उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अयुक्लीडीय भूमिती
अनु
March 23, 2007 - 5:43 am
'दोन समांतर रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत.' -युक्लीडचा सिद्धांत.
'असे काही नाही, त्या एकमेकांना छेदतीलही.'-कोणीतरी.
याच संकल्पनेतून अयुक्लीडीय भूमितीचा उदय झाला. पण मला याबद्दल इतकेच माहिती आहे. तेही रसायनशास्त्रविषक एका पुस्तकात एका लेखात उदाहरण म्हणून दिलेले हे वाक्य वाचले म्हणून.अयुक्लिडीय भूमिती या विषयावर जाणकार अधिक प्रकाश टाकतील काय? अयुक्लिडीय भूमितीची तत्वे काय आहेत?त्याचा व्यवहारात उपयोग कुठे होतो?अयुक्लिडीय भूमिती सध्या कोणत्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते का?
दुवे:
Comments
समांतर रेषा
युक्लिडीय भूमिती आपल्याला नैसर्गिकरित्या किंवा स्वाभाविकपणे बरोबर आहे असे वाटते, पण या भूमितीची तत्त्वे प्रगत विज्ञानाच्या बर्याच क्षेत्रांना लागू होत नाहीत असे वाचले आहे. सहज विकिपिडीया चाळले असता अयुक्लिडीय भूमितीचे हापरबोलिक आणि एलिप्टिकल (यांना मराठी प्रतिशब्द काय?) असे दोन भाग आहेत आणि युक्लिडीय/अयुक्लिडीय यातील मुख्य फरक युक्लिडीय समांतर रेषांच्या सिद्धांतामुळे आहे असे समजले. युक्लिडीय भूमितीनुसार एका रेषेला त्या रेषेवर नसलेल्या बिंदूमधून जाणारी आणि त्या रेषेला न छेदणारी एक आणि एकच रेषा काढता येते. हापरबोलिक भूमितीनुसार एखाद्या रेषेला, त्या रेषेवर नसलेल्या बिंदूमधून जाणार्या आणि त्या रेषेला न छेदणार्या अनंत रेषा काढता येतात. (आता सरळ नसलेल्या रेषांना 'रेषा' कसे म्हणायचे?) आणि एलिप्टिकल भूमितीनुसार कोणत्याही दोन रेषा एकमेकांना छेदतातच. असो, ही आपली वाचीव माहिती झाली जाणकारांनी अधिक/योग्य माहिती दिल्यास उत्तम.
बरोबर/गोंधळ
मिलिंदराव, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी खरे तर ते वाक्य "सरळ नसलेल्या रेषेला 'सरळ रेषा' कसे म्हणायचे?" असे लिहायला हवे होते. विकिपीडियाच्या या पानावरील माहिती नुसार अयुक्लिडीय भूमिती दोन प्रकारे समजावता (किंवा समजून घेता) येते. पहिला प्रकार माझ्या आधीच्या प्रतिसादात दिलेला आहे. दुसरा प्रकार (जो त्या पानावरील दुसर्या परिच्छेदात आहे) त्याच्या वर्णनामुळे असा गोंधळ झाला.
असेच नाही काही..
युक्लिडीय भूमितीनुसार एका रेषेला त्या रेषेवर नसलेल्या बिंदूमधून जाणारी आणि त्या रेषेला न छेदणारी एक आणि एकच रेषा काढता येते.
असेच नाही काही, "एका रेषेला त्या रेषेवर नसलेल्या बिंदूमधून जाणाऱ्या आणि त्या रेषेला न छेदणाऱ्या अनंत स्क्यू रेषा काढता येतात." अर्थात त्या 'एकप्रतलीय' नसतील इतकेच !
~ तो ~
आभार
माहितीबद्दल आभार.
विकीवरील हा दुवा वाचला. त्यावर बर्यापैकी माहिती मिळते. पण लहानपणापासून युक्लीडीय भूमितीची सवय झाल्याने असेल कदाचित, मनाला वेगळा विचार कळत नाही.
सदर दुव्यात 'स्पेस टाइम' च्या भूमितीत अयुक्लीडीय तत्वांचा उपयोग होतो असे म्हटले आहे. जाणकार यावर अधिक प्रकाश टाकू शकतील काय? गणितविषयक उपयुक्त माहिती या चर्चेच्या निमित्ताने मराठीत आली तर आम्हाला हवीच आहे.
अवांतर
अयुक्लिडीय भूमितीचा उपयोग आईन्स्टाईनने 'सापेक्षता सिद्धांतात' केल्याचा उल्लेख येथे वाचला.
सापेक्षता सिद्धांत
सापेक्षता सिद्धांताची सुरुवातच युक्लिडीय भूमितीची पाळेमुळे (नि पाया) खणण्यापासून होते. (याच मुळे वाचक भ्रमित होऊन अर्ध्या पानावरून उठून जातो!)
~ तो ~
्अयुक्लीडिअन भूमिती
"्अयुक्लीडिअन भूमिती" बद्दल इतका उत्साह पाहून खुपच आनंद झाला. याची सुरूवात रिमान नामक गणित्याने केली होती. ही फारच स्वाभावीक कल्पना आहे.
आपण जी साधी भूमिती करतो, त्यामधे एक प्रतल घेउन त्या प्रतलावर रेषा वगैरे काढतो. पण विचार करा की आपले जग मात्र प्रतल नाही... आपण पृथ्वीवर राहतो. आणि ती गोल आहे.
मला पृथ्वीवर रेषा काढायची आहे. कशी काढणार? प्रतलावर रेषा काढताना मी एका ठीकाणी सुरू करतो नि सरळ चालत जातो, फक्त माझ्याच सोबत एक जणाने माझ्या विरुद्ध दिशेला चाले जायचे, म्हणजे दोन्ही बाजूंनी अनंत किरण सुरु होउन, एक रेषा बनेल.
हेच पृथ्वीवर करायचे. एक बिंदू ठरवून दोनजणांनी विरूद्ध दिशेत चालत जायचे! पण असे केले तर (थोडी कल्पना शक्ती लढवा), जे तयार होईल, ते एक वर्तृळ तयार होईल..!! म्हणजेच, पृथ्वीवरील रेषा एक वर्तृळ असते. (एक छोटा चेंडू घेउन हे आपण करू शकता...!!!) आता, समजा, तुमच्याकडे असे एक पृथ्वीवरील रेषा (= वर्तृळ) दिले आहे नि त्याच्यावे नसणारा एक बिंदू दिला आहे. या बिंदूमधून किती रेषा (= वर्तृळ) काढता येतील, ज्या पहिल्या रेषेला छेदणार नाहीत...? एक सोपी आहे, जी पहिल्या रेषेप्रमाणेच(= वर्तृळ) जाइल, तिच्या पासून कायम एकच अंतर ठेउन असेल. पण, अजून एक रेषा(= वर्तृळ) आहे.... ह्या दुसर्या वर्तृळाच्या वरती (पहिल्या वर्तृळाच्या विरुद्ध दिशेला) एक छोटे वर्तृळ काढा..!!! ते सुद्धा पहिल्या वर्तृळास छेदत नाही..!!! आणि असे पाहील्या याच बिंदूतून जाणारी अनंत वर्तृळे काढता येतील, जी पहिल्या वर्तृळास छेदत नाहीत. चेंडू घेउन त्यावर चित्र काढल्यास सोपे होईल. पण, एकमेकांना न छेदणार्या रेषा (=वर्तृळे) म्हणजेच समांतर रेषा..!!!! त्यामुळे, जर भूमिती गोलावर करायची असेल, तर एकाच बिंदूतून जाणार्या अनंत रेषा काढता येतील, ज्या दिलेल्या रेषेस समांतर असतील. हिच ्अयुक्लीडिअन भूमिती भूमिती..!!!
यामधे मजेशीर गोष्टी घडतात. उदा. दोन रेषा परस्परांना एकाहून अधिक बिंदूत छेदतात... विषुववृत्त ही एक रेषा आहे, नि दोन्ही धृवांना जोडणारी एक रेषा घ्या, ती विषुववृतास दोन बिंदूंत छेदते..!!
रिमानने दाखवले की हा सारा खेळ अंतर मोजण्याचा वेगळ्या पद्धतीमुळे होतो.. पृथ्वीची त्रिज्या "य" असेल, तर, दोन धृवांतील अंतर, जर असेच मोजले तर ते २य असेल. पण, आपण मात्र ते मोजताना जमिनीवरून चालत मोजतो, म्हणजेच, पाय*य (पाय= गणिती स्थिरांक)....!! हापरबोलिक आणि एलिप्टिकल भुमिती मधेहेच अंतर वेगळ्या प्रकारे मोजतात. ते फारच क्लिष्ट नि भाषेमधे लिहीण्यास अवघड आहे.
ही भूमितीच आजच्या संशोधनात गणित नि भौतिकामधे वापरतात. त्यामुळे, उलट, युक्लिडीअन भुमिती कुठे आहे असा प्रश्न पडतो.!!! ;-)
आपेक्ष आहे की हे भापले असेल. अन्यथा, वर म्हटले तसे, चेंडू घ्या वा संत्रे नि त्याचर हे करून पहा..!!! ;-) ते जास्त सोपे नि मजेशीर आहे...!!!!
- आपला चिंटू
छान - लेख/चर्चाप्रस्ताव लिहावा ही विनंती
छान -
श्री. चिंटू यांनी लेख/चर्चाप्रस्ताव लिहावा, आणि माहिती द्यावी, उत्तरे द्यावी, ही विनंती.
धनंजयजी धन्यवाद
आपणास उत्तर आवडले हे पाहून छान वाटले. शुद्ध गणित लिहीताना कायमच भीती वाटते ती, लिखाण क्लिष्ट होण्याची... अस्तु, सध्यातरी मी ईथे नवीन आहे. जमेल तशी चांगल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करीनच. लेख लिहीण्याकरीता वेळ मिळताच काम करीन.
- आपला चिंटू
शंका आहे.
मला एक शंका आहे.
मला भूमिती, गणित कमी कळते. पण माझी कल्पनाशक्ती चांगली आहे. त्यामुळे तुम्ही जे सांगताय ते थोडेच कळले.
तुम्ही म्हणता-
प्रतलावर रेषा काढताना मी एका ठीकाणी सुरू करतो नि सरळ चालत जातो, फक्त माझ्याच सोबत एक जणाने माझ्या विरुद्ध दिशेला चाले जायचे, म्हणजे दोन्ही बाजूंनी अनंत किरण सुरु होउन, एक रेषा बनेल.
थांबा! ज्याक्शणी तुम्ही चालू लागण्यापूर्वी ज्या दिशेला तुम्ही पाठ करता तेथील जग वेगळे असते, तुमच्या सोबत जो दुसर्या दिशेला जातोय त्याच्यासाठी त्याची पाठ असलेले जग वेगळे असते. मग हे कसे काय शक्य होवू शकते? इथे काही तरी गडबड आहे.
मी रेशा काढली. आणी मग प्रतलच म्हणजे कार्डबोर्डच मला हवा तसा दुमडला तर....
तसे होत नाही जे तुम्ही सांगता. तुम्ही पृथ्वीचा गोलपणा तुम्ही आधीच गृहित धरला आहे.
तुम्ही म्हणता ते पटत नाही. दोन रेशा एकमेकांना समांतर राहील्यानंतर त्या छेदू शकत नाही. जसे मानवी जीन्स च्या आराखड्या बाबतीत म्हणता येवू शकते.
भूमितीचा हा भाग तर्कशास्त्राच्या हद्दीत येतोय, अन् मला गोंधळवतोय. कारण क्रिया-प्रतिक्रिया ह्या विशयावर चिंतन करताना मला जी चित्र समोर येतात त्या चित्रातील दोन रेशा एकमेकांना छेदत नाहीत. परंतू त्यावेळी 'एक आणी एकच प्रतल' नेहमी आडवे येते, त्याला मी 'आर' असे नाव दिले आहे. जी आर अर्धनरनारी इश्वराच्या चित्रामध्ये असते. जी दिसत नाही पण तीचे अस्तित्व दिसते, जी दोन वेगळ्या चित्रांच्या मधोमध उभी येते.(आडवी देखील येत असेल)
रेषेची व्याख्या
प्रती श्री. सतीश रावले,
गणितामध्ये एकमितीय वास्तव अवकाश म्हणजे वास्तव संख्यांचा संच, द्विमित वास्तव अवकाश म्हणजे वास्तव संख्यांच्या संचाचा दोन वेळा कार्टेशिअन पद्धतीने केलेला गुणाकार नि त्रिमित वास्तव अवकाश (Real Three Space or Three Dimensional Real Space) म्हणजे वास्तव संख्यांच्या संचाचा तीन वेळा कार्टेशिअन पद्धतीने केलेला गुणाकार होय.
वरीलपैकी कोणत्याही संचामधील रेषेची व्याख्या नि त्यांच्या उपसंचातील रेषेची व्याख्या अनु. खालील प्रमाणे आहे:
१. कोणत्याही एक (दोन/तीन) चल वास्तव रेषीय समीकरणाचा उकल संच म्हणजे (अनु.) एक (दोन/तीन) मितीय वास्तव अवकाशातील रेषा होय.
(Solution space of a linear equation is 'n' variables with real coefficiants is called 'n' dimesional line, for n=1,2,3,...)
२. दिलेल्या वास्तव अवकाशाच्या उपसंचातील रेषा म्हणजे वरील रेषा नि त्या संचाचा छेद संच होय.
हि गणिती तांत्रिक व्याख्या किचकट असल्याने मला द्यावयाची नव्हती. म्हणून मी लिहिली नाही. परंतू ह्या व्याख्याने गोलावर रेषा काढली असतात ती कशी दिसते ते मला सामान्य आयुष्यातील भाषा वापरून सांगायचे होते. तर वरील व्याख्येने मिळालेली रेषा ही मी मागे लिहिल्याप्रमाणे एकाबिंदुपासून विरुद्ध दिशांना सरळ चालत गेल्यावर जो रस्ता मिळतो त्याच्याच सारखी असते. म्हणून मी तसे वर्णन केले. यापुढे त्याचा काही हेतू नव्हता. आपण वरील व्याख्या मनात ठेवून जर परत तो लेख वाचला तर काही गोंधळ राहणार नाही असे वाटते. (शिवाय, ह्या दोन्ही व्याख्या वापरून आपण गोलाशिवाय इतरही उपसंचांवरील रेषांचा विचार करू शकता!)
- चिंटू
रेषेची चक्रीय व्याख्या!
आम्हाला जीवशास्त्रात असे शिकविले गेले की मूत्रपिंडाचा (याला इंग्रजीत वृक्क असेही म्हणतात) आकार घेवड्याच्या बीसारखा असते आणि घेवड्याची बीन रेनीफॉर्म असते.
रेषेची व्याख्या सांगण्यासाठी 'लिनीअर' या शब्दाचा अर्थ ज्ञात असणे आवश्यक असल्यास व्याख्या निरर्थक ठरेल.
व्युत्पत्तीच फक्त चक्रीय असावी
व्युत्पत्तीच फक्त चक्रीय असावी.
"लिनियर" समीकरणे म्हणजे ज्यांत चलपदाचा पहिला (किंवा शून्यावा) घात आहे, आणि कुठल्याही चलपदाचा गुणाकार फक्त अचल संख्यांशी होतो, आणि या पदांची केवळ बेरीजच होऊ शकते... (बेरजेमध्ये वजाबाकी समाविष्ट आहे).
अशी व्याख्या असल्यामुळे "लिनियर" शब्दाचा या ठिकाणी थेट अर्थ भूमितीतला नाही, (व्युत्पत्ती तिथून असली तरी) व्याख्या चक्राकार नाही.
(परंतु काही गणितज्ञ रेषेची व्याख्या करत नाहीत. फक्त अमुक इतक्या ऍक्सियम् ना रेषा अनुसरते, हे गृहीत धरतात.)
ठीक
खुलासा पटला.
--
तरीही, अयुक्लिडीय भूमिती ही संकल्पनाच निव्वळ व्याख्याविस्तार (आणि म्हणूनच निरर्थक) वाटते.
अयुक्लिडीय भूमितीचा व्यवहार काहीसा असा वाटतो:
एक युक्लिडीय त्रिमिती अवकाश गृहितले जाते. क, ख, आणि ग, असे तीन अक्ष त्यात कल्पिले जातात. त्यात, क२ + ख२ + ग२ = घ असा एक गोल (किंवा इतर कोणत्याही समीकरणाने बद्ध वाकडातिकडा आकार, उदा. खोगीर) आखला जातो. नंतर त्या गोलालाच, "हे आमचे अयुक्लिडीय द्विमिती प्रतल, आमचा याच्यावर भारी जीव" असे संबोधिले जाते आणि त्या 'प्रतलावर' द्विमिती अयुक्लिडीय भूमिती आखली जाते.
अशाने काही गणिते सोपी होतात काय? त्या भूमितीचे सारे नियम तर मूळच्या त्रिमिती युक्लिडीय अवकाशाच्या नियमांवरूनच शोधावे लागतात!
इतिहास असा नाही
आणि सिद्धांतही असा नाही.
यूक्लिडची ऍक्सियमे "स्वयंस्पष्ट" मानली जातात. पण अगदी युक्लिडच्या काळापासून पॅरॅलल पॉस्च्युलेटबद्दल लोकांचे मन पटत नव्हते. स्वयंस्पष्टतेसाठी सोपा सुटसुटीतपणाचा जो काही मानसिक निकष असतो, त्यात युक्लिडची बाकी सगळी ऍक्सियमे बसतात. हे ऍक्सियम/पॉस्च्युलेट मात्र फारच ओबडधोबड-लांबलचक आहे.
गेली कित्येक शतके भूमितिज्ञ प्रयत्न करीत आहेत/होते की पॅरॅलल पॉस्च्युलेट ऍक्सियमांमधून काढून थियरमांमध्ये स्थापित करावे. (थियरम वाटेल तेवढे क्लिष्ट-लांबोडके असू शकतात. इतकेच काय अधिकाधिक डेरिव्हेशने करता क्लिष्ट थियरम मिळण्याची आपल्याला अपेक्षाच असते.)
थेट सिद्धता कोणाला जमेना. मग बर्याच जणांनी रेडुक्टियो पद्धत वापरून सिद्धता करायचा प्रयत्न केला. "एकही समांतर रेषा नाही", "बरोबर दोन समांतर रेषा आहेत" वगैरे पॉस्च्युलेट मुद्दामून घेतली, आणि त्यातून आदल्या सुटसुटीत स्वयंस्पष्ट पॉस्च्युलेटना छेद जाईल, आणि सिद्धता होईल, असा तो प्रयत्न होता. (युक्लिडिअयन भूमिती ऍक्सियमॅटिक असल्याकारणाने "उरलेल्या ऍक्सियमांशी बेबनाव" हाच "ऍब्सर्ड"चा अर्थ.) परंतु काही केल्या पहिल्या कुठल्या ऍक्सियमना छेद गेलेला नाही.
ऍक्सियम बदलले, की त्या फॉर्मल चिह्नासाठी डोळ्यांसमोर जे काय येत असे, त्याच्याशी मात्र बेबनाव येतो. पण याला ऍब्सर्ड म्हणता येत नाही. यूक्लिडच्या ऍक्सियमांमध्ये "मनःचक्षूंसमोर अमुक चित्र चितारा" असे काहीच नाही. आणि यूक्लिडनंतरच्या हजारो वर्षांत कुठलेच चित्र मनासमोर न आणता फॉर्मल तर्कशास्त्रीय गणिते करण्याचे कौशल्य कित्येक गणितज्ञांपाशी होते.
मुळात ज्या गणितज्ञांनी वेगळे पॅरॅलल-पॉस्च्युलेट मानून युक्लिडच्या इतका मोठा सिद्धांतांचा डोलारा कुठल्याही अंतर्गत विरोधाशिवाय बनवला होता, त्यांच्या डोळ्यासमोर खोगीर-वगैरे कुठलेही चित्र नव्हते. पुढे कोणालातरी डोळ्यांसमोर चित्र हवे होते, त्यांनी खोगिराचे चित्र डोळ्यासमोर आणले.
- - -
डोळ्यासमोरील चित्रांशी बेबनाव झाल्यास डोळ्यासमोरील चित्रे पुरती खोडून टाकायचा अनुभव आपणा सर्वांना शाळेपासून आहे. "सर्वात लहान असा एक पूर्णांक आहे" हे ऍक्सियम जोवर आहे, तोवर "पूर्णांक संख्या" म्हणताच डोळ्यासमोर दगड/फळे वगैरे पिंडांची गणना येते. ते ऍक्सियम खोडून टाकले, की डोळ्यांसमोर दगडांची चित्रे येणे कठिण जाते. मग आपण वेगळेच कुठले चित्र बनवतो - पण बनवलेच पाहिजे अशी गरज नाही, तर्कदुष्टता नाही इतके तपासले तरी पुरते. उदाहरणार्थ काही लोकांच्या डोळ्यांसमोर उधारीची प्रथा असलेला पैशांचा व्यवहार येतो.
नंतर त्या उधारीलाच "ही नाणी नामक पिंडांची उधारी आहे, म्हणजे शेवटी पिंडेच" म्हणून "हे आमचे अ-नॅचरल पूर्णांक सेट, आमचा याच्यावर भारी जीव" असे संबोधिले जाते आणि त्या 'पूर्णांक सेटवर' अ-नॅचरल अंकगणित आखले जाते.
कोणाचा यावर भारी जीव असला तर हरकत नाही, पण असे काही चित्र असायची गरज नाही. पैशाची उधारी नसलेल्या कित्येक वेगळ्या चित्रांत उणे-पूर्णांक चितारता येतात. किंवा कुठलेच चित्र मनात न आणता तर्कसंगत गणित करता येते.
- - -
तुम्ही गणीतीपद्धतीने योग्य असाल पण तरीही....!
श्री. चिंटू तुम्ही लिहीले होते,
रेशा कशी तयार होते? असा प्रश्न पडतो तेंव्हा उत्तर मिळते..बिंदूपासून. बिंदूला शक्ती मिळत गेली की त्या बिंदूंचे रेशेत रुपांतर होईल. परंतु हे झाले एका रेशेबद्दल. एका पेक्शा जास्त रेशा काढायच्या असतील तर आधी सुरवातीचे बिंदू नेमके एकमेकांपासून कुठे-कुठे असतील? हे विचारात घ्यावे लागेल. तुम्ही सांगितलेल्या उदाहरणात ते कुठे-कुठे घ्यायचे हे कळले कि मग अवकाश, प्रतल म्हणजे काय? ते कळू शकते.
दोन बिंदू एकमेकांपासून समांतर अंतरावर राहतील, व समान अंतर राखतच त्या बिंदूंपासून रेशा आखली जाईल, असे पाहील्या नंतर 'रेशे' पासून आधी एक कोन जन्माला येईल, कोनातून त्रीकोण जन्माला येईल, जन्माला आलेले दोन त्रीकोण एकमेकांमध्ये गुंफलेले असतील. परंतु एकमेकांपासून समांतर रहातील ही अट असल्यामुळे त्या असंख्य त्रीकोणातून वर्तुळ तयार होईल.
ते वर्तुळ असे असेल. (वेदिक तंत्रविद्येतून जे त्रिकोण दर्शविणारे चिन्ह निर्माण झाले ते आज सर्वदूर पसरले आहे.)
दोन समांतर त्रिकोणांचा अर्थ हाच होतो....
काहीही समजले नाही
एवढे फोटो टाकले आहेत म्हणजे महत्त्वाचे काही सांगायचे असावे. पण काहीच समजले नाही.
१. बिंदूला शक्ती मिळत गेली की त्या बिंदूंचे रेशेत रुपांतर होईल
कसली शक्ती हे समजले नाही.
२. दोन बिंदू एकमेकांपासून समांतर अंतरावर राहतील
बिंदू समांतर अंतरावर कसे काय राहतात? एकाच जागी असतील किंवा दूर असतील. समांतर बिंदू (आणि छेद देणारे बिंदू) ही कल्पना समजली नाही.
३. समान अंतर राखतच त्या बिंदूंपासून रेशा आखली जाईल, असे पाहील्या नंतर 'रेशे' पासून आधी एक कोन जन्माला येईल
समान अंतर राखत रेषा आखल्या तर समांतर रेषा बनतील. दोन समांतर रेषांमधून कोन कसा काय जन्माला येईल?
४. 'रेशे' पासून आधी एक कोन जन्माला येईल, कोनातून त्रीकोण जन्माला येईल, जन्माला आलेले दोन त्रीकोण एकमेकांमध्ये गुंफलेले असतील
सॉरी! हेही समजले नाही.
५. जन्माला आलेले दोन त्रीकोण एकमेकांमध्ये गुंफलेले असतील. परंतु एकमेकांपासून समांतर रहातील ही अट असल्यामुळे त्या असंख्य त्रीकोणातून वर्तुळ तयार होईल
समांतर त्रिकोण ही कल्पनाही समजली नाही. समांतर त्रिकोण एकमेकांना छेद देणारे असतात ही कल्पनाही इंटरेस्टिंग वाटली. आणि कसल्याही प्रकारच्या त्रिकोणातून (समभुजशिवाय कुठल्याही) वर्तुळ तयार होऊ शकते हेही रोचक वाटते.
६. वेदिक तंत्रविद्येतून जे त्रिकोण दर्शविणारे चिन्ह
वेदांत तंत्रविद्या आहे हे नव्याने ऐकले. अजून माहिती मिळेल काय?
७. दोन समांतर त्रिकोणांचा अर्थ हाच होतो...
एकमेकांत घुसलेल्या त्रिकोणांना समांतर त्रिकोण म्हणत असाल, आणि त्याचा सर्वात शेवटच्या फोटोशी संबंध लावत असाल, आणि त्याचा मी घेतला आहे "तोच" अर्थ असेल, तर मात्र मला शेवटचा फोटो समजला आहे असे नमूद करतो. फक्त त्याचे प्रयोजन समजले नाही!
(असमंजस) आळश्यांचा_राजा
तो प्रतिसाद चिंटूसाठी होता.
१. एका बिंदू पासून दुसरा बिंदू जन्माला यायचा असेल तर शक्ती हवी. किंवा एका स्थिर बिंदूला त्याच्या जागेपासून हलवून चलत्व द्यायचे असेल तर शक्ती ही हवी.
२.३.४.५. चिंटू यांचे प्रतिसाद आपण वाचले नाहीत कां? त्यांनी दोन बाजूंनी दोन वेगवेगळ्या रेशा काढात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आणून वर्तुळ तयार करायचे म्हटलेले आहे. बिंदू ह्या संकल्पनेतून रेशा ही संकल्पना जन्माला येते. दोन बिंदूमध्ये ठराविक अंतर असलेल्या समांतर रेशेपासून प्रथम 'एक रेशा हि संकल्पना' जन्माला येईल. अनेक समांतर रेशा आखल्यानंतर एक वेळ अशी येईल कि (स्तर बदलतो) तिथे 'कोन'ही संकल्पना' जन्माला येईल. अनेक कोन कसे व कधी येतील? हे ठरले कि (स्तर बदलतो) अनेक कोनांमधून एक 'त्रीकोण' ही संकल्पना (३डी) जन्माला येईल. दोन बिंदूंपासून तयार झालेल्या दोन वेगवेगळे त्रिकोण एकमेकांमध्ये गुंफलेले असतील. ही एक संकल्पना तयार झाली की (स्तर बदलतो) असंख्य त्रिकोणांमधून वर्तुळ ही संकल्पना जन्माला येईल. अनेक वर्तुळांपासून एक गोल तयार होईल.
चिंटूंनी आधीच एका गोलावर दोन रेशा आखल्या होत्या.
जमल्यास कागदावर चित्र काढून पहा. नंतर ते कातरीने कापून त्याला आकार देण्याचा प्रयत्न करा. एक त्रिकोण नकीच बनवता येईल.
शीव व पार्वती हि एक संकल्पना आहे. तंत्रविद्येत (चित्रात दाखवल्याप्रमाणे -) एक त्रिकोण शंकराचे प्रतीक आहे तर दुसरा त्रिकोण शक्तीचे-पार्वतीचे प्रतीक आहे. ह्या दोघांच्या मिलनातून 'गणेश' ही 'बुद्धीची देवता' ही संकल्पना जन्माला येते. म्हणजे 'रेशा, कोन, त्रीकोण, वर्तुळ व इथुन सगळा पसारा, व त्यांचे विभाग, स्तर कसे तयार होतात? हे जिथे समजते ते.
माफ करा
चिंटूसाठी असलेला प्रतिसाद नजरचुकीने वाचला गेला. केवळ चिंटू यांच्याच अवलोकनार्थ अशी टिप्पणी (असल्यास) बघण्यात आली नसल्याने गफलत झाली. असो.
चिंटू यांचे प्रतिसाद वाचले. अगोदरही वाचले होते. आत्ता परतही वाचले. ते नीट समजले. (अगोदरही नीट समजले होते.) आपण काय म्हणत आहात हे मात्र अजूनही समजले नाही. (मला समजायलाच हवे, आणि त्यादृष्टीने आपण कष्ट घेऊन मला ते समजाऊन सांगायला हवे असेही काही नाही म्हणा. पण मला समजलेले नाही हे खरेच आहे.)
इथे, "एक" समांतर रेषा ही संकल्पना मी प्रथमच ऐकत आहे. एखादी रेषा दुसर्या रेषेच्या सापेक्ष समांतर असते असे मी शाळेत शिकलो आहे. तेंव्हा, समांतर हा शब्द वापरताना किमान दोन रेषा असल्याच पाहिजेत.
स्तर म्हणजे प्रतल म्हणत असाल, तर एक कोन हा एकाच प्रतलात असतो. दोन प्रतले एकमेकांना छेद देत असतील, आणि त्यातून कोन निर्माण होत असेल, तरी तसला कोन पुन्हा एका प्रतलात असतोच. आता, एकाच प्रतलावर कितीही एकमेकांना समांतर रेषा काढल्या तरीही अशी वेळ केंव्हाही येणार नाही, की जिथे कोन ही संकल्पना जन्माला येईल. (वाकवलेले प्रतल असेल, तर अशी वेळ अगदी लगेच पण येऊ शकते, त्यासाठी 'अनेक' समांतर रेषा काढायची गरज नाही.)
तीन कोनांचा त्रिकोण बनतो, आणि तो २डी असतो. ३डी नसतो. वक्र रेषांचा त्रिकोण (उदा. पृथ्वीच्या पृष्ठभागावर) बनला, तर तो ३डी असू शकतो; म्हणजे त्याचे आकलन होण्यासाठी तिसर्या मितीची आवश्यकता पडते या अर्थाने. पिरॅमिड, शंकू, गोल या रचना ३डी आहेत. रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ या रचना २डी आहेत.
म्हणजे गणेश हे युक्लिडियन तसेच अयुक्लिडियन भूमितीचे प्रतीक म्हणायचे का? (बाय द वे, पौराणिक आख्यायिकांप्रमाणे गणेशाच्या निर्मीतीत शंकराचा कसलाही "हात" नाही! हत्तीचे डोके हे शंकराचे योगदान असले तरी ते त्याच्या शरीरातून काढून लावलेले नाही, बाहेरून आपले कापून आणले आणि लावले. आणि गणेशाचा भाऊ, कार्तिकाच्या निर्मीतीशी पार्वतीचा संबंध नाही! दोन्ही भाऊ प्रॅक्टिकली सिंगल पॅरेंटची अपत्ये आहेत. पॅरेंट म्हणजे, जनक अशा अर्थाने. त्यामुळे गणेश हा शंकर-पार्वतीच्या मीलनातून जन्माला आला याच्याशी असहमत!)
मला आपलं वाटत होतं की बिंदू, रेषा, प्रतल,इ. भौमितीय रचना या गणिती संकल्पना आहेत, आणि सुरुवातीच्या पातळीवर सुलभीकरण करून दृष्य स्वरुपात त्या आकृतीच्या साहाय्याने दाखवता येतात. किचकट होत गेल्या की तशा आकृतीच्या साहाय्याने दाखवता येत नाहीत. मुळात ३डी रचना देखील कागदावर चित्र काढून दाखवता येत नाही. परस्पेक्टिव्ह देऊन २डी चित्र काढून ३डी चा आभास करावा लागतो. ४डी तर काढताच येणार नाही. केवळ गणिताच्याच साहाय्याने समजाऊन घ्यावी लागणार.
थोडक्यात आपण काय म्हणता आहात, ते अजूनही समजले नाही. असो. काही हरकत नाही.
डिलिटेड
रिपीट झाला. काढला.
०
हे असले नको ते अध्यात्म घालूनच भारतीयानी सगळी शास्त्रे बाद करून टाकली.