अलविदा जगजीतसिंग!

जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी
लेखक: सुधीर काळे, जकार्ता

पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्याच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे.

त्यांचे गायन मी जवळ-जवळ १९७५-१९८० सालापासून सातत्याने ऐकत आलेलो आहे. मी त्यावेळी मुकुंद या पोलाद बनविणार्‍या प्रख्यात कंपनीत 'Kalwe Steel Plant Division'चा प्रमुख म्हणून काम करत होतो व आम्ही कंपनीच्या कळव्यातील कॉलनीत रहात असू. बाहेर जाणे फारसं व्हायचं नाहीं, गेलो तरी आठवड्यातून एकादे वेळी. त्यामुळे बर्‍याचदा घरी आलो कीं "दूरदर्शन-एक्के-दूरदर्शन" हाच पाढा असायचा आणि जे दाखविले जाईल ते आम्ही (मुकाट्याने) पहायचो. मला त्या काळात हिंदी सिनेसंगीत ऐकायची खूप आवड होती व माझी आवडती हिंदी गाणी टेप-प्लेयरवर ऐकणे हाही एक विरंगुळा असायचा.

मी जगजीत सिंग यांचे गायन सर्वप्रथम ऐकले ते दूरदर्शनच्या वाहिनीवरच. त्यावेळी ते नव्यानेच प्रसिद्धीस येऊ लागले होते. गझल हा काव्य (आणि गान)प्रकारही आजच्याइतका लोकप्रिय झाला नव्हता. उर्दू भाषा समजायची नाहीं. म्हणजे उर्दूतील बहुतांश क्रियापदांचे हिंदी क्रियापदांशी (व म्हणूनच संस्कृत क्रियापदांशी) बरेच साम्य असल्यामुळे गझल ऐकताना असे वाटायचे कीं आपल्याला अर्थ कळतोय् बरं कां, पण लक्ष देऊन ऐकल्यावर समजून यायचे कीं तो फक्त एक भासच होता. शिवाय सिनेसंगीताच्या मानाने गझलांच्या चालीत फारसे वैविध्यही नसायचे.
शेवटी अर्थही कळत नाहीं व संगीतही कांहींसे गंभीर धाटणीचे आणि चालींमध्ये फारसे वैविध्य नसलेले इत्यादी कारणांमुळे मी उर्दू गझलांपासून (आणि जगजीत सिंग यांच्या गायनापासून) तसा दूरच राहिलो.

पुढे मुकुंदमधील एका मुस्लिम सहकार्‍याला न समजलेल्या उर्दू शब्दांचा अर्थ विचारायचा सपाटा लावला. खरा अर्थ कळल्यावर "युरेका-युरेका"ची नशा यायची. पण असे किती दिवस चालणार? मग मी देवनागरीतील शब्दकोषाचा शोध सुरू केला. शब्दकोष खूप पाहिले पण त्यातले उर्दू शब्द उर्दू लिपीत असल्यामुळे त्या माझ्यासारख्याला उर्दू लिपी न येणार्‍याला उपयोगी नव्हत्या. शेवटी (मरहूम जरीना सानी) आणि डॉ. विनय वाईकर यांनी संकलित केलेल्या "आईना-ए-गझल" हा शब्दकोश हातात पडला आणि एकादे घबाड मिळावे तसा आनंद झाला[१].

त्यात शब्दार्थच आहे असे नाहीं तर त्या शब्दाचा उपयोग कसा करतात हे वाचकाला कळावे म्हणून जवळ-जवळ १०,००० अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण शेरही दिलेले आहेत. हा शब्दकोष घेतल्यावर मात्र गझलांचा अर्थ कळू लागला आणि गझला ऐकायची गोडी वाढू लागली आणि मग मात्र मी जगजीत सिंग यांच्या गायनाच्या पार प्रेमात पडलो व त्यांचे गायन जास्त-जास्त आवडू लागले.

त्यांच्या आवाजातला "दर्द" मला फार भावायचा. अर्थ कळायला लागल्यापासून त्यांच्या आवाजातली मिठ्ठास, आवाजातला दर्द, आधुनिक वाद्यवृंदाचा वापर (पूर्वी गझल गायकांच्या साथीला केवळ ’तबला-पेटी’च असायची, पण जगजीत सिंग आपल्या साथीला भारतीय आणि पाश्चात्य वाद्येही वापरायचे) या त्यांच्या गायकीतील सर्व बाबींपेक्षा मी त्यांच्या गझलांच्या "निवडी"च्या सर्वात जास्त प्रेमात पडलो. जगजीतसिंग यांच्या आवाजातला ’दर्द’ खूप आवडतो तर त्यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्या गायनाच्या बाबतीत त्यांचा आवाज व त्यांच्या गाण्यातला डौल, गाण्याची सहजता या बाबी मला खूप आवडतात.

हळू-हळू जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचे गायन ऐकण्याचा मला आणि सौ.ला छंदच लागला. अर्थ चांगला व चालीही कांहींशा सोप्या, मग आणखी काय हवे? आजही त्यांनी निवडलेल्या गझलांच्या अर्थानेच मी मंत्रमुग्ध होतो.

आता जगजीत सिंग यांच्या मी ऐकलेल्यापैकी मला आवडणार्‍या गझलांकडे वळतो. (बर्‍याच मी ऐकलेल्या नाहींत.)

बर्‍याचदा त्यांनी निवडलेल्या कांहींशा गंभीर गझलांमध्ये खट्याळ शेर यायचे व मजा वाटायची. ज्यांनी सईद राहींनी लिहिलेली त्यांची "कोई पास आया सवेरे सवेरे" ही गझल ऐकले आहे त्यांना तिच्या शेरात दोन्ही रस दिसतील.
"कहता था कल शब संभलना-संभलना,
वही लडखडाया सवेरे सवेरे"
असा कवीच्या मित्राबद्दलचा हा खट्याळ शेर संपतोय्-न संपतोय् तोच....
"कटी रात सारी मेरी मयकदेमें,
खुदा याद आया सवेरे सवेरे"
या ओळींचे गांभिर्य माझ्या हृदयाला स्पर्शून जाते.

तसेच "बडी हसीन रात थी" या गझलेतील
"मुझे पिला रहे थे वो कि खुदहि शम्मा बुझ गयी,
गिलास गुम, शराब गुम, बडी हसीन रात थी"
हा शेर आपल्याला प्रियकर-प्रेयसींच्या अंधारातील प्रेमचेष्टांचा मखमली स्पर्श जाणवून देतो तर त्यातलाच पुढचा शेर
"लबसे लब जो मिल गये, लबसे लबही सिल गये,
सवाल गुम, जवाब गुम, बडी हसीन रात थी"
हा शेर ऐकल्यावर प्रश्नोत्तरे "बंद" व्हायचे कारण लक्षात येऊन चेहर्‍यावर नक्कीच हास्य उमटते.

त्यांच्या "बाद मुद्दत उन्हे देखकर यूं लगा, जैसे बताब दिलको करार आ गया" या गझलेतील दुसर्‍या कडव्याचा अर्थ किती बहारदार आहे! दारूच्या प्याल्यात दारू ओतणार्‍या "साकी"ला "आज तेरी जरूरत नहीं" असे हा शायर कां सागत आहे? कारण बिन पिये बिन पिलाये, खुमार आलेला आहे!
"तिश्न नजरें मिली, शोख नजरोंसे जब,
मय बरसने लगी, जाम भरने लगे!
साकिया आज तेरी जरूरत नहीं
बिन पिये बिन पिलाये, खुमार आ गया!

"कल चौदहवी की रात थी, शब-भर रहा चर्चा तेरा.." ही गझल गुलाम अली आणि जगजीत अशी दोघांनी आपापल्या चालीत गायलेली आहे, पण मला तर जगजीत यांचीच चाल आवडते. तसेच दिलके दीवारों-दर पे क्या देखा" या गझलेत "तेरी आँखोंमें हम ने क्या देखा" असा प्रश्न करत ते "कभी कातिल कभी खुदा देखा" असे बहारदार उत्तर देतात, आणि शेवटी "फिर न आया खयाल जन्नत का, जब तेरे घर का रास्ता देखा" असेही प्रेयसीला सांगून मोकळे होतात! ही गझलही माझी खूप आवडती आहे.

आणखी एक सुंदर गझल आहे "होठोंसे छूलो तुम" आणि त्यातले शेवटचे कडवे तर लाजवाब आहे:
"जगने छीना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा,
सब जीता करे मुझसे, मैं हरदम ही हारा,
तू हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो"
असे आपल्या प्रेयसीला सांगत हा प्रियकर तिच्या प्रेमाची परिणामकारकपणे पण कारुण्यपूर्ण याचना करतो आहे.

त्याकाळी अदलीब शादानी यांची "देर लगी आनेमें तुमको, शुकर है फिरभी आये तो" ही गझलही माझी आवडती गझल होती. त्यातला हा शेर किती अर्थपूर्ण आहे:
शफक धनुक महताब घटायें तारे नगमें बिजली फूल
उस दामनमें क्या क्या कुछ है, वो दामन हाथमें आये तो...!
वा क्या बात है!!

त्यांनी संगीत दिलेल्या "अर्थ" या चित्रपटातील त्यांची "झुकी झु़की सी नजर..", "तुमको देखा तो ये खयाल आया" आणि "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" ही तीन गीते मला खूपच आवडतात.

मला त्यांची अतीशय खट्याळ असलेली (आणि म्हणूनच आवडती) गझल आहे अमीर मीनाई यांनी लिहिलेली "सरकती जाये है रुखसे नकाब आहिस्ता, आहिस्ता" ही! त्यात "आहिस्ता-आहिस्ता" हा "रदीफ" आहे. तरुण मंडळी अगदी आजही ही गझल तंद्रीत गातात. मला आवडते ते हे शेवटचे कडवे: शायर म्हणतो कीं माझी निर्दय प्रेयसी माझी मान निर्दयपणे कापत असली तरी मी तिला प्रेमाने म्हणतो की "बाई, काप पण जरा आहिस्ता-आहिस्ता"!
वो बेदर्दीसे सर काटे "अमीर" और मैं कहूं उनसे
हुजूर आहिस्ता-आहिस्ता, जनाब आहिस्ता-आहिस्ता"

त्यांच्या मला सर्वात जास्त आवडणार्‍या दोन गझला आहेत "ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो..." ही पहिली आणि सरफरोशमधील "होशवालों को खबर क्या" ही दुसरी.

त्यापैकी ’ये दौलत भी लेलो’मधील मक्ता (शेवटचा शेर) आहे माझा आवडता आहे:
कभी रेतकी ऊंचे कीलोंपे जाना, घरोंदे बनाना बनाके मिटाना,
वो मासूम चाहतकी तस्वीर अपनी, वो ख्वाबों-खिलौनोंकी जागीर अपनी,
न दुनियाका गम था न रिश्तोंके बंधन,
बडी खूबसूरत थी वो जिंदगानी"
हा शेर प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी आणते.

"होशवालोंको" ही गझल तर जगजीतजींच्या डोक्यावरील मुकुटच आहे! त्यातलाही मक्ता फारच हृदयाला भिडतो
"हम लबोंसे कह न पाये उनको हाल-ए-दिल कभी,
और वो समझे नहीं है खामोशी क्या चीज है"!
वाह वा क्या बात है!

जगजीत सिंग यांच्या गायनाची गोडी लावण्यात व उर्दू भाषेशी परिचय करून देण्यात सिंहाचा वाटा होता डॉ. विनय वाईकर आणि त्यांच्या "आईना-ए-गझल" या शब्दकोषाचा. म्हणून जगजीत सिंग गेल्यावर मला त्यांची खूप आठवण झाली आणि मी त्यांना नागपूरला फोन करून तसे सांगितलेही. त्यावेळी त्यांच्या सौ.नी (मीनाताईंनी) जगजीत सिंग यांच्या "जिंदादिली"च्या दोन हृद्य आठवणी सांगितल्या त्या इथे सांगायलाच हव्यात.

"आईना-ए-गझल"चे हस्तलिखित तयार झाल्यावर डॉक्टरसाहेब प्रकाशक शोधू लागले, पण त्यांनी संपादित केलेल्या या "रत्ना"ची त्यावेळी कुणाला पारखच झाली नसावी बहुदा. शेवटी त्यांनी हे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचे ठरविले. १९७८ साली त्याला ५०,००० रुपये खर्च येईल असा अंदाज होता व तेवढी रक्कम कशी उभी करायची असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. कुणी तरी त्यांना सांगितले कीं तुम्ही जगजीत सिंग यांना भेटा, त्याप्रमाणे हे दांपत्य त्यांना प्रत्यक्ष भेटले. जगजीत-जींनी ते हस्तलिखित पाहिले आणि एक पैसाही मानधन न घेता एक पूर्ण कार्यक्रम त्यांना दिला व त्यातूनच "अमित प्रकाशन"ची स्थापना झाली व "आईना-ए-गझल" प्रकाशित झाले.

सौ. मीनाताई दुसरी आठवण सांगत होत्या....! एकदा जगजीत सिंग छिंदवाडाला मेहफिल करून रात्री परत येत होते तेंव्हा वाटेत चहासाठी एका ठिकाणी थांबले. तिथे त्यांना एका ट्रक ड्रायव्हरने ओळखले. तो बिचकत-बिचकतच त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्या गायनाची मनापासून खूप तारीफ केली. एका आड जागी एका ट्रक ड्रायव्हरसारखा रसिक श्रोता भेटल्यामुळे सद्गदित झालेल्या जगजीत सिंग यांनी त्यांना छिंदवाड्याच्या कार्यक्रमात मिळालेली शाल त्या ट्रक ड्रायव्हरला पांघरली व हातात श्रीफळ ठेवले.

माझी खात्री आहे कीं त्या ट्रक ड्रायव्हरने ती शाल आजही त्यांची आठवण म्हणून जपली असणार!
अशा थोर गायकाला आणि जिंदादिल मनुष्याला भावपूर्वक आदरांजली! आज जगजीत सिंग यांच्या (आणि चित्राजींच्या) एका गाजलेल्या गझलेतील या ओळी ओठावर येतात.....

मिलकर जुदा हुए तो, न सोया करेंगे हम
इक दूसरेकी यादमें, रोया करेंगे हम.....
आँसू छलक छलक के, सतायेंगे रात भर
मोती पलक-पलकमें, पिरोया करेंगे हम.....
जब दूरियोंकी याद, दिलोंको जलायेगी
जिस्मोंको चाँदनीमें, भिगोया करेंगे हम.....
गर दे गया दगा हमें, तूफानभी 'कतिल'
साहिलपे कश्तियोंको, डुबोया करेंगे हम.....

अलविदा, जगजीत सिंग! तुम्ही तुमच्या गझलांच्या रूपाने अमर आहात!!
------------------------------------------------
टिपा:
[१] या शब्दकोशामुळेच मला मत्ला (गझलेचा पहिला शेर), मक्ता (गझलेचा शेवटचा शेर), रदीफ (गझलेच्या पहिल्या दोन्ही शेरात शेवटी येणारा आणि नंतरच्या शेरात दुसर्‍या ओळीत येणारा शब्दसमुदाय), काफिया वगैरे गोष्टी कळू लागल्या. गझलेतील कडव्यांना ’शेर’ म्हणतात हेही तिथेच कळले.

कांहीं शब्दांचे अर्थ: (१) तिश्न-तहानलेली, प्यासी (२) शोख-खट्याळ, नटखट (३) मय-मद्य (४) जाम-मद्याचा प्याला (५) खुमार-नशा (६) शफक-अरुणिमा, संधिप्रकाश (७) धनुक: इंद्रधनुष्य (८) महताब-चंद्र (९) घटा-ढग (११) जिस्म-शरीर (१२) साहिल-किनारा (१३) कश्ती-नाव

"गझल"चे अनेकवचन "गझलें" आहे (गझलियात हे अनेकवचनसुद्धा वापरतात). पण मी इथे त्याचे "गझला" असे मराठीकरण केले आहे.

Comments

श्रद्धांजली

आपला या क्षेत्राशी/ कलेशी जो काही संबंध आला त्याविषयी लिहून अतिशय समर्पक रीत्या वाहिलेली श्रद्धांजली भावली.

+१

+१ छान लेख.

त्यांची आपण नमूद केलेली व इतरही काही गाणी मला आवडतात, तरीदेखील त्यांच्या आवाजात चढ/उतार कमी असल्याने (मला तो वाटत असल्याने) काही गाण्यांमध्ये त्यांचा आवाज खूपच सपक वाटतो.

त्यांच्या आवाजाच्या रेंजला मर्यादा नक्कीच होत्या

मूकेश या थोर गायकाप्रमाणेच त्यांच्या आवाजाच्या rangeला मर्यादा नक्कीच होत्या. पण गझल गायकीत जो गुण सर्वात जास्त लागतो तो म्हणजे 'दर्द'! तो त्यांच्या आवाजात भरपूर असल्यामुळे त्यांचे गझल गायन मला फार भावायचे.
___________
जकार्तावाले काळे

अत्यंत सुरेख लेख

वा: सुधीर! जगजीतसिंगांच्या सगळ्या गझलांचा छान आढावा घेतला आहेस. काही थोर व्यक्ती जीवंत असतांनाच आधी नजरेआड जातात आणि ते जगाचा निरोप घेतात तेंव्हा त्यांची आठवण खोदून काढली जाते. जगजीतसिंग मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतांनाच अचानक त्यांना काळाने गाठले. त्यांचे निधन धक्कादायक होते. त्यांच्या गझलांविषयी तू जे लिहिले आहेस त्याचे बरेचसे श्रेय त्यांच्या शायरांना जाते असे वाटेल, पण जगजितसिंगांच्या पारखी नजरेने त्या गझला हेरल्या आणि आपल्या आवाजातून त्यांना लोकांपर्यंत पोचवल्या यामुळे त्या लोकप्रिय झाल्या असेसुद्धा म्हणता येईल. इतर (विशेषतः पाकिस्तानी) गझलगायकांच्या तुलनेत मला जगजीतसिंगांच्या गझलांमधील उर्दू शब्द (कोठल्याही शब्दकोषाचा आधार न घेता) समजायला सोपे वाटतात. तू उल्लेख केलेल्या बहुतेक गझलांचे अर्थ मला कळले होते असे त्या ऐकतांनाच वाटले होते.
त्यांच्या एका गझलेत म्हंटल्या प्रमाणे रूठकर हमसे कहीं जब चले जाओगे तुम| ये ना सोचा था कभी इतने याद आओगे तुम||
(आआठवणीतून लिहिले असल्यामुळे चूभूद्याघ्या)

गाताना केले जाणारे उच्चार

माझ्या लेखातही जगजीतसिंगांच्या गझलांच्या 'निवडी'बद्दलच त्यांचे मी कौतुक केले आहे.
आणखी एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी जी राहून गेली. गुलाम अलीसारखे उच्च दर्जाचे गायक गातात तेंव्हां त्यांचे उच्चार कधी कधी कळत नाहींत. पण जगजीत सिंग, पंकज उधास व अनुप जलोटा यांच्यासारख्या भारतीय गायकांच्याबाबतीत मात्र, त्यांची जीभ 'हलकी' असल्यामुळे असेल पण, उच्चार नीट ऐकू येतात व त्यामुळे कळतात.
___________
जकार्तावाले काळे

मस्त!

गझलातील अजिबात काहीही समजत नसतानाही आमच्यासारख्या बर्‍याच जणांना त्यांचे गायन बांधून ठेवी.

एक् गायक ह्याशिवाय एक स्पष्टवक्ता म्हणूनही किंवा स्पष्ट मते असणारी व्यक्तीही ते आहेत. पाकिस्तानमधील गायक बोलावून गाउन घेण्यापेक्षा इथल्या भारतीय टँलंटलाच अधिकाधिक संधी द्यावी हे ते जाहीररित्या सांगत. जर भारतीय संगीत आणि कलेवर त्या देशात बंदी आहे, तर इथूनही तसेच उत्तर जावे हे थेट सांगण्यास त्यांनी संकोच केला नाही.
जनसामान्यांच्या भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवत. (विद्वानांच्या भाषेत populist )इथे स्फोट करणारे पाकिस्तानी असतील् तर पाकिस्तान ह्ज्या देशाशी राजनैतिकच काय् किंवा कलाक्षेत्रातील काय संबंध कशाला हवेत ही त्यांची साधी सरळ विचारणा होती.ह्या गोष्टी आज कलाकार म्हणवल्या जाणार्‍या बहुतांश लोकांत दिसत नसताना त्या त्यांच्या ठायी उठून दिसतात.
कलाकार म्हणून मान देताना ह्याही गोष्टींबद्दल आठवण आली इतकेच.

--मनोबा

छान !

लेख आवडला. थोडा उशीरा प्रकाशित झाला असेही वाटले.
जगजितसिंग यांनी भजने किंवा भावगीतेही म्हटली असली तरी त्यांचे प्रमुख योगदान गझलेच्याच संदर्भात आहे, किंबहुना गझल-गायन क्षेत्रातली त्यांची मुद्रा कधीही पुसली जाणार नाही असे मला वाटते.

काही गोष्टी-
१)त्यांच्या मला सर्वात जास्त आवडणार्‍या दोन गझला आहेत "ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो..."

'ये दौलत भी ले लो' ही गझल नाही. 'नज्म' म्हणता येईल. अशीच आणखी एक गाजलेली, माझी आवडती नज्म म्हणजे- "बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी."
"कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यों है" ही कैफी आजमी लिखित नज्मही अशीच अजरामर आहे.

२)मक्ता (गझलेचा शेवटचा शेर)
प्रत्येक गझलेचा शेवटचा शेर मक्ता नसतो. ज्या शेवटच्या शेरात शायराचे नाव गुंफलेले असते, (ज्याला 'तखल्लुस' म्हणतात) त्याच शेरास 'मक्ता' म्हटले जाते.

उदा.
"कहां मैखाने का दरवाजा 'गालिब' और कहा वाईज,
पर इतना जानते है कल वो जाता था, के हम निकले
"

----------------------------------------------------------

मनोबाने जगजित यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल जे म्हटले, त्याचे आणखी एक उदाहरण.
'स्लमडॉग मिलेनीअर' जोरात होता तो काळ. आठ ऑस्कर मिळाले होते, सगळीकडे कौतुक सुरू होते. तेव्हा 'जय हो' हे एक सामान्य गाणे असल्याचे जगजित जाहीरपणे म्हणाले होते.

पण माझा लेख जगजीतसिंग यांच्या गाण्याबद्दल आहे.....!

मक्ताबद्दल मलाही हीच शंका आली. डॉ. विनय वाईकरांच्या 'आईना-ए-गझल'मध्ये तखल्लुसचा उल्लेख आहे, पण तो परिच्छेद वाचून माझा असा ग्रह झाला कीं मक्ता हा मक्ताच असतो मग त्यात शायरचे नाव असो वा नसो. त्यात 'तखल्लुस'चा संबंध नाहीं. पण यातले माझे ज्ञान अपुरे असल्यामुळे मी हा प्रश्न जाणकार या नात्याने डॉ.साहेबांना विचारला. ते म्हणाले की शेवटचा शेर नेहमीच 'मक्ता' असतो, मग त्यात शायरचे नांव असो वा नसो.
डॉ.साहेबांची चूक झाली नसावी! कारण त्यांचे म्हणणे मला नीट कळले आहे ना हे नक्की करण्यासाठी जेंव्हां मी सौ मीनाताईंशी बोलत होतो तेंव्हां त्यांच्याकरवी पुन्हा विचारवले. उत्तर ठामपणे तेच मिळाले.
I rest my case.....!
गझल व नग्ममधील बारीक फरक मला कळत नाहीं. इथे तुमचे बरोबर असू शकेल.
___________
जकार्तावाले काळे

छान् माहिती.....

मला वाटते नज्म़ म्हणजे जिला यमक आहे ती. ग़झलेला यमक हरेक ओळिला असेलच असे नाही.
उदा:- ऩज्म च्या ओळिंत आयी, अंगडाई,परछाई असे यमकातले शब्द हरेक ओळित किंवा alternate ओळिंत असतात.

अवांतर १ :- ऩज्म आणि ग़झल ह्यांना योग्य ठिकाणी नुक्ता मी दिलाय का?
अवांतर २ :- सदर प्रतिसाद ऐकीव व अंदाजाच्या माहितीनुसार दिलेला आहे.

--मनोबा

प्रतिसाद

१) तुमचा लेख जगजित यांच्या गाण्याबद्दल आहे याची मला कल्पना आहे, कारण मी तो वाचला आहे. खटकलेल्या गोष्टी / चुकीची माहिती दुरूस्त करण्यात काही वावगे नाही असे मला वाटले. यावर आणखीही लिहिता येईल पण तुम्हाला ते नीटपिकिंग वाटत आहे असे दिसते, त्यामुळे थांबतो.

२) मक्त्याबद्दल माझेही मत ठाम आहे. त्यामुळे वाईकरांचे मत पटले नाही एवढे नोंदवून आय टू रेस्ट माय केस.

गझल/नज्म बद्दल-

गझल दोन दोन ओळींच्या रचनेत असते, ज्याला शेर म्हणतात. पहिल्या शेरात(ज्याला मतला म्हणतात) दोन्ही ओळीत यमक असते (ज्याला काफिया म्हणतात) आणि शेवटी एक सारखे अंत्ययमक असते (ज्याला रदीफ म्हणतात.) रदीफ असणे अनिवार्य नाही, तो नसूही शकतो. त्यानंतर प्रत्येक दुसर्‍या ओळीत यमक जुळवेलेले असते. सर्व ओळींचे वृत्त सारखेच असते.
गझल हा असा बांधीव प्रकार आहे. याउलट नज्म म्हणजे मोकळा, सैलसर काहीसा आपल्या मुक्तछंदासारखा काव्यप्रकार आहे. यमकांची, ओळींची किंवा मात्रांची बंधने नसतात, आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच विषय उलगडत नेलेला असतो. (गझलेत प्रत्येक शेर स्वतंत्र असतो, त्यामुळे प्रत्येक शेरात वेगळा विषय असू शकतो.)

छान लेख

जगजीत सिंह ह्यांना श्रद्धांजली. कॉलेजच्या दिवसांमधे ह्यांच्या गझला ऐकायला फार आवडायचे, नंतर थोडे एकसुरी वाटू लागले होते. पण ह्यांच्या आवाजाने खूप आनंद दिला आहे हे निश्चित!

जगजीतसिंग

जगजीतसिंग यांच्या गजला मला आवडतात. गुलजार यांच्या 'मिर्जा गालिब' या मालिकेला जगजीतसिंग यांनी दिलेले संगीत हा एक चिरंतन आनंदाचा ठेवा आहे.
सन्जोप राव

ज्ञानेश-जी, गैरसमज नसावा!

ज्ञानेश-जी,
गैरसमज होतोय् असे वाटते. मला स्वतःला 'गझल' या प्रकाराबद्दल टेक्निकल माहिती नाहीं. मी फक्त 'कानसेन' आहे. (म्हणूनच सुरुवातीला "संगीताच्या, काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच" असे मी लिहिले आहे.) मी इथे "आईना-ए-गझल"मधील हे वाक्य शब्दशः उधृत करत आहे. हे वाक्य वाचल्यावर मला असे वाटले कीं शायरच्या स्वतःचे नाव टाकण्याच्या कृतीला 'तखल्लुस' म्हणतात कीं अशा शेवटच्या कडव्याला (शेराला). म्हणूनच मी डॉ. आणि सौ. वाईकरांना विचारले. ते वाक्य असे:
"गझल का पहला शेर मक्ता कहलाता है और आखिरी शेर, जिसमें शायर का नाम अथवा 'तखल्लुस' होता है, उसे मक्ता कहते हैं|"
पण याबद्दल मला ज्ञान नाहीं म्हणूनच मला कांहींही ठाम मत नाहीं. त्या संदर्भात मी लिहिले कीं मी जगजीतजींच्या गाण्याबद्दल हा लेख लिहिला आहे.
लिहिण्यात चूक होऊ नये म्हणून मी शक्य तितके प्रयत्न करतो. 'गझल' या शब्दाच्या अनेकवचनाबद्दलही असाच गोंधळ माझ्या मनात होता. तो दूर करण्यासाठी इथल्या एका पाकिस्तानी गृहस्थांना (ज्यांची माझी थोडीशी ओळख आहे) विचारले. तेही गोंधळले. शेवटी मी त्यांच्या मातोश्रींशी बोललो (त्या जकार्तालाच मुलाकडे असतात आणि बहुदा माझ्या वयोगटातल्या असाव्यात). त्यांनी सांगितले कीं 'गझलें' आणि 'गझलियात' ही दोन्ही रूपें बरोबर आहेत, पण मी जो लेख लिहिला आहे त्या संदर्भात गझलें हे जास्त योग्य वाटते.
गझल या काव्यप्रकाराबद्दल आपल्याला खूप माहिती आहे असे दिसते. तरी माझी आपल्याला विनंती आहे कीं या विषयावर आपण जरूर लेख लिहावा. हे वेळही त्यासाठी चांगली आहे. माझ्यासारख्या अनभिज्ञ लोकांचे या आवडल्या विषयावरचे ज्ञान अशा लेखामुळे वाढेल. तरी मी आपल्याला अशी आग्रहपूर्वक विनंती करतो. गैरसमज नसावा हे पुन्हा नमूद करतो.
___________
जकार्तावाले काळे

'रदीफ' आणि 'काफिया'

ज्ञानेश-जी, आपला ई-मेल कळवलात तर मी आपल्याला या पुस्तकातली कांही माहिती scan करून पाठवू इच्छितो. कारण 'रदीफ' आणि 'काफिया' याबाबतही आपण लिहिलेल्या आणि "आईना-ए-गझल"मधल्या व्याख्येत थोडा फरक असावा असे वाटते. माझा ई-मेल आहे sbkay@hotmail.com
धन्यवाद
___________
जकार्तावाले काळे

दोन पाने स्कॅन करून पाठविली आहेत. जर नीट दिसली नाहींत तर सांगा

आज सकाळी मी आपल्याला दोन पाने स्कॅन करून पाठविली आहेत. जर नीट दिसली नाहींत तर सांगा म्हणजे जास्त 'पीपीआय'ला स्कॅन करून पाठवेन. मला १२५% ला छान दिसताहेत.
___________
जकार्तावाले काळे

मस्त झालाय लेख.

मस्त झालाय लेख.
जगजित सिंगांच्या अनेक उत्तमोत्तम गझलांचा संग्रह या (दु:खद) निमित्ताने जालावर (टोरेंट) दिसत आहे.

तसेही (अराजकीय विषयांवरचे ;) ) श्री काळे यांचे अकृत्रिम लेखन मला आवडतेच. राजकीय लेखन आवडत असले तरी त्यातील मते मात्र बर्‍याचदा पटत नाहि हे श्री काळे यांना देखील एवाना माहित झाले असेल :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

धन्यवाद, ऋषिकेश-जी

धन्यवाद, ऋषिकेश-जी. आपल्यातले (राजकीय) मतभेद मला माहीत आहेत, पण तरीही आपल्यातली 'चाहत' दृढ आहे.
'अराजकीय' वरून 'अराजक' हा (भलत्याच अर्थाचा) शब्द लक्षात येऊन गंमत वाटली.....!
___________
जकार्तावाले काळे

"आईना-ए-गझल" कुठे मिळेल?

बर्‍याच लोकांनी "आईना-ए-गझल" कुठे मिळेल याबद्दल 'व्यनि'वर चौकशी केली. त्यामुळे वैयक्तिकरीत्या न लिहिता इथे लिहीत आहे. "आईना-ए-गझल"चे प्रकाशक आहेत:

श्री प्रसन्न मुजुमदार
श्री मंगेश प्रकाशन,
श्री शांतादुर्गा निवास, २३ रामदास पेठ, "तरुण भारत प्रेस" जवळ, नागपूर ४४० ०१०फोन: (०७१२) २५३७२७६

पुस्तक त्यांच्याकडे मिळेल कीं नाहीं हे माहीत नाहीं. माझ्याकडे असलेल्या प्रतीवर हा पत्ता लिहिलेला आहे.
___________
जकार्तावाले काळे

 
^ वर