तीन आठवणी

तीन आठवणी

आपणा सर्वांना आपल्या लहानपणापासूनच्या खूप आठवणी असतात पण त्यापैकी काही त्या लहान अजाणत्या वयातहि मनावर खोल ठसा उमटवतात कारण त्यामागचे प्रसंग काही स्वतःचे वैशिष्टय असलेले आहेत ह्याची कोठेतरी जाणीव असते. असेच माझ्या स्मृतीतील हे तीन प्रसंग.

१५ ऑगस्ट १९४७.

पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मी पावणेपाच वर्षांचा होतो. सातार्‍यात मनुताई अभ्यंकर ह्यांनी नुकतीच गावातील पहिली माँटेसोरी शाळा सुरू केली होती आणि तिचा मी पहिल्या दिवसापासूनचा विद्यार्थी होतो. इंग्रजी राज्य, स्वातन्त्र्य असा कशाचाच अर्थ मला माहीत नव्हता. (नाही म्हणायला माझ्या आतेभावाने केव्हातरी वापरलेला 'टॉमीज' हा शब्दा मी ऐकलेला होता आणि माझ्या आठवणीतहि राहिलेला होता. सातारच्या हजेरीमाळावर एक जळून काळेठिक्कर पडलेले एक विमान बघण्यास आम्ही गेलो होतो असेहि मला आठवते.)

आमची शाळा सातारच्या कन्याशाळेच्याच आवारात अगदी मागे एका लांब खोलीत भरत असे. १५ ऑगस्टला आम्हा सर्वांना शाळेत आणून खोलीबाहेरच्या मोकळया मैदानात १०-१२ फूट उंच बांबूवर झेंडा फडकविण्यात आला. नंतर आम्ही सर्वजण खोलीत इकडेतिकडे खेळत असतांना एका खोक्यावरून उडी मारताना मला एक खिळा लागून गुढघ्यातून रक्त येऊ लागले आणि मी भोकाड पसरले. माझी आत्या तेव्हा कन्याशाळेतच शिकत होती. तिला बोलावून माझी घरी रवानगी करण्यात आली. गोड शिरा प्रसाद म्हणून केला होता तो मी जाण्यापूर्वी खाल्ला आणि तिरंगी झेंडयाचा रुपयाच्या आकाराचा बिल्ला घेऊन घरी गेलो अशी मला ह्या दिवसाची स्पष्ट आठवण आहे.

गांधीहत्या आणि जळित.

त्यानंतर ५ महिन्यातलाच हा पुढचा प्रसंग.

आमचे शंभर वर्षांचे जुने घर साता‍र्‍याच्या शुक्रवार पेठेत होते. हा भाग जवळजवळ पूर्णपणे ब्राह्मणेतर जातीतील घरांचा होता. आम्ही आणि अजून तीनच ब्राह्मण घरे पेठेत होती. आमचे पेठेत सर्वांशी उत्तम घरोब्याचे संबंध होते. आमचे सर्व खेळगडी आसपासच्या घरातील होते. माझ्या आजोबांना एक जुने वृद्ध गृहस्थ म्हणून पेठेत मान होता, आमचे शेजारी अनेक बाबीत त्यांना सल्ला विचारीत असत आणि आसपासची त्यांच्या वयाची जुनी मंडळी पुष्कळ वेळा शिळोप्य़ाच्या गप्पा करण्यासाठी आमच्या ओसरीवर बसत असत. आमचा हिंदुमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे राजकारण ह्यांच्याशी काही संबंध नव्हता. माझे आजोबा हे महादेव गोविंद रानडे ह्यांचे समजूतदार आणि समावेशक विचार मानणारे होते.

३० जानेवारी ह्या दिवशी महात्मा गांधींवर नथुरामने गोळया झाडल्या आणि एकदोन दिवसातच महाराष्ट्रात ऐतिहासिक काळापासून खदखदत असलेला ब्राह्मण-अब्राह्मण वाद अनपेक्षित रीत्या वर उफाळून आला. ह्या हत्येबाबत सर्व ब्राह्मण समाजाला उत्तरदायी मानून त्यांची घरे जाळण्यासाठी ही उत्तम सबब आहे आहे काही समाजकंटकांनी ठरविले.

घटनेनंतर एकदोन दिवसातच ब्राह्मणांची घरे जाळण्याची लाट महाराष्ट्रात - विशेषत: दक्षिणेकडील जिल्ह्यात - सुरू झाली. आमचे घरहि त्या लाटेत सापडले. ३० जानेवारीनंतर एकदोन दिवसात दुपारी एकच्या सुमारास माझ्या आ़ईने जेवणाची पाने घेतली होती. माझ्या आजोबांचे धाकटे भाऊ चिंतामणराव कोल्हटकर त्या समयी आमचे घरी आले होते. तेव्हा ते पुण्यास राहात असत. माझे वडील व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी गेले होते. जेवायला बसणार एव्हढयात ४०-५० जणांचा एक जथा आमच्या घरात शिरला आणि घारातील सर्वांनी बाहेर पडावे कारण घर जाळण्यात येणार आहे असे त्यांनी आजोबांना सांगितले. विरोध करण्याता काहीच अर्थ नव्हता. कोणास मारहाण, दुखापत वा शारीरिक इजा होऊ नये होऊ नये म्हणून आजोबांनी सर्वांना बाहेर काढले आणि आमच्या घरासमोरच्या पवारांच्या घराच्या पायरीवर ते स्वतः जाऊन बसले. मी थोडा मागे रेंगाळलो होतो. झुंडीपैकी एका माणसाने खर्‍या मायेच्या शब्दात 'बाळ, बाहेर जा, नाहीतर तुला लागेल' असे मला सांगितले असे स्पष्ट आठवते. त्यावेळेस तो त्याच्याबरोबरच्या अन्य गुंडांबरोबर आमच्या फर्निचरची मोडतोड करण्याच्या कार्यात मग्न होता.

आमच्या घराच्याच निम्म्या भागात आमचा जुना छापखान्याचा चालू व्यवसाय होता. तेथे भरपूर कागद आणि कटिंग मशीनचे कचरण पडलेले होते. जमावाने त्याचे बोळे केले आणि त्यांवर रॉकेल टाकून ते बोळे घराच्या लाकडी आढयात टाकले. त्यामुळे घराचा लाकडी सांगाडा पेटू लागला. छपाईची यन्त्रे तोडणे वा त्यांची नासधूस करणे, छापखान्यातील टाईप जमिनीवर ओतून टाकून त्याची पै करणे, असेहि विध्वंसक प्रकार जमावाने सुरू केले. (एकमेकात मिसळलेल्या आणि त्यामुळे निरुपयोगी ठरलेल्या टाइपाला पै म्हणत असत.)

२०-२५ मिनिटे हा धुमाकूळ चालू असता अचानक पोलिस आल्याची आवई उठली. ती वस्तुत: खोटी होती. आमच्या शेजार्‍यांपैकी कोणीतरी ती वावडी उडवली होती पण तिला घाबरून जमाव जसा आला तसाच दोन मिनिटात तेथून नाहीसा झाला.

आमचे शेजारी त्वरित जमा झाले आणि साखळी करून त्यांनी जवळच्या ओढयातून पाणी आणून लागलेली आग हळूहळू विझवली. मुख्य प्रसंग संपला. आम्हाला कसलीच शारीरिक इजा झाली नाही पण आर्थिक नुकसान खूप झाले. एक-दोन दिवसांनंतर तेव्हाचे एक मंत्री गणपतराव तपासे आमच्याकडे पाहणीसाठी आले होते. सरकारातून यथाकाल कही रक्कम मदत म्हणून आणि काही कर्ज म्हणून मिळाली. वडील हप्त्याहप्त्याने कर्ज फेडीत असतांनाच द्वैभाषिक आले आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. माझ्या तेव्हाच्या आठवणीनुसार नव्या सरकारने जे अगदी पहिलेपहिले काही निर्णय घेतले त्यांमध्ये जळित कर्जाची बाकी माफ करण्याचा निर्णय होता. यशवंतरावांचे बेरजेचे राजकारण असे होते.

आमच्या घरापैकी छापखान्याची बाजू पुष्कळच जळली होती आणि ती बरीचशी नव्याने बांधावी लागली. निम्मी घराची बाजू त्यामानाने ठीक होती. तरीहि ह्या प्रसंगाची आठवण म्हणून आगीची धग लागलेल्या तुळया अखेरपर्यंत तेथे होत्या.

ह्या गंभीर प्रसंगाला असलेली एक विनोदी झालरहि आठवते. युद्धानंतरचे ते दिवस रेशनिंगचे होते आणि आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' -ज्याला लोक विनोदाने 'मेलो मेलो' म्हणत - नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे आणि त्याच्या बेचव भाकर्‍या हे आमचे मुख्य खाणे असे. ते मला बिलकुल आवडत नसे. मला आवडायच्या त्या गव्हाच्या पोळया, ज्या आमच्या वाटयाला कधीमधीच यायच्या.

घर जळल्यानंतर आम्हां मुलांना काही दिवस दुसरीकडे ठेवण्याचे ठरले. आमच्याच पेठेत आगटे नावाचे कुटुंब होते. त्यांच्याकडे जमावाची दृष्टि वळली नव्हती. जळिताच्या दिवशी त्यांच्याकडे आमची पाठवणी करण्याचे ठरले. ह्या बातमीमुळे मला मनातून बर्‍यापैकी आनंद झाला कारण आगटयांकडे नेहमी पोळया असतात अशी माझी बालबुद्धीची समज होती आणि त्यामुळे आज आपण जेवायला पोळया खाणार ही समजूत माझ्या उल्हसित मनोवृत्तीचे कारण होती. ह्यातली irony मला तेव्हाच जाणवली असली पाहिजे कारण तीमुळेच माझा हा बालिश आनंद माझ्या स्मृतीत टिकून राहिला आहे.

मादाम माँटेसोरी.

ह्या जगविख्यात बाईंशी प्रत्यक्ष बोलण्याचे भाग्य मला मिळले आहे अशी माझी समजूत आहे. प्रसंग असा.

अशी मला एक आठवण आहे की माँटेसोरी शाळेत एक दिवशी आमच्या बाई मनुताई ह्या एका उंच, गोर्‍या आणि मेमसाहेबासारख्या वेषातल्या बाईंना घेऊन आल्या होत्या. आम्ही सर्व मुले भिंतीपाशी रांगेने बसलो होतो. आमच्या शिस्तीनुसार वर्गात शिरण्यापूर्वी चपला-बूट बाहेर काढायची पद्धत होती. गोर्‍या बाई बुटासकट आत आल्याचे पाहून मी त्यांना मराठीत सांगितले, 'बूट बाहेर काढून या, नाहीतर मनुताई रागावतील.' मुलगा काय म्हणतो आहे असे बाईनी विचारले आणि जेव्हा त्यांना हे इंग्लिशमध्ये सांगण्यात आले तेव्हा त्या हसून बाहेर गेल्या आणि बूट उतरवून आत आल्या. हा प्रसंग एखाद्या चित्रासारखा माझ्या आठवणीत टिकून राहिला आहे.

ह्या बाई कोण हे सांगणारे मात्र नंतर कोणीच मला भेटलेले नाही. अलीकडेच कर्मधर्मसंयोगाने मला ह्या कोडयाच्या उत्तराचा धागा सापडला तो असा. इंटरनेटवर चाळताचाळ्ता केवळ अपघातानेच मला एके ठिकाणी मादाम मोंटेसोरींची थोडी माहिती दिसली. आपल्या माँटेसोरी चळवळीच्या प्रसारासाठी १९३९ साली थिऑसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून त्या हिंदुस्तानात आल्या होत्या. तेव्हाच दुसरे महायुद्ध सुरू झाले. माँटेसोरी ह्या नागरिकत्वाने इटालियन. त्यांचे मुसोलिनी सरकारशी पटत नव्हते म्हणून त्या हॉलंडमध्ये राहात असत. तरीहि त्या इटालियन असल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना परतीच्या प्रवासाची परवानगी नाकारली. तदनंतर युद्धाची सर्व वर्षे त्यांनी कोडाईकनाल येथे काढली. त्यांना अन्य कोणताच त्रास झाला नाही. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्थान लक्षात घेऊन स्वत: वॉइसरॉय त्यांची ख्यालीखुशाली मधूनमधून विचारीत असे. कोडाईकनालमध्ये असतांना बाईंनी अनेक हिंदुस्तानी तरुणींना आपल्या माँटेसोरी पद्धतीचे शिक्षण दिले होते. आमच्या मनुताई त्यांपैकीच एक होत्या आणि ते शिक्षण घेऊन आल्यावर सातार्‍यात त्यांनी स्वतःची माँटेसोरी शाळा सुरू केली होती.

युद्धानंतर माँटेसोरीबाई युरोपात परतल्या पण ४६-४७ साली त्या पुनः हिंदुस्तानात आल्या होत्या. एव्हढे समजल्यावर मी येथील लायब्ररीमधून त्यांचे एक चरित्र आणले आणि त्यात मला असा उल्लेख सापडला की भारतातील ह्या दुसर्‍या मुक्कामात त्यांनी पुण्यास भेट दिली होती.

आता चित्र मला स्पष्ट झाले. सातारा-पुणे अंतर केवळ ६९ मैल आहे आणि खाजगी गाडीने दोन-अडीच तासात सहज पार करता येत असे. (त्याच सुमारास एस.टी. नव्यानेच सुरू झाली आणि एस.टी. गाडया सर्व थांबे घेऊनहि हे अंतर ३ तासात करीत असत हे मला चांगले आठवते.) आपल्याच एका विद्यार्थिनीने (म्हणजे मनुताई) सुरू केलेली माँटेसोरी शाळा पाहण्यासाठी माँटेसोरीबाई एका दिवसाच्या धावत्या दौर्‍यावर सातार्‍याला आल्या असणार आणि त्यामुळे वर्गात येण्यापूर्वी बूट बाहेर ठेवावे हा अमूल्य सल्ला त्यांना माझ्यापासून मिळाला असणार!

आता माझा नातू असाच एका माँटेसोरी शाळेमध्ये जातो. एकदा त्याच्या शाळेत त्याला आणायला मी गेलो असता हॉलमध्ये बाईंचा फोटो पाहिला. प्रिन्सिपॉलना मी माझी ही गोष्ट सांगितली. ती ऐकून ते इतके आनंदित झाले की त्यांनी तो मजकडून लिहवून घेतली आणि माँटेसोरी चळवळीच्या एका मासिकात छापवून आणली!

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

साध्या शब्दांत प्रसंग डोळ्यासमोर उभे केले आहेत. दुसर्‍या प्रसंगातील आक्रस्ताळेपणाच्या अभावाची विशेष नोंद कराविशी वाटते.

____________
वाचण्यासारखे काही

+1

सुंदर लेखन

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

हृद्य

हृद्य आणि साध्या सरळ शब्दातल्या आठवणी भावल्या.

पहिला किस्सा स्वातंत्र्याचा . त्या एका दिवसाने अशाच लाखो आठवणी लाखो लोकांच्या मनात साठल्या असणार.

दुसर्‍या प्रसंगातली 'बाळ, बाहेर जा, नाहीतर तुला लागेल' असे मला सांगितले असे स्पष्ट आठवते. त्यावेळेस तो त्याच्याबरोबरच्या अन्य गुंडांबरोबर आमच्या फर्निचरची मोडतोड करण्याच्या कार्यात मग्न होता. ही ओळ पुन्हापुन्हा वाचूनही मानवी मनास नक्की काय म्हणावे ते समजले नाही.
अशाच आठवणी श्री ज जोशींच्या लिखाणात फार फार पूर्वी, फारसे काही समजत नसताना वाचल्याचे स्मरते. ब्राह्मण-अब्राह्मण वाद् आणि सामान्यांवर त्याचे पडसाद असे काहीसे ते होते.

तिसरा किस्सा माँटेसरीचा. नुकतेच स्टीव् जॉब्ज ह्यांचे स्टॅनफोर्ड् मधील भाषण पुन्हा वाचण्यात आले आहे. त्यातले connecting the dots हे वेगळ्या अर्थाने आपल्याबद्दल्, काही दशकांच्या प्रवासाने सिद्ध झाल्याचे दिसते.

--मनोबा

+१

अगदी असेच म्हणतो.
स्मृतींच्या माध्यमातून उलगडणारा इतिहासाचा पट फार आवडला. असेच लिखाण आणखी येऊ द्या.

अजून एक...

अजून एक गोष्ट आठवली ती म्हणजे आमच्या इथल्या हौशी/निमव्यावसायिक रंगभूमीवर वीसेक वर्षांपूर्वी "वाडा चिरेबंदी" ह्या नाटकाच्या बर्‍याच तालमी बघायला जायचो. त्यातही एलकुंचवारांनी हाच(ग्रामीण भागात ३० जानेवारी १९४८ नंतरची परिस्थिती आणि म्हातार्‍या जोडप्याने त्याही स्थितीत त्याच घरात रहायचा घेतलेला निर्णय.) विषय मांडलाय. कुणी ते नाटक पाहिलय का?

दुसरी गोष्ट म्हणजे "राहिले दूर घर माझे" मध्ये एक हिंदु स्त्री पाकिस्तानमध्ये राहताना दाखवली आहे, त्यातही तिच्यावर्, तिच्या कुटुंबावर आणि घरावर हल्ले असेच काहिसे कथानक होते.

लेखातली दुसरी घटना वाचून ह्या दोघांची आठवण झाली. बाकी त्या वाक्याला पुन्हा एकदा दंडवत.

--मनोबा

+१

>हृद्य आणि साध्या सरळ शब्दातल्या आठवणी भावल्या.

असेच म्हणते.

लेखन आवडले

सरळ, सोपे प्रामाणिक लेखन आवडले. आणखीही लिहा.
अवांतर १: .गांधीहत्येनंतर आमच्या गावातला आमचा वाडा जाळण्याचा प्रयत्न झाला होता, पण गावचे पाटील वाड्याच्या कट्ट्यावर बसून राहिले आणि त्यांनी गावकर्‍यांना 'आधी माझा वाडा जाळा, मग या वाड्याला हात लावा' असे सांगितले असे वाडवडिलांकडून ऐकले आहे.
अवांतर २: आपल्या लिखाणावरुन आपले वय सत्तरीच्या आसपास असावे असे वाटते. ( या वैयक्तिक खाजगी उल्लेखाबद्दल क्षमस्व.) या वयात आपण आंतरजालावर वाचन आणि लेखन करता हे मला खास कौतुकाचे वाटते.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

+१

या आठवणी आता इतिहासाचा भाग असल्या तरी तो इतिहास घडताना अनुभवलेल्या असल्याने महत्त्वाच्या आहेत. आणखीही लिहा.

अवांतर १' माझ्या आजोळकडून आठवण : जळितात बिर्‍हाडकरू म्हणून रहाणार्‍या आमच्या आजोबांचा 'भिडे वाडा' जळाला. पण त्यांच्या घरातले रस्त्यावर काढलेले सामान राखायला दस्तुरखुद्द (कै.) दत्ताजीराव कदम रात्रंदिवस बसून होते. (हे दत्ताजीराव कदम कोण ते सन्जोपरावांना कळेल. पण त्यावेळी ते 'दत्ता जॉबर' म्हणून लोकांना माहित होते. जॉबर म्हणजे यंत्रमागाचे तंत्रज्ञ.)

मनाला भिडणार्‍या आठवणी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अरविंद कोल्हटकर यांनी लिहिल्या आठवणी आवडल्या.अनुभवाधारित अनलंकृत लेखन मनाचा वेध घेतेच. तसेच सर्वश्री. सन्जोपराव, ज्ञानेश, मन आणि क्रेमर यांचे समर्पक प्रतिसादही आवडले.

रोचक माहिती

२ अतिशय महत्वाच्या ऐतिहासिक आणि एक उत्सुकता-वर्धक घटनेचे आपण चालते-बोलते साक्षीदार आहात, आणि अतिशय चपखल शब्दात आपण त्या घटना मांडल्या आहेत. रोचक माहिती.

वा!

चांगली माहिती. आठवणी आवडल्या. अशाच आठवणी इतरही उपक्रमींकडे असाव्या. त्यांनी त्या येथे मांडल्या तर आणखी बहार येईल.

छान

आठवणी सांगायची पद्धतही आवडली.

+१

हेच म्हणतो.

-Nile

+२

होय. आणि तुम्ही या वयातही हौसेने संगणक, इंटरनेट हे सगळं शिकून उत्तम माहिती टंकता याचंही कौतुक वाटतं.

+३

अगदी असेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आठवणी आवडल्या

स्वातंत्र्यवर्षातल्या आठवणी आवडल्या. विशेषतः त्यातील अलिप्तता. ज्या वयातल्या या आठवणी आहेत त्या वयातल्या आठवणीत सुसुत्रता नसते. पण त्या आठवणींचा मागोवा घेऊन त्यांच्यातून इतिहास काढलात हे विशेष.

प्रमोद

छान

तीनही आठवणी हृद्य आहेत.

गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत बाधित झालेल्या ब्राह्मणांना सरकारने आर्थिक मदत दिली होती, ही माहिती नवी आहे.

दंगल नव्हे जाळपोळ...

१९४८ साली घडलेली ती दुर्दैवी घटना ही दंगल नव्हती तर एकतर्फी जाळपोळ होती. आजही त्याला 'जळित' म्हणूनच ओळखले जाते. दंगलीमध्ये दोन पक्षांत हिंसक चकमकी होतात. 'जळिता'मध्ये ब्राह्मण समाजाने प्रतिकार, प्रतिशोध असले काही केले नाही. जमाव आला, त्याने दमदाटीने ब्राह्मणांना बाहेर काढले आणि राहती घरे पेटवून दिली इतकेच काय ते घडले.

अरविंदराव,
तुम्ही ही घटना स्वतः अनुभवली आहे. माझ्या पिढीने त्या गोष्टी वाडवडिलांकडून ऐकल्या आहेत. खूप काही भीषण घटनाही त्यात आहेत. खरे तर आता त्या आठवणीही नको वाटतात. पण आमच्या घराबाबत घडलेली घटना विनोदी आहे. दु:खाला हास्याची किनार, असे त्याचे स्वरुप आहे. उपक्रमी वाचकांच्या चेहर्‍यावर किंचित हास्य फुलवण्यासाठी मी ही आठवण येथे नमूद करतो.

सातार्‍याजवळच्या एका खेड्यात आमचे छोटेसे मंदिर. माझे काका गावातले पोस्टमन. दिवसभर काम करुन झाल्यावर ते मुक्कामाला शहरात येत असत. त्या घटनेच्या वेळी त्यांनी मंदिरातच थांबण्याचा निर्णय घेतला कारण शहरात जमाव फिरतोय, अशा काही अफवा कानावर पडू लागल्या होत्या. माझे वडील तेव्हा तरूण असल्याने त्यांनी सोबतीला त्यांना बोलवून घेतले.
ही जाळपोळ सुनियोजित नव्हती. रोज रात्री सातार्‍यातील एका विशिष्ट ठिकाणाहून ट्रकभर लोक बाहेर पडत असत. आसपासच्या खेड्यांत जाऊन तेथील स्थानिकांना दमदाटी आणि द्वेषपूर्ण चिथावण्या देऊन गप्प केले जाई. गावातील तरुणांची डोकी फिरवली जात. त्यांच्याकडून गावात ब्राह्मणांची घरे किती व कुठे आहेत, याची माहिती घेतली जाई. भीतीमुळे घरातील माणसे निघून गेली असतील तर काम सोपे होई अन्यथा ब्राह्मणांना जीवाची भीती घालून बाहेर काढले जाई. घरात घुसून आधी मिळेल त्यावर हात साफ केला जाई. ही लूटपाट झाली, की मग रिकामे घर पेटवून दिले जाई.
तर क्रमाक्रमाने एकेका घराला आग लावत जमाव आमच्या मंदिराजवळ आला. त्यांना मंदिर काय, अन् घर काय कशाचेच सोयरसुतक नव्हते. 'बामनाचं हाय ना मग जाळून टाका,' असा साधा सरळ विचार. गावात अंधार होता. जमाव हातात काठ्या, दिवट्या व कंदिल घेऊन आला होता. काका व वडिलांनी आतून दारे लाऊन घेतली होती. जमाव बाहेरुन 'दार उघडा' अशा आरोळ्या ठोकत होता. काका आणि बाबा जाम घाबरले होते. सुचेल ते बोलत होते. एका क्षणी काका ओरडत सुटले, ' इथे सरकारी नोकर राहतात. पुढे जा.'
हे ऐकल्यावर बाहेरचा जमाव एकदम शांत झाला. त्याने गावातल्या लोकांना हाका मारायला लावले. गावातल्या लोकांनी काकांना दार उघडायला सांगितले. काका बाहेर गेले. जमाव अजूनही कैफात होता. त्यातील एक् दोन जण काकांना म्हणाले, 'जास्त हुशारी करतो का रे? घरात कोंडून जाळून टाकीन. बर्‍याबोलाने बाहेर हो.' त्यावर काका म्हणाले, ' एक काम करा. पुढची घरे जाळून या. तवर मी घरातले सरकारी सामान (टपालखात्याची बॅग, गणवेश इ.) बाहेर काढतो. उद्या हे सामान जळलं तर माझी नोकरी जाईल.'
काका असं बोलल्यावर गावातल्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांच्यातील जाणत्या लोकांनी जमावाच्या पुढार्‍यांना बाजूला घेऊन सांगितले, अरे हा गावचा पोस्टमन आहे. घर जाळलं तर हा उद्या सरकारला झालेलं सांगणार. जबाबात तुमची नावे येणार आणि गावातल्या लोकांची पण. पोलिस चौकशी होईल आणि खासगी मालमत्तेबरोबर सरकारी मालमत्ता व सरकारी नोकराचा जीव धोक्यात आणण्याच्या खटल्याचे लचांड मागे लागेल. सगळ्यात भीती म्हणजे घर जाळलं तर हा लेकाचा उद्या गावातील लोकांची पत्रे नीटपणे वाटणार नाही. नक्कीच घोळ घालून ठेवेल.
पटल्यावर मग मात्र सगळ्यांच्या बोलण्याचा नूर पालटला. लोक मोठ्या प्रेमाने काकांना 'बाबूराव' म्हणून हाक मारायला लागले. त्यांना मायेचा उमाळा आला. म्हणाले, 'बाबूराव! आम्हाला माहीत आहे तुम्ही कुणाच्या अध्यामध्यात नसता. जावा बिनघोर झोपा. उलटंसुलटं बोलू नका म्हणजे झालं.'
जमाव निघून गेला. आमचं लहानसं मंदिर वाचलं.

पण आमच्याकडे हा गंमतीशीर प्रसंग घडला असला तरी गावात इतरत्र जे प्रकार घडले मन विषण्ण करणारे होते, असे वडिलांनी आम्हाला सांगितले. उदा: गावातील सावकाराचे घर जाळताना मागे गोठ्यात बांधलेल्या गाई सोडण्याचे कुणाच्याच ध्यानात आले नाही. ती मुकी जनावरे आर्त हंबरडा फोडत आगीत भाजली. जमाव गावातले राममंदिर जाळायला गेला. त्याच्या पुजार्‍याने जमावाला शिव्या दिल्या. जमाव भडकला आणि त्याला गादीत गुंडाळून जाळणार होता, पण गावातील म्हातारी माणसे आडवी पडली. म्हणाली, ' काय जाळायचं ते जाळा, पण आमच्या डोळ्यादेखत बामणाला जिवंत जाळण्याचे पाप बघायला लावू नका.' मग त्या जमावाने पुजारीबाबांना नागडं करुन बडवलं. पुजारी बोंब मारत पळून गेला आणि शेतात लपून बसला. दोन दिवसांनी त्याला तिथून बाहेर काढला तोवर तो वेडा झाला होता. मरेपर्यंत डोक्यावर परिणाम झालेल्या अवस्थेतच राहिला.

जळिताची धग पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणांना जितकी बसली तितकी कोकण आणि विदर्भात जाणवली नाही.
आमची पिढी पुढची. वाईट एकच झालं, की आम्हाला कारण नसताना पुढेही ब्राह्मणद्वेषाचे चटके सहन करावे लागले.

ब्राह्मणद्वेष

लोकांच्या मनात ब्राह्मणद्वेष हा आधीपासूनच खदखदत होता. गांधीहत्येच्या निमित्ताने तो उफाळून बाहेर आला एव्हढंच.

सहमत

आमची पिढी पुढची. वाईट एकच झालं, की आम्हाला कारण नसताना पुढेही ब्राह्मणद्वेषाचे चटके सहन करावे लागले.
सहमत आहे. मागासवर्गीयांनी पूर्वी चटके सहन केले, ब्राह्मण आत्ता करताहेत. हिसाब बराबर.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

:)

दुखावणाऱ्या भावनांचे हिशोब करणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणे दुटप्पी वाटते.

कारण नसताना एम एफ हुसेनला चटके बसल्यास ह्याच लोकांना त्रास झाल्याचे वाचले होते.

हिसाब बराबर नाही...

ज्यांनी प्रत्यक्ष अन्याय केला आणि ज्यांनी तो सहन केला त्यांच्यात अकाऊंट सेटलिंग झाले असते तर हिसाब बराबर म्हणता आला असता.
ज्यांचा या गोष्टींशी कधीच संबंध आला नाही त्यांच्याबाबत असे घडणे म्हणजे एक नवा अन्याय इतकेच म्हणता येईल. 'वाळल्याबरोबर वलंबी जळतं' या म्हणीचा दाखला दिला तरी ते पटण्यासारखे नाहीच.

ज्ञानेश्वरांचा छळ पैठणच्या ब्राह्मणांनी केला म्हणून त्याची शिक्षा कोकणात सव्वा रुपया दक्षिणा आणि मूठभर शिध्यासाठी गावोगाव पूजा सांगणार्‍या भिक्षुकाला मिळणे, हे अतार्किक आहे. त्याचबरोबर पूर्वजांच्या गुन्ह्यांचे खापर पुढच्या पिढ्यांवर लादण्याचे समर्थन भारतातच दिसून येते. ज्यूंवरील अत्याचारांना लोक हिटलर आणि नाझी कंपनीला जबाबदार धरतात. सर्व जर्मन समाजाला वेठीला धरत नाहीत.

'हिसाब बराबर' विचारसरणीशी असहमत. ती न्याय्य नाही, हे माझे वैयक्तिक मत.

हिसाब बराबर नाहीच

'हिसाब बराबर' हे उपरोधाने, त्राग्याने, उद्वेगाने म्हटले आहे. असा कसा हिसाब बराबर होईल? आरक्षणाच्या विरोधात व.पु. काळ्यांनी 'हे म्हणजे कालपर्यंत तुम्ही पोटभर जेवलात आणि आम्ही उपाशी राहिलो, मग इथून पुढे काही वर्षे आम्ही पोटभर जेवू आणि तुम्ही उपाशी राहा असे आहे. जोपर्यंत ब्राह्मणांच्या (तथाकथित उच्चवर्णियांच्या) काही टक्के मुली इतरांसाठी राखून ठेवा असा कायदा येत नाही तोवर आरक्षणाला विरोध करु नये असे म्हट्ले होते, तसे हे झाले. वपुंचे हे विधान कमालीचे कडवट, औपरोधिक आहे. हे काही वपुंनी केलेले आरक्षणाचे समर्थन नाही.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

 
^ वर