३४॥
तया पर्जन्या यज्ञीं जन्म। यज्ञातें प्रगटी कर्म। कर्मासि आदि ब्रह्म। वेदरूप ॥१३५॥
मग वेदांतें परात्पर। प्रसवतसे अक्षर। म्हणौनि हे चराचर। ब्रह्मबद्ध ॥१३६॥
परी कर्माचिये मूर्ति। यज्ञीं अधिवासु श्रुति। ऐकें सुभद्रापति। अखंड गा ॥१३७॥

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥१६॥
ऐशी हे आदि परंपरा। संक्षेपें तुज धनुर्धरा। सांगितली या अध्वरा। लागूनियां ॥१३८॥
म्हणौनि समूळ हा उचितु। स्वधर्मरूप क्रतु। नानुष्ठी जो मत्तु। लोकीं इये ॥१३९॥
तो पातकांची राशी। जाण भार भूमीसी। जो कुकर्में इंद्रियांसी। उपेगा गेला ॥१४०॥
तें जन्म कर्म सकळ। अर्जुना अति निष्फळ। जैसें कां अभ्रपटल। अकाळींचें ॥१४१॥
कां गळां स्तन अजेचे। तैसें जियालें देखैं तयाचें। जया अनुष्ठान स्वधर्माचें। घडेचिना ॥१४२॥
म्हणौनि ऐकें पांडवा। हा स्वधर्मु कवणें न संडावा। सर्वभावें भजावा। हाचि एकु ॥१४३॥
हां गा शरीर जरी जाहलें। तरी कर्तव्य वोघें आलें। मग उचित कां आपुलें। ओसंडावें ? ॥१४४॥
परिस पां सव्यसाची। मूर्ति लाहोनि देहाची। खंती करिती कर्माची। ते गांवढे गा ॥१४५॥

यातील सर्वभावे भजावा हाचि एकु. (१४३).
याच श्लोकाचे काही भाषांतर येथे वाचले.
तेही असेच दिसते.

ओव्या निवडून काढलेल्या दिसतात. वाच्यार्थाने त्यांचा पारलौकिकाशी संबंध नसला तरी संदर्भासहित आहे.

केवळ वाच्यार्थ मानला तरी "खंती करिती कर्माची" वचनाचा अर्थ समजत नाही. कर्माची खंत करू नये. याचा फळाची अपेक्षा/आशा धरु नये याच्याशी मेळ बसत नाही. तसेच तुम्ही म्हणता तसे यथामती म्हटले तरी सर्व सारासार विचारपूर्वक करावें.तसेच आपले व्यवहार नैतिक असावे.सत्कर्मेच करावी.अनैतिकतेची संगत धरू नये.अशा प्रकारे आचरण केल्यास मन सदैव प्रसन्न राहाते.त्यात संसारदु:खे शिरू शकत नाहीत.ताण-तणाव निर्माण होत नाहीत.
असा अर्थही त्यातून निघत नाही. जर नैतिकतेने वागले तर कर्माची खंत का केली जाईल?

ताण तणावावर 'मामेकं शरणं भज' या उपायांसारखाच वरील अकरा ओव्यांचा उपाय दिसतो.

प्रमोद

खंती = कंटाळा

परिस पां सव्यसाची ...(परिस= परिश्रव,ऐक)
मूर्ती लाहोनि देहाची ....(लाहोनि=लाभोनि)
खंती करिती कर्माची
ते गांवढे गा॥..३/१४५ .....(गांवढे=अज्ञानी)


या ओवीचा दांडेकर प्रतीत दिलेला अर्थ असा: अर्जुना ऐक, मनुष्य देह मिळाला असता, जे कर्माचा कंटाळा करतात, ते अडाणी असतात.
इतर एक दोन ठिकाणी खंती शब्दाचे आळस, तिरस्कार असेही अर्थ दिले आहेत, तेही इथे चालू शकतील.

ज्ञानेश्वरीत अनेक परिचित शब्द वेगळ्या अर्थाने वापरलेले असतात. काही उदाहरणे देतो.
१. स्वर्गाचे वर्णन करताना "रंभेऐशी नाचणी" असे लिहिले आहे. इथे नाचणी = नर्तकी.
२. सदैव = सुदैवी
३. देखणा = डोळस

खंती

धन्यवाद, 'खंती' चा हा अर्थ मला वाटला त्यापेक्षा वेगळा आहे.

प्रमोद

निवडक ओव्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत यात शंका नाही.पण थोडा समजुतीचा घोटाळा दिसतो.म्हणजे मला सांगायचे आहे ते आणि त्यांना प्रतीत झाले तें यांत भेद आहे.कधी आपल्या निर्णयांचे विपरीत परिणाम होतात.कधी काम तडीस जात नाही.अपयश येते.त्यावेळी माणूस तणावग्रस्त होऊ शकतो.अशा वेळी या अकरा ओव्यांचे मनन केले,त्यांतील विचार समजून घेतला तर मनाला थोडे समाधान लाभू शकेल.पूर्ण विवेकी व्यक्तीला अशा ओव्यांच्या आधाराची आवश्यकता नसावी असे श्री.अरविंद कोल्हटकर म्हणतात ते ठीक आहे.पण काही जणांच्या विचारांना पुष्टी,समर्थन मिळू शकते.
तसेच या अकरा ओव्या निवडक आहेतच.त्यांचाच अर्थ पाहावा. गीतेतील मूळ श्लोकाकडे जाण्याची आवश्यकता नाही.ज्ञानेश्वरांनी गीतेतील श्लोक केवळ आधारभूत म्हणून घेतले आहेत.त्यांनी आपले स्वतंत्र विचार अनेक ओव्यांतून मांडले आहेत.त्यांचा गीताश्लोकाशी संबंध असेलच असे नाही.
..
श्री.प्रमोद यांनी म्हटले आहे,:"तसेच आपले व्यवहार नैतिक असावे.सत्कर्मेच करावी.अनैतिकतेची संगत धरू नये.अशा प्रकारे आचरण केल्यास मन सदैव प्रसन्न राहाते.त्यात संसारदु:खे शिरू शकत नाहीत.ताण-तणाव निर्माण होत नाहीत.
असा अर्थही त्यातून निघत नाही. जर नैतिकतेने वागले तर कर्माची खंत का केली जाईल?"

..
ओवी क्र.६ :...कुकर्मी संगती न व्हावी..सत्क्रियाचि आचरावी... यांतून अर्थ स्पष्ट होतो.तसेच ओ. क्र.९,१०,११ यांत प्रसन्न मनात संसारदु:खे प्रवेश करीत नाहीत असे म्हटले आहे.

ओवी क्र. ६

ओवी क्रमांक ६ मुळे कुकर्मे करू नयेत आणि सत्कर्मे करावीत असा अर्थ ध्वनित होतो. पण त्याचा खंती ओवीशी संदर्भ लागत नव्हता. विनायक यांनी खंतीचा अर्थ कंटाळा असा दिला आहे त्यामुळे थोडेफार संदर्भ लागतो. (पुरेसा नाही.)

तुम्ही दिलेल्या ओव्यांचा अर्थ मला असा लागला.

कर्मे करताना कंटाळा करू नये (ओवी १), प्राप्त कर्म हेतुरहित रीतिने कर (२,३), कर्मे मी केली असे समजू नकोस (४), सर्वात्मका ईश्वराची पूजा कर्माने होते (५), कर्मफलाची आस धरू नये, चांगली कर्मे करावी, कुकर्मे करू नयेत (६), काही कारणाने कर्म केले वा राहून गेले तर बरे/वाईट वाटून घेऊ नकोस(७,८), कमलपत्रा प्रमाणे अलिप्त राहा(९), जिथे प्रसन्नता आहे तिथे संसारदु:ख नाही(१०), (११ वी ओवी एकटी अगम्य).

या अकरा ओव्यातून 'परिक्षेत अपयश आले', 'नोकरीतून काढून टाकले', 'धंद्यात खोट आली', अशा घटनातून येणार्‍या ताणतणावांत कसा आधार मिळतो? ताण तणाव बाळगु नकोस एवढेच या अकरा ओव्यातून ध्वनित होते.

आपले कित्येक निर्णय आणि कृती 'प्राप्त वा कर्तव्य कर्मात' मोडत नाहीत. उदा. सिनेमाला गेलो (सिनेमा भुक्कड निघाला पैसा वाया गेला). ही नोकरी सोडून दुसरी पकडली (पण दुसरी झेपली नाही.) उच्चशिक्षणासाठी गेलो (आणि ते झेपलेच नाही.) अशा कर्मांना वरील ओव्यांमधे कसे बसवणार?

ताण तणाव कमी करण्यासाठी मन दुसर्‍या कशात गुंतवावे असा एक उपाय आहे. वरील ओव्या वाचण्याचा उपाय याच पद्धतीचा असल्यास ताण कमी होईल. पण यापेक्षा अजून काही मला त्यात आढळत नाही.

तुमचे म्हणणे असेही दिसते की या अकरा ओव्या स्वतंत्रपणे पहाव्यात गीतेतील श्लोकांचा वा मागच्या पुढच्या ओव्यांचा संदर्भ पाहू नये. असे असल्यास कोल्हटकर म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचा वा स्वरुपानंदांचा टेकू कशासाठी? जे म्हणणे आहे ते तुमचे म्हणून सांगा ना. अन्यथा ताण तणाव कमी करण्यासाठी अगम्य दैवी पुस्तक वाचणे हा एकच टेकू यात दिसतो.

प्रमोद

...रिघणे नाही समस्तां संसारदु:खां|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रमोद सहस्रबुद्धे म्हणतात,:"ताण तणाव कमी करण्यासाठी मन दुसर्‍या कशात गुंतवावे असा एक उपाय आहे. वरील ओव्या वाचण्याचा उपाय याच पद्धतीचा असल्यास ताण कमी होईल. पण यापेक्षा अजून काही मला त्यात आढळत नाही. "
..
कोण्या कामात अपयश आले,दु:ख झाले की मग मन रमविण्यासाठी या ओव्यांचा जप करायचा असे नव्हे."सुखीं संतोषा न यावे| दु:खीं विषादा न भजावे|आणि लाभालाभ न धरावे मनामाजी|" ही विचारसरणी मनावर बिंबण्यासाठी या ओव्यांचे मनन करावे.एकदा हा विचार दृढ झाला की अंगीकृत काम,कर्तव्य कर्म "ते आचरिजे गौरवें शृंगारोनी|" करता येते. उत्साहाने, आनंदाने घडते.मग विषाद वाटण्याचा प्रसंग येत नाही.
..*या अकरांतील प्रत्येक ओवी ,गीतेतील कुठल्यातरी श्लोकावर भाष्य करताना लिहिली आहे हे खरे.समजा तो श्लोक पुनर्जन्म, मोक्ष,स्वर्ग अशा भ्रामक कल्पनांसंबंधी असला तरी त्यामुळे त्या ओवीच्या अर्थाला बाधा येत नाही.ती त्याज्य ठरत नाही.जो वाच्यार्थ आहे तो महत्त्वाचा.या ओव्यांत सलगता नाही हे खरे.पण सर्वांचा मिळून एक सुसंगत अर्थ लागतो हे तुम्हीच योग्य प्रकारे दाखवून दिले आहे.तसेच या ओव्यांत अगम्य असे काही नाही.

संबंध

यनावालांनी दिलेल्या ओव्यांचा गीतेशी संबंध आहे हे श्री. प्रमोद यांनी सप्रमाण दाखवले आहेच. सुमारे दहा हजार ओव्यांपैकी फक्त याच अकरा ओव्या यनावालांना का घ्याव्याश्या वाटल्या? याहीपेक्षा मुळात ज्ञानेश्वरीबद्दल त्यांना लिहावेसे का वाटले हे मला पडलेले प्रश्न आहेत. मला सुचलेली उत्तरे अशी.

आधी यनावालांनी "गाढव आणि गाजरचित्रे" असा लेख लिहिला. त्यात धार्मिकांनी श्रद्धाळूंसमोर मृत्यूनंतर स्वर्गाचे रम्य, पण भ्रामक चित्र रंगवले आहे आणि सामान्य श्रद्धाळू याला भुलून व्रतेवैकल्ये, यज्ञयागात गुंतून पडला असे लिहिले. त्यासाठी त्यांनी जे स्वर्गाचे वर्णन केले आहे त्यातला कामधेनूंची खिल्लारे, कल्पतरूंच्या बागा वगैरे भाग थेट ज्ञानेश्वरीतून घेतला. मात्र पुढच्याच काही ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी स्वर्गाच्या अपेक्षेने यज्ञयाग करणार्‍या याज्ञिकांची अत्यंत कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली आहे, (त्यांची तुलना वेश्येच्या पैसे संपलेल्या गिर्‍हाईकाशी केली आहे वगैरे ) त्या ओव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कारण हे लिहिले तर आपली पुरोगामी विचारवंत म्हणून काय किंमत राहिली? मी त्या ओव्या लिहिल्यावर "त्या ओव्या माझ्या म्हणण्याला पुष्टी देतात" असला मासलेवाईक प्रतिसाद दिला.

हे सर्व कमी पडले म्हणून की काय "चालवली भिंती मृत्तिकेची" हा लेख लिहून सावरकर आणि द. के. केळकर यांचा ज्ञानेश्वरविरोधी तर्कदुष्ट युक्तिवाद उपक्रमींच्या माथी मारायचा प्रयत्न केला. तो लोकांनी हाणून पाडला.

व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित केला आहे.

 
^ वर