थांबावे कुठे, कधी, कसे?

जनलोकपाल बिल पास होईपर्यंत रामलीला मैदान सोडणार नाही ही अण्णा हजारेंची नवीन घोषणा,शिरीष कणेकर यांचे ’लोकप्रभा’ मधील ’याद आने लगी’ नावाचे (सध्या तरी) दोन लेख आणि सोनी टेलिव्हिजनवर नुकत्यानेच परत सुरु झालेला ’कौन बनेगा करोडपती’ हा अमिताभ बच्चन यांनी सादर केलेला कार्यक्रम या परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या घटनांमध्ये एक अदृष्य सूत्र आहे. बिरबलाच्या 'न फिरवल्याने' या उत्तराच्या प्रश्नाप्रमाणे. ते म्हणजे या तीघांनाही कुणीतरी 'कुठे थांबावे' हे सांगणे आवश्यक आहे. अण्णांच्या आंदोलनाबाबत इतके बोलले-लिहिले जात आहे की या चर्चेत तो विषय नको. पण कणेकरांसारखा कोणे एके काळी 'टंग इन चीक' पद्धतीचे बर्‍यापैकी लिखाण करणारा लेखक आता फक्त आठवणींचे सांगाडे उकरत परत परत लता, दिलीपकुमार, गुलाम हैदर यावर लिहीत राहातो याला काय म्हणावे? भारतीय टेलीव्हिजनवरील 'गेम शो' ला एक नवी उंची देणारा अमिताभ बच्चन आता थकलेल्या शरीराने आणि थकलेल्या आवाजात 'केबीसी' चे चामडे चघळत बसतो याला काय म्हणावे? अनिल अवचटांनीच हे लिहिले आहे काय असा प्रश्न पडावा इतके सुमार आणि बालीश सदर ते 'सकाळ' मध्ये चालवत राहातात हे कशासाठी? (देवानंदचे उदाहरण कितीही चपखल असले तरी ते देण्याचा मोह टाळतो.) कुठे कधी आणि कसे थांबावे हे इतक्या जुन्या-जाणत्या लोकांना कळत नाही असे तरी कसे म्हणावे?
व्यवस्थापनशास्त्रात ’प्रॉडक्ट लाईफ सायकल’ नावाची एक संकल्पना आहे. कोणत्याही वस्तूला, कल्पनेला आविष्काराला एक विशिष्ट आयुष्य असते. त्यानंतर लोकांची रुची बदलते, तंत्रज्ञान बदलते आणि मग त्या गोष्टी हळूहळू कालबाह्य होतात. जरा विचार केला तर हे सगळ्याच गोष्टींना – अगदी साबणचुर्‍यापासून संकेतस्थळांपर्यंत सगळ्या गोष्टींना – लागू आहे हे ध्यानात येते. आपल्या उत्पादनांत, सेवेत, किंवा स्वतःमध्ये नित्यनेमाने बदल घडवून आणणारे लोक अशा ढासळत्या स्थितीतही लोकप्रियता टिकवून राहतात. पण हे अवघड काम आहे. बहुतेक गोष्टींचा बहर कधी ना कधी ओसरतो. तरीही अट्टाहासाने प्रकाशात राहाण्याचा प्रयत्न मग केविलवाणा होऊ लागतो. असे बालगंधर्वी केविलवाणे होऊन रसिकांनी, चाहत्यांनी झिडकारुन टाकण्याची वाट हे लोक का बघत बसतात? आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने जे मिळवायचे ते मिळवून झाले, जे करायचे ते करुन झाले की दिमाखात पडद्याआड जाणे या प्रतिभावंतांना का जमत नसावे?
मराठीतल्या एका प्रसिद्ध कथाकाराने आपल्या आयुष्यातली शेवटची बारा वर्षे एकही कथा लिहिली नाही. त्या काळात त्याचे जे लिखाण प्रसिद्ध झाले ते त्याने आधीच कुठेकुठे लिहिलेले होते. कलेच्या इतरही क्षेत्रांत अशी उदाहरणे आहेत. तेंडुलकरांनी तर आपले आयुष्यच कुठे संपावे याबाबत पक्की योजना करुन ठेवलेली होती. आपल्या क्षेत्रातल्या शिखरावर असताना - मग ते शिखर कितीही लहानसे असो -, लोकांनी 'आता पुरे' असे म्हणायच्या आधी थांबावे हे भल्याभल्यांना का कळत नसावे?

लेखनविषय: दुवे:

Comments

नशा ?

"आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने जे मिळवायचे ते मिळवून झाले, जे करायचे ते करुन झाले की दिमाखात पडद्याआड जाणे या प्रतिभावंतांना का जमत नसावे?"

~ नशा म्हणावी तर मग 'अजून किती दिवस नशेत राहायचे यांच्या मनी आहे?" असाही रसिकाला प्रश्न पडत राहतो. अनुक्रमणिकेत 'वि.आ.बुवा, मधु मंगेश कर्णिक' या नावाना जसे वाचक पलटून पुढे जातो तसेच कणेकर नावाचे झाले आहे. साप्ताहिकांना तर काय छापायचे हा प्रश्नच असतो. आठवड्यातील राजकारणाच्या चपात्या पहिल्या आठदहा पानात भाजल्या की मग उरलेल्यामध्ये किती कॅटरिन्या, राख्या, रेसिप्या, फॅशन्या आणि टेक्नोक्राफ्ट् आदीबद्दल मॅटर देणार संपादक ? मग मुळ्याच्या लोणच्याप्रमाणे दोन-तीन पाने कणेकर संझगिरी नावाकडे टाकली जातात. यांच्याकडेही असते रद्दी ढीगभर, उचलायचा त्यातील एखादा भाग आणि घ्यायचे त्याबदल्यात शे-दोनशे. संपला यांचा आठवडा.

पण निदान ही मंडळी एका ठराविक मासिक उत्पन्नासाठी ही अंक डागडुजीची कुंभार-कामे करतात असे म्हणण्यास वाव तरी आहे, पण बिग बी सुद्धा ? कशासाठी आपण किती 'तरतरीत' दिसतोय हे दाखविण्याचा अट्टाहास ? सुरुवातीच्या केबीसीचा चार्म आज तुझ्यात राहिलेला नाही, असे जया सांगत नसेल त्याना ? मग सोनी प्रत्येक एपिसोडमागे १ कोट मानधन देते त्यासाठी मेकअपचा तो डबल थर लावून त्या खुर्चीत बसायचे ? फार खिन्न वाटले पहिल्याच एपिसोडवेळी.

अजूनही उदाहरणे देता येतील. त्यातील प्रमुख अर्थातच गानकोकिळा लता मंगेशकर यांचे. परवाच केरळचा 'येसूदास' नावाचा एक पुरस्कार लता मंगेशकरांनी स्वीकारला. कसला हा सोस ? कुठली ती संस्था आणि आता एकदा देशातील "भारत रत्न" या सर्वोच्च नागरी पुरस्काराने राष्ट्रपतीनी गौरविल्यानंतर त्यापुढे कोणत्याही गल्लीबोळातील आणि कुठल्याही नावाची अवॉर्डस् घेण्यामुळे कसला हर्ष आपल्यात निर्माण होईल ? याचा विचार दिदींनी करायला पाहिजे असे त्यांच्याविषयी अभिमान बाळगणार्‍यानी केला तर ते चुकीचे होणार नाही. २००१ मध्ये भारत रत्नचा किताब मिळाल्यानंतर अगदी कालपर्यंत त्याना डझनभर पुरस्कार जाहीर झाले, देण्यातही आले. देणारे देत असतील पण 'कुठे थांबावे' हे गानसम्राज्ञीला समजत नसेल ?

दुर्दैवाने वंडरबॉय सचिनबद्दलही असेच लिहिण्याची [जवळजवळ] वेळ आली आहे.

अण्णांच्या आंदोलनाने सरकारला धडा शिकवल्याशिवाय् थांबु नये

अण्णांच्या आंदोलनला इतरांच्या पंक्तीत बसवणे सर्वस्वी चुकीचे आहे. बाकीची दोन् उदाहरणे ही सर्वस्वी मनोरंजनाशी (ते ही विशीष्ट वर्गाशी) निगडीत् आहेत्. ते (सदर्, कार्यक्रम) चालले काय् व् न चालले काय् , काही फरक् पडत् नाही.
अण्णांचे आंदोलन् सर्व लोकांच्या आयुष्यावर् दुरगामी परीणाम करु शकते. ते जर् आता थांबले तर् , सरकारचा आत्मविश्वास बळावेल. आपण् काहीही करु शकतो , आपल्याला जबाब विचारणारे कोणी नाही असा आत्ता असलेला समज बळावेल . ते आपणा सर्वासाठी घातक् आहे. (म्हातारी मेल्याचे..........)
कृपया चुकीची उदाहरणे देउन बुध्दीभेद करु नका.
(आवांतरः नशीबाने कोणी असा अनाहुत सल्ला म.गांधींना दिला नव्हता , कींवा दिला असल्यास त्यांनी तो अमलात आणला नसावा, नाहीतर स्वातंत्र्य मिळायला अजुन् किती वेळ लागला असता , कोणास ठाउक)

केव्हा थांबावे?

लोकांनी 'आता पुरे' असे म्हणायच्या आधी थांबावे हे भल्याभल्यांना का कळत नसावे?

ह्याच अर्थाचे एक चपखल इंग्रजी वाक्य मी कोठेतरी वाचले आहे. Go while others ask why. Do not wait till they start asking why not.

मार्केट

ज्या अर्थी धंदेवाईक दृष्टीने चालवले जाणारे चॅनेल / साप्ताहिक या व्यक्तींना आमंत्रित करते त्या अर्थी त्यांचे मार्केट अजून शाबूत असणार.

शिरीष कणेकरांच्या मेतकुटात त्यांचे पैलतीरी लागलेले डोळे जाणवतात तरी मी स्वतःही ते न चुकता वाचतोच. ते ज्या आठवणी लिहितात त्या भले जुन्या असतील पण त्या वाचायला आवडणारा वर्ग असणारच. मध्यमवयीन आणि म्हातार्‍यांचा का असे ना !

तसेच अमिताभ बच्चन यांनी करोडपतीचे सूत्रसंचालन करणे ही अमिताभ यांची नसून प्रायोजकांची गरज असावी. त्यांच्याखेरीज इतराम्नी या सूत्रसंचालनाचे केलेले प्रयत्न फसलेले आहेत हा इतिहास शिल्लक आहेच.

तुम्हा-आम्हाला वाटतात तसे ते खरंच नकोसे होतील तेव्हा चॅनेलवाले आपोआपच त्यांना बाजूस सारतील.

नितिन थत्ते

बरोबर् आहे

बरोबर् आहे.
अमिताभ बच्चन् यांचे सूत्र संचालन् खरोखरच् वाखाणण्यासारखे आहे.
कार्यक्रमाला लोकप्रीय् करण्यात् त्यांचा सहभाग् अत्यंत् महत्वाच आहे. ते ज्या तर्हेने पद्धतीने समोरच्या व्यक्तीला हाताळतात् त्यामुळे त्यांच्या बद्दलचा आदर् दुणावतोच.
त्यांच्या सूत्रसंचालनावर् टीका करणारे स्वतः कसे तोंडघशी पडले ते सर्वद्न्यात् आहे

कंटाळा

काही अंशी अशोक पाटील आणि नितीन थत्ते ह्यांचाशी सहमत.

तेच ते चेहरे तेच ते काम करताना पाहून कंटाळा येतो खरा, त्यातून ते चेहरे प्रतिभावान व्यक्तींचे असतील तर जास्तच खेद होतो.

पण बहुदा त्यांचा बाजूचा विचार केला तर - अनेक वर्ष प्रतिभेशी निगडीत क्षेत्रात काम केल्यावर, प्रसिद्धी, पैसा आणि वलय ह्याची सवय लागल्यावर त्यापासून दूर जाणे कठीण असू शकते. ते डोपामाईन का काय ते म्हणतात ते डोक्यात सिक्रीट होणार नाही आणि त्याची भूक लागल्यावर त्रास होणार, हे बहुदा सर्वच क्षेत्रात निवृत्त होताना होत असावे.

आणि कदाचित तुमची/आमची चव बदलली असेल असेही असू शकते की, कधी काळी आवडणारी नुक्कड मालिका(किंवा तत्सम) आज परत बघितल्यावर तेवढी भावत नाही, बदल रसग्रहण करणाऱ्यामध्ये देखील होऊ शकतोच की!!

प्रतिभेशी निगडीत क्षेत्रात माणसांच्या बदलत्या चवींना खाद्य पुरविण्यासाठी सतत गोष्टी बदलत ठेवाव्या लागतात, त्यामुळे मिडियामध्ये स्थिरता नाही हि तक्रार बऱ्याचदा ऐकायला मिळते.

You Either Die a Hero, or You Live Long Enough To See Yourself Become the Villain - डार्क नाइट

प्रतिसाद

लेखातल्या मतांशी सहमत आहे.
काही इतर सुचलेले मुद्दे :
१. बदलत्या काळाप्रमाणे आयुर्मर्यादा वाढलेली असणे हा घटक इथे संभवत असेल का ? एक शक्यता : काही वर्षांपूर्वी पर्यंत तरी "हे मानकरी अजून इथे कार्यरत का आहेत" अशा स्वरूपाचे विचार येण्याची शक्यता कमी होती कारण सरासरी आयुर्मान आणि एकंदर आरोग्यविषयक सुविधा कमी असल्याने वृद्धत्वी कार्यरत असण्याच्या घटना पूर्वी तुरळक होत्या आणि आता मात्र बर्‍यापैकी घडताना दिसतात.

२. overstaying their welcome या स्वरूपाची घटना आजची नव्हे मात्र याबद्दलची पब्लिकची संवेदनशीलता मात्र अधिक तीव्र झाली असल्याची शक्यता आहे. विविध माध्यमांमधे जसजशी नव्या उमेदीच्या , गुणवान व्यक्तींना मिळत असलेल्या संधी अधिकाधिक उपलब्ध होत जात आहेत तद्वत् आम पब्लिकला निबर चेहर्‍याच्या , वर्ख उडून गेलेला असतानाही मेकप आणि इतर "पॅडींग्" लावून काही झालं तरी प्रकाशात राहाणार्‍या कलावंतांना नकार देणे सहज शक्य होत असावे.

३. बर्‍याचदा जेव्हा आपण त्याच त्याच चेहर्‍याच्या त्याच त्याच कंटाळवाण्या लोकांच्या कंटाळवाण्या कामांना सामोरे जातो आहोत असा अनुभव येत असेल तर , आपणसुद्धा आपला कंटाळवाणा रस्ता बदलणे अपरिहार्य ठरते. जर का जुनी नियतकालिके , जुन्या संस्था , जुन्या कंपन्या नवीन काळाची पावले ओलांडून नव्या उन्मेषांना वाव देत नसतील तर अशा स्वरूपाच्या गोष्टींकडे just for the old times' sake जाणे या मधे ग्राहक/रसिक/श्रोता/वाचक/प्रेक्षक या नात्याने आपलीच मोठी चूक आहे हे आपल्याला मान्य करावे लागते.

आरसा ...

मला आता आरस्यात बघने सोडावे लागेल. रोज तोच चेहरा पाहतोय.

जोक्स अपार्ट , माणूस तोच असला तरी चालेल , त्याची रुप वेगवेगळी असावीत. प्रत्येक वेळी अधीक प्रगल्भ. १९८० चा अमिताभ आणी आजचा केबीसी मधील अमिताभ ह्या खूप फरक आहे. जेंव्हा जेंव्हा अमिताभला पाहतो मला एक प्रेरणा मिळतेच.

उलट , कधी थांबायचं असं ठरवणं म्हणजे नेगाटीव्ह विचारधारा आहे. मी जेंव्हा उद्या थांबायच असा विचार आणतो तेंव्हा मी आजच थांबलेला असतो.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

प्रतिमा

"जेंव्हा जेंव्हा अमिताभला पाहतो मला एक प्रेरणा मिळतेच."

~ लाखो नव्हे करोडोंसाठी अमिताभ एक प्रेरणास्थान बनले होते [आजही आहे/असेल]. मग तसे एकेकाळी 'बालगंधर्व' ही होते, पण साठी ओलांडल्यानंतरही "दादा ते आले ना?" अशी पृच्छा करत रंगमंचावर येण्याचा त्यांचा अट्टाहास पाहून त्यांच्या चाहत्यांच्या मनाला कशाप्रकारे वेदना झाल्या असतील त्याची कल्पना आपण करू शकतो. पु.लं.नी तर 'बिच्चारे सौभद्र' असे एक प्रहसनही लिहिल्याचे स्मरते.

'प्रतिमा' चाहत्यांच्या मनी लख्खच राहणे ही भावना दोन्ही बाजूंचा विचार करता स्वीकृत होण्यासारखी आहे.

"कधी थांबायचं असं ठरवणं म्हणजे निगेटीव्ह विचारधारा आहे."
~ बरोबर. पण हा नियम उद्योगधंद्याशी निगडित असणार्‍यांना काहीसा लागू होऊ शकेल. उदा. टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर आदी. ही मंडळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या क्षेत्राशी अथकपणे कार्यरत राहिली तर ते स्वागतार्हच मानले जाईल. पण वरच्या प्रस्तावात राजकारण, कला, साहित्य या बाबींकडे प्रस्तावकाने लक्ष वेधले असल्याने त्या क्षेत्रातील 'कलाकारां' च्या संदर्भात केलेल्या टिपणीकडे निगेटिव्ह विचारधारा म्हणता येणार नाही, असे वाटते.

?

थोडा फरक आहे असे वाटते. "दादा ते आले ना?" हे उदाहरण तारुण्यात सादर करत असलेलीच कलाकृती वार्धक्यात सादर करीत राहण्याचे आहे. (काहीच वेगळे नाही). परंतु बच्चन यांचे उदाहरण तसे नाही. एकतर ते चित्रपटांत जख्मी किंवा दीवार मधलीच भूमिका आज करत नाहीत. दुसरे म्हणजे करोडपतीचा शो प्रेक्षणीय* करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

*बाकीचा वाटा "अरेच्चा !! १५ पैकी ७ ची उत्तरं तर मलाही माहिती होती" असे प्रेक्षकांना वाटण्यात आहे.

नितिन थत्ते

केबीसी

"करोडपतीचा शो प्रेक्षणीय* करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे."

~ नि:संशय त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. यात दुमत संभवतच नाही. प्रश्न आहे तो मनी होत असलेल्या तुलनेचा. अकरा वर्षापूर्वी अमिताभमध्ये असलेला खळाळता उत्साह आजच्या केबीसी-५ मध्ये कितपत असेल याचा आलेख नजरेसमोर आणल्यास चित्र उतरते दिसते. [अर्थात हे मत व्यक्तीगत मानावे]. प्रकृती अस्वास्थ्यामुळे केबीसी-२ चे तर चक्क २४ एपिसोड त्याना पुरे करता आले नाहीत आणि मध्येच तो कार्यक्रम थांबविण्यातही आला. ही गोष्ट २००५ मधील.

पण असो. लोकांना 'सासबहूदिरभावजय + बालिका वधू' पासून काही अंशी दूर घेऊन जात असेल केबीसी...तर वेलकम !

"*बाकीचा वाटा "अरेच्चा !! १५ पैकी ७ ची उत्तरं तर मलाही माहिती होती" असे प्रेक्षकांना वाटण्यात आहे."

~ होय. याबद्दल खुद्द सिद्धार्थ बसू यांच्या [बरखा दत्त यानी घेतलेल्या] मुलाखतीत ऐकले होते. ते म्हणाले की, 'असे प्रेक्षकांना वाटणे हीच तर केबीसीची जादू आहे. प्रश्नसंच तयार करताना, विशेषतः पहिले पाच प्रश्न, टीम अशी काळजी घेते की बच्चन यानी प्रश्न विचारता क्षणीच घरात टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकाला वाटले पाहिजे की, अरेच्या मला याचे उत्तर माहीत आहे, मग मीदेखील का भाग घेऊ नये या स्पर्धेत."

मग सुरू झाली होती ती "अब लाईन्स खुली है. घुमाईये डायल."

थांबावे कुठे, कधी, कसे

थांबावे कुठे, कधी, कसे?

हा प्रश्नच मुळात स्थळ/काळ/व्यक्ती सापेक्ष असल्याने त्याला एकच असे उत्तर देता येणार नाही. मात्र वर दिलेल्या सार्‍या उदांमधे आपल्याला सहभागी होण्याची/वाचण्याची/ऐकण्याची/बघण्याची सक्ती त्या व्यक्तीने केलेली नाही तोपर्यंत त्यात मला गैर वाटत नाही

(हलकेच घेण्यासाठी: हे म्हणजे श्री ओक यांना किती वेळा नाडीवर लिहाल? किंवा श्री. सन्जोप रावांनी पुस्तक वाचन करून त्यावर लेख लिहिणे कधी थांबवाबे? असे विचारणे झाले ;) )

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सुरवात कशी, कुठुन, कधी करावी?

प्रतिसादाशी सहमत. 'सहमत' म्हणजे 'माझेही हेच मत'!

'इतरांनी कोठे? कधी? कसे? थांबावे.' असा विचार करणे मला योग्य वाटत नाही.

मी स्वतः अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांविशयी ऐकू, वाचू इच्छित नाही. कणेकर यांचे विचार खूप वर्शापूर्वी, दुचिवार ऐकले तेंव्हा पासून, मला खूप कुजकट वाटतात. आणी मी ते कधीही वाचलेले नाहीत/ वाचू इच्छित नाही.

मी स्वतःला ह्या बाबतीत लगेचच थांबवलेले आहे. त्यांनी थांबावे कि नाही याचा मी विचार कां करू? मला स्वतःला अजून 'मी सुरवात कशी करू?' हेच कळत नाही. आणी हा विचार खोलात जाऊन करता-करताच माझ्याकडून अनेक कृती नेहमीच ('लिखाण देखील') विस्फोट झाल्यासारख्या व्यक्त होतात. त्याचा मला कधी-कधी फायदा होतो आणी बर्‍याचदा नव्या आव्हानांना सामोरे जाणे क्रमप्राप्त होते.

सध्या लेटेस्ट 'अण्णा हजारे', 'गौतम गंभीर' यांविशयी वाचायला, पहायला आवडते.

कुठे थांबावे हे कळलेली माणसं!


थांबला तो संपला

'थांबला तो संपला' असा वाक्यप्रयोग प्रचलित आहेच. आपण थांबलो तर लोकांच्या स्मृतिपटलावरुन आपण विरुन जाउ याचेही भय प्रसिद्ध लोकांना असतेच. या ना त्या प्रकारे प्रसिद्धीचा झोत आपल्यावर राहील याची काळजी अनेक लोक घेतात. खुर्ची ला चिकटून राहण्याचे कसोशीने प्रयत्न करणारे व प्रसिद्धी वाचून तडफडणारे मला एकाच प्रकारचे वाटतात.
वर्कहोलिक माणसे सतत काम करत राहतात कारण त्यावरच त्यांचे अस्तित्व अवलंबुन असते. त्यांनी तसे केले नाही तर त्यांना नैराश्य येईल.
ज्याला कुठे थांबायच हे अचुक समजल आहे तो खरा यशस्वी असे ही म्हटले जाते. लोकांनी आपल्याला टाळण्यापेक्षा आपणच मर्यादेत राहिलेले बरे असा व्यावहारिक विचार करणारे ही अनेक आहेत.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर