भवाल संन्याशाची सुरस आणि चमत्कारिक कथा
(राही आणि प्रियाली ह्यांच्या सूचनांचा आदर करण्यासाठी पुढील लिखाण करीत आहे. हा मजकूर ३ वर्षांपूर्वी मी India-British-Raj ह्या List मध्ये लिहिला होता. त्याचे हे आणखी वाढवलेले भाषांतर आहे.)
तथाकथित भवाल संन्यासी खटला ब्रिटिश जमान्यातल्या हिंदुस्तानात आपल्या वेगळेपणामुळे अतिशय गाजला होता.
आजच्या बांगलादेशातील प्रदेशात भवाल नावाची पूर्व बंगालमधील दुसर्या क्रमांकाची मोठी जमीनदारी होती - साहिब, बीबी और गुलाम किंवा अलीकडच्या अंतरमहल अशा सिनेमात दिसते तशी. बांगलादेशातील जॉयदेबपूर हे तिचे मुख्य गाव. १७०४ सालापासून तिची मालकी एकाच रॉय चौधरी कुटुंबाकडे होती आणि आसपासच्या अन्य जमीनदार्या विकत घेऊन तिचा आकार वाढत गेला होता. २०व्या शतकाच्या प्रारंभी ती केवढी मोठी झाली होती ह्याचा अंदाज पुढील काही आकडयांवरून येऊ शकतो. १९१७ सालच्या सर्वेक्षण नोंदींनुसार तिच्याकडे त्यावेळी ४,५९,१६३ एकर जमीन होती. १९०४ साली तिने ८३,०५२ रुपये इतका शेतसारा भरला आणि खर्चवेच वजा करून तिचे रु. ४,६२,०९६ इतके उत्पन्न होते. जमीनदारीच्या श्रीमंतीची कल्पना खाली क्र.४ मधील सध्याच्या काळातील छायाचित्रांवरूनहि येऊ शकते. अन्य अनेक जमीनदार्यांप्रमाणे ब्रिटिश नोकरशाहीची तिच्यावर कडक नजर होतीच. तिचा मॅनेजर एक ब्रिटिश होता. जमीनदारीच्या श्रीमंतीची कल्पना खाली क्र.४ मधील छायाचित्रांवरूनहि येऊ शकते.
शिकारी वेषात रामेन्द्र |
जमीनदार राजा राजेन्द्र नारायण रॉय १९०१ साली वारल्यावर तिची मालकी वारसाने त्याच्या तीन अज्ञान मुलांकडे आली. तिघांनाहि शिक्षण देण्यासाठी इंग्लिश शिक्षक नेमले होते पण तिघांनीहि कोणतेच उपयुक्त शिक्षण घेतले नाही तिघेहि काही खास न करता पिढीजात पैशाचा उपभोग घेण्यात सर्व लक्ष घालून होते. दुसरा रामेन्द्र नावाचा मुलगा, ज्याचा जन्म २८ जुलै, १८८४ ला झाला होता, १९०५ च्या मे महिन्यात पत्नी बिभावती, तिचा भाऊ सत्येन्द्रनाथ बानर्जी आणि मोठया अन्य गोतावळयासह दार्जीलिंगला गेला आणि तेथेच ८ मे १९०५ ह्या दिवशी वारला. सिफिलिस हे त्याच्या मृत्यूचे कारण असावे. हिन्दु रिवाजानुसार त्याच रात्री त्याच्यावर दहनसंस्कार केला गेला अशी समजूत होती. त्याच्यामागे त्याची विधवा पत्नी बिभावती एकटी उरली आणि ती आपल्या भावाकडे कलकत्त्यास राहायला गेली.
भवाल साधु |
सोळा वर्षांनंतर, म्हणजे १९२१ साली ढाक्यामध्ये एक साधु अवतीर्ण झाला. लवकरच त्याच्यामध्ये आणि मृत रामेन्द्रामध्ये असलेले साम्य हा ढाक्यामध्ये चर्चेचा विषय झाला. त्याची एक बहीण ज्योतिर्मयी हिची तर खात्री पटली की आपला दिवंगत भाऊ म्हणजे हाच साधु आहे. पुष्कळ प्रतिष्ठित हिंदूंचेहि हेच मत होते. साधूने आपण होऊन कसलाच दावा सुरुवातीस केला नव्हता पण १९२२ साली भवालच्या भेटीत तिथल्या परिसराची त्याला खूप माहिती आहे अशी ह्या विश्वासू लोकांचे धारणा बनली. ब्रिटिश अधिकारी वर्ग मात्र साधु हा एक तोतया आहे अशा धारणेचे होते. त्याला पती म्हणून मानावयास बिभावतीने नकार दिला. कुटुंबाच्या अन्य सदस्यांनाहि हा दावा मंजूर नव्हता.
अन्य समर्थकांचा आग्रहारून अखेर साधूने लवकरच जमीनदारीतला आपला १/३ हिस्सा मागायला सुरुवात केली. जमीनदारीचा कारभार Court of Wards च्या अखत्यारात होता आणि त्यांनी हा १/३ हिश्श्याचा दावा मानावयास नकार दिला. प्रश्न सामोपचाराने मिटविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर साधूने १९३३ साली ढाक्याच्या कोर्टात दावा दाखल केला. सुरुवातीपासूनच असे स्पष्ट दिसत होते की बंगाली भद्रलोक साधूच्या मागे होते आणि ब्रिटिश राजसत्ता त्याच्या विरोधात होती.
साधूच्या बाजूने असे मांडण्यात आले की त्याचा तथाकथित म्रूत्यु हा सत्येन्द्रनाथ आणि रॉय चौधरी कुटुंबाचा डॉक्टर आशुतोष दासगुप्ता ह्यांचा कट होता, ज्यायोगे रॉय चौधरी कुटुंबाची सर्व मालमत्ता बिभावतीच्या माध्यमातून सत्येन्द्रनाथच्या ताब्यात आली असती. ह्यासाठी त्याच्यावर दार्जीलिंगमध्ये विषप्रयोग करण्यात आला आणि त्याला दहनासाठी काही जणांच्याकडे सोपविण्यात आले. ते भाडोत्री लोक त्याला घेऊन श्मशानात पोहोचले पण त्याच वेळेला मोठे पावसाळी वादळ सुरू झाल्यामुळे प्रेत तसेच ठेऊन ते आडोशाला गेले. प्रत्यक्षात रामेन्द्र मेला नव्हताच, तो केवळ शुद्ध हरपलेल्या स्थितीत होता. त्याच वेळी एक साधूंचा जथा तेथून चालला होता त्यांनी त्याला तशा अवस्थेत पाहून तेथून आपल्या बरोबर नेले. भाडोत्री लोक प्रेताकडे परतल्यावर प्रेत जागेवर नाही असे पाहून त्यांनी दुसरेच एक प्रेत मिळविले आणि त्याला रामेन्द्रच्या जागी जाळले.
तदनंतर सुमारे १५ वर्षे विस्मृतीच्या अवस्थेत तो त्या साधूंबरोबर अनेक ठिकाणी त्यांच्यातीलच एक होऊन फिरत राहिला. शेवटी ह्या फिरस्तीचा कंटाळा येऊन ढाक्यामध्ये बुरी गंगेच्या काठावर कायमचा मुक्काम ठेवण्यासाठी तो परतला. तरीहि मालमत्तेचा दावा करणे त्याच्या मनात नव्हते पण लोकांनीच त्याला पटवून दिले की तो खरा रामेन्द्र असून आपल्या मालमत्तेचा योग्य वाटा त्याने मागावा.
त्याच्या बाजूने पुरावा म्हणून जुने फोटो, पत्रे, परिचितांच्या साक्षी, शरीरावरील खुणा असा अनेकविध पुरावा दाखल करण्यात आला.
खालच्या कोर्टाचा निर्णय साधूच्या बाजूने लागला. त्याविरुद्ध Court of Wards पक्ष कलकत्ता उच्च न्यायालयात अपीलात गेला. एव्हांना दुसरे महायुद्ध सुरू झाले होते आणि एक न्यायाधीश लंडनमध्ये अडकून पडले होते. त्यांनी लंडनहून आपला निर्णय लेखी कळवल्यावर १९४० मध्ये उच्च न्यायालयानेहि २ विरुद्ध १ असा साधूला अनुकूल निर्णय दिला. त्याविरुद्ध बिभावतीने लंडनमधील प्रिवी कौन्सिलात अपील गुदरले. प्रिवी कौन्सिलने जुलै ३०, १९४६ च्या निर्णयानुसार साधूच्याच बाजूने निर्णय दिला. निर्णयात कायद्याच्या अनेक बाजूंवर विचार करण्यात आला आहे पण प्रमुख भर अशा मुद्द्यावर आहे की खालच्या दोन कोर्टांनी दिलेल्या findings of facts ना वरच्या कोर्टात आव्हान देता येणार नाही. (सर माधवन् नायर हे प्रिवी कौन्सिलचे तिघांपैकी एक न्यायाधीश होते.) दुसर्याच दिवशी तो निर्णय तारेने कलकत्त्यास कळविण्यात आला.
निर्णय समजताच दावेदार साधु कालीमंदिरात आपल्या विजयासाठी पूजा बांधण्यास गेला आणि तेथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि दोन दिवसात तो मरून गेला. बिभावतीच्या मते तोतयेगिरी करण्यासाठी ही दैवी शिक्षाच त्याला मिळाली.
ह्या खटल्याच्या विषयी अनेक अधिक तपशील येथे पाहता येतीलः
१)http://en.wikipedia.org/wiki/Bhawal_case
२)बुक्स.गूगल येथील मर्यादित वाचन पुस्तक A Princely Impostor? - The
Strange and Universal History of the Kumar of Bhawal, लेखक पार्थ चाटर्जी,
http://tinyurl.com/6ox5zv
३)वरील पुस्तकाचे परीक्षण http://www.shailaja.net/imposter.htm (हे आता उपलब्ध दिसत नाही.)
४)रॉय चौधरी कुटुंबाच्या राजेशाही निवासस्थानाचे सध्याच्या काळातील फोटो:
http://backtobangladesh.blogspot.com/2006/02/on-grounds-of-bhawal-raja.html
५)बांगलापीडियामधील लेख http://www.banglapedia.org/httpdocs/HT/B_0482.HTM
६)भवाल जमीनदारीबाबत अधिक माहिती:
http://www.banglapedia.org/httpdocs/HT/B_0483.HTM
७)प्रिवी कौन्सिलचा निर्णयः
http://privycouncil.independent.gov.uk/judicial-committee/judgements/ (ह्या पानावरून हा दुवा पकडा: 'Judgements before 1999 [Archived site]')
Comments
थेट सिनेमा बनवावा अशी
थेट सिनेमा बनवावा अशी कथा!
"मेरा साया" चित्रपटातल्या पतिपत्नींची अदलाबदल करून भरपूर श्रीमंती ओतून...
अगदी! अगदी!!
अगदी!! भन्नाट कथा आहे. मी दुपारी हे प्रकरण वर आल्यावर नेटावर शोधून वाचले होते.
अशाचप्रकारे इतर तोतयांबद्दलही लिहिले तर आवडेल. (जसे, सदाशीवभाऊंचा तोतया)
रोचक
सुरस कथानक. आणखी येऊ द्यात.
हेच म्हंतो.
-Nile
नाटक!
फारच रोचक कथा आहे.अनेक प्रसंगात नाट्य ठासून भरलेले आहे.
मात्र चित्रपटापेक्षा नाटकासाठी ही संहिता अधिक योग्य वाटते :)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
राशोमान आणि घोस्ट
जबरदस्त कथानक आणि त्या अनुषंगाने घडलेल्या घटना. अगदी प्रिव्ही कौन्सिलचा 'फाईन्डिंग्ज ऑफ दी फॅक्ट्स" चा मुद्दाही विचार करण्यासारखाच आहे. जागेवर प्रेत नाही म्हणून मयताला गेलेल्या लोकांनी दुसरे प्रेत आणून ते चितेवर ठेवले ~ साधूच्या बाजूने मांडलेला हा दुवा कच्चा दिसतो. ही खरी तर कोर्टाला न पटणारी घटना वाटायला हवी होती. पण असो. त्या काळातच कलकत्ता आणि आजूबाजूच्या प्रदेशाला भयानक अशा दुष्काळाने वेढले होते आणि इतिहास सांगतो की अगदी रस्त्याच्या कडेला उपासमारीने प्रेते पडली असली तरी त्यांच्या सडत चाललेल्या देहांची विल्हेवाट लावली जात नव्हती. त्या पार्श्वभूमीवर स्मशानात आयते 'जादा'चे एक प्रेत मिळाले असेलही.
साधू-सत्यकथा वाचत असताना मला दोन चित्रपट आठवले :
१. 'राशोमान' ~ इथेही एक मृत्यू झाला आहे, आणि चार व्यक्ती मयतासंदर्भात वेगवेगळे इंटरप्रिटेशन करीत आहेत. प्रकरण कोर्टापुढे गेले आहे. या कथेतही ती विधवा आहेच.
२. 'घोस्ट' ~ डेमी मूरला पटत नाही की तिच्या नजरेसमोरच मृत्युमुखी पडलेला तिचा प्रियकर आता जिवंत [जरी आत्म्याचा रूपाने] होऊन परत आला आहे. व्हूपी ज्यावेळी त्या दोघांच्या 'इन्टिमेट' बाबी तिला सांगते, त्यावेळी ती संभ्रमात पडते, विश्वास बसू लागतो....मग पुढील कथानक.
या अनुषंगाने सहज विचार येतो की इथली दोन्ही कोर्ट आणि अगदी प्रिव्ही कौन्सिल मध्ये 'बिभावती' ला अशा खाजगी बाबीविषयी त्या साधूला विचारण्यास सांगणे सुचले असावे की नाही. [कदाचित विचारले असेलही आणि बिभावतीने त्याला स्पष्ट नकारही दिला असेल.]
सॉमर्स्बी
३. रिचर्ड गिअरचा सॉमर्स्बी.
सुरस कोर्ट् कथा
फार पूर्वी केव्हातरी अमृत वा तत्सम मराठी डायजेस्ट् म्हणा वा कुठलातरी दिवाळी अंक म्हणा ही कथा सविस्तर छापून आली होती. तेव्हाच ती डोक्यात रुतून बसली होती. नंतर मग दर काही वर्षांनी काही नवे नवे संदर्भ मिळत गेले, तेही अधाशीपणाने वाचून काढले.अलीकडे पार्थो चटर्जीच्या पुस्तकाने या सर्वांवर कडी केली. पेरी मेसन् च्या कोर्ट् कथा अत्यंत आवडीच्या. त्यामुळे कोणतीही कोर्ट्कथा मिळाली की तिचा फडशा पाडायचा हे ठरलेलेच. ही कथा आवडण्यामागे मात्र आणखी एक कारण होते. ते म्हणजे त्याला असलेली बांग्ला पार्श्वभूमी.कथा एका खटल्याची असली तरी ती केवळ कायदेकानूंपुरतीच ऐतिहासिक नाही तर शंभर वर्षांपूर्वीच्या अविभक्त बंगालातल्या सामाजिक परिस्थितीचा तो एक दस्तैवज आहे. बंगालमध्ये ब्रिटिश सत्ता सर्वात आधी स्थापन झाली. कदाचित् त्यामुळेच की काय,तिथे इंग्रजी शिक्षणाचा प्रसार सर्वात आधी आणि अधिक झाला.त्याची प्रतिक्रिया म्हणून एतद्देशीय संस्कृतीसंवर्धनाची चळवळही जोमात सुरू झाली.गंमत म्हणजे त्याचीही प्रतिक्रिया उमटली आणि रीफॉर्मिस्ट् म्हणजे सुधारणावादी चळवळीने मूळ धरले.आधुनिक शिक्षणाचा प्रसार झाल्याने या सर्वांचे प्रतिबिंब तत्कालीन बंगाली साहित्यात पडलेले आहे.गेल्या तीन शतकांतल्या सामाजिक परिस्थितीचे जितके स्पष्ट चित्र बंगाली साहित्यातून उभे राहिले आहे तितके इतर कोणत्याही प्रांताचे नाही.रामकृष्ण परमहंसांचे बहुतेक सर्व शिष्य आधुनिकविद्याविभूषित होते.त्यातल्या बहुतेकांनी दैनंदिन्या,आत्मवृत्ते,प्रसंगवर्णने लिहून ठेवली आहेत. हे प्रचंड साहित्य धार्मिक वा आध्यात्मिक या प्रकारात मोडत असले तरी समाजशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मनोज्ञ आणि महत्त्वाचे आहे. मराठीमध्ये विवेकानंद वा अन्य संतांच्या बोधप्रद व्याख्यानांची भाषांतरे झाली पण त्यात सामाजिक वास्तवाची पार्श्वभूमी वगळली गेल्याने ती नीरस वाटतात. अपवाद एकच, चंद्रकांत खोत यांच्या दोन कादंबर्या.(एकीचे नाव दोन डोळे शेजारी. दुसरे आठवत नाही) अलीकडेच वीणा आलासे यांनी अनुवादलेल्या तीन लघुआत्मकथाही या दृष्टीने वाचनीय आहेत. असो.
अतिअवांतर झाले, असोच.
किंचित अवांतर...
<<आधुनिक शिक्षणाचा प्रसार झाल्याने या सर्वांचे प्रतिबिंब तत्कालीन बंगाली साहित्यात पडलेले आहे.गेल्या तीन शतकांतल्या सामाजिक परिस्थितीचे जितके स्पष्ट चित्र बंगाली साहित्यातून उभे राहिले आहे तितके इतर कोणत्याही प्रांताचे नाही. >>
इंग्रजांची सत्ता प्रथम बंगालात स्थापन झाल्याने सुधारणावादी चळवळी तेथे सुरु झाल्या व नंतर त्यांचा प्रसार अन्यत्र झाला हे खरे आहे, पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडण्यासाठी बराच काळ जावा लागला. हे प्रतिबिंब बंगाली व मराठी साहित्यात साधारणपणे आगेमागेच पडल्याचे आपल्याला दिसून येईल.
मराठीतील पहिली सामाजिक कथा राघो नारायण देवळे यांनी १८३८ मध्ये 'वाटसराची गोष्ट' म्हणून लिहिली. त्याच्या आधी एकच वर्ष १८३७ मध्ये मराठीत विष्णुशास्त्री बापट यांनी 'नीतीदर्पण' नीतीकथांचे संकलन लिहिले.
तत्कालीन महिलांच्या अवस्थेचे पहिले वर्णन बंगालीतील पहिली कल्पनारम्य कादंबरी असलेल्या 'फुलमणी ओ करुणार बिबरण'मध्ये असल्याची नोंद आहे. ही कादंबरी हॅना कॅथरीन मुलेन्स या लेखिकेने केवळ महिलांना समोर ठेऊन १८५२ मध्ये लिहिली.
विधवा स्त्रियांच्या हालापेष्टा व विधवा विवाहाचे समर्थन असा आशय असलेली पहिली मराठी कादंबरी 'यमुना पर्यटन' ही बाबा पदमनजी यांनी १८५७ मध्ये लिहिली. (ती वादग्रस्त ठरली तो वेगळा विषय)
आता या दोन्ही कादंबर्यांच्या काळात केवळ पाच वर्षाचे अंतर आहे. बंगालकडून आपल्याला खूप प्रेरणा मिळाली आहे आणि महाराष्ट्रापाठोपाठ या सुधारणा अन्यत्रही झिरपल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाबाबतच्या विशेषतः शाळांबाबतचे प्रयोग तर बंगाल व महाराष्ट्रात एकाचवेळी झाले होते. बंगालात ते यशस्वी झाले. महाराष्ट्रात थोडे उशिरा.