अङ्कानां वामतो गति:
दिवाळी अंकातील ’आर्यभटाची अक्षरचिह्ने’ ह्या माहितीपूर्ण लेखात असे एक विधान वाचले: ’आर्यभट संख्या लिहिताना अक्षरे नेहमीपेक्षा उलट्या क्र्माने लिहिताना दिसतो. (असे करण्याची गरज नाही.) म्हणजे सर्वात शेवटी मोठे स्थान तर सुरुवातीला एकंस्थान.’ त्यावरून सुचलेले काही विचार नव्या धाग्याच्या स्वरूपात लिहीत आहे. (वाकडी अक्षरे मी तशी केली आहेत.)
प्राचीन भारतात संख्यांचे लेखन करण्याच्या वेगवेगळया पद्धती होत्या. आर्यभटाची पद्धति लेखात आलेली आहेच. ह्याशिवाय अक्षरांनी संख्या मांडायची 'कटपयादि' नावाची एक वेगळी पद्धती होती. बिभूतिभूषण दता आणि अवधेश नारायण सिंगलिखित 'History of Hindu Mathematics' ह्या अधिकारी ग्रंथात ह्या सर्वांचे सूक्ष्म आलोचन वाचावयास मिळेल.
आर्यभट संख्या लिहिताना अक्षरे नेहमीपेक्षा उलट्या क्रमाने लिहिताना दिसतो ह्याच्या मागे 'अंकानां वामतो गति:' (शब्दशः - अंक डावीकडे जातात) हे तत्त्व आहे. ह्याचा वापर खगोलशास्त्राच्या ग्रंथातील संख्या, शिलालेखांतील आणि ताम्रपटातील वर्षगणना, धनाच्या रकमा असे प्रकार लिहिण्यासाठी केला जात असे. सर्व प्राचीन भारतीय लेखन (खगोलशास्त्र, गणित शास्त्र अशांचे सुद्धा), तसेच पुष्कळसे शिलालेख आणि ताम्रपट असे सर्व वाङ्मय श्लोकबद्ध असल्याने त्यात एखादी संख्या सरळ अंक लिहून चालत नसे कारण अशी संख्या वृत्तात कशी बसणार? ह्यासाठी पुराणग्रंथ, रामायण-महाभारतासारखी काव्ये ह्यामधल्या गोष्टींवरून एकेक अंक आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट शब्द (एकच नाही तर अनेक) अशा जोडया करून अंकांऐवजी ते ते शब्द वापरले जात. त्यामुळे श्लोकरचनेला हवी ती लवचिकता निर्माण होई. उदा. ० म्हणजे ख, गगन, अम्बर, आकाश इ., २ म्हणजे लोचन, नेत्र, अक्षि इ., ३ म्हणजे लोक, भुवन, अग्नि, पावक, काल इ., ५ म्हणजे बाण, शर, सायक, पांडव इ., २७ म्हणजे नक्षत्र, उडु, भ इ. ह्या शब्दांमागील संदर्भ ओळखून अंक कोणता हे ठरवायचे असा हा प्रकार होता. ह्याची अनेक कोष्टके वेगवेगळया ग्रंथातून दिलेली आहेत. ह्यामध्ये एकवाक्यता अशी विशेष नाही. मूलतत्त्व समोर ठेवून प्रत्येक लेखकाने वेगवेगळे पर्याय वापरले आहेत. वाचकाने संदर्भाने त्यांचा अर्थ ठरवायचा.
संख्या अंकस्वरूपात लिहितांना आपण सर्वात डाव्या बाजूस सर्वात मोठया स्थानाचा अंक, तदनंतर त्याच्या खालच्या स्थानाचा अंक ह्या मार्गाने अखेर एकंस्थानापर्यंत येतो, जे संख्येच्या सर्वात उजव्या टोकास असते आणि ते शेवटी भरले जाते. ह्याउलट गणिताच्या, खगोलशास्त्राच्या इ. पुस्तकांमध्ये मोठी संख्या (श्लोकात घालतांना) एकं स्थानावरील अंक वरील सांकेतिक शब्दांच्या स्वरूपात प्रथम, तदनंतर दहंचा आकडा त्याच पद्धतीने असे उलटे लिहीत असत. हीच संख्या हिशेबासाठी लिहिण्यासाठी अर्थातच प्रथम सर्वात पहिला (म्हणजे एकंचा) आकडा लिहून त्याच्या डाव्या बाजूला दहंचा, त्याच्या डाव्या बाजूला शतंचा असेच लिहावे लागत असे. ह्यालाच म्हणतात 'अंकानां वामतो गति:'.
ह्याचे खालील उदाहरण पहा: वर्तुळाचा वयास आणि परिघ ह्यांचा परस्परसंबंध भास्कराचार्याने लीलावतीमध्ये असा मांडला आहे:
व्यासे भनन्दाग्निहते विभक्ते
खबाणसूर्यैः परिधि: सुसूक्ष्मः।
द्वाविंशतिनिघ्ने विहृतेऽथ शैलैः
स्थूलोऽथवा स्याद् व्यवहारयोग्यः॥
“व्यासाला ३ अग्नि ९ नन्द २७ भ (३९२७) ने गुणल्यावर आणि (उत्तराला) १२ सूर्य ५ बाण ० ख (१२५०) ने भागल्यावर चांगला सूक्ष्म परिघ मिळतो. अथवा, (व्यासाला) २२ ने गुणून ७ (पर्वत) ह्याने भागल्यास सर्वसामान्य व्यवहारास पुरेसा योग्य (कामचलाऊ) असा परिघ मिळतो." (सोप्या शब्दात म्हणजे व्यास = १ मानल्यास परिघ ३९२७/१२५० = ३.१४१६ (४ दशांश स्थळापर्यंत) इतका सूक्ष्म मानाचा मिळतो. तसेच १२ ला ७ ने भागल्यास तो कामापुरता योग्य असा मिळतो. हनन म्हणजे गुणाकार. जुन्या गुणाकार लिहिण्याच्या पद्धतीत उत्तर जसजसे बाहेर येत जाते तसतसे गुण्य संख्येतील एकेक आकडा पुसून, म्हणजे त्याचे `हनन` करून, त्याजागी उत्तराचा एकेक आकडा भरत जात ह्या प्रथेमुळे हा शब्द निर्माण झाला असावा असे स्पष्टीकरण दत्ता आणि सिंग ह्यांनी दिले आहे. विभक्त आणि विहृत म्हणजे भागाकार केलेले.
येथे ३९२७ ही संख्या २७ (भ) ९ (नन्द) ३ (अग्नि) (भनन्दाग्नि) अशी लिहिली आहे. आकडेमोडीला अर्थातच भनन्दाग्नि ह्याचा काहीच उपयोग नाही. त्यासाठी सर्वात उजवीकडचा अग्नि (३) प्रथम लिहावा, तदनंतर नंद (९) आणि अखेरीस भ (२७) = ३९२७ असे लिहायला हवे. ’अग्नि’पासून ’भ’पर्यंतचा हा प्रवास ’अङ्कानां वामतो गति:’ ह्या वर्णनात बसतो.
’भ’ म्हणजे आकाश. त्यात नक्षत्रे २७. म्ह्णून ’भ’ म्हणजे २७ असा अर्थ लावावयाचा. दिव्याग्नि ३ = सूर्य, तडित्पात, पेटलेला विस्तव म्हणून अग्नि म्हणजे ३ . नंद वंशापाशी ९९ कोटींची संपत्ति होती असा समज आहे म्हणून नंद आणि ९ ह्यांचा मेळ. (...नवनवतिशतद्रव्यकोटीस्वरास्ते। नन्दा: पर्यायभूता: पशव इव हता: पशतो राक्षसस्य - मुद्राराक्षस). शैल म्हणजे ७ कारण तितके पर्वत भारतवर्षात मोजले जात. (महेन्द्रो मलय: सह्यः शुक्तिमानृक्षपर्वत:। विन्ध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वता:।।)
सारांश असा की आर्यभटाच्या लिखाणात काही चुकीचे नाही. तत्कालीन संकेताला ते धरून आहे.
Comments
छान
छान.
एक टिप्पणी :
असहमत. नाहीतरी डावीकडून उजवीकडे असे लिहायचे आहे, तर आधी भ (७-२*१०) लिहावे, मग नन्द (९*१००) लिहावे, मग अग्नि३*१००० लिहावे
७-२*१०-९*१००-३*१०००
<-७-२-९-३<- अशी वामतो गति: असली तरी आकडेमोड नियमित रीत्या करता येते.
दशमान बिंदू असलेले इर्रॅशनल आकडे लिहायचे असले, तर कुठे हल्लीच्या डावीकडून उजवीकडे लिहायच्या पद्धतीची सोय उघड होते. (वरील श्लोकात परिघ/व्यास ही संख्या रॅशनल आदमास करूनच दिली आहे.)
अङ्कानां वामनो गती
अंकाची उलटी गती समजली. भास्कराचार्याचा श्लोक आवडला.
भास्कराचार्याच्या श्लोकात आणि आर्यभटाच्या अक्षर-अंक पद्धतीत एक मोठा फरक आहे. आर्यभटाच्या पद्धतीत स्वराचा उपयोग स्थानासाठी केला आहे. त्यामुळे त्या पूर्ण वर्णात अंकाचे स्थान देखिल येते. भास्कराचार्याच्या उदाहरणात मात्र तसे नाही. भास्कराचार्य हा शब्द स्थानावरून अंकस्थान निश्चित करताना दिसतो. अशावेळी वामनोगतीचा नियम महत्वाचा ठरतो.
वर धनंजय यांनी दिल्याप्रमाणे अंक नियमित पद्धतीत उजवीकडून डावीकडे वा उलटे लिहिले तरी आकडेमोड करता येते. एकाची सवय झाली तर दुसरी अडचणीची वाटू शकते.
आर्यभट हा साधारणपणे अशी मांडणी करत असला तरी तो सर्वत्र (अगदी दशगीतिकेतही) तशीच करतो असे नाही. पहिल्या श्लोकातील काही शब्द (किग्र) किंवा ङिशिवुण्लृष्खृ (हा आकडा थोडा उलट सुलट लिहिलेला दिसतो) म्हणजे 15,82,23,75,00 (दोन च्या गटात मुद्दाम दिलेले आहेत.) हा आकडा या नियमाने लिहिला नाही.
भास्कराचार्याच्या पद्धतीत अलंकारिकता आणता येते. (एकाच आकड्यासाठी निरनिराळे शब्द वापरणे). आर्यभटाच्या पद्धतीत नेमकेपणा जास्त दिसतो.
प्रमोद