उपक्रम दिवाळी विशेषांक २०११ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!उपक्रम दिवाळी अंक २०११
http://diwali.upakram.org/

उपक्रम दीपावली विशेषांक २०११: अनुक्रमणिका

उपक्रम दिवाळी विशेषांक २०११ तील साहित्यावर प्रतिसाद/प्रतिक्रिया देण्यासाठी हा धागा वापरावा. एखाद्या विशिष्ट लेखावर चर्चा करायची असल्यास त्यासाठी स्वतंत्र धागा काढण्यास हरकत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

लवासा आणि पढतमूर्ख.

लवासावरील लेख वाचून खिन्न झालो. या प्रकल्पावर कुणाचा वरदहस्त आहे, हे नव्याने सांगायला नको. हीच धेंडे एरवी 'समतोल विकास' वगैरे विषयांवर व्यासपीठांवरुन बोलत असतात, टाळ्या घेत असतात. पर्यावरणाची अक्षम्य हानी हा भारताला महासत्ता होण्यापासून थांबवणार्‍या दहा मुद्द्यांपैकी एक आहे, असे नुकतेच एका दिवाळी अंकाविषयी वाचले.
जर लँड स्लाईडचा धोका आहे तर् बरेच आहे ना पडतील त्या श्रीमंतांची घरे :-) घेतील ते बघून. गरीब लोक तर नाहीत ना त्या वस्तीत
हे वाचून पढतमूर्ख हा शब्द आठवला. मृत्यूला श्रीमंत आणि गरीब यांच्यांमधील फरक कळावा अशी प्रतिसाददात्याची काहीशी अपेक्षा दिसते. त्या प्रतिसादात इतरही 'तारे' तोडले आहेत, पण ते विषयांतर इथे नको. लवासा प्रकल्पातील बांधकामातील तांत्रिक मुद्दे हा मूळ लेखाचा गाभा नाही हे वाचकाच्या लक्षात येत नाही याचे कारण लेखकाच्या मर्यादा हे नव्हे तर वाचकाची मती हे आहे . एकूण अशा विषयांवर असेच बालीश प्रतिसाद येतात, हेही दुर्दैवच. विशेषतः 'पल्याड' राहून 'बांधताहेत ना ते युरोप-अमेरिकेसारखी शहरे, मग तुमच्या का पोटात दुखते?' अशा आरोळ्या ठोकणारे बघीतले की पर्यावरण साक्षरता आणि शिक्षण, हुद्दा, व्यवसाय, पैसा यांचा एकमेकांशी कसा काडीचाही संबंध नाही ते ध्यानात येते.
सामान्य वाचक एकतर असे लेखन टाळून पुढे जातो, नाहीतर ते वाचून ते आपल्याला समजले अशा समजात काहीतरी भकत राहातो. लवासा दुर्दैवी आहेच, पण त्याहून मोठे दुर्दैव आहे ते अशा पढतमूर्खांचे समाजात असणे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

प्रतिसाद रिसायकल

सविस्तर उपप्रतिसाद देणार होतो पण वरच्या प्रतिसादात परफेक्ट उत्तर दिले असल्याने तेच वापरतो.

सामान्य वाचक एकतर असे लेखन टाळून पुढे जातो, नाहीतर ते वाचून ते आपल्याला समजले अशा समजात काहीतरी भकत राहातो. (श्रेय अव्हेर - सन्जोप राव)

धन्यवाद.

ही कोणती भाषा आहे?

'खरे लक्ष्मीपूजन' हा लेख (आणि एकूण उपक्रमाचा यंदाचा दिवाळी अंक) वाचताना जागोजागी ठेचाळलो. 'नामोनिशाण मिटवले जाते, आज भारतात १००० पुरुषांमागे केवळ ९३३ स्त्रिया जन्म घेऊ शकतात.,जगातील एकूण लापता किंवा हरविलेल्या महिलांमधील, मुलीचे आजारपण घरगुती उपायांनी धकवून नेणे,सामाजिक कार्य व संबंधित उपक्रम यांत विशेष रुची राखते वगैरे. ही कोणती भाषा आहे?
बाकी लक्ष्मीपूजन हा लेख तेच ते उगाळल्यासारखा आणि एक विवक्षित पवित्रा घेऊन लिहिल्यासारखा वाटला. या लेखातल्या मुद्द्यांविषयी दुमत नाही.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

संलक्षण

This comment has been moved here.

'खरे लक्ष्मीपूजन'

अरुंधती कुलकर्णी यांचे लेख नेहमीच आवडीने वाचले आहेत. 'खरे लक्ष्मीपूजन' लेख त्याच आवडीने वाचला आहे. स्त्री आता तुलनेने बदलत चाललेली आहे, बदलत्या स्त्री-प्रश्नाचा थोडा वेध सदरील लेखात यायला हवा होता असे वाटले. स्त्रीला दिल्या जाणारा गौणत्त्वचा काळ आता बराच मागे पडत चालला आहे असे मला वाटते. स्त्रियांवरचे अत्याचार, स्त्रियांचे शोषण, लिंगभेद आणि त्यासंबधीची आकडेवारीचा विदा मला सतत स्त्रीयांच्या दुर्दशा दाखविण्याच्या बाबतीत नेहमीच वाढून दाखविल्यासारखा वाटतो. हा काही लेखिकेने लेखात दिलेल्या आकडेवारीवरचा अविश्वास नाही. पण, असे मला नेहमीच वाटले आहे. पण पारंपरिक स्त्री आता बदलत चालली आहे, तीही अधिकाधिक स्वतंत्र होत चालली आहे. सदरील लेखातून अधिकाधिक आशावाद दिसला असता तर वाचतांना अधिक आनंद झाला असता.
'' यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता '' शब्दाचा शब्दशः अर्थ जाऊ द्या. परंतु स्त्रीचा सन्मान समाजाची समृद्धी दाखवतो असे समजणारे आम्ही वाचक असल्यामुळे लेखातून अपेक्षित 'खरे लक्ष्मीपूजन' दिसले नाही असे मला वाटले.

लेखाच्या जमेच्या बाजू नाहीतच असे काही नाही. मूळ विषय हा अनेकदा इतरत्र वाचण्यातून येत असला तरी प्रास्ताविकामधून वाचकाला विषयाकडे नेण्याची लेखिकेची हातोटी. लेखातील दोन्हीही चित्र. विषयातील प्रमुख मुद्यांचे विश्लेषण आणि समारोप ही लेखाची उत्तम मांडणी आहे, यात काही वाद नाही.

-दिलीप बिरुटे

लेखांमधील दुवे

दिवाळी अंकातल्या लेखांमधले दुवे जास्त ठळक करता येतील का? सध्याचा रंग आणि मजकूराखालची रेघ अगदीच फिके आहेत - नंदन यांच्या लेखात दुवे आहेत हे कर्सर फिरवल्यावर अचानक कळले!

भाषा

सन्जोप राव, धन्यवाद. लेख पुन्हा वाचताना मलाही त्यातली भाषा खटकली. लेख लिहिताना अन्य काही कामांमुळे तो लिहिल्यानंतर तपासायला मला पुरेसा वेळ नसल्याने तेव्हा वापरलेली भाषा / शब्दप्रयोग तसेच राहून गेले. लक्ष्मीपूजनाचा मुद्दाही मला जसा हवा तसा नीट उतरला नाहीए. मला हे मांडायचे होते की एकीकडे भारतात अनेक करोड लोक दरवर्षी लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा इत्यादी देवतांची ''शक्ती स्वरूपा'' म्हणून पूजाअर्चा करतात, नारीमध्ये हे देवीचे स्वरूप असण्याचा दावा करतात; मात्र वागताना अत्यंत विपरित किंवा विरोधाभासाने युक्त असे वागतात. तिला अबला वा दुर्बला लेखतात. तो विरोधाभास मला लक्षात आणून द्यायचा होता. लेख वाचताना आपल्याला झालेल्या तसदीबद्दल दिलगीर आहे.

दिलीप, आकडेवार्‍या या वेळोवेळी प्रकाशित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था वा शासनमान्य अहवालांमधील आहेत. त्यांत त्रुटी असतील तर ते दुर्दैवी आहे. लिंगभेदाबद्दल शहरांमधील दृश्य व ग्रामीण भारतातील दृश्य यांत खूप फरक आहे.

सस्नेह

अरुंधती

छान

दिवाळी अंक आवडला.

या अंकातील छायाचित्रे अंकाचे विशेष आकर्षण आहेत असे समजायला हरकत नाही.
सर्व लेखक-लेखिकांचे अभिनंदन.

लवासावरील लेख रोचक आहे. विशेष लक्षात राहण्यासारखे म्हणजे ऋषिकेश आणि रोचना यांचे लेख.

शांतता

उपक्रम स्थळ गेले काही दिवस शांत आहे.
दिवाळी अंकावर अजून जास्त चर्चा अपेक्षित होती... ऐसीअक्षरे.कॉम ने लक्ष वेधून घेतल्यामुळे, का दिवाळी सुट्टी मुळे, का लेख लांबलचक आहेत म्हणून हे कळत नाही, पण रोचक लेखांची लाइन् अप् बघून रंजक चर्चेची वाट बघत होते! अजूनही चर्चा होईल अशी आशा आहे.
(फक्त माझ्या लेखावर नव्हे, तर सगळ्याच लेखांवर! :-))

+१

रोचक लेखांची लाइन् अप् बघून रंजक चर्चेची वाट बघत होते! अजूनही चर्चा होईल अशी आशा आहे.

अगदी सहमत.
हेच मी माझ्या या प्रतिसादामधे म्हण्टलेलं आहे.

लेख फार आवडला

This comment has been moved here.

कर्नल मकेंझीचा ऐतिहासिक खजिना

This comment has been moved here.

ट्रॉय - सा रम्या नगरी आणि तिची कहाणी

या लेखाचे कौतुक करणारे फारसे प्रतिसाद दिसले नाहीत.

२०१० मधील चंद्रशेखर यांचा पारसापोलिसवरील सुरेख लेख आणि २०११ मधील कोल्हटकरांचा ट्रॉयवरील उत्तम लेख हे मेजवानी होते. पाश्चिमात्य ग्रीक शहर-राज्यांनी पौर्वात्य शहरांवर युद्धे लादून ट्रॉय आणि पारसासारखी शहरे बेचिराख केली.

इलियडच्या ओळखीपासून सुरु होऊन श्लीमनच्या ध्यासाबद्दल आणि श्लीमनची व्यावसायिकता, त्याचा धसमुसळेपणा इ. इ. प्रकाश टाकणारा हा लेख परिपूर्ण वाटला. तरीही, ट्रॉयच्या स्थापत्याविषयी अधिक माहिती आवडली असती.

एका सुंदर स्त्रीच्या मोहातून ट्रॉय नगराचा झालेला असा विनाश हा कवि होमर ह्याच्या इलियड ह्या महाकाव्याचा विषय. ट्रॉयला 'इलिअन' ह्या नावानेही ओळखले जात असे त्यावरून होमरने आपल्या महाकाव्याला 'इलियड' असे नाव दिले.

ग्रीक पुराणांनुसार ट्रॉस हा या प्रदेशाचा राजा होता. ट्रॉसवरून या शहराला ट्रॉय असे नाव पडले. ट्रॉसचा मुलगा इलिऑस (इंग्रजीत इलिअस). त्याच्या नावावरून या शहराला "इलिऑन" असे ओळखले जाऊ लागले.

ग्रीकांच्या मूळ नावांचे लॅटिनिकरण (की इंग्रजीकरण?) करताना ग्रीक नावातील "ओ" ला "यु" ने बदलण्यात आल्याने उच्चारांत तफावत जाणवते. जुन्या ग्रीकमध्ये "सी" हे मूळाक्षर वापरले जात नाही. इंग्रजीत जेथे तेथे मूळ ग्रीक "कॅप्पा"ला "सी" ने बदलून उच्चारांत घोळ घातले गेले आहेत.

 
^ वर