दिवाळी अंक- वाचलेले, चाळलेले, न वाचलेले

सालाबादाप्रमाणे दिवाळी आली व गेली. पहाट झाली भैरु उठला वगैरे. आता शिल्लक चिवड्या-चकल्यांची जशी नंतर एक सणसणीत तिखट मिसळ जमून जाते त्याप्रमाणे छापील दिवाळी अंकाची एक पारंपारिक खमंग चर्चा व्हायला हवी. काय वाचले, काय आवडले, काय आवडले नाही वगैरे. यंदा शंकरपाळ्या जरा जास्तच खुसखुशीत झाल्या होत्या, चकल्या आणि साईचे दही यंदा जमून गेले होते, अनारसे जरासे अगोड झाले होते का? असो, अगोडच बरे... या धर्तीवर.
इब्तेदा 'मौज' या मला आवडलेल्या दिवाळी अंकापासून करतो. मोहन सामंतांचे मुखपृष्ठ मला कळाले नाही, त्यामुळे आवडले नाही. प्रभाकर कोलतेंनी या अंकात सामंतांवर एक लेखही लिहिला आहे. त्या लेखातील सामंतांची चित्रे समजणार्‍याला काय, उद्या अमोल पालेकरांचा एखादा मराठी चित्रपटही समजेल! चित्रकलेवरचा चंद्रमोहन कुलकर्णींचा लेखही फडफड आवाज करत माझ्या डोक्यावरुन उडून गेला. दोनचार पिसेही खाली पडली नाहीत. काही लोकांच्या नशिबात काही गोष्टी नसतात, दुसरे काय!विल्यम होजेसची त्याने भारतात काढलेली चित्रे मला कळाली आणि म्हणूनच आवडली. त्याने समुद्र समुद्रासारखा, पूल पुलासारखा काढला आहे म्हणून असेल कदाचित. चित्र हे असे असावे. कुठे एक डोळा, एखादे वटवाघूळ, एखादा स्तन असले काहीतरी काढायचे आणि त्याला काहीतरी 'सॅन्डस ऑफ टाईम' असे काहीसे नाव द्यायचे- ही कला असेल तर तिला फार दुरुन नम्र प्रणाम! तेच बहुतेक कवितांविषयीही म्हणता येईल. पाडगावकरांच्या एका कवितेत मनसेवर तिरकस वार आहे (असे मला वाटले) , एकावर पुरुषाचे आणि स्त्रीचे प्रेम यावर टिप्पणी आहे (या कवितेचे नाव 'सिगारेटः एक ज्योक!) आणि एक कविता मृत्यूबाबत आहे. झाडावरुन खाली पडणारे पिवळेधमक पान म्हणजे जणू उडणारे पिवळेधमक फुलपाखरुच अशी वपुर्डी, दवणट कल्पना. 'दिडकीची भांग घेतली की शंभर कविता सुचतात' हे आठवायला लावणार्‍या या कविता. ग्रेस यांची 'गंजलेल्या खिळ्यांची कहाणी' ही कविता तर इंग्रजीत आहे. आधीच ग्रेस, त्यात इंग्रजी! आधीच सलमान, त्यात उघडा! आधीच राजश्री, त्यात तिला शारदेचा आवाज! आधीच नेहरा, त्यात जखमी! असो, कविता या विषयावर तज्ज्ञांनी लिहावे, आणि ते कविता कळणार्‍यांनी वाचावे. म्हणूनच या अंकातल्या वसंत आबाजी डहाके यांच्या 'कवितेची समीक्षा- काही मुद्दे' या लेखाची पाने उलटून मी तूर्त पुढे गेलो आहे.
सानिया यांचे 'अम्मा' हे व्यक्तिचित्र 'प्रेडिक्टेबल' पण चांगले आहे. आपल्या शर्तींवर जगलेल्या माणसांना निर्दय काळ परावलंबी, लोळागोळा आणि न संपणारे म्हातारपण देतो - आणि लवकर मृत्यूही देत नाही- हे आधी कुठेतरी वाचल्यासारखे वाटणारे, पण परत वाचावेसे वाटणारे असे काही सानिया यांनी लिहिले आहे.वा.ल. कुलकर्णींवर नरेंद्र चपळगाकरांनी लिहिलेल्या लेखाचा शेवट असाच असला तरी त्यात प्रामुख्याने वा.लंच्या अभ्यासू, व्यासंगी वृत्तीचे चांगले चित्रण आहे. शिक्षकाने,प्राध्यापकाने सतत वाचन, मनन करत राहावे अशा जुन्या, कालबाह्य विचारसरणीचे लोक हे. चपळगावकरही वा.लंच्या पुढच्या पिढीतले- वा.लंचे विद्यार्थी असूनही फारसे सुधारलेले दिसत नाहीत. असो, सुमारांचे संख्याबळ अशा जुनाट लोकांना आज ना उद्या कोपर्‍यात रेटत रेटत नेऊन भिंतीत चिणून टाकेल आणि वा.लंसारख्यांची एक पिढी उद्या कुणाच्या स्मरणातही असणार नाही. पण हा वा.लंवरचा लेख मला तूर्त आवडला आहे.
विनया जंगले यांचा 'मुक्या वेदना बोलक्या संवेदना' हा लेख मला फार आवडला. जंगले यांचे आधीचे लिखाणही असेच आवडले होते. विनया जंगले या पेशाने पशूवैद्यकीय अधिकारी आहेत. हा तसा पुरुषप्रधान पेशा. पण या पेशात, तेही सरकारी नोकरीत राहून जंगले यांनी आपल्या अनुभवांबद्दल अत्यंत संवेदनशीलतेने लिहिले आहे. मंदिरात हैदोस घालणारी माकडांची जोडी, त्याच मंदिरात राहणारी आणि त्या माकडांवर माया करणारी सखुबाई नावाची वेडसर बाई, तिने त्या माकडांची ठेवलेली 'एवन चिक्की' आणि 'रेवण चिक्की' ही नावे, त्या माकडांना बेशुद्ध करुन पकडणे आणि एकीकडे गावकर्‍यांचा जल्लोष सुरु असताना सखुबाईचे देवळातल्या खांबाला टेकून एकट्यानेच रडणे...'माणसांच्या कळपात सखुबाईला नवीन सोबती मिळतील का?' हा लेखिकेला पडलेला प्रश्न आपल्यालाही अस्वस्थ करुन जातो. दळवींच्या 'तात्या' ची आठवण येते. जंगलेंचे इतर अनुभवही वाचनीय आहेत. जंगलेंच्या या सगळ्या अनुभवांचे आता एक झकास पुस्तक निघायला हवे असे वाटणारे हे लेखन आहे. 'ओसामाची अखेर- एक वैज्ञानिक वधकथा' हा बाळ फोंडकेंचा लेख अफलातून आहे. ओसामा पाकिस्तानात किंवा अफगाणिस्तानात कुठेतरी लपून बसला आहे आणि तोराबोरा भागात केलेल्या बॉम्बवर्षावात तो ठार झालेला नाही अशी शंका, जवळजवळ खात्रीच झाल्यानंतर अबोटाबादमधल्या त्याच्या घरात घुसून त्याला मारण्यापर्यंतच्या अमेरिकेच्या प्रवासाची कहाणी थक्क करुन टाकणारी आहे. या सगळ्यात कॅलिफोर्निया विद्यापीठातील भूगोल आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थी यांनी केलेल्या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे हे कळाल्यावर विज्ञानाबद्दलचा आदर द्विगुणित होतो. त्यातील 'डिस्टन्स डीके थेअरी' (अंकात हे 'डिस्टन्ट डिके' असे छापले आहे.) आणि 'आयलंड बायोजिओग्राफी थेअरी' या तांत्रिक क्लिष्ट कल्पना फोंडके यांनी अगदी सहज समजतील अशा शब्दांत मांडल्या आहेत. हा लेख मुळातूनच वाचायला हवा. फोंडके या कल्पना समजावून सांगताना कुठेही रुक्ष होत नाहीत. अधूनमधून ते 'दी डॉग डिड नॉट बार्क' अशी होम्सकथांची उदाहरणेही देतात, हे थोर आहे. हेमंत देसाईंचा 'डाव्यांचे र्‍हासपर्व' हा लेख मी वरवर चाळून एखाद्या थंड संध्याकाळी वाचण्यासाठी ठेवून दिला आहे. जागतिकीकरणाच्या अटळ रेट्यात डावे विचार जगणार की मरणार हा मुद्दा नसून कधी मरणार हाच मुद्दा आहे. नॉट अ क्वेश्चन ऑफ इफ, बट ऑफ व्हेन! भांडवलशाही संकटात आहे, पण साम्यवाद तर केंव्हापासूनच हलाखीत आहे! हे या लेखाचे शेवटचे वाक्य उत्सुकता चाळवून गेले आहे. श्रीराम शिधयेंचा 'हे सृष्टीचे कौतुक जप बाळा' हा लेखही मला आवडला. थोडासा बाळबोध, मीना प्रभु शैलीचा (ही द्विरुक्तीच झाली म्हणायची!) हा लेख फिनलंडमधील पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानाची ओळख करुन देतो. ५३ लाख लोकसंख्येच्या फिनलंडमध्ये गोड्या पाण्याची लाखभर तळी आहेत. म्हणजे खरे तर फिनलंडला पाण्याचे दुर्भिक्ष नाहीच. तरीही या देशातली 'पाणीसाक्षरता' कौतुकास्पद आहे. अर्थात त्यामागचा त्या लोकांचा व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्याआड करता येणार नाही. भारतीयांचे - आणि म्हणजे केवळ भारतात राहणार्‍यांचे नव्हे- पर्यावरण, प्रदूषण याबाबततचे घोर अज्ञान ध्यानात घेता हा लेख मला मुद्दाम दुसर्‍यांदा वाचावासा वाटला.
'मावळतीचं ऊन' हा तात्यासाहेब शिरवाडकरांवरचा रामदास भटकळांचा लेख सुरेख आहे. भतकळांचे 'जिगसॉ' (शिंचे हे पुस्तक बाजारात उपलब्ध कधी होणार कुणास ठाऊक!) आवडल्याचे लिहिताना तात्यासाहेब 'एक जी.एंवरचा लेख वगळला तर सर्व लेखांनी एक दर्जा सांभाळला आहे' असे लिहितात- त्याची फार गंमत वाटली. या अंकात 'बदलता समाज- संगीतकला आणि कलाकार' नावाची एक लेखमाला आहे ही जरा मांडी ठोकून वाचायला लागणार असे दिसते. आपल्या रंगप्रयोगांबद्दल रत्नाकर मतकरींनी लिहिलेला एक दीर्घ लेखही असाच वाचावा लागणार. बाकी कथा वगैरे (आणि अवचटांची अपरिहार्य स्फुटे!) सध्या वाचल्या नाहीत तरी चालतील, असे दिसते.
'मौज' दिवाळी अंकात मुख्यतः पुस्तकांच्या जाहिराती आहेत. हे मला फार आवडले. 'चिन्ह' च्या नग्नता विशेषांकाची जाहीरात काहीजणांना किंचित 'बोल्ड'ही वाटेल, पण आता वाचकांनीही थोडे मोठे होण्याची गरज आहे, असे मला वाटते. जेथे एका क्लिकसरशी शेकडो पोर्नोग्राफिक साईटस उघडता येतात त्या काळात नग्नतेकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक निकोप, सकारात्मक व्हायला हवा. त्या दृष्टीने 'मौज' मधली ही जाहिरात हे एक सु'चिन्ह'च आहे, असे मला वाटते.
एकूण शंभर रुपयांचा २७२ पानांचा 'मौज' चा हा अंक मला आवडला.

लेखनविषय: दुवे:

Comments

उचलायला हवा

मी अजून फक्त जत्रा, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता, आवाज, गृहशोभिका वगैरे (जाहिरातींच्या दृष्टीने नक्कीच) प्रतिथयश परंतू नावालाच उरलेले अंक वाचले/चाळले.. यातील एकही नाही आवडला (काही लेखन छान आहे मात्र ते अपवाद अंक टुकार आहेत हा नियम सिद्ध करण्यापुरतेच आहेत :( )!

ठक् ठक् चा दिवाळी अंक चाळला बरा वाटला.. बर्‍याच वर्षात वाचलेला नाही त्यामुळे असेल!
हंस कालच मिळाला आहे. बघु कसा निघतो.

बाकी मौज, चिन्ह वगैरे अजुन तरी लायब्ररीत गवसलेले नाहीत.. मौज मिळताच उचलायला हवा

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

एक प्रश्न!

>>मौज, चिन्ह वगैरे अजुन तरी लायब्ररीत गवसलेले नाहीत.. मौज मिळताच उचलायला हवा.

छापील दिवाळी अंक विकत का घेतले जात नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे. दिवाळीनंतर मोठ्या संख्येने लायब्ररीकडे वळणारा वर्ग आहे, अनेक अगदी उच्च मध्यमवर्गीय वाचनाची आवड असणारे लोक अंक एकमेकांमध्ये वाटून घेऊन वाचतात. पुस्तकांबाबतीत काही प्रमाणात मी हे समजू शकते, पण मौज सारखे अंक विकत घेऊन संग्रही ठेवण्यासारखे अगदी नसले तरी वाचून टाकून दिले (जसे कपड्यांचे आपण वापरून टाकतो, देऊन टाकतो ) तसे का केले जात नाही?

हा प्रश्न ऋषिकेश यांच्यावर रोख धरून नाही. कृपया गैरसमज नको. खरेच जाणवलेला प्रश्न आहे.

बाकी मौज वाचायला मिळण्याची वाट पाहते आहे.

माझ्यापुरते कारण

बाकीच्यांचे सांगता येणार नाही मात्र माझ्यापुरते कारण सांगतो:
मी पुस्तकेदेखील लायब्ररीतून आणतो -- वाचतो आणि आवडल्यास्- इतके की पुन्हापुन्हा वाचावेसे वाटेल किंवा संदर्भ म्हणून वाचावे लागेल असे वाटल्यास विकत घेतो

हाच न्याय मी दिवाळी अंकांना लावतो. वर दिलेल्या बहुतांश अंकात 'लेखन कमी नी जाहिराती फार' अशी अवस्था आहे. शिवाय इतके अंक आहेत की सारे अंक जर १०० रु. वाचायला मिळत असतील तर ते का टाळावे?

याशिवाय, माझेच नव्हे तर कुटुंबातील सगळ्यांचे मिळून एक् पुस्तकांसाठी ठरलेले मासिक बजेट आहे. कोणालाही नवे पुस्तक घ्यायचे असल्यास इतरांना त्याची माहिती करून गद्यावी लागते असा पायंडा आहे. त्यात (जाहिरातींनी बरबटलेल्या) दिवाळी अंकात अधिक पैसे घालवण्यापेक्षा मी त्या किंमतीची आवडती पुस्तके घेईन

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शारदा

आधीच राजश्री, त्यात तिला शारदेचा आवाज!

हे वाक्य आठवून आठवून दिवसभर हसू येत आहे. पण अराउंड् द वर्ल्ड इन् एट डॉलर्स गाणं देखील डोक्यातून जात नाही!

अक्षर दिवाळी अंकात नंदा खरे यांची मुलाखत आहे असे मी ऐकले. ती वाचायची खूप इच्छा आहे.

फटकेबाजी

आवंदा मौज दिवाळी अंक वाचायला मिळो-न मिळो, कोणत्याही दिवाळी अंकातील लेखमालेत शोभेल असा एक रसग्रहणात्मक लेख वाचून मझा आला.
जबरा फटकेबाजी.

मटा, अक्षर, साधना

यंदाचा "संक्षिप्त निवडक मटा"( महाराष्ट्र टाईम्स च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त) एक नंबरय !!! ह्या लोकांनी ’निवडक मटा’ करायला पाहिजे. संपूर्ण अंक अजुन वाचून झालेला नाहीये, पण जेव्हढे वाचले त्यापैकी नाना पाटेकरांचा भक्ती बर्वे-इमानदारांबद्दलचा, ह्र्दयनाथांचा आशाजींसंबंधीचा, कुरुंदकरांचा "शिवचरित्र लेखन - काही पेच", आणि सुनीता देशपांडेंचा कुमार गंधर्वांवरचा मृत्युलेख - हे लेख विशेष आवडले.

अक्षर मधला प्रकाश अकोलकरांचा "एक पेपर - तीन संपादक" हा मटाच्या तीन संपादकांविषयीचा(तळवलकर, केतकर, राऊत) लेख उत्तम. मटाची पडझड कशी सुरु झाली याचा छान आढावा घेतलेला आहे. याच अंकात हेमंत कर्णिकांनी नंदा खरेंची मुलाखत घेतली आहे. नक्कीच वाचायला हवी अशी.

साधनाचा अंक यंदा "बदलांचा वेग आणि समस्यांचा वेध" या थीम वर आहे. अंक ऑनलाईन उपलब्ध आहे. इथून डाऊनलोड करता येईल.

मटा

मटाचा संपूर्ण अंक हा त्यांच्याच रविवार पुरवण्यांत पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

लहानशी दुरुस्ती

रविवार पुरवण्यांत नव्हे. जुन्या दिवाळीअंकांमध्ये.

इत्यादी व मिळून सार्‍याजणी

इत्यादी हा मनोविकास प्रकाशनाचा दिवाळी अंक यंदा वाचनीय वाटला. विशेषतः त्यातल्या कथा. जयंत पवार, प्रतिमा जोशी, मल्लिका अमरशेख यांच्या कथा त्यात आहेत. प्रकल्प हवेत की नकोत या विषयावरचा परिसंवाद मात्र शाळकरी. लक्ष्मीनारायण त्रिपाठी या हिजड्याच्या आत्मचरित्रातला काही भाग आहे, तो रोचक आहे. पण शीर्षकात गडबड आहे. "आणि मी हिजडा झाले..." असं म्हटलंय आणि आतल्या मजकुरात 'झालो' हा शब्द येतो. ही विसंगती संपादकांना कळली नाही की कळून दुर्लक्ष केले, ते तेच जाणोत. पण आजकाल इतके भरताड दिवाळी अंक निघताहेत की संपादन ही गोष्ट कुणीही करतं. ( हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण वृत्तपत्राचं संपादन, मासिकाचं संपादन आणि पुस्तकाचं संपादन निराळं असतं, हे नक्की. ) मी आणि माझा कलाविचार हा परिसंवाद मात्र वाचनीय आहे. ( सन्जोप, नक्की वाच.)
दुसरा अंक वाचला तो मिळून सार्‍याजणी या मासिकाचा. त्यात वेश्या या विषयावर स्वतंत्र मोठा विभाग आहे. सार्‍याजणी सारख्या पारंपरिक मासिकाने हा विषय निवडावा हे एक चांगले आश्चर्य आहे. त्यातला मंगला सामंत यांचा लेख अभ्यासपूर्ण असला तरी काही विधानं कुठल्या पायावर केलीत हे समजत नाही. ( उदा. नांगराचे संशोधन झाल्यामुळे स्त्रियांचे समाजातले स्थान बदलून दुय्यम झाले व त्या घरात बसू लागल्या. पूर्वी त्या भटक्या होत्या.) यातली प्रद्न्या दया पवार यांची कथा अविचारी आणि त्या कथा लिहितात हे दयनीय वाटावे अशी आहे.

कोसंबी

अंकांचा गोषवारा आवडला. "झालो-झाले" हे दोन्ही वापरून तृतीय लिंगास्मितेची भाषेत कशी अडचण होते हे दाखवायचे होते का कदाचित?

त्यातला मंगला सामंत यांचा लेख अभ्यासपूर्ण असला तरी काही विधानं कुठल्या पायावर केलीत हे समजत नाही. ( उदा. नांगराचे संशोधन झाल्यामुळे स्त्रियांचे समाजातले स्थान बदलून दुय्यम झाले व त्या घरात बसू लागल्या. पूर्वी त्या भटक्या होत्या.)

सामंत यांचा लेख मी वाचला नाही, पण कृषीसमाजाच्या उगमाबद्दल हा तर्क कोसंबी यांचा आहे. नांगरासारखी जड वस्तू शेती साठी वापरात आल्यावर मानव समाजात अनेक बदल झाले: उत्पन्न वाढले, त्यामुळे फिरत्या जमाती हळूहळू स्थानिक झाल्या; वढत्या उत्पन्नामुळे धान्य साठून ठेवणे शक्य होऊ लागले; या सर्प्लसवर आणि त्याच्या वाटपावर कमीअधिक प्रमाणावर हक्क बजावणे जसे सुरू झाले तसतशी समूहातली उतरंड वाढत गेली. बायकांचे काम आधीच्या फिरत्या समाजात हलक्या शेतीत किंवा खाद्यपदार्थ गोळा करण्यात हातभार लावण्यापासून वसलेल्या घरावर, मुलांवर अधिक केंद्रित झाले. अर्थात, हा फार दीर्घकालीन बदल होता, आणि तर्काचा हा गोषवारा अगदीच संक्षिप्त आहे. विस्तृत चर्चा या पुस्तकात सापडेल.

लोकसत्ता - वाचनीय

लोकसत्ता दिवाळी अंक वाचला. त्यातले काहि लेख खरोखर वाचनीय वाटले.
त्यातही गिरिख कुबेरांचा लेख (थोडा एकांगी ) असला तरी त्यातील सुरवातीची अण्णा, नेमाडे आदींवरची टोलेबाजी तुफान आहे :)
मुंबईच्या विद्युतीकरणाचा आढावा घेत घेत १९व्या-२०व्या शतकातील मुंबईचा प्रवास चितारणारा लेखही उत्तम आहे. याशिवाय सैदीमधील खेड्यातील हॉस्पिटल्स मधील परिस्थिती एका व्यक्तीचित्राच्या माध्यमातून साकारणारा लेखही आवडला.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अक्षर

अक्षर चा अंक सध्या वाचत आहे - रोचक, दीर्ध लेख आहेत - वर साळुंक्यांनी म्हटल्यप्रमाणे "मटा" वरचा प्रकाश अकोलकरांचा लेख उत्तम आहे. व्यक्तिरेखा-केंद्रित रचनेतून सामाजिक-सांस्कृतिक आढावा कसा घ्यावा, आणि जवळून ओळखत असलेल्या वक्तींबद्दल तटस्थ, प्रांजळपणे कसे लिहावे याचा हा लेख उत्तम उदाहरण आहे. मला टाइम्स ऑफ इंडियाच्या "प्रॉडक्टीकरणा"ची गोष्ट जवळून माहित होती, त्यामुळे यातील माहिती तशी नवीन नसली तरी मांडणी आणि शैली मस्त वाटली. बर्‍याच दिवसांनी न्यू यॉर्कर मधल्या रसाळ, दीर्ध लेखांची आठवण झाली. सुहास पळशीकरांचा बंगाल मधल्या अलिकडच्या राजकीय 'परिवर्तना' चा परामर्श ठीक-ठीकच वाटला. नंदा खरे यांची मुलाखत वाचून आता त्यांच्या बाकीच्या पुस्तकांबद्दल प्रचंड कुतूहल वाटत आहे.
"साहित्यिक संस्थानं" हा सुनील कर्णिकांचा लेख माहितीपूर्ण आणि अत्यंत विचारप्रवर्तक आहे - "मराठी प्रकाशन जगत इतके आजारी का आहे?" हे ही त्याचे शीर्षक असू शकले असते. लेखक, मासिक, प्रकाशन गृह, ग्रंथालय, वर्तमानपत्र, पुस्तकविक्रेते आणि साहित्य-संमेलन अशा या जगातले सर्व घटक कुठे कमी पडतात हे कर्णिक सांगत जातात - सुरुवात चांगली करूनही शेवटी क्षुद्रपणात सुख मानतात असा टीकेचा एकूण सूर आहे. प्रकाशन विश्वाची माहिती, आणि मूळ मुद्दा चांगाला आहे; टीकाही मिळमिळीत नाही. फक्त नेमाडेंच्या मिशांना वगैरे मधे आणून उगीच लेखाचा सूर बिघडवून टाकला आहे.

@सन्जोप राव - मौज चा अंकही मागवला, आणि मुखपृष्ठावरचे चित्र पाहून हसू आले. देसाईंचा डाव्यांवरचा लेख वाचनीय दिसतो. पळशीकरांच्या लेखाशी तुलना रोचक होईल.

पहिल्यांदाच "बुकगंगा" या सेवेकडून अंक इंटरनेट द्वारा मागवले, ४-५ दिवसांत कलकत्त्यात अंक पोहोचले.

 
^ वर