रोमन लिपि आणि भारतीय भाषा - एक विस्मृत वाद

(पुढील लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामुग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे. पुस्तकांच्या पृष्ठांचे संदर्भ १:१२, २:२० अशा प्रकारे दिलेले आहेत.)

१८३४ सालचा हिंदुस्थान. दुसऱ्या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब! ह्यामुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषकरून ब्रिटिश) संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिन्दुस्थानी संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणतः श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती. ह्या पार्श्वभूमीवर त्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्या वर्गामध्ये दोन वाद झाले. पहिला म्हणजे हिंदुस्तानी प्रजेला सुशिक्षित करण्यासाठी आणि हिंदुस्तानी भाषांचा विकास घडवून आणण्यासाठी जुन्या पारंपारिक संस्कृत, पर्शियन, अरेबिक अशा भाषा आणि त्यांमध्ये उपलब्ध असलेले ज्ञान पुरेसे आहे की इंग्रजी भाषेच्या माध्यमातून पाश्चात्य ज्ञान हिन्दुस्तानात प्रसारित करून हे उद्दिष्ट साधता येईल हा एक वाद. त्याचा निर्णय मेकॉलेच्या टिपणामुळे पाश्चात्य पक्षाच्या बाजूने झाला. ह्यावर काही दिवसांपूर्वी लिहिलेला लेख आणि तदनुषंगिक चर्चा येथे पाहता येईल. दुसरा वाद हिंदुस्तानी भाषा कोणत्या लिपींमधून लिहिल्या जाव्यात ह्याबाबतचा होता. हिन्दुस्तानात प्रचलित असलेल्या सर्व वेगवेगळया लिपी दूर करून सर्व हिन्दुस्तानी भाषा रोमन लिपीमध्ये लिहिण्याची प्रथा पाडावी काय असा हा एक नवा विचार होता.

१८३४ सालाच्या पुढेमागे सुरू झालेल्या ह्या वादातील पौर्वात्य पक्षाचा धुरीण होता जेम्स प्रिन्सेप (१७९९- १८४०). ह्याने ब्राह्मी लिपीची उलगड करून भारताच्या प्राचीन इतिहासाचे आणि त्याच्या आधुनिक पद्धतीच्या अभ्यासाचे नवे दालन जगापुढे उघडले असे म्हणणे योग्य ठरेल. ह्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले स्मारक आजहि कलकत्त्यात प्रिन्सेप घाट ह्या स्थानावर उभे आहे. पहिल्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप (१७९२ - १८७८) ह्याचा जेम्स हा धाकटा भाऊ. वादातल्या विरोधी म्हणजे रोमन पक्षाचा मुख्य प्रतिनिधि चार्लस एडवर्ड ट्रेवेल्यन (१८०७- १८८६). अगदी तरुण वयात हा हिंदुस्थानात कंपनी सरकारच्या नोकरीत आला आणि भराभर वर चढत १८३४ सालापर्यंत वयाच्या २७व्या वर्षी गवर्नर जनरलच्या निकटवर्तीय वर्तुळात त्याची गणना होऊ लागली होती. ३:३९१.

पहिल्या शैक्षणिक धोरणविषयक वादाचा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. दुसऱ्या लिपीविषयक वादात मात्र सरकारी पातळीवर काहीच स्वारस्य दाखविण्यात आले नाही. पहिल्या वादाचे मूळ १८१३च्या चार्टर कायद्याच्या काही शब्दांच्या अर्थामध्ये होते. लिपि बदलण्याच्या मागणीमागे कोणताच कायदा नव्हता आणि ’जैसे थे’ परिस्थितीच चालू रहिली. त्याचे स्वरूप दोन खाजगी पक्षांमधले मतान्तर एवढेच मर्यादित राहिले. कमीअधिक जोराने हा वाद पुढची साठएक वर्षे चालू राहिला पण तेवढ्या काळात देशी भाषांचीच बरीच प्रगति झाल्याने आणि त्यांच्यामध्येच बरीच ग्रंथसंपदा निर्माण झाल्याने ह्या वादातली हवाच निघून गेल्यासारखे झाले. १८५७च्या उठावानंतर प्रजेला उगीचच डिवचणेही राज्यकर्त्यांना शहाणपणाचे वाटले नसावे. असे झाले नाही हे माझ्या मते एक ’अपघात’ होता आणि एक छोटी गोष्ट घडून न आल्यामुळेच आपण ह्या लिपिबदलाच्या धोक्यातून वाचलो हे हिंदुस्थानी प्रजेचे हे मोठेच सुदैव म्हणायचे. नपेक्षा राज्यकर्त्यांच्या ह्याच उच्च वर्तुळाने एका फटक्यात देवनागरीसहित सगळ्या लिपी निकालात काढल्या असत्या आणि त्या जागी रोमन लिपीची स्थापना केली असती. ह्या 'सुधारणेचे' परिणाम हिंदुस्थानी प्रजेने कायमचे भोगले असते. ह्या विषयीचे माझे वैयक्तिक मत ह्या लेखनाच्या अखेरीस विस्ताराने लिहिले आहे. येथे एवढेच लिहितो की सर्वविनाशाच्या गर्तेपासून आपण बुडताबुडता थोडक्यात वाचलो आणि त्यामुळे आज भारत एक स्वतःची वेगळी ओळख असलेला स्वतन्त्र देश म्हणून जगात मानाने उभा आहे.

लिपीसंबंधीच्या ह्या वादाची सुरुवात एका छोटया बाबीवरून झाली. थॉमसन नावाच्या दिल्लीस्थित इंग्रजाने ट्रेवेल्यनच्या सूचनेवरून रोमन लिपीत एक इंग्रजी-उर्दू शब्दकोष तयार केला. त्याच्या प्रती कलकत्त्यातील स्कूल बुक सोसायटीने विकत घ्याव्या काय असा प्रस्ताव सोसायटीपुढे आला. तिचे दोन सदस्य जेम्स प्रिन्सेप आणि टायटलर ह्यानी हिंदुस्तानी भाषांसाठी रोमन लिपि वापरण्याचे काहीच कारण नाही असे त्रोटक शेरे मारून आपला विरोध नोंदवला. त्याला उत्तर म्हणून ट्रेवेल्यनने विस्तृत टिपण लिहिले. तदनंतर मूळ मुद्दा दूर राहून रोमन लिपि हिंदुस्थानातील भाषांना लागू करणे योग्य की अयोग्य हा वाद सुरू झाला. मिशनरी लोकांना रोमन लिपीच्या प्रसारात रस असल्याने त्यांच्या सेरामपूर प्रेसने १८३४ सालीच ह्या संपूर्ण वादातील मतमतान्तरे एकत्र करणारे पुस्तक छापले. इतकी मजबूत फळी असूनहि तिच्या विरोधात आपण बुडताबुडता थोडक्यात वाचलो ते कसे हे पाहण्यासाठी थोडे विषयांतर करावे लागेल.

मेकॉले १८३४त हिंदुस्थानात आला तेव्हा तो अविवाहित होता. आपल्या दोन बहिणींच्यावर त्याची फार माया होती आणि त्या दोघींपैकी धाकटी हॅना हीहि अविवाहित असून भावाबरोबरच हिंदुस्थानात आली. ( लग्नाच्या हेतूने, दुसरे काय? तेव्हाची ती पद्धतच होती!) कलकत्त्यात आल्यावर चार्ल्स ट्रेवेल्यन हा उपवधू आणि उज्ज्वल भवितव्य असलेला तरुण तिच्या प्रेमात पडला आणि डिसेंबर १८३४ मध्ये त्यांचा विवाह झाला. मेकॉलेला हा विवाह पूर्णपणे पसंत होता कारण ट्रेवेल्यनबद्दल त्याचे फार चांगले मत होते. त्या दोघांना जरी उत्तम वेतन असले -मेकॉलेचे वेतन वार्षिक १०,००० पौंड होते - तरी दोघेही मूळचे मध्यमवर्गीय होते आणि बचत करून ती मायदेशी पाठवण्याची दोघांनाही आवश्यकता होती. (मेकॉलेच्या ऑगस्ट १७, १८३३ च्या हॅनाला लिहिलेल्या पत्रावरून दिसते की रकमेच्या निम्म्याची बचत करून तिची व्याजावर आणि आपल्या लिखाणावर उर्वरित आयुष्य काढण्याची त्याची इच्छा होती. ३.३३०.) ह्या कारणाने विवाहानंतर नवविवाहित दांपत्य आणि मेकॉले एकाच घरात राहिले. ३:३९४. ( ह्याच घराच्या जागेवर सध्याचा प्रतिष्ठित बेंगाल क्लब उभा आहे. ३:३८९.) पाश्चात्य विरुद्ध पौर्वात्य शिक्षण हा पहिला वाद ह्याच सुमारास चालू होता कारण मेकॉलेचे टिपण २ फेब्रुवारी १८३५ ह्या दिवशी लिहिले गेले. मेव्हणे-मेव्हणे आणि एकाच घरात राहणारे असूनही ट्रेवेल्यनने लिपीच्या प्रकरणातहि रस घ्यायला मेकॉलेला उद्युक्त केल्याचे दिसत नाही. रोजच्या रोज डिनर टेबलवर ते काय बोलत होते ह्याबाबत काहीच नोंद उपलब्ध नाही. जर मेकॉलेला भाषेबरोबर लिपीच्या कामातही लक्ष घालण्यास ट्रेवेल्यनने पटविले असते तर अजून एक भारदस्त टिपण लिहून ह्यादेखील प्रश्नाचा कायमचा निकाल मेकॉलेने लावला असता आणि येथील सर्व मूळच्या लिपि विस्मृतप्राय होऊन आपण सगळे आपापल्या भारतीय भाषा रोमन लिपीत लिहायला लागलो असतो. ( जाताजाता असाही उल्लेख करावासा वाटतो की क्र. ३ चे मेकॉलेचे चरित्र त्याचा भाचा आणि हॅनाचा मुलगा जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन ह्याने लिहिलेले आहे.)

कालान्तराने मेकॉले आणि ट्रेवेल्यन दोघेही इंग्लंडला परतले. चार्ल्स ट्रेवेल्यन १८५९ मध्ये परत हिंदुस्थानात आला. मद्रासचा गवर्नर आणि व्हाइसरॉयच्या कौन्सिलात अर्थविभागाचा सदस्य म्हणून १८६५ पर्यंत तो पुनः हिंदुस्थानात होता. लिपीचा विषय तो विसरला नव्हता. इंग्लंड सोडण्यापूर्वी ह्या विषयाचा तेथे पाठपुरावा करण्याचे काम त्याअने मोनियर विल्यम्सकडे सोपवले होते. १८३४ त झालेला वाद आणि नंतर इंग्लंडातील वृत्तपत्रात छापलेले लिखाण एकत्रित करून मोनियर विल्यम्सनी जे पुस्तक प्रसिद्ध केले ते क्र. २ येथे उपलब्ध आहे. ह्याही प्रयत्नातून काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही.

मिशनरी लोकांनाही ह्या लिपीच्या प्रकरणात रस होता असे वर म्हटलेले आहेच. आपल्यापरीने धर्मप्रचाराची भाषान्तरित पुस्तके रोमन लिपीत छापून प्रसिद्ध करण्याचे त्यांचे कार्य चालूच होते. ह्या विषयाला खास वाहिलेले एक मासिक लाहोरमधे चारपाच वर्षे तरी प्रकाशित होत होते. ह्या मासिकाच्या पहिल्या आणि पाचव्या वर्षांचे अंक क्र. ४ येथे उपलब्ध आहेत. मासिकाच्या पृष्ठभागावरच त्याचा हेतु Roman-Urdu Journal. To advocate the use of Roman Alphabet in Oriental Languages असा नोंदवलेला आहे. हे अंक चाळले तर रोमन लिपीच्या चळवळीतली हवा निघून जायला लागल्याचे लक्षात येते. पंजाब विद्यापीठाशी संबंधित असलेल्या आणि अन्यही बऱ्याच प्रतिष्ठित हिंदु आणि मुस्लिम व्यक्तींची मते अंकात वेळोवेळी छापलेली आहेत आणि त्या सर्वांनी रोमन लिपीला विरोध केल्याचे दिसते. खुद्द सरकारलाही ह्या विषयात काहीच रस नसल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ खंड ५, अंक ४६, पृष्ठ २५ पाहा. डॉ. डब्ल्यू. सेंटर नावाच्या लेखकाने सरकारी पातळीवर हा प्रस्ताव उचलून धरायला विरोध केला आहे. लोकांना हा प्रस्ताव मान्य आहे का नाही ह्या चाचणीवरच त्याचे यशापयश ठरविले पाहिजे, सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही असे त्याने नमूद केले आहे. पंडिता रमाबाई ह्यांचेही नाव विरोधक म्हणून एका ठिकाणी आलेले आढळते. खंड ५, अंक ५०, पृष्ठ १७ येथे Lady-Pandit "Ramabai" and the Roman character असा एक लेख आहे. त्यावरून कळते की रमाबाईंनी जणू संस्कृत भाषाच विलाप करत आहे अशी कल्पना करून एक काव्य करून ते काव्य पूर्वीच्या वर्षी म्हणजे १८८१ साली बर्लिनमधल्या प्राच्यविद्या तज्ज्ञांच्या कॉंग्रेसकडे पाठवले होते आणि मोनियर विल्यम्स ह्यांनी त्या काव्याचे भाषान्तर करून दिले होते. प्रस्तुत काव्यातील दोन भाग संदर्भित स्थानी वाचावयास मिळतात. पण ह्या सर्व प्रचारातून निष्पन्न काहीच झाले नाही. एव्हांना देशी भाषांमध्ये त्या त्या लिपी वापरून बरीच ग्रंथनिर्मिति झालेली असल्याने १८५७ च्या घटनांच्या नंतर ह्या मुद्दयावरून खाजवून खरूज काढण्यात सरकारला काही स्वारस्य वाटत नसावे.

१८३४ साली लिपीबदलाला सर्वात अधिक अनुकूल वातावरण होते तरीही तो बदल होऊ शकला नाही. ह्यामुळे हिंदुस्थान आणि नंतरचा भारत देश मोठयाच आपत्तीतून वाचला असे पूर्वी म्हटले आहे ते का ह्यावर दोन शब्द लिहितो.

राजकीय पातळीवर सत्ता केन्द्रित असलेला आणि आज आपण ओळखत असलेला स्थायी आणि एकसंध देश इंग्रजांनी प्रथम निर्माण केला हे उघड आहे. तरीही तत्पूर्वी दोन अडीच हजार वर्षे हा देश सांस्कृतिक पातळीवर एकत्रच होता. मुस्लिम, शीख, पारसी, ज्यू असे अन्य प्रवाह आले तरी तेही ह्या सांस्कृतिक एकसंधतेचा भाग होऊन गेले. प्राचीन अशी संस्कृत भाषा, त्यात निर्माण झालेले तत्त्वज्ञान आणि विचार, त्यातील वाङ्मय आणि त्याच गोष्टींचा पुढे देशी भाषांमध्ये झालेला वेगवेगळा आविष्कार आणि विकास हे ह्या एकसंधतेला प्रामुख्याने पायाभूत आहेत असे मला वाटते. केरळमधल्या भारतीयाला बंगालमधला किंवा पंजाबमधला भारतीय फार दूरचा वाटत नाही ह्यामागे हे समान धागे आहेत. ह्याउलट १८३४ मधला हिंदुस्थान अगदीच स्वत्त्व गमावलेला आणि पराभूत अवस्थेतला समाज होता. इंग्रज जे म्हणतील ते करायला तो तयार होता. किंबहुना दुसरे काही करण्याचे स्वातन्त्र्य आसू शकते ही जाणीवच त्या समाजात नव्हती. इंग्रजांनी तेव्हा इथल्या लिपींना राजाश्रय काढून घेतला असता आणि रोमन लिपि राजकीय पातळीवरून प्रसारित केली असती तर केवळ रोमन लिपि शिकलेली अल्पस्वल्प हिंदी प्रजा दहापंधरा वर्षातच इथल्या लिपी विसरायला लागला असती. वापर नसला तर एखादी लिपि संपूर्ण विस्मरणात जायला फार वेळ लागत नाही. ब्राह्मी आणि खारोष्ठी ह्या प्राचीन लिप्यांचे हेच झाले. अगदी अलीकडचे आपल्या मोडीचेच उदाहरण घ्या. १९४०-५० पर्यंत बऱ्याच जणांना जुजबी का होईना, मोडी वाचता येत असे. शाळाअंधून मोडी बंद झाल्यावर ३०-४० वर्षांतच अशी स्थिति निर्माण झाली की आत्मविश्वासपूर्वक मोडी वाचणाऱ्यांची संख्या शंभराच्या आसपास येऊन ठेपली असावी. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणारे काहीजण प्रयत्नपूर्वक मोडी वाचायला शिकतात कारण आजच्या काळात हेही कोणीतरी केले पाहिजे ही जाणीव आपल्यामध्ये आहे. १८३४ साली कोणीही असा प्रगल्भ विचार केला असता असे वाटत नाही. लौकरच सर्व भारतीय लिपी पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या आणि त्या त्या लिपींमध्ये लिहिलेली असंख्य हस्तलिखिते आणि कागदपत्रे दुर्लक्षित अवस्थेत कोणाकोणाच्या माळ्यावर पडून राहिली असती. नशिबाने एखाददुसरे पुस्तक रोमन लिपीतून छापले गेलेही असते पण बहुतेकांची वाटचाल वाळवी, ओलावा, धूळ ह्या परिचित मार्गाने होऊन ती नष्ट तरी झाली असती किंवा पूर्ण विस्मरणात गेली असती. रोमन लिपीत आणि प्रामुख्याने मिशनरीनिर्मित ज्ञानावर पोसलेल्या नेटिव सुशिक्षितांची आपल्या प्राचीन ठेव्याकडे पाहण्याची दृष्टि अज्ञान आणि उपेक्षेचीच राहिली असती. स्पॅनिश आगमनानंतर माया लिपीचा आणि तिच्यात लिहिल्या गेलेल्या साधनांचा कसा विनाश झाला, आपल्याकडे ब्राह्मी लिपीचे काय झाले ही उदाहरणे डोळयासमोर आहेतच. आपल्या भूतकाळाचे ज्ञान आणि त्याच्या अस्तित्वाची जाण ह्या अनमोल ठेव्याला आपण पूर्णपणे मुकलो असतो. उरले असते ते केवळ जातीजमातीतील, भाषाभाषांतील आणि अन्य अनेक प्रकारचे भेद. त्यांची आपल्याकडे मुळीच टंचाई नाही. भूतकाळ विसरलेल्या समाजांचे भविष्य कसे असते हे आपण आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेच्या उदाहरणांवरून पाहू शकतो. भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवणारे घट्ट सिमेंट नाहीसे झाल्यावर इथे पुढेमागे कायमचे अराजक माजले असते आणि आजचा सामर्थ्यवान भारत कदाचित निर्माणच झाला नसता. १८३४ च्या काळातला दीनदलित हिंदुस्थान कदाचित पुनः डोके वर काढूच शकला नसता असे मला वाटते.

सर्व भारतीय भाषा रोमन लिपीमध्ये लिहिल्या जाव्यात अशी मागणी करणारे काही गट आजही आसपास आहेत. ह्या आजच्या चळवळींचे मूलस्रोत अगदी वेगळे आहेत आणि १८३४ च्या मागणीशी त्यांचे काहीच साधर्म्य नाही. ते केवळ नावापुरतेच एकासारखे एक दिसतात. प्रस्तुत लेखनात ह्या आजच्या मागणीबद्दल काहीही मतप्रदर्शन केलेले नाही असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

संदर्भ:

१. The Application of the Roman Alphabet to all the Oriental Languages ... सेरामपूर प्रेस, १८३४. http://tinyurl.com/yyt2x4q

२. Original papers illustrating the history of the application of the Roman Alphabet to the Languages of India, संपादक मोनियर विल्यम्स, १८५९. http://tinyurl.com/y2s5a6b

३. The Life and Letters of Lord Macaulay Vol. 1, जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन, १८८०. http://tinyurl.com/y2zbqbq

४. Roman-Urdu Journal Vol. 1, Civil and Military Gazette Press ,लाहोर, १८७८. http://tinyurl.com/2852g8n; Roman-Urdu Journal Vo.l 5, Civil and Military Gazette Press, लाहोर, १८८४. http://tinyurl.com/y6cz3ov

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली माहीती, लिपिप्रौढीबाबत असहमत

चांगली माहीती आहे.

भाषा कुठल्या लिपीत लिहिली जावी याबाबत मी सैद्धांतिकदृष्ट्या उदासीन आहे. ब्रिटिशांच्या पुष्कळ आधी ब्राह्मी लिपी लयाला गेली आणि अशोकाचे शिलालेख वाचणारे फक्त कोणी इतिहासपंडित तितके उरले. देवनागरी/लहंदा/बंगाली/उडिया/गुजराती लिप्या वापरात आल्या. दाक्षिणात्यांची ग्रंथलिपी गेली प्रचलनातून गेली आणि कन्नड/तेलुगु/मलयाळम्/तमिळ लिप्या प्रचलनात आल्या. याबद्दल कुठलाच शोक मला वाटत नाही. कोणी मला म्हटले, की देवनागरी त्याग आणि प्राचीन ब्राह्मी लिपी लिहायला वापर, तर त्याला मी वेड्यात काढेन.

लिप्या या मुख्यतः शिलालेख आणि प्राचीन दस्तऐवज वाचण्याकरिता नसतात, तर रोजच्या व्यवहाराकरिता असतात.

आता हे खरे, की मला रोमन लिपीमध्ये लिहिलेल्या मराठीपेक्षा देवनागरीत लिहिलेली मराठी वाचण्यास सोयीची वाटते. पण हा निव्वळ सवयीचा परिणाम आहे. गुजराती बंगाली वगैरे लिप्या येत असूनही त्यातील अक्षरे वाचायला मला कठिण जातात. इतकेच नव्हे, मराठी भाषा जर रोमन लिपीत लिहिली किंवा मलयाळम् लिपीमध्ये लिहिली, तर त्यापैकी मला रोमनच वाचायला सोपी जाईल.

दोन-अडीचशे वर्षांपूर्वीपासून मराठीतली विपुल ग्रंथसंपदा रोमन लिपीत छापून निर्माण झाली असती, तर त्याबद्दल विलाप करण्यासारखे मला काहीही वाटले नसते. त्याचीही सवय झाली असती.

स्पॅनिश आगमनानंतर माया लिपीचा आणि तिच्यात लिहिल्या गेलेल्या साधनांचा कसा विनाश झाला, आपल्याकडे ब्राह्मी लिपीचे काय झाले ही उदाहरणे डोळयासमोर आहेतच. ... भूतकाळ विसरलेल्या समाजांचे भविष्य कसे असते हे आपण आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेच्या उदाहरणांवरून पाहू शकतो. भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवणारे घट्ट सिमेंट नाहीसे झाल्यावर इथे पुढेमागे कायमचे अराजक माजले असते आणि आजचा सामर्थ्यवान भारत कदाचित निर्माणच झाला नसता. १८३४ च्या काळातला दीनदलित हिंदुस्थान कदाचित पुनः डोके वर काढूच शकला नसता असे मला वाटते.

या कल्पनाविलासाकरिता तुमच्याकडे काय निर्देश आहे?

ब्राह्मी लिपीचे काय झाले? माया/स्पॅनिश उदाहरणासारखी युरोपियन आगमनानंतर ती लुप्त झाली? मग गोमटेश्वराच्या पायथ्याशी शिलालेखात १००० वर्षांपूर्वी ब्राह्मीऐवजी देवनागरी, हलकन्नड, वगैरेच लिप्याच बर्‍या दिसतात - ब्राह्मी नव्हे.

माया लिपी कदाचित त्यांच्या राजपुरोहितांना बांधून ठेवणारे सिमेंट असेल. माया हा काही सुशिक्षित समाज नव्हता. माया साम्राज्याचा स्पॅनिशांच्या घातकी युद्धात नायनाट झाला. (अर्थात त्या आधी आत्मघातकी युद्धांत माया साम्राज्ये पार पिचलेलीच होती. स्पॅनिश पोचले तोवर मायांची सर्वात समृद्ध शहरे शेकडो वर्षे ओसाड पडलेली होती.)

व्हिएतनाम देशातली लिपी काही शतकांपूर्वी चिनी भाषेच्या लिपीत फरक करून बनवलेली होती. त्यानंतर त्यांनी रोमन लिपी अंगीकारली. त्यातही फरक केलाच. त्यामुळे त्यांचे काय मोठे नुकसान झाले? फ्रेंचांना त्यांनी हाकलले आणि रक्तरंजित युद्धात अमेरिकनांना हाकलले. बिगर-रोमन लिपी असती तर आधी हाकलले असते, की युद्ध कमी रक्तरंजित झाले असते? कायमचे अराजक वगैरे माजलेले नाही. आणि तो देश पुन्हा कधी डोके वर काढू शकलाच नाही वगैरे असे काही मला दिसत नाही. लिपीचा मुद्दा क्षुल्लक आहे, आणि वसाहतवाद आणि शीतयुद्धातील डावपेचांनी तो देश ग्रसला होता, हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

आफ्रिकेचे काय उदाहरण भारतातील स्थितीला समांतर आहे, ते मला माहीत नाही. दक्षिण अमेरिकेचे काय समांतर उदाहरण आहे, ते मला माहीत नाही. पण वसाहतवाद, गुलामगिरी, खनिजे आणि वनसंपदेचा व्यापार... उत्तर अमेरिकेत लाखोंनी मूळ-रहिवाश्यांची कत्तल... या सगळ्या गोष्टी लिपीबदलापेक्षा मला महत्त्वाच्या वाटतात.
- - -
कदाचित आजही भारतातील लोक मोठ्या प्रमाणात धोतरे आणि सकच्छ साड्या नेसत असते, तर कोणी लिहिले असते : "इंग्रज कंपन्या आणि सरकारी शाळा विजारी घालण्याबाबत सक्ती करण्याचा कुटील डाव खेळत होत्या. थोडक्यात वाचलो! भारताला एकत्र विणणारी आणि कासोट्याने घट्ट बांधणारी ही वस्त्रे जर आपण नेसायचे विसरून गेलो असतो, तर अराजक माजले असते आणि आजचा सामर्थ्यवान भारत कदाचित निर्माण झाला नसता." अरेरे - पेशवाई काळापासून टिकलेल्या पगड्या बांधणारे कारागीर आता कुठे राहिले - मोडी विशेषज्ञांइतकेच ते मोजके!

काष्टा खोचण्याऐवजी बटण-झिप वापरल्यामुळे भारताचे दीर्घकाळचे नुकसान झाले नाही, ब्राह्मीऐवजी नागरी लिपी वापरल्याने नुकसान झालेले नाही. आणि नागरी ऐवजी शेकडो वर्षांपासून रोमन वापरली असती तर काहीही मोठे नुकसान झाले नसते.

असहमत

कपड्यांच्या सवयीची उपमा पटली नाही. मला वाटते लेखकाला मांडायचा मुद्दा हा लिपिप्रौढी नसून एक शृंखला अकस्मात तोडल्यानंतर काय परिणाम होऊ शकले असते असा आहे. त्यांना अभिप्रेत असलेली शृंखला ही समाजाच्या सामुहिक स्मृतीची आहे. अचानक लिप्यंतर झाल्याने ही सामाजिक स्मृतीची शृंखला निश्चित तुटली असती. इतिहासाचा ठेवा सुलभ राहिला नसता हे पटते.

अर्थात त्याने आपला समाज इतिहासच विसरला असता हे काही पटत नाही. लिप्यंतरानंतरही जुने ग्रंथ रोमन लिपीमध्ये आणण्याचा नवा उद्योग उभा राहिला असता असे वाटते.

सहमत

धनंजय यांची या विषयावरची मते पटली नाहीत.
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम, माहितीपूर्ण वाटला. नव्या गोष्टी समजल्या, आभारी आहे.

थोडे अवांतर- या इंटरनेटयुगातही युनिकोडच्या आगमनानंतर मायबोली या संकेतस्थळावर "आधीच्याप्रमाणे रोमन मराठीच सुरू ठेवायचे, की युनिकोडकृपेने देवनागरीत मराठी लिहायला लागायचे" यावरून घमासान झाले होते. (असे जुनीजाणती मंडळी सांगतात ! ;))
अर्थातच देवनागरी गटाची सरशी झाली, हेवेसांनल.

नेमके कितपत अकस्मात?

लिप्यंतर अकस्मातच झाले असते हे कशावरून वाटते? आणि "अकस्मात" म्हणजे किती? एके दिवशी सर्व साक्षर लोक देवनागरीत लिहीत होते, आणि दुसर्‍या दिवशी ९९% टक्के साक्षर लोक देवनागरी-न-कळणारे झाले... इतके अकस्मात काही झाले, तर खचितच शृंखलाभंग झाला असता.
- - -
वास्तवात असे होत नाही. मागच्या पिढीला जुनी लिपी येत असते, मधल्या पिढीला दोन्ही लिप्या येत असतात. गोव्यात पोर्तुगिझांच्या काळात (गोव्यात छापलेल्या वर्तमानपत्र-पुस्तकांत) कोंकणी ही रोमन लिपीतच लिहिली जात असे, आणि आता जवळजवळ सगळेच लोक देवनागरीत लिहितात. तरी रोमन लिपीत लिहू-वाचू शकणारे जुनेजाणते लोक अजूनही सापडतात. सरकारने कोंकणीसाठी रोमन लिपीस अधिकृत साहाय्य बंद केल्यानंतर काही दशके रोमन लिपीतील कोंकणी वर्तमानपत्रे येत असत, नंतर बंद पडली. गोव्यातील चर्चची पत्रके सुद्धा आजकाल देवनागरी लिपीत दिसतात. शृंखला अकस्मात तुटल्याचा अनुभव नाही. (मी स्वतः कोंकणी देवनागरीत लिहायचा पुरस्कार करतो. मला सोय होते, हा स्वार्थ आहेच :-) ... पण इतकेच नाही, तर गोव्याबाहेर कोंकणी लिहिणारे जे गोवेकर होते, त्यांची संख्या मोठी होती. शिवाय त्या काळात गोव्यात राहून देवनागरीतच - मराठी शाळेतच - शिक्षण झालेले लोक खूप होते. त्यांना मौखिक कोंकणी अस्खलित येते, आणि मराठी शिक्षणामुळे देवनागरी येत असे, त्या सर्वांना कोंकणी लिहायची आयती सोय झाली.)
- - -
चिनी भाषेची लिपी जुन्या पद्धतीपासून नव्या पद्धतीची झाली (हे चीनच्या "सांस्कृतिक क्रांती"च्या आधी झाले) तरी चिनीची शृंखला अकस्मात् तुटली नाही. अजूनही चीनमधील कित्येक अभ्यासकांना (म्हणजे महाराष्ट्रात मोडीचे अभ्यासक असतात तशांना) वाचता येते.
- - -
भारतातील ग्रंथांची परंपरा मौखिक होती. (माझ्या आजोबांना लहानपणापासून कित्येक संस्कृत ग्रंथ मुखोद्गत होते : आणि त्यांचा जन्म तर १९०० नंतरचा होता. ही माझ्या आजोबांबाबत प्रौढी नव्हे, तर त्या काळातल्या त्या जमातीतल्या पुरुषांमधील सामान्य व्यवहार म्हणून हा दाखला देत आहे.) संस्कृत ग्रंथ कन्नड/तेलुगु वगैरे लिप्यांमध्ये छापण्यावाचण्याची परंपरा आहे; त्या गावांमध्ये संस्कृत पंडित देवनागरी न-शिकल्यामुळे अकस्मात शृंखलाभंग मुळीच झाला नाही.
- - -
मराठीमधील ग्रंथांची रचना त्याच काळात मोठ्या प्रमाणात सुरू झाली : त्या आधी दर्जेदार ग्रंथ निर्माण झाले असले, तरी ते सगळे मिळून थोडेच होते. त्यांची नव्या लिपीत छपाई करणे सहजच शक्य होते. त्यामुळे लिपीबदल झाला असता, तर आधुनिक मराठी ग्रंथरचनेच्या शृंखलेत काहीही खंड पडला नसता.

यू. एस. अमेरिकेत असल्या तक्रारी ऐकायला मिळतात : "अकस्मात इंच-पौंड ऐवजी मीटर-किलो वापरायला घेतले तर शृंखला तुटेल - कोणाला किती-काय मोजमापे समजणारच नाहीत..." कित्येक देशांचा अनुभव पाठीशी असल्यामुळे आपण म्हणू शकतो, की प्रत्यक्षात "अकस्मात" असा बदल होत नाही. पिढी-दोन-पिढी दुहेरी समज असलेले लोक भेटतात.

प्रतिसाद

"तरी रोमन लिपीत लिहू-वाचू शकणारे जुनेजाणते लोक अजूनही सापडतात."

हा मुद्दा मला नीटसा कळला नाही.
इंग्रजीशी परिचय असल्यास रोमन लिपीत लिहू-वाचू शकणार्‍या लोकांची वानवा कशी असेल? की माझे काहीतरी चुकते आहे इथे?

कोंकणी ही शेवटी 'भाषा' नसून 'बोली' आहे. त्यामुळे तिच्या लिपीत झालेला फरक हा भारताच्या वीस-बावीस समृद्ध भाषांच्या लिप्यंतरणाच्या तुलनेत नगण्य म्हटला पाहिजे. आपण वैयक्तिक सोय-गैरसोयीबद्दल बोलत नाही आहोत, तर एका विस्तृत भूप्रदेशाच्या भाषिक ओळखीचा हा प्रश्न आहे.(म्हणजे होता !) बाहेरून लादलेल्या रोमन लिपीची तुलना शतकानुशतके उत्क्रांत होत गेलेल्या कुठल्याही स्थानिक लिपीशी करता येणार नाही. शेवटी भाषेचा कितीतरी गहिरा आणि जवळचा संबंध संस्कृतीशी असतो, आणि असा काही निर्णय (पक्षी: रोमन लिपी) लादला गेला असता तर स्थानिक भाषा क्रमाक्रमाने नामशेष होण्याची शक्यता होती, असे मला वाटते. याबद्दल श्री. कोल्हटकरांनी केलेला तर्क पुष्कळच पटण्याजोगा आहे.

चीनमधे लिपीबदल कसा झाला याबद्दल मला कल्पना नाही, पण दोन्ही लिपी स्थानिक असाव्यात असा माझा अंदाज आहे. तुम्ही दिलेली इतर उदाहरणे प्रस्तुत मुद्द्याच्या संदर्भात थिटी आहेत, असे माझे मत आहे.

भाषा आणि बोली - फरक काय? ते असो...

कोंकणी ही शेवटी 'भाषा' नसून 'बोली' आहे.

हे काही समजले नाही. भाषा आणि बोली यांतला फरक (या संदर्भात, आणि सैद्धांतिक दृष्ट्याही) काय आहे? याबाबत वेगळा धागा सुरू करावा, अशी विनंती.

त्यामुळे तिच्या लिपीत झालेला फरक हा भारताच्या वीस-बावीस समृद्ध भाषांच्या लिप्यंतरणाच्या तुलनेत नगण्य म्हटला पाहिजे.

असेल बुवा. हा मुद्दा विस्ताराने सांगता येईल का? कुठल्या या वीस बावीस भाषा? कुठली त्यांची लिप्यंतरणे? त्यांच्यापैकी कुठल्या भाषेच्या लिप्यंतरणानंतर जर तो सांस्कृतिक समाज नाहिसा झाला नसेल, तर कोंकणीऐवजी त्या भाषेचे उदाहरण घ्या. की या सगळ्या वीस-बावीस भाषांपैकी कुठल्याच भाषेचे लिप्यंतरण झालेले नाही? पैकी ब्राह्मी-उद्भव नसलेली लिपी आणि ब्राह्मी-उद्भव लिपी असलेल्या दोनतरी "मोठ्या प्रदेशाच्या" भाषा मला ठाऊक आहेत : पंजाबी आणि सिंधी. त्यांचे उदाहरण तुमच्या मताला लागू करून दाखवाल काय?

इंग्रजीशी परिचय असल्यास रोमन लिपीत लिहू-वाचू शकणार्‍या लोकांची वानवा कशी असेल? की माझे काहीतरी चुकते आहे इथे?

रोमन लिपी कोंकणीकरिता वापरतात, तेव्हा त्यातील चिन्हांचा ध्वनींशी जो परस्परसंबंध आहे, तो इंग्रजीपेक्षा वेगळा आहे. इंग्रजी भाषा रोमन लिपीत वाचू शकणारा जर तेवढ्या भांडवलावर रोमन लिपीत लिहिलेली फ्रेंच भाषा वाचू लागला, तर जसा काहीच्या बाही उच्चार करेल - मूळ फ्रेंच भाषकालाही त्याचे वाचन समजू येणार नाही, तसाच हा प्रकार. इंग्रजी वाचता येते त्याला रोमन लिपीत लिहिलेले कोंकणी (शिकल्याशिवाय) वाचता येणार नाही.

- - -

बाहेरून लादलेल्या रोमन लिपीची तुलना शतकानुशतके उत्क्रांत होत गेलेल्या कुठल्याही स्थानिक लिपीशी करता येणार नाही.

बाहेरच्या कुठल्या गोष्टी "लादलेल्या" असतात, आणि कुठल्या गोष्टी "रुळलेल्या" असतात, त्याबद्दल तुम्हाला जितक्या सहजतेने ठाम विधान करता येते, तितके ठाम विधान मला करता येत नाही. याबाबत काही मार्गदर्शन करता येईल काय? शतकानुशतके उत्क्रांत होत गेलेला धोतर/साडी हा स्थानिक पेहराव आणि बाहेरून लादलेला शर्ट-पँट पेहराव यांची तुलना करता येईल, की करता येणार नाही? लिपीबाबत तुलना करता येत नसेल, पण पेहरावाबाबत करता येत असेल, तर त्यांच्यातला भिन्नता कशी ओळखावी?

तुम्हाला (व आळशांचा राजा यांनासुद्धा) पेहराव संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटत नाही, पण लिपी महत्त्वाची आहे. माझी स्वतःची आई पँटचे सोडा, सलवार-कमीज घालण्याबाबत काचकूच करते. माझ्या आजीच्या दृष्टीने घरी मांसाहार करण्याने काहीतरी महत्त्वाची परंपरा नासते. तुर्कस्तानातल्या कित्येक बायका डोक्यावरचा रुमाल काढायचा म्हटला तर त्यांची संस्कृती धोक्यात येते. तुम्ही सर्व लोक "अमुक गोष्ट संस्कृतीच्या अगदी जवळची आहे, तमुक नाही" हा फरक करता तरी कसे, हे मोठे कोडे आहे.

शेवटी भाषेचा कितीतरी गहिरा आणि जवळचा संबंध संस्कृतीशी असतो, आणि असा काही निर्णय (पक्षी: रोमन लिपी) लादला गेला असता तर स्थानिक भाषा क्रमाक्रमाने नामशेष होण्याची शक्यता होती, असे मला वाटते.

याबाबत एखादे उदाहरण माहीत आहे काय?

याबद्दल श्री. कोल्हटकरांनी केलेला तर्क पुष्कळच पटण्याजोगा आहे. ...चीनमधे ... दोन्ही लिपी स्थानिक असाव्यात असा माझा अंदाज आहे.

सुरुवातीच्या माझ्या प्रतिसादात व्हिएतनामी भाषेचे उदाहरण दिलेले आहे. त्यातली आताची लिपी रोमन आहे. पहिले उदाहरण लक्षात घ्यावे, ही विनंती. नाहीतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तुर्की भाषा आदली लिपी सोडून रोमन-उद्भव लिपी स्वीकारती झाली. ते उदाहरण घ्या. त्याकाळातल्या कमाल आतातुर्कच्या क्रांतीमध्ये तुर्की राष्ट्रवाद खूपच वाढला. तुर्की भाषा ही नामशेष तर झाली नाहीच, जागतिक ख्यातीचे लेखन त्या भाषेत होते.

मी वेगवेगळ्या भाषांची उदाहरणे दिली आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे असे बारीकसारीक फरक सांगितले आहेत. तुर्कस्तानाबाबतही काहीतरी फरक सापडेलच. कदाचित तुर्कस्तानात रोमनांसारखे हौदात समूहस्नान करतात, म्हणून ते उदाहरण तुम्ही बाद कराल! माझ्या एका उदाहरणाबाबत तुम्ही सांगितलेली माझ्या दुसर्‍या उदाहरणाला लागू होत नाही, म्हणजेच त्या अडचणी मूलभूत नाहीत, असे प्रतिपादन मी करतो.

लिपीबदलाने भाषा नामशेष होते असे एकही उदाहरण कोल्हटकरांनी दिलेले नाही. (माया वगैरे उदाहरणे चुकलेलीच आहेत. स्पॅनिशांनी मायाची लिपी शिक्षणाने बदलायचा कुठलाही प्रयत्न केला नाही. माया उच्चभ्रू समाजाला जिवेच मारले. तीच बाब दक्षित अमेरिकेत. आफ्रिकेबाबत नामोनिर्देशाशिवाय कोलटकरांनी काहीच तपशील दिलेले नाहीत, त्यामुळे त्या विस्तृत भूखंडातील शेकडो भाषांपैकी कुठल्या भाषा त्यांच्या मनात होत्या, ते कळणे दुरापरस्त आहे. आफ्रिकेत अक्षरे नसलेल्या काही भाषांना गेल्या शतकात लिप्या मिळाल्या आहेत खर्‍या - रोमन म्हणा, अरबी म्हणा - पण ही बाब या संदर्भात ना येथे ना तेथे. काही नाही त्यापेक्षा त्या भाषांचे थोडेतरी लेखन झाले.)

तुम्हीही लिपीबदलामुळे क्रमाक्रमाने नामशेष झालेल्या कुठल्याही भाषेचे उदाहरण आतापर्यंत दिलेले नाही. म्हणजे टिकलेल्या भाषांच्या उदाहरणांचे बारीकसारीक मुद्द्यांनी खंडन, पण लिपिबदलाने* नामशेष झालेल्या भाषेचे एकही उदाहरण अजून आपल्यापाशी नाही : त्यामुळे क्रमाक्रमाने नामशेष होण्याची शक्यता थोडी की खूप हे तुम्ही कसे जोखले, याबद्दल मला अजून नीट समजलेले नाही.

*लिपिबदलामुळे नामशेष झाल्याचे उदाहरण हवे. नुसतेच शौरसेनी प्राकृत, अर्धमागधी, अंदमानमधली ओको-जुवोई, ब्राझिलमधली कानोए... वगैरे नामशेष भाषांच्या यादीने काहीही साधत नाही : लिपिबदलामुळे या भाषा नामशेष झालेल्या नाहीत.

प्रतिसाद

भाषा आणि बोली यांतला फरक काय आहे?

अगदी ढोबळमानाने असे म्हणता येईल की जी प्राधान्याने 'बोलली' जाते ती बोली, आणि बोलली+ लिहिली+वाचली+छापली जाते ती भाषा.
Language आणि Dialect यातला फरक मी तुमच्यासारख्यांना समजावून सांगावा, अशी परिस्थिती नाही. ’कोकणी’स भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी एकेकाळी जोरात होती आणि पुलंसारख्या अनेकांनी त्याला विरोधही केला होता. पुलंच्या ’एक शून्य मी’ या पुस्तकात त्यांचा या विषयावरील लेख वाचनीय आहे- तुम्ही वाचला असेलच. (दिशाभूल म्हणतात ती हीच, कळ्ळें मूं भेंब्रोबाब?)
नवीन लेख वगैरे लिहिणे माझ्याकडून होणार नाही, क्षमस्व.

"असेल बुवा. हा मुद्दा विस्ताराने सांगता येईल का? कुठल्या या वीस बावीस भाषा? कुठली त्यांची लिप्यंतरणे?"

(हे बहुधा तुम्ही वैतागून लिहिले असावे.) मी भारतात प्राधान्याने बोलल्या जाणार्‍या वीस-बावीस भाषांबद्दल बोलतो आहे. मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू, मल्याळम, हिंदी, कन्नड इत्यादि. मी त्यांची 'होऊ घातलेली लिप्यंतरणे' असा शब्दप्रयोग करायला हवा होता.
पंजाबी आणि सिंधी भाषेत झालेला लिपीचा बदल हा ठरवून केला गेला किंवा कसे याबद्दल मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करत नाही.

रोमन लिपी कोंकणीकरिता वापरतात, तेव्हा त्यातील चिन्हांचा ध्वनींशी जो परस्परसंबंध आहे, तो इंग्रजीपेक्षा वेगळा आहे.

ठीक, हे आले लक्षात.
पण कोंकणी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा जाणणारा माणूस रोमन लिपीत लिहिलेले कोकणी व्यवस्थित वाचू शकेल किंवा नाही याचा खुलासा होत नाही. इंग्रजी भाषा रोमन लिपीत वाचू शकणारा जर तेवढ्या भांडवलावर रोमन लिपीत लिहिलेली फ्रेंच भाषा वाचू लागला, तर नक्कीच काहीच्या बाही उच्चार करेल, पण जर फ्रेन्च भाषा अवगत असण्याचे भांडवल त्याच्याकडे असेल तरीही त्याचे उच्चार चुकतील का? (तुमच्या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे अशी फारच थोडी जुनी माणसे शिल्लक आहेत जी रोमन-कोकणी वाचू शकतात.)

लिपीबाबत तुलना करता येत नसेल, पण पेहरावाबाबत करता येत असेल, तर त्यांच्यातला भिन्नता कशी ओळखावी?

पेहरावाच्या बाबतीतला तुमचा युक्तिवाद इथे लागू होत नाही, याचे कारण असे की इंग्रज सरकारने "नेटिव्हांचा धोतर-कुर्ता हा पेहराव मागास असून त्यांचा सर्वांगिण विकास घडवण्यासाठी त्यांना शर्ट-प्यांटात कोंबले पाहिजे" असा काहीएक धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलात आणण्याचा इतिहास नाही. (म्हणजे मी तरी वाचलेला नाही.) भारतीयांनी पोशाख आणि तत्सम इतर बदल अनुकरणातून स्वीकारले. ब्रिटिशांचे अनुकरण करून भारतीयांनी आपल्या भाषेच्या लिप्या बदलल्या असत्या काय? पण कायदा झाला असता तर कदाचित बदलल्या असत्या. आज भारतात इतके इंग्रजी शिकल्यानंतर तरी कुणाला त्यांच्या लिपिचे अनुकरण करावेसे वाटते का? त्यांच्या पोशाखाचे आणि चालीरितींचे आजही अनुकरण होतेच आहे ना? लिपि बदलणे हे लिंगरी बदलण्याएवढे सोपे आहे काय?

तुम्ही सर्व लोक "अमुक गोष्ट संस्कृतीच्या अगदी जवळची आहे, तमुक नाही" हा फरक करता तरी कसे, हे मोठे कोडे आहे.

'संस्कृती' वगैरे शब्द लिखाणात आले, की समोरच्याला मूर्खात काढायची एक फॅशन इथे आहे, याची मला कल्पना आहे. तरीही 'तुम्ही सर्व लोक' वगैरे जनरलायजेशन कृपया करू नयेत. मी इथे फक्त माझ्याच वतीने लिहितो आहे. आणि मी संस्कृतीला लिपि जवळची आणि पेहराव दूरचा अशा पद्धतीचा युक्तिवाद करत नाहीये. कायदा करून एखादा बदल समाजाच्या गळी उतरवणे आणि कालानुक्रमे समाजाने एखादा बदल स्वीकारणे यात तुमच्या मते गुणात्मकदृष्ट्या काहीच फरक नाही का?

लिपिबदलामुळे नामशेष झालेल्या एकाही भाषेचे उदाहरण माझ्याजवळ नाही. याचे कारण अशी एकही भाषा अस्तित्वात नाही- हे नसून तुमच्यापुढे माझे वाचन अगदीच कमी आहे- हे असावे. मी फक्त माझा तर्क सांगतो आहे, आणि त्यामुळेच 'असा माझा अंदाज आहे', 'असे मला वाटते' वगैरे शब्दप्रयोग तुम्हाला माझ्या पोस्टमधे मुबलक प्रमाणात दिसतील. तुमचा एकंदर व्यासंग माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त असल्याने, तसेच तुमच्याकडे कायदा करून सर्वस्वी वेगळी लिपि स्वीकारल्यानंतरही आपल्या सर्व अंगभूत भाषिक वैशिष्ठ्यांसह टिकून राहिलेल्या + आणखी प्रगत झालेल्या भाषांची उदाहरणे असल्यामुळे मी माझा तर्क किंवा माझे एकंदरच प्रतिपादन चुकीचे असल्याची शक्यता गृहीत धरली आहेच. तरी कृपया माझ्या या आणि आधीच्या पोस्टमधल्या विधानांना प्रतिवाद समजून खंडन करण्यापेक्षा शंका समजून निरसन करावे, ashi namra vinanati karto.

संस्कृतीबाबत

'संस्कृती' वगैरे शब्द लिखाणात आले, की समोरच्याला मूर्खात काढायची एक फॅशन इथे आहे, याची मला कल्पना आहे.

असे बहुधा नसावे. फक्त अमुकतमुक तपशिल हेच लक्षण मानून संस्कृतीची व्याख्या होते, अशा विधानालाच विरोध होतो.

प्रत्येक पिढीतून पुढच्या पिढीत बहुतेक सांस्कृतिक तपशील संक्रमित होतात. काही तपशील मात्र वाजूला पडतात, आणि काही नवीन तपशील जोडले जातात. त्यामुळे कुठल्याही एका तपशिलाला संस्कृतीचे लक्षण मानता येत नाही. याचा असा अर्थ होत नाही, की "संस्कृती" या संकल्पनेलाच विरोध आहे.

- - -
(बौद्धांचा असाच काही दृष्टांत आहे, पण या क्षणी मला ग्रीकांचा दृष्टांत आठवतो आहे : )
१. लाकडाच्या फळ्यांची बनवलेली नौका आहे, त्या सगळ्या फळ्या एकाच वेळी काढून टाकल्या तर नौका अशी काहीच राहात नाही.
२. तिची एखाद-दुसरी फळी कुजून खराब झाली, की तितक्याच फळ्या काढून नव्या फळ्या बसवतात.
३. ती एखाद-दुसरी फळी बदलली असली तरी नौका "तीच" आहे. कारण बाकी सार्‍या फळ्या आदल्याच आहेत.
४. सामान्यपणे मूळ/जुन्या फळ्या खराब होतात, आणि त्या मानाने बदललेल्या फळ्या टिकतात. (कारण त्या अजून तितक्या झिजल्या नसतात. झिजल्यावर त्याही बाद होतीलच.)
५. अशी दुरुस्ती वर्षानुवर्षे केल्यानंतर प्रत्येक फळी एकदातरी बदलली गेलीच : मूळची एकही फळी शिल्लक राहिलेली नाही.
६. कूटप्रश्न असा : नौका सुरुवातीचीच की वेगळी?
- - -
त्याच प्रमाणे कुठल्याही एका काळात एखाद्या समाजातील सर्व वागणुकीच्या पद्धतींना/सामाजिक रचनांना/परंपरांना मिळून संस्कृती म्हणता येते. त्या सर्वच वजा केल्या तर संस्कृती अशी काहीच नाही.
दर पिढीतून पुढच्या पिढीत संस्कृतीचे बहुतेक घटक अनुवृत्त होतात. पण एखाद-दुसर्‍या खराब फळीसारखा एखाद-दुसरा घटक बदलतो. याबाबतीत कुठलीही एक फळी, कुठलाही एक घटक बदलण्यास वर्ज्य नाही, संस्कृती शाबूत राहिल्याचेच दिसते.
त्यातल्या त्यात जुने घटक बदलले जातात.
खूप काळानंतर संस्कृतीच्या खूप आधीच्या कुठल्याही घटक-परंपरा जशाच्या-तशा उरलेल्या दिसत नाहीत. तरीसुद्धा संस्कृती अशी काहीतरी राहिलीच असते.

- - -
सारांश :- संस्कृतीचा उल्लेख आल्यावर हेटाळणी होत आहे, असा भास झाला, तरी बहुतेक वेळा तसे नसते. कुठल्याशा तपशिलालाच संस्कृतीकरिता अपरिहार्य मानल्याबाबत विरोध होत असतो. विरोध नेमका कशाला आहे, हे लक्षात येणे बरे असते.
"अमुक फळी बदलली तर नौका ही नौकाच राहाणार नाही" याबाबत विरोध केला, तर तो तितकाच मर्यादित असतो. हा वाद "नौकाच नको" विरुद्ध "नौका हवी" यांच्यातला वाद नसतो. फळीबाबत वाद हा नौकेबाबत वाद आहे, असा गैरसमज झालेले बरे नव्हे. त्याच प्रमाणे "संस्कृतीचा अमुक घटक अपरिहार्य नसतो" असे म्हणणे म्हणजे "संस्कृतीच नको" असे म्हणणे आहे, असा गैरसमजही असू नये.

चर्चा चुकीची दिशा घेत आहे.

मला वाटते चर्चा चुकीची दिशा घेत आहे.

लिपिबदलामुळे भाषाच नष्ट होईल असे मी स्वत: कोठेहि लिहिल्याचे किंवा सुचविल्याचे मला दिसत नाही. मी असे म्हटले आहे की लिपिबदल झालाच असता तर वापरातून गेलेल्या लिपीत बद्ध असलेले सर्व साहित्य आणि तदंगभूत संस्कृति आणि परंपरा दृष्टिआड गेले असते आणि लवकरच out of sight, out of mind ह्या नियमानुसार विस्मृतिप्राय झाले असते. माझे शब्द असे आहेतः 'लौकरच सर्व भारतीय लिपी पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या आणि त्या त्या लिपींमध्ये लिहिलेली असंख्य हस्तलिखिते आणि कागदपत्रे दुर्लक्षित अवस्थेत कोणाकोणाच्या माळ्यावर पडून राहिली असती. नशिबाने एखाददुसरे पुस्तक रोमन लिपीतून छापले गेलेही असते पण बहुतेकांची वाटचाल वाळवी, ओलावा, धूळ ह्या परिचित मार्गाने होऊन ती नष्ट तरी झाली असती किंवा पूर्ण विस्मरणात गेली असती. रोमन लिपीत आणि प्रामुख्याने मिशनरीनिर्मित ज्ञानावर पोसलेल्या नेटिव सुशिक्षितांची आपल्या प्राचीन ठेव्याकडे पाहण्याची दृष्टि अज्ञान आणि उपेक्षेचीच राहिली असती.'

एकुणातच त्या काळात साक्षरता (सुशिक्षितता नाही - ती कल्पनाच बहुतेकांना ठाऊक नव्हती) फार कमी होती. ज्ञानाची जोपासना आणि वृद्धि करणे हे ज्यांचे परंपरागत मानलेले स्थान होते त्या वर्गातहि ज्ञानाच्या मागे धावणे महत्त्वाचे मानणारे लोक अत्यल्प होते. काही टक्के जणांना कारकुनी करण्यापुरते अंकगणित आणि लिखाण येत होते, पूजा सांगण्यापुरते चार मंत्रहि त्यांनी पाठ केलेले असतील पण ह्यापलीकडे जाण्याची ऊर्मि कितीजणांना होती?

अशाच वर्गातले काहीजण जुन्या पठडीतून थोडे बाहेर पडून रोमन लिपीतले मराठी आणि त्यासाठी क्रमिक पुस्तके म्हणून मिशनरी लोकांनी निर्माण केलेले धडे वाचून नव्या पद्धतीचे साक्षर झाले असते आणि त्यावर त्यांना इंग्रजी राज्यात कारकुनाच्या नोकर्‍या किंवा अन्य व्यवसाय मिळाले असते. अशांपैकी किती टक्के लोकांनी वेद, उपनिषदे आणि षड्दर्शने किंवा कालिदास, ज्ञानेश्वर, रामदास आणि मोरोपंत पुढच्या काळासाठी वाचवायला पाहिजेत म्हणून त्यांचे रोमनीकरण करण्यासाठी हातातले उद्योग बाजूस टाकून पोटतिडिकीने ते काम अंगीकारले असते? वेद, उपनिषदे आणि षड्दर्शने किंवा कालिदास आणि मोरोपंत हे तर झाले पहिल्या फळीतील काम. त्यामागे कमी ज्ञात असे हजारो हस्तलिखित ग्रंथ भारतभर विखरून पडले होते त्यांचा नंबर कधी लागला असता? बहूधा त्यांचा नंबर लागण्याच्या आधीच त्यांची ह्या ना त्या मार्गाने विल्हेवाट लागली असती. हा सर्व वेळ मिशनरीनिर्मित पुस्तकांतून दिले जाणारे शिक्षण चालूच राहिले असते आणि जुन्या ज्ञानाकडे आणि परंपरेकडे पाहण्याची त्यांची दृष्टि अधिकाधिक उपेक्षेची आणि तुच्छतेची राहिली असती. थेंबथेंब पाणी सतत पडत राहिले तर दगडहि फुटतो. म्हणूनच मी म्हटले आहे: 'लौकरच सर्व भारतीय लिपी पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या आणि त्या त्या लिपींमध्ये लिहिलेली असंख्य हस्तलिखिते आणि कागदपत्रे दुर्लक्षित अवस्थेत कोणाकोणाच्या माळ्यावर पडून राहिली असती. नशिबाने एखाददुसरे पुस्तक रोमन लिपीतून छापले गेलेही असते पण बहुतेकांची वाटचाल वाळवी, ओलावा, धूळ ह्या परिचित मार्गाने होऊन ती नष्ट तरी झाली असती किंवा पूर्ण विस्मरणात गेली असती. रोमन लिपीत आणि प्रामुख्याने मिशनरीनिर्मित ज्ञानावर पोसलेल्या नेटिव सुशिक्षितांची आपल्या प्राचीन ठेव्याकडे पाहण्याची दृष्टि अज्ञान आणि उपेक्षेचीच राहिली असती.'

धनंजय म्हणतात त्याप्रमाणे एकदोन पिढया दोन्ही लिपि जाणणार्‍यांच्या झाल्या असत्या हे शक्य आहे पण मुळातच साक्षरता कमी असल्याने अशा लोकांची संख्याहि स्वल्प असणार. त्यामध्ये संशोधक वृत्तीवे लोक आणखी कमी. अशा तुटपुंज्या बळावर देवनागरी वा अन्य भारतीय लिप्यांमध्ये बद्ध साहित्य रोमन लिपीमध्ये संक्रमित करण्यास किती दिवस उपलब्ध होते? अशिक्षितांच्या केवळ मौखिक परंपरेवरच अवलंबून हे साहित्य किती दिवस सामाजिक स्मृतीमध्ये टिकून राहिले असते?

कालान्तराने अशा साहित्यास काही संशोधकहि मिळाले असते - जसे आज ईजिप्तच्या प्राचीन लेखांचे संशोधन होते किंवा माया लिपि पुन: शोधली जाते तसे संशोधन ह्याहि साहित्याचे झाले असते. पण त्या इजिप्शियन वा मायन संशोधनाचा स्थानिक प्रजेशी काहीहि दुवा नाही, त्यांचे आजचे प्रश्न आणि चिंता अगदी वेगळया आहेत आणि त्या सोडविण्यासाठी तसल्या संशोधनाचा काहीहि उपयोग नाही. मृतदेहाच्या शवविच्छेदनासारखे ते आहे. ते करण्याच्या कितीतरी आधी देहच मृत होणार नाही असे पाहणे महत्त्वाचे नाही काय?

अर्थात हे साहित्य आणि तदंगभूत विचार टिकवून धरले जाण्याची गरजच काय होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यावर माझ्यापाशी उत्तर असलेल्च तर ते एव्हढेच आहे की माझ्यामते ते टिकवले जाणे हे भारताच्या प्राचीन अशा सांस्कृतिक एकात्मतेचा गाभा - सिमेंट - आहे. ते टिकवून धरले जाण्याची आवश्यकता माझ्या लेखी एक गृहीत आहे.

पुन्हा माया?

ईजिप्तच्या आणि मायांच्या भाषेचे दृष्टांत येथे गैरलागू आहेत.

१८००-१९०० काळात बरेच लोक संस्कृताचे अध्ययन करत होते, आणि त्यातील ग्रंथ मिळवून छापून घेत होते. यांच्यापैकी युरोपियन लोकही होते. इंग्रज सरकारने संस्कृतच्या पाठशाळांनासुद्धा पैसे पुरवले होते. भांडारकर हा गृहस्थ इंग्रजांच्या स्थापलेल्या विद्यापीठात अभ्यास करत होता. तुकारामाच्या गाथांचे संकलन करण्यातही इंग्रज काळात सरकारने मदत केली. वगैरे. या सगळ्या गोष्टी इंग्रजांनी कुठल्याशा राजकीय फायद्यासाठी, पाताळयंत्री कारणासाठी केल्याही असतील. पण लिपीबदलाबरोबर हे सगळे राजकारण-पाताळयंत्र वेगळे असते, असे मानण्यास कुठे जागा आहे?

मिशनर्‍यांच्या शाळा कुठल्याही लिपीत का होईना त्याच गोष्टी शिकवत्या झाल्या असत्या. लिपी बदलली नाही, म्हणून बहुसंख्य मिशनर्‍यांनी एतद्देशीय धर्मांची आणि प्राचीन ग्रंथांची स्तुती केली की काय? आणि स्तुती करणारे मोनिएर विल्यम्स वगैरे मिशनरी होते, त्यांनी स्तुती करायची थांबवली असती काय? इंग्रज सरकारांनी नेटिव्हांसाठी स्थापल्या त्या शाळांमध्ये बहुतेक बिगर-मिशनरीच होत्या. त्यातील बहुतेक गुर्जी आणि मास्तर हे बिगरमिशनरीच होते. त्यांना मिशनर्‍यांची री ओढण्याचे काय कारण असते?

थेंबथेंब पाणी सतत पडत राहिले तर दगडहि फुटतो.

:-)
उपमा खुलवून सांगाल काय? थेंब कुठले? दगड कुठला? फुटणे म्हणजे काय? (ज्या ठिकाणी मूळ प्रमेयांच्या-गृहीतकांच्या बाबतीत असहमती आहे, तिथे निव्वळ काव्यात्मक उपमा टाळाव्या, असे मला वाटते. प्रमाणांपैकी "उपमान" हे तृतीय श्रेणीचे प्रमाण आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान ही त्याच्यापेक्षा वरच्या श्रेणीची प्रमाणे होत. उपमान हे प्रमाण वापरण्याकरिता हे आवश्यक असते, की लोकप्रसिद्धीमुळे दृष्टांतातील कार्यकारणसंबंधाबाबत संवादकांत सहमती हवी, आणि उपमान-उपमेय यांच्यात तुल्यता असण्याबाबत संवादकांत सहमती हवी. मगच "जसे उपमानाबाबतीत, तसेच उपमेयाबाबतीत" अशा प्रकारचे प्रमाण वापरून युक्तिवाद पटवता येतो.)

लौकरच सर्व भारतीय लिपी पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या... वगैरे...

का बरे? तुम्हीच पुढे म्हणता की हस्तलिखिते राहिली असती. आणि ज्या काही हस्तलिखितांचे लिप्यंतरण-छपाई झाली असेल त्या प्रती उपलब्ध असत्या. तुम्हीच म्हणता की उच्चारलेली भाषाही जिवंत राहिली असती. मग रोझेटा स्टोन सापडून हियरोग्लिफिक लिपीसारखे उत्खनन करण्याची वेळ का यावी? १७०० काळानंतरची एकतरी लिपी अशा प्रकारे नॉन-डिकोडेबल झाल्याचे उदाहरण तुम्हाला ठाऊक आहे काय? जी घटना झाल्याचे एकही उदाहरण शेकडो वर्षांत ठाऊक नाही, त्या घटनेची भीती कशाकरिता?

ईजिप्तच्या लिपीबाबत हजार-दोन हजार वर्षांनी कोडी पडलेली आहेत. हजार दोन वर्षांनी कोणत्या भाषांच्या बाबतीत कोडी पडतील त्याबद्दल भाकिते करणे म्हणजे लॉटरी खेळणे होय.
मधल्या काळात ईजिप्तची चित्रलिपी आणि ग्रीक लिपी दोन्ही ईजिप्तच्या फारोआंच्याच राज्यात प्रचलित होत्या - वसाहतवाद नव्हता. ग्रीक लिपी शिल्लक राहिली, कारण ती चित्रलिपीपेक्षा भराभर लिहिण्यास सोयीची असावी. शिवाय ती उच्चारानुसारीही आहे. हे सोयीचे फायदे सोडून त्या काळातल्या ईजिप्शियनांनी चित्रलिपीच ठेवायला हवी होती? आता तीची नात असलेली कॉप्टिक भाषाही गेली, ग्रीक लिपीही गेली. कॉप्टिक भाषासुद्धा बोलणारे ख्रिस्तीच लोक. दोन हजार वर्षांच्या नंतर कुठल्या ईजिप्तॉलॉजिस्टची सोय व्हावी, म्हणून त्यांनी चित्रलिपीच वापरत राहायला हवी होती, असे म्हटल्यास... वेळखाऊपणामुळे त्यांची जी गैरसोय झाली त्याची भरपाई करून द्यायला आपण त्यांच्या काळात जाणार थोडेच आहोत?

माया लिपीचे लिप्यंतर करण्याचा प्रयत्नही स्पॅनिश वसाहतवादाने केलेला नाही. त्यांच्या अभिजनांची कत्तल केली. माया भाषा अजून आडगावांत जिवंत आहे. त्यांना चिरडून टाकण्याचे धोरण आजकाल मेक्सिकन सरकारने बंद केलेले आहे. त्यांच्यापैकीच सुशिक्षित लोकांनी ती भाषा लिहिण्यासाठी रोमन लिपीचा प्रकार वापरायला घेतला आहे.

तुम्हीच वर इंग्रजांची लिप्यंतराबाबत कागदपत्रे दिलेली आहेत. लिप्यंतर करण्यात रस होता, हेच माया अनुभवापेक्षा वेगळे आहे. आणि भारतातील अभिजनांची कत्तल वगैरे करण्याबाबत तुम्ही दिलेल्या कागदपत्रांत काहीच चर्चा नाही. त्यामुळे माझ्या मते तुमची दोन्ही उदाहरणे नि:संदर्भ आहेत.

अमेरिका खंडांतला वसाहतवाद (स्थानिक लोकांच्या कत्तली करणे, वसाहतवाद्यांकडून कायमच्या मोठ्या लोकसंख्या स्थापणे, आणि मग उरल्यासुरल्या मूळ लोकांना वसाहतवाद्यांचे नोकर करणे),
आफ्रिकेतला वसाहतवाद (थोड्या वसाहतवाद्यांनी स्थानिकांना पशुतुल्य वापरणे, बहुतेक करून नैसर्गिक संपत्तीचे अपहरण) आणि
आशियातील वसाहतवाद (थोड्या संख्येतल्या वसाहतवाद्यांनी राज्य करून मोठ्या स्थानिक लोकसंख्येने उत्पादन केलेल्या संपत्तीचे अपहरण करणे) यांच्यात खूपच फरक आहे.

भारताचे माया साम्राज्य होता-होता वाचले, ही भीतीच मुळात मनात यायला नको. आणि मग लिपी, सकच्छ लुगडी, शाकाहार... वगैरे क्षुल्लक गोष्टींनी भारत वाचला असा कल्पनाविलासही नकोत. कारण माया आणि भारतीय समाजांत शोधल्यास असे शेकडोनी फरक सापडतील.

तुम्ही पुन्हा या बाबतीत "माया" म्हटले तर "सबकुछ माया है" म्हणून डोळे बंद करण्याशिवाय काय पर्याय राहील?

चांगला लेख आणि चर्चा

चांगला माहितीपूर्ण लेख आणि तशीच चर्चा चालली आहे. रोमन लिपीत मराठी लिहिणे कठीण नाही, सवयीचा प्रश्न आहे. परंतु

Roman lipeet maraathi lihine katheen nasaawe. - रोमन लिपीत मराथी लिहिने कथीन नसावे.

Roman lipeet MarAThi lihiNe kaTheen nasAwe. - रोमन लिपीत मराठी लिहिणे कठीण नसावे.

Roman lipi2t mara2t2hi lihin2e kat2hi2n nasa2we. - रोमन लिपीत मराठी लिहिणे कठीण नसावे.

एक्सेंट मार्क्स वापरून आहेच आणखी एक मराठी लिहिता येण्याजोगा प्रकार. केवळ रोमन अक्षरांनी भारतीय भाषांचे उच्चार करणे कठीण वाटते. त्यांच्यातील खाचाखोचा वेगळ्या तर्‍हेने दाखवता आल्या तर रोमन अक्षरांचा वापर करून भारतीय भाषा लिहिणे कठीण नाही. कदाचित त्यामुळे भाषा वेगवेगळी असली तरी ती युनिवर्सल लिपी बनवून सर्वांना वाचता येईल. याचे नेमके फायदे किती किंवा तोटे किती याचे गणित केलेले नाही.

लिप्यंतरामुळे एका कालखंडातील साहित्याकडे दुर्लक्ष होऊन ते साहित्य लयाला जाईल ही कोल्हटकरांची भीती खरी वाटते.

बोली भाषा

"भाषा आणि बोली"

श्री.धनंजय आणि श्री.ज्ञानेश यांच्या प्रतिसादात भाषा आणि बोलीचे उल्लेख आले आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण चाललेल्या या विषयावर [प्रामुख्याने लिपीवर] केवळ वरील संदर्भापुरता माझा हा सहभाग समजावा.

साहित्य अकादमीने काही वर्षापूर्वी 'बोली भाषा' [त्यांच्या व्याखेत 'मौखिक'] एकत्रित करून त्यांच्यातीलही काही निवडक साहित्य, प्रमाणित भाषातून प्रसिद्ध करणे हा प्रकल्प हाती घेतला होता. गोंडी, अहिराणी, कोरकू, वारली, भिल्ली या महाराष्ट्रातल्या आदिवासी समजल्या जाणार्‍या [म्हणून आतापर्यंत दुर्लक्षित ?] बोली भाषा त्या समितीने प्राथमिक अभ्यासासाठी निवडल्या होत्या. बडोदा येथे अशा बोली भाषा संदर्भातील एक संशोधन केन्द्र अकादमीतर्फे चालविले जाते. काही वर्षापूर्वी (नेमके साल आठवत नाही) भिल्ली बोलीभाषेतील 'रामायण महाकाव्या'ची प्रत देवनागरी लिपीत उपलब्ध झाल्याची बातमी 'ललित' की 'मेहता ग्रंथ जगत' मध्ये आली होती. पण आपल्या उदासिनतेपोटी त्याचा मागोवा पुढे घेतला गेला नसेल यात दुमत असणार नाही.

असो.

[बाकी या विषयावरील वरील मते-मतांतरे वाचून शॉ चा 'टू पीपल डिव्हायडेड बाय द सेम लँग्वेज' हा शेरा आठवला.]

चांगला उपक्रम

आजवर अलिखित असे मौखिक परंपरेतले साहित्य लिखित स्वरूपातही साठवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.

लिप्यंतरणे

अतिशय उत्तम चर्चा.. मी इथे प्रथमच आलोय परन्तु इतकी चांगली चर्चा पाहून काही शंका इथे मांडाव्या वाटल्या..

१. बहुतेक सगळ्या युरोपीय भाषा या रोमन लिपी वापरतात आणि एकमेकांच्या भाषा समजायला, शिकायला त्यांना त्याचा फायदा ही होतो.. जर त्यांच्या मूळच्या लिपी वेगळ्या असतील तरी रोमन लिपीचा अंगीकार त्यांच्यासाठी (त्यांची वाढ, झालेच तर अस्तित्व यासाठी ) फायदेशीर ठरला असे म्हणता येईल का ?

२. माझ्या एका दक्षिण भारतीय मित्राशी चर्चा करताना एक कल्पना मांडण्यात आली की युरोपीय भाषांच्या तऱ्हेने जर सर्व भारतीय भाषांनी जर एकाच लिपी (उदा. देवनागरी ) अवलंबली तर सर्वाना अधिक उपयोगी ठरणार नाही काय ? (उदाहरणार्थ मराठी व हिंदी या दोन्ही भाषा एकाच लिपीमध्ये असल्याने मराठी लोकांना हिंदी तर हिंदी लोकांना मराठी शिकणे दक्षिण भारतीयांच्या तुलनेने सोपे जाते तसे.. ) साहित्य, विचार इत्यादीचे आदान प्रदान यासाठी हि गोष्ट लाभदायक ठरू शकते का ?

लिप्यंतरामुळे एका कालखंडातील साहित्य लयाला जाईल ही भीती आजच्या काळात तरी निराधार आहे.. (१८३४ किवा १८६० साली मात्र तशी परिस्थिती शक्य होती असे वाटते..) ..

{ थोडे विषयांतर :
नौकेचा दृष्टांत आवडला.. पण मग प्रश्न उरतोच की 'वसंतोत्सव' विरून गेला आणि 'valentine day' आला.. मग नौका तीच मानायची की वेगळी..? तीच असेल तर विरोध का? नसेल तर मग विरोध निरर्थक का ?
}

कारणे

>> नौकेचा दृष्टांत आवडला.. पण मग प्रश्न उरतोच की 'वसंतोत्सव' विरून गेला आणि 'valentine day' आला.. मग नौका तीच मानायची की वेगळी..? तीच असेल तर विरोध का? नसेल तर मग विरोध निरर्थक का ?

विरोध का? याचे उत्तर एक जाऊन दुसरी आली या विचाराने देता येणार नाही. सध्याच्या संक्रमण काळात दुसरा आलेला व्हॅलेण्टाईन डे 'कोठून आला' याचे एक बर्‍यापैकी निश्चित ज्ञान आहे. त्या 'कोठून' ला विरोध आहे म्हणुन 'आला' ला सुद्धा विरोध आहे. पुढे २००-३०० वर्षांनी 'कोठून'चा संदर्भ पुसट होईल तसा विरोध मावळेल.

समांतर उदाहरण म्हणजे मुंबईच्या संस्कृतीतून नारळीपौर्णिमा 'जवळजवळ' गेली आहे आणि रक्षाबंधन आले आहे. परंतु रक्षाबंधन हे 'बाहेरून'* आलेले नाही म्हणून त्याला व्हॅलेण्टाईन डे सारखा विरोध नाही.

*कदाचित हिंदु इतिहासातल्या दैदिप्यमान/पराक्रमी वगैरे राजपुतांकडून आली आहे म्हणून अजूनच कमी विरोध आहे.

नितिन थत्ते

अधिक पटली

लेखन आवडले.. तरीही श्री धनंजय यांनी व्यक्त केलेली विरुद्ध मते अधिक पटली.
तेव्हा श्री धनंजय यांच्याशी एकुणात (ढोबळमानाने) सहमती व्यक्ती करतो

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगला लेख

श्री. कोल्हटकर ह्यांनी लिहीलेला लेख आवडला व तो लिहीताना त्यांनी 'जे कश्ट घेतलेत' त्या कश्टांना मी नमन करतो.

लेखाच्या विशयाचा मुळ गाभा आहे - 'लिपी'. काळाने थोपवलेल्या बदलामुळे लिपीत होत गेलेले व होत असलेले बदल, भाशेतील बदल, भाशेतील बदल म्हणजे 'शब्दांच्या पदार्थरूपातील' व 'भावार्थरूपातील बदल' व त्या अनुशंगाने वाक्यांच्या वापरात व अर्थाकलानात होत असलेले/ गेलेले बदल, ह्या बदलांसोबत संस्कृतीमध्ये 'होत गेलेले'/ 'होत असलेले' (वाक्यांमधेल ह्या दोनही काळांना व्यक्त करेल असा शब्द - 'होणारे') बदल' ह्या बाबत पस्तुत लेखात मांडत असतानाच एक हळहळ देखील व्यक्त केली गेली आहे. काही वाचकांना ही 'हळहळ व्यक्त करणे' चूकीचे वा निरर्थक वाटू शकते. परंतु लेखात व्यक्त केलेली 'हळहळ' काहिशी अद्न्यानापोटी वा कमी माहितीपोटी आलेली असू शकते.

मला असलेल्या तोडक्या-मोडक्या माहितीनुसार, ब्राह्मी लिपी विकसीत होण्याआधी, वेद लेखनबद्ध होण्याआधी द्न्यानी मंडळींचे (ढोबळमानाने) बहुधा दोन गट होते.
१) जे स्वतः द्न्यानी होते. ज्यांनी, 'जे जाणले गेले आहे ते' वेद म्हणून इतरांना सांगितले.
२) जे वरच्या गटातील लोकांनी प्रसवलेले 'वेद' 'संपादन व संवर्धन करीत' पुढच्या पिढीत पोहचवण्याचे काम केले.
काहि काळानंतर एक क्रमांक असलेला गट काहिसा नाहीसा होत त्यांचा कर्तुत्वाचा प्रभाव निस्तेज व प्रभावहिन होत जावून त्यांची परंपरा खंडीत झाली. त्याचवेळी दुसर्‍या क्रमांकाच्या गटाने (स्पश्ट म्हणायचं झालं तर प्रवृत्तीने) जास्त उचल खाल्ली. व 'बाबा वाक्यंम प्रमाणंम' हे धोरण त्यांच्याकडून राबविले गेले. इथून पुढील काळात तीसर्‍या क्रमांकाचा गट ह्या परीस्थितीमुळे जन्माला आला.
३) हा गट तो होता, ज्यांनी 'जे जाणले गेले आहे ते' व्यक्त करणार्‍या वेदांना (जे फार आधीच्या द्न्यानी मंडळींने प्रसवले होते. व जे काळाच्या अनुसार विकसित व अद्यवत झाले नव्हते व ज्यात काही कचरा दुसर्‍या क्रमांकाच्या गटाकडून कळत-नकळत घुसविला गेला.) त्यालाच पूजनीय मानून वे वेगळेच धर्म-परंपरा-रीती-भाती विकसित करणारा होता. इथून हिंदू हा धर्म जन्माला आला. त्यातील चूकीच्या परंपरांमुळे पुढील काळात तीसर्‍या क्रमांक असलेल्या नवीन गटाचे इतर धर्म उदयास आले.

आजच्या काळात दुसर्‍या गटाचे कुणी उरलेले नाही त्यामुळे आपण काही तरी मुकतो आहे असे मानण्यातून वरील लेखातील हळहळ व्यक्त झालेली आहे/ असावी.

पाश्चात्य देशात १९०० सालाआधी वर उल्लेखलेल्या पहिल्या क्रमांकाचे गट निर्माण झाले होते व त्यांनी काळानुसार त्यांच्याकडून 'जे जाणले गेले ते' शब्दबद्ध करून नव-नवीन शोध लावले. हे शब्दबद्ध लिखाण 'द्न्यान' म्हणून आज आपण आपल्या आभ्यासक्रमातून पाठ करीत, परीक्शेत भसाभसा लिहून गुण कमावत 'दाटूमिठाचे द्न्यानी' होत तीसर्‍या क्रमांकाचे 'द्न्यानी' नव्हे 'भारवाहक' होत आहोत.

लिपी - लिहीण्याची पद्धती ही ह्या सगळ्या परिवर्तनाची साक्शीदार होती, असते. संस्कृत भाशा हि देवनागरीतून लिहीण्याआधी देखील होती. संस्कृत भाशा पुढारलेली म्हणून देवनागरी देखील 'बेस्टं' हा विचार काहिसा चूकीचाच. देवनागरी व सद्य भारतीय भाशा लिपीच्या ज्या सांगाड्यावर (लिपीचे व्याकरण म्हणा हवं तर..! ) उभारलेल्या आहेत. त्या सांगाड्यामध्ये सुधारणा करणे पुढील काळाची गरज आहे. तुम्ही म्हणाल, झालं रावल्यांची गाडी पुन्हा घसरली. तर तसं नव्हे!

बर्‍याच गोश्टी स्पश्ट करायला वेगळा लेख इथे प्रकाशित करावा लागेल. (व तो मी सध्या लिहीत आहे.)आणी म्हणून थोडे संक्शिप्त स्वरूपात जलदपणे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.-
विचारांना जर लहरी मानले तर त्या लहरींना बंदिस्त करण्याचे काम लिपी करते.
लिपी चित्रबद्ध रेशांपासून बनते.
रेशा बिंदूंपासून अस्तित्वात येते.
बिंदूंच्या एकत्र येण्यासोबत वेगवेगळ्या वळणाने रेशा आखता येतात. आता ह्या वेगवेगळ्या दिशा कोणत्या? असे म्हटले तर डोळ्यांपुढे 'स्वस्तिक चिन्ह' आणता येवू शकते.

स्वस्तिक चिन्हं हे एका बिंदूंपासून पुढे सरकणारी रेशा व तीची दिशा दर्शविते. ढोबळमानाने (फ्रंट व्ह्यूवने) पूर्व-दक्शिण- पश्चिम -उत्तर अश्या आहेत.
ह्यात चार दिशांमध्ये एक दिशा रीवर्सल दर्शवणारी असते. म्हणून तीला आपण वगळले तर कमीत कमी तीन दिशा व्यक्त होतात. त्यांचे क्रमण पुढील चित्राप्रमाणे होवू शकते.

प्रत्येक चिंतनाच्या ह्या टप्प्यावर वेगवेळ्या र्‍हूशींकडून (पहिल्या फळीतील) वेगवेगळ्या संकल्पना व त्यावर आधारलेला डोलारा उभा राहू लागला. ह्या वरील चित्रातील मांडणीतून जशी शिव-पार्वती ची मांडणी झाली तर स्थांनांतरीत मंडळींकडून तेच चिंतनचित्र वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या संकल्पना पुढे घेवून विकसित होत गेले असावे. हे वरील चित्र माझ्या मते ३डी स्वरूपात खालील प्रमाणे दिसू शकते.

काहि मंडळींनी त्याचे प्रतिरूप 'डमरू' म्हणून स्विकारले. तिथून पुढे शंकराचा डमरू वाजला आणी अनेक ध्वनी उत्पन्न होवून त्यातून शीवाचे व्याकरण प्रकट झाले अशी संकल्पना घडत जावून तीचा एक डौलदार डोलारा देखील उभा राहिला.

खालील चित्र ' देवनागरीतील प्रत्येक वर्ण कसा काय चित्ररूपात विकसित झाला असावा?' हे शोधून काढून त्याचे रेखाटन इतिहासतद्न्य वालावलकर ह्यांनी केले होते, ते चित्र लिपीतद्न्य वाकणकर ह्यांनी वालावलकरांच्या मृत्यूआधी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लिहीलेल्या 'गणेशविद्या' ह्या पुस्तकातून जगासमोर आणले होते.

पाश्चिमात्य लिपीचे लॉजिक विशेशतः प्रत्येक वर्णाचे भारतीय लिपींच्या लॉजिकच्या अगदी भिन्न आहे. पण एक साम्य आहे ते म्हणजे लिहीताना 'डावीकडून-पूर्वीकडे जाणारी दिशा'. आगामी काळात ह्या दोन लॉजिकमध्ये सुवर्णमध्य साधत नवा सांगाडा असलेली लिपी विकसित होवू शकते. म्हणजे भारतीय लिपींमध्ये रोमन लिपीत ज्या चांगल्या बाबी आहेत त्या स्विकाराव्या लागतील तर रोमन लिपीला देखील भारतीय लिपींमध्ये ज्या चांगल्या बाबी आहेत त्या स्विकाराव्या लागतील. वर म्हटल्याप्रमाणे - 'विचारांना जर लहरी मानले तर त्या लहरींना बंदिस्त करण्याचे काम लिपी करते.' हे नव्या युगातील विचारांना स्विकारण्यासाठी उपयोगाचे असेल. आत्ता बघां ना! आपण मनात मराठीतून विचार करीत आहोत पण टंकताना - asech taMkata aahota? naahi kaa? रोमन लिपीतील वर्णांचे सुटसुटीपण भारतीय लिप्याना स्विकारावे लागेल. व भारतीय लिप्यांमधील खजुराहोतील शिल्पांप्रमाणे वर्णांचे जे एकमेकांशी लगट करीत, एकमेकांवर आरुढ होत, चुंबा-चुबी करीत (उदा.: 'क्श','त्य', 'थ्य','द्य','ट्र', 'द्ग' इत्यादी प्रकाराद्वारे) व्यक्त होण्याची प'द्ध'त टाळावी लागेल.

रेशांच्या ह्या वक्रीकरणातून व्यक्त होत जाण्याने भारतीय लिपींचा आत्मा प्रकट होत गेला व तो हळू-हळू विकसित होत गेला, (आणी पुढे विकसित होत जायला हवा) ब्राह्मीच्या आधी म्हणजे सगळ्यात वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे ब्राह्मणयुगा आधी हि संकल्पना विकसित झालेली नसावी. त्या आधी काय होते? हे आपल्याला जाणण्याचे कारण काय? पहिली ते पाचवी इयत्तेत उत्तीर्ण होत गेल्यावर आधीच्या इयत्तेत कोण-कोणत्या पुस्तकात कोण-कोणत्या पानावर काय-काय छापलेले होते, शिक्शकांनी काय शिकवले ते आठवण्याने कोणताच फायदा होत नसतो. ते विसरले जावे हिच निर्सगाची इच्छा असते. तसेच मागच्या जन्मात आपण कसे वागलो, कोणाशी काय बोललो तेही आठवले जावे असे निसर्गाला मान्य नसते. अगदी तसेच वर दाखवलेल्या चित्रांमधल्या द्न्यातयुगांआधी काय-काय होते? त्याचे जतन, संवर्धन केले जावे हि अपेक्शा बिनकामाची आहे. ह्या घडीला, प्रत्येक घडीला पहिल्या फळीचे द्न्यानी कसे होता येईल हाच प्रयत्न करणे गरजेचा वाटतो.

बोली भाषा

बडोद्यापासून थोडे दूरवर तेजगढ येथे विविध आदिवासी संस्कृतींच्या अभ्यासासाठी एक केंद्र श्री गणेश देवी या सुप्रसिद्ध बोलीभाषाशास्त्रज्ञतत्त्वज्ञांनी स्थापन केले आहे.त्यांच्याकडून 'ढोल' नावाचे एक नियतकालिक प्रसिद्ध होते.त्यात भारतातल्या आदिवासी बोलींतले साहित्य एकाच लिपीत छापण्याचा प्रयत्न असतो. अनेक बोलीभाषकांना लिहिते करण्याचाही प्रयत्न असतो.

 
^ वर