कार्टे कधी फोडावे?

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा!

भारतीय सणातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी.
आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो!

एक सण आणि कितीतरी वैविध्य. प्रत्येक प्रांतात दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
अगदी आपल्या महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक गावात दिवाळीचे एक वेगळे वैशिष्ठ्य पाहायला मिळते.
यात सर्वात वेगळेपण पाहायला मिळते ते म्हणजे अभ्यंग स्नानाच्या दिवसाचे!

या दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुर ह्या राक्षसाचा वध केला म्हणून पहाटे लवकर उठून, कार्टे फोडून, अभ्यंग स्नान करून, मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करायची.

आज आपल्या कोकणातील कितीतरी गावात स्नानानंतर कार्टे फोडतात तर कितीतरी गावात आधी.
आज उपक्रम वर हाच मुद्दा मांडायचा आहे कि हे जे कार्टे फोडायचे आणि त्याच्या रसाचा तिला कपाळाला लावायचा राक्षसाचे रक्त म्हणून ते कधी सणांच्या आधी कि स्नान केल्या नंतर.

नक्की हे कार्टे कधी फोडावे ह्यावर काही प्रकाश टाकता येईल काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

कारीट आणि नरकासुर

या फळाला वेगवेगळी नावे आहेत. कारीट(अनेकवचन कारीटे) आणि चिराटे (अनेकवचन चिराटी) ही दोन नावे त्यातल्या त्यात जास्त प्रचारात आहेत.किराटी,कोर्टी,चिर्डी,चिड्डी ही नावेही ऐकलेली आहेत. ही प्रथा महाराष्ट्रात सर्वत्र नसावी.
हे अत्यंत कडू फळ नरकासुराचे प्रतीक मानले जाते.मंगल स्नानाच्या आधी ते फोडून नरकासुराचा प्रतीकात्मक वध करायचा,सारी कटुता,दुष्टता नाहीशी करायची आणि मग मंगल स्नानाने पवित्र होऊन सण साजरा करयचा अशी काहीशी कल्पना असावी.

प्रथमच ऐकतो आहे.

कार्टे फोडणे ही प्रथा महाराष्ट्रात सर्वत्र नसावी. आमच्याकडे तरी नाहीच.

कोकणात असावी

माझ्या घरी तरी कधी कारटे फोडलेले नाही पण माझ्या मैत्रिणीच्या घरी फोडत. आंघोळीआधी असे वाटते कारण कारट्याला उग्र वास असतो.

कारटे नाही

आम्ही कारटे म्हणत नव्हतो. कर्टुले म्हणत असू. आंघोळीनंतर, बाहेर पडताना लगेच बाथरूमच्या बाहेर कर्टुली ठेवून आम्ही ती पायाने फोडत असू. सगळीकडे बिया बिया होत. पण काहीतरी थ्रिल वाटे एवढे खरे!
रस डोक्याला वगैरे नव्हतो लावत.

:)

>>कार्टे कधी फोडावे?

कार्ट्याने अगदी उच्छाद मांडला असेल तेव्हा त्याला (पट्टीने किंवा छडीने) फोडावे.

नितिन थत्ते

कार्टे कधी फोडावे?

एकदम सही....!!! लेखाचे नाव वाचून माझा हाच ग्रह झाला होता कि कार्ट्याला फोडून काढण्यासाठी लेखक कारण शोधतोय....!!! हा हा हा हा हा आहा ....!!!!

कार्टे कधी फोडावे?

एकदम सही....!!! लेखाचे नाव वाचून माझा हाच ग्रह झाला होता कि कार्ट्याला फोडून काढण्यासाठी लेखक कारण शोधतोय....!!! हा हा हा हा हा आहा ....!!!!

कारीट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कारीट हे कोकणात आढळणारे रानवेल फळ आहे.वेल काकडीच्या वेलीसारखी दिसते.फुलेही तशीच पिवळ्या रंगाची असतात.कारीट काकडीसारखे दिसते पण आकार अंड्याएवढा असतो. ते अगदी कडू असते.आतल्या बिया काकडीच्या बियांसारख्या (पण आखुड) असतात.
लहानपणी चावदिसाच्या पहाटे अंगणात तुळशीवृंदावनासमोर कारीट ठेवून गोविंदा,गोविंदा, गोssविंदा अशी आरोळी ठोकत तिसर्‍या गोविंदाच्यावेळी टाचेखाली कारीट फोडल्याचे आठवते.हा विधी अभ्यंगस्नानानंतर असायचा.

गंमत

आमच्या मराठवाड्यात ही प्रथा नसल्याने तुमच्या चर्चेच्या विषयावरुन जरा गोंधळ निर्माण झाला. विषय पाहून मला वाटले की कार्टे (मुले/मुलगा/चिरंजीव) जर जास्तच त्रास देऊ लागले तर कधी पर्यंत सहन करायचे आणि मर्यादेच्या पुढे गेल्यावर त्याला सोलून/फोडून कधी/कसे काढायचे वगैरे लिहिले आहे का काय? आजकाल आपल्या आईवडिलांनी जसे आपल्याला फोडून काढले तसे काढण्याचे मी तरी कुठे ऐकलेले नाही. म्हणून कुतुहलाने धागा उघडला अन कसे काय, पोपट झाला ना राव! ;)

 
^ वर