पुनर्जन्म आणि कर्मविपाक
पुनर्जन्म व कर्मविपाक
पुनर्जन्म (व विशेषत: कर्मविपाक ) या विषयी पूर्वासूरींनी काय विचार मांडले आहेत याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. मग "एक चांगले कृत्य दुसर्या वाईट कृत्याच्या परिणामाला नाहिसे करते का ? " असे प्रश्न मनात उद्भवतात.( मागे या संबंधी लेख आला होता का हे मला माहीत नाही. असल्यास कृपया त्याचा संदर्भ द्यावा.) ही "माहिती" आहे, माझे मत नाही. सगळ्यांना हा विचार पटलाच पाहिजे असे नाही. तसेच सर्व प्रश्नांना उत्तरे मिळतीलच असेही नाही. पण प्रत्येकाला हे प्रश्न पडतातच व पूर्वीच्या विचारवंतांनी , (याचा दुसरा अर्थ धार्मिक विचारवंतांनी) काय मते मांडली ते आता पाहू.
पुनर्जन्म हिन्दू, बौद्ध व जैनांनी स्विकारला आहे. मुसलमान व ख्रिश्चन धर्मांनी नाही. पहिल्या तिघांच्या विचारात थोडेथोडे फरक आहेत. आपण फक्त हिन्दू विचारसरणी बघू. प्रत्येक जण बघत असतो की या जगात काही जण सुखसंपदेत जगतात तर काही जण दु;खविपदेत. सज्जन कष्ट भोगतात तर दुष्ट मजा करतात. हे असे का ? याचे उत्तर सापडत नाही. कोणताही "तर्क" याचे पटणारे उत्तर सांगू शकेल असे नाही. पण प्रयत्न अनेकांनी केला. जेंव्हा या जन्मातील बरीवाईट कृत्ये व या जन्मातील भोगावी लागणारी सुखदु:खे यांचा सुसंगत मेळ जमवता येईना तेंव्हा असे मत मांडले गेले कीं मागे या माणसाचा जन्म होता व त्यावेळी त्याने केलेल्या चांगल्या कृत्यांची चांगली फळे त्याला आज मिळत आहेत मग भले तो आज वाईट वागेना का ! आज सज्जन असणार्या माणसाने मागील जन्मी पाप केले असेल तर त्याला त्याचे फळ आज भोगलेच पाहिजे. मागचा जन्म म्हटले कीं पुनर्जन्म आला व कर्माची फळे चुकत नाहीत हा कर्मविपाक सिद्धांत आला.
ऋग्वेदात पुनर्जन्माचा विचार आला आहे. . ऋ.१०.१६.३ व रु.१.१६४.३१-३२ इथे या कल्पनेचा उगम आहे व नंतर कठोपनिषद, बृहदारण्यक, छांदोग्य व कौषितकी या उपनिषदांमध्ये त्याचा विस्तार झाला. कर्मविपाकाचा विचार याचवेळी वाढला. पुनर्जन्म व श्राद्धकल्पनेत विसंगती आहे कारण मृत पूर्वजांचे आत्मे पुनर्जन्म घेतल्यानंतरही १०० वर्षांनी पिंड ग्रहण कसे करू शकतील ? गीतेत मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो तसे आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो असे म्हटले आहे. पुत्र-प्रपौत्र होऊन वंशसातत्य रहात असल्याने पुत्राच्या रुपाने वडील पुनर्जन्म घेतात असेही म्हटले आहे.हल्ली आजोबा नातवाच्या रुपाने परत येतात असेही समजले जाते.
पुनर्जन्म ही कल्पना स्विकारावयाची असेल तर "आत्मा " ही कल्पना प्रथम स्विकारावीच लागते.कारण नाशवंत शरीर दुसरे रूप धारण करू शकणार नाही. पण आत्म्याला अविनाशत्व दिलेले असल्याने तो कुठल्याही शरीरात स्थलकालाबाधित प्रवेश करू शकतो. म्हणजे माणसाचा आत्मा कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो व तो कुत्रा मेल्यावर परत माणूसही होऊ शकतो. एक गंम त म्हणजे फक्त मानवच आपली प्रगती करून घेऊन "मोक्ष " मिळवू शकतो, या चक्राच्या बंधनातून सुटका करून घेऊ शकतो.
पण पुन्हा असा प्रश्न पडला कीं पुनर्जन्म तरी का व्हावा ? मागच्या कर्माची फळे मी भोगली, संपले ! इथे " कर्मविपाका " चा संबंध येतो. "विपाक " याचा अर्थ परिणाम, शेवट किंवा फळ. कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे. ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदा. मी चोरी केली. मला पकडले व त्या बद्दल शिक्षा झाली. मला कर्माचे फळ मिळाले; संपले. पण मी या ज्न्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही.याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे व वाईट कर्माची अशुभ. कर्माच्या जातीप्रमाणे (Gradation) फळाची जात. हा झाला सिद्धांत. पण या मध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. म्हणून काही जास्त कलमे-उपकलमे जोडली आहेत. ती बघू.
काही कर्मे मागील ज्न्मांतील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते.त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते. काही चालू जन्मातील असतात.यांना निरनिराळी नावे दिली आहेत. यातील काही स्पष्ट अर्थ माहीत नसला तरी गोळाबेरिज अर्थ व्यवहारात नेहमी वापरले जातात.
(१) संचित : कोण्याही मनुष्याने सांप्रतच्या क्षणापर्यंत केलेले कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील केलेया कर्मांची बेरीज.
याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण करतेवेळी कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते.
(२) प्रारब्ध : संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाहीत. ती परस्पर विरोधीही असतात. बरीवाईट फळे एकाचवेळी कशी भोगणार ? जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळावयास सुरवात झालेली असते त्यांना प्रारब्ध म्हणतात.
(३) क्रियमाण : प्रारब्ध भोगत असतांना तुम्ही या जन्मीही कर्मे करत असताच. अशा कर्मांना क्रियमाण वा वर्तमान कर्मे म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भो्ग तेथेच संपतो. पण तसे झाले नाही तर पुढी्ल जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो.
असा हा चक्रव्युह आहे. मागील जन्मांची फळे आज भोगा व या जन्माची फळे भोगावयास पुढचा जन्म घ्या. यातून सुटका कधीच नाही कां ? नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल. आहे. सुटकेचा मार्ग आहे. कर्म करूच नका. फळ नाही, पुनर्जन्म नाही. अर्जुनाने हाच मुद्दा मांडला. भगवान म्हणाले " मुर्ख आहेस. कर्मे चुकत नाहीत. जगतो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात." हा ही मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात. तेच गीतेचे मर्म म्हणावयास हरकत नाही. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात. कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही. तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने, फळे मला अर्पण करून युद्ध कर, या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत.
परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली व त्याचे नियम लागू केले की मग तो यात ढवळाढवळ करत नाही.विस्तवाने हात भाजतो हा नियम.
मग तो सर्वांना सर्वकाळ लागू होतो.( दुर्जनांना तसेच सज्जनांनाही) तसेच एकदा तुम्हाला बुद्धीस्वातंत्र्य दिले की ते कसे वापरावे ही तुमची जबाबदारी. तुम्ही ती चुकीच्या मार्गाने वापरली व त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागले तर मग ईश्वराला दोष देणे बरोबर नाही. कर्माचे फळ नेमून दिले की मग तो उदासिन राहतो.त्याला विषमता व निर्दयता हे दोष लागत नाहीत.(वे.सू.२.१.३४. "पेरलेलेच उगवते व पेराल तेच उगवेल " हा सृष्टीनियम असल्याने तुम्ही आपल्या विपदांबद्दल ईश्वराला जबाबदार धरू शकत नाही.
तुमची फळे तुम्हालाच भोगावयाची असतात. ती दुसर्याला देता येत नाहीत व दुसयाला ती घेता येत नाहीत. एका दुष्कृत्याचे फळ दुसर्या सत्कृत्याने नाहीसे होत नाही. सत्कृत्याचे फळ मिळेल पण दुष्कृत्याचे भोगावेच लागेल. कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा की या स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्ये करा व पुढील जन्म सुखात घालवा ; त्याच वेळी ( मागील दुष्कृत्यांची ) प्रारब्धाची फळे भोगतांना विवेकाने ती सुसह्य होतात याकडे लक्ष द्या.
तुम्ही एखाद्याला मदत केली व त्याची दु :खे कमी केलीत म्हणजे काय झाले ? त्याच्या प्रारब्धातील सत्कृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली व त्याची दु:खे कमी झाली व त्याचे वेळी तुमच्या यादीत सत्कृत्याची भर पडली.
एक मोठा विषय थोडक्यात लिहावयाचा असल्याने बर्याच गोष्टी राहिल्या आहेत. नाइलाज अहे.
शरद
Comments
शंका
माहिती म्हणून वाचली
शंका आहेच.
हे वाचले आहे तरीही दोन शंका विचारायचा मोह आवरत नाही.
शंका १:
१. कर्म केले व वासना ठेवली तर फळ मिळतेच
२अ. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते
२ब. वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळते.
३. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात
४. चांगले कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा / वासना न धरता केले तर फळ मिळत नाही .. व शेवटी मुक्ती मिळते
मग वाईट कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा / वासना न धरता केले तरीहि फळ मिळायला नकोच म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता वाईट कृत्ये केली तर मोक्ष नक्की! बरोबर का?
शंका २:
जर फळ हे कर्माशी निगडीत नसून इच्छेशी निगडीत आहे तर चांगल्या फळाची इच्छा धरून वाईट कृत्य केल्यास फळ असे असेल?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
कुकर्म आणि सत्कर्म
शेवटी सामान्य मनुष्य हा त्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे चांगले-वाईट ठरवीत असतो.गीतेमध्ये कोणती कर्मे सात्विक,राजसी अथवा तामसी याची त्या काळानुसारची वर्गवारी दिलेली आहे.पण मनुष्याला ते उमजेलच असे नाही. फार तर त्याच्या दृष्टीने जे चांगले, ते तो करेल.पण त्याचे खरे मूल्य काय हे कोणीतरी ठरवायला हवे. इथे या सर्व कर्मांचे मूल्यमापन करणारा असा कोणीतरी तिसराच 'तो' कल्पावा लागतो.
तेही असो. एक उदाहरण पाहू. कृष्णाने कंसाचा वध केला; तो काम,क्रोध इ. विकारांनी प्रेरित होऊन केला नाही, तर निष्काम कर्तव्यभावनेने केला. त्यामुळे त्याचे फळ आणि संचित कृष्णाला लागू नाही आणि ते भोगण्यासाठी पुनर्जन्मही नाही. शिवाय हा जरी 'खून' असला तरी जगाच्या दृष्टीने(आणि कृष्णाच्याही) ते एक सत्कृत्यच होते.अर्थात कृष्ण हा महात्मा, योगेश्वर मानला गेला आहे, त्यामुळे त्याची प्रज्ञा स्थिर असणे गृहीत आहे. त्यामुळे त्याच्या कर्माचे मूल्य ठरवायला आणखी कोणाची आवश्यकता भासली नसावी.
एकंदरीत गुंतागुंतच आहे.
अवांतर: इथे आणखी एका अगदी विरुद्ध अशा 'महात्मा वध/ह्त्या' प्रकरणाची आठवण होते आहे.
कॉलिंग रिटे आणि यनावाला
शरदकाका, पुनरागमनाबद्दल अभिनंदन. लेख व्यवस्थित वाचून प्रतिसाद देईन. सध्या जागा राखून ठेवते.
पासपोर्ट
मागच्या जन्मीचा पासपोर्ट या जन्मी चालत नाही. नवीन काढावा लागतो. यावरून हे सिद्ध होते की पुनर्जन्म नाही.
मागच्या..
"मागच्या जन्मीचा पासपोर्ट.. " इथेच सिद्ध होते की पुनर्जन्म आहे :)
---------------------
-धनंजय कुलकर्णी
व्वा
"मागच्या जन्मीचा पासपोर्ट.. " इथेच सिद्ध होते की पुनर्जन्म आहे
व्वा
चांगले / वाईट ?
चांगले / वाईट याला डिफाइन करताल का जरा ?
---------------------
-धनंजय कुलकर्णी
धावता आढावा, ऋग्वेद, बौद्ध
चांगला आढावा.
ऋग्वेदात याविषयाबाबत फारसे नाही, असे ऐकले होते. वरील ऋचांचे संदर्भ चांगले आहेत. पण त्या ऋचा वाचून सकृद्दर्शनी पुनर्जन्माबाबत संकेत मिळाला नाही. नीट वाचून बघतो.
माहिती हिंदू धर्माबाबत आहे, हे स्पष्टच केले आहे, पण आधी यादीत बौद्ध धर्माचा उल्लेख केला आहे, त्याअनुषंगाने... पुढील वाक्य हिंदू धर्माबाबत नव्हे, तर व्यापक वाटले :
बौद्ध धर्म अनात्मवादी आहे, तरी पुनर्जन्म स्वीकार करतो. आत्मा नसलेल्या कर्माच्या भेंडोळीचा पुनर्जन्म होतो. (नाहीतरी त्या धर्माच्या मते एकच जिवंत पिंड एका क्षणापासून दुसर्या क्षणापर्यंत टिकते, म्हणजे काय? म्हणजे आत्मा नसलेली कर्माची-जडतत्त्वांची-वगैरे भेंडोळीच टिकते.) म्हणजे आत्मा मानल्याशिवायही पुनर्जन्म मानणे शक्य आहे, उद्धृत वाक्याप्रमाणे व्यापक स्वयंस्पष्ट विधान नाही.
कर्माचे मूलभूत तत्त्व (म्हणजे जडवस्तूंमधील रचना आणि हालचाल क्षणापासून पुढच्या क्षणापर्यंत चालू राहाणे) ठीक वाटते. मला वाटते, की तीनही धर्मात "कर्म म्हणजे काय" हे मुळात समजावताना जडवस्तूंचे उदाहरण देतात. हे निरीक्षणाने ठीक वाटते. त्या तत्त्वापासून जीवांबाबत केलेला विस्तार मात्र कल्पनारम्य आहे.
यातील मुख्य दोष म्हणजे हिशोबाचा ताळा जमण्याचा आहे. "एक जीवित-पिंड" संपल्याचे दिसल्यावर त्यातील जडपदार्थ आणि जडपदार्थांच्या जीवजंतूंमध्ये खास दिसणार्या चलनवलनाचा हिशोब नंतरच्या काळातल्या काही जीवित-पिंडांमध्ये दिसतो. मात्र यांत गणिताचा ताळा जमत नाही. त्यामुळे जीवितपिंडांची संख्या (स्वनिरीक्षणाचे सामान्यीकरण करून प्रत्येक जीवितपिंडाला आत्मा असावा, असे, म्हणजे आत्म्यांची) कालक्रमाने कमी-अधिक होण्याचे निरीक्षण व्हायला हवे होते. त्यामुळे कालक्रमाने तोच आत्मा कुठला हे सांगणे हिशोबाच्या दृष्टीने ठीक नाही. बौद्धांनी तरी या हिशोबाच्या मुद्द्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते, असे राहून-राहून वाटते. त्यांना कर्माच्या भेंडोळ्या तुटून एकाच्या अनेक होणे, किंवा मिसळून अनेकांच्या एक होणे, हे मानण्यात काहीच मूलभूत विरोध नाही.
मात्र हिशोबाकडे दुर्लक्ष हे इतिहासाच्या दृष्टीने ठीकच आहे. हिशोबाचा ताळा जमण्यासाठी निरीक्षण सूक्ष्म असावे लागते. ते नसल्यास हिशोबाबाबत कल्पनाविलास करण्याशिवाय गत्यंतर नाही. तरी "लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ आत्मा-संख्या" हा कल्पनाविलास म्हणजे जरा निष्काळजीच वाटतो.
सहज गंमत म्हणून-
सांख्यिकीचा विदा गोळा करणे कठिण काम आहे. तरीही जगातल्या समस्त पशुपक्षीवनस्पतीकीटकमत्स्यादि जीवांची संख्या कॉन्स्टंट रहात असते असे विधान कुणाकडून आल्यास नवल नाही. शिवाय हिशोब चुकला तर बिरबलाप्रमाणे - "कमी भरले तर अन्य ग्रहावर गेले असतील, जास्त भरले तर अन्य ग्रहावरून आले असतील" असे विधान करता येईलच. ('एलियन्स आहेत/नाहीत' हेही असेच एक विधान आहे.) ;)
हिंदू तत्त्वज्ञान
हिंदू तत्त्वज्ञान हे गहन,गुंतागुंतीचे,समजण्यास कठिण आणि(त्यामुळेच कदाचित) परस्परविरोधी दावे अथवा भूमिका असणारे वाटते. त्यात शिरल्यास आमच्यासारख्यांचा अभिमन्यूच व्हायचा. असो. इथे फक्त 'कर्मणि एव अधिकारः ते' या श्लोकाविषयी सांगावयाचे आहे. इथे भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे अधिकारक्षेत्र दाखवून देतात. ते कर्म करणे इतकेच केवळ आहे. कर्माचे फळ (मिळेलही,पण ते) काय अथवा कसे असावे हे ठरवणे हे अर्जुनाच्या अधिकारक्षेत्रात नाही.(म्हणून)
कर्मफळाचा हेतू बाळगणारा असा तो होऊ नये,अर्थात कर्माचे फळ अमुकच मिळेल अशी इच्छा त्याने धरू नये. मात्र अकर्मन् म्हणजे काहीच न करण्याच्या, रिकामटेकड्या अवस्थेतही त्याने राहू नये.
लेख आवडला
लेख आणि त्यातील मुद्दे आवडले.
या लेखात अनेक वाद दडलेले आहेत. केवळ हिंदु, बौद्ध, जैन (शीख?) या भारतीय धर्मात नसले तरी इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यु धर्मातही यातील काही मुद्यांचा समावेश होतो.
माणसाला स्वतंत्र बुद्धी (फ्री विल) असते. या स्वतंत्र बुद्धीत आणि नियत जगात (डिटर्मिनिज्म) विरोध आहे. कर्मविपाकाचा सिद्धांत बराचसा नियत जगाकडे झुकतो. त्यामुळे लेखात लिहिलेला विरोधाभास हा त्या पद्धतीचा आहे. अमुक एका योनीत जन्म झाला म्हणून त्या योनीचे आणि जन्माच्या वेळच्या परिस्थितीचे (आणि आनुवंशीकतचे) गुण चिकटतात आणि त्याबरोबर धार्मिक पापपुण्य बुद्धीही येते. मग पाप वा पुण्य केली तर फळे स्वीकारणे हे नीतिस धरून आहे का? (म्हणजे हे करणारा जगन्नियंता न्यायी आहे का?) असाही त्यात प्रश्न येतो.
लेखात या प्रश्नाचा चांगला मागोवा घेतला आहे. माझ्या माहितीनुसार (आणि हा दुवा पाहिल्यावर ) ऋग्वेदातील पुनर्जन्माचा उल्लेख पुसट आहे. कर्मसिद्धांत वेदात, आरण्यकात व उपनिषदात फारसा नाही (चु.भु.द्या.घ्या.). गीतेत तो आहे. बौद्ध धर्मात याबद्दल एकवाक्यता नाही. (पुनर्जन्म आहे की नाही यावर उत्तर नाही.) जैनांचे मला फारसे माहित नाही.
गीतेतील कर्म शब्द नेमका कशाबद्दल आहे याबद्दल मला शंका आहे. तो बहुदा कर्मकांडातील कर्मांबद्दल असावा. दुसरा तिसरा अध्याय वाचल्यावर 'कर्म म्हणजे आपण धरतो ती सर्व कामे' असा अर्थ त्यात दिसला नाही. यज्ञयाग वगैरे करताना फळाची इच्छा धरू नये असा निष्काम कर्मयोगाचा अर्थ मला जास्त योग्य वाटतो. निष्काम कर्मयोग हे गीतेचे मर्म आहे हे मला फारसे पटलेले नाही. कोणीतरी मला ते पटवून देईल अशी मला आशा आहे. मी धरलेला अर्थ धरला (कर्म हे कर्मकांडापूरते मर्यादित केल्यावर) लेखात व्यक्त केलेला विरोधाभास येत नाही.
कर्मविपाकाचा सिद्धांत (ज्यात सततचा पुनर्जन्म आहे.) हा श्राद्धकर्म सिद्धांतास छेद देणारा आहे. तसेच स्वर्ग-नरक सिद्धांताची गरज काढणारा आहे. हाच सिद्धांत परमेश्वराविना (ज्यास बरे वाईट करण्याची शक्ति आहे.) चालतो. त्यामुळे कधी कधी परमेश्वर न मानणारे या गटात येऊ शकतात. बुद्ध धर्मियांमधे कर्मविपाक मानतात पण परमेश्वर मानत नाही.
हा सिद्धांत मानवाला निष्क्रिय बनवतो आहे त्यात समाधान मानून घ्यायला सांगतो असा त्याविरोधात मुद्दा मांडला जातो. या मुद्याशी मी फारसा सहमत नाही.
प्रमोद
गीता प्रवचने
विनोबा भावे यांनी अतिशय सोप्या रितीने गीता प्रवचने या छोटेखानी पुस्तकात अर्थ समजावला आहे. (पवनार वर्धा, वेथून प्रकाशित)
मिळाल्यास नक्की वाचा. त्यात कर्म हे रोजच्या जगण्यातील कर्म असेच मानले आहे.
येथे मला गीता प्रवचने भाषांतरीत हिंदीतून ऐकण्याची सोय आढळली.
हे मी ऐकलेले नाही. कसे आहे ते कुणी ऐकल्यास कळवावे.
-निनाद
कर्मण्येवाधिकारस्ते
गीताप्रवचने मी वाचली नाहीत. पण त्यात कर्माच्या दोन अर्थांबद्दल उहापोह आहे का? तसे असल्यास वाचायला आवडतील. (विनोबांचे लिखाण मला आवडते.)
रोजच्या जीवनातील कर्म हा अर्थ, कर्म करण्याचा 'अधिकार' असण्याशी जुळत नाही. या उलट असा अधिकार असणे हे कर्मकांडांबाबत म्हणू शकतो. इथून माझी शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर या श्लोकाच्या आसपासचा भाग वाचला. रोजच्या कामांना त्यात आणले आहे असे कुठे दिसले नाही.
प्रमोद
या विषयी
बाबा महाराज आर्वीकर - गीता प्रबोध तसेच पूर्णवादी साहित्यातील भाष्य अवश्य वाचा. धन्यवाद.
कर्म
कर्म म्हणजे नित्यकर्म,प्राप्तकर्म,कर्तव्य,काम. भगवान् श्रीकृष्ण असे सांगतात की अर्जुनाचे (आणि पर्यायाने मानवाचे) अधिकारक्षेत्र (जुरिस्डिक्शन् म्हणूया का?) हे फक्त (दिलेले, वाट्याला आलेले, ठरवलेले) काम करण्यापुरतेच मर्यादित आहे. (जे काही असेल ते) काम करणे या क्रियेवरच फक्त त्याचा अधिकार आहे.त्या क्रियेचे परिणाम काय होतील हे ठरवणे हे त्याच्या हातात नाही. सबब,(जी गोष्ट आपल्या हातात नाही, त्या) परिणामांचा विचार न करता त्याने कर्मात मग्न असावे. (मात्र,) त्याने सदैव कृतीशीलच राहावे, रिकामे कधीही राहू नये.
पास
फारच किचकट विषय. पास.
कशासाठी?
पुनर्जन्म, कर्मविपाक इ. आहे असे म्हणणारे अंधारात तीर मारत आहेत कारण ते खरे असल्याचा, कमीत कमी ते खरे आहेत असे दूरान्वयाने का होईना सुचवणारा, कोणताहि पुरावा वा स्वानुभूति गेल्या चारपाच हजार वर्षात - जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली असे म्हणता येईल - कोणीहि नोंदवून ठेवलेला नाही.
पुनर्जन्म, कर्मविपाक ह्यामध्ये काही अर्थ नाही, मृत्यूनंतर कयामतच्या दिवसापर्यंत वाट पहायला हवी असे म्हणणारेहि कोठलाच पुरावा वा स्वानुभूति दाखवू शकत नाहीत.
दोनही बाजूंना स्वयंसिद्ध प्रेषित वा तत्त्वज्ञ उपस्थित आहेत. दोनहि पक्ष तर एकाच वेळेस खरे असू शकत नाहीत हेहि स्पष्ट आहे.
तर मग पाणी घुसळून लोणी निघेल असे आपल्याला का वाटते?
श्राद्धपक्ष
लेख आणि प्रतिसाद आवडले.
विसंगती आहे खरी. विशेषतः श्राद्धपक्षात सर्व पितरांना आवाहन केले जाते तो प्रकार बाहेरून भारतात येऊन तर रुजला नसावा? श्राद्धपक्ष हा उन्हाळ्यानंतर येतो. पाश्चात्य देशांत उन्हाळ्यानंतर शेतांची कापणी झाली की हॅलोवीन, ऑल सेंट्स डे, डे ऑफ द डेड वगैरे साजरे होतात. अदमासे त्याच सुमारास आपल्याकडे पितृपक्ष साजरा होतो. ज्याप्रमाणे पाश्चिमात्यांत या वेळी मृतात्मे लोकांना भेटायला येतात त्याचप्रमाणे हिंदु पौराणिक कथांत मृतात्मे पितृलोकांतून पृथ्वीवर आपल्या वंशजांना भेट द्यायला येतात असे समजतात.
कर्मविपाक वगैरे बाजूला ठेवला तरी जोपर्यंत माणसाला जगण्याची आसक्ती आहे तोपर्यंत पुनर्जन्माला मरण नाही. :-)
माझे प्रश्न
>>हिंदू तत्त्वज्ञान हे गहन,गुंतागुंतीचे,समजण्यास कठिण आणि(त्यामुळेच कदाचित) परस्परविरोधी दावे अथवा भूमिका असणारे वाटते. त्यात शिरल्यास आमच्यासारख्यांचा अभिमन्यूच व्हायचा. असो.
स्वतःच्या बुद्धीला कमी लेखून संशयाचा फायदा का द्यावा? सरळ परस्परविरोधी आहे म्हणावे.
>>कोणत्याही फळाची अपेक्षा न करता वाईट कृत्ये केली तर मोक्ष नक्की! बरोबर का?
सदरचे चांगले कृत्य / वाईट कृत्य हे निकष हिंदू/वैदिक धर्मीयांनाच लागू असावे का? म्हणजे अफजलखानाने देवळे फोडणे हे कृत्य चांगले की वाईट हे कसं ठरवायचं? अगदी अफजलखान मुसलमान असल्यामुळे त्याला पुनर्जन्म नसला तरी.....
की अफजलखान हा मनुष्यांत मोजायचा नाही?
बाकी गीतेतली "फळाची आशा न धरता कर्म/कर्म करण्याची सक्ती" (२.४७) हे तत्त्वज्ञान नसून प्रस्थापितांचा नागडा स्वार्थ आहे.
नितिन थत्ते
वकील कोण?
शरद यांनी स्वतःचे मत दिलेले नाही, उद्धृत माहितीच्या सत्यतेचा बचाव करण्याची जवाबदारी त्यांनी नाकारलेली आहे. त्यामुळे, या धाग्यावर गंमत मिळणार नाही. अन्यथा, पुनर्जन्म कल्पनेची वाट लावण्यासाठी अनेक युक्तिवाद देता येतील.
एक बचावकर्ता, एक अधिकृत पुस्तक, इ. एक खिडकी योजना नसेल तर रामोन ल्यूलच्या यंत्राने किंवा कळफलक बडविणार्या माकडांच्या मदतीने अनेक आवृत्त्या बनविता येतील. किती आवृत्त्यांचे खंडन करीत बसावे? भिन्नभिन्न धर्मग्रंथांत मांडलेले पुनर्जन्माचे विविध उल्लेख एकमेकांशी सुसंगत नाहीत. मला वाटते की हिंदू धर्म विकेंद्रित असल्यामुळेच टिकून राहिला. असो.
तत्त्वज्ञान
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्य स्यसंशय:||
हे कर्मविपाकबिपाक फक्त मनाची समजूत काढण्यासाठी आहे. काळाच्या अनिश्चित प्रवाहामुळे घडणार्या कोणत्याही घटनेचा काहीही कार्यकारणभाव नसतो. मानवाच्या विकसित बुद्धीमुळे असा कार्यकारणभाव शोधण्याची निष्फळ धडपड तो करतो.'मामानुस्मर' यासाठी की 'भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे' हे आश्वासन - मानसिक पाठबळ साशंक मनाला हवे असते.
बाकी पुनर्जन्म, गतजन्माचे स्मरण इ.इ. जे असेल ते असो. प्रत्येक मनुष्याला भावना असतात.त्यांचा आदर आहे.:)
कर्मसिध्दांत
या चर्चेवरून हीराभाई ठक्कर यांचे 'कर्मसिध्दांत' हे पुस्तक आठवले. बर्याच दिवसांपूर्वी मराठी अनुवाद वाचनात आला होता.
-स्वधर्म
गृहीतके
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कर्मसिद्धान्तात तीन मूलभूत गृहीतके आहेत असे दिसते.ती अशी:
*प्रत्येक कर्माचे फळ कर्त्याला मिळतेच.ते कर्त्यालाच मिळते/भोगावे लागते.
*सत्कर्माचे फळ चांगले म्हणजे कर्त्याला सुखकारक असते.
*दुष्कर्माचे फळ वाईट म्हणजे कर्त्याला दु:खदायक असते.
ही गृहीतके नीतीला धरून आहेत. न्याय्य आहेत. म्हणून ती खरी असायला हवीत असे आपल्याला वाटते .आपण तसे गृहीत धरतो. वस्तुतः या गृहीतकांना सैद्धान्तिक वा आनुभविक आधार नाही.
>सत्कर्माला कधी चांगले फळ मिळते तर कधी वाईट.
>दुष्कर्माचे फळ कधी दु:खदायक असते तर कधी सुखकारक.
>योजनाबद्ध प्रयत्नपूर्वक काम करूनही काहीच फळ मिळाले नाही असेही क्वचित् घडते.
म्हणजे कृतकर्माचे फळ यादृच्छिक असते असे अनुभवास येते.
..
दुष्कृत्य करणार्याला त्याची कटुफळे निसर्गतः आपोआप भोगावी लागतील असे आपल्याला वाटते.पण न्याय नैसर्गिक नसतो . निसर्ग उदासीन आहे.दुष्कर्मीला दंडण्यासाठी माणसाने न्याय व्यवस्था निर्माण केली. तसेच सत्कार्यासाठी मानसन्मान, पारितोषिके ठेवली.(याचा अल्प स्वल्प का होईना,उपयोग होतो.)
वरील तीन गृहीतके सत्य असलीच पाहिजेत या अट्टहासापोटी त्यांच्या येन केन प्रकारेण समर्थनार्थ पुनर्जन्म,संचित, प्रारब्ध,क्रियामाण अशा भ्रामक कल्पनांचा डोलारा उभा करावा लागला.कर्मसिद्धान्ताचे हे एक संभाव्य कारण मानता येईल.
....याहून अधिक संभवनीय म्हणजे सत्ता अबाधित राखण्यासाठी राजे आणि धर्मगुरू यांनी संगनमताने केलेली ही धूर्त योजना असू शकेल.
पटले.
सुंदर् प्रतिसाद्.आवडला.
कर्मफळसिद्धांत
हा मानायचा तर त्यासाठी एक पायाभूत सूत्र मानणे आवश्यक ठरते. ते म्हणजे कोण्यातरी तिसर्या शक्तीची कल्पना-देव,जगन्नियंता,प्रकृती,परमात्मा वगैरे. कारण मनुष्य त्याच्या बुद्धीनुसार सत्-असत् चे अर्थ लावतो.काय सत् आणि काय असत् हे समजावणारी स्वतःची सदसद्विवेकबुद्धी त्याने जागृत ठेवावी अशी अपेक्षा असते. ही बुद्धी जितकी जागृत आणि तीक्ष्ण तितका त्याचा सदसत् चा विवेक सूक्ष्म असे म्हणता येईल. कर्म केवळ त्याच्या दृष्टीने चांगले/वाईट असून चालत नाही. त्या विश्वनियंत्याच्या दृष्टीने ते तसे ठरायला हवे. 'त्याला' काय आवडेल ह्याचा विचार जेव्हा मानवाला करता येईल किंवा मानव तो करील आणि त्याप्रमाणे वागेल तेव्हा ते कर्म सत्कर्म ठरेल. अर्थात् ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठिता,त्यालाच हा विवेक जमेल,सामान्यबुद्धींना नाही.सामान्य पातळीवरून मानवी बुद्धी प्रज्ञा पातळीवर नेण्यासाठी अनेक मार्ग गीतेत सांगितले आहेत. सांख्य,कर्म,ज्ञान,भक्ती वगैरे. हे सर्व बुद्धी स्थिर करण्याचे,बुद्धीला सतत उच्च-अत्युच्च पातळीवर नेण्याचे मार्ग आहेत. असे सतत करत राहिल्यास कदाचित् अशी अवस्था प्राप्त होईल की तेव्हा त्या मानवाची आणि विश्वनियंत्याची इच्छा एकच होईल,आत्मा आणि परमात्मा एक होतील.
गीतेत शेवटी अर्जुन सांगतो,'भगवंता हे सगळे तू मला समजावलेस खरे. पण ते मला जमले नाही तर? किंबहुना यातले काहीच मला शक्य झाले नाही तर?'
त्यावर भगवंत सांगतात,'अरे,काहीच जमण्यासारखे नसेल,तर तू फक्त माझे स्मरण ठेव'
सतत भगवच्चिंतनात,अनुसंधानात राहावे. यासाठी काहींनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला आहे.पण हे नाम, अनुस्मरण हे मंचावर पार्श्वभागी झुलणार्या एखाद्या पडद्यासारखे असावे,त्याला साक्षी ठेवून समोरची सर्व नाटके घडत राहावी,यथाशक्ती घडू द्यावी. रंगमंच रिकामा राहू नये.
विश्वरूप दर्शन व कर्मफळे
इतकं करूनही त्या अर्जुनाला काही पूर्ण बोध झाला नाही, तेंव्हा म्हणे भगवंतांनी त्याला 'विश्वरूप दर्शन' दिले. एकाच वेळी म्हणे भर दिवसा सगळे तारे, अनेक सूर्य, चंद्र अन् बरेच काही अर्जुनाच्या डोळ्यासमोर चमकून गेले..अन् मगच!
मला तरी वाटतं..
इतकी डोकेफोड करून,
शांतपणे प्रश्नोत्तरे करूनही
याच्या डोक्यात काही उजेड पडेना ..
मग भगवंतांनी याच्या श्रीमुखात एक सणसणीत दिली असावी अन मग डोळ्यांसमोर सगळे तारे - ग्रहगोल चमकल्या मुळे, पुन्हा हे (कानाखालचे) फळच काय तर कोणतेच फळ नको, अश्या निष्काम बुद्धीने तो पार्थ गांडीवाचा टणत्कार करत कर्मरत झाला असावा..
(एका चमत्काराचा 'रॅशनल' अर्थ लावला असे समजून स्वतःची पाठ थोपटणारा) आडकित्ता