तर्कक्रीडा १६: (अ) तुंबाडचे खोत (ब) नऊ अंकी संख्या

(अ) तुंबाडचे खोत तुंबाडला बाबा खोत आणि भाऊ खोत यांची घरे समोरा समोर अहेत.बाबा खोताच्या अंगणात नुकत्याच पाडलेल्या असोल्या नारळांचा ढीग आहे. भाऊच्या अंगणात सुद्धा तसाच नारळांचा ढीग आहे.दोन्ही ढिगांतील नारळांची संख्या सारखीच (समान) आहे.
.....बाबा खोताने नारळ सोलण्याचे काम अफाट बापूला दिले. तर भाऊने सपाट बापूला.दोघांनी दुसर्‍या दिवशी सकाळी येऊन कामाला लागायचे असे ठरले.
.....सपाट बापू सकाळी लौकर आला.बाबा खोताच्या अंगणातील नारळ सोलू लागला.त्याने पाच (५) नारळ सोलले.सहावा सुळावर चढविणार एवढ्यात अफाट बापू आला.
....."अरे सपाट्या; हें काम माझें.भाऊ खोताकडचें तुझें.तूं तिकडेस जाऊन नारळ सोल. कसें?"
या प्रश्नावर होकारार्थी मान हालवून सपाट बापू समोरच्या अंगणात गेला. भाऊ खोताचे नारळ सोलूं लागला.
इकडे ढिगातील उरलेले सर्व नारळ अफाट बापूने सोलले.काम पूर्ण झाल्यावर तो सपाट बापूच्या मदतीला गेला.तिथे अफाट बापूने भाऊ खोताचे नऊ नारळ सोलले तेव्हा तो ढीगसुद्धा संपला.
तर अफाट बापूने सपाट बापूपेक्षा किती नारळ अधिक सोलले?
********
(कोडे तोंडी सोडवायचे आहे. कोणतीही लेखी मांडणावळ नसावी.)
********
(ब) नऊ अंकी संख्या :एक ते नऊ हे सर्व अंक वापरून एक नऊ (९) अंकी संख्या लिहा.(अर्थात सर्व अंक भिन्न. शून्य नाही).ही संख्या अशी हवी:
* त्या नऊ अंकी संख्येला ९ ने पूर्ण भाग जाईल.
*एककांक पुसल्यावर उरलेल्या ८ अंकी संख्येला ८ ने पूर्ण भाग जाईल.
*आठ अंकी संख्येचा एककांक पुसल्यावर उरलेल्या ७ अंकी संख्येला ७ ने पूर्ण भाग जाईल.
*या प्रमाणे सहा अंकीला ६ ने,पाच अंकीला ५ ने,चार अंकीला ४ ने, तीन अंकीला ३ ने तर उजवीकडचे सात अंक पुसल्यावर उरलेल्या दोन अंकी संख्येला २ ने नि:शेष भाग जाईल.
(योग्य विचार केल्यास संख्या लौकर सापडेल.कॅलक्युलेटरचा वापर करण्यास प्रत्यवाय नाही.कृपया उत्तर व्यनि. ने)

लेखनविषय: दुवे:

Comments

आठवण..

वालावलकरशेठ,

तुंबाडचे खोत तुंबाडला बाबा खोत आणि भाऊ खोत यांची घरे समोरा समोर अहेत.बाबा खोताच्या अंगणात नुकत्याच पाडलेल्या असोल्या नारळांचा ढीग आहे. भाऊच्या अंगणात सुद्धा तसाच नारळांचा ढीग आहे.

वा! कोडं वाचून क्षणभर देवगडात गेल्यासारखं वाटलं हो! असोल्या नारळाचा कोवळेपणा आणि गोडवा काही औरच! आणि असोल्या नारळाचा अंगरस काढून आणि तिरफळ घालून केलेली सुरमईची आमटी बाकी खासच!

आपने तो गाव की याद दिलाई! ;)

बाकी कोड्यांचं चालू द्या!

ता क - आमच्या मातोश्री श्रीमती वैदेही अभ्यंकर नित्यनियमाने सकाळमधली आपली इंग्लिश कोडी सोडवत असतात! ;)

तात्या.

ते सुग्रास जेवण!

श्री.तात्यासाहेब यांस सप्रेम नमस्कार.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! त्यातील "असोल्या नारळाचा अंगरस काढून आणि तिरफळ घालून केलेली सुरमईची आमटी.." हे वाचताना पूर्व स्मृती चाळवल्या. त्या काळी कधी लिहिलेल्या चार ओळी आठवल्या.(प्रशस्त दिसत नसले तरी इथे देतो.)

**
मनासारखी मिळे सोलकढी |
जेवाया मग अवीट गोडी |
घासावरती घास घेऊया |
मारूया भातावरती ताव| याSला जेवण ऐसे नाव ||
**

दोन घडीचा डाव..

मनासारखी मिळे सोलकढी |
जेवाया मग अवीट गोडी |
घासावरती घास घेऊया |
मारूया भातावरती ताव| याSला जेवण ऐसे नाव ||

वा वालावरकरशेठ! वरील ओळी आपण मस्तच बांधल्या आहेत. आत्ताच चालीवर म्हणून पाहिल्या. मजा आली! ;)

शेवटी काय हो, हा सगळा दोन घडीचाच डाव! तो केव्हाच संपून जातो. पण तो सुरू असताना होता होईलतो आपल्यातल्या माणसाचं माणूसपण जपण्याचा आपण प्रयत्न करायचा, तरच त्याला 'जीवन ऐसे नांव' असे म्हणता येईल!

आणि या दोन घडीच्या डावात जीव ओवाळून टाकावा अशी एखादी मिसळीची प्लेट, आईने प्रेमानं जवळ घेऊन डोक्यावर थापलेलं खोबरेल तेल, छानश्या स्कॉचचे दोन पेग, चार मनमोकळ्या शिव्या ज्यांना हासडता येतील असे एखाद् दोन जिवाचे जिवलग मित्र, आपल्या सौंदर्याने केव्हाच आपली विकेट काढणारी एखादी मादक स्त्री**, जीव तृप्त करणारं चांगलंसं संगीत, मासळीचं फर्मास जेवण, घरच्या घरी जमवलेलं एखादं पान, वर सातारी तंबाखू, एवढ्या गोष्टी मिळाल्या तरी पुरेश्या आहेत!

खरं की नाही वालावलकरशेठ? ;)

आणि हो, मासळीचं जेवण झाल्यावर पान चघळता चघळता मेंदूला खुराक देणारं आणि घटकाभर विरंगुळा आणणारं तुमचं एखादं छानसं कोडंही हवंच बरं का! ;)

असो!

'दोन घडीचा डाव,
याला जीवन ऐसे नांव!'

क्या बात है...

आपला,
(दोन घडीचा!) तात्या.

** येथे आपल्या सौंदर्याने केव्हाच आपली विकेट काढणारी एखादी मादक स्त्री किंवा बायको असं मला म्हणायचं आहे. माझ्यापुरतं बोलायचं तर मी पहिला ऑप्शन स्विकारला आहे! ;)

आपला,
(अविवाहीत!) तात्या.

४ नारळ!

४ नारळ अधिक सोलले!

नारळ

आठ

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

आठ

आठ श्रीफळे अधिक सोलली असावीत असें वाटतें.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

आठ नारळ

आठ नारळ अधिक सोलले

तर्क.१६:तुंबाडचे खोत, नऊ अंकी संख्या

तुंबाडचे खोत : अफाट बापूने आपल्या वाट्याचे पाच नरळ सोललेच शिवाय सपाट बापूच्या वाट्याचे चार नारळ सोलले. तेवढे चार नारळ सपाट बापूने कमी सोलले. म्हणजे अफाट बापूने सपाट बापूपेक्षा आठ (८) नारळ अधिक सोलले.
श्री.अमित कुलकर्णी यांनी हे उत्तर व्यनिं.ने पाठविले. तो,योगेश आणि मनिमाऊ यांनी हे उत्तर प्रतिसादात दिले आहे.
****
नऊ अंकी संख्या : ती नऊ अंकी संख्या ३८१६५४७२९ .हे उत्तर अमित आणि वरदा यांनी बरोबर शोधले. पण त्यांना खूप वेळ लागला असे लिहितात.
......५ या अंकचे स्थान मध्यभागी हे त्यांनी ताडलेच.एका आड एक सम विषम संख्या हेही ठरवले.
......आता उजवी कडचे तीन अंक पुसल्यावर उर्वरित सहा अंकी संख्येला ६ने पूर्ण भाग जायला हवा.म्हणजे त्या ६ अंकांची बेरीज ३ ने विभाज्य हवी.सर्व अंकांची बेरीज ४५ आहे. म्हणून पुसलेल्या तीन अंकांची बेरीज सुद्धा ३ने विभज्य हवी. त्यांतील मधला सम....एक अंक पुसून उरलेली संख्या ८ ने विभाज्य. यासाठी कसोटी अशी "तीन किंवा त्याहून अधिक अंकी संख्येतील श. द. ए. या तीन अंकांनी होणार्‍या संख्येला जर ८ने भाग जात असेल तर,आणि तरच, त्या संख्येला ८ ने भाग जातो." याच्या उपयोगाने शेवटचे तीन अंक ठरविता येतात. पुढे कोडे सोपे होते.
....................यनावाला.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

९ अंकी संख्या: एक तर्कक्रम

तर्काचार्यांच्या सूचनेवरून माझा तर्कक्रम खाली देत आहे.

१. ती संख्या अ१-अ२-अ३-अ४-अ५-अ६-अ७-अ८-अ९ आहे असे समजू. प्रत्येक अ म्हणजे १ ते ९ पैकी एकेक अंक आहे.
२. यातील अ५=५ हे कळायला सोपे आहे. एकूण अंकांची बेरीज करून आलेले अंकमूळ ० असल्यामुळे अंक कोणत्याही क्रमाने आले तरी ९ ने भाग जाईलच, तेव्हा नववा अंक कोणता याचा शोध अनावश्यक.
३. यातील अ२, अ४, अ६, अ८ या जागीं २,४,६,८ च येऊ शकतात. यामधील अ४ व अ८ या जागा विशेष महत्वाच्या. येथे ४ किंवा ८ असू शकत नाहीत. कारण यांच्या आधीचे अंक विषम आहेत. ४/८ ने भाग जाण्याची अट मग पूर्ण होणार नाही. त्यामुळे अ४ व अ८ हे ६ व २ यापैकीच असू शकतात. म्हणजे अ८ येथे ६ असल्यास अ४ येथे २ असणार किंवा उलट.
४. अ३-अ४ या संख्येला ४ ने भाग गेला पाहिजे, तसेच अ७-अ८ या संख्येला ८ ने भाग गेला पाहिजे (नुसते ४ ने भाग जाऊन चालणार नाही, कारण अ६ सम आहे).
म्हणून अ८ या जागी ६ असल्यास अ७ या जागी १ किंवा ९ च असू शकतात.
तसेच अ८ या जागी २ असल्यास अ७ या जागी ३ किंवा ७ च असू शकतात.
५. अ८ या जागी समजा २ आहे. म्हणून अ४ = ६.
म्हणजे संख्या अ१-अ२-अ३-६-५-अ६-अ७-२-अ९ अशी झाली.
६. यातील अ१-अ२-अ३ याला ३ ने भाग गेला पाहिजे आणि अ४-५-अ६ यालाही ३ ने भाग गेला पाहिजे तरच अ१तेअ६ या संख्येला ६ ने भाग जाईल.
म्हणून अ६=४ व अ२=८.
संख्या = अ१-८-अ३-६-५-४-अ७-२-अ९.
७. अ१, अ३ येथे आता १, ३, ७,९ यापैकी अंक येऊ शकतात.
अ१-अ२-अ३ ला ३ ने भाग जाण्यासाठी अ१+अ३=४/१०/१६/२२.
अ१ व अ३ या जागीं १,३ किंवा १,९ किंवा ३,७ किंवा ९,७ या जोड्या येऊ शकतात.
म्हणून अ७ पर्यंतची संख्या आता
१८३६५४७/३८१६५४७/१८९६५४३/१८९६५४७/९८१६५४३/९८१६५४७/९८७६५४३/७८९६५४३
पैकी एक असेल.
७ ने भागून बघूया.
फक्त ३८१६५४७ ला भाग जातो, इतरांना जात नाही.
म्हणून (एक) उत्तर ३८१६५४७२९.

अशाच प्रकारे अन्य उत्तर नाही असे सिद्ध करता येते.

हा एक तर्कक्रम आहे, याहून वेगळेही असणार.
अन्य कोणाचा तर्कक्रम वरीलपेक्षा छोटा व सोपा असल्यास येथे अवश्य द्यावा, माझ्याही ज्ञानात भर पडूदे.

- दिगम्भा

संगणक आणि पाशवी बळ

वापरून काहीही करता येते पण त्यात बुद्धीची तलवार चालवण्याची मजा नाही.

कार्ल फ्रीड्रिश गाउसने एका प्रमेयाच्या एकामागून एक ६ वेगवेगळ्या सिद्धता शोधल्या होत्या, शेवटी सर्वात "एलिगंट् प्रूफ्" मिळाल्यावर त्याचे समाधान झाले.
त्याची प्रेरणा सदैव माझ्या मनात असते.
(आम्ही फोर्ट्रान४ च्या जमान्यात प्राइमनंबरजनरेशनच्या अशाच उत्तरोत्तर एफिशंट अनेक आज्ञावल्या लिहिल्या होत्या त्याचीही आठवण झाली.)

बाकी वेळ नसणे वगैरे सगळे मान्यच आहे.

- दिगम्भा

पाशवी बळ

"पाशवी बळ" म्हणजे Brute-force म्हणायचे आहे का? तसे असेल तर मग Brute-force या शब्दप्रयोगामध्ये असलेली अतिसामान्यत्वाची छटा त्यात येत नाही आणि 'पाशवी' मुळे अनावश्यक अर्थ येतो तो वेगळाच. तसे म्हणायचे नसेल तर कृपया या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे.
आपला
(सोयीस्कर) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

हा प्रतिसाद खरेतर वरच्या प्रतिसादाला द्यायचा होता. चुकून इथे दिला. क्षमस्व.
आपला
(विमनस्क) वासुदेव

पाशवी बळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी
***********************************
श्री.दिगम्भा याच्या या शब्दप्रयोगाविषयी मला असेच लिहायचे होते. परंतु युयुत्सु यांनी आपल्या अधिकार लेखणीने ते लिहिले;म्हणजे प्रश्नच मिटला. ते पाशवी बळ योग्य तर्‍हेने वापरण्यासाठी उच्चप्रतीची तर्कशक्ती लागते, हे खरेच.

गणित आणि तर्कशास्त्र

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"गणित म्हणजे तर्कशास्त्रच" याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री.दिगम्भा यांचा नऊ अंकी संख्येविषयींचा युक्तिवाद. हा युक्तिवाद वाचावा आणि श्री.दिगम्भा यांना त्रिवार प्रणाम करावा !
.......यनावाला.

 
^ वर