देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम - भाग २

देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम - भाग २

               भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच  किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही  समजण्याचे कारण नाही. आमचे पूर्वज अत्यंत चारित्र्यवान होते, असे जर कोणी सांगत असेल तर ती सुद्धा लबाडी आहे कारण आर्थिक भ्रष्टाचार हा मनुष्य जातीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून किंवा मनुष्य जातीच्या  जन्माच्या आधीपासूनच अस्तित्वात होता, याचे पुरावे आहेत. देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वतःची नैतिकमुल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो,  असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मिळ नाही. मात्र बिना धूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.

             काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यासारख्या प्राण्यांचा बळी द्यावा लागतो. त्यापैकी काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. नरबळीखेरीज त्यांना दुसरे काहीच चालत नाही. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पुजा अर्चना न केल्यास प्रसन्न होत नाही पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाही. अशा तर्‍हेच्या "प्रसन्न देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते "आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा." 
               मात्र काही देवता वेगळ्याच म्हणजे "ओंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या असतात. अशा देवतांचे स्वरूप फारच वेगळे असते. इथे याचकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा मर्जीला अजिबात स्थान नसते. ठरल्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी त्यांची पुजा करावीच लागते. दहीभात, मलिंदा, कोंबडी, बकरी यापैकी काहीना काहीतरी त्यांना द्यावेच लागते. नाहीतर त्या कोपतात. अशा देवतांना समाजही खूप घाबरतो. कारण या ओंगळ देवतांचा जर क्रोध अनावर झाला आणि त्या कोपल्या तर घरातल्या व्यक्ती आजारी पडणे किंवा मरणे, नैसर्गिक प्रकोप होणे, रोगराई येणे अशा तर्‍हेची संकटे येतील, अशी भिती त्यांच्या मनात दबा धरून बसलेली असते. पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये अशाच तर्‍हेने समाजाची उत्क्रांती झाली असल्याने लाचखोरी आणि भ्रष्टाचार मनुष्यजातीच्या रक्तात पुरेपूर भिनलेला आहे. 
             निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडविला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी काहीना काहीतरी असा एक शारीरिक विशेष गूण किंवा अवयव दिले आहे की त्यामुळे त्याला स्वसामर्थ्यावर जगता येऊ शकेल. जसे की वाघसिंहाला तीक्ष्ण नखे आणि दात, हरणाला पळण्याचा प्रचंड वेग, हत्तीला शक्तिशाली सोंड, सापाला विष, जिराफाला उंच मान, काही प्राण्यांना झाडावर चढण्यायोग्य शरीररचना, मगरीला पाण्यात पोहण्यासाठी खवले, पक्षांना आकाशात उडण्यासाठी पंख वगैरे वगैरे. त्यामुळे त्या-त्या पक्षी-प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार न करता जगणे सोयीचे झाले. त्यांना निसर्गाकडूनच स्वतःचे जीवन जगण्याचे हत्यार आणि ते वापरण्याचे कौशल्य मिळाले असल्याने त्यांना त्यांचे आचरण भ्रष्ट करण्याची गरजच भासत नाही. एका सावध प्राण्याने दुसर्‍या बेसावध प्राण्याची शिकार केली तर त्याला खून किंवा प्राणीहत्त्या मानली जात नाही आणी त्यांना निसर्गानेच तशी मुभा दिली असल्याने ते कायद्याचे उल्लंघनही ठरत नाही. म्हणूनच प्राण्यांना पाप-पुण्याच्या कसोट्याही लागू होत नाही. 
            मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही की तो त्याच्या साहाय्याने स्वतःची शिकार स्वतःच मिळवून आपले पोट भरू शकेल. माणसाला देवाने वाघासारखे तीक्ष्ण नख, हत्तीसारखे दात किंवा सोंड, मगरीसारखी प्रचंड ताकद यापैकी जरी काहीही दिले नसले तरी त्याऐवजी बुद्धीसामर्थ्य दिले आहे. बुद्धीसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा देऊन टाकले आहे आणि इथेच खरी मेख आहे. बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे व्यक्तीनिहायस्वातंत्र्य हेच मानवजातीच्या संबंध वर्तनाचे आणि गैरवर्तणुकीचे कारण ठरले आहे. बुद्धीचा वापर कसा करावा याचे नियंत्रण जर निसर्गाच्या स्वाधीन असते तर माणुसकी, सज्जनता, नैतिकता यांच्या व्याख्या करण्याची गरजच भासली नसती. तसेच माणसाने नीतिनियमाने वागावे म्हणून कायदे करण्याची गरजच भासली नसती. माणसाचे आचरण निसर्गाने नेमून दिलेल्या चौकटीतच राहिले असते. 
               माणसाच्या वर्तणुकीचे नियमन निसर्ग करत नसल्याने व आपापल्या बुद्धीचा वापर कसा करावा याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असल्याने मानवीजीवाच्या व्यक्तीगत हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मानवी जीवांच्या समुच्चयातूनच समाज बनत असल्याने प्रत्येक मानवी जीवाने व्यक्तीगत पातळीवर समाजाला पोषक हालचाली करणे म्हणजे नैतिकता आणि समाजाला नुकसान पोहचेल अशी हालचाल करणे म्हणजेच अनैतिकता, अशी एक ढोबळमानाने व्याख्या तयार झाली असावी. समाजरचना ही परिवर्तनशील असल्याने मग नैतिकतेच्या व्याख्याही त्यानुरूप बदलत गेल्या असाव्यात. 
             एखाद्या व्यक्तीने केलेले वर्तन जर उर्वरित समाजाला पीडादायक ठरत असेल तर त्याचे ते वर्तन गैरवर्तन ठरत असते. या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे. मोह आणि स्वार्थ हा सजीवांचा स्थायीभाव असल्याने आणि मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा असल्याने, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे लपतछपत चौर्य कर्म करून, घेता येईल तेवढा लाभ पदरात पाडून घेणे, ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. ही प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. गैरवर्तन किंवा भ्रष्टाचार ही न संपवता येणारी गोष्ट आहे. मात्र समाजहिताच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मार्गाने व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. 
             विविधता हा निसर्गाचा मुख्य गूण असल्याने जन्माला येणारी माणसेही जन्मताच नानाविध प्रवृत्तीची असतात. काही माणसे निष्कलंक चारित्र्याची असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो. काही माणसे समाजाला व सामाजिक कायद्याला जुमानत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात, काही माणसांच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणारी असतात मात्र माणसांचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो.
            मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचार धार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.

(क्रमशः:)                                                                                                                                गंगाधर मुटे

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

ओह

ओह

प्रथा

प्रथा अशी न्यारी या उत्तम कांबळेंच्या पुस्तकात काही देवतांना तर 'देशी' च लागते असा उल्लेख आहे. बाकी गणपतीला तू मला परिक्षेत पास कर ( अभ्यास केला नाही तरी बी) मी तुला २१ मोदकांचा नैवेद्य वाहीन असा नवस करणारे विद्यार्थी असतात. इथेच लाच चालू होते
प्रकाश घाटपांडे

'सत्यम बटबटीतम आक्रोशम'


विधान १ :मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचार धार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही. हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.



विधान २: एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.


श्री. गंगाधर तुम्ही परस्पर विरोधी विधाने एकापाठोपाठ लिहून नेमके काय सांगू पाहता? पहिल्या विधान खरे मानले म्हणेज भ्रश्टाचार जर काबूत करणे अशक्य असेल तर....तर दुसरे विधान कुचकामीच ठरते.

हे एवढे सोडले तर एक मात्र खरे कि तुम्ही दोनही लेखात जे विचार मांडले आहेत ते सत्याच्या जवळ जातात. पण आपण केलेल्या चिंतनातून सत्याची असद बाजूच लेखातून अधोरेखीत होत आहे. त्यामुळे दोनही लेख काहिसे 'सत्यम बटबटीतम आक्रोशम' वाटत आहे.

'सत्यम, शिवम, सुंदरम' हे हिंदू संस्कृतीचे आधारपद.

सत्यम म्हणजे 'जे सत्य आहे असे ते'.
शिवम म्हणजे 'सत्याची जी चांगली बाजू आहे' अशी ती.
सुंदरम म्हणजे 'बुद्धीच्या विवेकी अवस्थेतून प्राप्त होईल अशी दृश्टी'
सोप्या शब्दात - सदसतविवेक बुद्धी चा विजय होवो किंवा चिरकाल टिको!

जेंव्हापासून माणूस गाईचे तिच्या वासरासाठी असलेले दूध काढून स्वत:च्या वापरासाठी करू लागला, मानले तर, तेंव्हापासूनच मानवाच्या प्रगतीची सुरवात झाली.
परंतु आपण म्हणता त्या दृश्टीने पाहिले तर, हा देखिल भ्रश्टाचारच आहे!
परंतु 'सदसतविवेक बुद्धी' चा वापर करून म्हटले तर, 'ती एक घटना आहे - मानव व पशू यांमध्ये असलेली परस्परावलंबनाची.
कारण तसे नसते तर, प्रेयसीला फूल देणं म्हणजे तर प्रेमातील भ्रश्टाचार म्हणावा लागेल. अन् म्हणूनच आपल्या लेखात मला काहितरी चूकतय असे वाटत होते. हा प्रतिसाद देण्यास म्हणूनच उशीर झाला.

आत्ता आपण 'भ्रश्टाचार' ह्या शब्दाचा शब्दश: विचार करू.
त्या शब्दाची फोड करायची म्हटली तर - भ्रश्ट + आचार
भ्रश्ट = बिघडलेले, विकारांनी भरलेले
आचार ='देवाण-घेवाणीशी संबंधित औपचारीकता'

'देवाण-घेवाण' म्हणजे काय? हे समजणे कठिण नाही. पण 'औपचारीकता' व तीही 'देव-घेवीशी संबंधित अशी' हे समजणे व समजावणे काहिसे कठिण आहे.
बरं ह्या 'आचराणातल्या औपचारीकता' पाळायच्या तरी कशा असतात? देवाण-घेवाणीचा व्यवहार करताना समोरची व्यक्ती/संस्था समोर दिसत नसली तरीही ह्या औपचारीकता पाळणे गरजेचे असते कां?

ह्या प्रश्नांची उत्तरे उदाहरणासहीत परदेशातील विशेशपणे युरोपातील किंवा जपानमधील उपक्रमी सदस्य स्पश्ट करू शकतील. मला उदाहरण द्यायला जमायचे नाही, अजून तरी नाही. पण मी विचार करून हे ठामपणे सांगू शकतोय कि 'आचरणातील औपचारीकता' पाळण्याने भ्रश्टाचार कमी करता येवू शकतो. इथे मी, 'जे भ्रश्टाचारपिडीत व्यक्ती आहेत' त्यांबद्दल बोलत आहे.

आपले काम करून घेताना भारतातील लोकं कसे बोलतत? त्यांची देहबोली कशी असते? त्या प्रसंगात ते मानसिकदृश्ट्या किती स्थिर असतात? ह्या गोश्टींची तुलना परदेशातील लोकांशी केली जायला हवी. टाळी एका हाताने वाजत नाही.

उतावळ्या, बेसावध, चिड-चिड करणार्‍या, काहि गोश्टींची जबाबदारी आपणहून न स्विकारणार्‍या व्यक्तीला आपले काम करून घेणे सोपे आहे कां? तो ' काहितरी गमावतो' त्यानंतर 'ते' जे तो गमावला आहे ते परत मिळवण्यासाठी त्याला पैशाची वा इतर गोश्टीची लाच द्यावी लागते. हो! आत्ता एखादा आजार खूपच बळावतो तेंव्हा प्राथमिक स्तरावर जे उपचार उपयोगी पडू शकतात ते त्याला अगदी शेवटच्या स्तरावर उपयोगी पडतीलच असे नाही. 'आचरणात आलेल्या वाईट सवयी' दूर होण्यासाठी व 'आपले काम करून घेताना आपण कसे वागावे? कसे बोलावे? आपली देहबोली कशी असावी? ह्याचे प्रशिक्शण जनतेला दिले गेले तर नक्कीच फरक पडेल. मी ह्याच गोश्टींना 'व्यवहार करतानाच्या आचरणातील औपचारीकता' म्हणत आहे.

विधाने परस्पर भिन्न नाही.

विधान १ :मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचार धार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही. हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे.

विधान २: एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.

ही दोन विधाने परस्पर भिन्न नाही.
ही दोन विधाने एकत्र केली तर

मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचार धार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही. कायदे, नैतिकतेचे धडे यासोबतच आणखी काही उपाययोजना केल्या तरच भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवता येईल. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.

लेखात मांडलेले विचार आणि दाखले केवळ "भ्रष्टाचार" या मुद्द्यापुरतेच मर्यादीत घ्यावे. मुलभूत मानवी प्रवृत्ती आणि भ्रष्टाचार यांचा संबध उघड करण्यासाठी काही दाखले द्यायची गरज भासली म्हणून घ्यावे लागले.

पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

 
^ वर