उत्तर मराठेशाही बद्दल काही शंका... सनद, चौथाई वगैरे

मराठेशाहीचा शिवाजी ते संभाजी तसेच राजाराम इथवरचा इतिहास थोडाफार समजण्यास सोपा वाटला, कमीत कमी तो एका हेतूने प्रेरित असा वाटतो (जेवढा वाचला तो तरी) .. अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते..
परंतु मग शाहू राज्य करू लागल्यावर त्याच मोगलांकडे दक्षिणेच्या चौथाईसाठी सनदा मागण्याचे प्रयोजन काय ते मात्र कळत नाही.. ज्यांच्याविरुद्ध २७ वर्षे लढा दिला त्यांच्या दारात त्यानंतर सदैव सनद, चौथाई वगैरे साठी मराठे (सातारकर (पेशव्यामार्फत), कोल्हापूरकरदेखील ) जाताना दिसतात.. हे कसे?

पहिल्या बाजीरावाची आणि निजामाची जवळ जवळ सर्व युद्धे या चौथाईच्यासाठी झालेली दिसतात.. अगदी त्यानंतरही बहुतेकवेळा मराठे सर्व भारतात वर्चस्व गाजवत असताना देखील एक राज्यव्यवस्था म्हणून काहीही वैशिष्टये दिसत नाहीत.. बंगालात तर कोलकात्याबाहेर 'maratha ditch' नावाची गोष्ट मराठा 'लुटारूंना' रोखण्यासाठी होती असे दिसते..
जर कोणतीही राज्यव्यवस्था म्हणून मराठेशाही उभी राहिली नसेल आणि (नामधारी मोगल सत्तेच्या परवानगीने) चौथाई, खंडणी आणि लूट अशा मार्गांनी तिचे बहुतांश अस्तित्व जाणवत असेल तर शिवाजींचे कार्य आणि दृष्टीकोन(vision) यांच्याशी नाळ तुटलेल्या व्यवस्थेस 'मराठा साम्राज्य' किंवा तत्सम उपाधी कितपत योग्य?

(मला चौथाई काय तेही नक्की माहीत नाही.. परंतु 'मराठ्यांचा इतिहास' (लेखक आठवत नाही) हे पुस्तक वाचताना उद्भवलेल्या या शंका इथे मांडतोय.. )

लेखनविषय: दुवे:

Comments

शेजवलकर

शेजवलकरांच्या निझाम-पेशवे संबंध ह्या पुस्तकात तुम्हाला ह्या विषयावर बरीच माहिती मिळेल. कदाचित शाहूने अनेक वर्षे मोंगलांच्या कैदेत काढली आणि शेवटी मोंगलांनीच त्याला सोडले (अपेक्षेप्रमाणे ताराबाईशी भांडणे व्हावीत म्हणून्), म्हणून मराठे शेवटपर्यंत स्वतःला मोंगलांचे वतनदार मानू लागले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाहू

मूळ विषयाबद्दल माझ्याकडे ठोस माहिती नाही परंतु डफचा इतिहास वाचला होता त्यातील काही भाग आठवतो तो असा, शाहू हा मुघलांच्या कैदेत राहिला. कालांतराने (बहुधा लग्नात) त्याला अक्कलकोट, इंदापूर, नेवासा वगैरेची जहागीर देण्यात आली. पुढे झुल्फीकार खानाच्या रदबदलीमुळे त्याची सुटका झाली तरी येसुबाई, शाहूच्या दोन बायका आणि इतर कुटुंब मुघलांच्याच ताब्यात राहिले. शाहूच्या चांगल्या वागणूकीच्या बोलीवर त्याची सुटका आणि इतरांना ओलीस ठेवले गेले होते त्यामुळे शाहू मुघलांचा वतनदार राहिला असावा.

चू. भू द्या. घ्या. अधिक माहिती पुन्हा वाचावी लागेल.:-(

'मराठा साम्राज्य'

'मराठा साम्राज्य' हा शब्द् भूभाग वाचक किंवा लोकसमूह वाचक असावा. "राजपूत राजघराणी" जशी तत्कालीन राजपुतान्यात होती, त्याच प्रमाणे. शिवाजीची ध्येयधोरणे चालवणारे ते मराठा अशा अर्थाने ते नसूही शकेल.मराठा ताकदीची अधिकृत जाणीव प्रथम करून दिली ती शिवाजी महाराजांनी. मग शिंदे-होळकर-भट-गायकवाड,पवार,विंचूरकर,मेहेंदळे असे अनेक "मराठा" शाहूंच्या मुद्रेखाली एकत्रित झाले.

दुसर्‍या नजरेतून पाहू गेल्यास तांत्रिकदृष्ट्या बघता,ध्येयधोरणे शिवकालापासून पेशवेकालापर्यंत बदललेली वाटू शकतात; पण तांत्रिकदृष्ट्या शाहू हे "छत्रपती" हे नामाभिधान लावत. शिवाय शिवाजींचे थेट वंशज! म्हणूनही "मराठा साम्राज्य"(शिवाजीने सुरु केलेले मराठा साम्राज्य) म्हणून हे म्हणू शकतो. शिवाय तेव्हढ्यापुरती माघार घेण्यात, शत्रूशी आणि प्रतिस्पर्ध्याशी योग्य वेळ मिळेपर्यंत शांतता कायम ठेवण्यात गैर काहिच नाही ही महाराजांचीच पॉलिसी. आपल्या सामर्थ्याबद्दल खात्री होइ पर्यंत मुघलांचे एक् सामान्य सरदार म्हणून खुद्द् महराजांनीच काही वर्षे काम केले आहे.(मिर्झाराजे ह्याच्याशी तह केल्यापासून् ते आग्रा भेटीहून आल्यानंतरची काही वर्षे.)

--मनोबा

मराठा राजमंडळ

मग शिंदे-होळकर-भट-गायकवाड,पवार,विंचूरकर,मेहेंदळे असे अनेक "मराठा" शाहूंच्या मुद्रेखाली एकत्रित झाले.

एकत्रित झाले असे म्हणण्यापेक्षा विखुरले असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटते. आपला वट वाढवण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी पेशव्यांनी काही सरदार निर्माण केले, आणि वाढवले. तेच पुढे जाऊन स्वतंत्र झाले, विखुरले.

स्वराज्य-मोगलाई

शेजवलकरांचे मत होते की शिवाजी-संभाजी-राजाराम हा काळ, आणि शाहू-बाजीराव-नानासाहेब-उत्तर पेशवाई हा काळ एकाच "मराठेशाही"च्या सत्रा खाली आणूच नये, कारण त्यांच्यात काही मूलभूत फरक होते - मुघलांशी "कायदेशीर" नात्यात झालेला बदल, हा त्यातला महत्त्वाचा फरक.

शाहू परतल्यावर त्यांनी मराठ्यांच्या दक्षिणेतले वसूलीचे हक्क मुघल सनदीद्वारा अधिकृत करून घेतले. १७१६ पर्यंत राजाराम-ताराबाईंच्या सैन्यांविरुद्ध लढाई जिंकायचे चिन्ह मुघलांना दिसत नव्हते. दक्षिणेतले मुघल अधिकारीच आग्र्याला तडजोडीच्या याचिका पाठवत होते. तेव्हा मराठ्यांनी तोपर्यंत मिळवलेल्या हक्कांचे, आणि आणखी काही, असे मुघलांनी त्यांना सनद करून देऊन टाकवेत असे सूचित केले - या हक्कातच चौथ (एका प्रांताच्या एकूण वसूलीचा एक चातुर्थांश भाग) आणि सरदेशमुखी (वसूलीचा १/१० भाग) आले - हे दोन हक्क शाहू-बाळाजी विश्वनाथ यांनी वेगवेगळ्या मुगल सुब्यात मागितले - औरंगाबाद, बिदर, वर्हाड, गोलकोंडे, बिजापूर आणि कर्नाटक, आणि खांदेश. माळवा आणि गुजरात मध्ये देखील चौथची मागणी केली. महाराष्ट्र देशात मिळवलेल्या स्वरा़ज्याचीही सनदीद्वारा मुघलांकडून मान्यता मागितली - यातून पुढच्या स्वार्‍यांपासून सुस्कारा, आणि मुघलांनी काबीज केलेले गड मराठ्यांना मिळाले. या खेरीज वेगवेगळ्या सरदारांनी काबीज केलेले जमीन-प्रांत ही त्यांच्या नावातर्फे या यादीत होते. या मागण्यांबदले, पेशव्यांनी दक्षिणेत मुघलांतर्फे १५,००० चे सैन्य ठेवायचे, सरदेशमुखीच्या वसूलीचे १० % मुघलांना परत करण्याचे, आणि रु. १०००० वर्षाला मुघल दरबारात भरण्याचे कबूल केले. मुघल दरबाराला ह्या मागण्या मान्य नव्हत्या. पण त्यावेळीस मुघल दरबारातच यादवी युद्ध चालू असल्याने पेशवे-शाहू यांची डिप्लोमसी यशस्वी झाली, आणि सनदा मिळवल्या गेल्या.

मूळ सनदा आता उपलब्ध नसून ग्रांट डफ (त्याने त्या पाहिल्या होत्या) च्या पुस्तकात त्यांचे तपशील सापडतात.(पृ. ४४५-४५०)

यावरून म्हणता येईल की मुघलांकडूनच स्वराज्याची मान्यता कायदेशीर करवून घ्यायची झाली तर मुघल-मराठा संघर्षाचा नेमका काय राजकीय अर्थ लावायचा? आंद्रे विंक या इतिहासकाराचे याबद्दल विवेचन बहुतेक इतिहासकरांपेक्षा काहीसा निराळा, पण चिंतनीय आहे. विंक यांचा अभ्यास मुघल साम्राज्याच्या विस्ताराशी, स्थानिक राज्यांना मुघल सिस्टेममध्ये मिसळून घेण्याशी, आणि मुघल सार्वभौमत्वाच्या तात्त्विक पायाशी, सत्तेच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. याच संदर्भात मुघल-मराठा संबंधांना ते अभ्यासतात. कायदेशीर सनदा, पत्रे वगैरे, आणि राजधानीहून लांब बदलत्या मुघल-मराठा फ्रंटियरवर स्वराज्य-मोगलाई ची व्याख्या, आणि दैनंदिन अंमलबजावणी, किती बहुपदरी होत्या हे उलगडू पाहतात.

मुघलांसारख्या आधुनिकपूर्व राज्यात, "सार्वभौमत्व" ही कल्पना स्पष्ट सीमा असलेल्या, भूमीवर बजावलेल्या, अखंड सत्तेवर (territorial sovereignty) आधारित नव्हतीच असा विंक यांचा तर्क आहे. उलट, सार्वभौमत्व सत्तेच्या अंमलबजावणीच्या काही विशिष्ट घटकांतून होत असे - करवसूली, ठरविक राज्यकारभारसंस्थांचा प्रसार, पादशाहच्या दरबारप्रथांशी इमान, इ. मुघल सत्ता ही देखील अनेकमजली इमारत होती - पादशाह सार्वभौम असला तरी विविध पातळीवरचे राजा, जमीनदार त्या सत्तेत हक्काचे सहभागी होते. हा सहभाग संघर्षपूर्ण होता ("फितना" ही अरबी सत्ताशास्त्रीय कल्पनेशी विंक याचा लिंक लावतात), आणि एकूण सार्वभौमत्व वाढवण्यात त्याचा जितका हातभार लागे, तेवढाच तो पुढे भारी ही पडू शकत असे - काहींना स्थानिक अधिकार वाढवून द्यावे लागत, काहींना करवसूलीचे हक्क देणे भाग पडले, इ.

ह्या पार्श्वभूमीवर, मुघल-मराठा संबंधात संघर्ष-आणि-देवघेव याच्या विलक्षण मिश्रणाचे विंक विवेचन करतात. १८व्या शतकात "स्वराज्य" ची कल्पना भूमीचे अखंड सार्वभौमत्व नसून करवसूलीवर आणि करवसूली मिळवण्याच्या क्षमतेवर अवलंबून होते असा त्यांचा तर्क आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी, अर्थात स्वराज्यच्या विस्तारासाठी संघर्षाची गरज होती, किंबहुना संघर्ष या पद्धतीचा अविभाज्य घटकच होता. म्हणून एकाच प्रांताच्या वसूलीवर दोन्ही सत्ता हक्क बजावत, एकमेकांचे हक्क मान्यदेखील करत, पण लढाया होतच राहत. सनदीत मिळवलेले हक्क जमीनीवर, दैनंदिन स्तरावर बजावण्याकरिता संघर्ष अपरिहार्य होता. सिस्टेम अर्थात स्टेबल नव्हती, आणि १८व्या शतकाच्या शेवटी-शेवटी, मुघल सत्ता जशी दुर्बल होत गेली, आणी मराठ्यांचा उत्तरेत विस्तार होत गेला, तसे संबंध फारच गुंतागुंतीचे होत गेले.

एकूणच हा खूप वादग्रस्त मुद्दा आहे. विंक यांचे संशोधन १८व्या शतकावर, उत्तर-मुघल-पेशवाई वर जास्त आहे, त्यामुळे शिवकालाबद्दल त्रोटकच विवेचन आहे. शिवाजीमहाराजांनीही काहीकाळ सरदारी पत्करली होती ह्याचा उल्लेख आहे, पण त्यांच्या स्वराज्य कल्पनेतत आणि 'फितना'त तात्त्विक दृष्ट्या काय आणि किती फरक असू शकेल आणि होता, याची विंक हवी तितकी दखल घेत नाहीत. स्वराज्याच्या एकाच वेळी अनेक, परस्परविरोधी कल्पना देखील असू शकतील ह्याकडेही ते फारसे लक्ष देत नाहीत. पण थोडक्यात, सार्वभौमत्वाची ही लवचिक कल्पना आणि त्या काळच्या राजकीय विचारविश्वाचा संदर्भ समोर ठेवल्यास, १८व्या शतकाच्या साधनांमध्ये, घटनांमध्ये दिसून येणारा विरोधाभास - एकीकडे लढाया, एकीकडे वाटाघाटी, एकाच प्रांतात दोन सत्तेंचे हक्क आणि सत्तेची ओढाताण - काहीसा दूर होतो, हा त्यांचा तर्क चिंतनीय आहे.

प्रतिसाद शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संपादित केला...

प्रतिसाद

एका गुंतागुतीच्या प्रश्नावर बोट ठेवल्याबद्दल धन्यवाद. विषयावरील प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. (विशेषतः रोचना यांचा प्रतिसाद.)

माझ्या माहितीनुसार 'चौथ' आणि 'सरादेशमुखी' हे दोन्ही शब्द शिवाजीमहाराजांनी वापरलेले आहेत. (विकीवर याचा त्रोटक उल्लेख आहे.) कदाचित हे त्यापूर्वीचेही शब्द असावेत. चौथ म्हणजे राज्य उत्पन्नाचा चौथा हिस्सा. तर सरदेशमुखी म्हणजे अजून दहा टक्के. हे कर 'संरक्षण' (प्रोटेक्शन) करासारखे होते.

औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते.

हा तर्क फारसा बरोबर नाही. मोगलांशी युद्ध मुख्यतः संभाजीच्या काळात सुरु झाले. (तत्पूर्वीचे युद्ध हे काही महिनेच टिकले.) हे युद्ध औरंगजेबाने लादले होते. मराठ्यांना यात फारसा पर्याय नव्हता. शिवाजीच्या काळात प्रामुख्याने आदिलशाहीशी संघर्ष होता असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.

परंतु मग शाहू राज्य करू लागल्यावर त्याच मोगलांकडे दक्षिणेच्या चौथाईसाठी सनदा मागण्याचे प्रयोजन काय ते मात्र कळत नाही.. ज्यांच्याविरुद्ध २७ वर्षे लढा दिला त्यांच्या दारात त्यानंतर सदैव सनद, चौथाई वगैरे साठी मराठे (सातारकर (पेशव्यामार्फत), कोल्हापूरकरदेखील ) जाताना दिसतात.. हे कसे?

नामधारी राज्यकर्ते हा प्रकार जगभर व्यवस्थितपणे चालू असे. शहाजीने काही काळ निजामशाही(?) तील अल्पवयीन मुलाच्या नावाने राज्य केले, हैदरअलीने बेंगरुळात हाच प्रकार केला, नाना फडणविसाने सवाई माधवरावाच्या नावाने राज्य केले, शाहुनंतरच्या राजांच्या नावाने पेशव्यांनी राज्य केले वगैरे यातली उदाहरणे. औरंगजेबानंतरचे मुघल बादशहा हा नामधारी बनले होते. बाहेरील सत्तांच्या जोरावर कुठलातरी नामधारी बादशहा व्हायचा. कित्येक वर्षे हे काम शिंद्यांच्या फौजांनी केले होते. (चु.भु.द्या घ्या). अगदी इंग्रजांनी देखिल बादशहाच्या नावे आपण राज्यकारभार करतो असे सांगितले होते.

पूर्वीच्या राजाला एकदम काढून टाकणे, वंशविच्छेद करणे अशा गोष्टींमुळे नवीन राज्यकर्ते वैधता गमावून बसत. या ऐवजी नामधारी राज्यकर्त्यांच्या नावे राज्यकरणे हा दोन्ही डगरीवर पाय ठेवण्याचा एक उपाय होता. या कारणासाठी जगभर हा प्रकार चालायचा.

उत्तर मराठेशाहीतील मराठ्यांचे सनदा मागणे याच प्रकारात मोडते.

जर कोणतीही राज्यव्यवस्था म्हणून मराठेशाही उभी राहिली नसेल आणि (नामधारी मोगल सत्तेच्या परवानगीने) चौथाई, खंडणी आणि लूट अशा मार्गांनी तिचे बहुतांश अस्तित्व जाणवत असेल तर शिवाजींचे कार्य आणि दृष्टीकोन(vision) यांच्याशी नाळ तुटलेल्या व्यवस्थेस 'मराठा साम्राज्य' किंवा तत्सम उपाधी कितपत योग्य?

मराठ्यांचा राज्यविस्तार आणि साम्राज्या उत्तर मराठेशाहीत (शाहूपासूनचा काळ) झाले. त्यातील महत्वाची राज्ये म्हणजे शिंदे होळकर आणि गायकवाड (नागपूरकर भोसले, झाशी अशी इतर काही संस्थाने.) या विस्तारित राज्यात मराठ्यांचे उपद्रवी मूल्य नव्हते तर स्थानिक लोकात मिळून राज्य केले गेले. इतर भारतात (विशेषतः उत्तर आणि पूर्वेकडील भागात) हा राज्य विस्तार झाला नाही. उरलेल्या भूभागासह भारताला मराठा साम्राज्य म्हणणे चुकीचे आहे.

तर शिवाजींचे कार्य आणि दृष्टीकोन(vision) यांच्याशी नाळ तुटलेल्या व्यवस्थेस 'मराठा साम्राज्य' किंवा तत्सम उपाधी कितपत योग्य?

हा प्रश्न तुम्ही समजावून दिला पाहिजे. शिवाजींचा दृष्टिकोन आणि उत्तर मराठेशाहीत मोठी फारकत होती हे मान्य. पण ती बहुतांशी स्थितीकालपरत्वे येत गेली असावी.

प्रमोद

माहितीपूर्ण प्रतिसाद

रोचना व प्रमोद यांचे माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले.

करप्रणाली नियंत्रण, ठरविक राज्यकारभारसंस्थांचा प्रसार

रोचना व इतरांच्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद..

शेजवलकरांच्या मताशी सहमत.. खरेतर सुरुवातीचे वाक्य 'औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते.' या हेतूने होते.. कदाचित मांडणीमध्ये चूक झाली असेल माझ्याकडून.

म्हणूनच हा 'कायदेशीर' नात्यातला हा मोठा बदल समजून घ्यावासा वाटतो.. याला 'स्थितीकालपरत्वे' झालेला बदल म्हणता येणार नाही असे वाटते...

शिवाजीमहाराजांनी सरदारकी मुलासाठी (स्वतःसाठी नव्हे.. ती टाळण्याचा तो प्रयत्न होता.. ) मान्य केली यात त्यांची स्वेच्छा नक्कीच नव्हती असे दिसते.. सार्वभौमत्व आणि प्रजाभिमुख राज्यव्यवस्था हा त्यांचा हेतू त्यांचा दृष्टीकोन दर्शवतो.. त्यांची वाटचाल ही यासाठी लागणारे धोरणात्मक स्वातंत्र्य याकडे दिसते.. मी एवढेच म्हणेन की 'करवसुली म्हणजे स्वराज्य' एवढ्या ध्येयावर त्यांनी नक्कीच सुरुवात केली नव्हती..

आता उत्तर मराठेशाहीबद्दल.. २७ वर्षांचे युद्ध संपताच शाहूने 'खरा वारस' म्हणून सत्ता घेतली तर शिवाजी दुसरा याने कोल्हापुरात गादी वसवली.. पण दोघानीही दिल्ली दरबारी चौथाईसाठी जाणे समजत नाही..
विंकचे विवेचन पटण्याजोगे आहे परंतु जर १००% कर वसूल करता येत असेल तर २५% कर घेऊन बाकी दिल्लीस पाठवणे म्हणजे दलालीच नव्हे काय? कर ठरवणे, माफ करणे व त्याचा रचनात्मक उपयोग करण्याचा अधिकार नसेल तर मग काय.. हे जरा पचत नाही..

नामधारी राज्यकर्ते हा प्रकार येथे येत नाही असे वाटते.. कारण सनद पेशवे(सातारकर) किंवा कोल्हापूरकर किंवा निजामास मिळू शकते.. तो अधिकार ती सनद देणाऱ्याच्या हातात..(मग त्याच्या अधिकाऱ्यांना लाच देणे आले पण तो मुद्दा इथे गौण..) प्रश्न असा की जर समकालीन हैदर अली जर स्वतंत्र राहू शकतो.. अतिपूर्वेकडील राज्ये तसेच बंगाल व परकीय वसाहती (गोवा व इतर) यांना सनदी लागत नाहीत तर मराठ्यांना का लागाव्या..

>>पूर्वीच्या राजाला एकदम काढून टाकणे, वंशविच्छेद करणे अशा गोष्टींमुळे नवीन राज्यकर्ते वैधता गमावून बसत.>>

असे वाटत नाही कारण हैदरअली, इंग्रज तसेच पूर्वी जेव्हा मोगल आले तेव्हा देखील त्यांनी स्वतःची राज्यव्यवस्था सुरु केली.. इथे मोगलांना नष्ट करावे अशा काही अपेक्षेबद्दल मी बोलत नाही तर 'करप्रणाली नियंत्रण, ठरविक राज्यकारभारसंस्थांचा प्रसार' अशा बाबी तसा विचार उत्तर मराठेशाहीमध्ये दिसत नाहीत याबद्दल बोलत आहे..

काही चुकले असेल मांडताना तर चू. भू. द्या. घ्या.

हैदर

प्रश्न असा की जर समकालीन हैदर अली जर स्वतंत्र राहू शकतो.

हैदरने देखिल मुगल बादशहाकडून 'नबाब' पद मागितले होते आणि ते त्याला मिळालेही. (नक्की संदर्भ आता हाताशी दिसत नाही.)

प्रमोद

पण...

हैदरने तेव्हाच्या म्हैसूरच्या सत्ताधार्‍यांना(ओडियार घराण्याला) उलथून टाकून सत्ता हाती घेतली होती ना.
त्याची दिल्लीत सैन्य घेउन घुसायची मराठ्यांइतकी ऐपत नसेल.
पण जसे त्याने त्याला जिथे जमत होते तिथले सर्वाधिकार हातात घेतले तसे, दिल्ली-पानिपत- अटक् इथं पोहचूनही मराठ्यांनी आधीची सत्ता सरळ उलथवून का टाकली नाही अशी शंका राहते.
अजून एकः- "पेशवा" हा शब्दच अरेबिक आहे म्हणे. शिवाजी महराजांच्या काळात प्रशासनाची देखरेख करणारा "पेशवा" हे पद् होतेच.(त्याला नंतरच्या काळात मिळाले तेव्हढे अधिकार नव्हते , किंवा तो स्वतःच virtual ruler बनला नव्हता तो भाग वेगळा.)
महाराजांच्या काळात ह्या पदाच्या "पेशवे" ह्या नावापेक्षा "पंतप्रधान्" का "प्रधान अमात्य" हे भारतीय नाव अधिक प्रचलित होतं.

--मनोबा

वाडियार

हैदरने तेव्हाच्या म्हैसूरच्या सत्ताधार्‍यांना(ओडियार घराण्याला) उलथून टाकून सत्ता हाती घेतली होती ना.

माझ्या माहितीनुसार वाडियार घराण्यातील राजाच्या नावे हैदरने सत्ता घेतली होती. हा दुवा बघा.

महाराजांच्या काळात ह्या पदाच्या "पेशवे" ह्या नावापेक्षा "पंतप्रधान्" का "प्रधान अमात्य" हे भारतीय नाव अधिक प्रचलित होतं.

अष्टप्रधान मंडळात अमात्य आणि पेशवे ही वेगळी पदे होती. अधिक माहितीसाठी मराठीपुस्तकेवरील हे आज्ञापत्र पहा.

प्रमोद

पेशवा अरबी नव्हे

अरबीत 'प' हे व्यंजन/अक्षर नाही. त्याऐवजी 'ब' वापरतात. 'पेशवा' हा शब्द फारसी आहे. एखादा शब्द संस्कृत नसला किंवा फारसी/अरबी असला तर तो कसा काय भारतीय (?) ठरतो हे कळत नाही.

अवांतर: अरबीत पैंगबराला रसूल म्हणतात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हॉ ऑ .....

>>अरबीत 'प' हे व्यंजन/अक्षर नाही. त्याऐवजी 'ब' वापरतात.

सहमत आहे. आमच्या एका मित्राने तिकडे प्रार्थनेच्यावेळी "लेत अस ब्रे" म्हणतात असे सांगितले होते.

नितिन थत्ते

मुघल सिस्टेम

प्रतिसाद देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. आणि प्रतिसाद अतिशय लांबल्याबद्दलही क्षमस्व. खाली लिहीलेले कदाचित मूळ प्रश्नाहून फारच अवांतर वाटेल, पण एकदा लिहायला लागल्यावर १८वे शतक किती रोचक आहे हे पुन्हा जाणवले आणि राहावले नाही :-)

सार्वभौमत्व आणि प्रजाभिमुख राज्यव्यवस्था हा त्यांचा हेतू त्यांचा दृष्टीकोन दर्शवतो.. त्यांची वाटचाल ही यासाठी लागणारे धोरणात्मक स्वातंत्र्य याकडे दिसते.. मी एवढेच म्हणेन की 'करवसुली म्हणजे स्वराज्य' एवढ्या ध्येयावर त्यांनी नक्कीच सुरुवात केली नव्हती..
आता उत्तर मराठेशाहीबद्दल.. २७ वर्षांचे युद्ध संपताच शाहूने 'खरा वारस' म्हणून सत्ता घेतली तर शिवाजी दुसरा याने कोल्हापुरात गादी वसवली.. पण दोघानीही दिल्ली दरबारी चौथाईसाठी जाणे समजत नाही..

हो. म्हणूनच मी म्हटले की विंकचे विवेचन शिवाजींच्या स्वराज्यकल्पनेला समजण्यास कमी पडते. पण शिवाजीचे कार्य, ध्येये, एकूण मुघलकालीन प्रवाहाच्या, किंबहुना मुघल-मराठा संबंधांना अपवाद आहेत, असे वाटते. करवसूलीची क्षमता ही त्यांनादेखील महत्त्वाची होतीच. पण त्यासहित राज्यव्यवस्था, संस्था, भाषा, इ. मध्ये परिवर्तन आणण्याबद्दल ठराविक विचारही होते. १८व्या शतकात उपखंडातील एकूण चित्रच बदलून गेले, आणि उत्तर मराठेशाहीत आलेल्या फरकांना कारणीभूत ठरले. म्हणूनच एकदा वारसदार सातार्‍यात आणि कोल्हापूरात सत्तारूढ झाल्यावर, मुघलांशी लढाई संपल्यावर सगळे काम झाले असे म्हणता येत नाही.

विंकचे विवेचन पटण्याजोगे आहे परंतु जर १००% कर वसूल करता येत असेल तर २५% कर घेऊन बाकी दिल्लीस पाठवणे म्हणजे दलालीच नव्हे काय? कर ठरवणे, माफ करणे व त्याचा रचनात्मक उपयोग करण्याचा अधिकार नसेल तर मग काय.. हे जरा पचत नाही..

नामधारी राज्यकर्ते हा प्रकार येथे येत नाही असे वाटते.. कारण सनद पेशवे(सातारकर) किंवा कोल्हापूरकर किंवा निजामास मिळू शकते.. तो अधिकार ती सनद देणाऱ्याच्या हातात..(मग त्याच्या अधिकाऱ्यांना लाच देणे आले पण तो मुद्दा इथे गौण..) प्रश्न असा की जर समकालीन हैदर अली जर स्वतंत्र राहू शकतो.. अतिपूर्वेकडील राज्ये तसेच बंगाल व परकीय वसाहती (गोवा व इतर) यांना सनदी लागत नाहीत तर मराठ्यांना का लागाव्या..

या साठी एकूण मुघलकालीन वातावरण आणि राजकीय संस्कृती (ज्याला मी वर सिस्टेम म्हटले) समजून घ्यायला हवी. बंडखोरी, वाटाघाटी, चकमकी, हे मुघल साम्राज्याच्या विस्ताराचे अंग होते - "दलाली" पेक्षा सत्तेचा सहभाग अनेक पातळींवर होत असे हे महत्त्वाचे आहे. अकबरने यशस्वी स्वार्‍या करून निरनिराळ्या क्षमतेचे राजे-सुलतान आणि त्यांचे सैन्यबळ वाटाघाटींपर्यंत आणले. मनसबदारी संस्थेच्या अंतर्गत पादशाहच्या दरबारात समावून घेतले. दरबारी शान आणि खर्च (खिताब, नजराना, इ) आणि पादशाहला दिलेले वैयक्तिक पाठिंबा या नाजुक धाग्याने हे सगळे एकत्र बांधले गेले होते. मुघल दरबारप्रथांमध्ये शामिल होणे अनेकांना फायद्याचे वाटले. जोपर्यंत पादशाह स्वत: हे सर्व आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर चालवत होता, आणि अनेक मजली इमारतीतून प्रांतांतले उत्पन्न स्थानिक जमीनदार-राजापासून सुबेदारमार्गे आग्र्याला दरबारी पोहोचत होते, तोवर ठीक होते. अनेकदा बंडखोर अधिकारी (पादशाहच्याच घराण्यातले) ह्यात व्यत्यय आणत, पण मुघल सैन्यात (आणि मनसबदारीसंस्थेत) त्यांना धडा शिकवण्याची क्षमता होती.

औरंगजेबानंतर ही सिस्टम कोलमडली. औरंगझेब असतानाच बंड निराळ्या कारणांमुळे वाढले - धार्मिक तेढ, वसूलीची वाढ, खर्चिक दरबारप्रथांविरुद्ध त्याची मोहिम, दरबारात उलेमाचे वाढते वर्चस्व - वसूली नियमित गोळा करणे अधिक गरजेचे झाले, पण त्याचवेळी वसूलीची साखळी मोडून स्वत: राज्य चालवण्याचे निर्णय अनेकांनी घेतले. मुघलोत्तर राज्यांनी बंड पुकारले, पण मुघल सिस्टेमला पूर्णपणे झिडकारले नाही. स्वत:च्या नवीन राज्यांची लेजिटिमसी बिंबवायला मुघल दरबारप्रथांचा, करवसूलीप्रथांचा, इ. सगळ्यांनी कित्ता गिरवला - अनेक ठिकाणी नवीन इमारती; चित्रकलेला, स्थानिक वाङ्मयाला दरबारातून प्रोत्साहन; फारसीचा दरबारी वापर, मुघल शैलीचे खिताब इ. दरबारातल्या मान्यवरांवर, किंबहुना स्वतःसाठी घेणे; मुघल पेहराव; अशा अनेक मुघलांच्याच प्रथा चालू ठेवल्या. यातच सनदाही मोडतात. मुघल दरबार झपाट्याने दुर्बल होत गेले, पण आतून किडत जाणारे साम्राज्य बाहेरून १५० वर्ष कायम राहिले. दरबाराशी वाटाघाटी चालूच राहिल्या - त्याचा संपूर्ण इतिहास फारच गुंतागुंतीचा आहे, पण आग्र्याच्या गादीचा सम्मान पादशाह दुर्बल झाल्यावरही कायम होता. येथे हा फक्त वरवरचा खोटा दिखावा होता हे म्हणण्यापेक्षा ह्यातच आपण मुघल सार्वभौमत्वाच्या खुणांची मरणोत्तर देखील दीर्घायु पाहू शकतो असे म्हणता येईल. वर, मुघल साम्राज्य विरुद्ध बंदखोर म्हणजे वरपासून खालपर्यंत सैन्य, अधिकारी, वगैरे संपूर्ण वेगळे नसून दोन्ही बाजूंमध्ये बराच गढूळपणा होता आणि तो चालूच राहिला. त्यामुळे मुघलप्रथा दैनंदिन स्तरावर चालू राहिल्या.[याला स्वराज्याच्या कल्पनेतला पोकळपणा किंवा फितुरी न म्हणता त्या काळचे राजकीय-लष्करी सत्य, आणि स्थानिक जमीनदार/राज्ये आणि मोठे राज्य-साम्राज्य वसवू पाहणार्‍यां मधली चिरकाल चुरस असे म्हणता येईल. आणि म्हणूनच विंकचा मुघल दृष्टीकोनातून केलेला दोन सत्तांमधली ओढाताण, एकाच इलाक्यातले सत्तेचे ओवरलॅप, यांचा अभ्यास विचारकरण्याजोगा वाटतो.]

यात मराठ्यांची कथा काहीशी निराळी, पण एकूण मुघलोत्तर राज्याचीच आहे. राजाराम-औरंगझेबचे युद्ध चालू असतानाच अनेक सरदारांनी वाटाघाटी चालू ठेवून बाजू पुन्हा पुन्हा बदलल्या. आता २१व्या शतकात आपल्याला सातरा-कोल्हापूर या दोन गाद्या स्वतंत्र स्थिरस्थावर झाल्या हे ठाऊक आहे, पण त्या काळात कोण वर्चस्व गाजवेल हे नक्की नव्हते. ताराबाईंनी शाहूला चांगलाच लढा दिला. संभाजी-राजारामच्या संघर्षात आणि दीर्घकाल लढाईत अनेक जुने घराणे मागे पडून नवीन लढवैय्ये समोर आले - यात शेवटी शेवटी अनेकांनी स्वतंत्र मुघल इलाख्यात दौरेही केले, वाटाघाट्याही केल्या. मुघलांचा वझीर त्या कालात प्रत्येक वर्षी खून किंवा आजाराने मरून नवीन येत असे, त्या मुळे वाटाघाट्यांची दिशा सारखी बदलत असे. हे सगळे पाहता, शाहू+पेशवा यांनी सनदा आणून मुघलांशी लढाई संपवून स्वतःकडे जमतील तितके सरदार जमवायचा प्रयत्न केला. त्यांना त्यांचे हक्क-वसूली अधिकृत करून देण्याची, पटवून देण्याची क्षमता शाहूपेक्षा १७२० मध्येतरी मुघल सनदांतच जास्त होती! आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे, मराठ्यांमधले सत्तेचे इच्चुक असलेल्या अन्य गटांपेक्षा त्याचा दरारा अद्याप जास्त होता. तेव्हा, स्वत:चे राज्य, सैन्य, वसूली, आणि पाठी असलेले सरदार हे प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पक्के करण्यास शाहूला मुघल सनदा मागून घेणे रास्त वाटले. ताराबाईच्या गटाने ही तेच केले, पण शाहूच्या मुघलवास्तव्यामुळे, दरबाराशी जवळीकीमुळे सनदा शेवटी त्याच्या हातात आल्या.

पुढे हे सगळे बदलले. शाहूचे राज्य स्थिरावले, आणि माळव्यात वगैरे पेशव्यांनी राज्यव्यवस्था हळूहळू मुघलांकडून घेऊन पूर्णपणे मराठ्यांची केली. खंडणी घेण्याकरिता मराठे सर्वत्र पसरले. मराठा डिच ही इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांचे उडिसामार्गे येणार्‍या मराठ्या स्वार्‍यांपासून संरक्षणासाठी बांधली होती . मग या काळात तरी मुघलांशी पूर्ण सनदांचे नाते का नाही तोडले? याला ही बदललेला काळ हेच कारण. १८व्या शतकात सगळ्या मुघलोत्तर राज्यांची सर्वात मोठी गरज म्हणजे स्वार्‍यांसाठी, सैन्यासाठी पैसा.वसूली आणण्याचे काम भाडोत्री सैन्यांना (त्याचा भाग देऊ करून - revenue farming) अनेक राज्ये या काळात करत होते. पेशवे या साठी शिंदे-होळकर आदींवर अवलंबून होते, आणि त्यांनी मोठ्या घराण्यांशी लग्नसंबंधही ठेवले. पेशव्यांनी मुघलांकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा आपली लेजिटिमसी वेगळ्या संस्थांद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला - ब्राह्मणी कायदे, धर्मक्षेत्रांचे मुघलांकडून हक्क मिळविणे, दक्षिणा, ब्राह्मण राज्य, यावर भर दिला. उत्पन्नाची गरज मात्र सर्वव्यापी झाली - आणि माळव्यात वगैरे सुव्यवस्था मराठ्यांनी आणली तरी, बाकीच्या प्रांतात खंडणीसाठी फक्त स्वार्‍याच होत राहिल्या. पानिपत मध्ये मराठे अबदालीविरुद्ध मुघल दरबाराच्या बाजूने लढले (भाऊसाहेबांच्या बखरीत सदाशिवराव भाऊंनी नाणी बनविण्याकरिता चांदीचे मुघल छत्र मोडले, तेव्हा या अपमानामुळे प्रलय येण्याची भीती पसरली, अशी गोष्ट आहे). एकूण, सातारकर गादीकडून पेशवाईची वस्त्रे असोत वा मुघलांच्या सनदा असोत, पेशव्यांना त्याच सिस्टेम मध्ये राहून स्वतःचे राज्य चालवणे जास्त महत्त्वाचे आणि रास्त वाटले.

तात्पर्य: मराठे मुघल साम्राज्यावुरिद्ध लढले, पण मुघल सत्तेचे सर्वात यशस्वी वारसदार ही झाले. हे त्यांनी मुघल सिस्टेमशी दीर्घकाल लढाई-तडजोड दोन्हीतून मिळवले. त्यामुळे "मराठा साम्राज्य" हे संज्ञा वापरावयाचीच झाली तर, तिचा मुघलांचे सर्वात मोठे वारसदार हाच खरा अर्थ लागतो. संपूर्ण मुघल वर्तुळ एकीकडे, आणि त्यांच्या स्वतंत्र मराठा राज्य-प्रजा-सैन्य-व्यवस्था एकीकडे अशी चौकटच मुळी हा इतिहास समजावयास अपूरी आहे. ती १९व्या शतकापासून सुरू झालेल्या राष्ट्रीय भावनेतून लिहीलेल्या इतिहासाची देणगी आहे. तुम्ही म्हटल्या प्रमाणे उत्तर मराठेशाहीने या सगळ्यात पडण्यापेक्षा स्वतःची छाप, व्यवस्था वगैरे निर्माण का नाही केली" या प्रश्नाचा हा अत्यंत लांबलचक (आणि कदाचित असमाधानकारकच) प्रतिसाद उत्तर देण्याचा प्रयत्न आहे! त्यांना स्वातंत्र्याचे इमॅजिनेशन नव्हते असे काही तुम्हाला म्हणावयाचे आहे असे वाटते (चू भू द्या घ्या). शिवाजीचा पूर्वेतिहास पाहता ते विवेचन कदाचित बरोबर ही आहे, पण त्यात वेगळ्याच काळातले वैचारिक चौकट त्यांच्यावर लादण्याचाही धोका आहे. असे केल्यास त्यांच्याच जगाच्या निराळ्या पदरांना मग आपण मुकतो, असे मला वाटते.

प्रश्न असा की जर समकालीन हैदर अली जर स्वतंत्र राहू शकतो.. अतिपूर्वेकडील राज्ये तसेच बंगाल व परकीय वसाहती (गोवा व इतर) यांना सनदी लागत नाहीत तर मराठ्यांना का लागाव्या..
असे वाटत नाही कारण हैदरअली, इंग्रज तसेच पूर्वी जेव्हा मोगल आले तेव्हा देखील त्यांनी स्वतःची राज्यव्यवस्था सुरु केली.. इथे मोगलांना नष्ट करावे अशा काही अपेक्षेबद्दल मी बोलत नाही तर 'करप्रणाली नियंत्रण, ठरविक राज्यकारभारसंस्थांचा प्रसार' अशा बाबी तसा विचार उत्तर मराठेशाहीमध्ये दिसत नाहीत याबद्दल बोलत आहे..

बंगालला सनदा लागल्या नाहीत, पण बंगाल खुद्द मुघल प्रांत होते, त्यामुळे फरक एवढाच पडला की उत्पन्न काही दशक दिल्लीस गेले नाही. नंतर १७६५ नंतर ते उत्पन्न इंग्रजांच्या घशात जाऊ लागले. परकीय वसाहतीदेखील मुघल सनदा घेऊनच सुरुवातीला व्यापारासाठी वसल्या. पुढे त्यांनी त्यांची चिरफाड केली ती त्यांची शक्ती वैश्विक पातळीवर वाढल्यामुळे. मुघल सिस्टेममध्ये त्यांचा सहभाग केव्हाही वरवरचाच होता.

राहिली गोष्ट हैदर ची. हैदरने बंड पुकारले (१७६१) तेव्हा मुघल दरबार खूपच दुर्बल झाले होते आणि परिस्थिती शाहूच्या काळापेक्षा फारच बदललेली होती. प्रमोदने म्हटल्या प्रमाणे त्याने आणि टिपूने पथेप्रमाणे मुघल खिताब घेतलेही, पण दिल्लीदरबाराने त्यांना मान्यता दिली नाही. हैदर-टिपूला काळजी जास्त होती इंग्रजांची, आणि इंग्रजांशी चांगले नाते असलेल्या व्यापारी गटाची. हैदर आणि टिपू तत्कालीन परिस्थिती, अन्य राज्यांची पैशासाठी तारेवरची कसरत चांगली ओळखून होते. खंडण्यांपेक्षा, जमीनीच्या उत्पन्नापेक्षा राज्यांतल्या व्यापारावर कर वाढवावा, आणि स्थानिक पाळेगारांना केंद्रीय सत्तेखाली आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण इथेच ते कंपनी आणि त्यांच्या स्थानिक व्यापारी कंपूच्या आड आले. १७९९ पर्यंत हैदर-टिपूचे लष्करी सामर्थ्य मोडण्याचाच इंग्रजांनी प्रयत्न केला.

पुन्हा शुद्धलेखनाकरिता संपादित... राहिलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे!

चाबूक..!!

अतिशय समर्पक प्रतिसाद रोचना.. बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरे आणि नवीन माहितीपण मिळाली.. धन्यवाद..

+१

असेच म्हणतो.

प्रत्येक मनुष्य आपल्या पूर्वसुरींच्याच तत्त्वांना धरून चालतो असे नाही.

आपल्या अलिकडच्या इतिहासात स्वातंत्र्यलढ्यात एकत्र असलेले लोक नंतर वेगळे झालेले दिसतात. काँग्रेसने लढ्याचे नेतृत्व केले पण पुढच्या काळात अनेक काँग्रेसजनांनी (इतकेच नव्व्हे तर स्वतः काँग्रेसने सुद्धा) विरोधकांबरोबर संधान बांधून आपापले स्वार्थ जपलेले दिसतात. त्यात गैर काहीच नाही. किंवा स्वातंत्र्यानंतरची काँग्रेस ती हीच का? असा प्रश्नही आपल्याला पडत असतो. त्याला समांतरच इतिहास मराठेशाहीचा दिसतो.

इस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्याच्या उद्देशाने येथे आली पण पुढे त्यांनी वेगळीच धोरणे ठेवून आपली वातचाल केली. मधल्या काळात भारतावर कब्जा करून लुटणे हे उद्दिष्ट पाळले. नंतरच्या काळात (थोडासा काळ) एतद्देशीयांचे भले करणे हा ही उद्देश त्यातल्या काहींनी ठेवला.

नितिन थत्ते

+१

रोचना यांचा प्रतिसाद उत्तम आहे. अशा सदस्यांची उपक्रमात भर आनंद वाढवते. :-)

व्यापक प्रतिसाद

अतिशय व्यापक आणि माहिती पूर्ण प्रतिसाद. अतिशय आवडला. शेतीकराकडून - व्यापारकराकडे झालेला प्रवास चांगल्यारितीने मांडला आहे. एक दृष्टिकोन उभा केला आहे जिच्याशी सहमत आहे.

शिवाजीचा पूर्वेतिहास पाहता ते विवेचन कदाचित बरोबर ही आहे, पण त्यात वेगळ्याच काळातले वैचारिक चौकट त्यांच्यावर लादण्याचाही धोका आहे. असे केल्यास त्यांच्याच जगाच्या निराळ्या पदरांना मग आपण मुकतो, असे मला वाटते.

सहमत.

प्रमोद

सहमत

शिवाजींचे कार्य आणि दृष्टीकोन(vision) यांच्याशी नाळ तुटलेल्या व्यवस्थेस 'मराठा साम्राज्य' किंवा तत्सम उपाधी कितपत योग्य?
सहमत आहे.

रोचना यांचा प्रतिसाद

रोचना यांचा प्रतिसाद फार आवडला. विषयाचा एकूण गुंतागुंतीचा आवाका जाणवून देणारा आणि तत्कालीन चौकटींचे निर्णयांमधले स्थान ओळखणारा असा माहितीपूर्ण प्रतिसाद आहे.

उत्कृष्ट विवेचन

रोचना ~ अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद.

"एकूण, सातारकर गादीकडून पेशवाईची वस्त्रे असोत वा मुघलांच्या सनदा असोत, पेशव्यांना त्याच सिस्टेम मध्ये राहून स्वतःचे राज्य चालवणे जास्त महत्त्वाचे आणि रास्त वाटले."

~ शाहूचे पुण्यात आगमन आणि त्यानंतर त्याने सातार्‍यात व ताराबाईने कोल्हापूरात सवत्या चुली करणे व त्यामुळे थोरल्या राजांनी स्थापिलेली राज्यसंस्था कायमची अडगळीत जाऊन पडली तरी पेशव्यांच्या दृष्टीने आता फक्त "उदंड झाले पाणी, स्नानसंध्या करावया' अशीच स्थिती निर्माण झाल्याने रोचना यांचे वरील विधान फार योग्य असेच झाले आहे.

[त्या स्नानसंध्येची बरीच वाढ पेशवाईत झाली. पण ज्या कारणी ती लागावयाची, ते राजकारण पार दृष्टीआड झाले.]

उत्तम चर्चा आणि प्रतिसाद

उत्तम चर्चा आणि प्रतिसाद. रोचना यांना विशेष धन्यवाद.

+१

रोचना ह्यांचा विस्तृत प्रतिसाद भावला.

--मनोबा

धन्यवाद

सर्व उपक्रमींच्या उत्साही प्रोत्साहनाचे मनापासून आभार! हा माझा आवडता विषय, त्यात १८व्या शतकाबद्दल लिहावे आणि अभ्यासावे तेवढे कमीच आहे....

मराठा साम्राज्य चौथाई सरदेशमुखी इत्यादि

रोचना ह्यांच्याइतका माझा ह्या विषयाचा अभ्यास नाही आणि पुढील लिखाण माझ्या सर्वसाधारण वाचनावर आधारित आहे.

'मराठा साम्राज्य' हा शब्दप्रयोग अनेक ठिकाणी वापरला जातो. वस्तुतः ते राज्य (Kingdom) किंवा साम्राज्य (Empire) नव्हतेच. शिवाजीने स्थापन केले ते राज्य होते. राज्याभिषेक करवून घेऊन शिवाजीने ते दाखवून दिले होते. मुघल आणि अन्य मुस्लिम सत्तांपासून अलग असे आपले अस्तित्व निर्माण करणे एव्हढेच मर्यादित ध्येय त्याला शक्य होते आणि तदनुसार मुख्यत्वेकरून कोंकण आणि सह्याद्रीचा काही भाग असे छोटे राज्य शिवाजीच्या काळात झाले.

नंतर शाहूच्या काळापर्यंत परिस्थिति बदलली होती. मुघल आणि अन्य मुस्लिम सत्ताधारी पूर्वीइतके समर्थ राहिले नव्हते. अशा वेळी महाराष्ट्राबाहेर नजर फैलावण्याची इच्छा आणि क्षमता मराठयांमध्ये निर्माण होऊन बाळाजी विश्वनाथ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला. तरीपण सर्व हिन्दुस्तानभर आपली सत्ता स्थापित करणे हे संख्येच्या निकषावरसुद्धा शक्य नाही हा व्यावहारिकपणा त्यांच्यामध्ये होताच पण हिन्दुस्तानात राहाणार्‍या सर्व व्यक्तींप्रमाणे दिल्लीश्वरांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीहि काहीशी श्रद्धेची होती. दिल्लीश्वर हा काय तो हिन्दुस्तानचा खरा स्वामी ही ती श्रद्धा. (टीप १ पहा.) पुष्कळ मराठी कागदपत्रामधून दिल्लीकर बादशाहाचा उल्लेख 'सार्वभौम' असा केलेला आढळतो तो ह्या श्रद्धेचाच भाग. ही श्रद्धा आणि थोडा व्यावहारिक शहाणपणा ह्यांचे मिश्रण करून महाराष्ट्रापुरते स्वराज्य आणि बाकी मुघल प्रांताची चौथाई आणि सरदेशमुखी असे धोरण त्यांनी आखले. साम्राज्य निर्माण करून राजपूतासारख्यांना आपल्या छत्राखाली आणणे सोपे नाही हे जाणण्याइतका प्रगल्भपणा त्यांच्यामध्ये होता.

ह्या चौथाई आणि सरदेशमुखीच्या वसूलीसाठी केवळ पेशव्यांवर अवलंबून न राहता अन्य कर्तबगार व्यक्तींना दूरच्या प्रांतात जाऊन आपापले अंमल बसविण्याची मुभा दिली गेली. ह्यातून जे निर्माण झाले ते मराठा साम्राज्य नव्हते. साम्राज्याला सम्राट् लागतो. सर्वानुमते हिन्दुस्तानचा सम्राट् एकच - जो दिल्लीत राहतो. ह्या मराठा अनेकपदरी polity ला समर्पक असा शब्द मराठीत नाही. इंग्लिशमध्ये तिला confederacy म्हणता येते.

आज तीव्रतेने दिसणारी हिंदु-मुस्लिम तेढहि त्या काळात इतकी तीव्र नव्हती. दिल्लीकर बादशाहा मुस्लिम आहे तेव्हा त्याला दूर करून 'हिंदुपदपातशाही' निर्माण करावी अथवा मुस्लिमांनी हिंदूवर केलेल्या अन्यायाबाबत आता 'बदला' घ्यावा असेहि कोणास विशेषेकरून वाटत नव्हते. (थोडे अवांतर - माझ्या मते ह्याचे कारण मी हिंदु आहे ह्या जाणिवेपेक्षा मी ब्राह्मण किंवा मी क्षत्रिय, वैश्य आहे ही जाणीव अधिक तीव्र होती. उदा. जोपर्यंत ब्राह्मण समाजाच्या अन्य जातींच्या तुलनेत वरच्या स्थानाला कोणी आह्वान देत नसले तर आपल्या डोक्यावरचा सत्ताधीश अन्यधर्मीय मुस्लिम आहे ह्याच्याशी जुळवून घ्यायला ब्राह्मणांना अवघड वाटत नव्हते. ही खालच्या जातीबाबतची jealousy त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची होती. नारायणराव पेशव्याच्या काळात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे कलियुगामुळे शूद्र कसे झाले आहेत आणि त्यामुळे त्यांना वेदोक्ताचा अधिकार कसा नाही असा शास्त्रार्थ करण्यात आणि तसे आज्ञापत्र मिळविण्यात पुण्याच्या ब्रह्मवृंदाने किती संघटन दाखविले आणि किती शक्ति वापरली हे पाहणे येथे उद्बोधक ठरेल. त्यांच्या दृष्टीने खरा महत्त्वाचा प्रश्न हाच होता)

सर्वांशी जुळवून घ्यायला पाहिजे ह्या जाणिवेतूनच पेशव्यांनी काशी-मथुरेतील देवळे repossess करण्याचा बाबरी मशीद प्रकार कधीहि केला नाही.

सारांश असा की चौथाई-सरदेशमुखी हेच आपले ईप्सित हा मराठी नेत्यांचा निर्णय हा त्यांच्या pragmatism चा भाग होता. Discretion is the better part of valour ही म्ह्ण बहुधा त्यांच्या कानावरून गेली असावी.

(टीप १: जगन्नाथ पंडिताचा पुढील प्रसिद्ध श्लोक पहा:
दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान्पूरयितुं समर्थः|
अन्यैर्नृपालै: परिदीयमाणं शाकाय वा स्याल्लवणाय वा स्यात्||

दिल्लीश्वर किंवा जगदीश्वर हेच केवळ इच्छापूर्ति करू शकतात. अन्य राजांनी दिलेले भाजीला तरी पुरेल नाहीतर मिठाला तरी पुरेल - दोन्हीला नाही.)

सेन्सिबल व न भरकटलेली चर्चा!

बरीच उद्बोधक व नवीन माहीती रोचक पद्धतीने मिळाली. रोचना यांचे विशेष आभार. या विषयावर अजूनही वाचायला आवडेल.

सामान्यत: मराठी साम्राज्याबद्दलची सामान्यांना असलेली माहिती इतकीच, की शिवाजीं नंतर कधीतरी शाहू छत्रपती झाले मग पेशवे. पेशवे गेल्यानंतर इंग्रज. थोडे फार (फार थोडे) डीटेल्स अगदी शिवाजीं ठाऊक बद्द्लही असतात. अन ते ही बर्‍याचदा अतिरंजीत.

मला वाटतं ..........

मला वाटतं, माणसं त्या त्या काळातल्या परिस्थितीप्रमाणे वागत असावीत. भविष्यात इतिहास लिहिला गेल्यास आपल्याबद्दल काय लिहिलं जावं ते ठरवून कोणी वागत नसावेत.
इतिहासाच्या पुनर्लेखनात होत्याचं नव्हतं करणं ही नित्याचीच बाब आहे. सत्ताधारी आपली सत्ता टिकवण्यासाठी ही गोष्ट नेहमीच करत असतात. याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास. मी त्या चळवळीचा साक्षीदार आहे. माझ्या माहितीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र् निर्मितीचं श्रेय प्रामुख्यानी संयुक्त महाराष्ट्र समिति नी आचार्य अत्रे यांना जातं. पण नंतरच्या काळात या गोष्टीला हळूहळू अनुल्लेखानी मारण्याची पद्धत सुरु झाली नी सत्ताधारी काँग्रेसजनांनी "मंगल कलश" थिअरीचा प्रचार सुरू केला. लोकसत्तासारख्या प्रथमपासूनच मुंबई महाराष्ट्राला मिळण्याच्या विरोधात असणार्‍या नेहरू-मोरारजीधार्जिण्या वृत्तपत्रांनी ती थिअरी उचलून धरली नी यशवंतराव चव्हाणांना संयुक्त महाराष्ट्राचा "मंगल कलश" दिल्लीहून (नेहरूंच्या हातून) आणण्याचं श्रेय बहाल केलं.

 
^ वर