बावला आणि तुकोजीराव होळकर
१९२५ साली मुंबई उच्च न्यायालयापुढे चाललेला बावला खून खटला बॉलिवुडच्या एखादया कथानकापेक्षाहि रंगतदार होता. एक सुंदर बाई, तरुण श्रीमंत प्रेमी, त्यातून उत्पन्न झालेला मत्सर आणि जोडीला इंदूरसारख्या बड्या संस्थानाचे राजेसाहेब खुद्द असं मसालेदार मिश्रण अन्यत्र
![]() |
तुकोजीराव होळकर |
दुसरीकडे कोठे पाहायला मिळणार? ह्या सर्वाची परिणाम म्हणजे तुकोजीराव होळकरांना गादी सोडायला लागणं, दोघा आरोपींना फाशीची शिक्षा मिळणं आणि एकाला जन्माचं वेड लागणं असा झाला.
कथानकाचा मुख्य भाग मुंबईच्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू भागात हॅंगिंग गार्डनजवळ १२ जानेवारी १९२५ च्या दिवशी सायंकाळी सात-साडेसात वाजता काही मिनिटातच पार पडला. संध्याकाळच्या अशा शांत वेळी काही लोक तिथे हवा खात असतांना केम्प्स कॉर्नरकडून रिज् रोडनं (आजचा बी.जी.खेर मार्ग) एक मोटरगाडी वर बागेकडं आली. हा रस्ता आजच्या काळात वर येण्यासाठी बंद आहे पण त्या तुरळक रहदारीच्या आणि खूपच कमी गजबजाटाच्या दिवसात असा काहीच निर्बंध नव्हता.
![]() |
मॅक्स्वेल गाडी १९२४ |
गाडीमध्ये दोन पुरुष आणि एक तरुण स्त्री असे तिघेजण बसलेले होते. पाठोपाठच एका तांबड्या रंगाच्या मॅक्स्वेल १९२४ ह्या गाडीतून सात-आठ जण बसून आले आणि त्यांच्या गाडीनं पहिल्या गाडीला जाणूनबुजून मागून ठोकरलं. लगोलग मॅक्स्वेलमधले लोक बाहेर आले आणि पहिल्या गाडीतल्यांना शिव्यागाळ करायला त्यांनी सुरुवात केली. दोघंतिघं गाडीच्या फुटबोर्डावरही चढले. त्या गाडीत मालक अब्दुल कादर बावला त्याचा मॅनेजर मॅथ्यू असे दोघं होते. बावला मुंबईमधला एक श्रीमंत व्यापारी होता. बरोबरची तरुणी होती मुमताझ बेगम नावाची सुंदर नर्तकी होती. ह्यापूर्वी सुमारे दहा वर्षं ती इंदूरचे राजेसाहेब तुकोजीराव होळकर ह्यांच्या पदरी होती. इंदूरच्या अंतःपुरातल्या सोनेरी पिंजऱ्याचा कंटाळा येऊन तिनं ते सोडलं आणि दिल्ली, नागपूर असं हिंडत ती अखेरीस मुंबईला पोहोचली. इथं तिला अब्दुल कादर बावला भेटला आणि ती त्याच्याबरोबर राहू लागली. राजेसाहेबांचा आश्रय सोडून तिचं असं तिसऱ्याबरोबर राहाणे हे दरबारच्या इभ्रतीला सरळसरळ आव्हानच दिल्यासारखं होतं आणि ह्या अपमानाचा बदला घेण्याच कट इंदुरात शिजला. इंदूरच्या ह्या हेलनला जमलं तर पळवून परत आणायचं नाहीतर दरबारच्या खाजगी बाबीत ढवळाढवळ करण्याबाबत तिला आणि तिच्या नव्या याराला काही जबर शिक्षा करायची असं ठरलं. तिचा मुंबईतला ठावठिकाणा सापडल्यानंतर इंदूर दरबारातले काहीजण दरबारची गेलेली इभ्रत परत मिळविण्यासाठी मुंबईला रवाना झाले.
मुंबईत पोहोचल्यावर बावलाचा छडा लावून हे दरबारातले म्होरके आणि त्यांनी मुंबईत बरोबर घेतलेले काही भाडोत्री गुंड असे सात-आठजण पिस्तुलं, सुऱ्या आणि कुकऱ्या घेऊन त्याचा पाठलाग करीत निघाले आणि मलबार हिलवर बागेबाहेर अखेर त्यांनी त्याला गाठलं. ठोकर देऊन बावलाची गाडी थांबवल्यावर त्यांनी बावलाच्या गाडीला वेढा घातला आणि मुमताझला पळविण्याच्या इराद्यानं ते तिला गाडीबाहेर खेचू लागले. बावलानं विरोध करून तिला वाचवायचा प्रयत्न केल्यावर कोणीतरी त्याच्यावर पिस्तुलानं गोळया झाडल्या आणि मलबार हिलवर बागेबाहेर अखेर त्यांनी त्याला गाठलं. ठोकर देऊन बावलाची गाडी थांबवल्यावर त्यांनी बावलाच्या गाडीला वेढा घातला आणि मुमताझला पळविण्याच्या इराद्यानं ते तिला गाडीबाहेर खेचू लागले. बावलानं विरोध करून तिला वाचवायचा प्रयत्न केल्यावर कोणीतरी त्याच्यावर पिस्तुलानं गोळया झाडल्या आणि चाकूनं मुमताझच्या चेहेऱ्यावर दोनचार वार करून तिला कायमचं कुरूप करून टाकलं.
हे सर्व होत असतांना मागून प्रसंगवशात् आणखी एक गाडी आली. गाडी चालवत होता सेगर्ट नावाचा एक तरुण इंग्रज सैनिक अधिकारी. तो आणि त्याच्याबरोबरचे अजून दोन अधिकारी बॅटली आणि स्टीफन, सगळे लेफ्टनंटच्या हुद्द्याचे, चालू असलेला प्रसंग पाहून आपल्या गाडीतून उड्या टाकून उतरले. सेगर्टनं मुमताझला हल्लेखोरांच्यापासून सुटं केलं. हे तिघं अधिकारी नुकतेच गोल्फ खेळून परत येत होते. गोल्फ स्टिक्स वापरून तिघांनी हल्लेखोरांवर चाल केली. ह्या सगळया गोंधळात कोणीतरी सेगर्टवर तीन-चार गोळया चालवल्या. आपल्या जखमांची पर्वा न करता त्यानं मुमताझला आपल्या गाडीकडं नेलं. एव्हांना कर्नल विकरी नावाचा दुसरा इंग्रज अधिकारी आपल्या गाडीनं तिथूनच चालला होता तोहि खाली उतरला. ह्या चौघांनी मिळून हल्लेखोरांपैकी दोघांना पकडलं. मुमताझ वाचली. उरलेले हल्लेखोर पळून गेले. थोड्याच वेळात बावला जागीच मरून पडला.
हल्लेखोरांचं दुर्दैव म्हणूनच हे तरुण इंग्रज त्या जागी त्या वेळेला हजर होते. विलिंग्डन क्लबमधून गोल्फ खेळून ते तिघेही सेगर्टच्या गाडीनं कुलाब्याकडं निघाले होते. पेडर रोडनं केम्प्स कॉर्नरला फोहोचल्यावर खरं तर सरळ ह्यूज रोडनं (आजचा सिताराम पाटकर मार्ग) पुढं जायचं पण सेगर्टनं चुकून गाडी उजवीकडं रिज् रोडला घेतली आणि केवळ ह्या चुकीमुळंच ते गुन्ह्याच्या जागेवर येऊन ठेपले. ते जर आले नसते तर बहुधा मुमताझला ताब्यात घेऊन हल्लेखोर घटनास्थळ सोडून पळाले असते आणि पोलिसांना पत्ता लागायच्या आत ब्रिटिश सत्तेखालचा भाग सोडून इंदूर संस्थान गाठू शकले असते. त्या परिस्थितीत पुढं काय झालं असतं हा तर्क करणं मोठं अवघड आहे.
कालांतरानं सेशन्स कोर्टापुढं ९ आरोपींवरचा खटला सुरू झाला. उभय पक्षांनी मुंबई आणि कलकत्त्याचे बडे वकील आपापल्या बाजूनं आणले होते. खटला बरेच दिवस चालला आणि तो ऐकायला प्रेक्षकांची मोठी उपस्थिति असे. आरोपींच्या बाजूनं बॅ. जिनाही उभे होते. हल्लेखोरांची मोठी संख्या आणि एकून गोंधळाचे वातावरण ह्यामुळं केस तशी अवघड होती पण चारी अधिकाऱ्यांच्या खणखणीत साक्षींमुळं गुन्हा सिद्ध झाला. ९ आरोपींपैकी ५ जणांच्याविरुद्ध सर्व आरोप सिद्ध झाले. दोघंजण निर्दोष सुटले. एकूण आरोपींपैकी शफी अहमद नबी अहमद, पुष्पशील बलवंत पोंदे आणि शामराव देवजी दिघे ह्यांना फाशीची शिक्षा मिळाली. बहादुरशहा मोहमदशहा, अकबरशहा मोहमदशहा, अब्दुल लतीफ मोहिउद्दीन आणि सरदार आनंदराव गंगाराम फणसे ह्या चौघांना जन्मठेप काळया पाण्याची शिक्षा मिळाली.
आरोपींनी लंडनला प्रिव्ही कौन्सिलपुढं अपील केलं. पुढील काळातल्या सायमन कमिशनचे सर जॉन सायमन हे विख्यात वकील आरोपींची बाजू संभाळत होते. अपीलचा उपयोग झाला नाही आणि सर्व शिक्षा पक्क्या झाल्या. फाशी मिळालेल्यांपैकी दोघंजण फाशीवर लटकले. मात्र तत्पूर्वीच पुष्पशील बलवंत पोंदे हे ठार वेडे झाले आणि त्यामुळं त्यांची फाशी टळून कायमच्या तुरुंगवासात त्यांचे उर्वरित आयुष्य गेलं.
अजून एक अप्रत्यक्ष आरोपी इंदूरमध्ये होता. तुकोजीरावांचा ह्या प्रकरणामागचा हात सर्वांना दिसत होता. खास कमिशन नेमून त्या कमिशनपुढं त्यांची चौकशी करण्याच प्रस्ताव व्हाईसरॉयकडून आला पण आपण राजे असल्यामुलं आपली चौकशी करण्याच कोणालाहि अधिकार नाही असा मुद्दा तुकोजीरावांनी पुढं मांडला. त्यांना गादीवरून काढून टाकण्याचा अधिकार इंग्रज सत्तेनं वापरण्याच्या आधीच त्यांनी गादीचा त्याग केला आणि युवराज यशवंतराव त्यांच्या जागी गादीवर आरूढ झाले. बरीचशी मौल्यवान जडजवाहिरात बरोबर घेऊन तुकोजीराव युरोपकडं रवाना झाले. त्यांचं उर्वरित आयुष्य युरोप-अमेरिकेत इकडून तिकडं हिंडण्यात गेलं आणि अखेरीस २१ मे १९७८ ह्या दिवशी पॅरिसमध्ये त्यांचं आयुष्य संपलं.
ह्या संदर्भात भर्तृहरीचा अत्यंत समर्पक श्लोक आठवतो. तो म्हणतो:
यौवनं धनसंपत्तिः प्रभुत्वमविवेकिता।
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्॥
तरुण वय, धनदौलत, अधिकार आणि विवेकाचा अभाव ह्यापैकी प्रत्येक गोष्ट एकेकटीसुद्धा आयुष्य नासवून टाकायला पुरी आहे. हे चारहि एका ठिकाणी आल्यावर मग बोलायलाच नको!
Comments
छान
खूपच रंजक लेख आहे.
तुकोजीराव होळकरांसंबंधीचा एक अजून लेख याआधी http://www.misalpav.com/node/15365 इथेही आला होता (सध्या मिपाचा सर्वर काम करीत नाही असे दिसते आहे).
+१
१०० टक्के सहमत. खरेच खूप रंजक लेख आहे.
हो का?
काही मजकूर संपादित.»
गाढव संस्थानिकाचा गाढव दुराभिमान: रंजक किस्सा
किस्सा साध्या शैलीत मांडल्याने रंजक झाला आहे.
या दुव्यावर होळकर तसेच इतर संस्थानिक लोकांची माहिती आहे. गाढवांना किती बंदुकांची सलामी लागत असे, त्यांची बिरुदावली वगैरे माहितीच फक्त आहे. इतर रसरशीत माहिती मात्र नाही.
मस्त लेख
हा इतिहास खरोखर रंजक आहे.
(सदर लेख तुम्ही याआधी कुठे प्रसिद्ध केला होता का? वाचल्यासारखा वाटतो आहे.)
सोन्याचा पिंजरा
असा लेख (म्हणजे या विषयावरचा) मिसळपावावर रामदास यांनी लिहिला होता. त्याखाली त्यांनी या घटनेची माहिती देणारी काही तत्कालीन पुस्तकातील पानेही लावली होती. त्यानुसार, या सर्व कथेत आणखी एक बळी गेलेला आहे तो म्हणजे मुमताज़च्या नवजात मुलीचा. रखेल हवी असणे पण अनौरस संतती नको असणे या इच्छेतून या अर्भकाला नर्सकरवी मारण्यात आले होते. हे शल्य उराशी बाळगूनच मुमताज़ने तेथून पोबारा केला.
हा गुन्हा बाहेर आला आणि गाजला तो केवळ तो मुंबई प्रांतात घडला आणि त्यात काही ब्रिटीश अधिकारी सामील होते म्हणून. अन्यथा, स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःच्या संस्थानात या संस्थानिकांनी केलेल्या अत्याचारांची गणती इतिहासात फारशी नमूद नसावी.
रंजक कथा
रंजक आणि रक्तरंजित कथा.
वाचताना "देजा व्यू"ची भावना झाली, त्याचा खुलासा आता झाला! बरोबर - रामदास यांनी लिहिलेला लेखच आठवत होता.
संस्थानिकांच्या रंगढंगाच्या कथा प्रसिद्ध आहेत...
मी मागे मराठीतले एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव 'संस्थानिकांच्या विलासकथा' असे काहीसे होते. त्यात भारतातील संस्थानिकांच्या विलासाचे, विक्षिप्तपणाचे, उधळेपणाचे, कंजूसपणाचे, कामक्रीडांच्या आवडीचे असे अनेक किस्से होते. त्यात हे लंपट राजे आपली वासना भागवण्यासाठी कोणत्या थराला जात, हे सांगताना काही अत्याचाराच्या कहाण्याही नमूद केल्या होत्या. तुकोजीरावांचे प्रकरण त्यात वाचले होते. पंजाबमधील एका संस्थानच्या राजकुमारीने प्रेमात पडून एका सामान्य स्तरातील प्रियकराबरोबर पलायन केले. त्यानंतर तिचा कसा पाठलाग झाला याची कहाणीही या अत्याचाराच्या गटातच मोडते.
ब्रिटिशांनी अनेक संस्थाने वारस नसल्याच्या कारणावरुन खालसा केली पण काही संस्थानिकाच्या अत्याचाराच्या कारणावरुनही केली. त्याच्या कारणीमीमांसेची नोंद जुन्या कागदपत्रांत सापडू शकेल.
माणुस
संस्थानिक बी पहिल्या छूट मान्स हायेत मंग ती वायल काय कर्नार? योगप्रभु बी भोगप्रभु होउ शकतात बर्का ( ह घ्या )
कामातुराणाम् न भयम् न लज्जा ||
प्रकाश घाटपांडे
काय भुललासि वरलिया सोंगा...
<<योगप्रभु बी भोगप्रभु होउ शकतात बर्का >>
प्रकाशबाप्पू,
हलकंच घेतलय दादा. :)
पण थोडा जडार्थपण समजाऊन सांगतो. (चातुर्मासाचे कंटाळवाणे प्रवचन)
भोग हा भोगून संपवायचा असतो. खरा 'योगप्रभू' असलेल्या त्या श्रीकृष्णानेही तो तसाच संपवला होता. म्हणूनच 'महानंदा' चित्रपटातील 'मागे उभा मंगेश' या गाण्यातील एक ओळ शंकराइतकीच कृष्णालाही लागू पडते.
जन्म जन्माचा हा योगी, संसारी आनंद भोगी
भोगप्रभू होणे हे निमित्त असते. कमलपत्राप्रमाणे पाणी अंगाला लागू न देण्याचे कौशल्य मात्र त्यात साधावे लागते. संसारी माणूस त्या अलिप्त अवस्थेकडे लवकर पोचू शकतो. श्रीमंत आणि राजेलोकांना भोगाची अतीव लालसा असते. एखादाच राजा जनकासारखा 'विरक्त राजयोगी' अपवाद.
असो. तुमच्या कोपरखळीच्या उत्तरादाखल इतकेच म्हणेन
ऊस डोंगा परि, रस नोहे डोंगा
काय भुललासि वरलिया सोंगा
चोखा डोंगा परि, भाव नोहे डोंगा
काय भुललासि वरलिया सोंगा
जयपूरची राजकन्या
"पंजाबमधील एका संस्थानच्या राजकुमारीने प्रेमात पडून एका सामान्य स्तरातील प्रियकराबरोबर पलायन केले."
श्री.योगप्रभू यानी 'पलायना'चे उदाहरण दिले आहे, पण जयपूरचे महाराज भवानी सिंग यांची एकुलती एक कन्या राजकुमारी दिव्या सिंग ही तर चक्क आपल्या ड्रायव्हरच्या प्रेमात पडली होती. तिचे ते प्रेमप्रकरण वेळीच लक्षात आल्यानंतर त्या ड्रायव्हर 'नरेन्द्र' ची गच्छंती वाड्यावरून झाली असली तरी दिव्याच्या प्रेमात काहीच खंड पडला नव्हता. 'ह्योच नवरा पाहिजे' असाच राजकुमारीचा धोशा होता. मुलगा नाही पण ही एकच कन्या जिच्याकडे राजघराण्याची वारस म्हणून पाहिले जात होते, तिच्या हट्टापुढे शेवटी जयपूरचे महाराज नमले आणि दिनांक ५ ऑगस्ट १९९५ रोजी नवी दिल्लीच्या 'ताज पॅलेस' इथे अगदी 'राजकुमारी' थाटाचा जरी नसला तरी आगळावेगळा म्हणावा असा विवाह राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती आणि निवडक निमंत्रित मनसबदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जयपूरमध्ये राजपूत घराण्याच्या अन्य शाखांनी या विवाहाला [अर्थातच] कडाडून विरोध केला असल्याने महाराज भवानी सिंग आणि महाराणी पद्मिनी देवी यानी थेट दिल्लीच गाठली आणि राजकुमारीला तिच्या स्वप्नीचा राजकुमार मिळाला.
खरेतर अगदी 'फेअरी टेल्' वाटावी अशी ही कहाणी आहे/होती, पण ती प्रत्यक्षात घडवून आणली ती सामान्य कुटुंबातील प्रियकराने नव्हे तर प्रत्यक्ष राजकुमारी हिनेच.
संस्थानिकांच्या गमतीजमती
संस्थानिकांच्या गमतीजमतीच्या गोष्टींना अंतच नाही. तुकोजीरावांचे वारस यशवंतराव हयांच्या स्वतःच्या कहाण्या आहेतच. त्यावरच लिहीत राहिलो तर दुसरे काहीच करता येणार नाही.
मग तूर्तास दुसरे काही करूच नका. :-)
लिहा की, महत्त्वाच्या तरी लिहा. तूर्तास दुसरे काही न करता आम्हालाही या गोष्टी ऐकवा. :-)
गॉसिप्स सर्वांनाच आवडतात. यशवंतराव होळकर दुसरे यांच्या पुनर्जन्माची कहाणी वाचली आहे. ;-) एक बातमी येथे वाचा.
अल् थानी ह्यांचा इस्लामविरोधी दावा
शेखसाहेबांचा हा दावा मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते ह्याबाबतच्या इस्लामच्या शिकवणुकीच्या पूर्ण विरोधात आहे. त्यांच्यावर फतवा काढायला हवा. का अल् थानी असल्यामुळे त्यांना त्यातून सूट आहे?
शाही इमाम
तिकडे शाही इमाम असतात का? ;-)
+१
प्रियाली यांच्या मतास दुजोरा देतो. तुम्ही लिहाच, कोल्हटकर साहेब ! :)
'फ्रीडम ऍट मिडनाईट' या पुस्तकातसुद्धा संस्थानिकांचे असेच काही किस्से वाचल्याचे स्मरते.
वा!
नेमके तपशील, सोपी भाषा आणि चुरचुरीत लेखनशैलीमुळे लेख वाचायला मजा आली
श्री रामदास यांचा (याच कथेवरील) सुंदर लेख मिसळपाववर वाचला होता, तरीही हा लेखही संपूर्ण वाचला तो शैलीसाठीच!
असेच लिहित रहा.. वाचतो आहोतच!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
मानेकशॉ नानावटी खटला
मिपावर लिहिलेल्या जयंत कुलकर्णी यांच्या मानेकशॉ नानावटी खटल्याची आठवण आली
प्रकाश घाटपांडे
एक विनंती
'बहावल संन्यासी' या नावाने प्रसिद्ध असलेली कोर्टातली एक लढाई अशीच वाचनीय आणि मनोरंजक आहे.प्रदीर्घकाळ चाललेल्या या केसविषयी आपण लिहावे अशी आपणास विनंती करावीशी वाटते. या गाजलेल्या आणि गुंतागुंतीच्या केसची समग्र आणि तपशीलवार माहिती देणारे एक इंग्लिश् भाषेतले पुस्तकही चार-पाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले आहे.विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा खटला खळबळजनक ठरला होता.
पार्थ चॅटर्जींचे "प्रिन्स्ली इंपोस्टर"
तुम्ही या पुस्तकाचा उल्लेख करताहात का? खरोखर अत्यंत रंजक आणि अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. पार्थ चॅटर्जी या आधुनिक भारताच्या, आणि बंगालच्या आघाडीच्या इतिहासकाराने लिहीलेले आहे. भवाल राजाच्या तोतया केसबद्दलच नाही, तर त्या निमित्ताने आधुनिक भारतीय राजवटीचे, कायदेकानूचे, अस्मितेचे सुंदर विश्लेषण आहे. एकदा उचलले की खाली ठेववत नाही.
संक्षेप
या प्रकरणाचे संक्षिप्त रूप येथे वाचता येईल. रोचक आहे हे खरेच.
होय
होय हेच ते पुस्तक.
होळकर घराणे
अहिल्यादेवी होळकर या होळकर घराण्याच्या मुख्य आधारस्तंभ होत्या . इतर नबाब, राजांप्रमाणे त्या विलासी अजिबातच नव्हत्या . माझ्या एका मित्राने लिहीले म्हणुन काही होळकर घराण्याची अब्रू जाणार नाही . अहिल्यादेवीँनी अनेक ठिकाणी मंदिरे बांधली , आज 12 ज्योर्तिलिँगापैकी त्यांनी 7 मंदिरे स्वत: बांधली आहेत. चार धामापैकी दोन मंदिरे त्यांनी बांधली आहेत. एवढचं नाही तर अनेक ठिकाणी घाट बांधले याचा आजही उपयोग केला जातो. केवळ तुकोजीँनी चुक केली म्हणून संपुर्ण होळकर घराण्याला दोष देण्यात काही अर्थ नाही . आज कोणत्या राजाने एवढे पुण्य केले असेल? मुसलमानांनी उध्वस्त केलेली 98% मंदिरे त्यांनी दुरुस्त केली त्यामुळे एखाद्याला संपुर्ण होळकरांना नाव ठेवण्याचा काही अधिकार नाही. आज तुम्ही कोणत्याही तीर्थस्थळाला भेट द्या तेथे एक तरी बारव असेल जी अहिल्यादेवींनी बांधली असेल. अहिल्यादेवीँचा जन्म अहमदनगर जिल्हातील चौँडी या गावी झाला . मराठ्यांचे शुर सरदार मल्हारराव होळकर हे चौंडी गावी मुक्कामी असताना त्यांना अहिल्या दिसली व त्यांनी आपल्या मुलाकरता ती वरली. पुढे एक मुलगा झाल्यावर एका लढाईत त्यांच्या नवर्याचा म्रुत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षाचे होते . त्या काळी सती जाण्याची चाल असताना त्यांना सासर्याने जाउ दिले नाही व पुढे त्यांनी 32 वर्ष राज्य केले.
इतक्या वर्षात त्यांचा मुलगा वारला , मुलगी ( दत्तक ) वारली. जावई , नात वारले .इतके असुनही देवीँनी मंदिरे बांधली . रामोशी लोकांना माणसात आणले म्हणुन आज त्यांचा धडा 5 वी ला , 9 वी व 12 वी ला आहे. त्यांचा म्रुत्यू पिठोरी अमावस्या , पोळा या दिवशी झाला .
निबंध
आपल्या निबंधाचा रोख बावला आणि तुकोजीराव होळकर या लेखावर दिसतो. पण कोल्हटकरांनी लिहिलेले लेखन हे एका केसच्या संदर्भात आहे त्यात संपुर्ण होळकरांना कुठेही नाव ठेवण्याचा संबंध दिसत नाही.
अवांतर- आपल्या नावाचे धनंजय या आयडी साधर्म्य दिसते. त्यामुळे काही लोकांचा घोटाळा होउ शकतो.
प्रकाश घाटपांडे
अहिल्याबाई होळकर
बाकी होळकरांचे काहीहि असो, अहिल्याबाईंच्या चांगल्या कृत्त्यांची जाणीव टिकून आहेच ह्यात शंका नाही.
बाकी शिंदे, होळकर आणि गायकवाड ह्या तीन मोठया मराठी संस्थानापैकी दोघांचे संस्थापक, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर, त्यांच्या भरीव कामाबद्दल ख्यातनाम आहेत. त्यांचे वंशज, अनुक्रमे दौलतराव आणि यशवंतराव, ह्यांची आठवण असलीच तर त्यांनी मराठेशाहीच्या र्हासाच्या काळात आपल्या कर्तूतीने त्या र्हासाला कसा हातभार लावला ह्याबाबतचीच आहे. ह्या तिन्ही घराण्यांपैकी हे वर उल्लेखिलेले संस्थापक आणि बडोद्याचे सयाजीराव सोडले (आणि अर्थात् अहिल्याबाई) तर बाकीच्यांच्या विषयी nothing much to write home about अशीच स्थिति आहे. इंग्रजांची चापलुसी करून आपापली संस्थाने आणि राजेशाही चैनीचे आयुष्य चालू ठेवणे एव्हढेच बहुतेकांचे अवतारकृत्य होते. येथे असे आठवते की स्वामिनिष्ठा(!) दर्शविण्यासाठी विजयाराजेंचे पति जिवाजीराव ह्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या (म्हणजे जिवाजीरावांच्या नावात) किंग जॉर्जचे नावहि घातलेले होते, जेणेकरून त्यांचे नाव जॉर्ज जिवाजीराव असे होते. उदा. पहा http://en.wikipedia.org/wiki/George_Jivajirao_Scindia .
पानिपत प्रकरणात मल्हाररव होळकरांचा अंगचोरपणा आणि पराभव समोर दिसू लागताच रणछोडदासपणा करणे हे पराभवाचे एक कारण होते असेहि बरेच अभ्यासक मानतात.
महादजी संस्थापक?
बाकी शिंदे, होळकर आणि गायकवाड ह्या तीन मोठया मराठी संस्थानापैकी दोघांचे संस्थापक, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर, त्यांच्या भरीव कामाबद्दल ख्यातनाम आहेत.
माझ्या अल्प माहितीप्रमाणे राणोजी शिंदे हे त्या घराण्याचे संस्थापक होते. त्यांची दोन औरस मुले जयाप्पा आणि दत्ताजी पराक्रमी म्हणून प्रसिद्ध होती. दासीपुत्र महादजी शिंदे हे अर्थातच सर्वात् पराक्रमी निघाले. बुराडीच्या लढाईत दत्ताजी, पानिपतावर जयाप्पाचा मुलगा जनकोजी (त्याला पकडून वध करण्यात आला), तुकोजी हे लोक धारातीर्थी पडले तर महादजी कसेबसे जीव वाचवून परतले. मल्हाररावांची मुले नालायक निघाल्याने त्यांना शिंद्यांच्या पराक्रमी मुलांबद्दल दु:स्वास होता.
रोचक
तुमच्या मित्राने काय म्हटले होते?
अवांतर : उपक्रमावर आणखी एक धनंजय आयडीचे स्वागत! लवकरच धनंजयांचे येथे मताधिक्य होईल :-)
मंदिरे बांधणे
मंदिर बांधणे या एकमेव निकषावर अहिल्याबाईंच्या कर्तृत्त्वाची चर्चा करणे योग्य नाही. इतर जनकल्याणकारी कामांची माहिती द्यावी.
हे मित्र कोण आहेत? कुठे असतात? कृपया संदर्भ द्यावा.
अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवी होळकरांनी इतर जुलमी किंवा नादिष्ट होळकरांची जबाबदारी उचलली नसेल असे वाटते. बाकी चालू द्या!
अवांतरः धंनजय वैद्य नावाच्या मनुष्याला देवाने(?) घडवल्यावर साचा मोडून टाकला असा माझा ठाम ग्रह आहे पण हल्ली सर्वत्र 'मेड इन चायनाचे' प्रस्थ आहे.
चुकिचे.
अवांतरः ही इज कस्टम मेड, नो साचा कॅन अकोमोडेट हीम असा माझा ठाम् ग्रह आहे.
-Nile
कस्टम मेड?
कस्टम मेड? माझ्या मते अपघाताने किंवा कर्मधर्मसंयोगाने !--वाचक्नवी
हाहा
>> माझ्या मते अपघाताने किंवा कर्मधर्मसंयोगाने !-
हे वाचून खपले. :-)
बाकी धनंजय कस्टम मेड असले तर कोणाच्या ऑर्डरवरून? परमेश्वर असा तुमच्या आमच्या इच्छेने का वागतो?
हे फारच टुकार लॉजिक आहे. त्यांना जन्माला घालण्याची जगन्नियंत्याचीच मराठी संकेतस्थळांसाठी (आणि इतर बर्याच गोष्टींसाठीही) योजनाच होती याची मला खात्री आहे. *असो, धनंजय यांना फारच अवघड होऊ नये म्हणून हे लॉजिक पुढे चालवण्याचा मोह टाळत आहे.
नामसाधर्म्यामुळे धनंजय यांनी अचानक आडनावही लावायला का सुरुवात केली असे वाटले. मग लगेच लक्षात आले.
बिग बँग
योजना नसावी. देवाची एवढी कुवत कुठली? तेव्हा बिग बँगसारखा एखादा स्फोट झाला असावा.--वाचक्नवी
मिसळपाववरचा लेख
मिसळपाववारचा तो http://www.misalpav.com/node/15365 उघडता आला. त्यांचा 'सेवक' दुरुस्त झाला असावा.--वाचक्नवी