"नागमंडल"

आज १९ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबर २०११ पर्यंत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे पंधरावा नाट्यमहोत्सव सुरू होत असून भारतातील विविध भाषांतील रंगकर्मी तेथे आपल्या कलागुणांचा आविष्कार करतील. मराठी मनाला 'नाट्यवेड' ही संकल्पना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, पण अशा महोत्सवाच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध प्रांतातील नाट्यविषयी कलाजीवन कशारितीने फुलत गेले आहे याचा लेखाजोखा काढता येतो.

नवी दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' तर्फेही सन १९९९ पासून प्रतिवर्षी 'भारत रंग महोत्सव' आयोजित करण्यात येतो आणि अर्थात तिथेही देशातील जवळपास सर्वच भाषातील नाट्यकलाकृती त्या त्या राज्यातील कलाकार मोठ्या हिरीरीने, उत्साहाने सादर करतात. दिल्लीतील सफदर हाश्मी मार्गावर असलेल्या 'श्रीराम भारतीय कला केन्द्र' इथे [तसेच अन्यही छोटीमोठी नाट्यथिएटर्स असतातच] प्रामुख्याने सादर होत असलेल्या या नाट्याविष्कारांना रसिकांची लोटणारी गर्दी पाहिली की 'लोक टीव्हीपुढे २४ असतात' ही उक्ती खोटी वाटू लागते.

या लेखाचे प्रयोजन एवढ्यासाठी की, १९९९ साली प्रथमच भरविण्यात आलेल्या अशा देशव्यापी नाट्यचळवळीतील सादरीकरणाचे पहिले मानाचे पान देण्यात आले होते ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे रंगकर्मी श्री.गिरीश कर्नाड यांच्या 'नागमंडल' या दोन अंकी नाटकाला. एका लोककथेवर आधारित आणि स्त्री-पुरुषाच्या [किंवा पती-पत्नीच्या] एकनिष्ठतेच्या प्रश्नावर विचार मांडणारे 'नागमंडल' हे केवळ कन्नड भाषेतीलच नव्हे तर भारतातील जवळपास सर्व मान्यताप्राप्त भाषेतून त्या त्या राज्यात सादर केले गेलेले नाटक म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरणार नाही. देशात कोणत्याही निमित्ताने भरल्या जात असलेल्या थिएटर मूव्हमेन्टमध्ये कर्नाडांच्या या नाटकाचा समावेश - सादरीकरण असो वा चर्चाविषय असो - असतो. भारतातीलच नव्हे तर इंग्लंड अमेरिकेतीलही कित्येक विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'नागमंडल' चा सिलॅबसमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कर्नाड यांचे "नागमंडल" हे नाटक दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या काही सर्पविषयक लोककथांवर आधारित आहे. कर्नाटकातील दोन लोककथांचे हे एक सुंदर नाटकीकरण आहे. भारताच्या अनेक भागात नाग-पंथाचे अस्तित्व आपणास आढळून येते. 'नागमंडल' मध्ये कर्नाड यानी दोन लोककथांचे एकच गुंफण केले आहे. पहिली लोककथा सामान्यपणे दंतकथांच्या विरोधभासात्म दुहेरी स्वरूपावर प्रकाश टाकते : त्याना स्वतःचे म्हणून एक खास अस्तित्व आहे आणि ते कथन करण्यावर अवलंबून नसते. तथापि एका कलाकाराकडून दुसर्‍याकडे अशी ती सांगितली गेल्यानंतरच त्यांच्या असण्याला अर्थ प्राप्त होतो. ह्या कथेतच दुसरी एक लोककथा दडलेली आहे - ती आहे 'राणी' या नवविवाहितेची गोष्ट. "लग्नबाह्य संबंधातून गर्भवती राहिली आहे" अशा नवर्‍याच्या आरोपावर ग्रामपंचायतीसमोर जाब देताना [खरेतर आपल्या आयुष्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी] ती काल्पनिक कथा रचते. कल्पित आणि अर्धसत्यावर जगण्याची मानवी गरज राणीची बिकट अवस्था टोकदारपणे व्यक्त करते.

वैवाहिक जीवनाच्या एका संवेदनशील प्रश्नाला नाटक स्पर्श करते. नाटकाची शैली लोककथेची आहे आणि त्याचे स्वरुपही तसेच आहे आणि नाटक एक प्रश्न स्पष्टपणे विचारते - 'खरा पती कोण ?' एका निष्पाप मुलीशी लग्न करणारी आणि स्वत:च्याच सुखात सदोदित रममाण होणारी व्यक्ती [तिचा बाहेरख्याली नवरा] की जी त्या विवाहित स्त्रीला जीवनाचा खराखुरा आणि परिपूर्ण आनुभव देणारी व्यक्ती [नाग]. नाटक प्रामुख्याने तीन व्यक्तीवर केन्द्रीत आहे ~ अप्पाण्णा, त्याची पत्नी राणी, आणि नागराज - जो मानवाचे रूप धारण करू शकतो [लोककथेत असे उल्लेख असतात].

कर्नाड यांच्या लेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट असे आहे की ते भूतकाळाचा वापर करून वर्तमानकाळावर प्रकाश टाकतात. त्यासाठीच 'नागमंडल' ह्या नाटकात त्यानी प्राचीन आणि आधुनिक स्थिती यांचा संयोग घडवून आणला आहे. त्यानी मांडलेला प्रश्न [पतीपत्नी एकनिष्ठतेचा] आजही तितकाच प्रखर नि टवटवीत आहे आणि त्याची दाहकता आजही भारतीय स्त्री-जीवनाला पोळून काढते आहे. एका पारंपारिक लोककथेचा वापर करून ते वर्तमानावर प्रकाश टाकतात आणि अशाप्रकारे भूत आणि वर्तमान याना एकत्र गुंफतात. एका लोककथेमधून मानवी जीवनामधील व्यामिश्रतेचे ते दर्शन घडवतात. नाटकातून सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंतागुंतीचे दर्शन घडते. समाजात प्रचलित असलेल्या सामाजिक लांछनास्पद रुढींना नाटक छेद देण्याचा प्रयत्न करते. उदा. एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील जवळचे नातेसंबंध, पती उघडपणे व्यभिचारी असतानाही त्याचे मन जिंकण्यासाठी चालणारी भारतीय स्त्रीची हतबलता, पती कितीही बाहेरख्याली असला तरा आपण एकनिष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची विवाहित स्त्रीवरच लादलेली गरज; मात्र दुसरीकडे व्यभिचारी पतीला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल [समाजाकडून - नाटकात ग्रामपंचायतीकडून] साधा जाबही विचारला जात नाही हे प्रखर वास्तव आणि खेड्यातील न्यायव्यवस्थेचे एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी स्त्रीला 'नागाच्या वारूळात हात घाल' असा आदेश देणे- समाजाला मान खाली घालायला लावणार्‍या अशा काही महत्वाच्या समस्यांवर गिरीश कर्नाड यानी ह्या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. लोककथांचे माध्यम नाटककाराने अत्यंत यशस्वीपणे आणि कलात्मकतेने वापरलेले दिसते.

[मुद्दाम पूर्ण कथानक देत नाही. आपल्या शहरात संधी मिळाली तर जरूर या नाटकाचे सादरीकरण पाहावे - विशेष म्हणजे हे नाटक आपल्याला समजेल अशाच भाषेतील असावे असाही आग्रह धरण्याचे कारण नाही. लोककथेच्या प्रभावामुळे ते समजायला सोपे जाते. मी स्वतः 'कन्नड' भाषेतीलच याचा प्रयोग पाहिला होता, कन्नड खोलवर समजत नसल्याने त्यावेळी माझ्या हातात ऑक्सफर्ड प्रेसने प्रसिद्ध केलेला या नाटकाचा इंग्रजी तर्जुमा हाती होता, तरीही पात्रे काय संवाद म्हणत आहेत हे पुस्तकात पाहाण्याची आवश्यकताही भासली नाही, इतके ते स्टेजवरील वातावरण घरगुती वाटते.].

या निमित्ताने श्री.गिरीश कर्नाड यांच्याविषयी दोन शब्द [जरी इथल्या सर्व सदस्यांना हे नाव आणि त्यांचे कार्य माहीत असले तरी] :

गिरीश कर्नाड यांची गणना भारतातल्या आघाडीच्या नाटककारांमध्ये व नटांमध्ये केली जाते. माथेरान येथे १९३८ मध्ये जन्मलेल्या कर्नाडांचे बालपण आणि शिक्षण कर्नाटकातल्या शिरसी या गावी घडले. १९९० च्या दशकात एक विख्यात नाटककार म्हणून ते नावारुपास आले. त्यानी आपली नाटके मुळात कानडी भाषेतून लिहिली आणि नंतर स्वत:च त्यानी त्या नाटकांचे इंग्रजी अनुवाद केले. ऑक्सफर्ड येथे र्‍होड्स स्कॉलर म्हणून शिकण्याची त्याना संधी लाभली. नंतर शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम तर फुलब्राईट स्कॉलर म्हणून शिक्षण घेतले. लेखक या नात्याने कन्नड भाषेत लिहिणे ते अधिक पसंत करतात, तथापि नंतर शिकलेल्या इंग्रजी भाषेवर आणि त्यातून लिहिण्याचेही त्यांचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे. हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीशी ते संबंधित आहेत हे इथल्या सर्वच सदस्यांना माहीत असणे नवलाचे होणार नाही, इतकी त्यांची या क्षेत्रातील कामगिरी भरीव अशी मानली जाते. फिल्म इन्स्टिट्यूट आणि दूरदर्शन या दोन्ही संस्थांचे त्यानी डायरेक्टर म्हणूनही कार्य केले तसेच संगीत नाटक अकादमीचे ते अध्यक्षही होते. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला गेलेला 'ज्ञानपीठ' सन्मान त्याना लाभला आहे तसेच राष्ट्रपतींकडून 'पद्मभूषण' पुरस्कारही.

स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्यातील एक अत्यंत महत्वाचे नाटककार म्हणून त्यांचा उदय झालेला आहे. 'ययाति' हे त्यांचे पहिले नाटक अर्थातच महाभारतातील त्या राजावर आधारित असून 'फायर अ‍ॅण्ड द रेन' हे त्यांचे अगदी अलिकडील नाटकही महाभारतातील कथेवर बेतलेले आहे. 'बळी' नाटक कन्नड महाकाव्यातील लोककथेवर आधारित असून 'फ्लॉवर्स' हे संस्कृत लोककथेवर आधारित आहे. 'हयवदन' हे त्यांचे खूप गाजलेले नाटक. संस्कृतमधील 'वेताळ पंचविमाशती' च्या थॉमस मॅनने केलेल्या भाषांतरावर रचलेले आहे. 'तुघलक' हे ऐतिहासिक नाटक मोहम्मद-बिन-तुघलक या सुलतानाच्या विक्षिप्तपणाच्या गोष्टीवर बेतले आहे. दक्षिणेकडील प्रचलित सर्पविषयक लोककथा आणि समजुतीवरून श्री.गिरीश कर्नाड याना स्त्री-पुरुष विवाहसंबंधातील एकनिष्ठ्ता या मुद्यावर आधारित 'नागमंडल' हे नाटक सुचले. या नाटकावरून निघालेल्या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार तसेच अन्य डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेत वेगवेगळ्या एकोणीस ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

[सदर लेखाच्या लिखाणासाठी इंग्लिश विषयाचा प्राध्यापक असलेल्या - जो पदवी अभ्यासक्रमासाठी हे नाटक शिकवितो - एका मित्रासोबत झालेल्या चर्चेचे आणि तत्संबंधी वाचनाचे साहाय्य झाले आहे.]

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

वा! परिचय उत्तम. अनेक आभार!
बाकी, अशी नाटके पुण्यात लागली आहेत हे कुठे प्रसिद्ध होते?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

नाट्यमंदिर

"अशी नाटके पुण्यात लागली आहेत हे कुठे प्रसिद्ध होते?"

~ पुण्यात 'बालगंधर्व' पेक्षाही भरत नाट्यमंदिर अशा नाटकांसाठी किंवा एकूणच 'नव्या' समजल्या जाणार्‍या नाट्यचळवळीसाठी उपयुक्त असे. पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक यांचा या संदर्भातील इतिहास 'भरत'शीच जोडला गेलाय. अर्थात हेही मान्यच करावे लागेल की मुंबईच्या छबिलदासने प्रयोगशीलतेमध्ये जे नाव कमाविले त्या तुलनेत पुणे हे परंपरावादी नाटकांची पंढरी म्हणूनच परिचित राहिले आहे.

महाराष्ट्रातील अन्य शहरात या संदर्भात आनंदच आहे म्हणा. माझ्या कॉलेजच्या दिवसात निदान 'गॅदरिंग' च्या निमित्ताने का होईना एकांकिका वा दोन अंकी नाटकांच्या तालमी व मोडकेतोडके सादरीकरण होत असे; पण "इडियट बॉक्स" ने ह्या सार्‍या परंपरा अस्मानात धाडल्या. मुळात इन्-टोटो गॅदरिंगच सार्‍या महाविद्यालयांनी बंद केले असल्याने आता नाट्यचळवळ जिवंत असेलच तर ती मेट्रो शहरातूनच. "पणजी" त काही प्रमाणात का होईना या परंपरेशी तिथला ख्रिश्चन समाज गुंतलेला आढळतो. गोवा कला अकादमीच्या आवारात अशा प्रायोगिक नाटकांच्या [इंग्रजी] प्रयोगांविषयी नेहमी वाचायला मिळते. होणार्‍या प्रयोगांना स्थानिकांची [तशीच परदेशातून पर्यटक म्हणून आलेल्या रसिकांची] हजेरीही चांगल्या प्रमाणात असते हे मी पाहिले आहे.

उत्तम परिचय

वा! परिचय आवडला.

नाग आणि भूत हे दोन्ही प्रकार कर्नाटकात अतिशय प्रचलित. नाग आणि भूत हे दोन्ही घराण्यांमध्ये असतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे भूत अंगात शिरणे किंवा अंगात येणे असे प्रकार असतात त्याप्रमाणे कर्नाटकात नाग अंगात येणे असते. नाग अंगात आला की मनुष्य भाकिते करतो किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.

हयवदन आणि नागमंडल या नाटकांविषयी पूर्वीही ऐकले आहे.

अ‍ॅण्ड द रेन' हे त्यांचे अगदी अलिकडील नाटकही महाभारतातील कथेवर बेतलेले आहे. 'बळी' नाटक कन्नड महाकाव्यातील लोककथेवर आधारित असून 'फ्लॉवर्स' हे संस्कृत लोककथेवर आधारित आहे.

या नाटकांविषयी थोडी अधिक माहिती दिल्यास आवडेल.

नाग आणि भूत

"नाग आणि भूत हे दोन्ही प्रकार कर्नाटकात अतिशय प्रचलित."

~ केवळ कर्नाटकच नव्हेतर त्याबरोबरीने आपले राज्य, कोकण किनारपट्टी इथेही हे दोन घटक आजही तितक्याच जोरदारपणे प्रचलित आहेत. कन्नड पाठोपाठ पंजाबी भाषेतील 'नागमंडल' हे वरच्या बेल्टमध्ये हिंदीपेक्षाही लोकप्रिय झाले त्याला कारणही {भूतापेक्षा} उत्तरेत असलेले 'शंकराच्या नागा' विषयीचे प्रेम आणि भक्ती. शंकराच्या गळ्यातील नाग हा तिकडे 'रक्षक' या भावनेतून पुजला जातो. सतलज आणि धौलधर या हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात नाग हे 'इच्छापूर्ती' चे प्रतिक मानले जाते. जाट सैनिकांच्या वैयक्तिक सामानसुमानात एखादा ताईत असला तर त्यावर नागाची प्रतिकृती कोरलेली आढळेल. थोडक्यात आपल्या भागात तुम्ही म्हणता तसे 'नाग आणि भूत' याना नमस्कार करण्यामागे एकप्रकारची 'भीति' दडली आहे; तर उत्तरेत [उत्तर प्रदेश नव्हे] नाग हा सखा/साथिदार समजला जातो.

कन्नड मिथकात नागाची 'कल्याणकारी' अशीच भूमिका आहे. त्यामुळेच की काय मराठी कथा विश्वात अग्रगण्य समजल्या जाणार्‍या जी.ए.कुलकर्णी यांची हयात कर्नाटकातच गेल्यामुळे त्यांच्या कित्येक कथात नागराज येतात् [एका गाजलेल्या कथेचे नावही 'नाग' असेच आहे]. 'लक्ष्मी' या त्यांच्या कथेत देवळात अजगरा तिच्यापुढे अवतरतो आणि प्रथम त्याच्या भयावह दर्शनाने घाबरलेली लक्ष्मी त्याला 'भाऊराया' असे पुकारते. अजगर खिडकीतून जात असता ती कृतज्ञतेने त्याच्या शेपटीला हात लावून नमस्कार करते, तर जितक्या भागाला हाताचा स्पर्श झाला तितका भाग सोन्याची लड होऊन लक्ष्मीसमोर पडतो....मग ती हरखते इ. इ.

हा भागही अशाच लोककथांवर आधारित असून लेखक आणि अशा कथांना सांस्कृतिक जीवनात स्थान देणारा वाचक या दोन्हीही घटकाना तसले कथानक आपलेसे वाटते.

गिरीश कर्नाडांनी नेमके हेच केले आहे. त्याना 'मराठी' ही चांगलेच अवगत असल्याने धारवाडमध्ये एकदोनदा त्यानी जी.ए.कुलकर्णी मठात हजेरीही लावली होती. 'इस्किलार' आणि 'तळपट' ह्या जीएंच्या दोन कथा त्याना खूप भावल्या होत्या.....[दोन्हीत 'नाग' आहेतच]. आजही त्यांच्या डायरीत यातील एकातरी कथेवर चित्रपट वा नाटक बेतावे अशी नोंद असेलही.

['फायर...' आणि 'बळी' बद्दल स्वतंत्र लिहितो.]

असाच एक हिंदी चित्रपट

जवळजवळ हीच गोष्ट असलेला पण इंडो-कनेडिअन पार्श्वभूमि असलेला Heaven on Earth नावाचा दीपा मेहता-दिग्दर्शित हिंदी सिनेमा अलीकडेच पाहण्यात आला.

प्रिटी झिंटाने त्यात चांद नावाच्या पंजाबी मुलीचे काम केले आहे. पंजाबच्या ग्रामीण भागातील ही मुलगी कॅनडातील एका पंजाबी कुटुंबात लग्न होऊन येते. लग्नापूर्वी नवर्‍याच्या घरच्या शीमंतीचे केलेले वर्णन साफ खोटे असते. नवरा दारू पितो आणि minimum wage प्रकारचे काम करतो. घरात सासू-सासरा, बहीण आणि तिचे कुटुंब हेहि कायमच्या मुक्कामाला असतात. दिवसा घरातील एक खोली फक्त झोपायला येणार्‍या काही लोकांना भाडयाने दिलेली असते म्हणून सासरा दिवसभर मॉलमध्ये बसून वेळ घालवतो. नव्या मुलीने सासू-सासरा आणि घरातील अन्य लोकांची सेवा करून पुनः बाहेर नोकरी करून जमेल तेव्हढा पैसा घरात आणावा असेहि दडपण असते. माहेरून आणखी पैसे आणण्याची मागणी चालू असतेच.

अशी संपूर्ण फसगत झालेल्या चांदला एक दिवशी नवरा भेटतो तो पूर्ण बदललेला. तो एकदम आदर्श प्रेमळ नवरा बनलेला असतो. ह्या बदलेल्या नवर्‍यावच्या प्रेमात चांद पडते पण तिला लवकरच उमजते की हा प्रेमळ नवरा म्हणजे खरा एक घराबाहेरच्या बिळात राहणारा नागराज असतो.

बायको आपल्याखेरीज कोणालातरी भेटते हे नवर्‍याच्या लवकरच ध्यानी येते. उलटतपासणीत चांद नागराजाची गोष्ट सांगते पण ती कोणास पटत नाही म्हणून तिला बिळात हात घालून नागराजास बाहेर काढायला सांगतात. तिने तसे करताच सर्वांच्या देखत नागराज बाहेर पडतो आणि वेगाने दूर निघून जातो.

नंतर कामावरच्या एका जमेकन बाईच्या मदतीने चांद नवर्‍याला सोडून भारतात परतते.

सिनेमा तसा चांगला होता आणि 'नागमंडल'चीच ही गोष्ट इंडो-कनेडिअन पार्श्वभूमीवर बेतलेली आहे हे स्पष्ट दिसते. तक्रारीला जागा एव्हढीच की अशा काल्पनिक गोष्टीमध्येहि भारतातला cold-blooded cobra कनेडिअन थंडीमध्ये उघडयावर जिवंत राहू शकेल हे मानणे अंमळ अवघड जाते.

हेवन ऑन् अर्थ

दीपा मेहता यानी 'नागमंडल' नाटकावरच हा चित्रपट बेतून त्याला 'इमिग्रेशन प्रॉब्लेम्स्' चा बाजही दिलाय. कॅनडाच काय पण नवरा मुलगा 'परदेशा'त नोकरी करतो एवढ्या तुटपुंज्या केसावर त्याच्या घराण्याचा केशसंभार भलताच दाट आहे अशी कल्पना करून मुलगी त्याला द्यायची हा [वाईट तसेच उल्लू] समजला जाणारा प्रघात आजही भारतात प्रखरपणे जाणवतो आणि मग परदेशात (दीपाच्या चित्रपटात 'कॅनडा') त्या अगदी एकट्या आणि असहाय स्थितीत पडलेल्या नवविवाहीतेचे काय हाल होत असतात यावर आधारित सत्यघटना वारंवार अनेक माध्यमातून आपल्यासमोर येत असतातच. [पण शिकलो काहीच नाही, असेच म्हणावे लागेल. केवळ पंजाबच नव्हे तर महाराष्ट्रातील मुलींच्याही नशिबी असे हाल आले आहेत.]

कॅनडाच्या मुक्कामात दीपा मेहता याना अशी सासरच्या लोकांकडून फसवणूक झालेली 'मोना गिल' नावाची एक तरुण स्त्री, जी आता एका मुलीची आईही होती, भेटली. 'कॅनडात नवरा' एवढ्याच भांड्वलावर तिचा विवाह झाला होता आणि तिथे सासू+नणंद नंतर परत पतीने केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाविरूद्ध बंड करून मोना घराबाहेर पडली आणि तिने थेट कॅनेडियन एम्बॅसीही गाठली होती. कॅनेडियन सरकारही अशा अपुर्‍या माहितीवर भरवसा ठेऊन मुलींची लग्ने लावून देण्याच्या 'साऊथ एशियन झोन कंट्रीज' रितीवर नाराज होतेच. त्यांच्या माहिती विभागाने 'मोना गिल" ला केन्द्रस्थानी ठेवून एशियन जनजागृतीसाठी एक डॉक्युमेन्टरीही प्रदर्शीत केली. दीपा मेहता यानी ती पाहिली तसेच मोनाबरोबर संवादही साधला होता.

त्यापूर्वीच त्यानी नवी दिल्लीत नीलम मानसिंग दिग्दर्शित हिंदी 'नागमंडल' नाटक पाहिले होते व त्यातील 'आप्पाण्णा' ची भूमिका ताकदीने सादर केलेल्या 'वंश भारद्वाज' च्या अभिनयाने त्या प्रभावितही झाल्या. पुढे कॅनेडियन सरकारच्या पब्लिसिटी विभागाकडून 'इमिग्रेशन प्रॉब्लेम' विषयासंदर्भात चर्चा सुरू झाली त्यावेळीच 'नागमंडल' आणि 'मोना गिल' या दोन्ही कथा एकत्र गुंफण्याचा त्यानी निर्णय घेतला, त्याचीच परिणती म्हणजे "Heaven on Earth". नाटकाप्रमाणेच चित्रपटातही त्यानी वंश भारद्वाजलाच नायकाची भूमिका दिली. प्रीतीने 'राणी' साकारली.

[वरील प्रतिसादात थंडीचा उल्लेख आला आहेच. शूटिंगच्या वेळीही कॅनडातील -२० डीग्री सेल्शिअस तापमानात प्रीतीसह सर्वच कलाकारांनी काम केले होते.]

मुलगा माझाच

पहिल्या जगातील परदेशात होणार्‍या स्त्रियांच्या फसवणूकीच्या अनेक प्रकारांपैकी एका सत्यकथेवर मराठीत एक पुस्तक आहे. त्या 'मुलगा माझाच'चा परिचय मागे इथे करून दिला होता त्याची आठवण झाली

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

परिचय आवडला

नागमंडल नाटकाचा परिचय आवडला. लेख वाचून नाटक पहाण्याची उत्सुकता जागृत झाली.
श्री कोल्हटकरांनी सांगितलेल्या कथेतही विलक्षण साम्य आहे. मूळ लोककथाही वाचायला आवडेल.
यावरून उद्युक्त होऊन नागमंडलचा शोध घेतल्यावर, लक्षात आले की १९९७ साली त्यावर सिनेमा निघाला होता. (नाटक त्यापूर्वीचे.) हेवन ऑन अर्थ (विदेश) हा सिनेमा त्यानंतरचा (२००८).

अवांतरः नेट धुंडाळणे इतके सोपे असायला नको होते :(

प्रमोद

वा. उत्तम परिचय

वा. उत्तम परिचय.

दर्जेदार भारतीय नाटके बघण्याची संधी मला हवी तितकी मिळत नाही, याबद्दल शल्य वाटते.

थोडे अवांतर

धनंजय, हल्ली सुदैवाने online खूप काही मिळते. उदा. संपूर्ण घाशीराम, नव्या संचातले पण जुन्यासारखेच केलेले, http://www.youtube.com/watch?v=-UNf-B-J0ek येथे उपलब्ध आहे. तेथेच परवा मला 'भवानी भवाई' सापडला. http://apalimarathi.com/ येथे बरेच चांगले मराठी चित्रपट आणि नाटके आहेत.

नवा शोध

आत्ताच शोध लागला की 'नागमंडल' असा कर्नाडांचा सिनेमा यूटयूबवर पूर्ण उपलब्ध आहे, पण तो कन्नडमध्ये असून त्याला इंग्रजी subtitles नाहीत.

सबटायटल्सचा प्रश्न

"पण तो कन्नडमध्ये असून त्याला इंग्रजी subtitles नाहीत."

~ होय. बेळगांवच्या एका डीव्हीडी विक्रेत्यांकडे 'संस्कार', 'घटश्राद्ध' आणि 'नागमंडल' अशी राष्ट्रीय पारितोषिके विजेते चित्रपटांची एकत्रित अशी डीव्हीडी उपलब्ध होती. मी फार आनंदलो होतो, पण त्यावरील प्रिन्टिंगचा दर्जा पाहून मनी पाल चुकचुकली होतीच ~ पायरेटेड असणार त्याबद्दल. तो सेल्समन कॉपी प्ले करून दाखविण्यास कसाबसा तयार झाला, त्यावेळी स्क्रीनवर पाहून समजले की या तिन्ही चित्रपटांना इंग्लिश सबटायटल्स नसणार. डीव्हीडीचा दर्जाही हातही लावू नये असाच होता. पण आमच्या विनंतीवरून त्या मुलाने रॅपर फाडले होते म्हणून मग त्यापायी 'अब्बा' ग्रुपची ओरिजिनल सीडी घेतली.

उत्तम

परीक्षण आणि कर्नाडांबद्दल वाचून आनंद झाला. दोन तीन वर्षांपूर्वी कर्नाड विस्काँसिनच्या मॅदिसन शहरात प्रत्येक वर्षी भरणार्‍या साउथ-एशियन काँफरंसला प्रमुख वक्ते म्हणून आले होते. स्वातंत्र्योत्तर भारतीय नाटकविश्वाचा आढावा भाषणात त्यांनी फार मार्मिकपणे घेतला. तेथिल नाट्यशास्त्र(?) विभागाच्या लोकांनी त्यांनीच इंग्रजीत अनुवाद केलेल्या "ययाति" सादर केले, आणि नंतर प्रश्नोत्तराला कर्नाड स्वत: उपस्थित होते. त्या दिवसाची आठवण करून दिलीत - धन्यवाद!

ता.कः "थ्री प्लेज" या नागमंडल, हयवदन, आणि तुघलक़ च्या इंग्रजी अनुवादाला कर्नाड यांनी लिहीलेली प्रस्तावना वाचण्यासारखी आहे.

सुंदर

लेख आवडला.

हयवदन मी अलिकडेच वाचले. नागमंडल माझ्याकडे नाही, पण उत्सुकता चाळवली आहे.

वर दिलेली कथा, प्रीटी झिंटाचा चित्रपट यांसारखाच दुसरा चित्रपट म्हणजे अमोल पालेकरचा चित्रपट पहेली. यात राणी मुखर्जीच्या नवर्‍याऐवजी एक भूतच तिच्या नवर्‍याच्या रूपाने येते.

चांगला परिचय

नाटकाचा परिचय आवडला.

कन्नड साहित्य मराठीपेक्षा अधिक समृद्ध आहे असे माझे (मर्यादीत माहिती व अतिमर्यादीत साहित्यिक जाण यांवर आधारीत) वैयक्तिक मत आहे.

कर्नाडांच्या 'फायर अँड रेन'वर आधारीत 'अग्निवर्षा' नावाचा बंडल सिनेमा पाहील्याचे आठवते.

विजयदान देठा आणि गिरीश कर्नाड

@ चित्रा ~

विजयदान देठा [राजस्थानी लेखक, ज्यांच्या कथेवर 'पहेली' आधारित आहे] आणि गिरीश कर्नाड [प्रामुख्याने कन्नड भाषिक लेखक] ह्या दोन दिग्गजांमध्ये ठळक असे कोणते साम्य असेल तर त्यांचे 'लोककथां' वर असणारे निस्सीम प्रेम. श्री.देठा तर कर्नाडांपेक्षा बारा वर्षानी ज्येष्ठ असून कर्नाड लिहिते होण्याअगोदरपासून राजस्थानी साहित्य क्षेत्रातील एक आदराचे नाव बनले होते.

मी श्री.देठा यांच्याविषयी हे अशासाठी लिहित आहे की, 'पहेली' च्या प्रदर्शनानंतर कित्येक उथळ सिनेसमीक्षकांनी तो चित्रपट [पहेली] कर्नाडांच्या 'नागमंडल' वर बेतला असल्याचे तारे तोडले होते. वास्तविक 'लोककथां' ची जादू या देशाच्या सर्व प्रांतातील धमन्याधमन्यात रुजली असल्याने तसेच अतिन्द्रीय शक्तींचा वास आणि त्यांच्या विचारांचे रोजच्या जीवनातील छाया ही अतूट असे बंधन असल्याने हरेक ठिकाणी या लोककथांचा आधार घेऊन साहित्य निर्मिती होत असतेच. युरोपीअन कल्चर आणि तिथल्या 'फोक-लोअर' मध्येही अशा चांगल्या कारणासाठी साम्य असणारी तरीही 'फसवी' म्हटली जाणारी पात्रे असतात. त्याना Doppleganger (किंवा Double Walker) असे म्हटले गेले आहे. यांच्याविषयीदेखील 'मिथ' स्वरूपात खूप साहित्य उपलब्ध आहे.

'पहेली' सुरेखच चित्रपट आहे आणि शाहरूख खान सारख्या 'सिटी ग्लॅमर' असलेल्या 'स्टार' ने ग्रामीण राजस्थानी 'किशन' च भूमिका स्वीकारणे [जरी ते 'होम प्रॉडक्शन' असले तरी] हे कौतुकास्पदच होते. राणी मुखर्जीची 'लच्छी' तर पुरेपूर उतरली आहे.

मराठीत [सिनेमा आणि नाटक दोन्ही ठिकाणी] लोककथांचा वापर करून क्वचितच निर्मिती झाली असेल.

सुंदर

खूपच छान माहिती मिळाली. नाही, नागमंडलवरून पहेली चित्रपट बेतला असावा असे वाटत नाही - पण दोन कथानकांमधली साम्यस्थळे बरीच आहेत. मलाही पहेली फार आवडला. छायाचित्रणही फारच नजरेत भरेल असे.

>लोककथांचा वापर करून क्वचितच निर्मिती झाली असेल.

+१

हयवदन आणि विजयाबाई मेहता

१९८२-८३ दरम्यान कर्नाडांच्या एका नाटकाचा-बहुतेक हयवदन- चिं.त्र्यं.खानोलकरांनी केलेला अनुवाद किंवा रूपांतर विजयाबाईंनी रंगमंचावर आणला होता. चिंत्र्यं नी कोंकणी लोककलेचा बाज वापरून रूपांतर केले होते.त्यातला 'माणसातला अपरिमित अपुरेपणा' हा वारंवार वापरला गेलेला शब्दसमुच्चय अजूनही लक्षात राहिला आहे.विजयाबाईंची कारागिरी आणि सजावट लक्षात घेऊनही प्रयोग खूपच परिणामकारक वठला होता.
अगदी अलीकडचे 'ब्रोकन् इमेजिस्' लेखनाच्या आणि कथेच्या दृष्टीने तितकेसे आवडले नव्हते. पण दिग्दर्शन, सादरीकरण आणि अभिनय ग्रेटच. संपूर्ण प्रयोग एकपात्री-खरे तर पात्रे दोन आहेत पण शबानानेच दोन्ही भूमिका वठवल्या आहेत-असूनही खिळवून ठेवणारा होता आणि याचे श्रेय शबाना आझ्मींना.त्यांचा जोरकस पर्फॉर्मन्स् आणि ऊर्जा दाद देण्याजोगी होती.

 
^ वर