राधाधरमधुमिलिंद

आपण सर्वांनी ’राधाधरमधुमिलिंद’ हे संगीत सौभद्रातील अण्णासाहेब किर्लोस्करांचे विख्यात नाटयपद अनेक वेळा ऐकलेले असेल. मी जेव्हा जेव्हा ते ऐकतो तेव्हा त्याचा पूर्ण अर्थ मला लागत नाही. अखेर त्याचा छड लावण्यासाठी आज बसलो.

पहिली अडचण म्हणजे गाण्याचे निश्चित शब्द काय आहेत ते ठरविण्याची. अण्णासाहेबांनी मुळात काय शब्द वापरले होते ते मूळ हस्तलिखित प्रत (कोठे उपलब्ध असली तर, शक्यता फारच कमी) किंवा अगदी जुन्या छापलेल्या प्रती पाहिल्याशिवाय ठरविता येणार नाही. काही अलीकडच्या छापील प्रती उपलब्ध आहेत पण येथे त्या मला मिळणे कठीण आहे. भीमसेन जोशींपासून अनेक गायकांनी म्हटलेले हे पद ऐकून शब्द कळतात, तसेच जालावरहि ते काही ठिकाणी उपलब्ध आहेत. पुढील दोन पाठ पहा:

http://mr.wikipedia.org/wiki/संगीत_सौभद्र

राधाधरमधुमिलिंद जयजय । रमारमण हरि गोविंद ॥ धृ ॥
कालिंदी तट पुलिंद लांच्छित सुरनुतपदरविंद । जयजय ॥ 1 ॥
उदधृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद । जयजय ॥ 2 ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतिते न निंद । जयजय ॥ 3 ॥

http://www.khapre.in/portal/url/mr/sahitya/gaani/khadilkar/saubhadra

राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥ धृ ॥
कालिंदी-तट-पुलिंद-लांच्छित सुरनुतपदरविंद । जय. ॥ 1 ॥
उदधृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद । जयजय ॥ 2 ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतिते न निंद । जयजय ॥ 3 ॥

बारीक भेद सोडले तर दोन्ही पाठ जवळजवळ सारखेच आहेत. सारखेच आहेत तीन अर्थांनी - समजणारे सर्व शब्द दोनहि ठिकाणी सारखे आहेत तसेच दुर्बोध शब्दहि दोनही ठिकाणी तेच आहेत. सरळसरळ चूक म्हणता येईल असा दोन शब्दहि दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने लिहि्ले आहेत.

हा शेवटचा मुद्दा आधी स्पष्ट करतो. ’कालिंदीतटपुलिंदलांछित’ म्हणजे काय? ’पुलिन्द’ ह्याचा अर्थ मोनिअर-विल्यम्स कोषामध्ये ’Name of a barbarous tribe, a barbarion, a mountaineer' प्रकारचा दिलेला आहे आणि त्याला ऐतरेय ब्राह्मण, महाभारत असे आधार दाखविले आहेत. तेव्हा हे उघड दिसते की ’कालिंदीतटपुलिंदलांछित’ ह्याला काही अर्थ नाही. ’पुलिन्द’च्या जागी ’पुलिन’ असे वाचले की त्याला अर्थ येतो. ’पुलिन’ म्हणजे नदीकाठचा वाळूचा तट. (मोनिअर-विल्यम्स.) (कालिन्द्या: पुलिनेषु केलिकुपितामुत्सृज्य रासे रसं... इ.) ’कालिंदीतटपुलिनलांछित’ म्हणजे यमुनेच्या किनार्‍यावरल्या वाळूने अंग मळलेला. ’सुरनुतपदरविंद’लाहि काही अर्थ नाही. हा साडीचा पदर नाही तर ’सुरनतपदारविंद’ आहे. ज्याचे पदारविंद (पदकमले - करारविन्देन पदारविन्दं पादारविन्दे विनिवेशयन्तम्) सुर म्हणजे देवांनी ’नत’ (नतमस्तक) व्हावे असा हरि.

हे प्रश्न सुटले. गाणे छापणार्‍या कोणीतरी पुलिनचे पुलिंद केले आणि तोच प्रघात पडला - शारदा नाटकातील ’दाखवायासि मला’ ह्याचे ’दाखवाया सिमला’ होते किंवा ’कुचभल्ली वक्षाते टोचुनिया दुखवी मज’ हे शब्द रंगमंचावरील गायक घोळून घोळून आणि प्रेक्षकांतील स्त्रीवर्गाकडे दृष्टि टाकत म्हणत राह्तो तसे काहीसे! गायक ’पदारविंद’चे ’पादारविंद’ करतात, त्यालाहि अर्थ तोच आहे पण वृत्ताला ’पदारविंद’ अधिक बरे.

पण बाकी शब्दांचे काय? ज्यांचा अर्थ स्पष्ट आहे ते शब्द असे - राधाधरमधुमिलिंद म्हणजे राधा-अधर-मधु-मिलिंद, राधेच्या अधरेचा मधु सेवन करणारा भुंगा. (बाकी कृष्णाची मजा होती - राधेच्या अधरेच्या मधूचे सेवन केले काय किंवा गोपींची वस्त्रे लपविली काय, त्याचे कौतुकच. आज कोणी असे काही करण्याचे धार्ष्टय दाखवले तर प्रथम बाई चप्पल काढेल आणि नंतर पोलिस हातकडया घालून नेतील!) ’उद्धृतनग’ दोनही जागी ’उदधृतनग’ असे लिहिले आहे तेहि चूक आहे. ’उद्धृतनग’ म्हणजे (गोवर्धन) पर्वत उचलणारा. ह्यापुढे मात्र बर्‍याच अडचणी आहेत. ’मध्वरिंदमानघ’ पैकी मध्वरिंद कळले - मधु राक्षस (मधुकैटभांपैकी) ह्या अरि(शत्रु)चे दमन करणारा. ’मधुसूदन’चा हाच अर्थ आहे. पण ’मानघ’ म्हणजे काय? कशाच्या जागी हा पाठ चुकून पडला असावा ह्याचाहि तर्क मला करता येत नाही. तसेच ’सत्यपांडपटकुविंद’ ’गोपसदनगुर्वलिंदखेलन’ ’बलवत्स्तुतिते न निंद’ म्हणजे काय? ’गोपसदनगुर्वलिंदखेलन’ मधील गोपसदन आणि खेलन कळले पण ’गुर्वलिंद’ म्हणजे काय हे स्पष्ट नसल्याने एकूण शब्दाचा अर्थ लागत नाही.

आपणापैकी कोणास ह्या शंका पूर्वी आल्या असल्या किंवा गाण्याच खरा अर्थ ठाऊक असला तर प्रतिसादात यावा ही विनंती.

लेखनविषय: दुवे:

Comments

नवा शोध

मला वाटते वरील चर्चाप्रस्ताव लिहिण्यात माझी थोडी घाईच झाली.

तो लिहिल्यानंतर काही वेळातच मला भीमसेन जोशींनी गायलेले हे पद http://www.youtube.com/watch?v=OMoJck-Gcdw येथे मिळाले. पदाच्या शब्दांबरोबर त्यांचा अर्थहि दाखविला आहे आणि तो बहुतांशी पटण्याजोगा आहे. त्यांपैकी मला प्रथम न लागलेले शब्द खाली दिल्याप्रमाणे आहेत.

राधाधरमधुमिलिंद जयजय । रमारमण हरि गोविंद जयजय
कालिंदी तट पुलिंद लांच्छित सुरनुतपदरविंद । जयजय
उदधृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद । जयजय
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतिते न निंद । जयजय

मध्वरिंदमानघ - मधु-अरिंदम-अनघ. अरि = शत्रु. मधु दैत्याचे दमन करणारा आणि अघ (पाप) विरहित.
सत्यपांडपटकुविंद - सत्यप-अंडपटकुविंद. अंडपट = विश्वरूपी वस्त्र (ब्रह्मांड ह्यातील अंड). कुविंद = विणकर. सत्यरक्षक आणि विश्वरूपी वस्त्राचा विणकर. ह्याच अर्थाचे 'धागा धागा अखंड विणु या' हे भावगीत आपणास माहीत आहेच.
गोपसदनगुर्वलिंदखेलन - गोपसदन-गुरुअलिंद-खेलन. अलिंद = अंगण. गोपसदनातील आणि गुरूच्या अंगणात खेळणारा.
बलवत्स्तुतिते न निंद = बलवत्स्तुतीला (बलवंत, स्वतः नाटककार किर्लोस्कर ह्यांनी केलेल्या ह्या स्तुतीला) कमी लेखू नकोस.

वर उल्लेखिलेल्या विडीओमध्ये 'कालिंदीतटपुलिंदलांच्छित' ह्याचा अर्थ 'honored by the people living on the banks of the Kalindi river' असा दिला आहे तो मात्र अनेक कारणांसाठी पटत नाही. 'पुलिंद' म्हणजे वनवासी, भिल्लांसारखे लोक, सर्वसामान्य लोक नाही. तसेच 'लांछित'चा अर्थ honored असा होऊ शकत नाही. मी वर सुचविल्याप्रमाणे 'पुलिंद'ऐवजी 'पुलिन' असा पाठ स्वीकारला की सर्व प्रश्न सुटतात.

भाऊराव कोल्हटकर (१८६३-१९०१)
भाऊराव कोल्हटकर (१८६३-१९०१)

हे पद प्रसिद्ध होण्यामध्ये किर्लोस्कर मंडळीचे तत्कालीन विख्यात नट-गायक भाऊराव कोल्हटकर, ज्यांना त्यांचे चाहते प्रेमाने 'भावडया' म्हणत असत, त्यांचा मोठा वाटा होता. केवळ योगायोगाने त्यांचे एक छायाचित्र मला गोविंदराव टेंबेलिखित 'माझा संगीत व्यासंग' ह्या पुस्तकाच्या डिजिटल रूपात सापडला. तो आपणां सर्वांच्या माहितीसाठी येथे देत आहे.

छोटी दुरुस्ती

अजून एक छोटी दुरुस्ती.

'करारविन्देन पदारविन्दं पादारविन्दे विनिवेशयन्तम्' नाही. 'करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम्' असे हवे.

'नुत' हे नु-नौमि (२प) अर्थ नमन करणे ह्याचे वर्तमानकालीन धातुसाधित आहे. असेहि दिसते की हे गीत म्हणजे पादाकुलक ह्या मात्रावृत्तातील रचना आहे, ज्यात प्रत्येक पादामध्ये ४ मात्रांचे ४ गट येतात. ह्यामुळे 'सुरनुतपादारविंद' हा पाठ योग्य असून वृत्तात बसण्यासाठी आवश्यक आहे.

पुलिंद आणि पुलिन ह्यामध्येहि एका मात्रेचा फरक पडतो पण कवि गेयतेसाठी कधीकधी वृत्ताच्या नियमांकडे कानाडोळा करू शकतात म्हणून 'कालिंदीतटपुलिनलांछन' हेच योग्य वाटते.

एवंच काय, ह्या लिखाणामुळे माझ्या डोक्यातील एक कोळिष्टक साफ झाले!

-इंद हे यमक

श्री. अरविंद कोल्हटकर यांनी कठिण शब्दांचा अर्थ चांगला समजावून सांगितलेला आहे. धन्यवाद.

पादाकुलकाच्या नियमामुळे काही शब्द सुधारले तहे उत्तम.

त्याच प्रमाणे -इंद या यमकाकडे लक्ष दिले पाहिजे. (प्रत्येक चरणात १०-११-१२ या मात्रा.) त्यामुळे "पुलिंद" हे असेच हवे.

कालिंदीतटावरच्या असंस्कृत जमाती(पुलिंदां)द्वारा निंदा केलेला (लांछित) असा अर्थ घेता येतो. देव (मात्र) त्याच्या चरणकमलांची स्तुती करतात. (यातून निंदा/स्तुती यांतला असंस्कृत-ऋजू हा भेद अधिक गडद होतो.)

या कवितेच्या रचनेत "गझल" या रचनाप्रकाराचे बरेच नियम पाळल्यासारखे दिसत आहेत.
ध्रुवपदात "जयजय" रदिफ दोन्ही चरणांत येतो. मात्र त्यानंतरच्या कडव्यांत फक्त शेवटल्या चरणांत येतो,
त्या आधी -इंद हे अंत्ययमक आदला शब्द बदलून आलेले आहे.
(मात्र हे चरणांतर्गत यमक सर्व ओळींत घेण्याचे रचनावैचित्र्य हे येथे खास.)
शेवटच्या कडव्यात कवीचे नाव गुंफलेले आहे.
प्रत्येक कडवे काहीसे स्वतंत्र आहे. (आदल्या-पुढल्या कडव्याचा कथानक-संदर्भ अपेक्षित नाही.)

राधाधरमधुमिलिंद जयजय ।
रमारमण हरि गोविंद जयजय ॥ (मतला) ॥

कालिंदी तट पुलिंद लांच्छित ।
सुरनुतपादारविंद जयजय ॥

उदधृतनग मध्वरिंदमानघ ।
सत्यपांडपटकुविंद जयजय ॥

गोपसदनगुर्वलिंदखेलन ।
बलवत्स्तुतिते न निंद जयजय ॥ मक्ता ॥

- - -

काहीकाही ठिकाणी कवीने पादाकुलकाचे नियम काटेकोरपणे पाळले असूनही एखाद-दोन ठिकाणी अर्था लागण्याच्या दृष्टीने वाचन करता यतिभंग झाल्याचा आभास होतो.
किंवा कुठल्याही मात्रागणवृत्तात जो काही गण असतो, तो गण वृत्ताला लय/ताल देतो. (उदा पादाकुलकात नुसत्याच कशाही विखुरलेल्या १६ मात्रा नसतात, तर ४-४-४-४ मात्रा, असे चार-चार मात्रांचे चार गण असतात) . प्रत्येक गणाच्या शेवटी निमिषमात्र विलंब करायची सोय हवी - नाहीतर ताल बिघडतो. ही "सोय" म्हणजे शब्दाचा शेवट - नेहमीच्या अर्थाने "यति" नव्हे. मराठीमध्ये शब्दांतर्गतचे काही स्वर ताणता येतात, तर अन्य स्वर ताणता येत नाहीत. जे स्वर थोडे ताणता येतात, ते स्वरही गणाच्या शेवटी येऊ शकतात.
उदाहरणार्थ येथे ताल आणि अर्थ, दोन्ही छान जमतात :

कालिं-दी तट- पुलिंद- लांच्छित ।
सुरनुत-पादा-रविंद - जयजय ॥

प्रत्येक गणाच्या शेवटी एक तर शब्दाचा शेवट आहे, सामासिक शब्दातील पदाचा शेवट आहे, किंवा क्वचित विलंब चालवून घेणारे गुरू अक्षर आहे.

तीच बाब या ठिकाणी होत नाही, आणि वाचताना त्रास होतो :

राधा-धरमधु-मिलिंद - जयजय ।
रमार-मण हरि - गोविंद जयजय ॥

येथे अर्थ नीट लागण्यासाठी "रमा-रमण हरि" असा स्वल्पविराम घेता येतो, पण ताल साधण्यासाठी मात्र वरीलसारखी "रमार" अशी फोड करावी लागते. येथे गणाच्या शेवटी अर्धवट शब्द आहे. समासांतर्गत पदाही शेवट नाही.

कवीने ताल-लय यांचा अर्थाशी बेबनाव टाळावा, असे मला वाटते.

पुलिन्द आणि गुर्वलिन्दखेलन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या नाट्यगीतात पुलिनच्या जागी पुलिन्द म्हणणे आणि ऐकणे अधिक चांगले वाटते हे खरे असले तरी अर्थपूर्णतेच्या दृष्टीने पुलिन हा शब्दच योग्य वाटतो. पुलिन्द शब्दाचा अर्थ भिल्ल असा दिला आहे.(लघुगीर्वाणकोश--ओक). यमुनेच्या तीरावरील भिल्ल श्रीकृष्णाला दूषणे कशाला देतील? पुढे लांच्छित असे कभूधावि आहे.त्याचा अर्थ डाग पडलेले,मलिन झालेले असा होतो.माझ्यामते"कालिन्दीतटपुलिनलांच्छित सुरतनुपादारविन्द.." असे शब्द असावे."ज्याचे दिव्यशरीर(सुरतनु) आणि पदकमले यमुनेच्या तीरावरील वाळूने मलिन झालेली आहेत अशा श्रीकृष्णाचा जयजयकार असो."असा अर्थ असावा.
..
गुर्वलिन्द..यात अलिन्द म्ह़णजे घरापुढील ओटा.अंगणही म्हणता येईल. अलिंद हा पुल्लिंगी शब्द आहे. गुरु हे त्याचे विशेषण घेतल्यास,"गोपालांच्या घरासमोरील मोठ्या विस्तीर्ण अंगणात खेळणारा..." असा अर्थ समर्पक दिसेल.मधेच ते गुरूचे घर कशाला?

जयदेव कवीची अष्टपदी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
नाट्यगीतगायनाच्या एका कार्यक्रमात निवेदन करताना पु.ल.देशपांडे "राधाधरमधु..."
या पदाविषयी म्हणाले की ही संस्कृत कवी जयदेव याची अष्टपदी आहे.
यावरून "बलवत्स्तुतिते न निन्द जयजय|"एवढी एकच ओळ नाटककार किर्लोस्करांनी लिहिली असावी.(हे पटते. कारण इतर सामासिक शब्द अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिले नसावेत असे वाटते) .संपूर्ण गीतात "ते" हा द्वितीयेचा प्रत्यय(स,ला,ते;स ला, ना,ते) तेवढा मराठी आहे.उर्वरित सर्व संस्कृत.

पुलिंद गुर्वलिंद गीतगोविंद

'कालिंदीतटपुलिनलांच्छन' हे अधिक युक्त आहे असे मी प्रारंभीच म्हटले आहे. 'पुलिंद'ऐवजी 'पुलिन' असा पाठ स्वीकारल्यास पादाकुलकाला एक मात्रा कमी पडते हे खरे पण हा दोष फार गंभीर आहे असे नाही. अर्थाच्या दृष्टीने पाहिल्यासहि तेच वाटते. पुलिन्द म्हणजे भिल्लांसारखे वनवासी लोक. यमुनेच्या काठी व्रजभूमीजवळ असे लोक राहात असल्याचे कृष्णलीलांशी संबंधित अन्य कोठल्याच साहित्यात दिसत नाही. तसेच पुलिंदानी कृष्णाला नावे ठेवायचे कारण काय आणि ती गोष्ट कृष्णस्तुतीमध्ये आणायचे कारण काय?

यनावालांनी सुचविलेला 'गुर्वलिंद' म्हणजे मोठे अंगण हेहि शब्दश: चूक नाही पण गुरु हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो तेथे त्याचा अर्थ 'वस्तुमानाने मोठा, जड' असा घेतला जातो. मोनियर-विल्यम्सने त्याचा अर्थ 'Heavy, weighty (opposed to laghu) असा दर्शविला आहे. क्षेत्रफळाने मोठा प्रदेश, लांबीने मोठा रस्ता ह्यांचे वर्णन 'गुरु' असे होणार नाही. योगातील अणिमा (आकाराने लहान), महिमा (आकाराने मोठा), लघिमा (वजनाने हलका, जसा कापूस), गरिमा (वजनाने जड, जसा पर्वत) ह्या अष्टसिद्धींपैकी पहिल्या चार सिद्धी हेच सुचवितात. मला वाटते की 'गुर्वलिंद' म्हणजे मोठे अंगण हे जरी शब्दश: चूक नाही तरी पण usage मध्ये बसत नाही.

'गोपसदनगुरु' म्हणजे गोपगृहाचा स्वामी म्हणजे नंद असाहि अर्थ करता येईल. पण 'गोपसदन' म्हणजे घर आणि 'गुरु(सदन) म्हणजे शिक्षणाची जागा किंवा शाळा हा balance मला अधिक रमणीय वाटतो आणि म्हणून 'गोपसदनगुर्वलिंद' ह्याचा अर्थ 'घरच्या आणि शाळेच्या अंगणात सतत खेळत असलेला' हा अर्थ मला अधिक पटतो.

पु.लं.नी तसे म्हटले असले तरी हे गीत गीतगोविंदात आहे असे दिसत नाही. त्या काव्याची संस्कृत प्रत Digital Library of India येथे मिळाली आणि मी ती संपूर्ण चाळली. मला तरी त्यात हे काव्य किंवा त्याच्याशी मिळतेजुळते असे काहीच सापडले नाही.

हे पद किर्लोस्करांनीच केलेले असावे ह्याला उपोद्बलक असे अजून दोन मुद्दे. पहिला म्हणजे किर्लोस्करांचे शिक्षण जरी फार नव्हते तरी संस्कृत वाङ्मयाची त्यांना चांगलीच जाण होती असे कोठेतरी वाचलेले आहे. त्यांची सर्वच गीते संस्कृतप्रचुर भाषेत लिहिलेली आहेत. प्रत्यक्ष ह्या गीताकडे पाहिले की अभिजात कवींमध्ये न दिसणारा ओबडधोबडपणाहि ह्या गीतात आहे. सत्यप म्हणजे सत्याचे पालन करणारा असा अर्थ ह्या गीतात घ्यावा लागतो. 'प' हा प्रत्यय बहुधा 'पिणारा' अशा अर्थी वापरला जातो, जसे मधुप. 'सत्याचे पालन करणारा' हा त्या प्रत्ययाचा जरा कृत्रिम उपयोग वाटतो. सत्यप+अंडपट+कुविंद असली 'हठादाकृष्ट' रचना कालिदास किंवा जयदेवाला करायला लागली नसती. संस्कृत भाषेवरील त्यांच्या पकडीमूळे त्यांना असले काव्य करायची आवश्यकता भासली नसती. विश्व हे एक वस्त्र असून ईश्वर हा त्याचा विणकर आहे ही कल्पनाचित्र मलातरी संस्कृतमध्ये कोठे वाचल्याचे आठवत नाही. अंडपट हा शब्दहि अपरिचित आहे. कबीरापासून ह्या कल्पनाचित्राचा उगम आहे काय अशी मला शंका आहे. ह्या सर्वांवरून मला असे वाटते की हे पद जयदेवासारख्या अभिजात कवीचे नसून किर्लोस्करांचेच असावे.

गुरु

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.कोल्हटकर म्हणतात,:"गुरु हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो तेथे त्याचा अर्थ 'वस्तुमानाने मोठा, जड' असा घेतला जातो"
..
हे निरीक्षण तसे पटण्यासारखे आहे. पण क्वचित् श्रेष्ठ,मोठे या अर्थीही गुरु शब्द वापरल्याचे दिसते.जसे:
*जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी|(एक शंका:नामे दोन असल्याने विशेषणाचे गरीयसौ असे द्विवचन हवे का हो?)
.
*अयि बत गुरुगर्वं मा स्म कस्तूरि यासी-
रखिल परिमलानां मौलिना सौरभेण.....
.
*आरंभगुर्वी क्षयिणी क्रमेण
लघ्वी पुरा वृद्धिमतिश्च पश्चात्
दिनस्य पूर्वार्ध परार्ध भिन्ना
छायेव मैत्री खलसज्जनानाम्|
.
*गरीयः सौरभ्यं रसपरिचये नार्हति सुधा...| (पनसान्योक्ति)

आदिम सत्यम् = ब्रह्म

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"उद्धृतनगमध्वरिंदमादिमसत्यमण्डपट " असा सामासिक शब्द मानला तर...
....आदिमसत्यम् + अण्ड + पट= ब्रह्म +अण्ड +पट = ब्रह्माण्डपट असा अर्थ होऊ शकतो. मग ,
" गोवर्धनगिरिधारी असणार्‍या,मधु (आणि कैटभ अशा) शत्रूंना वठणीवर आणणार्‍या,ब्रह्मांडाचे वस्त्र गुंफणार्‍या विणकररूपी श्रीकृष्णाचा जयजयकार असो." असा अर्थ ठीक दिसेल.

 
^ वर